Saturday, 9 October 2021

'गोडसे' सिनेमा व्हायला हवा!



"गांधीजयंतीदिनी 'गोडसे' चित्रपटाची घोषणा ही मांजरेकरांची मनोविकृती दिसतेय. सध्या विकृतीलाच प्रतिष्ठा मिळण्याचे दिवस आहेत. असे कितीही चित्रपट, नाटकं, कथा, कादंबऱ्या येऊ द्यात, गांधीजींचा विचार कधीही मरणार नाही कारण गांधीजींचे विचार विश्वकल्याणाची आस धरणारे आहेत. अहिंसा, सत्य, करुणा, बंधूभाव हे मानवी मुल्यांचे संस्कार आहेत. ते गांधीजींच्या मारेकऱ्यांच्या समर्थकांप्रमाणे कुणाही जातीधर्माच्यापुरता संकुचित नाहीं अथवा कुणाच्या द्वेषावर, असत्यावर आधारित नाही. स्वच्छता अभियान असो वा स्वदेशीचा नारा, देखाव्यासाठी का होईना गांधीजींना वंदन करावंच लागतं. गांधींजींची हत्या झाल्यावर नेहरूंनी गांधीजींच्या मारेक-याचा नामोल्लेख एक 'माथेफिरू' असा केला होता. माथेफिरूला नायक ठरवत चित्रपट काढण्याचा विचार एखादा माथेफिरूच करू शकतो. गांधीजींचा विचार, प्रेम, क्षमा, करुणा आणि समस्त मानवजातीचं उत्थान यावर आधारित आहे. त्यामुळं असे अनेक माथेफिरू येतील आणि जातील पण गांधीजींचे विचार मात्र शाश्वत होते, आहेत आणि पुढेही राहतील! यात शंका नाही!"
-------------------------------------------------------------

*स* ध्या राज्यात निवडणुकीचं वातावरण नसलं तरी सतत राजकारणाला उधाण आलेलं असतं. इतके दिवस नथुरामाच्या नाटकाचे प्रयोग सुरु होते, त्या नाटकात नथुरामाला दररोज फाशी दिली जात असताना फारशी कुणी दखल घेतली नाही. पण अचानकपणे महाराष्ट्रात सोलापूर कोल्हापुरापासून नागपुरापर्यंतच नव्हे देशभरात सर्वत्र या 'गोडसे' सिनेमाला विरोध होतोय. नथुरामाचा सिनेमा होऊ नये म्हणून लेख लिहिले जात आहेत. आंदोलन होताहेत. चित्रपटनिर्मिते आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशीच गांधीजींचा खून करणाऱ्या नथुरामच्या जीवनावर 'गोडसे' नामक चित्रपट काढण्याची घोषणा केलीय. यापूर्वीही नथुरामावर नाटक रंगमंचावर आलं होतं, त्यालाही विरोध झाला होता. परंतु नथुरामचा सिनेमा तयार होणं आणि ते अधिकाधिक लोकांनी पाहणं समाजहिताचंच आहे. सडक्या विचाराला धर्मकृत्याचा, देशहिताचा टिळा लावत बुद्धिवान माणूस नि:शस्त्र माणसाचा खून करण्यापर्यंतचं पशुत्व कसं अंगिकारतो याची साक्ष देणारं हे जसं नाटक होतं तसंच हा सिनेमाही असेल. देशातल्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या मुस्लिम अनुनयाला कडवा विरोध करणाऱ्या भाजपेयींचं आजवरचं राजकारण पाहता 'सिनेमा व्हायलाच हवाय'ची जबाबदारी खरंतर त्यांनीच घ्यायला हवी होती, अशी नथुरामवाद्यांची इच्छा होती. पण नथुरामला त्यांनी झटकलं आणि गांधीवाद्यांकडं, त्यांच्या विरोधकांकडं जबाबदारी सोपवलीय त्यामुळं प्रसिद्धीमाध्यमांतून त्याची उलटसुलट चर्चा सुरू झालीय आणि वादाला तोंड फुटलंय!

