"शरद पवारांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मास्टरप्लॅन आखला असल्याचं समजतं. राष्ट्रीय स्तरावर प्रामुख्यानं हिंदी भाषिक पट्टयातून काँग्रेसचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न, शिवाय हिंदीभाषकांना भावणाऱ्या नितीशकुमार यांच्यासारख्या प्रभावी नेत्यांचं राष्ट्रीय राजकारणात पुनरागमन व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न चालवले आहेत. यासाठी त्यांनी सीताराम येचुरी यांना सोबत घेतलंय. असं घडलं तर वेगळा निकाल लागू शकतो याची जाणीव झाल्यानं भाजपकडून पवारांना लक्ष्य केलं जातंय. त्यासाठी भाजपबरोबरच देवेंद्र ब्रिगेडातले राणे पितापुत्र, दरेकर, पडळकर, सदाभाऊ खोत शिवाय सदावर्ते, राज ठाकरे यांना त्यांच्यावर सोडलं आहे. भाजपला आव्हान देणाऱ्या पवारांच्या या प्रयत्नानं आगामी काळात राष्ट्रीय राजकारणात आणि सत्ताकारणात काय घडेल हे पाहणं महत्वाचं असेल!"
---------------------------------------------------
बिहारच्या सत्तेत उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. नितीशकुमारांनी आमदारांना येत्या ७२ तास पाटणा सोडू नये अशी ताकीद दिलीय. बिहारमध्ये अघटित काही घडलं तर त्याचे राष्ट्रीय राजकारणावर परिणाम होण्याचीही शक्यता आहे. त्यासाठीची ही नांदी तर नाही ना! पवारांनी जो मास्टप्लॅन आखलाय त्याचा हा प्रारंभ तर नाही ना? अशी शंका यावी अशी स्थिती आहे. सत्तेसाठी २०१४ मध्ये न मागता पाठींबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत 'सॉफ्टकॉर्नर' स्वीकारलेल्या भाजपनं आता आक्रमक पवित्रा घेतलाय. विशेषतः शरद पवारांना टार्गेट करायचं ठरवलंय. पडळकर, सदाभाऊ खोत या देवेंद्र ब्रिगेडच्या साथीला आधी गुणरत्न सदावर्ते आता राज ठाकरे यांना पवारांवर सोडलंय. आता हा पवारविरोध अधिक टोकदार होत जाणार आहे. यांचं कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आहेत. त्यांना भाजपचे चाणक्य समजलं जातं. तसं राजकारणात आताशी अनेक चाणक्य उदयाला आलेत. प्रशांत किशोरांसारखे स्वयंघोषित चाणक्यही आहेत. पण गेली ५०-६० वर्षें सक्रिय राजकारणात असलेल्या शरद पवारांना देशातले सारे राजकारणातले चाणक्य मानतात. पवारांना नरेंद्र मोदींही चाणक्य मानतात, हे त्यांनीच एकदा सांगितलं होतं. सर्व राजकीय पक्षांशी त्यांचे मैत्रीचे, जिव्हाळ्याचे संबंध आहेत. जुन्यापिढीतल्या राजकारण्यांशी तर तो होताच पण नव्या तरुण नेत्यांशीही तेवढीच सलगी आहे. ते त्यांच्याकडं एक वडीलधारे म्हणून आदरानं बघतात. त्यांनी सत्ताधाऱ्यांसमोर एक पर्याय उभं करण्याचा प्रयत्न चालवलाय. सर्व विरोधकांना एकत्र आणण्यात पवारांचा मोठा हात असेल. आपल्या राजकीय शक्तीपेक्षा मोठा गेम पवार खेळू शकतात. यांची चाहूल लागल्यानं त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू झालाय. राज्यांच्या अधिकारक्षेत्रात असलेलं सहकार खातं दिल्लीकरांनी आपल्याकडं घेतलं. महाराष्ट्रात पवारांचं सहकार क्षेत्रावर वर्चस्व असल्यानं त्याला शह देण्याच्या हालचाली सुरु झाल्यात. आज पवारांचं वय झालंय. प्रकृती साथ देत नाही; पण मानावं लागेल की, त्यांनी या वयातही महाराष्ट्रात मोदी आणि फडणवीस यांनी जिंकलेली बाजी उलटवून त्यांना चारीमुंड्या चीत केलं आणि उद्धव ठाकरेंच्या हाती सत्ता सोपविली. हे मोदी-शहा-फडणवीस यांच्या जिव्हारी लागलंय. आता वयाच्या ८१ व्यावर्षी अत्यंत शांतपणे गुप्तता पाळत पवारांनी २०२४ साठी एक मास्टरप्लॅन तयार केलाय. यांची भनक