Saturday, 12 June 2021

भाजपविरुद्ध हिंदुत्ववादी चेहरा हवा!

"देशांत भाजपविरोधी वातावरण तयार होतंय. परंतु ते आपल्याकडं वळविण्यासाठी कोणत्याच पक्षांकडं चेहरा नाही. भाजपेयीं निवडणुकीत जी आयुधं वापरताहेत तीच आयुधं वापरून उभा ठाकणारा तेवढाच ताकदवान, धुरंधर नेता हवाय. गेली ६०-७० वर्षे सेक्युलॅरिझमच्या नावाखाली काँग्रेसनं जो अल्पसंख्याकांचा अनुनय केला त्याची परिणिती 'हिंदू जागरणा'त झालीय. हिंदुराष्ट्रवाद अंगीकारलेला एखादा भाजपविरोधी नेता जर आगामी काळात देशापुढं आला तर भाजपेयींचा, मोदींचा पराभव होऊ शकतो. अन्यथा पुन्हा मोदीच देशाच्या उरावर बसतील. कोरोनानं कितीही मृत्यू झाले तरी मोदी होते म्हणून इतकेच मृत्यू झाले नाहीतर आणखी वाढले असते. आपण वाचलो ते मोदींमुळंच! असा कांगावा भक्त करतील. असं करण्यात त्यांचं आयटी सेल सज्ज झालेलं असेल. मात्र जर देशातील सर्व विरोधकांकडून सेक्युलर ऐवजी 'हिंदुत्ववादी' विचारांच्या नेत्याचा पर्याय दिला तरच देशात नेतृत्वबदल शक्य होऊ शकेल ...! यादृष्टीनं उद्धव ठाकरे यांचा विचार होऊ शकतो!
---------------------------------------------------

*नि* वडणुक रणनीतीत निष्णात मानले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची मुंबईत भेट झाली अर्थात दोघांच्या तब्बल तीन तास झालेल्या भेटीत देशातल्या राजकीय स्थितीची आणि आगामी काळातील राजकीय वाटचालीवर चर्चा झाल्याचं समजते. आगामी निवडणुकीत भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसनं यात सहभागी होण्याचं टाळलं तर देशात बिगर काँग्रेस आणि बिगर भाजपेयीं अशा तिसऱ्या आघाडी करण्याच्या दृष्टीनं चाचपणी सुरू आहे. यात शरद पवार, ममता बॅनर्जी, देवेगौडा, अकाली दल, द्रमुकचे स्टॅलिन, तेलंगणा राष्ट्र समिती, व इतरांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व आहे. संजय राऊत यांनी गेल्या सहा महिन्यापासून अशी आघाडी व्हावी आणि त्याचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं अशी मागणी उघडपणे करत आहेत. प्रशांत किशोर यांनी नुकत्याच झालेल्या बंगालच्या आणि तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका पार पाडली होती. त्यांचं नांव चर्चेत आलं ते २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या निवडणुकीची व्यूहरचना आखली आणि नियोजन केलं तो त्यांना फायदा झाला होता. त्यानंतर त्यांनी पंजाबमध्ये अमरेंद्रसिंग, नितीशकुमार, जगनमोहन रेड्डी, आदित्य ठाकरे यांच्यासाठीही निवडणूक रणनितीसाठी मदत केली होती. त्यामुळं या भेटीचे वेगवेगळे तर्क लढवले जाताहेत. त्यांनी राहुल गांधी यांनाही सल्ला देण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांनी तो गांभीर्यानं घेतला नाही. मोदींचा पराभव होऊ शकतो, अमित शहा हे चाणक्य नाहीत. त्यांना ओव्हरकॉन्फिडन्स आहे अशी वक्तव्य त्यांनी केली आहेत. बंगालच्या निवडणुकीनंतर किशोर यांनी रणनितीकार म्हणून काम करणार असं जाहीर केलंय. पण त्यांची कंपनी अद्याप काम करते आहे. निवडणुकीत राजकीय रणनिती आखण्यात माहीर असलेले हे दोघे जर एकत्र आले तरी मोदींसमोर कोणता चेहरा असेल हा प्रश्नच आहे. कारण सगळ्याच प्रादेशिक नेत्यांची महत्वाकांक्षा आड येऊ शकते. त्यानुसार प्रयत्न व्हायला हवेत. भाजपेयीं ज्या हिंदुत्ववाद आणि राष्ट्रवाद घेऊन भावनात्मक राजकारण करतात, त्यांना विरोध करायचा असेल तर त्याच विचारांच्या जवळपास जाणारा, अल्पसंख्याकांचा अनुनय न करणारा चेहरा लोकांसमोर आणावा लागेल. धर्माचं राजकारण करण्याची सुरुवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली. १९८७ साली त्यांनी डॉ. रमेश प्रभू यांच्या निवडणुकीत सर्वप्रथम हिंदुत्वावर मतं मागितली. त्यामुळं त्यांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षासाठी काढून घेतला होता. हिंदुत्वावर मतं मिळतात हे भाजपेयींच्या लक्षांत आल्यानं त्यांनी १९८९ साली हरियाणातील पक्षाच्या अधिवेशनात हिंदुत्वाचा पुरस्कार केला. ही शिवसेनेबाबतची वस्तुस्थिती आहे. उध्दव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण हिंदुत्व सोडलेलं नाही हे विधीमंडळात आणि बाहेरही जाहीरपणे सांगितले आहे. हे इथं नोंदवावं लागेल!

