Sunday, 4 June 2023

भूलोक गंधर्व...! एस.पी.बालसुब्रह्मण्यम

साथिया... तूने क्या किया.
वर्ष होतं सन २०००. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन भारत दौऱ्यावर असताना सर्व क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांची ते भेट घेत होते. लता मंगेशकर यांची मोठ्या आदरानं क्लिंटन यांनी विचारपूस केली. लतादीदींच्या आवाजाची जादू जगभर पसरलेली होतीच, पण त्यासोबतच सर्वात जास्त गाणी गाणारी गायिका म्हणून क्लिंटन यांनी लतादीदींचं कौतुक केलं. मात्र लता मंगेशकरांनी क्लिंटन यांना थांबवत तिथं उपस्थित एका गायकाकडं हात करत सांगितलं. "माझ्यापेक्षा जास्त गाणी यांनी गायली आहेत....!" क्लिंटन यांनी त्या गायकाचा हात हातात घेतला. “तुम्ही किती गाणी गायली?" असं क्लिंटन यांनी विचारल्यावर त्या गायकानं स्मित हास्य करत उत्तर दिलं, "३५ हजार...!". क्लिंटन यांना आश्चर्य वाटलं त्यांनी विचारलं, "किती वर्षात?" त्यावर ते म्हणाले “३५ वर्षात...!” क्लिंटन यांनी या महान गायकासमोर अक्षरशः हात जोडले. ते गायक होते. श्रीपती पंडिताराध्युला बालसुब्रह्मण्यम...!

अर्थात ज्यांना इंडस्ट्रित प्रेमानं बाला, बालू किंवा एसपीबी म्हटलं जातं ते एस. पी. बालसुब्रह्मण्यम.
करीअरच्या ३५ वर्षांत ३५ हजार गाण्यांचं गणित आपल्यासारखी अडाणी माणसं पटकन करतात. मी पण हिशेब लावला. वर्षाला हजार गाणी. दिवसाला साधारण ३ गाणी रेकॉर्ड केली असं म्हणू या. फेब्रुवारी १९८१ मध्ये एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांनी एकाच दिवशी बारा तासात तब्बल २१ गाणी रेकॉर्ड केली. विशेष म्हणजे या २१ गाण्यांपैकी त्यांनी एकाही गाण्याचा सराव केलेला नव्हता. पहिल्या किंवा फार तर दुसऱ्या टेकमध्ये गाण्याला संगीतकार "ओक्के" म्हणत गेले आणि १२ तासांत २१ गाणी रेकॉर्ड झाली. गाणं गाताना एकाग्रता आणि साधनेतून हे सहज होत गेल्याचं बालासर सांगायचे. एक काळ तर असा होता की बालासरांचं दररोज १५ ते २० गाणी रेकॉर्ड करण्याचं रुटिन झालं होतं. हिंदीमध्ये आनंद मिलिंद या संगीतकार जोडीसाठी त्यांनी सलग १६ गाणी रेकॉर्ड केली होती. एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचा हा गायकीचा प्रवास आणि यश सोपं नव्हतं. त्यासाठी अनेक वर्षांची मेहनत, संघर्ष आणि कामाप्रती निष्ठा होती. मुळात बालसुब्रह्मण्यम यांना गायक वगैरे व्हायचंच नव्हतं.
