Saturday, 23 October 2021

देवाभाऊ, जरा दमानं घ्या.....!

"महाराष्ट्रात विरोधीपक्षनेत्यांची एक मोठी परंपरा आहे. भाजपतही रामभाऊ म्हाळगी ते एकनाथ खडसे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी तत्कालीन सरकारांना वेठीला धरलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनीही आमदार म्हणून चांगलं काम केलेलं आहे; पण जिंकूनही हरल्यानंतर आणि पहाटेचा शपथविधी फसल्यानंतर विरोधीपक्षनेता म्हणून ते अधिकच वैफल्यग्रस्त झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळं आता आक्रस्ताळीपणा, आकांडतांडव आणि आततायीपणा हा त्यांचा जणू स्थायीभाव बनलाय. सत्तेसाठी ते आतुर बनलेत, आसुसलेत असं दिसून येतंय. गेल्या ४० वर्षात देवेंद्र फडणवीस हे असे मुख्यमंत्री होते ज्यांनी आपला पांच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलाय. त्यानंतर हातातली राज्याची सत्ता गेली असली तरी त्यांनी राज्यातला भारतीय जनता पक्ष आपल्या ताब्यात ठेवलाय. त्यांचं राजकारण कसं आणि काय होतं. त्यांच्यासमोर असलेल्या आव्हानांना ते कसे सामोरं गेले. त्यांच्या स्वभावातली वैशिष्ठ्ये, त्यांच्या राजकीय चाली, मित्रपक्ष आणि विरोधीपक्षांशी त्यांचं असलेलं नातं, त्यांच्याशी संघर्ष आणि त्यावर केलेली मात ह्या साऱ्या बाबी आणि वास्तव लक्षांत घेऊन भाजपनं सक्षम विरोधीपक्ष म्हणून काम करावं. सरकार पाडण्याचा प्रयत्नानं तिन्ही पक्ष अधिकच जवळ येताहेत. घट्ट बनताहेत तेव्हा देवाभाऊ, जरा दमानं घ्या.....!"
-------------------------------------------------------

नशिबानं दिलं आणि कर्मानं नेलं अशी अवस्था देवेंद्र फडणवीस यांची झाली. कालपर्यंत एक अभ्यासू आमदार म्हणून नावाजले गेलेले फडणवीस सत्ता हाती येताच बावचळल्यासारखे वागू लागले. आपल्याच पक्षातल्या सहकाऱ्यांचं राजकीय कारकीर्द संपवायला लागले. इतर पक्षातल्या आयारामांना आणून सहकारी नेत्यांवर कुरघोडी करू लागले. साहजिकच पक्षांतर्गत नाराजी निर्माण झाली. खडसे, मुंडे, तावडे, शेलार यांना शह देण्याचा प्रयत्न होतोय, तर प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चित्रा वाघ, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, राम कदम अशा खुज्या नेत्यांना महत्व प्राप्त करून दिलं. 'बाटग्याची बांग....!' याप्रमाणे ही मंडळी उधळली आहेत. ताळतंत्र सोडून बोलू-वागू लागले आहेत. संस्कारक्षम, साधनसुचितेतल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना हे आवडत नसल्यानं ते फडणवीस यांच्यावर नाराज झाले आहेत. सत्तेच्या अमिषानं आलेल्यांची तर गोची झालीय. 'धरलं तर चावतंय अन सोडलं तर पळतंय' अशी अवस्था झालीय. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय! पक्षाच्या निष्ठावान कार्यकत्यांची अवस्था तर 'सहनही होत नाही अन सांगताही येत नाही अशी स्थिती बनलीय. एवढं सारं घडत असतानाही सत्तेसाठी फडणवीसांची तडफड काही कमी होत नाही. त्यामुळं लोकांच्या मनातली त्यांची प्रतिमा डागळतेय! लहानपणी विटी-दांडूचा खेळ खेळताना मुलांची हार-जीत होते. जिंकलेल्यांचा उत्साह अनावर असतो, तर हरलेले मात्र हिरमुसलेले असतात. त्यातील काहींना विजयी पक्षानं आपली फसवणूक करून विजय मिळवला असं वाटत असतं. त्यामुळंच झालेल्या पराभवाचा सूड उगवला पाहिजे म्हणून ते दात ओठ खात असतात. त्यातूनच मग ते विटी पळव, दांडू पळव अशा युक्त्या योजून विजयी पक्षाला जेरीस आणण्याचे प्रयत्न करीत असतात. यात काही फार नविन आहे असं नाही. शेवटी बालपणच ते. पराभव पचवण्याची क्षमता या वयात आलेली नसते. म्हणून मग कुठले तरी सुड घेऊ प्रयत्न सुरू होतात. २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळालेलं असतांनाही शिवसेनेनं भाजपेयींना बाजूला ठेवीत कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या सहकार्यानं सरकार स्थापन केलं. या घटनेचा आपल्याला राग आला आणि आपण, पक्ष कार्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केलं, असं फडणवीस यांचं म्हणणं. त्यांचं हे विधान थेट त्या विटी-दांडूच्या खेळासारखंच म्हणावं लागेल. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातील राजकारण हे असं निवडक लोकाच्या राग- लोभावर चालणार असेल तर महाराष्ट्राचं यापुढं काही खरं नाही! त्यातल्या त्यात फडणवीस यांच्यासारखे लोक जर राजकीय आघाडी सांभाळणार असतील तर निश्चितच असंच म्हणावं लागेल. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे नशिबवान नेते. राजकारणासारख्या निसरड्या क्षेत्रात एखाद्या तरूण माणसाला एखादं घबाड हाती लागावं, ज्याची आयुष्यात कधी अपेक्षा ठेवली नाही एवढं मोठं पद मिळावं, पक्षश्रेष्ठींचा संपूर्ण पाठिंबा मिळावा, पक्षांतर्गत कुठलीही स्पर्धाच असू नये आणि राजकारणाचे सारे मैदान मोकळं मिळावं असं त्यांचं नशिब थोर! स्वत:च्या बुलेट ट्रेनच्या स्पीडनं धावणाऱ्या पक्षाला पुरेसं बहुमत मिळालेलं नसलं तरी युती पक्षाच्या भरवशावर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. दुसऱ्या कार्यकाळासाठी निवडणुकीला सामोरं गेले तेंव्हा येणारं पुढचं राजकारण आपली आतापर्यंतची राजकीय कारकीर्द झाकोळून टाकणार आहे, हे त्यांच्या गावीही नसावं. पण पाच वर्षे त्यांनी जो एक हाती कारभार केला आणि केवळ दिल्लीश्वरांच्या मर्जीनं राज्याचा गाडा हाकलला तोच एककल्ली कारभार फडणवीस यांच्या अंगलट आला. त्यांचा वारू चौफेर उधळला होता. महाराष्ट्रातील बडे बडे नेते मंत्रालयातील सत्तेचं तीव्र केंद्रीकरण उघड्या डोळ्यांनी पहात होते. या पाच वर्षांच्या कारकिर्दीत फडणवीस यांनी एककल्ली कारभार तर केलाच. पण, पक्षात त्यांच्यासमोर आव्हान देऊन उभं करण्याची क्षमता असणाऱ्या नाथाभाऊंना त्यांनी घरी बसवलं. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मधले जे कुणी गळाला लागू शकणार होते त्यांना येन केन प्रकारेण भाजपेयीं करून घेण्यात आलं. ही सारी स्पर्धाच संपुष्टात आल्यानंतर फडणवीस जणू हवेत उडायला लागले. शासन प्रशासन ठप्प झालं. गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील किंवा विनोद तावडे आणि मंत्रिमंडळातील इतर सारेच मंत्री जणू काही आपण सारे राजकारणामृत जन्मत:च कोळून प्यायलो आहोत, या पध्दतीनं राज्यभर संचार करू लागले. ज्यांची कधी आपल्या मतदार संघात निवडून येण्याची पात्रता नव्हती ते थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधींवरही हल्ले बोलू लागले. हे सारं करत असतांना लोक आपल्या वर्तणुकीवर नजर ठेवून आहेत याचा विसर त्यांना पडला. राज्यातली ही एकहाती सत्ता केवळ आपली नसून शिवसेनेच्या जोरावर आहे हे धरातलावरचं पूर्ण सत्य ते विसरले!

महाराष्ट्रात शरद पवार नावाची एक राजकीय संस्था आहे हे तर जणू त्यांच्या ध्यानी मनीही नव्हतं. उलट लोक ज्यांना त्यांच्या जाणतेपणाकरिता ओळखतात, ज्यांना ' जाणता राजा' म्हणतात हे सत्य देखील ते खोडून काढायला निघाले. उलट ' शरद पवार यांचे राजकारण आता संपले आहे ' अशी दर्पोक्तीही मिरवली गेली. महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाचं प्राबल्य मोठं आहे हे कोण जाणत नाही? कोण मानत नाही? सारेच मानतात. पण, रेशिमबागेला पवारांचा कायम दुस्वास. त्यांना हरविण्यासाठी इतर ओबीसींना संघटित करून आपण मराठ्यांचा कायम बंदोबस्त करू शकू असे हिशेब रंगले. बुध्दिबळाच्या पटावरून 'जाणता राजा' हटविण्याचा प्रयत्न झाला. राजकारणातली एक खेळी म्हणून एका जाणत्या राजाऐवजी थेट छत्रपतींच्या घराण्यातील दोन-दोन राजांसाठी पायघड्या अंथरण्यात आल्या. संभाजीराजे असोत, की उदयनराजे, छत्रपतींचे वंशज म्हणून त्यांचा सन्मान मोठा. पण, गडचिरोलीपासून गुहागरपर्यंतच्या महाराष्ट्रातल्या राजकारणात हे दोन्ही राजे कधीही नव्हते. छत्रपतींचा सन्मान वेगळा आणि गावकीचं, तळा-गाळातलं राजकारण वेगळं हे समीकरण बुध्दिबळाच्या पटावर न दिसणारं. सारं राजकारण मलमपट्टीचं. असं कुठं राजकारण होत असतं? मराठासमाज राजकीयदृष्ट्या जागरूक. हे फोडाफोडीचं राजकारण डोळ्यांदेखत पाहिलं जात होतं. पण सत्तेपुढं शहाणपण चालणारं नव्हतं. आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला. महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे तो मराठा समाज संघटित झाल्याचं चित्र साऱ्या देशानं पाहिलं. फडणवीस मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचं रोज रोज सांगत होते. न्यायालयात ते कसं टिकेल असे प्रयत्न करणं आवश्यक होतं. पण ते झालं नाही. केंद्र सरकारची या कामी थेट मदत घ्यायला हवी होती. ते देखील झालं नाही. उलट, सेव्ह नेशन-सेव्ह मेरिटवाले न्यायालयात धडकले. साऱ्या आरक्षण प्रश्नाचा बोजवारा उडाला. मराठा समाजाची चुळबूळ वाढली होती. हे असंच होणार हे काय त्यांना माहित नव्हतं. नाशिक आणि परिसरातल्या शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केलं. रस्तोरस्ती दूध वाहिलं. शेतकऱ्यांनी लॉंग मार्च काढला. आंदोलन पसरलं. हे न्याय्य मागण्यांसाठी चाललेले शेतकरी आंदोलन संपविण्यासाठी पुन्हा फूटपाडे धोरण आलं. रात्रीच्या अंधारात वर्षा बंगल्यावर शेतकरी नेत्यांपैकी दोघा-चौघांशी चर्चा करतांनाचे मुख्यमंत्र्यांचे व्हिडिओ झळकले. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याचं कुठं असं स्वरुप असतं ? रात्रीच्या अंधारात कुठं लोकआंदोलनं संपवली जात असतात का ?