*अटलजींची पायाभरणी तर मोदींनी त्यावर साज*
हिंदुत्वाला शिवसेनाप्रमुखांनी हवा दिल्यानंतर भाजपेयींचा विस्तार झाला. भाजप हा राष्ट्रीय स्तरावरचा तर शिवसेना हा प्रांतीय पक्ष असल्यानं भाजपची व्याप्ती मोठी होती. त्याचं त्यांना यश मिळालं. मात्र अटलजीनंतर शताब्दीकडं वाटचाल करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सत्तेसाठीचा चेहरा मिळत नव्हता. अडवाणी यांनी जिनांचा गुणगौरव केल्यानं संघाच्या वर्तुळातून ते बाद झाले. नरेंद्र मोदींच्या माध्यमातून तो चेहरा मिळाला त्यामुळं भारतीय जनता पक्षाला सत्तेपर्यंत पुन्हा पोहोचता आलं. अटलबिहारी वाजपेयी यांनी सत्तेची पायाभरणी केली होती त्यावर साज मोदींनी चढविलाय. भाजपेयींकडं २४ तास राजकारण करणारे नेते आहेत. शिवाय पगारी कार्यकर्ते-पेड वर्कर २४ तास उपलब्ध असतात. याशिवाय त्यांच्या जोडीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक साथीला असतात. ह्या सगळ्यांना पक्षाचं काम सतत दिलं जातं. म्हणजे लोकसंपर्क आणि पक्षविस्तार करण्यासाठी ते सतत सज्ज असतात. कोणताही कार्यक्रम, मग बारशापासून अंत्यसंस्कार, दहाव्यापर्यंत, लग्न- मुंजी, मरण-सरण, जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी सर्व ठिकाणी उपस्थित राहून त्यांना एकच काम असतं. ते जिकडं-तिकडं आपल्या पक्षाची मतं बिंबवताना दिसतात. शिवाय कोणत्याही कारणांनी पक्षाचं चिन्ह लोकांच्या घरापर्यंत जावं यासाठी ते दक्ष असतात. त्यामुळं पक्ष लोकांपर्यंत पोहोचतो हे नाकारून चालणार नाही. हे सारं योजनाबद्धरित्या सुरू असतं. ते सतत लोकांशी कनेक्ट असतात. फाईटर नेहमी जिंकत असतो या न्यायानं त्यांना यश लाभतं. ही मंडळी तिथं राजकीय, राष्ट्र- सांस्कृतिक संदेश देण्यासाठी सज्ज असतात. भाजपचं यश हे त्यांच्या आक्रमक प्रचारामध्ये असतं. 'सांप्रदायिक जातीयवादी प्रचार करणं, 'बाटो और राज करो' नीती वापरायची, मोदी-शहांचा फार्म्युलानं विनिंग मशीन बनवणं, विरोधकांची खासगी प्रकरणं काढून त्यांच्याविरुद्ध रान पेटवणं, त्यासाठी सरकारी तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणं, कार्पेट बॉंबिंग म्हणजे धडाकेबाज प्रचार, मीडियाची मदत, पैशाचा अतोनात वापर ह्या बाबींचा वापर आताशी मोठ्या प्रमाणात भाजपेयीं करत असतात. या साऱ्या क्लुप्त्या वापरूनही बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. तिथं त्यांचा पराभव झाला. २०१४ ते २०२१ या काळात पराभूत होणं आणि पुन्हा जिद्दीनं उभं राहणं हे आपण पाहिलंय. २०१५ मध्ये दिल्ली, बिहार इथं पराभव झाला. २०१६ मध्ये आसाम जिंकला, उत्तरप्रदेश, उत्तराखंड इथं यश लाभलं. गोवा, कर्नाटक, गुजरात इथं हारता हारता वाचले. राजस्थान, मध्यप्रदेश, या हिंदी पट्ट्यातील राज्यात पराभव झाला. त्यानंतरच्या लोकसभा निवडणूका झाल्या तेव्हा भाजपेयींनी तिथं प्रचंड बहुमतानं जिंकल्या. हरियाणा, उत्तराखंड, महाराष्ट्र इथं पराभवासारखी स्थिती झाली. पण त्यांची उमेद, जिद्द संपली नाही. मात्र झटका बसला. भाजपच्या विरोधात सक्षम नेता उभा राहीला तर भाजपचा पराभव होऊ शकतो हे दिल्लीत केजरीवाल, बंगालमध्ये ममता, तामिळनाडूत स्टॅलिन, केरळमध्ये विजयन यांनी नुकतंच दाखवून दिलंय. खरंतर काँग्रेसनं निवडणूकीतील सततच्या पराभवाने त्यांनी आपला आत्मविश्वासच गमावलाय. निवडणुकीपूर्वीच माघार घेण्याची वृत्ती दिसून आलीय. लढाऊबाणाच हरवलाय!

