"राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारचे चांगलेच वाभाडे काढलेत. त्यांच्या त्या अत्यंत संयमित, आक्रमक आणि राजकीय परिपक्वता दाखवत केलेल्या भाषणाचं सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. सरकारचा फोलपणा, खोटारडेपणा, बेफिकीरवृत्ती, न केलेल्या कामाचा पिटला जाणारा डंका या आणि अशा अनेक बाबींवर कडाडून केलेली टीका सत्ताधारी भाजपला बरीच झोंबलीय. राहुल गांधींनी उपस्थित केलेले मुद्दे खोडून काढण्याऐवजी भाजपनेते नेहमीप्रमाणे त्यांची टर उडवण्यात, टिंगलटवाळी करण्यातच धन्यता मानताहेत. राजकीय विश्लेषकांनी मात्र कौतुक केलंय. या भाषणातून राहुल गांधी हे एक सक्षम विरोधीपक्ष नेता म्हणून लोकांसमोर आजतरी आले आहेत, त्यांना राजकीय सूर सापडलाय हीच काय ती जमेची बाजू म्हणावी लागेल! पण पक्षाची अस्वस्था कधी सुधारणार?"
----------------------------------------- ------------
*गे* ल्या काही वर्षांत राजकारणाचं शुद्धीकरण होण्याऐवजी ते दिवसेंदिवस अधिक गढूळ होत चाललंय. शिवाय राजकारणातला विखार वाढत चाललाय. हा विखार केवळ दिखाव्यासारखा आहे. कारण सत्तेच्या खुर्चीत बसल्यानंतर विरोधकांना किंवा हितशत्रूंना वेसण घालण्यासाठी घटनात्मक संस्थांचा वापर, गैरवापर केला जात असला तरी यासंदर्भातली प्रकरणं शेवटापर्यंत नेली जात नाहीत, हे वास्तव आहे. हे राजकारण केवळ कुरघोड्या करण्यासाठी किंवा विरोधकांना दाबण्यासाठी, नमवण्यासाठीचं आहे. भ्रष्टाचाराचे, गैरव्यवहारांचे आरोप ज्यांच्यावर केले जातात, तेच उद्या पक्ष बदलून आपल्या पक्षात आले की साधू-संत बनून जातात. जर खरा विखार असता तर ज्यांच्यावर तुफान आरोप केलेत असे अनेक नेते जन्मठेपेच्या सजेवर गेले असते. सीबीआय असो, ईडी असो वा अन्य तपासयंत्रणांकडून छापेमारी होते, चौकशा होतात; पण पुढे काहीही घडत नाही. केवळ चौकशा चालू ठेवून भ्रष्टाचारी नेत्यांवर दबाव, दडपण कायम राखायचे आणि त्याआडून राजकीय लाभ उठवायचा असं घडतं. दुर्दैवानं, राजकारण्यांनी केलेल्या या ‘विषपेरणी’तून समाजात जो विखार वाढत चाललाय, तो मात्र अत्यंत चिंताजनक आणि घातक आहे. यावर नेमकं बोट राहुल गांधी यांनी ठेवलंय. राहुल यांनी देशापुढं असलेल्या आव्हानांवरून भाजप सरकारचा आक्रमकपणे समाचार घेतलाय. त्यातले सारेच मुद्दे झोंबणारे असल्यानं, राहुलनं संभ्रमित मनानं केलेले आरोप बिनबुडाचे आणि राजकीय उद्देशांनी प्रेरित असल्याची टीका भाजप मंत्र्यांनी केली. राहुल यांनी भाषणात परिणामकारक मांडणी होती. केंद्रातल्या सत्तांतरानंतर प्रधानमंत्री मोदी यांनी सूत्रं हाती घेतल्यापासून, जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आवश्यक संवादकौशल्य आणि वक्तृत्व असलेल्या नेत्याची पोकळी राष्ट्रीय राजकारणात निर्माण झाली होती. ती पोकळी राहुल यांनी भरून काढताहेत काय असं पहिल्यांदाच दिसून आलं. राहुल गांधी अठरा वर्षांपासून लोकसभेचे सदस्य आहेत. आजवरच्या त्यांच्या लोकसभेतल्या भाषणांची भाजपच्या बाकांवरून सातत्यानं टर उडविली जात होती. प्रधानमंत्री मोदी आणि गृहमंत्री शहांपासून भाजपच्या सर्वच नेत्यांनी राहुल गांधींवर सतत टिंगलटवाळी, उपरोध आणि टीका केलीय. मारून मुटकून राजकारणात आणले गेलेले राहुल गांधी