Saturday, 8 July 2023

'सत्ता'मेव जयते...!

"सर्वोच्च न्यायालयानं शिवसेना फुटीवर राज्यपालांचे, नेता निवडीचे, प्रतोद निवडीचे सारे निर्णय चुकीचं ठरवले, मात्र सत्ता फुटीरांच्याच हाती दिली! हा अजब न्याय दिला. तो निर्णयच आता इतरांसाठी 'पथ मार्गदर्शी' ठरलाय. पक्षात फूट पाडून सत्तेसाठी शिंदेगटानं जी पायवाट चोखाळली, त्याच पायवाटेवरूनअजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न चालवलाय! ही इतिहासाची पुनरावृत्ती ठरतेय. पूर्वी पक्षात फूट व्हायची, फुटीर नवा पक्ष स्थापन करायचे, आता फुटीर पक्षच आपला आहे, चिन्हही आपलंच आहे, असा दावा करून पक्ष बळकवताहेत, सत्ता मिळताहेत! त्यासाठी 'महाशक्ती'चा आशीर्वाद असतोच. 'पुरोगामी महाराष्ट्र' असं म्हणवून घेण्यास लाज वाटावी असं सध्या महाराष्ट्रात घडतंय. बेदिली, फसवणूक, विश्वासघात, बदमाशी, उन्माद, अहंकार, माज यांना ऊत आलाय. राजकारणाचा तर पार चोथा झालाय, चिखल झालाय!"
---------------------------------------

*या* लेखाचा मथळा देतांना 'सत्यमेव जयते' या पवित्र शब्दाचं विडंबन करताना मनाला खूपच वेदना झाल्या. पण त्याशिवाय दुसरा मथळा योग्य वाटतंच नाही! सध्या राज्यात राजकारण्यांचा नंगानाच चाललाय. कसलाही विधिनिषेध राहिलेला नाही. सत्तापिपासूनी कोलांटउड्या मारत सत्ता मिळवली तरी त्यांच्यात अस्वस्थता आहे. त्यातल्या अनेकांचा मंत्रिपदं मिळवण्याचा हट्ट आहे, पक्षातलं परतीचे दोर कापले गेलेत. शिंदेंसेनेच्या फुटीरांमध्ये चलबिचल सुरू आहे. अजित पवारांच्या फुटीरांमध्ये नव्यांना स्थान मिळालेलं नाही, त्याच जुन्या खोंडांकडं मंत्रिपद दिली गेलीत. त्यामुळं त्यांचा 'अभिमन्यू' झालाय. अनेक कुंपणावर आहेत. त्यांची अवस्था 'कोणता झेंडा घेऊ हाती!' अशी झालीय. त्याचं समाधान करण्यात नेतृत्वाला अपयश येतंय. त्यामुळं सत्तेतली शिंदेंसेना अजितवादी पक्ष यांच्यातल्या अनेकांकडं सत्ता झिरपलीच नाही, त्यामुळं ते सारे अस्वस्थ आहेत. तर १०५ आमदार असतानाही 'महाशक्ती'ला सत्तेत दुय्यम स्थान मिळालंय. कमी संख्या असलेल्यांना गोंजारलं जातंय. यामुळं सारे भाजप अस्वस्थ आहेत. इतर पक्षातून भाजपत आलेल्यांची अवस्था तर आणखीच अवघड झालीय. 