एस.पी.बालसुब्रह्मण्यम यांचा जन्म ४ जून १९४६ रोजी आंध्रप्रदेशच्या नेल्लोरमध्ये झाला. बालांचे वडील हरीकथांचे म्हणजे आपल्याकडे कीर्तन म्हणतो तशाप्रकारचा कार्यक्रम करायचे. घरात नाटक, कलेचं वातावरण होतं पण आपल्या मुलानं इंजिनीअर किंवा डॉक्टर होऊन आर्थिक परिस्थिती बदलावी, अशी मध्यमवर्गीय इच्छा त्यांच्या वडीलांचीही होती. त्यामुळे बालसुब्रह्मण्यम यांनी अनंतपूरच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र आजारपणामुळं त्यांना शिक्षण सोडावं लागलं. घरची जबाबदारी असल्यानं त्यांनी चेन्नई-मद्रास मध्ये नोकरी पत्करली. एस.पी.बालसुब्रह्मण्यम यांचा आवाज छान होता. म्हणजे मित्र त्यांचं कौतूक करायचे म्हणून ते स्थानिक गायन स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. पण त्याकडं करीअर म्हणून त्यांनी कधी पाहिलंच नव्हतं. वर्ष १९६४ मध्ये नशिबानं बालसुब्रह्मण्यम यांना एक संधी दिली. घडलं असं की, चेन्नई मद्रासमध्ये बाला ज्या रुममेटसोबत राहात होते. त्यानं बालांचं नाव मद्रासमध्ये होणाऱ्या एका गायन स्पर्धेसाठी परस्पर नोंदवून टाकलं. त्यासाठीचे दहा रुपयेही त्यानंच भरले. ही स्पर्धा खूप महत्वाची होती. कारण या स्पर्धेसाठी पी. नागेश्वरराव, तत्कालीन ख्यातकीर्त पार्श्वगायक संगीतकार घंटशाला आणि दक्षिणामूर्ती हे तेलुगू सिने इंडस्ट्रीतले दिग्गज संगीतकार जजेस म्हणून काम पाहणार होते. या स्पर्धेत एकतर नॉन फिल्मी गाणं गायचं होतं. शिवाय ते तुम्ही लिहून कंपोज केलेलं असावं, अशी अट होती. बालासरांनी आपलं गाणं सादर केलं आणि ते एका कोपऱ्यात जाऊन इतर मुलांचे परफॉर्मन्स बघत बसले. त्याच वेळी बालांजवळ एक व्यक्ती येऊन म्हणाली. "तू खूप छान गायलास. माझ्या पुढच्या सिनेमात तू गाणं गाशील का?"
बाला जरा गोंधळून म्हणाले. "अहो, मी तुम्हाला ओळखलं नाही. मला माफ करा, मी चित्रपटात वगैरे गाण्याचा कधी विचार केला नाहीये...!"
ती समोरची व्यक्ती म्हणाली. "माझं नाव एस.पी.कोदंडपाणी आहे, मी संगीत दिग्दर्शक आहे...!" बालसुब्रह्मण्यम यांनी कोदंडपाणी यांना विनयपूर्वक नकार दिला. "माफ करा मला, माझे वडील माझ्यासाठी खूप कष्ट घेत आहेत. मला इंजिनीअर होऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे...!" असं सांगून बालसुब्रह्मण्यम निघून गेले. त्यांनी कोदंडपाणी यांना घरचा पत्ताही दिला नाही.
कोदंडपाणीही तेव्हा नवखेच होते. जवळपास वर्ष दीड वर्ष त्यांनी बालसुब्रह्मण्यम यांचा पाठपुरावा करून गाण्यासाठी तयार केलं. शेवटी बालसुब्रमण्यम तयार झाले. आयुष्यात कधीही सिनेमात गाण्याचं स्वप्न बालांनी पाहिलं नाही. मात्र काही स्वप्न तुमचा पाठलाग करत असतात, बालासरांच्या बाबतीत तेच घडलं होतं.
वर्ष १९६६. रेकॉर्डिंगचा दिवस ठरला. चित्रपट होता 'श्री श्री श्री मर्यादा रामण्णा'. प्रॉडक्शन हाऊसची गाडी बालांना घ्यायला येणार होती. पण ती काही आलीच नाही. शेवटी कंटाळून बालासरांनी सायकलवरून स्टुडिओ गाठला. त्यात चौकीदार त्यांना आत सोडेना. सायकलवरून धापा टाकत आलेला मुलगा "मी गायक आहे, आज माझ्या गाण्याचं रेकॉर्डिंग आहे...!" असं म्हणत असेल, तर त्यावर कोण विश्वास ठेवणार? चौकीदारानं बालसुब्रह्मण्यम यांना अक्षरशः हकललंच होतं. मात्र तेवढ्यात संगीतकार कोदंडपाणी आले आणि त्यांनी बालांना आत नेलं.
