Monday, 1 December 2025

अवमूल्यन राजनीतीचं विचारधारांचं...!

"गळ्यात गळा घालून उभे राहणारे गळा कसा कापायचा, किती कापायचा, कुणाचा, कधी कापायचा याची खलबतं सतत चाललेली असतात. गोरगरिबांना सेवासुविधा देण्यात एकमत आहे झेंड्याचे रंगसुद्धा तसे फार वेगळे कुठे आहेत? सेनेचा भगवा तिरंग्यात वर आहे तर भाजपत तो आडवा घातलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना वरखाली ठेऊन मध्ये पांढरा आणलाय. तिघात भगवा कॉमन! उडीदामाजी गोरे काळे प्रमाणे सारेच एका माळेचे मणी आहेत. नेत्यांना आपले सारे उद्योग बिनबोभाट पार पाडण्यासाठी नंदीबैलांचा एक कळप हवा असतो. काही चलाख धूर्त, काही विरोधी गटातले उपद्रव देण्याचं सामर्थ्य असणारे आणि बाकी माना हलवणारे नंदीबैल घेऊनच राज्य चालविण्याचा परिपाठ सुरूय. सध्या राजनीतीचं, राजकीय विचारधारांचं पराकोटीचं अवमुल्यन झालेलंय. राजकारणात जो जनतेला जास्त शिताफीने वेड्यात काढेल तोच सत्तेत बसतो हे दुर्दैव आहे. राजकीय अनागोंदीने ग्रासलेल्या समाजाला आधार हवाय. आज संवेदनशील, अभ्यासू, राजकीय, सामाजिक समाजसेवकांची मात्र वानवा आहे...!"
----------------------------------------------
'आम्हाला २ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे....!' असा उघड इशारा भाजपनं मित्रपक्षाला  दिलाय. याचा अर्थ काय तो त्यांनी घ्यावा असंही त्यांनी म्हटलंय. राजसत्तेत असलेल्यांना इथं रामराज्य अन् रामाला आणायचं होतं, रामात रममाण व्हायचं होतं, पण ते आता रम, रमा, रमी यांच्यात रमलेत...! कृषिमंत्री तर भर विधानसभेत मोबाईलवर रमी खेळतात. गृहराज्यमंत्री आपल्या आईच्या नावानं डान्सबार चालवतात. 'लाडकी बहीण' योजनेला चालवण्यासाठी दारूचे नवीन लायसन्स नव्याने इशू करताहेत. दारूवर टॅक्स वाढवलाय. स्वतःच्या पक्षाचे तब्बल १३२ आमदार असतांना संजय शिरसाट, दादा भुसे, नीतेश राणे, संजय राठोड, माणिकराव कोकाटे, प्रताप सरनाईक, योगेश कदम अशा मंत्र्यांना सहन करणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पहिलेच मजबूर मुख्यमंत्री ठरलेत...! यात एक नाव राहिलंय, एकनाथ शिंदे यांच नगरविकास खाते आणि त्यांची कामे (MMRDA) यांचं जर ऑडिट केलं तर खूप मोठी अनियमितता दिसेल. शिवाय मेट्रो, नावाशेवा, समृद्धी आणि इतर महामार्गाच्या काँट्रॅक्टरकडून किती पक्ष निधी मिळाला याचीही चौकशी होणं आवश्यक आहे. विरोधात असताना उठसुठ राजीनामा मागणारे फडणवीस आज कसे एखाद्या लाचारासारखे सारं उघड्या डोळ्यानं पाहताहेत. यालाच कर्म म्हणतात, पूर्वी कारण नसताना राजीनामा मागणं आणि आता कारण असतानाही राजीनामा मागता न येणं किती दुर्दैवी आहे हा प्रकार....! ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सर्वांना मांडीवर घेऊन सरकार चालवावं लागलंय. सत्तेवर आल्यानंतर जनतेसाठी जे काही काम केलंय, त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिलंय हे सांगण्याऐवजी 'तुम्ही आम्हाला मतं द्या तरच तुम्हा निधी उपलब्ध करून देऊ..!' असं सांगितलं जातंय. मग तीन पायाचा हा पांगुळगाडा तिजोरीवर शाब्दिक कोट्या करतोय. कामाऐवजी सरकारी पैशावर मतं मागताहेत. जणू यांनीच कष्ट करून, आपला जमीन जुमला विकून तिजोरी भरलीय! एक म्हणतो तिजोरी आपल्याकडे आहे, तर दुसरा म्हणतोय तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत. तर तिसरा म्हणतोय आपल्याकडेही दुसऱ्या चाव्या आहेत. यांच्या या 'सुंदोपसुंदी' मध्ये विरोधक हरवलेले दिसताहेत. त्याची स्पेस राहिलेली नाही. नाहीतरी राजसत्तेला विरोधक नकोच आहेत. त्यांच्यापासून त्यांना मुक्तीच हवीय...!
