शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्तानं दोन मेळावे झाले. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या मेळाव्यात मोदी-शहा-फडणवीस-शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला हवं असलेलं भाषण केलं. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यामुळं शिवसेनेचा वर्धापनदिन हा चिखलफेकीचा ठरला. शिंदे यांनी बंड केल्यानंतर मुख्यमंत्री बनलेल्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला; त्या घटनेला आता वर्षभराचा कालावधी झाला असेल. त्यांच्या जागी महाराष्ट्राचा कारभार सांभाळायची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी घेतली; त्यालाही आता वर्षभराचा काळ लोटलाय. सत्तेवर आलेलं 'शिंदे सरकार' वैध आहे की अवैध याचा जो काही निवाडा व्हायचा तो झालाय! सरकारचं जीवनमरण हे आता विधानसभा अध्यक्षांच्या हाती आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठी माणसांना न्यायाचा चंद्र दाखवला मात्र निकलाला चूड लावलीय! संजय राऊत यांनी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात सांगितलं तसं, 'न्यायालयात न्याय दिला जातो पण त्याची अंमलबजावणी इतरांना करावी लागते. जसे न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली पण त्याची अंमलबजावणी 'जल्लादा'ला करावी लागते!' अगदी तसंच या निकालाचं आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हे सरकार किती दिवसांसाठी आहे, या प्रश्नाबरोबरच एकनाथ शिंदे या व्यक्तिमत्त्वाची वैधता किती दिवसांसाठी आहे, असा सवाल गांभीर्यानं चर्चिला जातोय. त्याला कारणंही तशीच आहेत. ती कारणं कधी न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान पुढे आलीत, तर कधी 'भाजप'च्या गोटातून किंवा शिंदे यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदार-खासदारांच्या गोटातून पुढं आलीत. चर्चेत असणाऱ्या काही कारणांचा ऊहापोह करण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या स्थानाचं आत्ताचं वास्तव काय आहे, ते समजून घेऊ. शिंदे स्वतः राज्याच्या शक्तिशाली सत्तास्थानावर आहेत. पण ते त्या स्थानावरून आपली शक्ती वापरू शकतात का, हा मोठा प्रश्न नाही. ते मुख्यमंत्री असले तरी 'खरे मुख्यमंत्री' हे त्यांचे सहकारी असणारे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, हे स्पष्ट दिसतंय. आता त्यांच्या राजकीय स्थानाबद्धल बोलू. त्यांनी गेल्यावर्षी जून महिन्यात बंड केलं. त्या दिवसांपासून ते म्हणत आहेत की 'आमचीच 'शिवसेना' खरी आहे!' हा दावा करताना पक्षप्रमुख पद, शिवसेना भवन, मातोश्री, दै. सामना आणि सा. मार्मिक, ठाकरे हे आडनाव या सहा गोष्टी वगळता 'शिवसेना'चं म्हणून जे जे आहे त्यावर दावा ठोकत होते. म्हणजे मुख्यमंत्रीपद घेतले, विधिमंडळ पक्ष ताब्यात घेतला, संसदेतला पक्ष घेतला, संघटनेतील काही पदाधिकारी घेतले आणि संपूर्ण 'शिवसेना' या पक्षावर निवडणूक आयोगाकडं दावा केला. तो त्यांनी मिळवला.
