Tuesday, 31 May 2022

अविनाशी साम्राज्याला धक्का...!

"आपल्या विरोधात असलेल्यांच्या मुसक्या आवळण्याचं आणि त्यांच्या मस्तकी ईडीचा किरीट चढविण्याचा खेळ सध्या राज्यात सुरू आहे. एकापाठोपाठ एक विरोधीपक्षाच्या राजकारण्यांनंतर आता मराठी उद्योजकांकडे केंद्रीय तपास यंत्रणांनी आपला मोर्चा वळवलाय. पुण्यातले उद्योजक, पतंगराव कदमांचे व्याही, सकल पक्षांचे मित्र, आपल्या कल्पनेतून शून्यातून विश्व निर्माण करणारे हरहुन्नरी अविनाश भोसले यांना आता लक्ष्य करण्यात आलंय. सध्या सीबीआयच्या जाळ्यात त्यांना अडकवलं आहे. आता ईडी त्यांना आपल्याकडं घेण्याची शक्यता आहे. राज्यात अशी अनेक मंडळी आहेत पण मराठी उद्योजकांना टार्गेट करण्यात केंद्र सरकारला विशेष आनंद होत असावा. यामागे विरोधकांना मिळणारी रसद राखण्याचा हा डाव दिसतो आहे. असो. अविनाश भोसले कोण आहेत याचा घेतलेला हा मागोवा!"
--------------------------------------------------

पुण्यातले उद्योजक अविनाश भोसलेंना सीबीआयनं अटक केली आहे. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालय-ईडीनं अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांची ४० कोटींहून अधिकची संपत्ती जप्त केली होती. १० फेब्रुवारी रोजी ईडीनं अविनाश भोसले यांच्या पुण्यातल्या कार्यालयावर छापा टाकला होता. पण, अविनाश भोसले काही पहिल्यांदाच वादात सापडलेत, असं नाही, तर विमान प्रवास करताना केलेलं कायद्याचं उल्लंघन असो किंवा राजकारण्यांशी असलेले संबंध, अविनाश भोसले नेहमीच चर्चेत राहिले आहेत. ईडी आणि इतर तपास यंत्रणेचा वापर महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस'साठी होतोय हे आजवर दिसून आलंय. यापुर्वी ज्यांच्यावर ईडीनं कारवाई केली पण त्यांनी भाजपला जवळ केल्यानं त्यांची त्यातून मुक्ती झाली. ज्यांनी भाजपला विरोध केला त्यांच्याभोवती ईडी व इतर तपास यंत्रणांनी फास आवळलाय. त्यातून अविनाश भोसले यांना लक्ष्य केल्याचं म्हटलं जातंय. २००६ साली हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली आणि अभिनेता ब्रॅड पिट हे दोघे अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्ल यांच्याशी संबंधित चित्रपटाचं शूटिंग करण्यासाठी पुण्यात आले होते. त्यावेळेस या दोघांच्या राहण्याची सोय पुण्यातल्या अविनाश भोसले यांच्या प्रासादतुल्य बंगल्यात करण्यात आली होती. भोसले यांचं बाणेरमध्ये घर आहे. त्याला व्हाईट हाऊस असं नाव देण्यात आलं आहे. पांढऱ्या रंगाच्या या बंगल्याचा लूक अमेरिकेच्या व्हाईट हाऊस सारखा आहे. इथंच भोसले यांची तिन्ही हेलिकॉप्टर्स असतात, असं सांगितलं जातं.

