Friday, 26 November 2021

स्वातंत्र्य मिळवलं की, ब्रिटिशांनी दिलं...!

"पद्मश्री पुरस्कारानं गौरवल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत यांनी जे काही स्वातंत्र्याबाबत काढलेले निंदाजनक उदगार; त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते यांनी तिचीच री ओढत केलेले शब्दतांडव यानं चर्चेला उधाण आणलं. स्वातंत्र्यलढ्यासारखा अभिमानास्पद विषय त्यासाठी वापरलेला 'भीक'सारखा शब्दप्रयोग हे अधिक तिरस्करणीय आहे. त्याचा निषेध व्हायलाच हवाय. पण वस्तुस्थितीही समजून घ्यायला हवीय. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांची झालेली जर्जर अर्थव्यवस्था, राज्य चालविण्यात येत असलेल्या अडचणी, गांधीजींचं भारत छोडो सारखं असहकाराचं आंदोलन, त्यातच सुभाषबाबूंनी देशाबाहेरून आणि सावरकरांनी देशातल्या सैनिकांमध्ये उठाव करण्याचा प्रयत्न, हे स्वातंत्र्यप्राप्तीची प्रमुख कारणं आहेत. हे समजून घ्यायला हवंय. त्यामुळं आपल्याला इंग्रजांनी स्वातंत्र्य दिलं की आपण ते मिळवलं हे समजेल!"
--------------------------------------------------

*भा* रतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाची चर्चा घडवून आणण्याचा हक्क कंगना राणावत, विक्रम गोखले यांनाच नव्हे तर देशातल्या सर्वांना जरूर आहे, पण त्यासाठी त्यांच्या 'भीक'सारखा अपमानास्पद शब्दप्रयोग करण्याला कदापिही सहन करता कामा नये. गांधीजी आणि त्यांच्या आंदोलनाला सुनियोजितरित्या पुसून टाकण्याचा अश्लाघ्य प्रयत्न सध्या काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जातोय. आपल्याला मिळालेल्या पद्मश्री सन्मानानंतर दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री कंगना राणावत हिनं 'भारताला १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र्य हे ब्रिटिशांकडून 'भीक' म्हणून मिळालं तर खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळालंय ...!' असं म्हटल्यानं नवा वाद निर्माण झालाय. महात्मा गांधी, सरदार पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून अहिंसक आंदोलनाशी जोडल्या गेलेल्या स्वातंत्र्य संग्रामात आपलं सारं जीवन अर्पण करणाऱ्या असंख्य आंदोलनकर्त्यांचा, स्वातंत्र्यलढ्यातील योद्ध्यांचा हा अपमान आहे याबाबत दुमत असण्याचं काही कारण नाही. 'खरं स्वातंत्र्य २०१४ नंतर अस्तित्वात आल्याचं कंगनानं म्हटल्यावर प्रधानमंत्र्यांना देखील मनोमन वाटलं असेल की, 'हे जरा अतीच होतंय!' १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातल्या आणि ब्रिटनमधल्या इतिहासकारांनी दस्तऐवज म्हणून अशी काही पुस्तकं, संशोधन आणि मुलाखती दिल्या आहेत ज्यातून हे स्पष्ट होतं की, १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला मिळालेलं स्वातंत्र्य इंग्रजांनी केवळ गांधीजींच्या नेतृत्वाखाली चाललेल्या 'भारत छोडो' आंदोलनासमोर झुकून स्वातंत्र्य दिलेलं नाही, तर त्याला इतरही काही कारणं होती. कंगनानं 'भीक' सारखा असभ्य शब्दाचा वापर करणं हे काही शोभा देणारं नव्हतं. पण जेव्हा इंग्रजांना असं वाटू लागलं की, आता भारत देश हा आमच्यासाठी एक ओझं बनलाय, आर्थिकदृष्ट्या भारतातलं प्रशासन चालवणं हे परवडणारं नाही. शिवाय इंग्रजांच्या लष्करात अगदी खालच्या स्तरावरच्या भारतीय शिपायांवर कुणाचंच नियंत्रण राहिलं नाही. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून बाहेरून भारतावर आक्रमण करण्यासाठीची जुळवाजुळव सुरू केली होती. सावरकरांनी लष्करात भरती होण्याचं आवाहन लोकांना केलं, त्यासाठी अनेक ठिकाणी भरती केंद्र सुरू केली. मूठभर इंग्रज भारतीय लोकांच्या लष्करानेच आपल्यावर राज्य करीत आहेत. अशा भारतीय लष्कराच्या माध्यमातून उठाव झाला तर इंग्रजांना इथं राहणं शक्य होणार नाही, ही भूमिका सावरकरांनी घेतली होती. आणि तसंच काहीसं घडू लागलं होतं. इंग्रजांना यापुढंच्या काळात इथं राज्य करणं शक्य होणार नाही. तेव्हा त्यांना भारतातून निघून जाण्याचा निर्णय घ्यावा असं वाटू लागलं. अशा काही ऐतिहासिक घडामोडींची एक शृंखला इंग्रजांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातली जोडली यातली एक कडी ही गांधीजींच्या अहिंसक आंदोलनाचीही होती. पण याशिवायच्या इतर अनेक कड्या काळाच्या ओघात पडद्याआड टाकल्या गेल्या.