'शिवसेना'ची वार्षिक ऊर्जा असणारा 'दसरा मेळावा' आणि त्यासाठी 'शिवाजी पार्क' या मैदानावरही हक्क सांगितला. यामुळं राजकारणातलं आणि संघटनेतलं त्यांचं स्थान 'तेलगु देसम्' पक्षात बंड केलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्यासारखंच झालं, असं भासविलं गेलं. पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे, ते हळूहळू समोर येतेय. त्यामुळेच तर एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वाची, प्रतिमेची वैधता किती, हा प्रश्न चर्चेचा विषय झालाय, याबाबत त्याचं विवेचन महत्त्वाचं आहे किंवा ते आवश्यक आहे. त्यांची 'रिक्षावाला मुख्यमंत्री' झाला, ही सुरुवातीची प्रतिमा काही दिवसही टिकू शकली नाही. कारण रिक्षावाला ज्या परिस्थितीत आणि पद्धतीनं मुख्यमंत्री झाला, हा पहिल्या दिवसापासून वादाचा विषय झाला होता. विशेष म्हणजे, हे बंड करण्यापूर्वी ७ वर्षे ते मंत्री होते. तेव्हा त्यांचं वर्णन 'रिक्षावाला मंत्री झाला,' असं झालं नव्हतं. भाजीवाला, रिक्षावाला, पानपट्टीवाला, नर्स, वॉचमन, टॅक्सी ड्रायव्हर, मास्तर, प्रिन्सिपॉल, पिठाची चक्कीवाले यांना 'शिवसेना'नं नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री करणं हे काही विशेष नाहीच. कारण ती त्या संघटनेची ओळख आहे. "मुख्यमंत्री झाल्यावर करतो, बघतो किंवा 'अ' प्रमाणे कार्यवाही करा," असा अर्जावरचा शेरा मी बंद करणार आणि फोनवरच आदेश देणार, असं काहीतरी सांगणारे शिंदे यांचे 'व्हिडिओ' पुढे आले. पण त्यावर प्रचंड टीका झाल्यावर आणि असे फोनवरचे आदेश अधिकारी मंडळी फाट्यावर मारत असल्यानं तोही एक 'ड्रामा' ठरला! आणि एकनाथ शिंदे 'नायक' सिनेमातल्या अनिल कपूर होता होता राहिले. प्रशासनावर मांड ठोकणाऱ्याला जन्मतःच मुडदूस झाल्याचं चित्र अधिकाऱ्यांपुढं आलं. 'आमचीच खरी शिवसेना' असं सांगणाऱ्या शिंदे यांनी 'येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही २०० जागा जिंकू, असं जाहीर केलं. या '२०० जागा भाजपसहित' असं त्यांना म्हणायचं असावं. पण समजा, जेव्हा केव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील आणि शिंदे यांचा गट 'भाजप' सोबत निवडणुकीला सामोरा जाईल; तेव्हा ते 'आमचीच खरी शिवसेना' म्हणतात त्या पक्षाला 'भाजप' विधानसभेच्या १३५ जागा सोडणार आहे का? या प्रश्नाचं उत्तर जसजशा निवडणुका येतील, तेव्हा 'नाही, नाही आणि नाही,' असंच येणार आहे. मध्यंतरी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केवळ ५० जागा मिळतील असं जाहीर केल्यानंतर गोंधळ उडाला होता. नंतर सारवासारव केली गेली. पण नुकतंच राज्यातल्या ४८ लोकसभेच्या जागा आणि विधानसभेच्या २८८ जागांवर भाजपनं आपले नेते नेमले आहेत. जवळपास तेच सारे भाजपचे उमेदवार असतील असं सांगितलं गेलंय. एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे ज्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, तिथंच 'भाजप'नं बैठकांचं सत्र सुरू केलंय. मुंबई महापालिकेची निवडणूक लढताना त्यांच्या खऱ्या शिवसेनेला युतीत निम्म्या जागा मिळणार आहेत का? या प्रश्नाचं उत्तरही 'नाही' असंच आहे. कारण, 'शिंदे गट' आणि 'मनसे' यांनी युती करावी, असा बूट निघालाय. शिंदे गट जर 'मनसे' बरोबर गेला तर बाळासाहेबांना क्लेश देणारी 'शिवसेना' खरी कशी? त्यामुळं शिंदे यांची वैधता किती काळाची आणि कोणत्या दर्जाची, असा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. येत्या पंधरवड्यात त्यांच्या 'खऱ्या शिवसेना'चा अर्थात 'शिंदे गट, भाजप आणि मनसे' यांचा एकत्रित 'बैठक' होण्याची शक्यता आहे. त्याला सत्ता असल्यानं महत्व असेल. प्रोटोकॉल नुसार, शिंदे मुख्यमंत्री असल्यानं त्यांच्याच पुढाकारानं ही बैठक असेल. पण ते प्रतिशिवसेनाप्रमुख'च्या भूमिकेत असणाऱ्या राज ठाकरे यांना रुचतील आणि पटतील का? अर्थातच राज ठाकरे हे असं व्यक्तिमत्त्व आहे की त्यांना जे पटेल आणि रुचेल तेच ते बोलतात, करतात. 