*कोण कुठं होते नी कुठं पोहोचले!*
आज राजकारणात काही घडू शकते इतकी अस्थिरता नाही आणि दाखवलं जातंय तेवढं वैचारिक मतभेद आता राहिलेले नाहीत. मुळात कुणीही कुठल्याही विचारांशी निष्ठेनं बांधलेला नाही. अगदी भाजपचे कार्यकर्ते, नेते धरून हे म्हणता येईल. आज सर्वत्र चलती भुरट्या राजकारण्यांची आहे. सत्तेसाठी शक्य होईल ते सारं करण्याचा पक्का इरादा करूनच आता लोक राजकारणात पडतात. सारं काही करतात आणि आव मात्र तत्व-निष्ठेचा, नि:स्वार्थी जनसेवेचा आणतात. जो मिळेल तिथं मिळेल तेव्हा हात धुवून घेतो तोच वारंवार माझे हात स्वच्छ आहेत अशी ग्वाही देतो, हे आता सगळेच जाणतात. लोक बोलत नाहीत त्याची कारणंही आता सगळ्यांना ठाऊक आहेत. कोण कुठं होते नी कुठं पोहोचले ही काय लोकांना दिसत नाही? महिना ओलांडताना खिशाचा तळ पुनः पुन्हा चाचपून भोकं पडलेल्या विजारी घालणारे आपण, म्हणजे कंडक्टरनं बसचं तिकीट देताना साडेतीन रुपयांऐवजी तीन रुपये घेतले तरी लॉटरी लागल्याचा आनंद होणारे आपण! ज्यांना खरोखरच लॉटरीच लागलीय त्यांच्याकडं बघत 'देवा दया तुझीही, ही शुद्ध दैव लीला, लागो न दृष्ट आमची, त्यांच्याच वैभवाला...!' असं म्हणत बसण्याखेरीज आणखी काय करणार! मुद्दा आहे सत्तेसाठी सारं काही करायला तयार असणाऱ्या सत्तानिष्ठ राजकारण्यांचा. हिंदुत्व आता राजकारणातून बाद झालंय असं वाटत नाही. राजकारण्यांनी ते बाद केलं की, लोकांनीच बाद ठरवलं होतं ह्यावर चर्चासत्र ठेवायचं ते ठेवतील. ते बाद झालेलं नाही हे आपण बघितलंय. कुणी अजूनही हिंदुत्व सांगत असेल तर ते हातात फिरणाऱ्या रुद्राक्ष माळेइतपतच, केवळ छाप पाडण्याएवढंच असणार. अर्थकारणात समाजवादी विचारांचं तर कधीच रुद्राक्ष झालंय. राजकारणात समाजवाद्यांचं जे काही झालंय त्यासाठी दोन मिनिटं शांत उभं राहून श्रद्धांजली देण्याला कुणीही नकार देणार नाही. तेव्हा कुठलंही 'कॉम्बिनेशन' आता होऊ शकतं. आणि ते होण्याइतपत 'सामंजस्य' आपसात राखायला काय हरकत आहे? एकदा सगळ्यांचा पॉट एकच आहे हे कळल्यावर आडवं कुणाला घालायचं आणि उभं कुणाला करायचं हे ठरवायला विशेष अडचण पडू नये. उभे आडवे धागे विणले की, वस्त्र तयार होतं. उगाच अटीतटी आणून आणि भरमसाठ बोलून काही साधत नाही. नेते वाट्टेल ते बोललेलं विसरून, वाट्टेल ते करतात. कुणाशीही त्यांना सहज जमवून घेता येतं आणि न जमवून घेतलं तरी चालतं. त्यांना संरक्षण कवच असतं. कार्यकर्ते या अटीतटीनं बरबाद होतात. निष्कारण भांडणं, वैर वाढतं हाणामाऱ्या कराव्या लागतात. कार्यकर्त्यांना ह्याची जाणीव झालीय. निवडणुकीनंतर असले आक्रस्ताळे अटीतटीचं राजकारण बाजूला पडेल असं वाटत होतं आणि घडलंही तसंच.
*जंगी सभा, फरडे वक्तृत्व राहीलं नाही*
कुठलंही जनकल्याणाचं काम जिद्दीनं, इर्षेनं करणारे कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांचा मान राखून त्याला विश्वास देऊन धडाक्यानं विकासाची कामं करणारे कल्पक, विवेकी, विधायक वृत्तीचे नेतृत्व ही युती महाराष्ट्राला स्थैर्य, सामर्थ्य, ऐश्वर्य देऊ शकेल. ग्रामीण भागात शिकलेली, नवी दृष्टी लाभलेली, आपल्या भागाचा विकास, कायापालट करण्याची ईर्षा असलेली, त्यासाठी गावातच पाय रोवून गावातच राहायची तयारी असणारी आणि शहरातल्या लोकांचे रीतभात, हुशारी, चलाखपणा याला तोडीस तोड ठरणारी तरुणांची संख्या लक्षणीय आहे. त्याबरोबर ईर्षा, चुरस, डावपेच यांचीही ग्रामीण भागातली तीव्रता वाढलीय. या तरुणांना एकमेकांना शह, काटशह देत, एकमेकांना संपवण्याचा कार्यक्रम राबवू न देता त्यांना विविध पातळ्यांवर विविध क्षेत्रात विविध सत्तास्थानावर एकमेकाला पूरक असं काम करण्याची गोडी लावायला हवीय. यशवंतराव चव्हाणांनी, शरद पवारांनी तरुणांना विधायक कामांसाठी प्रेरणा देऊन ग्रामीण भागात नव्या जोमदार तरुणांची एक फौजच उभी केली होती. साखर कारखानदारांना कितीही नावं ठेवा, त्यांनी आपल्या भागातील लोकांचं जीवन बदलून टाकलंय. शिक्षणाची कोंडी फोडलीय. त्यांची दादागिरी दंडेली याबद्धल तक्रारी आहेत पण त्यांनी कितीतरी लोकांना विकासाच्या वाटेवर चालायची संधी दिलीय. याच लोकांनी काँग्रेसला बळ दिलं होतं आता ते नेमकं कुणाच्या मागं आहेत याचा शोध घ्यावा लागणार नाही. लाखाच्या सभेत तास, अर्धातास दे दणादण भाषण ठोकलं की विचार रुजतात हा भ्रम दूर करून तात्यासाहेब कोरे, विखे पाटील, मोहिते पाटील, रत्नाप्पाण्णा, पी.के.अण्णा पाटील या सगळ्या साखर कारखान्यामागील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा, त्यांनी उभ्या केलेल्या संघटित शक्तीचा, त्यांनी दाखवलेल्या व्यापारी दृष्टीचा विचार, नेते होऊ बघणाऱ्या सगळ्यांनीच विशेषतः शहर भागातील मंडळींनी करायला हवाय! राजकारण बदलतंय. आता जंगी सभा आणि फरडे वक्तृत्व, हंशा, टाळ्या आणि आवाज कुणाचा या आरोळ्यानी लोक आता बधत नाहीत. सभांचा प्रभाव आता दिवसेंदिवस मर्यादित होणार. पुन्हा एकदा प्रत्यक्ष कामाचा जमाना येतोय. ज्यांच्याबद्धल लोकांना हा माणूस काम करतोय असा विश्वास आहे तो कसा आहे, कुठल्या पक्षाचा आहे हे न बघता लोक मतदान करतील. आता मतदान करून आपण आपल्याला हवा असलेला प्रतिनिधी पाठवण्यात यशस्वी होऊ असा विश्वास लोकांमध्ये आलाय. भरमसाठ भाषणबाजी करणाऱ्या नेत्यांना आपले भाग्यविधाते बनवायला लोक तयार नाहीत.
