"आज धान्याचे भाव कडाडलेत, पेट्रोल, डिझेल, गॅस ही इंधनं भडकलीत, महागाईचा आगडोंब उसळलाय, शिक्षणाचा खेळखंडोबा झालाय, महामारीनं लोकांचं कंबरडं मोडलंय, त्याला जीवन जगणं असह्य झालंय. पण त्याची कुणालाच फिकीर नाही. सत्ताधारी आणि सत्ताकांक्षी आपल्याच मस्तीत मग्न आहेत. मीडिया या दोघांनाही झुंजवण्यात मश्गुल आहेत. सुशांतसिंग, अर्णव गोस्वामी, कंगना राणावत या फालतू गोष्टींवर तांडव आरंभला होता, तो आता तसाच सुरू आहे. आता आर्यन खान, समीर वानखेडे यांची प्रकरणं हाती लागलेत. यावरच सध्या चर्चित चर्वण सुरू आहे. ड्रगपासून सुरू झालेला कल्लोळ आता हिंदू-मुस्लिम-दलित यावर सुरू झालाय. सामान्य माणसांच्या व्यथा, वेदनांना कुणीच वाली राहिलेला नाही. त्यांचं जीवन सुसह्य व्हावं यासाठी सरकार काही करताना दिसत नाही. प्रत्येक गोष्टीचा 'उत्सव' साजरा करण्यातच सारे दंग आहेत. विपन्नावस्थेतल्या सामान्यजनांकडं पाहणार कोण?"
---------------------------------------------------
*'हा*तभर घातलं अन बोटभर काढलं...!' अशारितीनं प्रधानसेवकानं पेट्रोलच्या दरात पाच रुपयांची घट केली तरीही पेट्रोलचे, डिझेलच्या दरानं शंभरी गाठलीय तर गॅस सिलिंडर हजारावर जाऊन पोहोचलाय. पूर्वी इंधनाचे भाव जरा जरी वाढले तर रस्त्यावर येऊन आंदोलन करणारेच आज सत्तेत आहेत. ते मात्र गप्पगार झालेत. सर्वच क्षेत्रात महागाईनं हातपाय पसरलेत. त्यांना आवर घालायला कुणीच पुढं येत नाहीत. उलट त्यातूनही काही ओरबडण्यात धन्यता मानणारेही दिसताहेत. महामारीच्या दणक्यानं शिक्षणाचा खेळखंडोबा झालाय. त्याच्या प्रत्येक निर्णयात धरसोडपणा केला जातोय. त्यामुळं 'नको ते शिक्षण' म्हणण्याची पाळी विद्यार्थ्यांवर आलीय. या साऱ्यांची फिकीर सत्ताधारी आणि सत्ताकांक्षी या दोघांनाही दिसत नाही. सत्ताधारी सत्ता उपभोगण्यात मदमस्त आहेत तर सत्ताकांक्षी विरोधक सत्तेविना तडफडताना दिसताहेत. त्यानं महाराष्ट्रातलं वातावरण गढूळ बनलंय. निष्ठावंत दुरावलेत, संधिसाधू, बाजारबुणग्यांनी उच्छाद मांडलाय. सत्तेचा मलिदा कसा लाटता येईल यातच सारे मग्न झालेत. कधीकाळी आपली सत्ता येईल असं स्वप्नातही न जाणवलेले कार्यकर्ते 'दीपक' चित्रांकीत केशरी ध्वज खांद्यावर घेऊन लोकनिंदेची, टिंगलटवाळीची पर्वा न करता लोकांपर्यंत जाणारे जनसंघी आज राहिलेले नाहीत. देशातच नव्हे तर आपल्या सोलापुरातला जरी विचार केला तर प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या विचारांसाठी, ध्येयासाठी झटणारी मंडळी जनता पक्षाच्या काळात उजेडात आली पण जनसंघानं जेव्हा भाजपेयीं रूप धारण केलं तेव्हापासून या निष्ठावंत जनसंघींच्या उरावर आताचे हे व्यावसायिक भाजपेयीं थयथया नाचू लागलेत. ही अवस्था केवळ इथलीच नाही तर राज्यातलीही तशीच आहे. मांडीवर घेतलेल्यांनी दत्तकांनी 'बाटग्याची बांग मोठी...!' यानुसार नुसता धुमाकूळ घातलाय. प्रवीण दरेकर, राम कदम, चित्रा वाघ, राणे पितापुत्र, गोपीनाथ पडळकर, यासारख्यांनी जनसंघ-भाजप ह्यांचं मुळं स्वरूपच उध्वस्त करून