"मुंबईतल्या अमराठी माणसांमध्ये मराठी द्वेष आहेच. इथल्या मराठी माणसाला शिवसेनेनंच हिम्मत दिली, विखुरलेल्या मराठी ताकदीला साथ दिली, मराठी एकजुटीचं सामर्थ्य काय करू शकतं ह्यांचा रोकडा प्रत्यय दिला. पण शिवसेनेनं स्वीकारलेलं हिंदुत्व मुंबईच्या मराठी माणसाच्या मानेवर तलवार फिरवणारं ठरलं हे कटू सत्य प्रत्येक मराठी माणूस जाणतोय. मराठी माणसाला मुंबईत शिवसेना हा आधार वाटत होता. मराठी माणसाचं दुःख जाणत होती, त्यासाठी झुंजत होती. त्यावेळी प्रांतियतेचा आरोप होत होता. पण मराठी भाषेचं आणि मराठी माणसाचं अस्तित्व या वाघानंच मुंबईत जपलं होतं. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. शिवसेनेच्या सम्राटांच्या माथी हिंदुत्वाचा किरीट चढलाय. मराठी माणसांवर अन्याय होतोय. अन्य भाषिकांच्या शिरजोरीनं मराठी माणसांचा गळा दाबला जातोय. आज शिवसेनेच्या हाती महाराष्ट्राची सत्ता आहे, पण ती सत्ता मराठी माणसांपर्यंत झिरपलीच नाही...!"
---------------------------------------------------
*हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू l*
*हिला बैसवू वैभवाच्या शिरी ll*
हा ध्यास उरी घेतलेले मराठीचे पुत्र हिंदुत्वाच्या विशाल सावलीत खुशाल झाले. मराठी हिताचे रुद्राक्ष बनवून त्याच्या माळा खेळवण्यात आनंद मानू लागले. महाराष्ट्राच्या या राजधानीत मुंबईत यानेकी बंबईत, बोलेतो बॉम्बेत - मंत्रालयासमोर माथ्यावर मुगुट आणि अंगावर लक्तरं असलेली माय मराठी 'माझी दया करा हो, सरकार, माझी लाज राखा हो सरकार....!' असा करुण आक्रोश करत उभी असल्याचं दृश्य मुर्दाडल्या डोळ्यांनी आम्ही अजूनही बघत आहोत आणि या दुर्दैवी मराठी माऊलीच्या लक्तराला हात घालण्याचा हलकटपणा करण्यासाठी मुंबईतले काही बेशरम साळसूदपणे उभे ठाकले आहेत. ज्यांच्या त्यागाचं, सेवेचं आणि कौतुक करून मराठी माणसानं ज्यांचा देवतातुल्य आदर केला तीही मंडळी पट्टी डोळ्याला बांधून या दुर्योधन-दुःशासनांच्यासाठी आपली पुण्याई खर्चायला उभे ठाकले आहेत. राज्यातल्या सत्तेचे ठेकेदार 'महाराष्ट्र सर्व भाषिकांचा' या फॉर्म्युल्याच्या वरवंट्यानं मराठी बांधवांना भरडणाऱ्या इंग्रजी-हिंदी काळकुटात लडबडलेले कुणी मराठी माणसाच्या विरुद्ध मुंबईत संघर्ष उभा करण्याच्या धमक्या देताहेत. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भारतीय जनताचा पक्षाची मंडळी हातात हात घालून आघाडीवर आहेत. 'मराठी गड्या, नको मारुस भलत्या उड्या, मुंबई कुणाची, पैसा टाकेल त्याची! निमूटपणे सहन कर मराठीची गोची!!' अशी सुभाषितं ऐकवायला कमी करणार नाही हेही मराठी माणसाच्या लक्षात आलंय. गरबा नाचवणारे किरीट सोमय्यासारखे लोक हे सुंदर, शिव, सत्य जाणल्यामुळंच मराठीच्या वस्त्राला हात घालायचं धाडस करत आहेत. मुंबईवर मराठी माणसाचा हक्क नाही हे सिद्ध करण्याचा हा धूर्त डाव उभा केला जातो आहे.