मराठा समाजाच्या अवहेलनेची ही दोन ठळक उदाहरणे ! या पार्श्वभूमीवर २०१९ च्या निवडणुका आल्या. कॉंग्रेस जणू संपल्यागत होती. राष्ट्रवादी पोखरल्या गेली होती. आता शिवसेना संपवणं हेच जणू एकमेव लक्ष्य होतं. जागावाटप वादग्रस्त करण्यात साडेतीन शहाण्यांना यश मिळालं. संपूर्ण बहुमताची घोषणा आली. ती वल्गना होती हे तर नंतर सिध्दच झालं. निवडणुकीचे निकाल आले. कौल युतीच्या बाजूनं होता. पण, बालहट्टानं पेट घेतला. मुख्यमंत्रीपद देणार नाही ही नवीन घोषणा आसमंतात रंगली. पुढे पुढे संघर्ष अधिक टोकदार होत गेला. सुईच्या अग्रावर मावेल एवढीही जमीन मिळणार नाही, हा इतिहासदत्त अहंकार पुन्हा जागृत झाला. पण, शिवसेना यावेळी गाफील नव्हती. आपल्या शांत स्वभावासाठी प्रसिद्ध असणारे उध्दव ठाकरे आता करारी भूमिका घेऊन होते. पण, संघी अहंकार मात्र कायम होतं. या राजकारणानं महाराष्ट्राला एक नविन घोषणा दिली. 'मी पुन्हा येईन' या घोषणेनं चहूबाजूंनी फेर धरला. राजकारण बहकलं. पण घोषणा अमर झाली. या घोषणेचा उध्दार गावागावातील चावड्यांवर आणि टपऱ्यांवर देखील होऊ लागला. मोठी माणसं उगीच मोठी होत नसतात. त्यांना मोठं करण्यात अशी घोषवाक्ये महत्वाची भूमिका बजावतात. 'तुम मुझे खून दो...!' या घोषणेत देखील 'तुम 'महत्वाचं' होतं. इथे 'तुम' ची जागा 'मी' नं घेतली होती. या 'मी' नंच घात केला. प्रदिर्घ काळपर्यंत सत्ता उपभोगण्याचे सारे प्रयत्न कोसळले. साऱ्या चालबाज्या फसल्या. तंत्र- मंत्र शक्तिहीन ठरले. येतो, येतो म्हणणारे फडणवीस तब्बल एकशे सहा साथीदारांसह रानोमाळ झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेसाठी २०१९ मध्ये जे जे काही केलं गेलं ते कधीच घडलं नव्हतं. वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार या महत्वाकांक्षी नेत्यांनीही मोठं राजकारण केलं. पण जे केले ते आब राखून. स्वत:ची आणि इतरांचीही प्रतिष्ठा जपून. फडणवीस यांनी मात्र सत्तेचा आणि मुख्यमंत्रीपदाचा पोरखेळ केला. एवढ्यावर ते थांबलं असतं, राजकारणातल्या व्यवहार्यता समजून घेतल्या असत्या, शांतपणे विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारीनं आपली भूमिका वठवली असती तर पुन्हा उभारी घेण्याची संधी त्यांना होती. पण, एकदा माणसाचा तोल गेला की तो सावरणे कठिण असतं असं म्हणतात. तसंच त्यांचंही झालं. कोविडसारख्या महामारीच्या काळातही त्यांनी राजकारण सोडलं नाही. रेमडिसिव्हीरचा साठा करण्यासाठी झालेलं भाजपेंयी प्रयत्न, त्यात खुद्द फडणवीस यांनी पोलिस ठाण्यात जाऊन केलेला हस्तक्षेप, कोविड स्थितीचं गांभीर्य लक्षात न घेता मंदिरं उघडण्यासाठी केलेले शंखनाद हे सारे प्रकार म्हणजे राजकारणातील बालिशपण! नंतर खुद्द गडकरी यांनी कोविड काळात राजकारण करू नका असा जाहीर सल्ला फडणवीसांना दिला. तेंव्हा कुठे ते थोडे वरमले. आजकाल त्यांनी बऱ्यापैकी शांतता ग्रहण केलेली दिसते. असो. या साऱ्या राजकारणात फडणवीस हे वैयक्तिकदृष्ट्या अपयशी तर ठरलेच. राजकारणात कुणी अपयशी ठरणे हे काही नविन नाही. पण गमावलेली पत आणि प्रतिष्ठा पुन्हा कमावणे सोपं नाही. फडणवीसांचं राजकारण तर फसलंच. पण, अलिकडच्या काळात त्यांना जी मानखंडना सहन करावी लागली ती त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनाही दीर्घ काळपर्यंत विसरता येणार नाही या प्रकारची! फडणवीस हे नाव आता जनमानसात पूर्वीसारखं आदरानं घेतलं जात नाही. त्यांचं नाव येताच खिल्ली उडविली जावी असं काहीसं आता झालेलं आहे. बरं, या सगळ्या राजकारणात फडणवीस यांचं वैयक्तिक नुकसान तर झालंच. पण त्याशिवाय त्यांच्या भाजपचंही कायमचं नुकसान झालं आहे. साऱ्या देशात भाजपाची लाट असतांना, अजिंक्य मानले जाणारे राजकीय पक्ष धराशायी झालेले असतांना देखील भाजपला महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता स्थापन करणं कधीही शक्य झालेलं नव्हतं. यापुढं ते कसं शक्य होईल? खरं म्हणजे, फडणवीस हे विदर्भाचे काय संपूर्ण नागपूराचेही नेते कधीच नव्हते. नागपूरचं महापौरपद एवढाच त्यांचा राजकीय, प्रशासकीय अनुभव. पश्चिम नागपूरसारख्या सुरक्षित मतदार संघामुळे विधीमंडळात सातत्यानं येणं त्यांना शक्य झालं. एक अभ्यासू आमदार म्हणून त्यांनी लौकिकही मिळवला. पण हे जे काही त्यांनी मिळवलं, ते पाच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदानं त्यांच्याकडून अक्षरश: हिसकावून घेतलं. मोदी आणि अमित शहा यांनी गडकरी विरोधाखातर फडणवीस यांना हवा दिली आणि नेतृत्वाचा हा कृत्रिम फुगा हवेतच विरून गेला. ज्यांच्याकडं काल परवापर्यंत आशेनं, अपेक्षेनं पाहिलं जात होतं, ते फडणवीस यांचं नेतृत्व ऐन तरूणपणी राजकारणाच्या एका तडाख्यानं गारद केलं. त्यांचं राजकीय भविष्य फार चांगलं असेल असं आता कदाचित त्यांचे समर्थकही म्हणू शकणार नाहीत. एखाद्या उमद्या नेतृत्वाच्या नशिबी असे प्रसंग येऊ नयेत. पण, फडणवीस यांना अपयशाचं हे घोंगडं अंगावर घेऊनच आता पुढील हिवाळे-पावसाळे पचवावे लागणार आहेत, असंच म्हणावं लागेल!