निश्चय आणि निर्भयता म्हणजे गांधीजी! त्यांना महाराष्ट्रात स्वातंत्र्यलढ्याचं बीज सापडलं. महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे म्हणून गांधीजींनी गुजरातेतला साबरमतीचा आपला आश्रम बंद करून तो महाराष्ट्रात वर्ध्याला आणला. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांना गुरुस्थानी मानलं. लोकमान्य टिळकांचा जयघोष करीत ते स्वातंत्र्याचा मंत्र देशाच्या खेड्यापाड्यात गेले, अशा नि:शस्त्र गांधींचा खून मराठी माणसानं करावा यासारखं अमानुष कृत्य अन्य नाही. हे भाकड विचारानं केलेलं भेकड कृत्य संतांची, वीरांची, बुद्धिमंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रावरचा कलंक आहे या क्रूरकर्म्याला आणि त्याच्या कृत्याची तरफदारी करणाऱ्यांना महाराष्ट्रानं कधीच आपलं मानलं नाही. न्यायदेवतेच्या दरबारात नथुरामला त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळाली होती. तिथं नथुराम खुनी ठरलेला असतानाही त्यानं 'गांधी वध' केला असा शंख करणारं नथुरामाचं भूत पुन्हा पुन्हा उठवून हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्यांच्या निष्ठेचा कस जोखत असतात. मुसलमानांना खुश करण्यासाठी गांधीजींनी हिंदुस्थानचे भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे केले. पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यायला भारताला भाग पाडलं. गांधींनी आपला जीव पणाला लावून स्वतःला देशापेक्षा मोठं केलं. त्यामुळं फाळणी झाली. हिंदूंचे बळी गेले. हिंदूंवर अत्याचार झाले. हिंदू स्त्रियांवर अत्याचार झाले. या साऱ्याला गांधीच जबाबदार होते, म्हणून नथुरामनं त्यांना खतम केलं, असा नथुरामवाद्यांचा युक्तिवाद असतो. नथुरामचं हेच नाटक होतं आणि आता सिनेमा येतोय. त्यात पाहणाऱ्याचा भावनिक उद्रेक होण्यासाठी गांधी द्वेषाचा मसाला जसा नाटकात मिसळला होता तसाच तो सिनेमातही असेल. नाटकातल्या काही भाकड संवादावर जशा नथुरामभक्तांच्या टाळ्या पडतात; तशाच त्या सिनेमातल्या संवादावर पडतील, चिल्लर उधळली जाईल अर्थात या टाळीबाजांनी आजवर यापेक्षा कोणता पुरुषार्थ गाजवलाय? महात्मा गांधींजींच्या राष्ट्रकर्तृत्वावर शिंतोडे उडविणारं नाटक आताच रंगभूमीवर आलेलं नाही, शिवसेना-भाजपची राजवट होती तेव्हाही १९९८ दरम्यान हे नाटक रंगभूमीवर आलं होतं. काँग्रेसनं गांधींना खुंटीला लावून गांधीवादाला आपल्यापासून दूर लोटलं असलं तरी लोक गांधींची काँग्रेस म्हणत काँग्रेसला मतदान करतात, जीवदान देतात. नेत्यांना बदनाम करून काँग्रेस संपणार नाही, हे स्पष्ट झाल्यानं गांधीजींच्या कार्यकर्तृत्वाची मापं काढण्याचा हा प्रकार सुरु असतो. ही विचारवादाची लढाई आहे. त्यात नेहमी गांधीवादाचाच विजय होतो, ही गांधीजींच्या देशत्यागाची किंमत आहे. ती काँग्रेसवाले वसूल करीत होते आता भाजपेयी करताहेत, तो त्यांचा नीचपणा आहे. गांधी बनिया होते , त्यांच्यामागे बहुजन समाज प्रचंड होता. त्यामुळं त्याचं राजकारण-समाजकारण प्रभावी होत होतं. त्याचा सल बुद्धिबळावर राजसत्ता मिळवू पाहणाऱ्याच्या मनात होताच. कारण आपल्याच नादानीमुळं पेशवाई बुडाल्यानं सत्तेचं चाटण मिळविण्याची त्यांना संधी हवी होती, परंतु गांधीजींनी राजकारणाचं सार्वत्रिकीकरण केल्यानं सत्तेचे लगाम आपल्या हाती येणार नाहीत, याची खात्री पटल्यानं त्यांनी गांधीद्वेषाचं विष पसरवायला सुरुवात केली.

