Monday, 13 June 2022

गोल्डी-लॉरेन्स गँगचा उच्छाद!

"देशातलं गुप्तचर खातं, इंटेलिजन्स ब्युरो, साऱ्या तपास यंत्रणा जणू उध्वस्त झाल्या आहेत की काय असं चित्र समोर आलंय. एखाद्याची हत्या करायची असेल तर फेसबुक, युट्युबसारख्या सोशलमीडियावरून त्याला खुलेआम धमक्या द्यायच्या, सांगून त्याची निघृण हत्या करायची; त्याचं लाईव्ह चित्रण, रनिंग कॉमेंट्री सोशल मीडियावर टाकायची ही गुन्ह्याची नवी मोडस ऑपरेन्डी बघायला मिळाली. गॅंगचा म्होरक्या कॅनडातला गोल्डी ब्रार यानं भारतातल्या लॉरेन्स बिष्णोईच्या साथीनं ७०० हून अधिक शार्पशूटर्सची एक गॅंग देशात उभी केलीय. त्याचं कनेक्शन थेट पुण्यापर्यंत पोहोचलंय. संतोष जाधव आणि सिद्धेश कांबळे उर्फ महाकाल यांना अटक केलीय. ब्रार-बिष्णोईच्या इशाऱ्यावर पंजाब अन उत्तरभारतात खुलेआम हत्या होताहेत. सलमान खानला याच गॅंगनं खुनाची धमकी दिलीय. कुख्यात दाऊद पाकिस्तानातून जे काही घडवतो ते सारं किरकोळ वाटावं असा उच्छाद कॅनडातल्या गोल्डीनं, भारतातल्या लॉरेन्सनं मांडलाय...!"
---------------------------------------------------

*रा*ज्यसभा निवडणुकांचा देशभरातला खेळ, त्याचबरोबर भाजपच्या प्रवक्त्यांचा वाचाळपणा आणि त्याविरोधात इस्लामी राष्ट्रांमधून उठलेला गदारोळ! हा गोंधळ सुरू असतांना भारतातल्या गुन्हेगारी जगतात धडकी भरवणारा प्रकार उघडकीस आलाय. माझ्या पत्रकारितेच्या चाळीस वर्षाच्या काळात अशाप्रकारची खतरनाक माफिया गॅंग मी पाहिलेली नाही. दाऊद, सलीम, छोटा शकील, छोटा राजन यांच्या टोळ्यांपासून पुण्यामुंबईतल्या छोट्यामोठ्या टोळ्या पाहिल्यात. पण ही गॅंग काही विचित्रच आहे. पंजाबी गायक सिद्धु मुसावाले या सेलिब्रिटीची ज्याप्रकारे हत्या केली तो अत्यंत भयानक निघृण प्रकार होता! "मै तेरे सरपे गोली मारुंगा.., ये मेरा वादा रहा..., तब तुम्हे पता चलेगा...!" अशी खुलेआम धमकी देऊन ज्याप्रकारे गायक सिद्धु मुसेवालाची हत्या केली त्यानं थरकाप उडायला झालं. पण त्याहून अधिक भयानक म्हणजे ज्या गॅंगनं हे सारं हत्याकांड घडवलं, त्यासाठीची योजना आखली ती सर्वसामान्यांच्या कल्पनेच्या बाहेरची आहे. पाकिस्तानात बसून दाऊद इब्राहिम जे काही घडवतो ते किरकोळ वाटावं असे अनेक गुन्हे कॅनडातून गोल्डी ब्रार नावाच्या गुंडानं घडवल्या आहेत. पंजाबी गायक आणि काँग्रेस कार्यकर्ता सिद्धू मुसावाले याला सांगून हत्या करण्यात आलीय. गोल्डी ब्रारच्या गॅंगची भारतातली सूत्रं लॉरेन्स बिष्णोई चालवतो. त्याच्या या गॅंगमध्ये ७०० हून अधिक शार्पशूटर्स आहेत. त्या गॅंगकडं अत्याधुनिक शस्त्र, हत्यारं आहेत. खुंखार समजली जाणारी केवळ एके ५६ नाही, एके ५७ चनाही तर एके ९४ असॉल्ट रायफल सारखी प्रगत हत्यारं आहेत. सुरक्षा यंत्रणेकडं लष्कर, पोलीस