डॉ. सुस्मितकुमार यांनी अमेरिकेच्या बुकसर्ज द्वारा एक संशोधनात्मक पुस्तक प्रकाशित केलंय. भारतीय स्वातंत्र्य आणि त्यापूर्वी घडलेल्या घडामोडी याचा यात अभ्यास केला आहे. हिटलरनं दुसऱ्या जागतिक महायुद्धाला जन्म दिलाय आणि जर्मनीनं ब्रिटनला आव्हान दिलं. या युद्धात ब्रिटन आणि फ्रान्स या देशांची अर्थव्यवस्था अडचणीत आली होती. महायुद्ध संपल्यानंतर ब्रिटनला पुन्हा आपल्या देशाला उभं कसं करावं याची चिंता लागून होती. शिवाय ज्या ज्या देशांवर इंग्रजांचं राज्य होतं ते देश सांभाळणं त्यांना अडचणीचं ठरू लागलं होतं. या देशांना जितकं म्हणून पिळून काढता येईल तेवढं त्यांनी पिळलं होतं. तिथली साधनसंपत्ती लुटली होती. याला लुटच म्हणावं लागेल. इंग्रजांनी भारताचा अमूल्य असा नागरी आणि नैसर्गिक खजिना लुटला होता आणि तो ब्रिटनमध्ये नेऊन ठेवला होता. शतकाहून अधिक काळ ज्या देशांवर इंग्रजांनी आपलं साम्राज्य स्थापन केलं होतं तिथं असंतोष निर्माण होणं स्वाभाविक होतं. काही देशात तर विस्फोटक वातावरण निर्माण झालं होतं. त्याचे चटके साम्राज्यवादी ब्रिटिश सरकारला बसू लागले होते. ज्या सैन्याच्या बळावर जगावर साम्राज्य निर्माण केलं होतं, तिथं त्यांचा पगार देण्याची स्थिती इंग्रजांमध्ये राहिलेली नव्हती. भारतालाच नव्हे तर १९४५ नंतर ब्रिटिश सरकारनं ही अवघड जागेची दुखणी दूर करण्याचा निर्णय घेतला आणि एक एक करत ब्रिटिशांच्या अंमलाखाली छोट्या छोट्या देशांना त्यांनी स्वातंत्र्य बहाल केलं आणि आपलीही सुटका करून घेतली. डॉ. सुस्मितकुमार यांच्या म्हणण्यानुसार "भारताला जे स्वातंत्र्य मिळालं ते हिटलरमुळं मिळालंय! दुसऱ्या महायुद्धानंतर जर्जर झालेल्या ब्रिटिशांनी आपल्या साम्राज्याला तिलांजली देत जॉर्डनला १९४५, पॅलेस्टाइन आणि म्यानमारला १९४८, इजिप्त १९५२, आणि मलेशिया १९५७ इथं इथला गाशा गुंडाळला. फ्रान्सचीही अशीच अवस्था होती. त्यांनी १९४९ मध्ये लाओसला आणि १९५३ मध्ये कंबोडिया आणि १९५४ मध्ये व्हिएतनाम मधलं आपलं वर्चस्व संपवलं. तशाचप्रकारे नेदरलँड त्यांच्या डच ईस्ट इंडिज कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशात आपलं बस्तान बांधलं होतं. १९४९ मध्ये त्यांनी इंडोनेशियाचा किनारा सोडला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताला स्वातंत्र्य हे गांधीजी आणि त्यांच्या इतर नेत्यांनी मिळवलं हे इथल्या लोकांवर बिंबवलं गेलं. भारताशिवाय ब्रिटनच्या अधिपत्याखाली असलेल्या ६५ देशातल्या कुणीही असा दावा केलेला नाही की, आमच्या देशातल्या कोणत्याही नेत्यानं वा क्रांतिकारकांनी ब्रिटीशाविरोधात आंदोलनं केली होती ज्यामुळं ब्रिटिशांना आम्हाला स्वतंत्र करण्याची गरज भासली. या कोणत्याही देशांमध्यें अशाप्रकारच्या कोणत्याही स्वातंत्र्यलढ्याचा इतिहासही नाही. तेव्हा असं म्हणावं लागेल की, दुसरं महायुद्ध झालं नसतं तर किमान आणखी ३०-४० वर्षं तरी ब्रिटिशांनी आपल्या साम्राज्याला आवरतं घेतलं नसतं!"