फाळणीच्या वेदनेनं आपण गांधींना मारलं हे नथुरामचं म्हणणं खोटारडेपणाचं आहे. गांधींना ३० जानेवारी १९४८ ला नथुरामने संपविलं. पण त्यापूर्वी १४ वर्षे त्यांना मारण्याची संधी नथुरामीवृत्ती शोधात होती. जून १९३४ मध्ये गांधींवर पुण्यात बॉम्बहल्ला झाला होता. जुलै १९४४ मध्ये गांधींच्या अंगावर सुरा घेऊन जाणाऱ्या नथुराम गोडसेला पाचगणीला पकडलं होतं. ऑगस्ट १९४४ मध्येही असाच प्रसंग सेवाग्राम आश्रमात घडला. त्यानंतर २९ जून १९४६ रोजी गांधींच्या मुंबई-पुणे प्रवासात नेरळ-कर्जत दरम्यान रेल्वे मार्गावर अपघात घडवून आणण्यासाठी मोठमोठया दरडी टाकल्या होत्या. रेल्वेचालकाच्या प्रसंगावधानानं अपघात टळला. गांधी बचावले, ह्या साऱ्या घातपातात नथुराम संशयित आरोपी असल्याचं सिद्ध झालं आहे. या काळात हिंदुस्तानच्या फाळणीची चर्चा सुरु नव्हती. त्यामुळं गांधींना फाळणीसाठी दोषी ठरवून त्यांचा खून करणाऱ्याच्या फाशीला हौतात्म्याचा टिळा लावण्यासाठी आटापिटा करणं ही देखील नथुरामी विकृतीच आहे. नथुराम जिवंत असताना कुणी ऐकलं नाही, त्याच्या मागं कुणी जमलं नाही. अशांच्या खुनशीपणाची पुस्तकं वाचून, नाटकं, सिनेमे पाहून कोण नथुराम बनणार? गांधीवादाचा स्वीकार केल्याशिवाय कुठल्याही राजकीय विचाराला सत्तास्थान लाभणार नाही, सत्य आणि अहिंसा ही गांधीवादाची मूलतत्त्व आहेत. त्याचा धिक्कार करून कुणी राजकारण , समाजकारण, सत्ताकारण, करू शकत नाहीत. हाच गांधींचा विजय आहे. गांधींचा हा मोठेपणा पचत नाही, असे वांतीकारक काय क्रान्ती करणार? नथुरामही त्यातलाच! तो नीट कळण्यासाठी 'नथुराम'चं नाटक आणि सिनेमा व्हायला हवं. त्यामुळं देशहिताच्या बुरखा घालून सत्य, अहिंसेचा खून करण्याची संधी शोधणारे आजचे छुपे नथुराम तरी ओळखता येतील. नथुरामच्या खुनशीपणामुळं नि:शस्त्र महात्म्याचा खून झाला तसाच हजारो निरपराधांच्या संसाराचा नाश झाला. महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांची होरपळ झाली; वर महात्मा गांधींच्या खुनाचं पाप महाराष्ट्राच्या माथ्यावर राष्ट्रानं थोपलं. एका गोळीत इतकं ऐतिहासिक क्रौर्य करणाऱ्या नथुरामला नाटकातही फासावर लटकलेलं दाखवलं आहे. तसं आता सिनेमातही दाखवलं जाईल त्याशिवाय तो पूर्ण होणारच नाही म्हणजे या नाटकाचे जेवढे प्रयोग आणि पडद्यावर सिनेमाचे खेळ होतील तेवढ्यांदा 'नथुराम' फासावर लटकलेला पाहायला मिळेल. तेव्हा सिनेमाही व्हायला हवाय!