*राजकारण सर्वबाजूनं नासतंय* 
भाषणांनी लाटा उठत नाहीत आणि एखाद्याला बदनाम करून उठवण्याचा अतिरेकही उलटतो. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सुरू असलेल्या अतिरेकामुळं लोकांत उद्धव ठाकरे, शरद पवारांबद्धल आपुलकी वाढतेय. भ्रष्टाचार-गुन्हेगारी यावर सोवळेपणानं बोलणाऱ्यांच्या बुडाखाली केवढं डबोलं आणि केवढी घाण आहे याची कल्पना सर्वांना आहे. सोवळ्यात पावित्र्यच असतं असं मी मानत नाही. सोवळे पावित्र्यासाठी वापरले जात असावं, पण पावित्र्याचा आणि सोवळ्याचा संबंध दाखवण्यापूरताच उरलाय याचं प्रत्यंतर देणारे महाभाग भेटल्यानंतर, अशी सोवळी मिरवणाऱ्यांपासून दूर राहणंच बरं असं लोक मानू लागले तर तो लोकांचा दोष नाही. भारतीय जनता पक्ष असा सोवळं मिरवणाऱ्यांचा गड्डा किंवा अड्डा आहे. राष्ट्रनिष्ठा, बंधुभाव, सचोटी, सभ्यता, सहजीवन कुठं असेल तर इथंच असाही टेंभा मिरवणारे आहेत. पण सगळ्या सोवळ्याआड जे आहे ते काँग्रेसपेक्षा काही वेगळं नाही. असं स्पष्ट करणाऱ्या घटना पुनःपुन्हा घडताहेत. त्यावर बोलायचं नाही? लिहायचं नाही? भाजपमध्ये भरपूर भ्रष्ट आहेत, भरपूर तत्वशून्य आहेत, भरपूर गुंड प्रवृत्तीचे आहेत. भरपूर संधीसाधू आहेत आणि जातीयतेची कीड वळवळणारेही आहेतच आहेत. सत्ताधाऱ्यांमधली घाण काढायचा, तिच्याबद्धल नाकानं कांदे सोलायचा तुम्हाला अधिकार आहे. तुमच्या बुडाखालील घाण दाखवली तर मग कळवळता का? वाईट माणसं, गुन्हेगार काँग्रेसमध्ये आहेत, सत्ताधाऱ्यांकडं नाहीत हा कांगावा पुष्कळ झाला. जरा आपल्या सोवळ्यातून येणाऱ्या दुर्गंधीचाही तपास घ्या असं कुणी म्हटलं तर रागावता का? राजकारण सर्वबाजूनं नासतंय; ते सुधारायचं, निदान आहे त्यापेक्षा अधिक नासू द्यायचं नसेल तर भाकड विश्वास बाळगू नका. फक्त आरोप आणि अफवा उठवून हेतुपूर्वक किटाळ रचलं गेलं, प्रतिमा डागळण्याचा उद्योग झाला त्याचं काय? राजकीय शास्त्री सध्या अशी काही कोडी सोडविण्याच्या आणि मांडण्याच्या कामात गुंतलेत.
*आयारामांना पायघड्या, कार्यकर्त्यांचा बळी* 
मी समर्थ आहे हा आत्मविश्वास नेत्यांत असायला हवा, पण लोकशाही समर्थ व्हायची असेल समर्थ आत्मविश्वास असलेल्यांची एक फळीच असावी लागते. पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी निष्ठावान, कर्तृत्ववान, सुशिक्षित, लोकसेवा करण्यात आघाडीवर असणाऱ्या कार्यकर्त्यांना दूर ठेवून आयारामांना पायघड्या घालून कार्यकर्त्यांचा बळी दिला जातोय. अशावेळी निष्ठावंत मिळणार कुठे? सारेच सत्तेचे लोभी....! आजकाल सत्तेसाठीच इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांना ज्या पक्षात होते त्यांनाच लक्ष्य करण्यासाठी पुढं केलं जातं. 'बाटग्याची बांग मोठी..!' या म्हणीप्रमाणे त्यांना वापरलं जातं. आज हीच मंडळी सत्ताधाऱ्यांवर सतत टीकास्त्र सोडत असतात. यातच सारं आलं! ही मंडळी शेणगोळा ब्रँड आहेत. ह्या शेणगोळ्यांचे साहेब त्यांना सारवण्यासाठीच वापरणार, नाही का...? राज्यात सत्तासुंदरीसाठी मित्र असलेल्या भाजपेयीं, राष्ट्रवादी आणि शिंदे सेना यांच्यात जुंपलीय. खरंतर हे राजकारण सडल्याचं लक्षण आहे. सरकारं बदलली की, एक मूलभूत व्यवस्था आणि निर्णयप्रक्रिया कायम असते. पण आधी घेतलेले सारे निर्णय पुसून टाकून, तुघलकी कारभार करायचा नसतो. अशी कारभाराची सलगता हीच लोकहिताची असते. हे पथ्य न पाळल्यानं विकासाचे प्रश्न चिघळू लागतात. राज्यातील धुरीणांनी पक्षीय मतभेद किती ताणायचं आणि श्रेयासाठी किती लढायचं याचा विचार केला पाहिजे. अलीकडं राज्यातले राजकारणी राज्यहितासाठी एकत्र येत नाहीत. राज्यातली सत्ता विरोधकांकडे आहे आणि केंद्रातली सत्तासुत्रे भाजपच्या हाती आहेत म्हणून प्रकल्प हाणून पाडणं कितपत योग्य आहे. पायाभूत सोयीसुविधांच्या प्रकल्पात राजकारण असू नये. सध्या असंच सुरू आहे. पूर्वी घेतलेल्या प्रकल्पांना स्थगिती दिली जातेय आणि त्या प्रकल्पांकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं तर त्याला आपल्या सत्तेच्या आधारे विरोध वा अडवणूक केली जातेय. हे सारं जनतेसाठी म्हणत जनतेलाच वेठीला धरून केलं जातंय. हा सडलेल्या राजकारणातला सत्ता संघर्ष आहे. एवढंच म्हणावं लागेल!