*काँग्रेसकडून रोगाऐवजी लक्षणांवर इलाज*
राष्ट्रीय स्तरावर असलेल्या काँग्रेसपक्षाच्या आज चिरफळ्या झालेल्या आपण पाहतो. कधीकाळी देशात सर्वत्र सत्ताधारी राहिलेल्या काँग्रेसची ताकद दिवसेंदिवस कमी होताना दिसतेय. पक्षांतर्गत घसरत्या लोकप्रियतेचं, पराभवाचं चिंतन व्हायला हवंय. विचारमंथन व्हायला हवंय पण अलीकडं तसं होत नाही. आज तर काँग्रेसपक्ष हा केवळ आई, बहीण, भाऊ यांचाच पक्ष उरलाय. पूर्वीच्या काळी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, आजही राहुल-प्रियंका यांना पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. हे जरी खरं असलं तरी पक्षानं लोकांशी संपर्क असलेले, कार्यकर्त्यांचं जाळं असलेले चांगले नेते घरी बसवलेत. आज गरज आहे ती प्रत्येक राज्यातल्या लोकांशी निगडित असलेल्या नेत्यांना पुढं आणण्याची. देशातून पूर्वी सेक्युलारीझमचा गवगवा असायचा आज ते संपुष्टात आलंय. तो शब्दच कुणी वापरत नाही. प्रचारात तो मुद्दा असायचा पण आता राष्ट्रवाद-हिंदूधर्म याचाच प्रचारात मोठ्याप्रमाणात वापर होतोय. त्याचीच चलती आहे. काँग्रेस आणि इतर विरोधीपक्ष मात्र अद्यापि सेक्युलारीझमलाच कवटाळून बसले आहेत. सेक्युलारीझम म्हणजे मुस्लिमांचं अनुनय हे चित्र उभं करण्यात भाजपेयीं यशस्वी झालेत. आजही अशीच भूमिका काँग्रेस घेताना दिसतेय. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आसाममध्ये मुस्लिम नेते बदरुद्दीन अजमल आणि बंगालमध्ये फुरफुरिया शरीफ यांच्याशी युती केली, या दोघांच्याही मुस्लिम संघटना, शिवाय मुस्लिम लिगशी समझौता केला. त्यामुळं भाजपेयींना 'काँग्रेस म्हणजे मुल्ला पार्टी' आहे, मुसलमानांचा पक्ष आहे. असं जे म्हणायचंय त्याला बळकटीच मिळतेय. याचा गांभीर्यानं काँग्रेसपक्षात विचार केला जात नाही. धर्माचं पोलरायझेशन, मंडल कमिटीचा अहवाल यापासून ३७० कलम रद्द करण्यापर्यंत जी भूमिका काँग्रेसनं घेतली त्यानं तर काँग्रेस 'राष्ट्रविरोधी' आहे असं नरेटिव्ह तयार झालंय. पक्षात तरुण नेत्यांना जसं की, सचिन पायलट, नवीन जिंदल, देवरा, सातव भाजपत गेलेले ज्योतिरादित्य अशांना कुजवलं गेलं. ते ते आपल्या राज्यात सक्षम नेते बनले असते पण दरबारी नेत्यांनी त्यांच्या पायात पाय घालून त्यांची, स्वतःची आणि पक्षाची वाट लावलीय. पक्षात आजतर परप्रकाशी नेत्यांना महत्व प्राप्त झालंय. राष्ट्र, धर्म आणि एकात्मता विषयीची आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचविण्यात पक्ष अपयशी ठरलाय. राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे पण आज पक्ष बिगरराजकीय लोकांच्या हातात गेलेला आहे. त्यातून अपरिपक्व राजकारण केलं जातंय. काँग्रेसच्या पतनाच्या मूळ रोगावर इलाज करण्याऐवजी रोगाच्या लक्षणांवर इलाज केला जातोय. त्यामुळंच पक्षाला आकार येत नाही.