त्याकाळी लाईव्ह रेकॉर्डिंग असायचं. शेकडो वाद्यवृंद, संगीतकार, गायक आणि रेकॉर्डिंग करणारी टेक्निकल टीम, क्रू मेंबर्स असा दोन तीनशे जणांचा तामझाम असायचा. बालसुब्रह्मण्यम यांनी हे असं याआधी कधीच पाहिलं नव्हतं. शिवाय ते ज्यांच्यासोबत गाणार होते. त्या गायिका होत्या प्रसिद्ध पार्श्वगायिका पी. सुशिला. ज्यांचं तमिळ, तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतल्या टॉपच्या गायिका म्हणून नाव होतं. त्यांच्यासोबत पहिलं गाणं गाण्याची संधी वयाच्या विसाव्या वर्षी एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांना मिळाली. काय आश्चर्य पाहा! कसलेले गायकही जिथं एका गाण्यासाठी दिवसभर टेक वर टेक घेतात. तिथं बालसुब्रह्मण्यम यांनी गायलेल्या गाण्याचा पहिला टेक ओके झाला. इथूनच एस.पी.बालसुब्रह्मण्यम नावाच्या पर्वाचा सिने जगतातला श्रीगणेशा झाला.
बालांना आता अनेक सिनेमांच्या ऑफर्स येत होत्या. घरची जबाबदारी आणि गाणं असा संघर्ष करत असताना त्यांना वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी लग्न करावं लागलं. त्यांची प्रेमकहानी सिनेमातल्या कथांसारखीच रंजक आहे. मद्रासमध्ये बाला ज्यांच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहायचे. त्या घरमालकाच्या मुलीसोबतच त्यांचे प्रेमसंबंध जुळले. बालांनी मुलीच्या वडिलांकडे लग्नासाठी रीतसर विचारणा केली. पण त्यावेळी जात समान असली तरी, त्यातही गोत्र वगैरे बघितलं जायचं. अपेक्षेप्रमाणे नकार आल्यावर बालसुब्रह्मण्यम यांनी पळून जाऊन लग्न केलं. मित्रांनी जमवलेल्या ५०० रुपयांत लग्न पार पडलं. त्यावेळी त्यांच्या पत्नीचा भाऊ बंगलोरमध्ये राहात होता. त्यांनी त्यांच्याकडं मुक्काम ठोकला. तीन चार महिन्यांत सगळ्यांचा राग शांत झाल्यावर ते परत आले. पण सगळं स्थिरस्थावर व्हायला दोन वर्ष गेली.

वर्ष १९६९, एस.पी.बालसुब्रह्मण्यम यांच्या आयुष्यात एक सुवर्णसंधी चालून आली. तमिळ सिनेमात ज्यांच्याशिवाय पानही हलत नव्हतं असे सुपरस्टार भारतरत्न एम.जी.रामचंद्रन आणि तमिळची लेडी सुपरस्टार जयललिता जे दोघेही कालांतरानं तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते. यांच्यावर गाणं चित्रित होणार होतं. चित्रपट होता 'आदिमाई पेण्ण'. एमजीआर आणि जयललिता यांची लोकप्रियता तेव्हा सिनेरसिकांना देवासमान होती. पण एमजीआर मात्र एका नवख्या आवाजाच्या प्रेमात होते. तो आवाज होता एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचा! वय वर्ष २३ असलेल्या कडकडीत आवाजाच्या या गायकाला एम.जी रामचंद्रन यांनी बंगल्यावर बोलावलं. "पुढच्या सिनेमात माझ्यावर चित्रित होणारं गाणं तू गावंस अशी माझी इच्छा आहे...!" अशी विनंती एम.जी.रामचंद्रन यांनी अवघ्या २३ वर्षाच्या एस.पी. बालसुब्रमण्यम यांच्याकडं केली. करीअरच्या पहिल्याच टप्प्यात एवढ्या मोठ्या व्यक्तीनं अशी ऑफर देणं हे संधीपेक्षाही प्रचंड जबाबदारीचं ओझं होतं. एमजीआर यांनी संगीतकार के.व्ही. माधवन यांची बालांशी भेट घालून दिली. महिनाभरानंतर हेच गाणं जयपूरला चित्रित होणार होतं. तेव्हा रेकॉर्डिंगही सोबतच व्हायचं. एमजीआर यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्नं अनेकांचं असायचं. बालाचं हे स्वप्नं कारकीर्दीच्या पहिल्या दोन वर्षातच पूर्ण होणार होतं. गाण्याची रिहर्सल सुरू झाली. पण अचानक बालांना टायफॉईड झाला. ते अंथरुणातून उठूही शकत नव्हते. ही मोठी संधी आपल्या हातातून जातेय की काय असं वाटत असतानाच स्वत: एम जी रामचंद्रन यांनी बालांचा हात हातात घेत धीर दिला.