*प्रेरणेचे  जितेजागते स्रोत दिसत नाहीत* 
मराठी भाषा, मराठी अर्थकारण, मराठी उद्योग, मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट, मराठी पत्रकारिता, या सर्व क्षेत्रातही मराठी राजकारणाप्रमाणेच यशस्वी होण्याच्या खुब्या गवसलेली सुमार माणसं कटीवर स्थानापन्न झाली आहेत. ती गाजत आहेत. वाजत आहेत. पण महाराष्ट्राची मात्र सर्व क्षेत्रात पिछेहाटच होत आहे. शिखरापर्यंत पोहोचण्याचे दोन मार्ग असतात. एक सरपटत सरपटत अडथळे टाळत वरपर्यंत जाण्याचा, दुसरा शिखराकडे झेपावून शिखरावर विराजमान होण्याचा. अशी झेप घेऊन शिखर गाठणाऱ्यांची संख्या जेवढी अधिक तेवढा समाज जिवंत. तेवढे समाजात चैतन्य अधिक. कारंज्यात उडणारे पाण्याचे फवारे जसे सारखे वरवर जात असल्याचं भासतं, अशी उत्तुंग कर्तृत्वाकडे झेपावणाऱ्या माणसांची कारंजी समाजात असावी लागतात. कारंजातला वर झेपावणारा प्रत्येक थेंब काही क्षणातच खाली येत असतो, पण खालून वर उसळणारे दुसरे थेंब ह्या खाली येणाऱ्या थेंबांचे अस्तित्व जाणवूच देत नाहीत. ते त्याला वरवर झेलत ठेवतात. असा वर जाणाऱ्यांचा जोश खाली कोसळणाऱ्यांनाही सावरतो. निदान त्यांचे कोसळणे आपल्या पोटात सामावून टाकतो. अशी कारंजी आपोआप कुठं उसळतही असतील, पण ती घडवावी लागतात हेच खरं! हे घडवणारे असतात साहित्यिक, पत्रकार, विचारवंत, भाष्यकार, प्रत्यक्ष कृतीतून आदर्श घडविणारे कर्मवीर, महर्षी, महात्मे! महाराष्ट्र एकेकाळी अशा नररत्नांची खाण असल्यासारखा होता आणि तो  जेव्हा तसा होता तेव्हाच तो भारताचा आधार होता. महाराष्ट्राचा आत्मा त्याच्या शरीरात झोपी गेलाय की काय, अशी शंका येतेय. महाराष्ट्राचा आत्मा नक्की झोपलाय, त्याला झोपवण्याचं काम गेल्या पन्नास वर्षात पुरं झालंय, असं म्हणण्यासारखी परिस्थिती नक्कीच आहे. थोडं मागं वळून बघितलं तर कितेीतरी प्रेरणादायी माणसं आपल्याला दिसतात. सभोवताली असलेल्यात असे प्रेरणेचे  जितेजागते स्रोत मात्र दिसत नाहीत. 
- हरीश केंची
९४२२३१०६०९



ll राष्ट्रपित्याला अभिवादन ll

"७४ वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली. पण गांधीजी संपले नाहीत. 'राष्ट्रपित्या'ची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेशी आपला काहीही संबंध नाही, अशी भूमिका संघानं अनेक दशकं घेतली होती परंतु अलीकडच्या काही वर्षांत हिंदू गटांनी गोडसेचं गौरवीकरण करत त्याच्या कृत्याचं उदात्तीकरण सुरू केलंय आणि गांधीहत्येचीही ते उघडपणे प्रशंसा करताहेत. भडक भाषणं करणाऱ्या भाजपच्या एका खासदारानं गोडसेला 'देशभक्त' म्हटलं होतं. बहुतांश भारतीयांनी याबाबत रोष व्यक्त केला असला, तरी संघानं आपली भूमिका सोडलेली नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी शंभरहून अधिक परदेश दौरे केले आहेत. त्यात त्यांनी गांधीजींचा आवर्जून उल्लेख केलाय. कधी बुद्धाचा उल्लेख केलाय. तो करताना प्रधानमंत्र्यांना किती त्रास होत असेल, परंतु, त्यांचाही नाइलाज आहे!"