'ना घरका ना घाट का!' अशी स्थिती झालीय. न्यायालयाचा निकाल लागूनही सेना फुटीरांबाबत अध्यक्ष निर्णय देत नाही म्हणून उध्दवसेना अस्वस्थ आहे, त्यासाठी पुन्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय. तर आपण पक्षाचे सर्वेसर्वा असतानाही पक्ष पळवला गेलाय म्हणून राष्ट्रवादी शरद पवारही अस्वस्थ बनलेत. त्यांनी नव्यानं पक्ष उभारणीसाठी कंबर कसलीय. या सगळीकडंच राजकीय अस्वस्थता पसरलीय. सगळ्यांनी नैतिकता कधीच गुंडाळून ठेवलीय, केवळ 'सत्ता' आणि त्यातून मिळणारा 'मत्ता' हेच लक्ष्य असल्यानं राजकारण्यांचा गोंधळ उडालाय! शांत, स्वस्थ आहे तो फक्त काँग्रेस पक्ष! सर्वात कमी आमदार असलेला काँग्रेस पक्ष राज्यात आता दुसऱ्या क्रमांकाचा झालाय! शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या घटल्यानं आता दोन्ही सभागृहातल्या विरोधीपक्षनेतेपद त्यांच्याकडं येईल! दुसरीकडं राजकारण्यांचं 'कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळून' वागणं लोक अनुभवताहेत. नैतिकता, ध्येयधोरणं, तत्व, विचार, मूल्यं हे सारं आता वाऱ्यावर उडून गेलंय. सत्ता आणि मत्ता हे अंतिम लक्ष्य, उद्देश राहिलेलंय. ज्यांना सत्तेत बसायला मतं दिलीत ते विरोधात आहेत अन ज्यांना विरोधात बसण्यासाठी मतं दिली ते सत्तेत आहेत. सत्तातुरांचा 'खो खो' चा खेळ सुरू आहे. कशाचीच, कुणाचीच, कसलीच लाज राहीलेली नाही. सत्तेसाठी मूठभरांचा नग्न स्वार्थ हे राज्यांचं, राष्ट्राचं वा समाजाचं अधिष्ठान असू शकत नाही. राज्यव्यवस्थेच्या मुळाशी किमान काही मूलभूत नैतिक मूल्यांचं अधिष्ठान असावं लागतं. ती नैतिकता, न्याय, विश्वास, सत्य आणि शिव या मूल्यांवर आधारलेली असते. उत्तम समाजाचं ते लक्षण असतं. अशा समाजातच प्रत्येकाला स्वतःचं कल्याण साधण्याची, माणूस म्हणून शांततेनं जगण्याची हमी मिळू शकते. या मूल्यांच्या अभावांसह जे सत्ताकारण चालतं त्यातून निर्माण होतो तो फक्त 'जंगलचा कायदा!'

बळी तो कान पिळी या न्यायानं, बळी मग तो शारिरीक ताकदीनं केलेला असो की सत्तेच्या कवचामुळं, तोच अशा समाजात इतरांचे कान पिळत असतो आणि मग तिथल्या अशा जनतेला जनता म्हणत नाहीत, तर गुलाम म्हणतात! आपल्याकडंच्या सर्वच राजकीय पक्षांची वाटचाल ही असे गुलाम निर्माण करण्याच्या दिशेनंच सुरू आहे, हे इथलं उघडंनागडं वास्तव आहे. इथं जनतेला किंम्मत शुन्य! अर्थात जनता पण तशीच आहे, ती या अशा नेत्यांनाच देव मानते…! राजकारणात कसलीच नैतिकता नसते, साधनसुचिता नसते, असं म्हटलं जातं; पण त्यात असतो तो फक्त संधीसाधूपणा आणि फक्त वैयक्तिक फायद्याचा विचार. गेल्या रविवारी दुपारी असाच सर्वांना अनपेक्षित धक्का बसला, राजकारण्यांना, कार्यकर्त्यांना, महागाईग्रस्त सामान्यांना आणि तमाम पत्रकारांनाही. शनिवारी पुण्यात शरद पवारांचा कार्यक्रम होता. पत्रकार ज्ञानेश महाराव यांच्या सत्कारासाठी तब्बल चार तास ते उपस्थित होते, पण त्यांना अशा प्रकारची कोणतीही