एवढंच काय दाऊद गॅंगकडंही अशी अत्याधुनिक हत्यारं नाहीत. यात आणखी एक भयानक बाब ही की, ज्याची हत्या केली जातेय त्याची 'लाईव्ह कॉमेंट्री' धावतं समालोचन सोशलमीडियावरुन केलं जातं. फेसबुकवर त्याची दृश्यं प्रसारित केलं जातं. यांचं फेसबुक अकौंट धुंडाळलं तर आढळून येईल की, हे गुंड बेधडकपणे हत्येची धमकी देताहेत. युट्युब, फेसबुकवर बिनधास्तपणे सांगितलं जातं की, आम्ही अमक्याला यादिवशी यावेळी मारणार आहोत आणि त्यावेळी त्याची हत्या केली जाते. मुसेवाले यालाही अशीच हत्येची धमकी देण्यात आली होती आणि ती प्रत्यक्षात आणली. हे सारं फेसबुकवर दाखवलं गेलं. अगदी लाईव्ह...! प्रश्न असा पडतो की, हे सारं सोशीलमीडियावर प्रसारित होत असताना पोलीस कुठं आहेत? इंटेलिजन्स ब्युरो काय करत होतं? गुप्तचर खातं कुठं हरवलं होतं? सायबर क्राईम शोधणार खातं कुठं विसावलं होतं. अशा या हत्याकांडाचं नियोजन आणि अंमल हे सारं जेलमधून होतं, आणि त्याचं संचलन लॉरेन्स करतो. एकेकाळी भव्य सांस्कृतिक वारसा आणि शूर पराक्रमी वीरांसाठी प्रसिद्ध असलेल्या पंजाबच्या भूमीत गेल्या काही वर्षांपासून शेतीमालाची विक्री आणि विदेशातून आलेल्या पैशाची रेलचेल सुरू झाल्यापासून तरुण पिढी बिघडू लागली. महागड्या कार-जीपमधून चंदीगड-अमृतसरच्या कॉलेज-खासकरुन गर्ल्स कॉलेजबाहेर रुबाब दाखवणाऱ्या तरुणांची दृश्य नित्याचीच आहेत. २०१६ मध्ये आलेल्या 'उडता पंजाब' या चित्रपटात ड्रगच्या विळख्यात अडकलेल्या पंजाबमधल्या युवा पिढीचं वास्तववादी चित्रण करण्यात आलं होतं. तरुणांना गुन्हेगारी क्षेत्रातलं ग्लॅमर खुणावत असतं. याचपायी पुणे जिह्यातले दोघे तरुण या गँगशी आकर्षिले गेले. त्याची नुकतीच धरपकड झालीय. संतोष जाधव आणि सिद्धेश हिरामण कांबळे उर्फ महाकाळ अशी अशी दोघा शूटरची नावं आहेत. मूसेवाला यांची हत्या करण्यासाठी एकूण आठ शूटर वापरण्यात आले होते. त्यापैकी तिघे पंजाबचे, तिन राजस्थानचे आणि दोघे महाराष्ट्राचे होते.

पंजाबमधल्या सुस्थितीत कुटुंबातला सुशिक्षित गोल्डी ब्रार आपल्या आयुष्यात चांगले दिवस यावेत यासाठी नोकरीच्या शोधात कॅनडात गेला. तिथं त्याच्या आयुष्याला वेगळंच वळण लागलं. तो ड्रग माफियांच्या हाती सापडला आणि फसला. आज तो 'कॉन्ट्रॅक्ट किलिंग' करतोय. त्याचाच एक साथीदार लॉरेन्स बिष्णोई ज्याचं नांव पोलीस आणि मीडियामध्ये आज गाजतंय. शिकली सवरलेली पण वाईट मार्गाला लागलेली ही मुलं सोशीलमीडिया सर्रास वापरतात. युट्युब, फेसबुक पोस्ट करतात, बंदूक चालवताना, पिस्तुल हाताळताना, गोळ्या झाडताना, ड्रॉईंगरूममध्ये बसले असताना, बागेत फिरताना , गुन्हे घडवताना, एखाद्याचा मुडदा पडताना अशा अनेक प्रकारची ही व्हिज्युअल्स आपल्याला सहजपणे पाहायला मिळतात. केवळ मौजेखातर ते करत नाहीत तर ते