------------------------------------------------
*३०* जानेवारी १९४८....! दिल्लीतल्या बिर्ला हाऊसमध्ये संध्याकाळी ५.१० वाजता महात्मा गांधी त्यांच्या खोली बाहेर पडले. महात्म्याला पाहायला, भेटायला, गाऱ्हाणं मांडायला, चर्चा करायला त्या दिवशी जरा जास्तच लोक आले होते. काही वेळातच पिस्तुलातून सुटलेल्या गोळ्यांचा आवाज आला आणि सगळेच काही क्षण थबकले. कानठळ्या बसवणारी ती शांतता संपल्यावर लोक भानावर आले. महात्मा गांधी खाली कोसळले होते आणि नथुरामच्या पिस्तुलातून अजूनही धूर येतच होता...! नथुरामला तात्काळ पकडण्यात आलं आणि लोकक्षोभापासून दूर ठेवण्यासाठी एका बाजूला नेण्यात आलं. नथुराम विनायक गोडसेनं भारताचे सर्वांत आदरणीय नेते असणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी यांच्यावर आजच्या दिवशी ३० जानेवारी १९४८ रोजी काही फुटांच्या अंतरावरून गोळ्या झाडल्या. दिल्लीत प्रार्थनासभेवेळी झालेल्या या हल्ल्यात गांधींजींचा मृत्यू झाला. गांधींजींच्या हत्येच्या १० दिवस आधीही म्हणजे २० जानेवारीला नथुराम आणि त्याच्या साथीदारांनी गांधींजींवर हल्ला केला होता. २० जानेवारीच्या त्या घटनेनंतर जर पुरेशी दक्षता घेतली असती तर आजचा इतिहास काही वेगळा असता. २० जानेवारी रोजी ते बिर्ला हाऊसच्या बागेत प्रार्थनेसाठी पोहचले. प्रार्थनेसाठी शेकडो लोक जमा झाले होते. इथं गांधींजींसाठी एक छोटंसं व्यासपीठ तयार करण्यात आलं होतं. त्या व्यासपीठावरुन ते बोलू लागले पण माइक खराब होता. तरी देखील त्यांनी आपलं भाषण सुरू ठेवलं, 'जे मुस्लिमांचे शत्रू आहेत ते भारताचेही शत्रू आहेत' असं ते म्हणाले. तितक्यात एक स्फोट झाला. इम्प्रोव्हाइज्ड एक्स्प्लोजिव्ह डिव्हाइसनं-ईआयडीनं हा स्फोट घडवून आणला होता. व्यासपीठापासून काही अंतरावरच हा स्फोट झाला होता!' अशी माहिती तुषार गांधी यांनी 'लेट्स किल गांधी' हे पुस्तकात दिली आहे. नथुराम गोडसेचा सहकारी दिगंबर बडगे सर्व्हंट क्वार्टरमध्ये लपला होता. तिथून त्यानं गोळीबार करायचा, असा कट होता. पण त्याचं धाडस झालं नाही आणि सर्वांनी तिथून पळ काढला. हा कट नथुराम गोडसेनं रचला होता. नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे आणि नारायण आपटे यावेळी इथं उपस्थित होते. हॅंडग्रेनेड टाकणाऱ्या मदनलाल पाहवाला पोलिसांनी अटक केली. पण त्याचे सर्व साथीदार मात्र पळून गेले. या घटनेच्या १० दिवसांनंतर म्हणजे ३० जानेवारी १९४८ ला बिर्ला हाऊसमध्येच नथुराम गोडसेनं प्रार्थनेच्या वेळीच गांधींजींवर गोळ्या झाडल्या.त्यापूर्वी गांधीजींच्या हत्येचा ४ वेळा प्रयत्न झाला होता आणि सर्वांत धक्कादायक गोष्ट म्हणजे हे प्रयत्न नथुराम गोडसे आणि त्याच्या साथीदारांनीच केले होते. पुण्यात टाऊन हॉलजवळ गांधींजींच्या ताफ्यातल्या गाडीवर हॅंडग्रेनेड टाकण्यात आलं होतं. १९३४ मध्ये गांधी हरिजन यात्रेनिमित्त पुण्यात आले होते. दोन कारमधून गांधी आणि त्यांचे सहकारी येत होते. गांधींची कार टाऊन हॉलला उशिरा पोहचली. पण हल्लेखोरांना वाटलं की पहिल्याच कारमध्ये गांधी आहेत. त्यांनी त्यांच्या गाडीवर हॅंडग्रेनेड टाकलं. हे ग्रेनेड गाडीच्या बॉनेटवर पडलं आणि बाजूला जाऊन त्याचा स्फोट झाला. या हल्ल्यात कुणाला दुखापत झाली नव्हती. दुसरा हल्ला पाचगणी इथं झाला होता. १९४४ मध्ये गांधींची प्रकृती खालावली होती. त्यांना विश्रांतीसाठी पाचगणीत नेण्यात आलं होतं. दिलखुश नावाच्या एका बंगल्यात त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. इथं ते गावकऱ्यांसोबत रोज संध्याकाळ प्रार्थना करत असत. एकदा प्रार्थनेच्या वेळी त्यांच्यावर एक युवक चालून आला. त्याच्या हातात खंजीर होता. गांधींजींचे रक्षक भिलारे गुरूजी यांच्या लक्षात आलं की समोरून कुणी चाल करून येत आहे. त्यांनी त्या युवकाला जेरबंद केलं आणि त्याच्या हातातून खंजीर हिसकावून घेतला. त्या युवकाला सोडून द्या, असं गांधींनी सांगितलं होतं. त्यामुळं त्याच्यावर कारवाई झाली नाही. तो युवक नथुराम गोडसे होता, असं भिलारे गुरूजींनी म्हटलं होतं. गांधींजींच्या हत्येचा तिसरा प्रयत्न झाला तो सेवाग्राममध्ये. १९४४ मध्ये गांधी वर्धा स्टेशनहून रेल्वेनं जाणार होते. त्यावेळी एक युवक गांधींवर चालून आला. पोलिसांनी तत्परतेने त्याला पकडलं. त्याची प्राथमिक चौकशी करून त्याला सोडून देण्यात आलं. त्याची नोंद देखील घेतली गेली नाही, असं गांधींचे चरित्र लेखक प्यारेलाल यांनी म्हटलं आहे. चौथा प्रयत्न पुढच्याच वर्षी म्हणजे १९४५ मध्ये गांधींजी मुंबईहून पुण्याकडं रेल्वेनं येत होते. एक गार्डचा डबा, एक इंजिन आणि एक तिसऱ्या वर्गाचा डबा अशी ही रेल्वे होती. रात्रीची वेळ होती. रेल्वे कसारा घाटात पोहचली. तेव्हा तिथं रुळांवर काही ओंडके ठेवण्यात आले होते. तसेच दगडांचा एक ढिगारा करण्यात आला होता. तो ढिगारा चालकाला दिसला आणि त्यानं करकचून ब्रेक दाबला. त्या इंजिनाचा हलका धक्का त्या ढिगाऱ्याला बसला पण एक मोठा घातपात टळला.