गांधीजयंतीचं औचित्य साधून चित्रपटनिर्माते महेश मांजरेकरांनी 'गोडसे' या त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केलीय. अद्यापि त्याच्या कथानकाबद्धल कांहीही स्पष्टता नाही. मांजरेकरांच्या पुर्वीच्या अनुभवावरून ही टीका सुरू झालीय. गांधीजींवर टीकात्मक लेखन वा त्यांच्या भुमिकांची चिकित्सा सतत होत आलीय. या चिकित्सेतून गांधीजींच्या विचारांची उपयुक्तताही सिद्ध झालेली आहे. महाराष्ट्रात यापूर्वी 'गांधी विरूद्ध गांधी' हे नाटकही येऊन गेलंय. हिंदीत 'मैने गांधी को नही मारा' हा अनुपम खेर अभिनित तसंच 'हमने गांधीजीको मार दिया' हे चित्रपटही येऊन गेले आहेत. गांधीजींचा मुलगा हिरालाल गांधी यांच्या चरित्रावर आधारीत अक्षय खन्नाचा 'गांधी माय फादर' हा गांधीजी कसे अयशस्वी पिता होते हे सांगणारा चित्रपटही येऊन गेलाय. त्यामुळं चित्रपटातून गांधीजींवर टिका हे काही नवीन नाही. रिचर्ड एँटनबरो या जागतिक फिल्म निर्मात्यानं गांधीजींवर १९८२ साली 'गांधी' हा अप्रतिम चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसमोर मांडला. विधु विनोद चोपडा यांनी 'लगे रहो मुन्नाभाई' या चित्रपटातून गांधीजींचे विचार नव्या परिप्रेक्षात मांडलं. त्यातून 'गांधीगीरी' हा नवा शब्दप्रयोगही रूढ झाला. गांधीजींची हत्या भारताच्या स्वातंत्र्यानंतर अवघ्या पाच महिन्यात झाली. स्वातंत्र्य, फाळणी, पाकीस्तान निर्मिती, धार्मिक दंगे अशा मंथनातून निघालेलं विष पचवायला गांधीजींसारखा महात्मा भारतात होता, त्यांनी हे विष स्वत:ची आहुती देऊन संपवलं. पण गांधीजींनी आहुती देऊनही हे विष संपलं नाही म्हणून गांधीजींवर दोषाआरोप अजूनही होत असतात. त्यातून गांधीजींच्या विरोधाचीही एक बाजू आहे, असा युक्तीवाद केला जातो. तो चुकीचा असला तरीही त्याचं अस्तित्व समाजात होतं नि आहे, हे वास्तव आहे. गांधीहत्येवरील गोपाळ गोडसेंचे पुस्तक याच प्रयत्नाचा एक भाग आहे.

सामाजिक घटनांच्या क्रिया-प्रतिक्रियांच्या परस्परसंबंधांचे विश्लेषण करताना आपण ज्या समाज नावाच्या एका व्यवस्थेत वावरतो, त्याचा पोत तर बिघडत नाही ना, याचा सतत विचार व्हावा लागतो. ज्या जाणिवेच्या आणि सामाजिक तत्त्वज्ञानाच्या अंत:प्रेरणेतून समाजविकासाच्या संवेदना जागृत होत असतात, त्याची पाळेमुळे आपल्याच अंतरंगाच्या भूगर्भात खोलवर रुतलेली असतात. मातीच्या पुतळ्यांना आकार देताना कुणी त्यात फक्त पाणी घालतं, तर कुणी कस्तुरीचा सुगंध. ज्याची मशागत करण्याची पद्धत संस्कारक्षम आणि शुद्ध असते, त्या पुतळ्यांचा सामाजिक विकास सुगंधी होतो; तर पाण्याच्या अतिवापराने काही मुळे कुजतात, सडतात, अविचारांच्या अविवेकी साखळदंडात बांधली जातात. परिणामी अशा