टाकलंय! माधव भांडारी, केशव उपाध्ये यासारखे निष्ठावंत प्रवक्ते शांत आहेत. भाजपेयींचा निवडणुकीनंतर हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास निसटला. त्यामुळं भाजपेयीं सैरभैर बनलेत. त्यांना कोणताच ताळतंत्र राहिलेला नाही. ते सारे बेफाम आणि बेताल झालेत. सत्ता मिळविण्यासाठी हरेक प्रयत्न करुन थकल्यानंतर चारित्र्यहनन, बदनामी, अवहेलना ही शस्त्र हाती घेऊन ही मंडळी सरसावलीत. हाती सुशांतसिंगच्या आत्महत्येचा विषय लागल्यावर ही मंडळी एवढी चवताळली की त्याला काही घरबंदच राहिला नाही यांच्या या माकडचेष्टांना केंद्र सरकारचा हातभार लागला. आत्महत्येच्या तपासाचा प्रवास भरकटत गेला. त्यातून ड्रग- अंमली पदार्थांचा विषय सुरू झाला. सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये तक्रार दाखल केली. मग केंद्रातल्या साऱ्या तपास यंत्रणा मुंबईत येऊन दाखल झाल्या. त्यांनी बॉलिवूडवर शरसंधान केलं. अनेकांना ताब्यात घेतलं, काहींना तुरुंगात डांबलं. पण हाती काहीच लागलं नाही. सुशांत गंजेडी होता, त्याच्या अब्रूचे धिंडवडे निघाले. मग त्याच्या वडिलांनीच तपास थांबवण्याची विनंती केली. मात्र भाजपेयींनी, मिडियानं या निमित्तानं महाराष्ट्राची, इथल्या सरकारची, पोलिसांची, व्यवस्थेची यथेच्छ बदनामी केली. एक वृत्तवाहिनीनं तर सुशांतच्या विषयाला हवा दिली. पाठोपाठ कंगना राणावत प्रकरण उदभवलं, त्यातही महाराष्ट्राची बदनामी करण्यात हीच मंडळी अग्रभागी होती. त्यानंतर अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटकं ठेवल्याचं प्रकरण निघालं. त्याचा तपास राहिला बाजूला त्यातून पोलिसांची १०० कोटींची वसुलीचे आरोप, हे सारं आलं. इथंही केंद्रीय तपास यंत्रणा सरसावल्या. आरोप करणारे परमसिंग फरार आहेत नि ज्यांच्यावर आरोप आहे ते देशमुखही फरार होते ते हजर झालेत. तपासाची दिशा भरकटत गेली. आता तर परमसिंगानं शपथपत्रावर १०० कोटींचा आरोपावर पुरावा नसल्याचं न्यायालयात सांगितलं! यामुळं सरकारवर आरोपाची राळ उठवणाऱ्या दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या भाजपेयीं नेत्यांची आणि त्यांच्या पिलावळीची गोची झालीय. प्रसिद्धीमाध्यमांची तर वाचाच बसलीय! आता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांच्या ड्रगचं प्रकरण बाहेर आलं. याचा तपास सुरू असतानाच समीर वानखेडेंच प्रकरण समोर आलंय. त्यात एनसीबीचे अधिकारी कशाप्रकारे राज्यात वागताहेत हे गोसावी, साईल, सॅम, ददलानी, पाटील या साऱ्यांच्या माध्यमातून लोकांसमोर आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांनी आरोपांची राळ उठवली. देवेंद्र फडणवीसांना त्यात उतरावं लागलं. मात्र 'डुकराशी कुस्ती' नको म्हणत त्यांनी माघारही घेतली आणि आपली 'शाउटिंग ब्रिगेड' यात उतरवली. ह्या साऱ्या कल्लोळानं भाजपेयींची गोची झालीय त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतलाय तर नवाब मलिक आक्रमक मूडमध्ये आलेत. पण हा कल्लोळ न्यायालयात जाऊन रखडणार असं दिसतंय!