गांधीजी पुण्याला आले आणि म्हणाले ज्या लोकांना मला मारावयाचं आहे त्यांनी मला खुशाल मारावं. पण माझ्या सोबतच्या लोकांना नुकसान पोहोचवू नये.अडतीस वर्षांचा नथुराम हिंदू महासभेचा सदस्य होता. गांधी मुस्लिमांचा अनुनय करत असून पाकिस्तानला झुकतं माप देत आहेत आणि त्यांनी हिंदूंचा विश्वासघात केला आहे, असा आरोप हिंदू महासभेनं केला होता. हिंदू महासभेनं फाळणीमधल्या रक्तपातासाठीसुद्धा गांधींना दोषी ठरवलं. गांधीहत्येनंतर वर्षभरानं न्यायचौकशी न्यायालयात गोडसेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. उच्च न्यायालयानं हा निकाल कायम ठेवल्यानंतर नोव्हेंबर १९४९ मध्ये त्याला देहदंडाची शिक्षा झाली. या गुन्ह्यातला त्याचा साथीदार नारायण आपटे यालाही देहदंड झाला आणि इतर सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली. हिंदू महासभेत दाखल होण्यापूर्वी गोडसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य होता. सध्या केंद्रात सत्ता गाजवणाऱ्या भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवार ९५ वर्षं हिंदू राष्ट्रवादाची पताका घेऊन चालतो आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः संघप्रचारक राहिले आहेत, आणि त्यांच्या सरकारमध्ये आणि सरकारच्या बाहेरही संघाचा खोलवर प्रभाव आहे. 'राष्ट्रपित्या'ची हत्या करणाऱ्या गोडसेशी आपला काहीही संबंध नाही, अशी भूमिका संघानं अनेक दशकं घेतली होती परंतु अलीकडच्या काही वर्षांमध्ये उजव्या हिंदू गटांनी गोडसेचं गौरवीकरण त्याच्या कृत्याचं उदात्तीकरण सुरू केलंय आणि गांधीहत्येचीही ते उघडपणे प्रशंसा करताहेत. गेल्यावर्षी, भडक भाषणं करणाऱ्या भाजपच्या एका खासदारानं गोडसेचं वर्णन 'देशभक्त' असं केलं होतं. बहुतांश भारतीयांनी याबाबत रोष व्यक्त केला असला, तरी संघानं आपली भूमिका सोडलेली नाही. गांधींजींची हत्या करण्याच्या कितीतरी आधी गोडसेनं संघाला सोडचिठ्ठी दिली होती. परंतु, संघाचं हे म्हणणं वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा एका पुस्तकात करण्यात आला आहे.भारताला स्वातंत्र्य मिळून काही महिनेच झाले होते. आणि देशात ठिकठिकाणी धार्मिक तणावाचं वातावरण होतं. 'हिंदू, शीख आणि मुस्लिमांमध्ये एकेकाळी बंधुभाव होता. आता तो राहिला नाही, हे पाहून माझ्या मनाला यातना होत आहेत!' असं गांधीजींनी म्हटलं होतं असं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं प्रकाशित केलेल्या आणि स्टॅनेले वॉलपर्ट यांनी लिहिलेल्या 'गांधीज मिशन' या पुस्तकात म्हटलंय. 'सर्वांनी एकत्र यावं यासाठी मी आमरण उपोषण करणार आहे!' अशी घोषणा गांधींजींनी १२ जानेवारीला केली होती आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी उपोषण सुरू केलं. 'तुम्ही तुमचं उपोषण सोडा,' अशी विनंती करण्यासाठी देशभरातून लोक येत असत. या लोकांसमवेत महात्मा गांधी नित्यनेमानं प्रार्थना करत. पण त्यांनी आपलं उपोषण काही सोडलं नाही. 'जेव्हा मला खात्री होईल की सर्व धर्मांच्या लोकांमध्ये सलोखा निर्माण झालाय, तेव्हाच मी माझं उपोषण सोडणार आहे!' असं त्यांनी निग्रहानं सांगितलं, अशी नोंद वॉलपर्ट यांच्या या पुस्तकात आहे. 'जर माझ्या अकार्यक्षमतेमुळं या देशातला हिंसाचार नियंत्रणात येत नाही, असं बापूंना वाटत असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देतो!' असं गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी म्हटलं होतं. पण गांधींजींनी त्याही गोष्टीला नकार दिला. १०० हून अधिक नेत्यांनी महात्मा गांधींना उपोषण सोडण्यासाठी विनंती केली होती. आम्ही शपथ घेऊन सांगतो की आम्ही धार्मिक सलोखा ठेऊ, असं आश्वासन त्यांनी वारंवार दिलं. त्यानंतर १८ जानेवारीला त्यांनी आपलं उपोषण सोडलं. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद असे प्रमुख नेते उपस्थित होते. 'आम्ही या पुढं बंधुभावानं राहू, असं सात कलमी आश्वासन सर्व गटांच्या नेत्यांनी लिहून दिलं. कोणत्याही स्थितीत आम्ही ही प्रतिज्ञा मोडणार नाही, असं ही त्यात म्हटलं होतं!' अशी नोंद या पुस्तकात आहे.शाळा सोडलेला, भिडस्त स्वभावाचा नथुराम काही काळ टेलर म्हणून काम करत होता, त्यानंतर त्यानं फळं विकण्याचाही व्यवसाय केला, मग तो हिंदू महासभेत दाखल झाला. तिथं तो संघटनेच्या वर्तमानपत्राचं संपादन करत असे. गांधीहत्येवरच्या न्यायालयीन सुनावणी दरम्यान त्यानं पाच तासांहून अधिक वेळ घेत १५० परिच्छेदांचं निवेदन वाचून दाखवलं होतं. गांधींना मारण्याचा 'कोणताही कट झालेला नव्हता', असं तिथं तो म्हणाला. आपल्या सर्व साथीदारांवरचा ठपका पुसण्याचा प्रयत्न त्यानं केला. हिंदुत्व या संकल्पनेचे प्रणेते आणि आपले नेते विनायक दामोदर सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे कृत्य केल्याचा आरोपही त्यानं नाकारला. या खटल्यात सावरकरांची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली असली, तरी गांधींजींचे कट्टर विरोधक असणारे जहाल उजव्या विचारांचे सावरकर या हत्येशी संबंधित होते, असं त्यांचे टीकाकार मानतात. गांधींजींची हत्या करण्याच्या कितीतरी आधी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले संबंध तोडले होते, असं गोडसेनं न्यायालयाला सांगितलं. 