मुळांमधून अविचारांचा जन्म होतो. तेच पुढे सामाजिक अध:पतनाच्या प्रक्रियेचे भवितव्य बनतात. सामाजिक अध:पतनाच्या वाटचालीची कारणमीमांसा करताना सिद्धांतपूर्ण विचारांचे मारेकरी शोधावे लागतात. जेव्हा भारतीय समाजव्यवस्थेच्या सामाजिक जाणिवेचा आणि नैतिक आदर्शाचा विषय येतो तेव्हा गांधींचा विषय सोडून आपल्याला पुढे जाता येत नाही. गांधी ही भारतीय समाजाची जगातली ओळख आहे. तो आपल्या समाजाचा मानवी चेहरा आहे. आज गांधी आपल्यात नाहीत. नथुराम गोडसे नावाच्या माणसाने त्यांची हत्या केली; मात्र त्यात धारातीर्थी पडले ते केवळ एक शरीर. गांधींचे विचार कधीच मरत नाहीत; पण तरीही त्यांची हत्या थांबत नाही. त्यांची रोज हत्या होते. त्याचे मारेकरी रोज बदलतात. या मारेकऱ्यांच्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे. ते नाव आहे महेश मांजरेकर! गांधीजींच्या मारेक-यांचीही एक बाजू आहे, असा एक मतप्रवाह आहे. तो मांडण्याचा प्रयत्न अनेक कथा, कादंब-या, नाटकं आणि चित्रपटातून आजवर झालेले आहेत. स्टँनली वॉलपर्ट यांनी नथुरामची बाजू मांडण्याचा एक तटस्थ प्रयत्न १९६२ साली 'नाईन अवर्स टू रामा' या कादंबरीतून केला होता. त्यावर अमेरिकेत याच नावाचा चित्रपटही येऊन गेला. भारतात या दोन्हींवरही बंदी घालावी अशी मागणी काँग्रेस आणि हिंदुत्ववाद्यांनीही केली होती. त्याचं एक कारण म्हणजे त्यात नथुरामचं अनैतिक संबंधही मांडले होते. 'गोकुळ शंकर' नावाच्या चित्रपटावरही बंदी घातली गेली कारण तो स्टँनली वॉलपर्ट यांच्याच कादंबरीवर आधारीत होता. 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक तर सर्वत्र प्रसिद्ध झालंय. मराठीच्या आधी गुजराती भाषेत रंगमंचावर आलं होतं. आजही त्याचे प्रयोग होत असतात. कमल हसननं याच स्टँनली वॉलपर्टच्या कादंबरीवर आधारीत 'हे राम' हा चित्रपट काढला पण त्यानं हा विषय सिनेमॅटीक लिबर्टी वापरत गांधीजींचीच बाजू ठळकपणे मांडली. हत्येचं समर्थन केलं नाही. स्टँनली वॉलपर्टची 'नाईन अवर्स टू रामा' ही कादंबरी वा त्यावरील सिनेमा हा आंतरराष्ट्रीय दृष्टीकोनातून मांडलेली कलाकृती होती. त्यात गांधीजीबद्धल द्वेष नव्हता तर गांधीजींचा तिरस्कार करणारे लोकही भारतात होते आणि त्यांनी गांधीजींची हत्या करताना त्यांची गुन्हेगारी का असेना पण नेमकी काय भुमिका होती हे मांडलं होतं. कमल हसनही भारतीय असला तरी त्याची दृष्टी व्यापक होती. पण 'मी नथुराम बोलतोय' या नाटकाचा हेतु मात्र नथुरामचं उदात्तीकरण नि गांधींचा द्वेष असाच होता. उच्चवर्णिय प्रेक्षक समोर ठेऊन केलेला हा प्रयोग होता. जो यशस्वी ठरला, कारण उच्चवर्गात विशेषतः बहुसंख्य ब्राह्मणांत गांधीजीबद्धल तिरस्कार आहे, हे वास्तव आहे.