जी हिंसा करतात, गुन्हे करतात ते दहशत निर्माण करण्यासाठी! हे गँगस्टर्स या कारवाया कधी, केव्हा, कुठं करणार हे ते सांगतात. गोळ्या घालून ठार मारतानाचे फुटेज ते फेसबुक, युट्युबवर पोस्ट करतात. मग त्या गुन्ह्याची जबाबदारीही घेतात. आव्हानही देतात. ही लाईव्ह कॉमेंट्री आहे गुन्ह्यांची! प्रधानमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्या तोंडून एक नाव ऐकलं असेल, मुख्तार अन्सारी, अतिक अहमद..! त्यांच्या दृष्टीनं हे देशातले सर्वात मोठे माफिया आहेत. योगीजींनी यांच्यावर बुलडोझर चालवलेत. अशा हाय प्रोफाइल गँगमध्येही ३०-४० हून अधिक शार्पशूटर्स नाहीत. पण गोल्डी ब्रार-लॉरेन्स बिष्णोईच्या गँगमध्ये ७००...हो, हो सातशेहून अधिक शार्पशूटर्स आहेत. हे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचं म्हणणं आहे. यांच्याकडं अशी अत्याधुनिक हत्यारं, शस्त्रं आहेत जी दाऊद, मुख्तार अन्सारीच काय कुठल्याही गँगच्या म्होरक्याकडं नसेल. एके ९४ असॉल्ट रायफल! ज्याला एके टीएन ९४ असंही म्हटलं जातं. अशाप्रकारे 'सोफेस्टिकेशन वेपन' रशियाच्या डिफेन्स लॅबमधून बाहेर पडलेलं आहे! सिद्धूची हत्या याच रशियन मेक एके टीएन ९४ असॉल्ट रायफलनं करण्यात आलीय. त्यात काडतुसांचा पूर्ण पट्टा ठेवला तर एकावेळी १,८०० राऊंड फायर करता येतात. सिद्धु मुसेवालाच्या हत्येच्यावेळी तिथं आठ शूटर होते. काहींच्या जवळ .४५ पिस्तुलं होती. तर काहींकडं ९ एमएम पिस्तुलं होती. तिघांकडं मोठी मशिनगन्स हत्यारं होती. पोलिसही हे मानायला तयार नाहीत. पण लोक सांगताहेत, जाणकार सांगताहेत की, तीन एके ९४ असॉल्ट रायफल्स होत्या. अशी हत्यारं जी जैश ए महंमद, लष्कर ए तोयबा अशा अतिरेकी संघटनांनाही मिळालेल्या नाहीत. ही हत्यारं यांच्या हाती कशी, कुठून आली हे देखील एक रहस्यच आहे. २९ वर्षाच्या मुसेवालाची कारमधून घरी परतत असताना निर्घृण हत्या करण्यात आली. तो घरापासून चार किलोमीटर अंतरावर असताना त्यांच्या मोटारीला पुढून मागून घेरून त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. हत्येनंतर काही तासांत कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि कॅनडात राहणाऱ्या गोल्डी ब्रार यांनी फेसबुक पोस्ट टाकून ही हत्या आपण केल्याची कबुली दिली. लॉरेन्स सध्या तुरुंगात आहे, तिथूनच तो आपल्या गुन्हेगारी कारवाया करतो. तो आपल्या मर्जीनं तुरुंगात गेलाय. सिद्धू मुसेवाला लोकप्रिय होता, पण तो चंदीगड वा मुंबईला गेला नाही. पंजाबातले तरुण अमेरिका, कॅनडाला जाण्यासाठी धडपड करत असतात. परंतु सिद्धू कॅनडातून परत येऊन आपल्या गावात शेती करत होता. सर्वाधिक टॅक्स भरणारा युवा शेतकरी सिद्धू शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सिस्टम विरोधात लढत होता.