'गांधीज् असॅसिन' या पुस्तकाचे लेखक धीरेंद्र झा लिहितात की, गोडसेचे वडील टपाल कार्यालयात कर्मचारी होते, तर आई गृहिणी होती. गोडसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक 'महत्त्वाचा स्वयंसेवक' होता. त्याला संघातून काढून टाकल्याचा कोणताही 'पुरावा' नाही. सुनावणीपूर्वी नोंदवण्यात आलेल्या जबानीत त्यानं 'हिंदू महासभेत दाखल होण्यापूर्वी संघापासून फारकत घेतल्याचा कुठेही उल्लेख केला नव्हता.' 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडल्यानंतर आपण हिंदू महासभेचे सभासद झालो' असं त्यानं न्यायालयातल्या निवेदनात म्हटलं असलं, तरी 'हे त्यानं नक्की कधी केलं याबद्धल तो काही बोलत नाही! हा दावा गोडसेच्या आयुष्यातला सर्वांत वादग्रस्त पैलूंपैकी एक आहे,' असं झा लिहितात. संघस्नेही लेखकांनी या दाव्याचा वापर करून गुपचूप असा समज पसरवला की, गोडसेनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सोडचिठ्ठी दिली होती आणि गांधींची हत्या करण्याच्या जवळपास दशकभर आधी तो हिंदू महासभेत दाखल झाला होता! गोडसे १९३० साली संघात आला आणि चार वर्षांनी त्यानं संघ सोडला, असा दावा अमेरिकी संशोधक जे.ए. कुर्रन ज्युनियर यांनी केला आहे. पण या प्रतिपादनासाठी त्यांनी कोणताही पुरावा दिलेला नाही. सुनावणी सुरू होण्यापूर्वी पोलिसांसमोर दिलेल्या जबानीत गोडसेनं दोन्ही संघटनांसोबत एकाच वेळी काम करत असल्याचं कबूल केलं होतं, असं झा लिहितात. या संदर्भातल्या वादात गोडसे कुटुंबियांनीही पूर्वी मतं मांडलेली आहेत. नथुरामचे बंधू जे २००५ साली मरण पावले, ते गोपाळ गोडसे मृत्यूपूर्वी म्हणाले होते की, त्यांच्या भावानं 'संघापासून फारकत घेतलेली नव्हती...!' याशिवाय, नथुराम गोडसेच्या चुलत नातवानं २०१५ साली एका पत्रकाराला सांगितल्यानुसार, नथुराम गोडसे १९३२ साली संघात दाखल झाला आणि त्याला 'कधीही संघातून काढून टाकण्यात आलं नव्हतं आणि त्यानं कधीही संघापासून फारकतही घेतलेली नव्हती....!' झा यांनी अभिलेखागारं पालथी घालून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा या दोन संघटनांमधल्या संबंधांचाही शोध घेतला आहे. हिंदू महासभा आणि रा. स्व. संघ यांच्यातले संबंध 'परस्परव्याप्त आणि प्रवाही' स्वरूपाचं होतं आणि त्यांची विचारसरणी जवळपास सारखी होती!, असं झा लिहितात. या दोन संघटनांचं 'कायमच जवळचे संबंध होते आणि काही वेळा त्यांचे सभासदही सारखे असत....!', गांधीहत्येपर्यंत ही स्थिती टिकून होती, असं झा नमूद करतात. गांधीहत्येनंतर वर्षभराहून अधिक काळ रा. स्व. संघावर बंदी घालण्यात आली. आपण १९३० च्या दशकात संघापासून फारकत घेतली होती, हे गोडसेचं न्यायालयातलं विधान संघ कायम उर्द्धृत करत आला आहे आणि संघाचा या हत्येशी काहीच संबंध नसल्याचं न्यायालयीन निकालातही म्हटलं होतं.गांधींजींच्या हत्येची चौकशी करण्यासाठी नंतर कपूर आयोगाची स्थापना झाली होती. १० दिवस आधी एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी सावध व्हायला हवं होतं, असं न्यायाधीशांनी सुनावणीवेळी म्हटलं होतं. याची नोंद कपूर आयोगाच्या अहवालात आहे. या देशाला एकत्र ठेवण्यासाठी, या देशाची शांतता अबाधित राखण्यासाठी गांधींजी सर्व शक्तिनिशी प्रयत्न करत होते. ऊर्वरित आयुष्यातही त्यांनी हेच कार्य सुरू ठेवलं असतं! असं सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांनी गांधींच्या हत्येची पार्श्वभूमी कशी होती, या विषयावर एक पुस्तक 'बियाँड डाउट- ए डॉसिएर ऑन गांधीज असासिनेशन' हे पुस्तक संपादित केलंय त्यात त्यांनी म्हटलंय. या पुस्तकात विविध लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा समावेश आहे. ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची हत्या झाल्यानंतर २ फेब्रुवारी रोजी नारायण आपटे आणि विष्णू करकरे मुंबईला पोहोचले, त्यांना १३ फेब्रुवारी रोजी पकडण्यात आले. ५ फेब्रुवारी रोजी नथुरामचा भाऊ गोपाळ गोडसेलाही पकडण्यात आलं. २२ जून रोजी लाल किल्ल्यातल्या विशेष न्यायालयात न्यायाधीश आत्माचरण यांच्यासमोर सुनावणीला सुरुवात झाली. १० फेब्रुवारी १९४९ रोजी न्यायालयानं निकाल दिला. यामध्ये नथुराम गोडसे आणि नारायण आपटेला फाशी सुनावली गेली. तर विष्णू करकरे, मदनलाल पहावा, गोपाळ गोडसे, दत्तात्रय परचुरे, शंकर किष्टय्या यांना जन्मठेप ठोठावली गेली. २ मे १९४९ रोजी न्यायाधीश जे. डी. खोसला यांच्या न्यायालयात अपिलावर सुनावणी सुरू झाली. २ जून रोजी इथंही फाशीची शिक्षा कायम ठेवली गेली आणि १५ नोव्हेंबर रोजी गोडसे, आपटेला फाशी देण्यात आली.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

चौकट  
ज्या बंदुकीनं गांधीना मारलं 
त्याच बंदुकीनं गांधी करण्याचं
सनातनी समीकरण घेऊन
नथुराम फिरतोय भारतभर
कि जिथं रक्ताच्या थारोळ्यात पडलेला
प्रत्येक गांधी मरतानाही पेरतोय
अहिंसेच तत्व
बंधुकधारी नथुरामच्या डोक्यात....!