कोरोना अचानक चीनमध्ये कसा काय उपटला? ह्या प्रश्नाचं उत्तर जसं जगात कुणालाही देता येणार नाही, तसंच अलीकडं फडणवीसांना नेमकं काय झालं ? याचंही उत्तर अख्ख्या ब्रम्हांडात कुणी देऊ शकणार नाही. फार काय, शुद्धीवर असताना फडणवीसांना देखील आपण नेमकं काय करतो आहोत, याचा नीट अर्थ लागत नसावा! आणि बहुधा गोमूत्राशिवाय ते दुसरं काही घेतही नसावेत! केवळ सत्ता गेल्यामुळं माणूस एवढा बेभान होऊ शकतो का? फडणवीसांचा कौटुंबिक वारसा, त्याचं महापौर ते विरोधी पक्षनेता इथपर्यंतच एकूण राजकारण, सामाजिक जीवनातला त्यांचा या आधीचा वावर हा निश्चितच इतका उद्वेग आणणारा कधीच नव्हता. एका राजकीय खेळीचा भाग म्हणून आणि लॉटरी लागावी तसं, मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर मात्र त्यांच्या फुग्यात जास्तच हवा भरायला लागली होती. आणि तसंही त्यांच्या हातात होतं तरी काय? किती हवा भरायची आणि केव्हा काढून घ्यायची, हे सारं नियोजन तर दिल्लीच्या हातात होतं! ही सारी वस्तुस्थिती लक्षात घेतली तरीही अलीकडं त्यांची जी काय सर्कस सुरू असते ती बघता, फडणवीसांना हल्ली नेमकं काय चावलंय, असा प्रश्न कुणालाही पडेल! गेल्या ७/८ वर्षांच्या काळात भाजपाच्या राजकारणात ज्या उथळ आणि उठवळ संस्कृतीला उत आलाय, त्या पातळीचे नेते फडणवीस कधीच नव्हते. फार काय संपूर्ण विदर्भातील भाजपाच्या आजवरच्या इतिहासात इतक्या उथळ राजकारणाचं दुसरं उदाहरण शोधूनही सापडणार नाही. फडणवीसांच्या तुलनेत योगी आदित्यनाथ, साक्षी महाराज, हे देखील आता बऱ्यापैकी सभ्य वाटायला लागलेत. या पार्श्वभूमीवर विचार केल्यास फडणवीसांचा थयथयाट अनाकलनीय आहे. त्यांच्या कुटुंबातून ज्या प्रकारची प्रतिक्रिया सत्ता गेल्यानंतर आली, तशा प्रकारचा जळाल्याचा धूर आजवरच्या इतिहासात कुठल्याही मुख्यमंत्र्याच्या किचन मधून आला नसेल. त्या प्रतिक्रिया बघून अवघा महाराष्ट्र थक्क झाला! एकूण परिस्थिती काय! आपण बोलतो काय! कुणालाच भान उरलं नाही. वर्षा बंगल्याच्या भिंतीवर जे काही लिहून ठेवलेलं आढळलं, ते तर धक्कादायकच होतं. फडणवीस यांच्या हातात अनपेक्षित सत्ता आली, फुगा फुगला. अति आत्मविश्वासात स्वतःच्याच हातानं टाचणी लावली, फुगा फुटला. ह्यात कोणाचीही काहीही भूमिका नव्हती, हे स्पष्ट आहे. तरीही एवढा थयथयाट का? असं स्वतःचंच कपडे स्वतःच फाडून घेण्याची गरज का पडावी? त्यांचं संतुलन पूर्णतः बिघडलंय, याची जाणीव कुणीही त्यांना करून देत नसावेत का? मुळात आधीचे फडणवीस इतके अपरिपक्व आणि आक्रस्ताळे कधीही नव्हते! तरीही असं का व्हावं ? कोण होतास तू, काय झालास तू? ही कव्वाली जणू फडणवीस यांच्यासाठीच लिहून घेतली असावी, असं वाटतं. पण हे प्रकरण असं हसण्यावारी उडवून देण्यासारखं आहे का? फडणवीस यांना काय एवढाही कॉमन सेन्स नसेल का? मला मात्र तसं वाटत नाही! मग नेमकं काय झालं असेल? काय कारणं असतील, असा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला सतावतोय !