लागल्यानंच मोदी-शहा अस्वस्थ बनले आहेत. मुंबईतल्या एका वरिष्ठ राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बोलत असताना त्यांनी म्हटलं की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत कशाच्या आधारे अखंड भारताच्या गप्पा मारतात? भाजपनेते काँग्रेसमुक्त, विरोधीपक्षमुक्त भारत कशाच्या जोरावर म्हणतात? देशातली जी आंतरराष्ट्रीय स्तरावरची, जिथं भारताचं मिनी रूप दिसतं असं म्हणतात त्या चारही महानगरात भाजपची सत्ता नाहीये. विरोधकांची आहे. देशाची राजधानी दिल्लीत केजरीवाल यांचं सरकार आहे, मुंबईत उद्धव ठाकरे यांचं, चेन्नईत स्टॅलिन यांचं तर कलकत्त्यात ममता बॅनर्जी यांचं सरकार आहे. इथं मोदींच्या पाऊलखुणा नाहीत. हे महत्वाचं आहे.
पवारांचा जो मास्टरप्लॅन तयार होतोय त्यात त्यांना देशातल्या सर्व विरोधकांना, प्रादेशिक पक्षांना, राष्ट्रीय स्तरावरच्या पक्षांनाही ज्यात काँग्रेस आणि डावेही आहेत त्यांना एका छत्राखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसच्या सोनियांशी, समाजवादी पक्षाच्या अखिलेश यांच्याशी चांगले संबंध आहेत. तेजस्वी यादव हे पवारांना वडिलांच्या जागी पाहतात. ममता बॅनर्जी यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत, यापूर्वी त्याही दोन तीनदा मुंबईत येऊन पवारांना भेटल्या आहेत. हेमंत सोरेन यांच्याशीही त्यांचे संबंध आहेत. बिजू जनता दलाचे वजनदार नेते मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याशीही पवारांचं नेहमी फोनवर बोलणं होत असतं. आंध्रप्रदेशचे जगन रेड्डी असो वा तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव असोत हेही पवारांचे निकटचे मानले जातात. स्टॅलिन यांच्याशीही पवार नेहमी बोलत असतात. सीपीएमचे सीताराम येचुरी यांच्या पक्षाचं केरळात सरकार आहे शिवाय ते संसदेतले सहकारी आणि व्यक्तिगत मित्रही आहेत. या सर्वांशी तुलना केली तर त्यांच्याकडं भाजपपेक्षा जास्त मतं आहेत. यांच्या साथीनं पवार २०२४ ला दिल्लीकरांना आव्हान देऊ इच्छितात. त्यांची रणनीती काय असेल, त्याची भूमिका काय असेल, ते कशाप्रकारे वर्कआऊट करताहेत हे हळूहळू लक्षात येईलच. या सगळ्या पार्श्वभूमीवर पवारांची मदार ही बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर अधिक दिसतेय. गेले काही दिवस नितीशकुमार यांची भूमिका काहीशी बदललेली दिसतेय. त्यांना बिहारमध्ये भाजपचं आव्हान दिसू लागलंय. त्यांनी नुकतंच एका रोजा इफ्तार पार्टीत ज्याचं आयोजन राबडीदेवी यांनी केलं होतं. नितीशकुमार त्याला आवर्जून उपस्थित होते. राबडीदेवी, तेजस्वी यादव, तेजप्रताप, लालूंनी कन्या मीसा याही तिथं त्यांच्यासोबत होत्या. त्यांच्यातली राजकीय दरी कमी झाल्याचं दिसून आलं. ते हास्यविनोद करीत होते. ह्या मनोमिलनामागे पवार असल्याचं म्हटलं गेलंय. पवार आणि सीताराम येचुरी यांनी २०१९ मध्येही हिंदी भाषिक पट्टयातून नितीशकुमार यांना लोकांसमोर आणून मोदींना पर्याय म्हणून आणण्याचा प्रयत्न केला होता. अखेरच्या क्षणी नितीशकुमार द्विधा मनःस्थितीत अडकल्यानं ते सारं बारगळलं. पण आता पवार आणि येचुरी यांचा असा एक प्रयत्न पुन्हा सुरू केलाय. नितीशकुमार यांना राष्ट्रीय नेतृत्वासाठी तयार करायचं. तेजस्वीची समजूत काढून त्यांच्याकडं बिहारची सूत्रं सोपवायची. २०१५ मध्ये जेडीयु आणि आरजेडी म्हणजेच नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांनी मोदींना चांगलाच शह दिला होता. त्या दोघांना त्या भूमिकेत पवार परत आणू इच्छितात.