बेडरपणानं ते मोदींसह सत्ताधारी भाजप-संघावर तुटून पडलेले दिसून आलं. राहुल गांधींनी लोकसभेत न अडखळता, आधार न घेता विरोधी पक्षाच्या नेत्याला साजेसं, बेधडक आरोपांनिशी केलेलं भाषण हा त्यांच्या आजवरच्या राजकीय कारकीर्दीतला महत्त्वाचा टप्पा ठरलाय. हिंदी शब्दांची वानवा असलेले राहुल, इंग्रजीत अधिक चांगलं बोलतात. आपण कितीही वास्तववादी बोललो, तरी सत्ताधारी बाकांवरील मंत्री आणि खासदार खिल्ली उडविणारच, हे गृहीत धरून विरोधकांना सामोरं जाण्याच्या आत्मविश्वासानं राहुल अलीकडं बोलत असल्याचं जाणवतं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना मोदी हे राहुल यांचा 'शहजादा' असा उल्लेख करायचे. बुधवारच्या भाषणात राहुल यांनी मोदींना 'शहेनशहा'ची उपाधी देत, टीका करत त्याचा वचपा काढला. सत्ताधारी भाजप सरकारला शब्दांनी झोडून जायबंदी करण्याची क्षमता आणि संवादकौशल्य राहुल यांच्यात असल्याचं दिसून आलं हीच काय ती नवी उपलब्धी आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून भाजपनं त्यांना ट्रोल करत खिल्ली उडवलीय. त्यावरून सरकारला राहुल गांधी यांनी संसदेत केलेले भाषण झोंबलेलं दिसलं. काहींना देश जणू २०१४ सालीच निर्माण झालाय, असं वाटतं अशांना त्यांनी चांगलंच सुनावलंय. गांधी म्हणाले, 'माझे पणजोबा पंडित जवाहरलाल नेहरू हे देशासाठी १५ वर्षे तुरुंगात होते. त्यांनी तुरुंगवास भोगलाय. माझ्या आजीनं, इंदिरा गांधींनी देशासाठी ३५ गोळ्या झेलल्या आहेत. माझे वडील राजीव गांधीसुध्दा देशासाठी हुतात्मा झाले आहेत. तेव्हा तुम्ही मला काय देश म्हणजे काय हे शिकवता?' असा सवाल राहुलनं केला. मला माझा देश माहितीय!' या वक्तव्यामुळं सत्ताधारी भाजप घायाळ झाला. तसंच चीनी सैन्य लडाखमध्ये का घुसलंय असं विचारणाऱ्यांना चीनचे एजंट ठरवणं याला राज्यकारभार करणं म्हणत नाही'. अशी टीका करत भाजपच्या या प्रवृत्तीवर जोरदार हल्ला चढवला. त्यामुळं राहुल गांधी यांचं झालेलं टोकदार भाषण सत्ताधाऱ्यांना चांगलंच झोंबणारं ठरलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले होते की, 'अर्थसंकल्पात गरीब लखपती बनलेत, मालामाल झालेत!' राहुल गांधी यांनी प्रधानमंत्र्यांच्या त्या दाव्याची चिरफाड केली. त्यांनी म्हटलं की, आज देशात दोन भारत निर्माण होत आहे. एक गरीबांचा आणि एक श्रीमंतांचा! दोन्ही भारताच्या दरम्यानची दरी दिवसेंदिवस सत्ताधाऱ्यांमुळं वाढतेय. रोजगारासाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तरुणांची जी आंदोलनं झाली, त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. राष्ट्रपतींनी देखील त्यांच्या अभिभाषणात एक शब्दही बेरोजगारांबाबत उच्चारलेला नाही. गरीब भारताजवळ रोजगार नाही. तरुणांच्या हाताला काम नाही. मात्र त्याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही. देशभरातले तरुण आज रोजगाराच्या शोधात आहेत. तरुणांना फक्त रोजगार हवाय. मात्र, मोदी सरकार त्यांना रोजगार देऊ शकत नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी राहुल यांच्या भाषणांत अडथळे आणले, गोंधळ घातला, तेव्हा केंद्र सरकारनं टीका सहन करायला हवीय. लोकांची नाराजी वाढतेय त्यावर समाधान शोधायला हवंय! असा सल्लाही त्यांनी दिला.