गुंड लॉरेन्स बिष्णोई याची युट्युबवरची वक्तव्य पहा, किती खुंखार आहे, यानंच सलमान खानला मुंबई आणि जोधपूर इथं उडवण्याची धमकी दिलीय. त्यासाठी त्यानं संपत मेहरा आणि नरेंद्र शेट्टी हे दोन शार्पशूटरांची नेमणूक केलीय. सलमानच्या मुंबईतल्या घराचा नकाशा त्याचा एप्रोच आणि एक्झिट रोड दाखवले, एन्ट्री कशी करायची हे दाखवलं. याशिवाय तो जोधपूर इथं येणार समजल्यानं तिथं त्याचीही तयारी केली होती. पण पोलिसांनी मोबाईलवर यांचा संवाद ऐकला आणि संपत मेहरा आणि नरेंद्र शेट्टी यांना ताब्यात घेतलं. प्रश्न सलमान खानचा नाही, मुसेवाला वा इतर कुणाचा नाही, तर इथल्या सामान्यांचं संरक्षण कोण करणार? चंदीगडमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची लॉरेन्स बिष्णोईनं एक ग्लोबल अंडरवर्ल्ड गॅंग बनवलीय. कॅनडात गोल्डी ब्रार आणि इतर साथीदार त्याच्याशी जोडलेले आहेत. गोल्डीची लाईफस्टाईल एखाद्या चित्रपटातल्या गँगचा म्होरका जसा दाखवतात तशी आहे. ती युट्युबवर पाहायला मिळेल. आलिशान मोटारीतून फिरणाऱ्या या गोल्डी ब्रारनं मुसेवालाची हत्या आपणच केली असल्याची फेसबुकवर सांगितलं आणि त्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. पंजाबच्या डीजीपींनी त्याला दुजोराही दिलाय. कॅनडात गोल्डी ब्रार गुन्हेगारी साम्राज्य सांभाळतो तर थायलंडमधला त्याचा कारभार काला राणा हा पाहतो. काला राणा देखील सुशिक्षित, उच्चशिक्षण घेतलेला तरुण आहे. त्याचंही फेसबुक, युट्युब अकौंट आहे. काही दिवसांपूर्वी त्याला थायलंडहून भारतात आणलं गेलंय. एकूण या गँगचा कारभार ऑस्ट्रेलिया, लंडन, जर्मनी अशा अनेक ठिकाणी पसरलेला आहे. उत्तरप्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यातून या गॅंगचे शार्पशूटर्स तैनात आहेत. सुपर शार्पशूटर्सही आहेत. याचं कामकाज दाऊद, छोटा राजन वा इतर कुठल्याही गँगपेक्षा कमी नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड, खूनखराबा, एक्स्ट्रोशन यासह हत्यारांचा व्यापार, ड्रग वाहतूक यासारख्या गुन्ह्यात ही गॅंग कार्यरत आहे. ते दिवसाढवळ्या खुलेआमरित्या अत्याधुनिक हत्यारं, शस्त्रांच्या साथीनं गुन्हे घडवताहेत. गोळ्या झाडताना, पिस्तलं, एके रायफल्स चालवत या गुंडांनी धमक्या दिल्या आहेत. ही मंडळी सतत सोशल मीडियावरची अकौंटस बदलत असतात. लॉरेन्स बिष्णोई ग्रुप नावाच्या फेसबुक पेजशी ६० हजार ८०० सदस्य संलग्न आहेत. जे लॉरेन्सला फॉलो करतात. एवढे फॉलोअर्स जगात दुसऱ्या कुठल्या गॅंगचे नसतील. याशिवाय यांची इतर अनेक खाती दिसतात, यांच्या काही ग्रुपवर भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांचेही फोटो आहेत. हे तुरुंगात प्रजासत्ताकदिन साजरा करतात. त्यासाठी तिथं पोस्टर्सही लावले जातात. त्यावर पूर्ण गॅंगची नांवं फोटोसह प्रसारित केली जातात. यांची डायलॉगबाजीही फेसबुकवर बिनधास्तपणे करतात, लॉरेन्स बिष्णोई आपल्या फेसबुकवर लिहितो, "जबतक हमारा नाम रहेगा, तबतक कांड होते रहेंगे...!" २१ फेब्रुवारी २२ ला, यांचा आणखी एक गँगस्टर, साथीदार काला जठेरी हाही कुख्यात गुंड आहे, त्यानं ३० हून अधिक खून केले आहेत. तो लिहितो, "जो हमारे खिलाफ हैं, वोह अपना ख्याल रखे l क्यूँकी गोलिया कहीसेभी बरस सकती हैं l...!" यासोबत त्यानं आपल्या काही साथीदारांचे फोटो टाकलेत, नावं लिहिलीत. कोणकोणते गुन्हे केलेत त्याचे फुटेज टाकलेत. काला राणा हा आणखी एक गँगचा सदस्य असलेला शार्पशूटर फेसबुकवर लिहितोय, "हर जखम गहरे देंगे, तुम थोडा सब्र तो करो....!" एकेठिकाणी तो लिहितो, "जिंदगी तो खुदके दमपर जी जाती हैं....!" समाजमाध्यमावर अशाप्रकारे लिहीत कुणाच्या हत्येबाबत बोलणं, त्यानंतर त्यांची अंमलबजावणी करणं, आणि त्याची जबाबदारी स्वीकारणं. हे अगदी सहजरीत्या होतं. असं गुन्हेगारी धाडस दाऊद, छोटा राजन वा दुनियातली कोणतीही गॅंग करत नाही. हे सारे गँगस्टर्स सुशिक्षित, पदवीधर, द्विपदवीधर आहेत. हे सारे विज्ञानाचे विद्यार्थी आहेत. ही टेक्नोसॅव्ही गॅंग आहे. फायरपॉवर यांच्याकडं आहे. परदेशी फेरारी, लंबोर्डीनी गाड्यातून हे फिरतात. पंजाबमध्येही मोठ्या किंमती मोटारी यांच्याकडं आहेत. हे लोक मॅसेजिंग एपचा वापर करतात, एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एका व्यक्तीचं तिहार जेलमधल्या एकाशी संभाषण सुरू असतानाच त्याला ताब्यात घेतलं. तो एका मॅसेजिंग एपच्या माध्यमातून गोल्डी ब्रारशी बोलत होता. तिहार जेलमध्ये या गुंडांचं बस्तान आहे, तिथून गुन्हेगारी साम्राज्य चालवलं जातं. लॉरेन्सचे संबंध या तिहार जेलशी निगडित आहेत.