*....नाहीतर मोदी पुन्हा सत्तेवर येतील.*
निवडणुकीत आज जी आयुधं भाजपेयीं वापरतात हीच आयुधं अटलबिहारी वाजपेयी आणि प्रमोद महाजनांच्या काळात वापरली गेली होती 'इंडिया शायनिंग' चा बोजवारा उडाला होता. भाजपेयींचा पराभव झाला होता. भाजपेयींचा पराभव होऊ शकतो. पण मोदींसमोर ठामपणे उभा राहील असा चेहरा आज कोणत्याही पक्षांकडं दिसत नाही. आज भाजपेयींसारखे २४ तास राजकारण करणारे नेते कोणत्याच पक्षात दिसत नाहीत. केजरीवाल, शरद पवार, ममता बॅनर्जी यांच्याशिवाय कुणी दिसत नाहीत. तेजस्वी यादव, अखिलेश यादव यांच्याकडून मोदी हरणार नाहीत. त्यांच्यात ती क्षमता नाही. हे पूर्णवेळ राजकारणी नाहीत. उत्तरप्रदेशात अखिलेश- राहुल गांधी एकत्र आले होते. तिथं अखिलेशनं आपल्या कार्यकाळात सर्वोत्तम कामगिरी केली असतानाही सपाटून मार खाल्ला. आजकाल देश आर्थिकबाबींऐवजी राष्ट्रवाद, धर्म यात भरकटला जातोय. यांच्याविरोधात जो कुणी येईल तो ध्वस्त होईल, भस्मसात होईल. या पीचवर तोच टिकेल जो ज्या पद्धतीनं बॉलिंग होतेय त्याला त्याच पद्धतीनं तोंड देणारा बॅट्समन असेल. असं घडलं नाहीतर २०२४ ला पुन्हा मोदीच सत्तेवर येतील. कारण राष्ट्रवाद, धर्म यासारखे संवेदनशील विषय आले की, भारतीय मतदार आंधळे बनतात. ही नशा अफीमपेक्षाही अधिक नशा देणारी असते. त्यामुळं भाजपेयींविरोधात एकत्र येणाऱ्या वा येऊ पाहणाऱ्या नेत्यांनी याचा गांभीर्यानं विचार करायला हवाय. केवळ विरोधासाठी विरोध करून चालणार नाही. संघराज्याचं अस्तित्व टिकविण्यासाठी आपले वैयक्तिक मतभेद दूर सारून, प्रसंगी आपल्या मतांना वळसा घालून सर्व विरोधकांसोबत उभं राहायला हवं. काँग्रेसनं देखील आपल्या राष्ट्रीय पक्षाचा ठिसूळ झालेला चेहरा सावरण्यासाठी तरी सर्वांना एकत्र आणून भाजपेयींनं सक्षम आणि मजबूत पर्याय दिला पाहिजे. काँग्रेसचा तो अवतार आता राहिलेला नाही. याची त्यांनी जाणीव ठेवावी.