यासाठी आपल्याला २०१९ ची लोकसभा आणि तिचा निकाल लक्षात घ्यावा लागेल. आधीच्या एखाद वर्षांपासून देशात मोदी विरोधी वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली होती. सरकार बहुधा सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरत होतं. मेक इन इंडियाचा फुगा फुटला होता. त्यामुळं भाजपेयींच्या जागा नक्कीच कमी होतील, अशी हवा राजकीय वर्तुळात पसरायला लागली होती. भाजपेयीं विविध राज्यातील विधानसभा एकापाठोपाठ हरतांना दिसत होते. गुजरातमध्ये थोडक्यात वाचली. गोव्यामध्ये हरली, पण सरकार बसवलं. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ मध्ये सत्ता गेली होती. हरियाणा, मध्येही हरलीच होती पण जोडतोड करून सरकार बसवलं. कर्नाटकात पण शह बसलाच होता. अशा पार्श्वभूमीवर भाजपेयींच्या किमान ४०-५० जागा नक्कीच कमी होणार, असा अंदाज होता. मित्रपक्षांची मदत घेतल्याशिवाय सरकार बनूच शकत नाही, अशी अवस्था होती. खुद्द भाजपेयींसुद्धा २३०च्या आसपास आकडा जाईल, अशी गणितं मांडत होते. म्हणजेच तो आणखी कमी असण्याची शक्यता होती. आणि इथंच खरी मेख आहे. भाजपेयींना स्पष्ट बहुमत मिळणार नसलं, तरी विपक्ष कुठंही एकजूट दिसत नव्हता. उलट मायावती सारख्या नेत्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती. सौदेबाजीची संधी शोधण्यात बरेच विरोधी पक्षातील नेते गुंतले होते. एकमेकांवर कुरघोडी करत होते. अशावेळी पुन्हा एकदा भाजपा सरकार केंद्रात येण्याची शक्यता जास्त होती. पण इतर मित्र पक्ष अशावेळी वरचढ झाले असते आणि मोदी यांच्या नावावर फुली मारल्याशिवाय समर्थन नाही, अशी अट त्यांनी घातली असती. अशावेळी जर सरकार बनवायचं असेल, तर नेता म्हणून भाजपेयींना नवं नाव पुढं करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. हा अंदाज घेऊनच गडकरींनी मोदी सरकारच्या धोरणाबद्धल विरोधी सूर लावायला सुरूवात केली होती. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. ही परिस्थिती लक्षात घेऊनच मोदी-शहा यांनी मित्रपक्षांसमोर लोटांगण घालायला सुरुवात केली होती. बिहारमधल्या लोकसभा जागा वाटप करतांना शहा किती लाचार झाले होते, हा प्रसंग लक्षात घेतला तरी आपल्याला सारं गणित समजून येईल. महाराष्ट्रातही सेनेची पाठ खाजवून देण्याचा कार्यक्रम नियमितपणे फडणवीस नाईलाजानं आणि केविलवाण्या चेहऱ्यानं पार पाडत होते. सेनाही खाजवून घेण्यातली मजा लुटत होती. रोज ठोकत होती. आणि खाजगीत तिकडं 'नाच मेरी बुलबुल'ची फर्माईश पण करत होती. महाराष्ट्रातली बुलबुल मस्त नाचत होती!

मात्र लोकसभेच्या धक्कादायक निकालानं सारंच चित्र बदललं. भाजपच्या स्वतःच्या अंदाजापेक्षा त्यांना सुमारे शंभर जागा जास्त मिळाल्या. राक्षसी बहुमत मिळाले. इथूनच मग मोदी यांच्या रथाचे छोटे मोठे घोडे बेभान व्हायला सुरुवात झाली. सारेच सुसाट झालेत. नव्या मंत्रिमंडळात शहा थेट गृहमंत्री झाले आणि सारा देश, सारे विरोधीपक्ष त्यांना आईसक्रीम सारखं सॉफ्ट वाटायला लागलं. केव्हा कुणाला गटकायचं याचा टाईम टेबल फक्त भाजपेयींनी म्हणजेच मोदी-शहा यांनी ठरवायचा होता. तो त्यांचा विशेषाधिकार होता. देशात असा राजकीय प्रलय आला असतांनाच महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणुका सहा महिन्यावर होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादीमधले भले भले लोक मोदी, शहा यांच्या नावाचा पट्टा, फडणवीस यांच्या हातानं आपल्या गळ्यात बांधून घेण्यासाठी रांगेत उभे होते. अगदी खानदानी लोकही त्यांचे पाय चाटायला लागले, पायावर लोळण घ्यायला उतावीळ झाले होते. सारे बिस्किटांचे कारखाने जणू काही फडणवीस यांच्याच मालकीचे झाले होते. विरोधी नेत्यांची ही लाचारी बघून मोदी-शहा नंतरच आपणच, अशी हवा फडणवीस यांच्या फुग्यात घुसली नसती, तरच नवल! तसंही एखाद्या महापंडीताच्या तोऱ्यात त्यांनी जाहीर करून टाकलंच होते, की 'लिहून ठेवा, महाराष्ट्राच्या राजकारणातून शरद पवार हे प्रकरण बाद झालेलं आहे.' त्यावेळचा त्यांचा आवेश आणि चेहरा कमालीचा मग्रूर दिसत होता. महाराष्ट्रात आता विरोधी पक्ष चटणीलाही उरणार नाहीत, अशा थाटात स्वतः फडणवीस आणि भाजपेयीं कार्यकर्ते वावरत होते. त्यांचं जाऊ द्या, पण त्याच सुमारास राष्ट्रवादीच्या सर्वोच्च वर्तुळातील एका महत्वाच्या व्यक्तीसोबत माझी चर्चा झाली होती. वरिष्ठ पातळीवर महाराष्ट्रात तुमचा अधिकृत काय अंदाज आहे, असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावर त्यांनी फार फार तर ४०-४५ असं उत्तर दिलं. मी