जेडीयु आरजेडी एकत्र आले आले तर बिहारमधल्या लोकसभेच्या ४० आणि झारखंडमधल्या १४ अशा ५४ जागांवर त्याचा प्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. याबाबत हेमंत सोरेन आणि नितीशकुमार यांच्याशीही पवार- येचुरी यांची चर्चा सुरू आहे. या प्रयत्नाला यश आलं आणि नितीशकुमार हे मोदींच्या प्रभावातून बाहेर पडले तर देशात एक नवं समीकरण आकाराला येईल. पवारांच्या या मास्टरप्लॅनमध्ये जे गणित दिसतेय, हे जरा समजून घेऊ या. लोकसभेच्या ५४३ जागा आहेत. त्यातल्या ३०३ जागा या भाजपकडं आहेत. त्यांना मिळालेली मतं आहेत ३७.३६ टक्के. पण जी मतं भाजपला मिळाली नाहीत त्याची टक्केवारी ६२.७४ इतकी आहे. जवळपास दुप्पट मतं भाजपच्या विरोधातली आहेत. युपीएची ११० तर इतरांकडे ९५ जागा आहेत. म्हणजे २०५ जागा भाजप विरोधातल्या आहेत. नितीशकुमार यांना पुढं करून जर आणखी ७०-८० मिळवता आल्या तर भाजपच्या तेवढ्याच जागा घटतील. आणि भाजपच्या जागा ह्या २५० च्या आसपास राहतील. असं घडलं तर पवारांचा गेम इथं सुरू होईल. झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र यावर पवारांची नजर आहे. लोकसभेच्या झारखंड १४, बिहार ४०, उत्तरप्रदेश ८० आणि महाराष्ट्र ४८ अशा मिळून १८२ जागा आहेत. महाराष्ट्राला जरी वगळले तरी बिहार, झारखंड आणि उत्तरप्रदेशात लोकसभेच्या एकूण जागापैकी २५ टक्के जागा या पट्ट्यात आहेत. जो काही खेळ होईल तो इथंच होईल असा होरा असल्यानं पवार सतत नितीशकुमार, हेमंत सोरेन आणि अखिलेश यादव यांच्या संपर्कात आहेत. आज देशातल्या निवडणुकांसाठी मोदी-शहांच्यानंतर पवारच संसाधन उपलब्ध करून देऊ शकतात. देशातल्या विरोधीपक्षांची मोट बांधण्यासाठी पवारांशिवाय दुसरं व्यक्तिमत्त्व आजतरी नाही. कारण सर्व पक्षांशी पवारांचे व्यक्तिगत मैत्रीचे संबंध आहेत. अशीच व्यक्ती हे करू शकते. आजतरी त्यांच्या या प्रयत्नात पवारांचा व्यक्तिगत स्वार्थ दिसत नाही त्यांना प्रधानमंत्रीपद हवंय असं काही दिसत नसल्यानं ही मंडळी त्यांच्याभोवती जमू शकतात. मागे एकदा अशीच सर्व विरोधीपक्षांची बैठक झाली होती, त्यात सर्व प्रादेशिक पक्षाचे नेते उपस्थित होते. त्यांनी वेगवेगळ्या सूचना केल्या. त्यावेळी पवारांनी सुनावलं होतं की, 'केंद्रातल्या सत्ता मिळवण्याच्या गोष्टी आपण नंतर करू या, जर प्रत्येक प्रादेशिक पक्षांनी आपापल्या राज्यातून भाजपला रोखलं आणि दूर हटवलं तर केंद्राची सत्ता आपल्या हाती येऊ शकते. त्यावेळी आपण चर्चा करून की, सरकार कसं असेल, कोणाचं असेल! केंद्रातलं सरकार मिळवण्याच्या नादात कमीतकमी आपलं राज्य तरी गमावू नका. आपल्या राज्यावरच लक्ष्य केंद्रित करा!' विरोधक एकत्र आले तर भाजपचा पराभव होऊ शकतो हे कोल्हापूरनं दाखवून दिलंय. मविआतले पक्ष एकत्र न आल्यानं पंढरपूरमध्ये पराभव