राष्ट्रपतींनी केलेल्या भाषणात बेरोजगारीवर भाष्य नाही म्हणजे देशात बेरोजगारी नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. देशात सात कोटी बेरोजगार वाढले आहेत. त्यामुळं देशातले लोक गरीबीकडं घसरत आहेत. देशातले ८४ टक्के लोकांचं उत्पन्न घटलंय. मात्र युपीएच्या काळात २७ टक्के गरीब लोकांचं जीवनमान उंचावले होते. मात्र भाजप सरकारच्या धोरणांमुळे गेल्या ७ वर्षात २३ कोटी लोकांना गरीबीत ढकलल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. परंतू देशाचे प्रधानमंत्री यावेळी संसदेत उपस्थित नव्हते. मात्र संसदेत राहुल गांधी यांनी भाषण केल्यानंतर संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी तुच्छतेनं राहुल गांधींवर टीका केली आणि भाजपचे पगारी प्रवक्ते सायबर फौजेसह राहुल गांधींवर तुटून पडलेत. देशातल्या शंभर लोकांकडं देशातली ३० टक्के संपत्ती आहे. हे शंभर लोक कोण आहेत? ज्यांच्या संपत्तीत वाढ झाली ती त्यांच्या उद्योगामुळं,पण देशात किती रोजगार वाढले? देशाची विमानतळं, बंदरं, सरकारी मालकीच्या कंपन्या, शेती उद्योग शंभर लोकांच्या मालकीचे होताहेत. त्यामुळं विमानतळावर आता देशाचं नाही तर उद्योगपतींचं नाव दिसतंय. अशी टीका राहुल गांधीनी करताच. भाजपनं राहुल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. बिहारमध्ये रेल्वे भरतीत लाखो बेरोजगार तरूण रोजगारासाठी रस्त्यावर आले. त्यांना चोप देऊन हा प्रश्न सुटणार नाही. रोजगारासाठी तुमच्याकडं काय उपाय आहेत ते सांगा. असं सुनावत गांधी म्हणाले, विरोधकांनी प्रश्न विचारला तर सरकारनं त्याचं उत्तर द्यावं, विरोधकांना मुर्ख म्हणू नये. सरकारनं विरोधकांवर लक्ष ठेवण्यासाठी १५ हजार कोटी रुपये पेगॅसिस सॉफ्टवेअरसाठी खर्च केलेत ही उधळपट्टी म्हणजे देशद्रोह नाही का? असा सवाल त्यांनी विचारला. सरकारच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह, असा नवा फंडा तयार होतोय. त्यामुळं विरोधकांना संसदेत बोलू दिलं जात नाही. तसंच आपल्या धोरणांनी चीन आणि पाकिस्तानला एकत्र येण्याची संधी या सरकारनं दिलीय, असा दावा राहुल गांधी यांनी केलाय. चीननं केलेले अतिक्रमण असो वा पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी यावर बोलले की त्यांना चीन किंवा पाकिस्तानचे एजंट ठरवलं जातंय. या मुर्खपणाला काय म्हणावं? या सरकारनं देशद्रोह आणि राजद्रोह यांच्यातली रेषाही संपुष्टात आणली आहे. सरसकट देशद्रोही ठरवलं जातंय. मोदी सरकारला विस्मरणाची कला अवगत आहे. त्यांना सत्य ऐकून घ्यायचंच नाही. त्यांनी २०१४ च्या प्रचारात दिलेली आश्वासनं आता त्यांच्या स्मरणात नाहीत. पण लोकांच्या स्मरणात नक्कीच आहेत. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणं, महागाई समाप्त करणं, इन्कम टॅक्स समाप्त करणं, पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात आणणार, दोन कोटी युवकांना रोजगार देणं, देशातील गरीब श्रीमंतातली दरी यावर राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित करून राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या वचनाची आठवण करून दिली. या घोषणांची आठवण करून देताच त्यांना देशद्रोही ठरवलं जातंय. देशासाठी बलिदान करणं, रक्त सांडणं, त्याग करणं वगैरे गोष्टींशी सध्याच्या केंद्र सरकारचा संबंध नाही. देशाचं आर्थिक चक्र हे दोन पाच उद्योगपतींभोवतीच फिरतेय. सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स हेच जणू मंत्रीमंडळाचे सदस्य आहेत. त्यामुळं सत्ताधाऱ्यांना पुलवामा का घडलं हे विचारणाऱ्यांना पाकिस्तानचे एजंट ठरवलं जातंय. तर चीनी सैन्य लडाखमध्ये घुसलंय, त्यावर बोलणाऱ्यांना चीनचं एजंट ठरवलं जातंय. राहुल यांनी याच प्रवृत्तीवर जोरदार प्रहार केलाय. त्यामुळं राहुल गांधी यांचे भाषण सत्ताधाऱ्यांना झोंबणारच!
राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून भाजपाकडून त्यांच्यावर हल्ला चढवला जात असताना शिवसेनेनेसह इतर विरोधी पक्षांनी राहुल गांधींचं कौतुक केलंय. भाजपावर खोचक शब्दांत निशाणा साधण्यात आलाय. विरोधकांच्या भाषणावेळी प्रधानमंत्र्यांनी उपस्थित राहावं असे आजवरचे संकेत आहेत. नेहरूंपासून अटलबिहारी वाजपेयींपर्यंत सगळ्यांनीच ही परंपरा पाळलीय. अटलजींच्या सरकारविरोधी भाषणाचे नेहरूंनी कौतुक केलं होतं. बॅ नाथ पैंच्या भाषणावेळीही नेहरू हजर राहात. मधू लिमये, मधू दंडवते यांच्या भाषणात सत्तापक्षानं व्यत्यय आणला नाही. पिलू मोदी इंदिरा गांधी सरकारचे वाभाडे काढत, पण भाषण संपताच इंदिरा गांधी लगेच पिलू मोदींना चिठ्ठी पाठवून भाषणाचं कौतुक करत असत. आता ते दिलदारीचं वातावरण संपलंय. विशेष म्हणजे, समाजामध्ये अशी विखारपेरणी करुन राजकीय नेते मात्र परस्परांशी अत्यंत सामोपचारानं वागताना दिसतात. डाव्यांपासून उजव्यांपर्यंत राजकीय पुढार्यांमध्ये पूर्णतः भिन्न विचार पाहायला मिळतात. व्यासपीठांवरुन ही मंडळी एकमेकांविषयी विखारी बोलत असतीलही; पण ते तात्पुरतं असतं. त्यांच्या मनात तो विखार नसतो. त्यामुळंच हे नेते एकमेकांना सांभाळून घेतात, एकमेकांच्या पाठिशी उभे राहतात, समारंभांतून आनंद लुटतात, खासगी जीवनात एकमेकांची चेष्टामस्करी करतात. थोडक्यात सतत राजकीय जोडे घालून ते फिरत नाहीत. समाजात वावरताना मित्रत्वाचे जोडे घालून फिरतात. पण सामान्य माणसाला या दोन गोष्टी वेगळ्या करताच येत नाहीत. एखाद्याचे राजकीय मत आणि सामाजिक मत, मैत्री वेगळी असू शकते, ही समज समाजातून कमी होत गेलीय; किंबहुना ती कमी केली गेलीय. लोकांना सदैव या किंवा त्या ध्रुवावरच राहण्यास भाग पाडायचं हा राजकीय पक्षांचा एककलमी कार्यक्रम बनलाय. त्यातून समाजात निर्माण झालेली दुही, दुफळी चिंताजनक आहे. माणसा-माणसांमध्ये निर्माण झालेले मतभेद टोकाचे आणि तीव्र बनत चाललेत. ही परिस्थिती हिंसेला पोषक ठरणारी आहे, हे विसरता कामा नये. सामान्य माणसाला यातून बाहेर काढण्याची नितांत गरज आहे. गुप्त मतदान ही लोकशाहीची खरी परंपरा आहे. पूर्वी अगदी नवरा-बायकोंमध्येही आपण कोणाला मतदान केले आहे, ही बाब शेअर केली जात नव्हती. आता मात्र घरावर झेंडे लावण्यापर्यंत लोकांची मजल गेलीय. साधं एखादं गेटटुगेदर असेल, वाढदिवस असेल किंवा अन्य कौटुंबिक कार्यक्रम असेल, पार्ट्या असतील, पिकनिक असेल तर; गप्पा मारायला लोक बसले की दहाव्या मिनिटाला राजकारणाचा विषय निघतो आणि पाहता पाहता दोन गट पडून जातात. यातून अगदी हमरीतुमरीर्पंत विषय जातो. सुसंस्कृत, सभ्य, साक्षर समाज म्हणून हे आपल्याला शोभनीय आहे का?