चाहुल लागलेली नव्हती. मात्र इकडं अजित पवार आणि त्यांच्या समर्थक राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करून मुंबईत रविवार सकाळपर्यंत पोहोचा असे निरोप देत होते. अजितदादा असं कोणतंही बंड करणार नाहीत. जरी त्यांनी १ जुलैचा अल्टीमेंटम पक्षाला दिला असला तरी ते कोणताही आततायी निर्णय घेणार नाहीत, असा विश्वास होता. मात्र दुपारी सगळंच चित्र पालटलं. टीव्हीवर 'अजितदादा शपथविधीसाठी राजभवनाकडं रवाना!' अशा बातम्या झळकू लागल्या. उभ्या महाराष्ट्राला धक्का बसला. कार्यकर्ते अस्वस्थ झाले. शरद पवार देशाच्या राजकारणासाठी  सरसावले असताना त्यांना स्वतःचं घर सांभाळता आलं नाही. स्वतःच्या पक्षाला सावरता आलं नाही. अजितदादांनी त्यांच्या काकाला, पक्षालाही वेठीला धरलं आणि ते आणि त्यांचे सहकारी 'देवेंद्रवासी' झाले! कालपर्यंत शिंदेंसेनेला '५० खोके एकदम ओक्के' अशी टीका करणाऱ्या अजित पवारांनी एकनाथ शिंदेंजवळ शरणागती पत्करली. 'अजितदादा चक्की पिसिंग, चक्की पिसिंग..!' असं जाहीर करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचे ते सत्तासाथीदार बनले. असा सत्ताखेळातला व्यवहार हा अनैतिकतेनंच करायचा असतो, त्यात नीतिमूल्यं डोक्याला गुंडाळून ठेवायची असतात, असा एक व्यापक भ्रम सध्या निर्माण झालाय. देशात साध्य, साधन, विवेक सांगणारा एक महात्मा होऊन गेला, हेही विसरलं गेलंय. किंबहुना त्यांची हत्या करणाऱ्यांचं महिमामंडन करण्यात सत्ताधारी मग्न आहेत. इकडं कोण कोणाला फसवून, घाबरवून, पैसे चारून सत्तेच्या तिजोरीवर वेटोळे घालून बसतो, यावरून 'कोण कोणाचा बाप' ठरतो अशी सैद्धांतिक मांडणी राजकारण्यांमध्ये होऊ लागलीय. फसवणूक, विश्वासघात, बदमाशी, उन्माद, अहंकार, माज अशा गोष्टी समाजजीवनात प्रतिष्ठित झाल्यात. त्या आड कोणताही 'इझम' येत नाही, कोणतीही धार्मिक नैतिकता येत नाही. आज संपूर्ण देश एकच राजकीय भूमिका घेऊन जगतोय. ते म्हणजे 'आपल्या नेत्यानं खाल्ली तर श्रावणी आणि दुसऱ्यानं खाल्लं तर शेण...!' आता अनुयायी, समर्थक, भक्त, पाठीराखे म्हणून काम एवढंच उरलंय, की आपल्या नेत्याच्या, पक्षाच्या प्रत्येक कृतीचं समर्थन करणं, त्या कृतींना तात्विक मुलामा देणं. विरोधकांना ट्रोल करणं. पण आज अशी स्थिती निर्माण झालीय की, सदासर्वकाळ अविरत सोशल मीडियावर निंदानालस्ती, ट्रोल करणारे भक्तगण गेले आठवडाभर सोशल मीडियावरून गायब झालेत, ते शांत आहेत. नेमकी काय भूमिका घ्यावी हे त्यांचं त्यांनाच समजतच नाहीये! कालपर्यंत ज्यांच्यावर टीकेची झोड उठवली तेच आता मांडीवर येऊन बसलेत!

