Tuesday, 21 June 2022

कार्यकर्ता हरवलाय!!

"राज्यसभा अन विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या. यात राजकारणातल्या सटोडीयांना मानाचं पान दिलं गेलंय तर कार्यकर्त्यांच्या तोंडाला पानं पुसली! सर्वत्र भुरट्या राजकारण्यांची चलती आहे. सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याच्या इराद्यानेच लोक राजकारणात येतात. सारं काही करून आव मात्र तत्व-निष्ठेचा, निस्वार्थी जनसेवेचा आणतात. मिळेल तिथं हात धुवून घेतो, तोच वारंवार माझे हात स्वच्छ आहेत अशी ग्वाही देतो. कोण कुठं होते नि कुठं पोहीचले हे काय लोकांना दिसत नाही? हे एका बाजूला सुरू असताना नेत्यांची मुलं कधी कार्यकर्ता होतच नाहीत. एकदम पदाधिकारी वा मंत्री म्हणूनच समोर येतात! ध्येय-धोरण, विचार-आचार, तत्व-निष्ठा, मूल्याधिष्ठित राजकारण, लोकांप्रती बांधिलकी ह्यासारखे मुद्दे टांगले गेले आहेत. त्यामुळं निरलस, निरपेक्ष, निस्वार्थी कार्यकर्ता आज गायब झालाय, हरवलाय! तो पुन्हा ठामपणे उभा राहणं ही केवळ राजकीय पक्षांचीच नव्हे तर समाजाचीही गरज आहे!"
--------------------------------------------------

*आ* जच्या तरुणांचा कोणत्याच राजकीय पक्षांवर विश्वास राहिलेला नाही; तो राजकीयदृष्ट्या भांबावल्यासारखा, दिशाहीन झालाय. कुणाचा तरी आदर्श आपल्या जीवनात घ्यावा असं नेतृत्वही त्याला दिसत नाही. मध्यंतरी अण्णा हजारेंच्या आंदोलनात हजारो तरुण रस्त्यावर उतरले होते, त्यांना अण्णांसारखा साधासुधा माणूस आकर्षित करू शकला. इतका स्वच्छ निस्वार्थी माणूस असू शकतो याचं आश्चर्य आणि कुतूहल त्यांना वाटलं होतं. पण कधीकाळी आपल्याकडं अशी माणसं शेकड्यांनीच नव्हे तर हजारोंनी होती; त्यावेळी त्यांनाच कार्यकर्ते संबोधलं जाई. त्यांच्याकडं कोणी त्यागी, निस्वार्थी म्हणून आदरार्थी बघत असला तरी त्यांना कोणी साधुसंत समजत नव्हतं. आपण प्रामाणिक असावं ही भावना समाजात सर्वत्रच रूढ होती. अशी निस्वार्थी माणसंही 'कार्यकर्ते' म्हटली जायची. आज अशी माणसं दुर्मिळ होताहेत. तसे आदर्श आजच्या पिढीसमोर नाहीत. त्यांना कार्यकर्ता म्हणजे काय, कसं समजावं असा प्रयत्न राजकीय पक्षांकडून, नेत्यांकडून होताना दिसत नाही. पूर्वी सर्वच पक्षात असे निष्ठावान कार्यकर्ते होते. *गांधी टोपी डोक्यावर घालण्यापूर्वी त्यावर कपाळ टेकवून वंदन करणारे काँग्रेस कार्यकर्ते होते, नेहरू सदर्‍याला ठिगळ लावून खांद्यावर शबनम बॅग लटकवून देशात समाजवाद आणण्याच्या निश्चयानं वठलेले साथी समाजवादी होते. उच्चविद्याविभूषित पदवीधर द्विपदवीधर झालेले अनेक जण राष्ट्रवादाच्या विचारानं भारून देशाच्या कानाकोपर्‍यात जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार पोचवणारे स्वयंसेवक होते. शिवसेनाप्रमुखांचा आदेश येताच जीवाचीही पर्वा न करता दे धडक बेधडक भिडणारे शिवसैनिक होते!* आता अशा कार्यकर्त्यांची सर्वत्र वानवाच दिसून येतेय. सगळ्याच पक्षनेतृत्वाला हे जाणवतं; याचं कारण, आजचं पक्षीय राजकारण लोकांच्या सुखदुःखाशी निगडीत राहीलेलं नाही. कोणत्याही विचारांशी वाहिलेलं नाही. केवळ सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि निवडणुकीसाठीच! असं ह्या पक्षांचं स्वरूप राहिलेलंय. सार्‍यांच्या निष्ठा या सत्तेला आणि खुर्चीला वाहिलेल्या असल्यानं सारे नेते हे सत्ताधारी पुढारी होण्यासाठीच सज्ज झाले आहेत. कार्यकर्ता व्हायला कोणीच तयार नाही. याचं कारण राजकारण हा व्यवसाय बनलाय आणि नेते, कार्यकर्ते हे व्यावसायिक झालेत. पूर्वीचा तो निरलस, निरपेक्ष, निस्वार्थी कार्यकर्ता आज गायब झालाय, हरवलाय!