"बालू काळजी करु नकोस. मी गाण्याचं शूटिंग महिनाभर पुढे ढकलतोय. हे गाणं तूच गाणार आहेस, लवकर बरा हो...!"
प्रश्न गाण्याचं शुटिंग पुढे ढकलण्याचा नव्हता, तर एम. जी. रामचंद्रन, जयललिता यांच्यासारखे सुपरस्टार मंडळी ज्यांचा एक एक मिनिट महत्वाचा असायचा. कारण एम.जी. रामचंद्रन यांच्यावर डीएमके पक्षाची खजिनदार पदाची मोठी जबाबदारी होती. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात होतं अशा व्यक्तीनं एका नवख्या गायकासाठी आपलं महिनाभराचं शेड्युल्ड बदललं. जयललिता यांचाही तसाच बोलबाला होता. सोबत शेकडो क्रू मेंबर्स, वाद्यवृंद आणि जयपूरच्या ज्या लोकेशनवर शुटिंग होणार होतं त्या ठिकाणच्या परवानग्या असं सगळंच बदलावं लागणार होतं. या सगळ्यात एमजीआर यांना एस पी बालसुब्रह्मण्यम यांचा आवाज असणं महत्वाचं वाटलं. यातच सर्वकाही आलं.
७० च्या दशकात एम.जी.रामचंद्रन, जेमिनी गणेशन, शिवाजी गणेशन अशा अनेक सुपस्टारचा आवाज बालसुब्रमण्यम बनले होते. पी. सुशिला, एस. जानकी, वाणी जयराम, एल. आर. ईश्वरी या दिग्गज गायिकांसोबत त्यांचे ड्युएट गाजू लागले. त्यामध्ये ७० च्या दशकात इलयाराजा या संगीतकाराचा उदय झाला होता. इलायाराजा यांच्यासोबत केलेली अनेक गाणी हिट झाली. ७० चं दशक तेलुगू, तमिळ सिनेसृष्टीत बालसुब्रह्मण्यम यांनी गाजवून सोडलं. १९७९ साली  'शंकराभरणम' या सांगितीक चित्रपटातल्या गाण्यासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. पण आपल्या सर्वांना एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांची ओळख झाली ती  'एक दुजे के लिए' या हिंदी सिनेमामुळे! मुकेश, मोहम्मद रफी यांच्यानंतर ८०च्या दशकाच्या सुरूवातीपर्यंत सिनेमांमध्ये किशोरकुमार यांच्या आवाजातल्या गाण्यांचा बोलबाला होता. अशावेळी एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांनी आपलं अढळ स्थान निर्माण केलं.

वर्ष होतं १९८१. तमिळ, तेलुगू सिनेसृष्टीतले दिग्गज दिग्दर्शक बालचंदर यांनी आपल्या तेलुगू चित्रपट 'मरो चरित्रम' चा हिंदी रिमेक करायचं ठरवलं. त्या सिनेमाचं हिंदी नाव होतं 'एक दुजे के लिए'.  सिनेमातलं मुख्य पात्र दक्षिण भारतातलं असल्यानं त्याला हिंदी येत नाही. मग सिनेमातली गाणीही दक्षिणेतल्या गायकानं गावी असा विचार झाला. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या कर्णमधूर संगीतावर एस.पी.बालसुब्रह्मण्यम यांच्या आवाजानं चार चाँद लावले.
तेेरे मेरे बिच मे कैसा है ये बंधन. अंजाना....!
तुने नही जाना मैने नही जाना...!
किंवा
हम बने तुम बने इक दुजे के लिएं...! या गाण्यात
i dont know What u say!
असं सहज हसत हसत गाणाऱ्या आवाजानं सगळ्यांना प्रेमात पाडलं.