मराठी माणसाची मुंबईवरची पकड ज्यामुळं ढिली पडेल असं राजकारण मराठी माणसाला हाताशी धरूनच खेळण्याची खेळी मुंबईतून वारंवार खेळली गेलीय. ह्या राजकारणाला पोलादी परंपरा आहे. पूर्वी महाराष्ट्र काँग्रेसला छेद देण्यासाठी मुंबई प्रदेश काँग्रेसचा वापर काँग्रेस श्रेष्ठी करत आले. आजही महाराष्ट्राला हा मुंबई प्रदेशचा कॅन्सर कसा पोखरतो आहे. हे मुंबई महापालिकेत जे काही घडतंय त्यातून दिसून येतंय. मुंबई प्रदेश काँग्रेस आणि मुंबईतला भारतीय जनता पक्ष यांचा ढाचा एकसारखाच आहे. इकडे भाई आहे, तर तिकडे लोढा, मेहता, सोमय्या अशी माणसं वेगवेगळी दिसली तरी 'मटेरीअल सेम टू सेम'च आहेत. मुंबईतल्या अमराठी माणसांना एकत्र गुंफून महाराष्ट्राच्या राजकारणात बुटाच्या खड्यासारखं सलत राहायचं हा फार्म्युला काँग्रेसनं बनवला तोच भाजपनं उचललाय. मराठीविरुद्ध अल्पसंख्याकांचा हुकुमी पत्ता खेळवण्याचा धूर्तपणा आणि त्याच्याबरोबर काळकूट घोटण्याची कुटीलता हीदेखील परंपराच आहे! गोवा महाराष्ट्राला मिळू नये म्हणून बेळगाव-कारवार कर्नाटकाला देण्याचं कारस्थान खेळलं गेलं आणि त्या कारस्थानाशी मराठी माणूस झुंजत असताना अलगदपणे डांग गिळंकृत केला गेला. मुंबई महाराष्ट्राला चंद्र सूर्य असेपर्यंत मिळणार नाही ही उद्दाम भाषा या मुंबईतच ऐकवली गेली आणि द्विभाषिक बनवून मुंबईवर राजरोस आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा डावही मुंबईतच खेळला गेला. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या सहाय्यानंच हे सर्व महाराष्ट्रविरोधी पवित्रे घेतले गेले. गुजरातेतल्या तेजस्वी तरुणांनी मोरारजींच्या क्रूर, निष्ठुर सत्तेला न जुमानता महागुजरातचं स्वतंत्र राज्य होण्यासाठी प्राण पणाला लावून लढा दिला म्हणूनच काही महाधूर्त मंडळींना मुंबईचा मोह त्यावेळी सोडावा लागला होता. मुंबई महाराष्ट्रापासून तोडता आली नाही हे काही मंडळींच्या मनात शल्य अजूनही या ना त्याप्रकारानं प्रगटत असतं, शिवसेनेच्या विरोधात साऱ्या देशभर जी तुफानी कावकाव होते त्याच्या मुळाशी मुंबईतल्या अमराठी माणसांचा मराठी द्वेषच आहे. मुंबईतल्या मराठी माणसाला शिवसेनेनंच हिम्मत दिली, शिवसेनेनंच विखुरलेल्या मराठी ताकदीला साथ दिली, मराठी एकजुटीचं सामर्थ्य काय करू शकतं ह्यांचा रोकडा प्रत्यय शिवसेनेनंच दिला. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कारस्थानांवर मात करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनाच नव्हे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यालाही बळ देण्याचे काम मुंबईतल्या संघटित मराठी माणसामार्फत शिवसेनेनंचे केलं होतं. म्हणून तर कावकाव करणाऱ्यांनी शिवसेनेला 'वसंतसेना' ठरवण्याचा चंग बांधला. दरिद्री चारुदत्ताला वसंतसेना हवीच कशाला असं वाटणारे शकार असतातच. मराठी माणसाचे मुंबईतले हे संघटन डोळ्यात सलणाऱ्या शकारांनी ही 'वसंतसेना' आपल्याकडं कशी वळेल याचा खूप विचार केला. 'मला नको मातीचा गाडा, मला हवा सोन्याचा गाडा' म्हणणाऱ्या बाळाचा हट्ट पुरवताना 'मृच्छकटीक' घडलं. शिवसेनेचं हिंदुत्व मुंबईच्या मराठी माणसाच्या मानेवर तलवार फिरवणारं ठरलं हे कटू सत्य प्रत्येक मराठी माणूस जाणतो आहे. मराठी माणसाला मुंबईत शिवसेना हा आधार वाटत होता. मराठी माणसाचं दुःख शिवसेना जाणत होती. त्यासाठी झुंजत होती. प्रांतियतेचा आरोप शिवसेनेवर होत होता. पण मराठी भाषेचं आणि मराठी माणसाचं अस्तित्व या शिवसेनेच्या वाघानंच मुंबईत जपलं होतं. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. शिवसेनेच्या सम्राटांच्या माथी हिंदुत्वाचा किरीट चढलाय. मराठी माणसांवर अन्याय होतोय. अन्य भाषिकांच्या शिरजोरीनं मराठी माणसांचा गळा दाबला जातोय. आज शिवसेनेच्या हाती महाराष्ट्राची सत्ता आहे, पण ती सत्ता मराठी माणसांपर्यंत झिरपलीच नाही. उलट त्याच्या हक्कावर गदा आणली जातेय.