कार्यकर्त्यांच्या समर्पणवृत्तीचा संस्कार आता हरवलाय. कार्यकर्ते जिथं, तिथं कामाचा उरक झपाट्यानं, हा मंत्र खोटा ठरू लागलाय. मात्र गणेशोत्सव, नवरात्र उत्सवांशिवाय नेत्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, यांच्या मिरवणुकीत नाचणार्‍यांची संख्या काही कमी झालेली नाही, ती अफाट बनलीय. आरतीला, महाप्रसादालाही रांगाच्या रांगा फुललेल्या दिसतात, परंतु कार्यक्रमाच्या ठिकाणी सतरंज्या घालायला कार्यकर्ते मिळण्याचे दिवस संपुष्टात आल्याचं दिसतं. अंग मोडून काम करणारी कार्यकर्त्यांची पिढी आता हायटेक झालीय. अधिकाधिक सोयी मिळाव्यात म्हणून 'इव्हेंट मॅनेजमेंट' नावाची एक नवी जमात अस्तित्वात आलीय. त्यांच्या आयोजनामुळं कार्यक्रम देखणा, आखीव-रेखीव आणि व्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण ठरतं! परंतु अशा व्यावसायिक रूपानं पक्षाचा कार्यकर्ता हरवतोय हे कुणी राजकीय नेते लक्षात घेत नाहीत. पूर्वी मी कम्युनिस्ट, मी पुरोगामी, मी नवमतवादी, आम्ही हिंदुत्ववादी, आम्ही अहिंसावादी, आम्ही अमुक विचारांचे असं सांगताना सांगणाऱ्याच्या मनात काही किंतू नव्हता; मी ऐकणार नाही उलट दोन्ही बाजूंना त्यांच्या त्यांच्या परीनं त्या त्या विचारांचा आणि चळवळीचा आदर होता. विरुद्ध मतवादी विचारसरणी डावी-उजवी करीत कार्यपद्धतीबाबत फारकत मानत परंतु परस्परांच्या कार्यकर्तावृत्तीबाबत आदरभाव होता मी या विचारसरणीचा असल्यानं माझं नुकसान होईल, ते माझ्या विचारांची मला मोजावी लागणारी किंमत आहे असाच त्यामागे अभिमानी विचार असायचा. मात्र या किमतीची मोजणी ज्या काळापासून राजकारण्यांनी अर्थकारणात, पैशात केली त्या क्षणापासून कार्यकर्ता वृत्तीचा ऱ्हास होत गेला. आताशी नवे कार्यकर्ते कार्यक्रमानंतर मिळणाऱ्या पाकिटांबरोबरच मटणासह ओल्या पार्टीची वाट पाहू लागलेत. विविध चळवळीत भक्तिभावानं झोकून देणं आता दूर झालंय. आणीबाणी सोसत प्रसंगी भूमिगत राहून ध्येयासाठी लढणाऱ्यांना तुरुंगवासाची भीती नव्हती की, पोटापाण्याची चिंता नव्हती. समाजरचनेसाठी आवश्यक त्या यज्ञात अशा कार्यकर्त्यांच्या हजारो समिधा होऊन लढल्या. आजही विविध मोर्चे, सभा, संमेलन, मेळाव्याला गर्दी होते. पण तळहातावर ठेवलेल्या नोटांच्या हिशोबानं! टाळ्या वाजतात त्याही त्याच हिशेबानं! कार्यक्रमानंतर पाण्याचा पाऊच, पोळीभाजीची पाकीटं हजारोंनी अंगावर फेकली जातात. ठरलेल्या वेळात आलेल्या माणसाच्या लोंढी पुन्हा ट्रकमध्ये चढविल्या जातात. आजच्या एखाद्या पक्षाची सभा संपल्यानंतर उद्या कोणत्या पक्षाच्या सभेला माणसं न्यायची, यावर