दिग्दर्शक बालचंदर, अभिनेता कमल हसन, रति अग्निहोत्री यांच्यासह अनेकांचा हा पहिलाच हिंदी सिनेमा होता. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल हे मात्र बालसुब्रह्मण्यम यांच्या हिंदी उच्चाराबाबत साशंक होते. पण जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा बालांच्या आवाजाला लोकांनी खूप पसंत केलं आणि सिनेमाला डोक्यावर घेतलं. प्रेमी जीवांचा विद्रोह दाखवणारा 'एक दुजे के लिए' सिनेसृष्टीतला महत्वाचा टप्पा मानला जातो. सिनेमा सुपरहिट तर झालाच. पण या चित्रपटातल्या गाण्यांनी नवे कीर्तीमान स्थापित केले. हे वेगळं सांगायची गरज नाही. त्याच वर्षी 'तेरे मेरे बिच मे...!' या गाण्यासाठी एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पहिल्याच हिंदी सिनेमात थेट राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हे बालांसाठी सुरेल पोचपावतीच होती. ‘एक दुजे के लिए’ मधल्या गाण्यांनी हिंदी सिनेमाला एस.पी. बालसुब्रह्मण्यम - लता मंगेशकर अशी ड्युएट जोडी दिली. पुढे या जोडीनं जवळपास दीड दशक गाजवलं. त्यातला पुढचा टप्पा होता 'मैने प्यार किया...!'
'मैने प्यार किया' हा सलमान खानचा तसा दुसरा सिनेमा असला तरी लीड म्हणून पहिलाच सिनेमा. यात सलमानचा आवाज बनले एस. पी. बालसुब्रमण्यम. सलमान तेव्हा अगदीच कोवळा होता. त्याउलट बालासरांचा आवाज भारदस्त आणि मॅच्युअर्ड असल्यानं तो योग्य वाटेल का? अशी अनेकांना शंका होती. पण ‘मैने प्यार किया’ सिनेमाची गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. आजही ती गाणी तेवढीच लोकप्रिय आहेत. बालसुब्रह्मण्यम आणि लता मंगेशकरांच्या आवाजानं सजलेल्या या गाण्यांमुळे सलमान खान रातोरात स्टार झाला.
"दिल दिवाना बिन सजना के माने ना.....
यह पगला है, समझाने से समझें ना....."
‌या गाण्याठी एस. पी. बालासुब्रमण्यम यांना हिंदीतला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. पुढे अनेक सिनेमांत सलमान खानचा आवाज एस.पी.बालसुब्रह्मण्यम यांचाच असायचा. सलमानचा सिनेमा सुरू असताना गाणं लागलं तर प्रेक्षकांच्या मनात फक्त बालांचाच आवाज असणार हे समीकरणच झालं होतं. मैने प्यार किया नंतर सलमान खानच्या लव, पत्थर के फुल, साजन, अंदाज अपना अपना, हम आपके है कौन या सिनेमांमध्ये बाला सरांचा जादूई स्वर होता. ‘लव’ आणि ‘पत्थर के फुल’ हे सिनेमे दणकून आपटले. पण लव सिनेमातलं "साथिया..... ये तुने क्या किया...!" हे गाणं आजही लहान थोरांच्या ओठावर असतं. हम आपके है कौन मधल्या "भाभी तेरी बहेना को माना, हाय राम कुडियों का है जमाना...!" हे गाणं आजही युनिव्हर्सल हिट आहे. वंश सिनेमातलं "आके तेरी बाहों मे हर शाम लगे सिंदुरी...!" हे बाला सरांचं सर्वात लोकप्रिय गाणं.
साजन सिनेमातली आर्त आणि मस्तीखोर अशा दोन्ही अंदाजातली गाणी गाण्याचं कसब एस.पी.बालसुब्रह्मण्यम यांच्याकडे होते. त्यांनी ते सिद्धही केलं. १९८५ साली आलेल्या 'सागर' सिनेमातल्या "युंही गाते रहो, मुस्कुराते रहो....! नाचों रे सब झुम के गाओ रे... आओ रे....!"  हे मस्तीखोर गाणं गाण्यासाठी किशोरकुमार यांच्या तोडीस तोड गायक हवा होता. पण किशोर दांच्या समोर टिकायची हिंमत तेव्हा कोणत्याच गायकात नव्हती. अशावेळी एस.पी.बालसुब्रह्मण्यम
यांनी ते गाणं गायलं आणि सगळ्यांचीच वाहवा मिळवली. ‘सागर’ सिनेमात ऋषी कपूर यांना किशोरदा यांनी आवाज दिला, तर कमल हसन यांचा आवाज एस.पी. बालसुब्रह्मण्यम बनले. सागर सिनेमामधलंच..