आज परप्रांतीयांच्या साथीला घेऊन स्वतःला मराठी म्हणवणाऱ्या आणि महाराष्ट्राचे तुकडे पाडून स्वतंत्र विदर्भ करू पाहणाऱ्या फडणवीशी काव्यानं मुंबईतल्या मराठी माणसाला वेठीला धरलंय. हे इथला मराठी माणूस जाणतोय. पण त्याची उर्मी संपलेली नाही. त्यानं परप्रांतीयांना आवाज टाकलाय, बस्स झालं! आता मराठी द्वेषाची उबळ आवरा आणि आपले स्वास्थ्य सांभाळा. महाराष्ट्राचं अन्न खायचं आणि मराठीचा द्वेष करायचा हा प्रकार सतत चालूच राहिला तर मराठी माणूस पिसाळून उठल्याशिवाय राहणार नाही. मुंबईतल्या गुजराती माणसांना मराठी सहजपणे बोलता येतं. इतर कुठल्याही राज्यात ही थेर खपवून घेतलं जात नाहीत. मुंबईत आम्ही मोठ्या संख्येनं आहोत, महाराष्ट्राच्या सरकारला आम्ही नमवू शकतो, शिवसेनेच्या नेत्यांनाही मॅनेज करू शकतो अशी घमेंड परप्रांतीयांना असणार. मराठी माणूस सरळ आहे तोवर सरळ, वाकडा झाला की तो तुकडा पाडल्याशिवाय राहात नाही हे विसरू नये. आम्ही मोठ्या संख्येनं आहोत म्हणून शिरजोरी कराल तर तुमचे पाय परत तुमच्या मातृभाषेच्या राज्यात कशी पाठवायची याचा विचार मराठी माणसाला करावाच लागेल. सर्वच मराठी माणसं मॅनेज करता येत नाहीत. सर्वच मराठी माणसांच्या हातात तराजू धरण्याचं मनोहरी व्रत घेणारी नाहीत. हातात खेटर घेण्याची मराठी माणसाची सवय सगळ्याच मराठी माणसांनी अद्याप सोडलेली नाही. मराठी द्वेषाची किरीटे कशी ठेचायची हे जाणणारी मराठी माणसं अजून मुंबईत आहेत. भारतीय जनता पक्षातल्या मराठी माणसांना ह्या किरट्या सौमय्याची ही थेरं मंजूर आहेत का हे एकदा स्पष्टपणे मुंबईतल्या मराठी माणसांना कळलेले बरे!
महाराष्ट्रात ज्यांनी घरंदारं केली असे जवळजवळ ऐंशी टक्के लोक महाराष्ट्राशी एकरूप झालेही आहेत. उत्तम मराठी व्यवहार करणारे लक्षावधी गुजराती, मारवाडी, कानडी, तामिळी, सिंधी, तेलुगु महाराष्ट्रात आहेत. त्यांनी आपल्या मातृभाषेप्रमाणेच मराठीचा स्वीकार केला आहे. पण भाषेचा आधार घेऊन राजकारण करण्याची हौस काही किरट्यांना आलीय. ते मराठी-गुजराती समाजात परस्पर द्वेषाचं, अविश्वासाचं विष कालवू बघत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात लुडबुडण्यासाठी त्यांना अवदसा आठवली आहे. गुजराती बांधवांच्या नवरात्राचा मराठी माणसांच्या नव्या पिढ्यांनी मोठ्या उत्साहाने स्वीकार केला आणि गणेशोत्सवापेक्षा नवरात्री अधिक रंगतदार बनवल्या. या सगळ्याला नाट लावण्याचा नादान उद्योग काही नाचऱ्या राजकारण्यांनी करावा आणि आपल्या राजकीय स्वार्थासाठी पावट्याचे निमित्त शोधणाऱ्या पादऱ्यांना पुढं करून अमराठी अल्पसंख्याकांवर अन्याय होतोय असा गळा काढावा हा नीचपणाचा कळस आहे. मराठीचा गळा आवळण्याचा उद्योग करणाऱ्यांना सगळ्या मराठी माणसांनी नुसतं शब्दांनी नव्हे, प्रत्यक्षातही झापडलं तरी गैर ठरणार नाही. कारण हे जे घडतं आहे त्यामागे पद्धतशीर सूत्र आहे. मराठी माणूस पेटायला वेळ लागतो, पण एकदा पेटला तर त्याला छळणाऱ्या, नाडणाऱ्या, हिणवणाऱ्या, खिजवणाऱ्या