बापू..., १९४८ ला आम्ही प्रथम तुम्हाला गमावलं त्यानंतर इंदिराजी, राजीवजी अन् आजपर्यंत दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी अशा अनेकांनाही आम्ही गमावलंय आणि काय कमावलं तर डोक्यात 'मोदी' आणि खिशात 'गांधी' कुठं जाणार भारत माझा....? तरीही २ ऑक्टोबरला तुमचं स्मरण करायचं, रस्ते झाडून परदेश दौरे झोडायचं, आणि तुमच्या विचारांना साफ करायचं! 
बापू..., आयुष्यभर तुम्ही केवळ पंचावर राहीलात तुमचं नाव घेऊन आम्ही मात्र लाखमोलाचं सूटबूट अंगावर मिरवायला लागलोत. 'कितने अच्छे दिन आये है....?' केवळ हिंदुस्तानातच नव्हे तर जागतिक पातळीवरही अनेक नेत्यांना प्राणाची आहुती द्यावी लागलीय. मार्टीन ल्यूथर किंग, अब्राहम लिंकन असतील किंवा जाॅन केनेडी असतील अगदी बेनझीर भुट्टो असोत, गोळी कोणत्या व्यक्तीनं चालवली याबाबत खल होईल, पण कोणत्या विचारानं गोळी घालण्याला प्रवृत्त केलं गेलं हे सर्वांनाच ज्ञात आहे. आपल्या विचारांना विरोध करणारा विचार जर कोणी मांडू लागला की, लागलीच त्याला संपवून मोकळेपणानं समाजात मिरवावं ही संस्कृती आताशी रूढ होऊ लागलीय. अशा विचारांना राजाश्रय मिळातोय की काय? अशी साधार शंका सर्वसामान्य नागरिकांना वाटतेय; पण इतिहासानं हेच वारंवार सिद्ध केलंय की व्यक्तीला संपविता येतं, त्यांनी मांडलेल्या विचारांना संपवता येत नाही! 
बापू ..., तुम्ही आम्हाला या देशातल्या गोरगरिबांना देशातल्या विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्याचा मंत्र दिलात. हरिजन, गिरिजन, अल्पसंख्याक भारतीय नागरिकांना इतरांनी जगण्याचा समान हक्क द्यावा म्हणून स्वप्न पाहिलंत. आणखीही माणूसकीची स्वप्न बापू तुम्हाला पाहायची होती पण कट्टरवादी विचारांची स्वप्न पाहणाऱ्यांनी, करोडो भारतवासियांचं सुखद स्वप्न एका गोळीनं नष्ट केलं. मानवतेवर प्रहार केला. आजही दक्षिण आफ्रिकेत तुमचं स्मरण केलं जातं. आम्ही मात्र तुम्हाला स्विस बॅन्केत ठेवण्यात मश्गूल आहोत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात गांधी टोपीला वंदन करून टोपी घातली जात असे. कारण गांधी टोपी हे अहिंसेचं प्रतीक आहे. भलत्या सलत्या विचारानं तरूणाईची माथी भडकू नयेत म्हणून गांधी टोपी डोक्यावर परिधान केली की, वाईट विचार डोक्यात शिरणार नाहीत म्हणून हे हिंसेविरूद्ध लढण्यासाठी बळ देणारं शिरस्त्राण आहे! पण दुर्दैवानं आज ही टोपीच नाहीशी झालीय. म्हणूनच माथी भडकताहेत, भडकवली जाताहेत! बापू ..., हिंदुधर्मशास्त्राप्रमाणे नुकतंच पितृपक्ष संपला, नवरात्र संपलं, उद्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आईचा जागर करण्यासाठी तुळजापूरकडे निघतील. खरंतर वर्षातून एकदा पितरांची आठवण केली की पुरे, मग वर्षभर लक्ष दिलं नाही तरी चालतं. योगायोग असा आहे की, तुमची जयंती पितृपक्षात आहे. आज एकदा तुमच्या अहिंसेच्या विचारांचं श्राद्ध घातलं की धार्मिक धुमाकूळ घालायला राजाश्रयाच्या मदतीवर कट्टरपंथी मोकळे!

अवमूल्यन राजनीतीचं विचारधारांचं...!

"गळ्यात गळा घालून उभे राहणारे गळा कसा कापायचा, किती कापायचा, कुणाचा, कधी कापायचा याची खलबतं सतत चाललेली असतात. गोरगरिबांना ...