चर्चा झडतात. कोणत्यातरी विषयावर भाळून संपूर्ण जीवन कारणी लावण्याचा वेड गेल्या दोन दशकापर्यंतच्या पिढीत होतं. परंतु या दरम्यान घडलेल्या नेत्यांनी अशा भावनिक कार्यकर्त्यांचा गैरवापर करून घेतला. हा कार्यकर्ता वर्ग चपला सांभाळणारा ठरला. चळवळीच्या ताई, भाऊ, दादा, अण्णा यांना स्टेशनवर उतरून घेतल्यापासून त्यांच्या बॅगा उचलण्यापर्यंत आणि स्टेजवर चढताना त्यांनी काढलेल्या चपला सांभाळण्यापर्यंतची सारी जबाबदारी या कार्यकर्त्याकडं बहाल करण्यात आली. कार्यकर्त्याला सुरवातीला अत्यंत सन्मानाचं वाटणारे हे काम थोड्याकाळानंतर रामागड्याचं होऊन जातं आणि त्याच्यातली ती कार्यकर्ता वृत्ती हरवून जाते. सुरुवातीला आग्रहानं सामाजिक, राजकीय कार्यात गेलेल्यांची फरफट कधी होते हे त्याचं त्यालाच कळत नाही. मग कालांतरानं त्याला प्रचंड मनस्ताप होतो. खाण्याचं, पिण्याचं, राहण्याचं वांदे होतात. एक एक आदर्श ढासळताना त्याच्या कार्यकर्तावृत्तीला दिसतात आणि त्यावेळी त्याला जे नैराश्य येतं, त्यानं त्याचं जीवनच बदलून जातं. यातून बाहेर पडावं आणि कुटुंबात रमावं तर, आजवरच्या आपल्या राजकारणापायी कुटुंबाची हेळसांड झालेली असते. त्यामुळं घरदार ही त्रासलेलं असतं. अशावेळी नाराजी व्यक्त करण्याची एकही संधी कुटुंबीय सोडत नाहीत. राजकारणाच्या भुताटकीतून भानावर आलेल्यांना ही सजा मिळालेली असते! पोटच्या पोराच्या तोंडाचा घास ओढून घेऊन चळवळीतल्या कार्यकर्त्यांना भरवलेला असल्यानं  कुटुंबप्रमुख याविषयी खदखदणारा त्याचा राग बायको-पोरांवर काढतात. कार्यकर्ता म्हणून साहेबांच्या मागे फिरावं तर फिरताना, मिरवताना, त्यांच्या चपला सांभाळताना घरात आलेलं उघडेपण यानं तो आतल्या आत खचत असतो. आदर्श म्हणून ज्या नेत्याकडं तो पाहत असतो, त्यांच्याशी बोलावं तर ही व्यक्तिगत बाब आहे नंतर बोलू असं म्हणून त्याला गप्पगार बसवलं जातं!

अशाप्रकारे ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं तिळातिळानं होणारं मरण मात्र नवी पिढी हेरते. त्यांच्यासारखं निष्काम काम करून काही साधणार नाही, हे तो ओळखतो, मग चळवळीतून स्वतःला घडवायचं एक नवं चक्र तयार होतं. पद, अधिकार याचा गैरवापर सर्रास होतो. जुन्या कार्यकर्त्यांना अलगद बाजूला सारलं जातं आणि सुरू होतो नव्या पिढीच्या हिशोबी कार्यकर्त्यांचा खेळ! यात तत्त्व, विचार, निष्ठा, आदर्श, ध्येयं याला थारा नसतो की तत्त्वासाठी, निष्ठेसाठी, सत्यासाठी, प्राणांची आहुती देण्याची भूकही नसते. अशा व्यावसायिक मनोवृत्तीचा आताशी शिरकाव झाला आहे तो 'इव्हेंट