'शिवसेना' फुटली याचा ते जरूर लाभ घेतील. पण म्हणून ते मुख्यमंत्रीपदी कोण आहे आणि उपमुख्यमंत्रीपदी कोण आहे, ह्याकडं दुर्लक्ष करून 'ठाकरे' नावाच्या स्वतंत्र आयडेंटिटीचं विघटन होऊ देतील, असं वाटत नाही. मग शिंदे यांची उपुक्ततता काय, असा प्रश्न विद्यमान परिस्थितीत पडतो. त्याचं उत्तर 'भाजप'नं अगोदरच धुंडाळून ठेवलंय. त्यांना 'शिवसेना' कमजोर करायची होती. तसा प्रयत्न त्यांनी सत्तेच्या समीकरणात करून दाखविलाय. वरवर संघटनाही कमजोर केलीय. पण ते करून त्यांना साध्याकडं जायचंय. म्हणजे काहीही करून देशाची सत्ता परत मिळवायचीय. 'भाजप'ला केंद्रात सत्ता देण्यात गेल्यावेळी महाराष्ट्र राज्याचा वाटा मोठ्ठा होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत 'भाजप-शिवसेना युती' चे ४२ खासदार निवडून आले होते. त्यात 'भाजप'चे २३ खासदार होते. तोच आकडा २०२४ मध्ये गाठणं शक्य नसलं तरी जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत. शिंदे गटात राज्यातले बारा खासदार आहेत. त्यांना पुन्हा निवडून आणण, हे त्यांचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी त्यांना आज शिंदे महत्त्वाचे आहेत, त्यासाठी राज ठाकरेही महत्त्वाचे आहेत. 'शिंदे-फडणवीस सरकार'च्या वैधतेचा सुप्रीम कोर्टात निकाल लागलाय, ते पडेल कधी हे लवकरच कळेल. तोपर्यंत 'भाजप'ला शिंदे हवेत. मुंबई महापालिका मिळविण्याच्या प्रयत्नातही शिंदे 'भाजप'ला हवेत. शिवसेनेला रस्त्यावरच्या लढाईत व्यग्र ठेवून उद्धव ठाकरे यांचा शक्तिपात करण्यासाठीही 'भाजप'ला शिंदे हवेत. 'शिवसेना'चे 'धनुष्यबाण' हिसकावून घेतलं त्यासाठी 'भाजप'ला शिंदे हवेत. थोडक्यात, 'भाजप'ला शिंदे त्यांच्या कथित खऱ्या शिवसेनेसोबत दीर्घ काळासाठी उपयोगाचे नाहीत, हे 'रा. स्व. संघ-भाजप' च्या 'थिंक टँक'ला माहीत आहेत. त्यांना शिंदेंचा उपयोग २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी करून घ्यायचाय. मध्यंतरी शिंदे गटाशिवायसुद्धा आम्ही 'अपक्ष आणि भाजप' असं सरकार बनवू शकतो, असा दावा माजी मंत्री बच्चू कडू यांनी केला होता. त्यावरून शिंदे यांची 'वैधता' किती, या प्रश्नाचं उत्तर मिळतं. शिवाय अजित पवार आणि राष्ट्रवादीचा पर्याय भाजपकडं होता. पण ते सारं फिसकटलं. केवळ एक आमदार असणाऱ्या राज ठाकरे यांच्या घरी 'भाजप' नेत्यांच्या वाढत्या येरझारा शिंदेंच्या 'वैधते'च्या शंकेवर शिक्कामोर्तब करतं. उजव्या विचारसरणीच्या सत्तेत असणाऱ्या ज्यांनी ज्यांनी बंड केलं, त्या शंकरसिंह वाघेला, कल्याणसिंह, येडीयुरप्पा, उमा भारती यांचं पुढं काय झालं, ते आठवा. त्यांना त्याच प्रवाहात समाविष्ट व्हावं लागलं किंवा केशुभाई पटेल व्हावं लागलं. शिंदे यांचं काय होणार, हे सर्वोच्च न्यायालयानं ठरवंलच आहे! पण आजच्या घडीला एकनाथ शिंदे यांचा 'संघ-भाजप'ला काय उपयोग आहे आणि भावी काळात त्यांचं काय स्थान असणार आहे, हे स्पष्ट झालंय. हे शिंदे आणि त्यांच्या ४० आमदारांच्या लक्षात येईल तेव्हा येईल! तोपर्यंत चालू द्या दहीहंडी, अख्खे दहा दिवस गणपती दर्शन, प्रभादेवीसारखे राडे, बंडाचं उदात्तीकरण करणारी भाषणे! या सगळ्यात जर उद्धव ठाकरे यांना दिवसेंदिवस लोकांची सहानुभूती वाढत चालली तर शिंदे यांच्या 'वैधते'ची मर्यादा अगदी अलीकडंही येऊ शकते.