पुन्हा विचारलं, आणि काँग्रेसच्या किती येतील? ते म्हणाले, अहो काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा दोंघाच्या मिळूनच ४०-४५ येतील. यावरून स्वतः विरोधी पक्ष कसा हादरलेल्या अवस्थेत होता, याची आपल्याला सहज कल्पना येवू शकते. अर्थात त्यातून नेमकं काय चित्र तयार झालं होतं विधानसभेपूर्वी? तर.. देशात, नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्रात भाजपा - सेनेला किमान दोनशे जागा मिळणार! विरोधी पक्षाला सध्यातरी महाराष्ट्रात काहीही भवितव्य नाही. अर्थात यामुळं कोण कोणते राजकीय परिणाम झाले असतील, तर महाराष्ट्राच्या सात बारावर मोदी-शहा-फडणवीस ही तीन नावं अगदी फायनल आहेत, असा संदेश सर्वत्र गेला. त्यातूनच विशिष्ट भाजपेयीं नेत्यांची आधीची मुजोरी आणखी वाढली आणि मग त्यातून निवडणुकीपूर्वीच मोठमोठे व्यवहार आगावू पक्के झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते दिल्ली आणि मुंबई अशा दोन्ही पातळीवरून झालं असणं स्वाभाविक आहे. या निमित्तानं प्रचंड मोठी उलाढाल करण्यासाठी सहज संधी संबंधित लोकासमोर होती. अशावेळी आयती गंगाच जर घरी चालून आली, तर मग ती अर्थातच केवळ अँटीचेंबर पर्यंतच मर्यादित थोडीच राहणार आहे? म्हणजे थेट किचनपर्यंत देखील घुसली असणार ना? मग सगळ्यांनीच मनसोक्त आंघोळी अॅडव्हांसमध्येच आटोपून घेतल्या असणार! आणि सारे कसे उद्याच्या रंगी बेरंगी फेसांचे स्वप्न रंगवण्यात गुंग असतानाच अचानक गंगा आटली! सारे शॉकमध्ये गेलेत ! क्षणभर काय होतेय हेच कळले नसणार कुणाला! पण जेव्हा शुद्धीवर आले, तेव्हा मग सरळ दिल्लीवरून राजभवनात बांबू पोचला असणार आणि म्हणून एवढ्या सकाळी मग दिवाळी पहाट घाईघाईत उरकून घ्यावी लागली असेल, असं समजायला बरीच जागा आहे.

पण ती 'पहाट मैफल' शरद पवार यांनी पुन्हा एकदा उधळून लावली आणि मग फडणवीस यांच्यासह सारेच पिसाळून गेले असतील. राजभवनवर आपला खानदानी गडी असूनही बार फुसका निघाला, पाळणा काही हलत नाही, उलट दिवसेंदिवस महाविकास आघाडी भक्कम होते आहे, मंत्रिमंडळाचं खातेवाटप उशिरा जरी झालं असलं, तरी पक्कं झालं, हे बघून मग दिल्लीचे मालक आणि मुंबईचे दिवाणजी यांचा बीपी जोरात वाढला असणार. ज्यांच्यासोबत बागेचे वादे झाले असतील, तेही आता अस्वस्थ झाले असणार! त्यांनीही आपला हिशेब करायला सुरुवात केली असणार! आता बाग तर तुमच्या हातात राहिली नाही, तेव्हा आम्हाला मोकळे करा, असा तगादा संबंधित लोकांनी लावला असणार! त्यांना काय, आपला धंदा महत्वाचा! त्यांची सोयरिक फक्त सत्तेशी, व्यक्तीसोबत त्यांना काहीही देणंघेणं नसतं. अशावेळी, त्यांना काहीतरी दिलासा देणं गरजेचं आहे. त्यातून तर हे, सरकार पाडण्याचा आभास निर्माण करणारे पोरकट चाळे होत नसावेत ना? तशी शक्यता मला जास्त वाटते. अन्यथा जनतेत महाविकास आघाडीच्या बाजूनं जनमत आहे, हे काय फडणवीसांना कळत नसेल? उद्धव ठाकरे यांचा ग्राफ अचानक वाढलाय, याची काय त्यांना कल्पना आली नसेल? तिकडं मोदी यांनी नुसताच गोंधळ घालून ठेवलाय, नोटबंदीपेक्षाही जास्त भयंकर चुका मोदी करत आहेत, एवढं समजण्याएवढीही बुद्धी भाजपेयींकडं नसेल का? किमान संघातल्या लोकांना तरी फडणवीसांना तेवढी जाणीव करून द्यावी असं वाटत नसेल का? 'फडणवीस आणि सर्कस'चे अलीकडील माकडचाळे बघून जनतेला अक्षरशः किळस यायला लागलीय, हे सोशल मीडियावरून तर कुणाच्याही लक्षात येईल. मग फडणवीस यांना कळत नसेल का? तरीही ते असं वागताहेत, याचा अर्थ त्यांचं मानसिक संतुलन बिघडण्याची काहीतरी गंभीर कारणं नक्की आहेत. आणि ती बहुधा अशाच आगावू प्रसाद वितरणाबाबतची असणार. मुंबईचा बाजार केवढा मोठा आहे, याचा जरा विचार करून बघा. आणि त्यामुळेच ' थांबा, आपली खिचडी लौकरच तयार होते आहे,' असे संबंधित लोकांना भासाविण्यासाठी आणि वेळ काढण्यासाठी हा सारा खटाटोप सुरू असावा, असं समजायला मोठा आधार आहे. शिवाय भाजपेयींच्या तोंडाला आधीच रक्त लागलेलं आहे. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. मोदी-शहा यांना तर महाराष्ट्र अशाप्रकारे हातातून जाणं, खूप जिव्हारी लागलं असेल. त्यांचा इगो भयंकर दुखावला असणार. आधीच त्यांचं राजकारण खुनशी स्वरूपाचं! शिवाय महाराष्ट्रातील या फाजितीचा दूरगामी परिणाम इतर राज्यांच्या राजकारणावरही होऊ शकतो, ही भीती त्यांना आता सतावत असणार. त्यामुळंही ते फडणवीस यांना चूप बसू देत नसावेत. अशावेळी फडणीस तरी काय करणार बिचारे? वास्तविक सत्ता येणं, जाणं ह्या गोष्टी चालतच असतात. पण मोदी शहा यांची संस्कृती मात्र वेगळी आहे..!