सच मेरे यार है, बस वही प्यार है,
जिसके बदले में कोई तो प्यार दे,
बाकी बेकार है, यार मेरे.
हो यार मेरे...!
हे गाणं माझ्या अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी एक आहे.
१९९१ साली मणिरत्न यांच्या 'रोजा' सिनेमात ए. आर. रेहमान यांचं संगीत आणि बालासरांच्या आवाजातली गाणी कोण विसरू शकेल. "रोजा जानेमन....!" हा स्वर सिने रसिकांच्या हृदयावर कोरला गेला तो कायमचाच. याव्यतिरिक्त अनेक हिंदी सिनेमांमधून एस.पी.बालसुब्रह्मण्यम गात होते. पण १९९५-९६ नंतर विशेषतः २० व्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना सिने जगतात अनेक बदल झाले. त्याची बरीच कारणं होती. नवीन संगीतकार आले, नवे गायक आले, तंत्रज्ञान बदललं. निर्माते दिग्दर्शक यांचा व्यवहारीपणा वाढला. अशा वातावरणात बालासर फार रुळले नाही. त्यांनी बॉलिवूडमधली गाणी गाणं बंदच केलं. मात्र तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नडमध्ये ते गात राहिले. शाहरुख खानच्या 'चेन्नई एकस्प्रेस' सिनेमाचं टायटल सॉन्ग एस.पी.बालसुब्रह्मण्यम यांनी गायलं होतं.

आपण एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांच्या गाण्याविषयीच बोलतोय. पण त्यांची प्रतिभा फक्त गाण्यांपुरतीच मर्यादित नाहीय. बालासर कमल हसनचा तेलुगू आवाज म्हणूनही प्रसिद्ध आहेत. कमल हसनचे तमिळ सिनेमे तेलुगूमध्ये बालसुब्रह्मण्यम सरांच्या आवाजातच डब्ड केले जातात. कमल हसनच्या ‘दशावतारम’ या तमिळ सिनेमाचं तेलुगू व्हर्जन एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांच्याच आवाजात रेकॉर्ड करण्यात आलंय. ज्यामध्ये त्यांनी सात वेगवेगळ्या पुरुषांचे आवाज आणि एका स्त्री पात्राचाही आवाज काढला. एवढंच नाही तर एम. जी. रामचंद्रन, गिरीश कर्नाड, अनिल कपूर, के. भाग्यराज, सलमान खान, रजनीकांतपर्यंत अनेक दिग्गजांच्या आवाजाचं डबिंग बालासरांनी केलंय. सर बेन केंग्जली यांनी गांधीजींची भूमिका साकारलेल्या 'गांधी' या हॉलिवूडपटाच्या तेलुगू व्हर्जनचा आवाजही एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचाच आहे. गायक आणि डबिंग आर्टिस्ट व्यतिरिक्त एस.पी.बालसुब्रह्मण्यम हे उत्कृष्ट अभिनेते सुद्धा होते. तेलुगू, तमिळ, कन्नड अशा तिन्ही भाषांमध्ये त्यांनी तब्बल ७५ चित्रपटांमध्ये अभिनयसुद्धा केलाय. आयुष्यात आपण काहीही न करता, वेळ नाही अशी ओरड करत असतो. पण हे असं कर्तृत्व बघीतल्यावर आपल्याला प्रश्न पडतो, कधी केलं असेल या माणसानं हे सगळं!