अविनाश भोसले यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातलं तांबवे हे गाव. वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं ते अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेरला गेले. त्यांचे वडील जलसंपदा विभागात अभियंता म्हणून कामाला होते. पुढं अविनाश भोसले पुण्यात आले आणि रिक्षा चालवण्याचं काम करू लागले. यासोबत ते छोटछोटी बांधकाम कंत्राटं घेत होते. अविनाश भोसले यांनी १९७९ मध्ये अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्टचर लिमिटेड या ग्रुपची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी बांधकाम क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. आम्ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या अनेक मुख्य पायाभूत प्रकल्पांच्या बांधकामातही सामील होतो. यात महामार्ग, पूल, बोगदे, तलाव आणि धरणांच्या बांधकामांचा समावेश आहे. असं अविनाश भोसले यांच्या ग्रूपच्या वेबसाईटवर नमूद केलं आहे. अविनाश भोसले यांच्या कारकिर्दीनं खऱ्या अर्थानं वळण घेतलं ते १९९५ दरम्यान शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाची कामं मिळाली. याच माध्यमातून त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी कालवे, धरणं बांधली. त्यानंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं. या सरकारचं मुख्यालय पुणे असल्यानं ते अविनाश भोसले यांच्यासाठी अनेक अर्थांनी सोयीचं ठरलं. त्यावेळी त्यांच्याकडं या व्यवसायाचं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं म्हणून मग त्यांनी आंध्रप्रदेशातल्या रेड्डी बंधूंना हाताशी धरलं. त्यांच्याशी व्यावसायिक संबंध प्रस्थापित केलं, त्यांना भागीदार बनवलं आणि त्यांच्या अशा कामाच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्रातली त्यातही कृष्णा खोरे प्रकल्पातली कामे घेतली. कामाची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच भोसले यांनी आपला व्यावसायिक कामातला नफा आधीच काढून घेऊन रेड्डी यांना त्या कामाची जबाबदारी देऊन टाकली. भागीदारीतून नफा घेऊन बाहेर पडल्यानंतर या नफ्यातून अनेक वेगवेगळ्या व्यवसायात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रासह देशभरात काम सुरू केलं. पुढे जलसंपदा विभागातल्या प्रकल्पांबाबत वाद निर्माण झाला, तेव्हा अविनाश भोसले यांनी जलसंपदा विभागातील कामं कमी करून इतर क्षेत्रांमध्ये उडी घेतली. गेल्या १५ ते १८ वर्षांत अविनाश भोसले यांची जी वाढ झालीय, ती प्रचंड वेगानं झालीय. जिला 'रॉकेट राईज' असं म्हटलं जाऊ शकतं. अविनाश भोसले यांनी पुण्यातल्या कोरेगाव पार्क भागात उभारलेल्या हॉटेलच्या उद्घाटनाला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, राष्ट्रवादीचे शरद पवार, भाजपचे गोपीनाथ मुंडे, काँग्रेसचे पतंगराव कदम आणि त्यावेळेचे देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे महाबळेश्वरला गेल्यानंतर ते अविनाश भोसले यांच्या बंगल्यामध्ये मुक्कामी राहिले आहेत. बाळासाहेब ठाकरे पुण्यात आल्यानंतर अनेकदा त्यांच्या गाडीचं सारथ्य अविनाश भोसले यांनीच केलं आहे. त्यावेळी त्याच्या बातम्यासुद्धा छापून आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार २०१३ मध्ये सांगली दौऱ्यावर असताना त्यांची तब्येत अचानक बिघडली. यानंतर त्यांना अविनाश भोसले यांच्या हेलिकॉप्टरनं पुण्यात आणलं गेलं. हे हेलिकॉप्टर अविनाश भोसले यांच्या बाणेर इथल्या घरावर लँड झालं होतं. याचीसुद्धा मीडियात बरीच चर्चा झाली होती. अविनाश भोसले यांच्या मुलीचं लग्न काँग्रेस नेते आणि राज्य सरकारमधले मंत्री विश्वजीत कदम यांच्याशी झालं आहे. अविनाश भोसले यांच्या सर्वपक्षीय नेत्यांसोबतच्या संबंध आहेत. अविनाश भोसले यांच्या साम्राज्याचा विस्तार हा निव्वळ सर्वपक्षीय राजकीय आशीर्वादावर आहे. त्यात त्यांची काम करण्याची आणि करून घ्यायची पद्धत याचाही वाटा आहेच. शिवसेना भाजपच्या सत्तेच्या काळात छोटेमोठे कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या अविनाश भोसले यांना 'अनलिमिटेड काम' देण्याचं लायसन्स मिळालं आणि त्यानंतर कृष्णा खोरे आणि इतर धरणांची मोठी कामं त्यांना मिळाली. सध्याच्या सर्वच नेत्यांसोबत अविनाश भोसले यांचे चांगले संबंध आहेत. बड्या सनदी अधिकाऱ्यांसोबतही त्यांची मैत्री आहे. अनेक अधिकाऱ्यांसाठी ते स्वत: कॉफी घेऊन जातात याचे किस्सेही मंत्रालयाच्या कँपसमध्ये चर्चेचा विषय आहे. अविनाश भोसले यांचा मातोश्रीपासून बारामतीपर्यंत चौफेर मधुर असा वावर आहे. १९९७ पासून महाराष्ट्रात जे जे सत्तेत आले, त्या प्रत्येकाच्या ते संपर्कात आहेत. राजकारण्यांना जे जे पाहिजे, ते पुरवण्याचं काम करणारा पहिला मराठी कंत्राटदार म्हणजे अविनाश भोसले होय!