झाला याकडं त्यांनी लक्ष वेधलंय. दरम्यान भाजपनेते 'ओव्हर ऍक्टिव्ह' आक्रमक बनले आहेत. त्यांच्या साथीला गेलेल्यांना समजून चुकलंय की, भाजप आपला केवळ वापर करतेय. इथला विचार केला तर, अर्णव, कंगना, वानखेडे यांच्यापाठोपाठ गुणरत्न सदावर्ते, राणा दाम्पत्य आणि आता राज ठाकरे यांचा वापर भाजप करतेय. हे सारे 'प्रोक्सी' भाजप आहेत हे दिसून आलंय. परंतु भाजपनं कितीही प्रयत्न केला तरी हिंदू-मुस्लिम असा वाद इथं राज्यात होणार नाही कारण इथं पुरोगामी विचारधारा रुजलेली आहे. काँग्रेसकडं पवारांचा तोडीचा नेता नाही, शिवसेना पक्षप्रमुख हे पवारांच्या छत्रछायेखाली आहेत. पवारांचं राजकीय व्यक्तिमत्व मोदीही मानतात. कारण पन्नासवर्षांहून अधिक काळ ते राज्य आणि राष्ट्रीय सक्रिय राजकारणात आहेत. इतका काळ इतर कोणत्याही नेत्याचा नाही. प्रधानमंत्री मोदीही त्यांना चाणक्य मानतात. ते मागे एकदा जाहीरपणे म्हणाले होते की, 'राजकारणाची दिशा कोणत्या बाजूला झुकलीय वा हवा कोणत्या दिशेनं वाहतेय हे समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या शेजारी जाऊन काळ बसलं तर लक्षांत येईल!'
पवारांच्या व्यक्तिमत्वातले काही पैलू पाहिले तर लक्षांत येईल की, जे असाध्य ते साध्य करण्याचा ते प्रयत्न करतात. त्यांची पकड इथल्या सहकारी चळवळी बरोबरच उद्योगपतींवरही आहे. ज्यांची कार्पोरेट कार्यालये इथं मुंबईतच आहेत. अदानी-अंबानीच नव्हे तर इतर सारे उद्योगपती पवारांसमोर नतमस्तक होत असतात. त्यामुळं काही घडवायचं असेल तर त्यासाठी लागणाऱ्या साधनसामुग्रीची, संसाधनाची पवारांकडं कमतरता नाही. ममता असो वा नवीन पटनाईक जे गेली अनेक वर्षें सत्तेत आहेत पण त्यांच्याहून अधिक रिसोर्सेस पवारांकडं आहेत. त्यामुळं एखादा निर्णय घेतला तर त्याची अंमलबजावणी मजबुतपणे ते करू शकतात. पवार कधी डगमगलेले दिसले नाहीत मग त्यांना ईडीनं बोलावलं असेल, त्यांच्या नातेवाईकांवर, सहकाऱ्यांवर कारवाया होत असतांनाही हे शांत दिसले. हाच आत्मविश्वास त्यांना राजकारणातली वाटचाल करण्याला ताकद देत असतो. संसाधन आणि अंमलबजावणी नंतर त्यांच्याकडं एक असा गुण आहे की, ते फोडाफोडीच्या राजकारणात माहीर आहेत. राज्यात पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर मोदी-फडणवीस यांची बाजी उलटवली हे आपण पाहिलंय. ते जो निर्णय घेतात ते तडीस नेतात असं आजवर दिसून आलंय. भाजपच्या मागे संघाची ताकद उभी आहे. कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे, कार्पोरेट जगताचा मोठा पाठींबा-बॅकिंग आहे. आता तर सर्व सत्ता हाती आहे. साऱ्या संस्था, यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहेत. असं असलं तरी देशातलं अंतर्गत संबंधातलं राजकारण मोदीहून अधिक पवार जाणतात. हे खुद्द मोदी मानतात. ते