वृत्तीची राख केल्याशिवाय राहात नाही. सगळ्याच मराठी माणसांनी भगवी वस्त्रे परिधान करून रुद्राक्षमाळा घालून घेतलेल्या नाहीत आणि आपले रांगडे मराठेपण गहाण टाकलेलं नाही. मराठी माणसाला निष्कारण डिवचू नये. हे असले किरटे मराठी माणसाच्या उरावर नाचवायचं भारतीय जनता पक्षानं ठरवलेलं असेल तर त्याची फळं पक्षाला भोगावी लागतील. महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर मुंबईचे सर्व फायदे मिळवण्यासाठी इथे वेगवेगळ्या प्रांतांतून जे लालची लोक आले त्यांनी एकत्रित येऊन मराठी माणसाला पैशाच्या जोरावर मुंबईत पराभूत करण्याचा चंग बांधलेला दिसतोय. राजकीय महत्त्वाकांक्षा असणाऱ्या उतावळ्या पुढाऱ्यांना आणि पत्रकारांनाही हेरून त्यांच्याकरवी मुंबईत मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी राजकारण यांना अपशकून करण्याचे जे प्रकार सध्या होत आहेत ते वेळीच रोखले गेले नाहीत, तर बघता बघता मुंबईचे वेगळे राज्य होईल. मराठी माणसा, यावेळी चुकशील तर मुंबईला मुकशील हे वारंवार सांगावं लागावं ही खरोखर दुःखद गोष्ट आहे. पण "महाराष्ट्राचे भाजपचे पुढारी महाराष्ट्र हिताकडे दुर्लक्ष करतात. दिल्लीश्वरांपुढे गुडघे टेकतात' असं तावातावानं सांगणारे विरोधी पक्षातले मराठी राजकारणीही आपल्या अमराठी नेत्यांपुढेच नव्हे, सहकाऱ्यांपुढेही असेच गुडघे टेकून महाराष्ट्राच्या हितावर निखारे ठेवतात हे दिसल्यावर मराठी माणसा, सावध राहा, नेत्यांना सावध कर, मराठी माणसांच्या दुष्मनांना धारेवर घर असा पुकारा पुनःपुन्हा करायलाच हवाय.
महाराष्ट्राचं शासन मराठीला न्याय देऊ शकत नाही, नको तेव्हा लेंड्या टाकतं. याचं कारण महाराष्ट्र शासनाची सूत्रंच बिगर मराठी माणसांच्या हातात आहेत. सत्ता जरी मराठी माणसांच्या हाती असली तरी, महाराष्ट्रातल्या उच्च शासकीय पदांवर ७० टक्के बिगर मराठी अधिकारी आहेत. ते आपल्याला मराठी बोलता येतं असं दाखवत असतीलही, तरी पण अजूनही शासनाचा कारभार मराठीतून चालत नाही याचं कारण या अधिका-यांची दाखवायची भाषा मराठी असली तरी प्रत्यक्षातली व्यवहाराची भाषा मराठी नाही हे दिसून आलंय. कारभार इंग्रजीत असला की, मंत्रीपदाचे नंदीबैल बुगबुगू करून हवं तसं वाकवता येतात हे कळून चुकल्यानं बोलायचं एक आणि करायचं दुसरं असा प्रकार हे अधिकारी शहाजोगपणे करीत आहेत. महाराष्ट्र शासनातले बिगर मराठी अधिकारी जेवढा मराठीचा वापर करतात तेवढा मराठी अधिकारी करत नाहीत असं अनेकदा सांगितलं जातं. ही कौतुकानं सांगायची गोष्ट आहे का? जागतिक मराठी परिषदा भरवून मराठीचे झेंडे जगभर नाचवण्यापेक्षा मंत्रालयात मराठी असून मराठीला फाट्यावर मारणारे जे कर्मचारी आहेत त्यांची थेरं थांबवणं महत्त्वाचं नाही? जर बिगर मराठी अधिकारी स्वतः मराठीचा वापर करतात, तर मग आपल्या हाताखालच्या लोकांना मराठीचा वापर करायला लावण्यात त्यांना अडचण आहे? शासकीय कारभार जर मराठीतून चालणार नसेल, मराठीचा मान जर सरकारच ठेवणार नसेल तर मराठीची गळचेपी थांबवणार