मॅनेजमेंट'चा! त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थांचा! समाजसेवेच्या नावाखाली देशी, परदेशी निधी घेऊन उपक्रम चालवण्याचा! हे एका बाजूला सुरू असताना 'व्हाईट कॉलर' जनतेची मुलं कधी कार्यकर्ता होतच नाही. एक तर ती होतात पदाधिकारी वा एकदम मंत्री म्हणूनच ! हे जमणं शक्य नसेल तर राजकारणात त्याला रस नाही असं मोठ्या दिमाखानं त्याचे मायबाप सांगतात. आपल्या पूर्वजांनी जपलेला कार्यकर्तावृत्तीचा संस्कारी ठेवा नव्या पिढीकडं हस्तांतरित करण्याची वेळ आलीय! जनता पक्षाच्या उदय आणि अस्तानंतर हळूहळू क्षीण झालेल्या कार्यकर्त्यावृत्तीनं आताशी माणूसकी राखली आहे. ही अशी स्थिती का झाली? याचा विचार करण्याची सत्ताधारी आणि सत्ताकांक्षी अशा सर्वच पक्षांची जबाबदारी आहे. गरज आहे ती पूर्वीप्रमाणे कार्यकर्ता
वृत्ती जोपासण्याची, तसं वातावरण निर्माण करण्याची. पण हे होईल का? आज सारे राजकीय पक्ष व्यक्तिसाक्षेप बनले आहेत. पूर्वी पक्षाचे नेते असत, आता नेत्यांचे पक्ष बनले आहेत! ध्येय, धोरण, विचार-आचार, तत्व-निष्ठा, लोकांप्रती बांधिलकी ह्यासारखे मुद्दे टांगले गेले आहेत! नेत्यांप्रमाणेच आता पक्षांचे कार्यकर्तेही उरले नाहीत तर ते नेत्यांचे कार्यकर्ते बनले आहेत! मूल्याधिष्ठित राजकारणाला तिलांजली दिली गेली, त्यामुळं कार्यकर्ता धुळीला मिळालाय. तो पुन्हा उभा राहणं ही केवळ राजकीय पक्षांची नव्हे तर समाजाचीही गरज आहे!

सध्या राजकारणात काहीही घडू शकतं इतकी अस्थिरता आहे आणि दाखविलं जातंय तेवढे वैचारिक मतभेद आता नाहीत. मुळात कुणीही कुठल्याही विचाराशी निष्ठेनं बांधलेला नाही. अगदी भाजपेयी नेते, कार्यकर्ते धरून हे म्हणता येईल. आज सर्वत्र चलती भुरट्या राजकारण्यांची आहे. सत्तेसाठी शक्य होईल ते सारे काही करण्याचा इरादा करूनच आता लोक राजकारणात येतात. सारं काही करून आव मात्र तत्व- निष्ठेचा, निस्वार्थी जनसेवेचा आणतात. जो मिळेल तिथं हात धुवून घेतो, तोच वारंवार माझे हात स्वच्छ आहेत अशी ग्वाही देतो. हे आता सगळेच जाणतात. कोण कुठं होते नि कुठं पोहीचले हे काय लोकांना दिसत नाही? महिना ओलांडताना खिशाचा तळ पुन्हा पुन्हा चाचपून भोकं पडलेल्या विजारी घालणारे आपण म्हणजे कंडक्टरनं बसचं तिकीट देताना साडेपांच रुपयाऐवजी पांच रुपये घेतले तर लॉटरी लागल्याचा आनंद होणारे! ज्यांना खरोखर लॉटरी लागलीय त्यांच्याकडं बघत 'देवा दया तुझीही, ही शुद्ध दैव लीला, लागो न दृष्ट आमची, त्यांच्याच वैभवाला!' असं म्हणत बसण्याखेरीज आणखी काय करणार! मुद्दा आहे सत्तेसाठी सारं काही करायला तयार असणाऱ्या सत्तानिष्ठ राजकारण्यांचा!