अविनाश भोसले यांच्याकडं तीन हेलिकॉप्टर आहेत. अनेक राजकीय पक्षांचे पुढारी आपल्या प्रचारासाठी हे हेलिकॉप्टर वापरतात. राजकारण्यांना वापरासाठी हेलिकॉप्टर पुरवणं, ही अविनाश भोसले यांची अभिनव कल्पना असल्याचं जाणकार सांगतात. उद्धव ठाकरे यांनी आषाढी वारीची फोटोग्राफी करताना ज्या हेलिकॉप्टरचा उपयोग केला ते हेलिकॉप्टर अविनाश भोसले यांच्या मालकीचं होतं आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी 'पाहावा विठ्ठल' या त्यांच्या पुस्तकामध्ये अविनाश भोसले यांचे आभारही मानले आहेत. निवडणुकीतील हेलिकॉप्टर्सच्या वापराविषयी २००९ मधल्या निवडणुकीदरम्यान त्यांनी एकदा सांगितलं होतं, आमच्याकडे फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातल्या अनेक राजकारणी आणि राजकीय पक्षांकडून विनंती करण्यात आली आहे. असं असलं तरी त्यांनी यावेळी हेलिकॉप्टरसाठी विनंती करणारे राजकारणी किंवा पक्ष यांची नावं सांगितली नव्हती. अविनाश भोसलेंचं हेलिकॉप्टर वापरलं नाही असा एकही बडा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात नाही. अनेक केंद्रीय नेतेही लाभार्थ्याच्या यादीत आहेत. अविनाश भोसले अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. महाराष्ट्रात कथित सिंचन घोटाळ्याच्या चर्चेनं जोर धरल्यानंतर २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. २००८-०९ मध्ये जलसंपदा विभागाच्या नियमांना तिलांजली देऊन चार कंत्राटदारांना धरणांच्या कामासाठी अॅडव्हान्स पैसे देण्यात आले. यासंबंधीच्या आदेशावर तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांची स्वाक्षरी होती. या चारपैकी एक होता धापेवाडा बॅरेज प्रोजेक्ट. या कामासाठीचं कंत्राट अविनाश भोसले यांच्या सोमा एंटरप्राईज या कंपनीला देण्यात आलं होतं. या कामासाठीचे वीस टक्के पैसे अॅडव्हान्समध्ये त्यांना देण्यात आले होते. यासाठीच्या आदेशावर अजित पवारांची स्वाक्षरी होती. १९९५ नंतर महाराष्ट्रात जेवढ्या धरणांचं बांधकाम झालं, त्यापैकी पन्नास टक्क्यांहून अधिक कामं अविनाश भोसले यांची कंपनी किंवा त्यांची भागीदारी असलेल्या कंपन्यांनी केली. यात महाराष्ट्राचा किती पैसा गुंतला असेल, याचा आपण अंदाज बाधू शकतो. याशिवाय, अजित पवार पुण्यात रेंज हिल भागातल्या ज्या जिजाई बंगल्यामध्ये राहतात तो बंगला अविनाश भोसले यांच्या मालकीचा होता. या बंगल्याची मालकी नक्की कुणाची, हे ठरवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाला या प्रकरणाची दखल घ्यावी लागली होती. नंतर आपण हा बंगला अजित पवारांना विकल्याचं  अविनाश भोसले यांनी स्पष्ट केलं होतं. काही वर्षांपूर्वी विदेशातून येताना महागडी घड्याळे, दागिने आणताना कस्टम्स ड्यूटी भरली नाही म्हणून अविनाश भोसले यांना दंड करण्यात आला होता. त्यावेळीही त्यांचं नाव चर्चेत आलं होतं. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी न घेता विदेशात बँक खातं उघडल्याचा अविनाश भोसले यांच्यावर आरोप आहे. यासाठी त्यांना १ कोटी ८३ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी या खात्यात पाचशे कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. आता हे पैसे कुणी आणि कशासाठी जमा केले, हे तपासण्यासाठी ईडीनं मुंबईत दोनदा त्यांची चौकशी केली आहे. त्यानंतर आता पुण्यातल्या त्यांच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले आहेत.