ब्रिटिश इतिहासकार पी.जे.केईन आणि ए.जे.हॉपकिन्स यांनी असं नोंदवलं आहे की, दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनची आर्थिक स्थिती कमकुवत झालेली होती. अशी आर्थिकदृष्ट्या निर्माण झालेली आणीबाणी यामुळं त्यांच्यात हुकूमत गाजविण्याची इच्छाच शिल्लक राहिली नव्हती. भारतातल्या इंग्रजांच्या सैन्यबळात ७० टक्क्यांहून अधिक भारतीय होते त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली होती. बंड करण्याची मानसिकता त्यांच्यात बळावली होती. १९४५ मध्ये भारताच्या नौदलातल्या सैनिकांनी खुलेआम बंड केल्यानं ब्रिटीश हादरुन गेले होते. १९४५ मध्ये व्हाईसरॉय व्हावेल यांनी एक संदेश पाठवला की, 'भारतात आता प्रशासकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि सैन्यबळावर अंकुश ठेऊन राज्य करणं व्यवहार्य वाटत नाही!' एकाही इंग्रज व्हाईसरॉयनं वा इतिहासकारानं स्वातंत्र्यलढ्यासमोर आपण लाचार आहोत असं कधीही, कुठंही उल्लेख केलेला नाही. त्यामुळं दुसरं महायुद्ध झालं नसतं तर ब्रिटिशांनी इथली सत्ता सोडली नसती. ब्रिटिशांविरोधातलं गांधीजींचं आंदोलन जसं तीन दशकं इंग्रजांनी चालू दिलं होतं तसंच आणखी काही दशकं ते चालू राहिलं असतं. डॉ.सुस्मित कुमार लिहितात की, '१९४० नंतर गांधीजींची लोकप्रियता आणि प्रभाव घटत होता. इंग्रज आणखी पाच-सात वर्षे जरी भारतात राहते तर त्यांच्या पूर्वीच्या पिढीतले स्वातंत्र्यसेनानी न्यायमूर्ती गोखले, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, मोतीलाल नेहरू, दादाभाई नवरोजी, चित्तरंजन दास यासारख्यासोबत गांधीजींचं नाव इतिहासात नोंदवलं गेलं असतं. पण स्वातंत्र्याचा अहिंसक लढा त्यानंतर 'भारत छोडो' सूत्रानुसार सुरूच होता त्यामुळं तत्कालीन नेते हे 'आमचंच यश आहे!' असं स्थापित करण्यात इतिहास आणि लोकांवर बिंबवण्यात यशस्वी ठरले. 'ज्यांच्या हाती सत्ता, त्यांच्याच हातात इतिहास!' या नितीप्रमाणे इतिहास लिहिला गेला. ब्रिटिशांनी भारताच्या सीमा नक्की केल्या, नकाशा बनवला आणि सर्व ताकतीनं भारताची फाळणी केली आणि हस्तांतराचा मसुदा, दस्तऐवज देखील त्यांनीच तयार केला. या साऱ्या बाबी लक्षांत घेता ब्रिटिशांनी आपल्या शर्ती, दुष्ट मानसिकता आणि आपल्या सोयीनुसार भारत सोडला. गांधीजी आणि कॉंग्रेसी नेत्यांनी ब्रिटिशांना भारत २६ जानेवारी रोजी स्वतंत्र व्हावा अशी इच्छा व्यक्त केली होती. कारण त्यादिवशी भारतानं १९३० मध्ये इंग्रजांच्याविरोधात 'पूर्ण स्वराज्या' संकल्प केला होता. पण लॉर्ड माउंटबॅटन यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस १५ ऑगस्टला जपाननं शरणागती स्वीकारली होती. त्या घटनेची स्मृती जागी राहावी म्हणून भारतीयांची मनीषा धुडकावून १५ ऑगस्ट हाच दिवस नक्की केला. त्यावेळी अशी अनेक कारणं सांगितली जात होती की, इंग्रजांना इथं राहणं नकोसं वाटत होतं. भारतीयांपासून त्यांना मुक्ती हवी होती. असं काहीही असलं तरी असं वातावरण तयार होण्यासाठी दुसरं महायुद्धच जबाबदार ठरलं होतं! भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा क्लेमेट एटली ब्रिटनचे प्रधानमंत्री होते. त्यांनी त्यावेळी आश्चर्यकारक अशी प्रतिक्रिया दिली होती. 'भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात गांधीजींच्या अहिंसक आंदोलनाचा तिळमात्र प्रभाव नाही!' रमेशचंद्र मुझुमदार लिखित 'हिस्ट्री ऑफ बंगाल'च्या प्रस्तावनेत पश्चिम बंगालचे जस्टीस पी.सी.चक्रवर्ती जे तत्कालीन हंगामी राज्यपाल देखील होते, त्यांनी लिहिलंय की, लॉर्ड एटली भारताला स्वातंत्र्य देण्याच्या प्रक्रिया दरम्यान दोन दिवस कलकत्त्याच्या गव्हर्नर पॅलेसमध्ये १९४५ च्या दरम्यान मुक्कामाला होते. त्याच्याशी बोलताना मी त्यांना थेट सवाल केला की, गांधीजींच्या नेतृत्वाखालील 'भारत छोडो' आंदोलन खूपच मंदावलेलं आहे त्यामुळं भारत सोडण्याची कोणत्याही प्रकारची गरज नाही तरीही तुम्ही हा निर्णय का घेत आहात? लॉर्ड एटली यांनी दुसऱ्या महायुद्धाचा उल्लेख केला. भारतीय सेना त्यातही नौसेनेतल्या सैनिकांमध्ये अस्वस्थता आहे, ते बंड करायच्या मानसिकतेत आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश सैन्याला इथं आणून हिंसक वातावरण तयार होऊ नये अशी आमची इच्छा आहे. जरी आम्ही ब्रिटिश सैन्य इथं आणलं तरीही सुभाषचंद्र बोस यांच्या गुप्त हालचाली आणि त्यांचा असलेला प्रभाव भारतीय नागरिक आणि विशेषतः ब्रिटिश सेनेत कार्यरत भारतीय सैनिकांच्या मानसिकतेवर पडलेला होता. आता आम्हाला याबाबत संघर्ष करायची, सैन्याची जुळवाजुळव करण्याची आणि त्यासाठीचा मोठा खर्च करणं परवडणारं नाही. त्यानंतर एटलींना विचारलं की, भारत सोडण्याचा इंग्रजांचा निर्णयात गांधीजींचा आणि त्यांच्या आंदोलनाचा प्रभाव किती आहे? यावर छद्मी हास्य करत हळूच आपले ओठ दाबत म्हणाले की, 'मी...नी...म...ल...! अर्थात खूप खूप कमी प्रमाणात!

सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यासाठीची त्यांची रणनीती देशभक्तांनाच नव्हे तर काँग्रेसच्या नेत्यांनाही प्रभावित करत होती. इंग्रजांनाही हे ऑन रेकॉर्ड मान्य केलं होतं की, सुभाषचंद्र बोस यांचं नेतृत्व, दृष्टिकोन त्याचबरोबर इंडियन सिव्हिल सर्व्हिससाठी आवश्यक अशी कार्यक्षमता होती. त्यामुळं इंग्रजांचा बोस यांना विरोध होता तर गांधीजी ब्रिटिशराज लांबविण्यासाठी सोयीचे वाटत होते. १९२१ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी गांधीजींना विचारलं होतं की, 'तुम्ही कशाप्रकारे भारताला स्वातंत्र्य घेऊन देऊ शकता?' गांधीजींनी त्यावेळी जे काही उत्तर दिलं त्यानं सुभाषबाबू नाराज झाले, कारण गांधीजींकडं स्वातंत्र्यप्राप्तीसाठी कोणतीच निश्चित अशी योजना नव्हती. भारतीय लोकांनाही हे कळून चुकलं होतं. म्हणूनच १९३८ मध्ये काँग्रेस पक्षाध्यक्ष म्हणून सुभाषबाबू निवडून आले जाते. त्यानंतरही दुसऱ्यांदा त्यांना काँग्रेस पक्षाध्यक्ष म्हणून निवडण्याची काँग्रेसच्या नेत्यांची तयारी होती. दुसऱ्या कार्यकाळासाठी जलद नागरिक असहकार आंदोलन आणि इतर आंदोलनाची रूपरेषा आखण्यात आली होती. गांधीजींना मात्र सुभाषबाबू पुन्हा पक्षाचे अध्यक्ष व्हावेत हे मान्य नव्हतं म्हणून त्यांनी मग अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपले अनुयायी सीतारामय्या यांचं नाव जाहीर केलं. गांधीजींचे उमेदवार असतानाही सीतारामय्या यांचा तेव्हा पराभव झाला. गांधीजी निराश झाले आणि त्यांनी उद्वेगानं म्हटलं की, 'सीतारामय्या यांचा पराभव त्यांचा पराभव नाही तर तो माझा पराभव आहे!' त्यामुळं सुभाषबाबूंना दुसऱ्या कार्यकाळात गांधीजींच्या भक्तांनी