कशी? महाराष्ट्र सरकार आपलं मराठीकरण कधी करणार आहे? महाराष्ट्रात मुंबईमुळं परप्रांतियांनी नको तेवढा हस्तक्षेप चालवला आहे. दिल्लीश्वरांशी निष्ठा दाखविण्यासाठी इथं मुंबईत परप्रांतियांना हाताशी धरून पद्धतशीरपणे मराठी माणसाच्या उरावर नाचवण्याचं राजकारण खेळलं जातंय. मुंबईत म्हशीचा गोठा, तोही बेकायदा बांधून, धंदा करायला आलेला उपरा हा हा म्हणता मुंबईतला महत्त्वाचा नेता होतो. आपल्या प्रांताची संघटित ताकद घेऊनच तो मुंबईत वावरतो. लोकशाहीनं दिलेले सगळे अधिकार वापरून तो इथल्या लोकांच्या आशा आकांक्षा तुडवत इथल्या माणसाला दुय्यम दर्जाचा बनवून सोडतो आणि इथल्या माणसानं काय करावे, यावरही अधिकारवाणीनं सुनवायला लागतो. त्याला शासनात विविध पदांवर असणाऱ्या अधिकाऱ्यांची सहानुभूतीच नव्हे, मदतही मिळते. मराठी माणसाच्या संस्थांना जमिनीचा तुकडा मिळताना शेकडो जणांना डोळे पांढरे करून घ्यावे लागतात. मात्र मराठी नसलेल्यांना आधी जमिनीचं दान, त्यावर पुन्हा अनुदान असा प्रसाद हात पुढं करताच कसा प्राप्त होतो? मराठी माणसाचे प्रश्न सोडवण्यापेक्षा, मराठी माणसापुढं प्रश्न उभे करून, मराठी माणसाला आपसातच झुंजायला लावून मराठीबाणा दाखवणारे राजकारणी आणि त्यांच्या कृपेनं मराठी माणसांचे सर्वांगीण कल्याण करण्याचा आव आणत चौफेर उडणारे मराठीचे सेवक यांच्याबद्धल काय बोलायचं? राज्यकर्त्यांनाच रामदासांचे बोल सांगावे हे बरं...!
सेवका आवरो नेणे। तो राजा मूर्ख जाणि जे ।
मूर्खचें राज्य राहेना। कोणाचे कोण ऐकतो।।
हरीश केंची,
९४२२३१०६०९
छोट्या चौकटी
"मराठी माणूस पेटायला वेळ लागतो, पण एकदा पेटला तर त्याला छळणाऱ्या, नाडणाऱ्या, हिणवणाऱ्या, खिजवणाऱ्या वृत्तीची राख केल्याशिवाय राहात नाही! मराठी माणूस सरळ आहे तोवर सरळ, वाकडा झाला की तो तुकडा पाडल्याशिवाय राहात नाही हे विसरू नये."
"मुंबईत म्हशीचा गोठा, तोही बेकायदा बांधून, धंदा करायला आलेला उपरा हा हा म्हणता मुंबईतला महत्त्वाचा नेता होतो. आपल्या प्रांताची संघटित ताकद घेऊनच तो मुंबईत वावरतो. लोकशाहीनं दिलेले सगळे अधिकार वापरून तो इथल्या लोकांच्या आशा आकांक्षा तुडवत इथल्या माणसाला दुय्यम दर्जाचा बनवून सोडतो!"
Subscribe to:
Post Comments (Atom)
मराठीच्या मरणकळा.....!
"पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधासाठी उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू येत्या पाच तारखेला मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येताहेत. ...
-
"आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करताना त्यांची वैविध्यपूर्ण वाटचाल डोळ...
-
"माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 'अवस्था ना घरका ना घाट का' अशी झालीय. त्यांना सहनही होत नाही अन् सांगताही येत न...
-
"खुज्या माणसांची सावली संध्याकाळी मोठी होते. तशीच आता सुमार कुवतीच्या माणसांची सर्वत्र सरशी झालेली दिसतेय. राजकारणाप्रमाणेच...
No comments:
Post a Comment