शरद पवारांच्या पुस्तकाचं प्रकाशन करताना म्हणाले होते की, 'पवारांमध्ये एक शेतकरी लपलेला आहे. शेतकऱ्याला हवामानाचा अंदाज सर्वात आधी येतो. शरदरावांनी त्यांच्या त्या गुणांचा राजकारणात पुरेपूर उपयोग केलाय!' शरद पवारांसमोर जरी खूप आव्हानं असतील तरी दोन महत्वाची आव्हानं आहेत. एक काँग्रेसला वळवणं, त्यांच्यात पडलेली फूट सांधनं, अस्वस्थ असलेल्या, दूर गेलेल्या काँग्रेसजनांना एकत्र आणणं! काँग्रेसनं मजबूत व्हावं असं त्यांना वाटतं. अनेक राज्यात जवळपास १५०-२०० जागांवर काँग्रेसची भाजपशी थेट लढत होत असते. राजस्थान, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश असो अशा अनेक राज्यात ही थेट लढत आहे. तिथं काँग्रेसनं मजबुतीनं उभं राहावं असं पवारांना वाटतं. पण काँग्रेसचे राजकुमार-प्रिन्स आहेत त्यांना गेल्या १०-१५ वर्षांत वारंवार संधी दिली, पण त्यांचा परफॉर्मन्स काही दिसला नाही. अशाचप्रकारे ते नितीशकुमार यांच्याकडंही पाहतात. हिंदी पट्ट्यात त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, बिहार, झारखंड, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, उत्तराखंड इथला हिंदी भाषिक मतदारांना स्वीकारला जाईल असा नितीशकुमार यांच्याशिवाय इतर कोणता नेता आजतरी दिसत नाही. ते ममतात नाही नवीन पटनाईक यांच्यात नाही. केजरीवाल अद्यापही नवीन आहेत. नितीशकुमार यांना केंद्रीयमंत्री म्हणून अनुभव आहे. मोदींना प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून भाजपनं जाहीर केल्यानंतर ते भाजपप्रणीत सरकारमधून मोदींना विरोध करत बाहेर पडले होते, हा इतिहास आहे. नितीशकुमारांना त्या भूमिकेत परत आणण्याचा पवारांचा प्रयत्न सुरू आहे. ही आव्हानं पवारांसमोर आहेत. काँग्रेसचं हिंदी पट्ट्यातलं पुनरुज्जीवन आणि नितीशकुमार यांचं पुनरागमन कशाप्रकारे होतेय यावरच पवारांचा हा मास्टरप्लॅन अवलंबून असेल. पण एवढं मात्र निश्चित की, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना याची जाणीव झाल्यानेच पवारांना टार्गेट केलं जातंय...! पाहू या, आगे आगे होता हैं क्या. !!
हरीश केंची,
९४२२३१०६०९
Subscribe to:
Post Comments (Atom)
अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!
शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...
-
"शी S...S... कर्नाटकातली ही घटना अत्यंत शरमेची, किळसवाणी आणि धक्कादायक आहे, जनता दलाच्या प्रज्ज्वल रेवण्णा या खासदारानं तब्...
-
"तुम्हाला ट्राफिक हवालदारनं पकडलंय का? तो पैसे डायरेक्ट घेत नाही, एक टपरी असते, तिथं तो पैसे द्यायला लावतो. भाजप हा ट्राफिक...
-
"आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करताना त्यांची वैविध्यपूर्ण वाटचाल डोळ...
No comments:
Post a Comment