'पुरोगामी महाराष्ट्र' असं म्हणवून घेण्यास लाज वाटावी असे प्रकार सध्या महाराष्ट्रात घडताहेत. राजकारणाचा तर पार चोथा झालाय, चिखल झालाय.  जनतेची कामं करायची सोडून राजकारणी एकमेकांवर चिखलफेक करण्यात दंग आहेत. आता पुतण्यानं भाजपसमोर लोटांगण घालत 'मला काकांपासून वाचवा हो' अशी किंकाळी फोडलीय. यापूर्वी जेव्हा-जेव्हा कठीण प्रसंग आले, भ्रष्टाचाराची प्रकरणं अंगाशी येण्याची शक्यता वाटली तेव्हा अजित पवारांनी 'काका मला वाचवा' अशी हाक मारली होती. काकांनीही त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केल्याचं दिसलं होतं. तोवर सगळे ठीक चाललं होतं, पण आता काकांची गत धृतराष्ट्रासारखी झाल्यावर पुतण्याला काकापासून संरक्षण घेण्यासाठी थेट कळप मोडावा लागलाय. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार भाकरी फिरवून पक्षाची संघटनात्मक घडी बसवण्याचा प्रयत्न करीत असताना अजित पवार आणि त्यांच्या आठ सहकाऱ्यांनी  शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. रविवारी राजभवनावर दुपारी अत्यंत घाईघाईनं पार पडलेल्या शपथविधी समारंभात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर अन्य आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्री बनण्याची संधी साधलीय. पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेना आणि भाजपच्या आमदारांना शपथ देऊन शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अशी चर्चा असतानाच अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनी शपथ घेतली. या शपथविधीमुळं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचं दिसलं. रविवारी सकाळपासून राजकीय घडामोडींना प्रारंभ झाला होता. अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीला प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे हेही उपस्थित होते. सुप्रिया यांनी अजित पवारांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. या आधीचं अजित पवारांचं पहाटेचं बंड फसलं होतं. यावेळची खेळी फसू नये म्हणून अजित पवार विधानसभेतल्या बहुसंख्य आमदारांच्या संपर्कात होते. भाजपसोबत जाण्याचा अजित पवारांचा निर्णय म्हणजे शरद पवारांना मोठं राजकीय आव्हान असल्याचं दिसतंय. सत्तेसाठी अधीर झालेल्या नेत्यांनी हवं तेव्हा हव्या तशा उड्या मारायच्या, त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र निष्ठा, विचारसरणी धरून ठेवायची. आपल्या नेत्यांसाठी भावंडांशी वैर घ्यायला मागंपुढं पाहायचं नाही. राज्यातल्या सध्याच्या घडामोडी पाहता अशा हाडाच्या कार्यकर्त्यांनी आरशात पाहायला हवंय आणि जनतेनंही हा खेळखंडोबा आणखी किती दिवस सहन करायचा याचा एकदा सोक्षमोक्ष लावायलाच हवा. 'पुरोगामी महाराष्ट्र' म्हणायची आता धास्ती वाटतेय, एवढा खेळखंडोबा आपल्या नेत्यांनी, राज्यकर्त्यांनी पुरोगामीत्व या संकल्पनेचा करून ठेवलाय. आपल्या सोईनुसार भूमिका घेत पुरोगामी या संकल्पनेचा बाजार मांडणाऱ्या नेत्यांमुळं आणि यांचे 'खेळ' बिनबोभाटपणे सहन करणाऱ्या आम्हा जनतेमुळं रविवारी सुरू झालेल्या तमाशाचं फार वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. ही गोष्ट या पलटूराम नेत्यांच्या मागं-पुढं करणाऱ्या, त्यांच्यासाठी मतदारसंघातल्या, तालुक्यातल्या अन् अगदी गावातल्या, घराशेजारी राहणाऱ्या मित्रांशी वैर घेणाऱ्या कार्यकर्त्यांच्या ध्यानी यायला हवी एवढीच काय ती इच्छा. राजकीयदृष्ट्या विचार केला तर अजित पवारांनी यावेळी बंडाचं धाडस दाखवलं आणि भाजपसोबत हातमिळवणी केली तर त्यात बिघडलं कुठं?, असा प्रश्न काहीजण उपस्थित करतील. त्यात काहीच गैर नाही, हेही गोरगरीब जनता, मतदार मान्य करेल, पण मग मतदारांसमोर परस्परांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढण्याचं, परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचं नाटक या दोन्ही पक्षानं करू नये, एवढंच जनतेचं मागणं आहे.     