अनेक अडथळे, अडचणी आणल्या. त्यामुळं वैतागून सुभाषबाबूंनी राजीनामा दिला. अरविंद घोष यांनी या साऱ्या घटनांवर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, 'गांधीजी हे हिटलरसारखे नाहीत तर स्टॅलिनसारखे सरमुखत्यार आहेत. ते त्यांचे प्रस्ताव, निर्णय, आणि आपल्याला हवं ते पक्षाच्या घटनात्मक निर्णयापूर्वीच नक्की करत असत आणि ते पक्षावर लादत असत. लोकांना बाहेर जे काही दिसतं तशी लोकशाही गांधीजींच्या प्रभावाखाली शक्य नव्हती. ब्रिटिशांशी चर्चेसाठी ते आणि त्यांनी ठरवलेले नेतेच सहभागी होत असत. इतरांना इथं हस्तक्षेप करण्याला स्थानच नव्हतं. देशाचे पहिले प्रधानमंत्री म्हणून सरदार पटेलांना बहुमताच्या पसंती होती पण गांधीजींनी त्यांचं नाव त्यांना मागे घ्यायला लावलं होतं. या घटनेवरून अरविंद घोष जे म्हणतात त्याला पुष्टी मिळते. सुभाषबाबू आणि त्यांच्या हालचाली, त्यांच्याकडं पाहण्याचा भारतातल्या लोकांचा आणि सैन्याचा बदललेला दृष्टिकोन, दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटन आणखी बिकट आर्थिक अवस्थेत जात असल्याचं दिसत होतं. हिटलरनं दुसऱ्या महायुद्धाला प्रारंभ केला नसता तर भारताला १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं असतं का? इंग्रजांनी आपल्या अधिपत्याखालील ५४ देशांतून कोणत्याही प्रकारचं आंदोलन वा उठाव झाला नसतानाही काढता पाय घेतला होता. त्याप्रमाणेच इंग्रजांची इच्छा आणि त्यांनी नियोजित केलेल्या दिवशीच भारताच्या स्वातंत्र्याची प्रक्रिया सुरू केली होती गांधीजी आणि सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात कायम मुख्य केंद्रस्थानी राहतील.

या लेखातून महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या योगदानाला कमी लेखण्याचा उद्देश नाही, पण भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास लिहिणाऱ्यांनी कोणती दुसरी बाजू लिहिलीय हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. देशातला एक मोठा वर्ग अशाप्रकारच्या इतिहासातून गांधीजींना सुनियोजितरित्या बदनाम करण्याचं षडयंत्र करत असल्याचं दिसून येतंय. गांधीजींचा सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांच्यातील परस्पर संबंध शिवाय भगतसिंग यांच्या फाशीच्या प्रकरणात गांधीजींकडून खास प्रयत्न झाले नाहीत असा वाद निर्माण करताहेत. गांधीजींच्या समर्थकांच्या मते इंग्रजांचे प्रमुख लॉर्ड एटली यांच्या प्रतिक्रिया खऱ्या असतील तर त्यांचा कोणताही पुरावा दिसत नाही. 'गांधीजी आणि त्यांच्या आंदोलनाचा आमच्यावर कणमात्र प्रभाव नव्हता. सुभाषचंद्र बोस यांनी देशाबाहेर चालवलेली आझाद हिंद सेनेची जुळवाजुळव आणि इंग्रजांच्या अधिपत्याखालील भारतीय सैनिकांनी सुरू केलेल्या उठावाच्या चर्चेनं आम्ही अधिक चिंतीत बनलो होतो. त्यामुळं भारताला स्वातंत्र्य देण्याच्या प्रयत्नाला प्रारंभ झाला होता...!' असं लॉर्ड एटली यांचं म्हणणं होतं. अशाप्रकारे पुस्तकातून मृत व्यक्तींच्या नावानं नोंदवलेले संवाद वा प्रतिक्रिया नमूद केलेल्या असतात. पण एक मात्र निश्चित की, जसजशी वर्षे उलटताहेत तसतसे गांधीजींची प्रतिमा अतुलनीय आणि जगासाठी प्रेरणादायी प्रतिभा म्हणून अधिकाधिक उजळून निघतेय.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...