आजच्या घडीला एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांच्या नावावर १६ विविध भाषांमध्ये ४० हजारांपेक्षा अधिक गाणी गायल्याचं रेकॉर्ड आहे. ज्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. ६ राष्ट्रीय पुरस्कार, तेलुगू सिनेमातला प्रतिष्ठित नंदी पुरस्कार तब्बल २५ वेळा त्यांनी पटकावलाय. बॉलिवूड फिल्मफेअर अवॉर्ड्स, साऊथचे सहा फिल्मफेअर अवॉर्ड्स, NTR नॅशनल अवॉर्ड, तर २०१६ साली नॅशनल फिल्म पर्सनॅलिटी पुरस्कार त्यांना देण्यात आलाय. २००१ साली भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार आणि २०११ साली पद्मभूषण पुरस्कारानं एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचा गौरव करण्यात आला होता. एवढं सगळं भरभरून जगलेल्या माणसाची एक छोटीशी शेवटची इच्छा काय असावी? तर त्यांना शास्त्रीय संगीताची एक मैफल सजवायची होती. या वयातही शास्त्रीय गाणं शिकण्याची त्यांची इच्छा होती हे ऐकून आश्चर्य वाटेल पण आजच्या तारखेला ४० हजारांपेक्षा जास्त गाणी गायलेल्या बालसुब्रह्मण्यम हे कधीही गाणं शिकलेले नाहीत. गाणं शिकले असता तर आणखी यश मिळालं असतं का? या प्रश्नावर त्यांनी फार छान उत्तर दिलं होतं. "शास्त्रीय गायक फार शिस्तबद्ध आणि साचेबंद गाणं गात असतात. याउलट चित्रपट संगीतात नवरसांचा वापर उलटसुलट आणि मजेशीर पद्धतीनं केला जातो. चित्रपट संगीताला कुठलंही बंधन नसतं, उलट नवीन प्रयोगाचं इथं स्वागत केलं जातं. त्यामुळे शास्त्रीय गाणं शिकलो असतो तर कदाचित मी सिनेमाकडे वळलोही नसतो...!" असं त्यांना वाटायचं.
एस.पी. बालसुब्रह्मण्यम आपल्या कामाविषयी प्रचंड प्रामाणिक होते. त्याचं छोटसं उदाहरण सांगतो. ब्रिदलेस हा प्रकार आपल्याला शंकर महादेवन यांच्यामुळे कळला. पण तमिळ सिनेमा ‘केलादी कन्मणी’ मध्ये बालसुब्रह्मण्यम यांनी ब्रिदलेस गायल्याची चर्चा रंगली होती. त्यावर काही वर्षांनी त्यांनी स्पष्टीकरण दिलं, की ब्रिदलेस गाणं हे गिम्मिक होतं. तुम्ही श्वास रोखून ठेवू शकता. पण गाताना श्वास रोखणं हे केवळ अशक्य आहे. कोणीही गायक साडे तीन ते चार मिनिटांपेक्षा जास्त वेळ श्वास रोखूच शकत नाही. चित्रपटातलं ते ब्रिदलेस गाणं हे टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालं. सिने इंडस्ट्रितले लोक प्रेक्षकांना असं नवीन काहीतरी करून आकर्षित करत असतात. मला या सगळ्याचं श्रेय घ्यायचं नाहीय...!" हे त्यांनी अगदी प्रांजळपणे कबूल केलं होतं. एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचा हाच सच्चेपणा त्यांच्या गाण्यात दिसून आला. आपल्या गायकीवर मोहम्मद रफी यांच्या गायकीचा प्रभाव असल्याचं ते सांगत. रफी साहेबच का तर, त्यांचं गाणं डोळे बंद करून ऐकलं तर आपल्या डोळ्यासमोर दृश्यं, ते प्रसंग तो रोमान्स अक्षरशः दिसायला लागतो. इंजिनियरींग कॉलेजला असताना रोज सकाळी सायकलवरून जाताना ते रफी साहेबांची गाणी ऐकायचे. कोणीतरी प्रेयसी तुमच्या कानाजवळ येऊन तुम्हाला साद घालतेय की काय असं रफी साहेबाचं गाणं ऐकताना वाटायचं. कारण रफी हे एक सहृदयी  व्यक्ती होते. म्हणूनच एक चांगला गायक होण्याआधी तुम्ही एक चांगली व्यक्ती असायला हवं. हे ते सगळ्या गायकांना आवर्जुन सांगायचे. चांगल्या व्यक्तीचा चांगुलपणा कलेतही उतरतो आणि कला बहरत जाते असा त्यांचा विश्वास होता. या विचारांशी बांधील राहून ते जगलेही तसेच. त्यामुळे एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचा आवाज हा आपला वाटतो, जिव्हाळ्याचा वाटतो. आज त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...

No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...