सध्या राजकीय क्षेत्र हे भंगाराचं दुकान झालेलंय. कोणीही लोकप्रतिनिधी येतो आणि तागड्यात बसून स्वतःला भंगार भावात विकतो. मतदारांना स्वतःची लाज वाटते की नाही ठाऊक नाही. पण प्रतिनिधी मात्र बेशरम आहेत. ऊरुसाच्या आधी तमासगीर मैदानात छावण्या टाकून रंगीत तालमी करतात. कोणाला कोणती भूमिका द्यायची हे ठरवतात. बाहेरुन कलाकार पळवून आणतात. प्रत्यक्ष तमाशाच्या आधीचा तमाशा त्या मैदानावरच होतो. आधी आदर करणाऱ्याची नंतर निंदा होते. ऊरुस संपला की सगळे थकून भागून गारेगार होतात. आपसात लग्नही जुळवून आणतात. पुढच्या ऊरुसापर्यंत छान संसार करतात. पटलं नाहीतर शेजारच्या छावणीत जातात. त्याला व्याभिचार नाही म्हणत. घरवापसी म्हणतात. सध्या राजकीय फडावर हाच भंगार मालाचा लिलाव सुरु आहे. मतदारांचं या दलालांना काही घेणं देणं नाही. त्याला गृहीत धरुन सगळा नासवा-नासवीचा धंदा राजरोसपणे सुरु आहे. मतदार थिएटरमध्ये बसल्यासारखं हे बघतो अन टाळ्या पिटतो. कपट कारस्थानाला हुशारी समजतो. कोणाला तरी शिव्या घालतो. कोणाला तरी मत देतो. पुन्हा पुढच्या खेळाचं तिकीट काढतो. आपल्या समाजाची मनोदशाच समजत नाही. सकाळी उठून पोटाची खळगी भरण्यासाठी त्याची रोजगार यात्रा सुरु होते. तो मजूर अड्डयावर स्वतःला भाकरीच्या भावात भाड्याने देतो. आणि राजकारणी तिकडं तारांकित हॉटेलात जनतेच्या पैशावर डुकरासारखे चरतात गाढवासारखे लोळतात. समाज हताशपणे कोणातरी सद्विचारी नेत्याची वाट पाहात बसतो. दररोज साने गुरुजी पैदा होत नसतात. समाज पुरुषानंच गांधी बनायचं असतं. पण आपला समाज पराभूत मनोवृत्तीचा आहे लढाईच्या आधीच हत्यार खाली ठेवणारा. कितीही दुर्धर प्रसंग आला तरी कोपऱ्यातल्या कोपऱ्यात जागा करून राहणारा. पण मानेवरचं जोखड भिरकावून देत नाही. 'ठेविले अनंते तैसेचि राहावे चित्ती असू द्यावे समाधान! परिस्थिती शरण समाजाचा निस्तेज चेहरा पाहावत नाही. गलितगात्र लोळागोळा झालेल्या समाजात दंगली घडविण्यासाठी प्राण कोण फुंकतो कोण जाणे. पण तो नक्कीच देशाचा हितचिंतक नाही. सामान्य नागरिकाला जोपर्यंत लोकशाहीतल्या मतांचं मूल्य समजत नाही. घटना साक्षर होत नाही. तोपर्यंत फडावर तमाशाची रंगीत तालीम होतच राहणार, दलाली आणि लिलावही होत राहतील. कोणीही शहाजोग नाही. सगळे एका आळीत आणि एकाच चाळीत राहतात. त्यांची संस्कृतीही एकच आहे. हे आम्ही नेहमीच म्हणतो आणि मतदार जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत म्हणत राहणार. राजकीय पक्षाची विचारधारा ह्या त्यावर चढवलेले पोषाख असतात. जात आणि पैसा याचं वास्तव राजकीय नेते कधीही दुर्लक्षित करत नाहीत. ते अधिक जोमानं त्याकडं पाहतात. मात्र पत्रकार आणि राजकीय विश्लेषक ते ठळकपणे मांडत नाहीत. राजकीय पक्षांच्या विचारधारेनुसार त्यांची धोरणं आणि कार्यक्रम असतात. हे इथं विसरलं जातं. मूल्याधिष्ठित राजकारणाचे तीनतेरा वाजवले जातात. 'निवडून येण्याची क्षमता' या गोंडस नावाखाली तमाम ध्येय, तत्व, निष्ठा ह्या पायदळी तुडविल्या जातात. पक्षविचारांशी बांधिलकी, कार्यकर्त्यानं तळागाळापासून केलेलं पक्षाचं काम मातीमोल ठरवलं जातं. पैसा खर्च करण्याची क्षमता, निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद ही आयुधं वापरण्याची ताकद असेल तर मग पक्षनिष्ठा हवी कशाला? आयुष्यभर अपमान, निंदा, टिंगलटवाळी प्रसंगी मार खाऊन काम केलेल्या संघाच्या स्वयंसेवकांना, जनसंघ, भाजपच्या कार्यकर्त्यांना पक्षाची झालेली ही अधोगती पाहून काय वाटत असेल? पक्षांत झालेल्या या भाऊगर्दीनं ती सुखावली असतील का? ज्या काँग्रेसी मार्गाला कार्यकर्त्यांनी आयुष्यभर विरोध केला त्याच मार्गावर आता पक्षाची सुरू असलेली ही वाटचाल आत्मक्लेश करणारी आहे.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...