दुसरीकडं काँग्रेसची देशात सर्वत्र पीछेहाट होत असताना, काँग्रेसी नेत्यांची, नेहरू-गांधीजींची, त्यांची टवाळी केली जात असताना मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत नाही. नेहरूंनी रचलेला आधुनिक भारताचा पाया, इंदिरा गांधींनी, राजीव गांधींनी आपल्या ध्येयधोरणांनी, निर्णयांनी देशाला दिलेला आकार या नव्यापिढीपुढं आणला जात नाही. त्यांच्याविरुद्ध केल्या जाणाऱ्या गोबेल्सनीतीला नवी पिढी बळी पडत असताना त्याबाबत मौन पाळलं जातंय. काँग्रेसजनांमध्ये हतोत्साह आहे. त्या नेत्यांचं स्मरण, जागरण होतच नाही. किंबहुना त्यांचं विस्मरणच केलं गेलंय. त्या दिव्यत्वाची प्रचिती नव्यापिढीपुढं ठेवण्याची गरज असताना काँग्रेसी नेतृत्व भलत्याच गोष्टीत रममाण झालेलं दिसतंय. मूल्याधिष्ठित राजकारणाची कास धरण्याऐवजी खोट्या, फसव्या आणि तत्वहीन राजकारणातच गडबडा लोळताना दिसतेय. आपल्याकडं असलेल्या खणखणीत नाण्यासारख्या नेतृत्वाकडं डोळेझाक करत इतरेजनांसारखे बागडताहेत याचं शल्य जुन्या जाणत्या काँग्रेसी मंडळींना वाटतंय. पण त्यांच्या मौलिक सल्ल्याकडं दुर्लक्ष केलं जातंय. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा उज्ज्वल कार्यकाळ लोकांसमोर आणण्याची कधी नव्हे इतकी आज गरज निर्माण झालीय! सत्तेच्या, मतांच्या आणि संख्येच्या राजकारणात काँग्रेस पक्ष हा कमकुवत बनलाय हे जरी खरं असलं तरी जनतेच्या मनांत अजूनही एक हळवा कोपरा त्यांच्यासाठी शिल्लक आहे. त्याला पक्ष साद घालताना दिसत नाही. नेहरू-गांधी यांचं राजकारण कसं प्रभावशाली होतं हे त्यांना सांगताच येत नाही. पक्षाला स्वकर्तृत्वाची ओळखच राहिलेली नाही. त्यामुळं त्यांचं वैभवशाली कार्य झाकोळलं गेलंय, त्यात भाजपनं त्यांची बदनामी विद्वेषाच्या माध्यमातून चालविलीय. ती रोखण्याची इच्छाशक्ती दिसत नाही. रणांगणात उतरलेल्या अर्जुनाची जशी अवस्था झाली होती तशी काँग्रेसची झालीय. 'काँग्रेसी इतिहासाची भगवद्गीता' सांगणारा श्रीकृष्ण येण्याची वाट तर ते पाहात नाही ना?
हरीश केंची,
९४२२३१०६०९
Subscribe to:
Post Comments (Atom)
अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!
शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...
-
"शी S...S... कर्नाटकातली ही घटना अत्यंत शरमेची, किळसवाणी आणि धक्कादायक आहे, जनता दलाच्या प्रज्ज्वल रेवण्णा या खासदारानं तब्...
-
"तुम्हाला ट्राफिक हवालदारनं पकडलंय का? तो पैसे डायरेक्ट घेत नाही, एक टपरी असते, तिथं तो पैसे द्यायला लावतो. भाजप हा ट्राफिक...
-
"आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करताना त्यांची वैविध्यपूर्ण वाटचाल डोळ...
No comments:
Post a Comment