    
शरद पवार कितीही दावा करीत असले तरी अजित पवारांच्या बंडामुळं पक्षाला मोठं खिंडार पडलंय यात शंका नाही. आता आणखी काय उलथापालथी होतील ते लवकरच स्पष्ट होईल. सत्ताप्राप्तीसाठी राजकारणी कोणत्याही थराला जाऊ शकतात. राजकीय नेत्यांच्या शाब्दिक चकमकी आणि एकमेकांवरच्या चिखलफेकीला आता जनता कंटाळलीय. दुर्दैवानं महाराष्ट्रातली जनता नेहमी बघ्याचीच भूमिका घेत असते. रविवारी महाराष्ट्रात जे काही घडलं त्याकडं जनता दिग्मूढ होऊन केवळ बघत राहिलीय. या घडामोडींनंतर महाराष्ट्राच्या जनतेच्या डोक्याला किती ताप होऊन बसलाय, याची कल्पना या नेत्यांना येणार नाही. उद्या एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते प्रचारासाठी आल्यावर मतदाराला आधी हे लक्षात घ्यावं लागेल की हे कार्यकर्ते नेमके कोणत्या पक्षाचे आहेत? ते शिवसेनेचे असतील तर कोणत्या शिवसेनेचे आहेत? शिंदेंचे आहेत का ठाकरेंचे, राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणुकीत उतरला असेल तर तो कुठल्या राष्ट्रवादीचा उमेदवार आहे हे त्याला कसं कळणार? त्याला सांगावं लागेल की अमूक उमेदवार थोरल्या पवारांचा नसून धाकल्या पवारांचा आहे. आता केवळ काँग्रेसच्या ४५ आमदारांपैकी एखादा गट फुटून सरकारमध्ये सहभागी कधी होणार याची त्याला आस लागलीय. एकदा तसं झालं म्हणजे चायबिस्कुटवाले पत्रकार ही सगळी साहेबांचीच गुगली आहे हे सांगायला मोकळे अन् तिकडं प्रधानमंत्री मोदी-शाह 'सबका साथ सबका विकास' केल्याचा बँडबाजा वाजवायला मोकळे!

राजकीय वैचारिक बांधिलकी, नैतिकता नावाचं जे काही त्यांनी नेसलं होतं, ते आता सुटत चाललं होतं. सत्तेची हाव माणसाला कोणत्या स्तरावर घेऊन जातं याचं प्रदर्शन तीन वर्षांपूर्वी तसंच गेल्यावर्षी आणि आताही उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसतेय. इथल्या प्राचीन संस्कृतीचे, परंपरांचे पाईक होण्याची पात्रता आपल्या अंगी यावी, अशी संघस्थानावर प्रतिज्ञा  करणारे आज कोणत्या परंपरा जपताहेत? कुणाशी चुंबाचुंबी करताहेत? दुसरीकडं संविधानातल्या सेक्युलरिझम, सर्वधर्म समभाव, इथलं उघडंनागडं वास्तव, त्याचे निघणारे धिंडवडे आपण पाहतो आहोत. गंगा-जमनी तहजीब इथपासून संसदीय लोकशाहीची मूल्यं इथपर्यंतच्या संकल्पनांचा उठता-बसता उदोउदो करणारे लोक या सगळ्याच्या विरोधात असलेल्या शक्तींशी मोहतर लावताहेत. त्यांना मांडीवर घेताहेत. ते आज 'अमितशाही' राजकारणाचं कौतुक करताना दिसताहेत. इथं 'रामराज्य' आणण्याची हिंदुत्ववाद्यांची प्रतिज्ञा आहे. खरंतर रामराज्य म्हणजे नीतीचं, न्यायाचं, लोकहिताशी बद्ध असलेलं राज्य. प्रभू रामचंद्र हा असा सर्व मूल्यं असलेला आदर्श राजा होता. अशा मूल्याधिष्ठित आदर्शासमोर आजकाल हटकून 'रोकड़ा व्यवहारवाद' उभा केला जातोय.