सुमारे सव्वा वर्षापूर्वी भोसले यांनी पोलीस आयुक्तांकडं जितेंद्र नवलानी यांची लेखी तक्रार केली होती ती त्यांना भोवली असल्याची चर्चा आहे. अविनाश भोसले मुंबई पुण्यातले मोठे नाव सर्व राजकीय पक्षांशी लागेबांधे आहेत. गोपीनाथ मुंडे यांचं बोट पकडून पहिला राजकीय धडा गिरवला; राजकीय धडे गिरवता गिरवतता राजकीय नेत्यांच्या गळ्यातला ताईत कधी झाले ते आता भोसले यांनाही आठवणार नाही युतीच्या पहिल्या राजवटीत पुण्यात असा काही जम बसवला की सभ्य पुणे आणि गुन्हेगारी जगताचे पुणे त्यांच्या खिशात कसे आले ते अजूनही भल्याभल्यांना समजलेले नाही राजकीय नेत्यांच्या गळ्यातील ताईत होवून एका मर्यादेत होणारा फायदा नोकरशाहीलाही खिशात ठेवले तर ' पांचो उंगलिया घी मे ' हे पक्के ओळखल्याने मंत्रालयातलं अनेक नोकरशहा त्याच्या जेवणाच्या टेबलावर जाऊन कधी बसले हे नोकरशाहीच्या लक्षातच आले नाही अविनाश भोसले यांनी फोन करावा आणि मंत्रालयातील फाईल हवी तिथे फिरवावी इतका दरारा या माणसाने निर्माण केलेला होता मंत्रालयात आणि राजकीय वर्तुळत ते ए बी या आद्यासक्षरनेच ओळखले जात असत मुंबई ठाण्यातील अनेक यशस्वी राजकीय नेत्यांप्रमानेच त्यांचा ही प्रवास रिक्षा चालवूनच सुरू झाला हा एक विचित्र योगायोग समजावा! अविनाश भोसलेना नुकतंच केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या सीबीआय तपास यंत्रणेने अटक केली आणि त्यांची रवानगी सीबीआय कोठडीत केली. खरंतर गेल्या काही महिन्यांपासून भोसले केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर होतेच भोसले यांनी बरोबर सव्वा वर्षापूर्वी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्तांकडे ईडी या तपास यंत्रणेतला एका दादा असलेल्या दलालाची म्हणजे जितेंद्र चंद्रलाल नवलानी यांच्या विरूध्द सुमारे आठ पानांची जोरदार तक्रार केली होती ही तक्रार केवळ जोरदार नाही तर जणू बॉम्बच आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये या लिखित तक्रारीत ईडी तपास यंत्रणा आणि नवलानी यांची कुंडलीच मांडण्यात आलेली आहे जितेंद्र नावलानी हा ईडीचा सेटलमेंट एजेंट असल्याचा गंभीर आरोप या पत्रात भोसले यांनी केला आहे. भोसले केवळ आरोप करूनच थांबलेले नाहीत तर तब्बल ७० व्यक्ती आणि कंपन्यांकडून सुमारे ६० कोटी दलाली वसूल करून ईडी आणि संबंधित व्यक्ती बा कंपन्यांमध्ये मांडवली घडवून आणली. या मांडवलीत दिवाण हौसिंग, लार्सन अँड टुब्रो, रहेजा बिल्डर, पलिझो हॉटेल्स, मोंशर फायर, इंडिया बुल्स, रुस्तमजी, इनोर्बिट मॉल, डी बी रिॲलिटी, वधवान बंधू अशा अनेकांची नावे भोसले यांनी दिली आहेत नवलानी याने काहीजणांकडून कोट्यवधी तर काहींकडून लाखो रुपये उकळले आहेत असाही आरोप त्यात केलेला आहे आणि या सर्व मोठ्या रकमा सल्ल्यापोटी घेतल्याचा आव ही नवलाने आणला आहे या सर्व रकमा सल्ल्यापोटी घेतलेल्या नसून ही खंडणीच असल्याचा आरोप भोसलेनी केला आहे. अविनाश भोसले यांनी हे पत्र कुणातरी मोठ्या राजकीय नेत्याच्या सांगण्यावरूनच आयुक्तांना लिहिले असा केंद्रीय यंत्रणांना संशय आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाहीतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा यामागे हात असू शकतो असा केंद्र सरकारला दाट संशय आहे ते नाव वदवून घेण्यासाठीच ही आजची अटक असावी असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे आज सीबीआयने ताब्यात घेतले आहे उद्या किंवा काही दिवसांनी ईडी ही चौकशीसाठी भोसले यांना अटक करू शकते असा कयास आहे.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...