डाका घालणाऱ्या अनेक टोळ्या असतात. पण काहींना फक्त संपत्ती हवी असते, सोने, नाणे, पैसा हवा असतो. तर काहींना लुटीनंतर गावाचा विध्वंस करण्यात खरा आनंद मिळतो. भाजपेयीं ही दुसऱ्या प्रकारात आनंद मानणारी विचित्र जमात आहे. याच विकृतीमधून त्यांनी शरद पवारांवर अटॅक करण्यासाठी इडीचा वापर केला होता आणि तिथंच ते फसले. शरद पवार म्हणजे काही नितीशकुमार नव्हेत, हे भाजपेयीं नेतेमंडळी विसरले. शरद पवार चवताळले. कारण तसाही त्यांना पर्यायच उरला नव्हता. त्यांच्या तंबुतला एकेक पोटार्थी नेता सरळ अफजलखानाच्या चड्ड्या धुवायला धावत होता. राजभवनवरची राज्यपाल प्रायोजित 'पहाट मैफल' बघता, जर शरद पवार मैदानात बॅटिंगला स्वतः उतरले नसते, तर राष्ट्रवादीत आणखी काय काय अनर्थ घडू शकलं असतं, याचा सहज अंदाज करता येतो. शरद पवार म्हणजे अडवाणी नव्हेत, हे भाजपेयींच्या लक्षातच आलं नाही. काही का असेना, छोटं जरी असलं, तरी ते त्यांच्या स्वतंत्र साम्राज्याचे सम्राट होते. आणि सम्राटाचं बंड किती महाग पडू शकतं, हे उद्धव ठाकरे यांनी भाजपेयींना अशा तऱ्हेनं दाखवून दिलं, की फडणवीस आणि अख्खी महाराष्ट्रतले भाजपेयीं अजूनही बिचारे हळद तेल लावून शेकण्यात व्यस्त आहेत. सोसतही नाही आणि सांगताही येत नाही. त्यामुळं अंधारातच एकमेकांची शेकून घेवून समाधान मानत आहेत. ह्यात आणखी एक गम्मत आहे. आज मोदी आणि शहा देशातले सर्वात पॉवरफुल नेते आहेत, असे भक्तांना आणि विचारवंतांना देखील वाटतं. पण वस्तुस्थिती खरंच तशी आहे का? मला स्वतःला मात्र तसं काही वाटत नाही. हां! भाजपत आज ते निर्विवाद मोठे नेते आहेत. देशाच्या सत्तेतही ते सर्वोच्च आहेत, यात संशय नाही. अगदी काही वर्षांपूर्वी अडवाणी हे भाजपातले अत्यंत पावर फुल नेते वाटत होते. आज त्यांची हालत काय आहे? बाबरी मशीद पाडली तेव्हा कल्याणसिंह यांचाही ग्राफ एकदम आकाशाला भिडला होता. पक्षाचे भावी अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. आज त्यांची हालत काय आहे? फार काय मोदी यांच्या उदयापूर्वी गडकरीसुद्धा अतिशय पावरफुल आणि भावी प्रधानमंत्री वगैरे वाटत होतं. पण सध्या ते काय करतात? अर्थात ते अजूनही प्रधानमंत्री होऊ शकतात, पण २०२४ च्या आधी. नंतर मात्र कठीण वाटते. असो. या पार्श्वभूमीवर मोदी यांची परिस्थिती पवार यांच्या तुलनेत काय असेल? ते शरद पवार यांच्यापेक्षा किती पटीने मोठे नेते असतील? या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल, तर मोदी स्वतःचा पक्ष काढू शकतात का? आणि काढला तर त्यांना जनतेचं किती समर्थन मिळेल ? हा मुख्य प्रश्न आहे. मोदी यांची एकूणच कार्यपद्धती, अरेरावी, सूडबुद्धी, संवेदनहिन वृत्ती बघता त्यांना लोक फारसा पाठिंबा देतील, असे नाही वाटत. आणि सध्या भाजपाला जरी त्यांनी आपल्या चड्डीच्या नाड्याला बांधून ठेवली असली, तरी कुठल्या क्षणी नाडा निसटून जाईल आणि त्यांची फजिती होईल, हे सांगता येत नाही. सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्रात कसं होत्याचं नव्हतं झालं आणि मी पुन्हा येईन! म्हणून किंचाळणाऱ्या फडणवीस यांच्यावर कसं सकाळ-संध्याकाळ राजभवन वर जाऊन ' 'दे माय.. दे माय ' करत भीक मागण्याचे दिवस आलेत, येवढेही लक्षात घेतले तरी भाजपा वाल्यांची भविष्यातील फजिती थांबू शकेल. 'पिसाळली गाय, काटे काय' अशी सध्या फडणवीस यांची अवस्था झालेली आहे. बहुधा त्यांना रात्रभर झोप येत नसावी. औरंगजेबाच्या डोळ्यात जसे शिवाजी महाराज खुपत होते, आणि मग त्यानं मोहिमेवर अफजलखानाला पाठवले, त्याहीपेक्षा जास्त उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद फडणवीस यांना खुपत असावं. बहुधा तोच अफजलखान फडणवीस यांना चावला असावा, असे परिस्थितीजन्य पुरावे आहेत. तोच अफजलखान, फडणवीस यांच्या नसानसातून ' शांताबाई.. ' च्या ठेक्यावर नाचत असल्याची मजा सारा महाराष्ट्र एन्जॉय करतो आहे. चंद्रकांत पाटील तर बिचारे फारच गोंधळलेले दिसतात! महाराष्ट्रातील अन्य भाजपेयीं नेत्यांचे चेहरे पाहिले, तर 'झाकू किती, झाकू कशी..!' अशी बिचाऱ्यांची अवस्था झालेली दिसते! समजा, पंकजा मुंडे यांना कुणी प्रश्न विचारला, की 'फडणवीस यांना अफजलखान चावला आहे, असं तुम्हाला वाटतं का?' तर प्रचंड गडगडाट करून हसणारा त्यांचा दिलखुलास चेहरा मला अगदी स्पष्टपणे समोर दिसतोय !