पंजाबात गेल्या दीडदोन वर्षाच्या कालावधीत बऱ्याचशा हत्या झाल्या आहेत. राजकारण्यांच्या, जमीनदारांच्या, तरुणांच्या हत्या झाल्यात. मारले गेलेत. अचानक असे गुन्हे राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्लीत होऊ लागले. टोळीयुद्धदेखील होताहेत. त्यांच्यामागे महत्वाचं कारण हे आहे की, रॉयल कॅनडीयन माउंटेड पोलीस-आरसीएमपी, लंडनमध्ये ज्याप्रकारे स्कॉटलंड यार्ड पोलीस आहे, आपल्याकडील सीबीआय आहे, तशाप्रकारे आरसीएमपी ही एक फेडरल पोलीस यंत्रणा आहे. या यंत्रणेनं कॅनडातल्या भारतीय पंजाबी गॅंगची लिस्ट करायला सुरुवात केलीय. कारण तिथं अशा खूपशा घटना घडल्यात. नाईटक्लबमध्ये, शहरात, होटेल्समध्ये ड्रगच्या निमित्तानं हत्या झाल्या आहेत. गोल्डी ब्रार आणि त्यासारख्यांची नावं समोर आल्यानं काहींना अटक केलीय. आरसीएमपीनं हरेक शहरात, राज्यात क्रॅकडाऊन करायला सुरुवात केली. व्हॅनक्यूहूर, टोरंटो, ओंटारी जिथं प्रामुख्यानं भारतीय राहतात. अशा ठिकाणी आरसीएमपीनं नाकेबंदी केल्यानं तिथले बरेचशे गुंड भारतात परतलेत. काही गोल्डी ब्रारप्रमाणे तिथंच राहिलेत. त्यांनी इथं आंतरराज्य टोळी बनवलीय. इथं 'ओव्हरसिज एक्स्ट्रोशन' केलं जातंय. राज्याचे पोलीस यांचं कार्यक्षेत्र केवळ त्या राज्यापुरतं असतं. ते अशा विविध राज्यात विस्तारलेल्या खतरनाक गँगशी कसे लढू शकतील? यासाठी गरज आहे की, सरकारनं केंद्रिय स्तरावर काही पावलं उचलायला हवीत. नॅशनल इन्व्हेस्टीकेशन एजन्सी-एनआयए ही तपास यंत्रणा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिरेकी कारवाया, गुन्हेगारी, हत्यारं, ड्रग वाहतूक तपासाचं काम करते. आंतरराज्य गुन्हेगारीचा तपास करण्यासाठी वेगळ्या पोलिसी इन्फ्रास्ट्रक्चर गरज आहे. ती निर्माण करून त्यांच्याकडं हे गुन्हे सोपवले जायला हवेत. राज्यातले पोलीस, एसआयटी यांच्या क्षमतेच्याबाहेर या गँगच्या कारवाया आहेत. ७०० हून अधिक शूटर्स, मल्टिनॅशनल कंपनीसारखी गुन्हेगारी टोळी याला रोखायला हवंय. मुसेवाला याच्या हत्येचं दुःख आहेच, पण सलमान व इतर बॉलिवूडच्या ज्या लोकांना धमक्या आल्या आहेत त्यांना कडक सुरक्षा द्यायला हवीय. त्याचबरोबर या गँगच्या घडामोडीवर लक्ष ठेवायला हवंय. हे ७०० शार्पशूटर्स आहेत त्यांचाही शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळायला हव्यात. जे कॅनडात आहेत त्यासाठी आरसीएमपीशी बोलायला हवंय.
हरीश केंची,
९४२२३१०६०९
 

No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...