महेश मांजरेकर ह्या भारतीय चित्रपट निर्मात्याच्या विचारात तद्धन बाजारूपणा भरलाय. त्यांचा 'मी शिवाजीराजे बोलतोय' हा सिनेमा तर मनसेचा राजकीय अजेंडा रेटण्याचा प्रयोग होता. नथुरामची बाजू मांडणारा, नथुराम या गुन्हेगाराची मानसिकता मांडणारा मनोविश्लेषणात्मक प्रयोग म्हणून एखाद्या गुन्हेगारांवर चित्रपट निघणं नवीन नाही. 'क्रिमीनल सायकॉलॉजी'चा अभ्यास विधी अभ्यासक्रमात गुन्ह्यामागील कारणं शोधण्याचा प्रयत्न असतो. पण त्यात गुन्हेगाराचं वा गुन्ह्याचं समर्थन वा गुन्हेगाराबद्धल सहानुभूती निर्माण व्हावी, त्याचं उदात्तीकरण असं अजिबात नसतं. पण भारतीय चित्रपट निर्माते हे प्रबोधन मुल्यापेक्षा बाजारू मुल्यांना महत्व देतात. अमिताभ बच्चनचा 'दिवार' असो, शाहरूख खानचा 'डर' वा अक्षय खन्नाचा 'रूस्तुम' हे सर्व चित्रपट गुन्हेगारालाच नायक बनविणारे आहेत. मांजरेकरांच्या 'वास्तव'मध्ये गँगस्टर 'रघू' हाच नायक होता. आता कदाचित नथूराम हा नायक असेल. आपला समाज गुन्हेगारी वृत्तीनं बरबटला आहे. 'वास्तव'चा 'रघू' काय आणि येणा-या 'गोडसे' मधला 'नथुराम' काय, लोकांना आवडतं ते पुरवणं हा चित्रपट निर्मात्यांचा बाजारू फंडा आहे. गांधीजयंतीदिनी गोडसे चित्रपटाची घोषणा करणं ही मांजरेकरांची मनोविकृतीच आहे. पण विकृतीलाच प्रतिष्ठा मिळण्याचे दिवस सध्या असल्यामुळं यावर केवळ उद्विग्न होणं एवढंच आपल्या हातात आहे. पण महत्वाची बाब अशी की, असे कितीही चित्रपट, नाटके, कथा, कादंबरी येऊ द्या, गांधीजींचा विचार कधीही मरणार नाहीत कारण गांधीजींचे विचार हिंदू संस्कृतीत वर्णन केल्याप्रमाणे विश्वकल्याणाची आस असणारे आहेत. या विचारांवर अहिंसा, सत्य, करुणा, बंधूभाव आदी मानवी मुल्यांचे संस्कार आहेत. त्यामुळं तो गांधीच्या मारेकऱ्यांच्या समर्थकांप्रमाणे कोणाही जातीधर्माच्यापुरता संकुचित नाहीं अथवा कोणाच्या द्वेषावर, असत्यावर आधारित नाही. गांधीजीबद्धल सतत मनात द्वेष बाळगणाऱ्या नि गांधी जयंतीदिनी नथुराम भक्तांची देवता स्वदेशात नि परदेशातही प्रात:स्मरणीय गांधीजींच्या चरणांवर नतमस्तक होताना दिसून येतं. स्वच्छता अभियान असो वा स्वदेशीचा नारा, गांधीजींना देखाव्यासाठी का होईना वंदन करावंच लागतं. गांधींजींची हत्या झाल्यावर नेहरूंनी 'द लाईट हॅज गॉन आऊट' असं म्हटलं होतं. त्यांनी गांधीजींच्या मारेक-याचा नामोल्लेख 'ए मॅडमन' म्हणजे एक माथेफिरू असा केला होता. माथेफिरूला नायक ठरवत चित्रपट काढण्याचा विचार एखादा माथेफिरूच करू शकतो. मांजरेकर असा माथेफिरूपणा करणार नाहीत, अशी आशा व्यक्त करू या! गांधीजींचा विचार, प्रेम, क्षमा, करुणा आणि समस्त मानवजातीचं उत्थान यावर आधारित आहे. त्यामुळं असे अनेक माथेफिरू येतील आणि जातील पण गांधीजींचे विचार मात्र शाश्वत होते, आहेत आणि पुढेही राहतील! यात शंका नाही!
- हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...