सरकार लवकरच बदलणार. सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघून घेईन. अशी दर्पोक्ती करणारा पेहचान कौन? नही पेहचाना? आणखी कोण? मी परत येईन अशी दर्पोक्ती करणाराच! देवेंद्र फडणवीस...! गेली कित्येक वर्षे, एक अभ्यासू आमदार, एक तडफदार नेता अशी ज्याची ओळख होती, तो मुख्यमंत्री बनून त्यानं सत्तेची चव काय चाखली, हा माणूसच बदलून गेला. एक उमदं व्यक्तिमत्वाचं, एका हेकेखोर, रडीचा डाव खेळणारा, अत्यंत नकारात्मक विरोधी पक्षनेता असं परिवर्तन घडतांना महाराष्ट्राला बघायला मिळालं. गेल्या विधानसभा निवडणूक निकालानंतर आपल्या हातातून सत्ता निसटल्याची हुरहूर अजून ह्या माणसाला लागली आहे. जणू काही मुख्यमंत्रीपदाची गादी, मोदींसारखी ह्यांच्यासाठी १५ वर्षे राखून ठेवण्यात आली होती. उद्धव ठाकरेंनी आपला विश्वासघात केला अशी त्यांनी आपली समजूत करून घेतली आहे. पण भाजपाच्या जागा १०५ वर उतरल्या, ह्या गोष्टीकडं ते जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहेत. म्हणून तर सत्तेची समीकरणं पटापट बदलली. बरं ह्यांच्या कारकिर्दीत सगळं काही आलबेल होतं असं आहे का? मुळीच नाही. बरखा पाटील प्रकरण, भीमा कोरेगाव प्रकरण, चिक्की घोटाळा, आरे कार शेड घोटाळा, एम.पी मिल एफ.एस.आय घोटाळा, आणि अशा अनेक घोटाळ्यात ते सर्वांना क्लीन चिट देऊन मोकळे झाले. ह्यांनी तरी घोट्याळ्याच्या बाबतीत भाष्य करणं शोभत नाही. आता तर राज्यातल्या पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून सध्याच्या सरकारच्या बातम्या फोडून अराजक माजवण्याचा नवीन पायंडा ते पाडत आहेत. माजी गृहमंत्र्यांना गोपनीय कागदपत्र पुरवण्याची पद्धत ही येत्या काळात सगळ्यांनाच महागात पडणार आहे. कोरोना महामारीच्या ह्या भयानक परिस्थितीचं राजकारण कसं करावं हे फडणवीसांकडून शिकावं. व्यापाऱ्यांना भडकावणं, लॉकडाऊनला विरोध करणं ह्या सर्व गोष्टी भविष्यात त्यांना महागात पडणार आहेत. कदाचित नाही पडणार. अरे ह्या माणसानं महाराष्ट्राच्या मदतपेटीत आपले दान टाकायच्याऐवजी, मोदींच्या पेटीत दान टाकलं, ह्यापेक्षा महाराष्ट्राची चेष्टा कोणी केली नसेल. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला अनुपस्थित राहून, बायकोकडून शिकून रुसून कसे बसले त्यानंही त्यांच्या मनाची जडणघडण दिसून आली. फडणवीस तर तडफडत आहेतच, पण त्याही पेक्षा जास्त त्यांच्या पत्नी ह्यांना नवऱ्याचं मुख्यमंत्रीपद गेल्याचं अतोनात दुःख झाल्याचं दिसतं. साहजिक आहे. पण त्यानं इतकी खालची पातळी गाठावी, हे अनाकलनीय आहे. आताच्या त्यांच्या मुक्ताफळांवरून, वर्षा बंगला सोडतांना, बंगल्याच्या भिंतींवर जी काही भयानक ग्रॅफिटी काढण्यात आली, ते प्रताप कोणी केले असतील हे ताडायला कोणी ज्योतिषी नको. महाराष्ट्राच्या इतिहासात कुठच्याही मुख्यमंत्र्याच्या पत्नीनं राजकारणात ढवळाढवळ केली नाही. मला समजत नाही, बँकेत असलेल्या आमच्या उच्चपदस्थ आप्तेष्टांना श्वास घ्यायला वेळ नसतो, आणि ह्या बाईंना गाणी गायला, अल्बमचं शूटिंग करायला कसा काय वेळ मिळतो? त्या बँकेत जातात कि नाही अशी पण शंका येते. त्यांनी तर एका गाण्यात स्वतःच्या नवऱ्याला, म्युनिसिपल कमिशनर आणि पोलीस कमिशनरलाही गायला लावलं. आता बोला. असो, फडणवीस दांपत्यानं वेळीच सावरावं. सत्तेच्या हव्यासापायी ते स्वतःची पातळी सोडून वागत आहेत, आणि लोकांच्या मनातून उतरत चालले आहेत. महाराष्ट्राची अस्मिता बाळगायची सोडून, केंद्राचे प्यादे बनण्यात ते धन्यता मानत आहेत. मी परत येईन ही गर्जना हवेत विरून गेली, तसंच मी बघून घेईन ही गर्जनाही विरून जाणार, कारण महाराष्ट्राशी तुम्ही करत असलेली गद्दारी उघड्या डोळ्यानं जनता बघत आहे आणि तीच तुम्हाला बघून घेणार आहे!
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...