हा ड्रग कल्लोळ उठला ते समीर वानखेडे हिंदू आहेत की मुसलमान यावरून! नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचा 'लग्नाचा दाखला- निकाहनामा' ट्विटरवरून सार्वजनिक केला. त्यांचं खरं नाव 'समीर दाऊद वानखेडे' असं असल्याचा दावा मलिक यांनी केला. तर त्यावर समीर वानखेडे म्हणाले, "मी हिंदू आहे. माझे वडीलही हिंदू आहेत. माझी आई मुस्लीम होती. पण आईवडिलांनी दोघांनी धर्म बदललेला नाही. माझ्या आईचं नाव झाहिदा होतं, तिचा २०१५ मध्ये निधन झालंय. मी धर्मनिरपेक्ष कुटुंबातून येतो!' समीरवर होणाऱ्या आरोपांचं खंडन करण्यासाठी त्यांचे वडीलही प्रसारमाध्यमांसमोर आले. त्यांनी खुलासा केला की, माझं नाव दाऊद नाही. माझं नाव ज्ञानदेव कचरुजी वानखेडे आहे. या निकाहनाम्यात समीर वानखेडेंचं नाव 'समीर दाऊद वानखेडे' असं लिहीण्यात आलंय. मग निकाहनाम्यात नाव दाऊद का? यावर त्यांनी 'प्रेमानं माझी पत्नी मला दाऊद म्हणून हाक मारायची. त्यांनी तसं नाव ठेवलं असेल!' असं विचित्र उत्तर दिलं. २००६ मध्ये समीर यांचं डॉ.शबाना कुरैशी यांच्याशी 'अरेंज मॅरेज' झालं होतं. पण १० वर्षानंतर त्यांनी २०१६ साली घटस्फोट घेतला. समीर आणि शबाना यांचा निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी म्हटलंय की, जर त्यांनी हिंदू असल्याचं मला सांगितलं असतं तर हा निकाहच झाला नसता. त्यावेळी सर्व वानखेडे कुटुंबीय हे मुसलमान होते. जर मुसलमान नसते तर शानदार निकाह झालाच नसता. मुसलमान नसते तर हे नातंच बनलं नसतं. हा निकाह लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एका हॉलमध्ये शानदार पद्धतीनं झाला होता. तसंच मेहरची रक्कम ३३ हजार होती तीही अदा केली होती, असंही त्यांनी सांगितलं. निकाहच्या वेळी २ हजार लोकं उपस्थित होते, तर विचार करा किती मोठा सोहळा झाला असेल. त्यावेळी त्यांनी समीर दाऊद वानखेडे असं नाव फॉर्मवर लिहिलं होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं समीर, त्यांचे वडील, त्यांची बहिण सर्वजण मुस्लिम आहेत, असा दावा त्यांनी केलाय. समीर वानखेडे यांच्या निमित्तानं धर्म, जात, धर्मांतर, पुन्हा आधीच्या जन्मात येणं, लग्नासाठी हिंदूंनी मुस्लिम धर्म स्विकारणं, आरक्षण मिळवणं हे मुद्दे चर्चेत आले आहेत. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. भारतीय राज्यघटना मूलभूत अधिकार म्हणून धार्मिक स्वातंत्र्याची हमी देते. कायद्यानुसार अनुसूचित जातींसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये १५ टक्के आरक्षण आहे. ही तरतूद १९५० पासूनची आहे. त्यात दोनदा दुरुस्ती करण्यात आली आहे. पहिली दुरुस्ती १९५६ मध्ये आणि दुसरी दुरुस्ती १९९० मध्ये. याअंतर्गत हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्म मानणाऱ्या व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीला अनुसूचित जातीचे सदस्य मानलं जाणार नाही. भारतीय राज्यघटनेत धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यात आलेलं नाही. मागास जातीचं आरक्षण मुस्लिमांना मिळत नाही. अनुसूचित जाती गटाचं आरक्षण फक्त हिंदू, शीख आणि बौद्ध यांच्यापुरतंच मर्यादित आहे. कोणतीही मुस्लिम व्यक्ती दलित किंवा अनुसूचित जातीच्या कोट्यातून आरक्षणाचा दावा करू शकत नाही हे स्पष्ट आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेले आरोप खरे ठरले तर समीर वानखेडे यांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागेल. एवढंच नाही तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो. आणि आजवर घेतलेल्या पगाराची वसुली केली जाऊ शकते. वधुवर दोघेही मुस्लिम असल्याशिवाय 'निकाह' होऊच शकत नाही मग वानखेडे यांनी ते मुसलमान होतो हे का दडवले? आजही ते मुसलमान असल्याचं का नाकारताहेत. समीर वानखेडे यांचे वडील जर दाऊद वानखेडे आहेत, तर समीर जन्मानंच मुस्लिम ठरतात. समीर यांची बहिण, आई, एवढंच नाही तर पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या मुलांची नावं मुस्लिम असतानाही ते मुस्लिम असल्याचं नाकारताहेत. नावावरून कुणी धर्म, जात शोधू नये, कुणी कोणतंही नाव ठेवावं. हा ज्याचा त्याचा प्रश्न; पण जेव्हा प्रश्न आरक्षणाचा आणि जातीच्या आधारे नोकरी मिळविण्याचा येतो तेव्हा हे सगळं बघावं लागतं. विशेष विवाह कायदाच्या तरतुदीनुसार त्यांच्या पहिल्या मुस्लिम बायकोकडून सहमतीनं घटस्फोट घेतला असं समीर वानखेडे यांनी स्वतः सांगितलंय त्यामुळं तिथं दाखल केलेल्या कागदपत्रांवर त्यांनी धर्म, जात काय लिहिलीय हे बघायला हवंय. समीर वानखेडे हे जन्मापासून मुस्लिम असतील आणि नंतर त्यांनी नोकरी मिळवितांना जर मागासवर्गीय असल्याचं दाखविणारं जातप्रमाणपत्र जोडलं असेल तर ती फसवणूक ठरते. असो! या प्रकरणाचा तपास सुरू आहे. समीर यांच्या खात्यांतर्गत आणि पोलिसांकडून. त्यातून जे काही निष्पन्न व्हायचं ते होईल!
प्रत्येक गोष्टीचा 'उत्सव' 'इव्हेंट' साजरा करणाऱ्या आणि सतत निवडणुकांच्या मूडमध्ये असणाऱ्या आपल्या राज्यकर्त्यांनी कोरोना महामारीच्या काळात लसीकरणात सावळागोंधळ घातला होता. लस केंद्र सरकार देणार की, राज्य सरकार? विकत की मोफत देणार! हा लसीकरणाचा चालवलेला खेळखंडोबा कोर्टानं रोखल्यानंतर लस उपलब्ध करून देण्याची तसदी सरकारनं घेतली होती. आता देशात १०० कोटी लस दिल्याचा 'उत्सव' साजरा केला. प्रधानमंत्र्यांनी आपली पाठ थोपटून घेतली. मग दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या भक्तांनी 'मोदी हैं तो मुमकीन हैं।' म्हणत त्याचीच री ओढली. दिखाऊ कार्यक्रम झाले. देशात १३५ कोटी लोकसंख्या आहे. प्रत्येकी दोन म्हणजे २७० कोटी लसीच्या मात्रा-डोस द्यावे लागणार आहेत अशावेळी १०० कोटी दिल्याचा एवढा डंका का पिटला जातोय? अद्यापही १७० कोटी लसीच्या मात्रा देणे बाकी आहेत. पण सध्या सगळीकडं १०० कोटींचा बोलबाला आहे. वसुली असो की, अब्रूनुकसानी त्यासाठी १०० कोटीचाच दावा केला जातो. त्यामुळं १०० कोटी लसीच्या मात्रा दिल्याचा गवगवा केला जातोय. आजवर आपण केवळ कोव्हीशिल्डवरच अवलंबून आहोत. कोव्हक्सीनला जागतिक आरोग्य संघटनेनं मान्यता दिलेली नव्हती ती आताशी कुठं मिळतेय. जागतिक आरोग्य संघटनेनं कोविडसाठीचा ज्या आठ लसींना मान्यता दिलीय त्यापैकी कोणत्या आपण मागवल्यात? याचं उत्तर नाही असंच आहे. असं असतांना उत्सव साजरा करून लोकांना भुलविलं जातंय, कारण आता पाच राज्याच्या निवडणुका आल्या आहेत. त्यासाठीची ही सारी खटपट! बिहारच्या निवडणुकीत सुशांतचा वापर केला होता. बिहारी सुशांतच्या न्याय हवाय अशी पोस्टर्स लावली गेली होती. आज समीर वानखेडे प्रकरणाच्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम असा वाद उभा केला जातोय तो प्रामुख्यानं उत्तरप्रदेशात होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं. त्यामुळंच समीर यांची बाजू घेत भाजपेयीं खिंड लढवीत आहेत.