हरीश केंची,
९४२२३१०६०९
उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ अगोदर घेतली ? का देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचे अंधारात आघाडीचा धर्म सोडून शिवसेनेला अगदी एकनाथ शिंदे सहीत सर्वानाच आश्चर्याचा धक्का उर्फ टांग लावून मुख्यमंत्रीपदाची शपथ अगोदर घेतली ? मग निश्चित समजेल की नक्की गद्दारी कोणी केली ? ठाकरेंनी खाल्लं तर शेण आणी फडणीसांनी खाल्लं तर श्रावणी !!! ऐसा कैसा चलेगा देवा ! १९८० साली भाजपाची स्थापना झाली त्या वर्षी विधानसभेचे निवडणूकीत बाळासाहेब ठाकरे यांनी केवळ काँग्रेसला पाठिंबाच दिला नव्हता तर काँग्रेस चे उमेदवारांचा प्रचारही केला होता पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात काँग्रेस चे उमेदवार श्रीधर माडगूळकर यांचे कोथरूड येथील जाहीर सभेत आदरणीय बाळासाहेब ठाकरे प्रमुख वक्ते होते मी त्याचा साक्षीदार आहे त्यावर्षी देवा तुम्ही फक्त दहाच वर्षे वयाचे होतात राजकारण समजण्याचे आणी कळण्याचे तुमचे वयही नव्हते गंगाधरपंतांना कारावास भोगावा लागला त्या आणीबाणीला बाळासाहेब ठाकरे यानी पाठींबा दिला होता तरीही सत्तेसाठी महाजन आणी मुंढे शिवसेनेबरोबर युती केली मा. प्रतिभाताई पाटील यांना काँग्रेस चे उमेदवार असूनदेखील राष्ट्रपती पदा साठी मराठी म्हणून शिवसेनेने मतदान केले आहे तुमचे बरोबर युती असतानाही ! राष्ट्रवादीकडून सुप्रियाताई सुळे राज्यसभेतील निवडणूकीत उमेदवार असतांना बाळासाहेब ठाकरे यांनी कौटुंबिक संबंधाला अधिक महत्त्व देऊन राष्ट्रवादीला पाठींबा दिला होता ! आपण २०१४ मध्ये मुख्यमंत्रीपद मिळवले तेंव्हांही शिवसेना तुमचे बरोबर नव्हती राष्ट्रवादी कॉंग्रेस ने बाहेरून पाठींबा दिला होता तेंव्हा तुमचे प्रखर हिंदुत्व कोणत्या बासनात गुंडाळून ठेवले होते आजचे तुमचे पाठिंब्यामुळेच झालेले मुख्यमंत्री तेंव्हा विरोधीपक्षनेते होते राजकारणात भाष्य करतांना गृहपाठ करून विधाने करावीत पब्लिक मेमरी एवढी पण कमजोर नसते देवा !!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!
शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...
-
"शी S...S... कर्नाटकातली ही घटना अत्यंत शरमेची, किळसवाणी आणि धक्कादायक आहे, जनता दलाच्या प्रज्ज्वल रेवण्णा या खासदारानं तब्...
-
"तुम्हाला ट्राफिक हवालदारनं पकडलंय का? तो पैसे डायरेक्ट घेत नाही, एक टपरी असते, तिथं तो पैसे द्यायला लावतो. भाजप हा ट्राफिक...
-
"आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करताना त्यांची वैविध्यपूर्ण वाटचाल डोळ...
No comments:
Post a Comment