लोकशाहीचं जे एक पवित्र स्वरूप आहे. नेमकं तेच विद्रूप करण्याचे प्रकार देशात आणि राज्यात सुरू आहेत. एकमेकांच्या भूमिका मान्य असलेले, एकमेकांच्या हातात हात घालून निवडणुका लढलेले पक्ष नंतर बाजूला झाले तर ते एकवेळ मान्य करण्यासारखं असतं. पण एकमेकांच्या सर्व भूमिकांना तीव्र विरोध करणारे, त्यांच्यावर टीकास्त्र सोडणारे नंतर एकत्र येतात आणि सत्ता स्थापन करू पाहतात वा करतात, हे मात्र सर्वसामान्य मतदारांना पटण्यासारखं नाही. कारण ती लोकांशी, मतदारांशी, आपल्या मूल्यांशी केलेली प्रतारणा ठरते. आणि म्हणूनच निवडणुक निकालानंतरचं कोणतंही 'जोडकाम' हे लोकशाहीचं 'पाडकाम' असतं! अशा जोडकामाचा अभद्र कळस रविवारी दुपारी पुन्हा एकदा पाहायला मिळाला. कालपर्यंत एकमेकांवर तुटून पडणारे रविवारी राज्यपालांच्या साक्षीनं एकमेकांशी हात मिळवताना दिसले. या अशाप्रकारची राजकीय शय्यासोबत, 'पोलिटिकल पोर्न' पाहावं लागणं ही राज्यातल्या जनतेला, मतदारांना मिळालेली शिक्षाच म्हणावी लागेल. राजकारणात नैतिकतेचा आग्रह आता सर्वांनीच सोडलाय, त्याची ही किंमत आहे. ज्येष्ठ साहित्यिक स्व.विद्याधर गोखले यांनी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांना विचारलं होतं, तुम्हाला तीन मुलं. पण यातलं कोणीच राजकारणात कसं नाही? यावर भोसले यांनी उत्तर दिलं, 'राजकारणात जाण्यासाठी तीन गुण अंगी लागतात. ते म्हणजे ‘लठ्ठ’, ‘मठ्ठ’ आणि ‘निगरगट्ट...!’. माझ्या तिन्ही मुलांमध्ये हे तिन्ही गुण नसल्यानं राजकारणात कोणीच नाही!” यात तथ्य किती हे ज्यानं-त्यानं ठरवावं. बॅॅरिस्टर भोसलेंचे शब्द भलेही टोचणारे असतील. पण सर्वसामान्यांवर दादागिरी करणारे, हिंसा करणारे ‘गुंड’ लोकप्रतिनिधी आजुबाजूला नाहीत का? स्वार्थासाठी, लोकहिताचा बळी देणारे ‘षंढ’ लोकप्रतिनिधी जिथं तिथं दिसतातच ना? ज्ञान, भान, भाषा, समज, वर्तन, गुणवत्ता, तारतम्य आणि यातून उभ्या राहणाऱ्या सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत किती राजकारणात? केवळ राजकारणीच नाही तर सुसंस्कृत, सुसंस्कारित, पार्टी विथ डिफर्न्स म्हणवणारे ही जी घाण करताहेत. त्यानं मतदारांना शिसारी येतेय. 'मत' या शब्दाला आता अर्थच उरलेला नाही. जनतेनंच आता काहीतरी करायला हवंय. गलिच्छ राजकारण, गलिच्छ निवडणुक प्रक्रियेविरूद्ध आता आवाज उठवला नाही तर खरंच देशाची वाताहात होईल!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...