'कोणत्याही समाजाची धारणा व्यवस्थित व्हावी, त्याचा योगक्षेम नीट चालावा त्याची उन्नती व्हावी यासाठी त्यातल्या धुरिणांनी वेळोवेळी काही तत्त्वं मनाशी निश्चित करून त्याअन्वये काही नियम, काही शासनं सांगितलेली असतात. त्या शासनांच्या मागची जी तत्त्वं, त्याचा जो मूळ हेतू त्याकडं लक्ष ठेवून जोपर्यंत समाज त्यांचं पालन करीत असतो तोपर्यंत ती फलदायी होतात. समाजाच्या धारणपोषणाला, रक्षणाला अभ्युदयाला त्याचं सहाय्य होतं. पण कालांतरानं स्वार्थामुळं, मोहामुळं, अज्ञानामुळं, आळसामुळं, श्रद्धाशून्यतेमुळं त्या मुलतत्त्वांचा विसर पडून समाज त्या शासनाच्या केवळ जडस्वरूपाचा उपासक बनतो. तो फक्त त्याची चौकट, त्याचा सांगाडा, त्याचं बाह्यरूपच तेवढं जाणतो. अंतरीचं तत्व, त्याचा आत्मा तो जाणीत नाही. नारळाची नरोटीच फक्त त्याला दिसते. ज्यातलं खोबरं नेलं, ते नासलं तरी त्याच्या ध्यानातच येत नाही. तो फक्त नरोटीची उपासना करीत असतो, पण त्याची श्रद्धा मात्र अशी असते की, आपण श्रीची उपासना करीत आहोत. समाजाचा अधःपात इथूनच सुरू होतो. धर्म, विद्या, नीती, राजकारण, समाजव्यवस्था या प्रत्येक क्षेत्रात जेव्हा जेव्हा बाह्य, जड रूपावर, केवळ कर्मठ आचारांवर टिळे, टोपी, गंधमाळेवर, यांत्रिक कसरतीवर समाज आपलं लक्ष केंद्रित करतो त्यावेळी त्या त्या संस्थेचा ऱ्हास होऊ लागतो आणि सर्वच क्षेत्रात नरोटीची उपासना सुरू झाली की, एकंदर समाज रसातळाला जातो!' आपल्या 'नरोटीची उपासना' या लेखात डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केलेले हे विचार आज मला आठवत आहेत.
हरीश केंची,
९४२२३१०६०९
Subscribe to:
Post Comments (Atom)
वंदे मातरम..! वंदे मातरम...!!
"वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला शतकोत्तर सुवर्णमहोत्सव निमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहात त्यावर चर्चा घडवून आणली गेली. या ...
-
"भारतीय राजकारणाला एक घातक वळण लागलंय. निवडणुका जिंकण्यासाठी लोकांवर फुकटच्या रेवड्या उधळल्या तर सत्ता लाभते हा प्रवाद आता ...
-
"माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 'अवस्था ना घरका ना घाट का' अशी झालीय. त्यांना सहनही होत नाही अन् सांगताही येत न...
-
"पुण्यात जातीअंतासाठी लोक 'एकता मिसळ'च्या माध्यमातून एकत्र येत असताना ब्राह्मण महिलांनी 'जय परशुरामा'च्या घ...
No comments:
Post a Comment