*भाजपातील असंतोषाचा फायदा घ्यायला हवा*
एकजात सारे विरोधीपक्ष सारे मूर्ख बनले आहेत. असं म्हटलं जातंय. कोरोनाचा उद्रेक गेल्यावर्षीही होता. लॉकडाऊन, प्रवासी मजदूर प्रामुख्यानं बिहारमधील, त्याचे मृत्यू ह्यांसारखे ज्वलंत प्रश्न असताना बिहारची निवडणूक झाली. उत्तरप्रदेशात पोटनिवडणुक झाली या दोन्ही ठिकाणी लोकांनी भाजपला मतं दिली होती हे विसरता येणार नाही. आजतर याच भागात मृत्यूचं तांडव आहे. अंत्यसंस्काराला जागा नाही. गंगेत प्रेतं टाकली जाताहेत. रोज चार हजाराहून अधिक लोक मरताहेत. तरीही मोदी-योगी पुन्हा निवडून येतील. आज २-३ लाख मेले; मोदी नसते तर २०-३० लाख लोकं मेली असती. आम्हाला मोदींनीच वाचवलंय अशी कंडी पिकवली जाईल. त्यांचं उदात्तीकरण केलं जाईल. त्यांना सडेतोड उत्तर देणारा नेता कुणीच नाहीये. अमित शहांना चाणक्य वगैरे म्हणाल तर ते केवळ विरोधीपक्षाच्या मुर्खपणामुळे! मघाशी म्हटल्याप्रमाणे काँग्रेस वा इतर कोणत्याही पक्षांकडं असा चेहरा नाही की, जो पक्ष हिंदूविरोधी नाही. निवडणूक दरम्यान मंदिरात जाणं, पूजाअर्चा करणं याकडं मतदार फारसं लक्ष देत नाहीत, गांभीर्यानं घेत नाहीत, महत्वही देत नाहीत. तुमच्या आचरणात, ध्येयधोरणात काय आहे, तिथं राष्ट्रवाद, हिंदुधर्म याला किती स्थान आहे. आपल्यात कोण कोण आहेत. सोबत कोण आहेत हे महत्वाचं आहे. भाजपला मिळालेलं यश हे हिंदुत्ववादी धोरणानं मिळालेलं आहे. हे मान्यच करावं लागेल. केजरीवाल, ममता बॅनर्जी यांनी आपण हिंदूविरोधी आहोत हे विशेषण लावू दिलेलं नाही. केजरीवाल वंदेमातरम, भारत माताकी जय, जय हनुमान अशा घोषणा देतात तर ममता बॅनर्जी ह्या जय श्रीराम ऐवजी जय सियाराम, दुर्गामाताकी जय म्हणतात. त्यांनी आपल्यावर तो ठप्पा लागू दिलेला नाही. भाजपेयींशी लढायचं असेल तर सॉफ्ट हिंदुत्वाचा अशाप्रकारचा चेहरा समोर आणावा लागेल. ज्याच्यावर हिंदूविरोधी असल्याचा ठपका लागलेला नसेल. यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांचा विचार करावा लागेल. देशात एक कोटी नाहीत तर दहा कोटी जरी कोरोना महामारीत कामी आले तरी भक्त म्हणतील मोदी होते म्हणून एवढ्यावरच निभावलं नाहीतर कितीतरी अधिक पटीनं लोक कामी आले असते असा गवगवा करतील त्यासाठी २४ तास राजकारण करण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादी विचार, हिंदुत्ववादी रसायन आणून लढणाऱ्या नेत्यांची निवड करायला हवी तर आणि तरच निभाव लागू शकेल अन्यथा नाही! आजमितीला भाजपमध्ये मोदींविरोधात असंतोष निर्माण होतोय. खस्ता झालेल्या नेत्यांना त्यांनी दूर केलंय केवळ राष्ट्रीय स्तरावरच नाही तर अगदी राज्य, शहर पातळीवरही हे त्यांनी केलंय. आपल्या सोलापुरात किशोर देशपांडे, रामचंद्र जन्नू, वळसांगकर ही मंडळी आज कुठं आहेत? तशाचप्रकारे राष्ट्रीय स्तरावर घडलंय म्हणून असंतोष दिसतोय. कुठलाही मंत्री याबाबत बोलायला तयार नाही. सुब्रमण्यम स्वामी यांनी तर उघडपणे आघाडी उघडलीय. अशावेळीच समर्थ पर्याय उभा राहिला तर भाजपचाही पराभव होऊ शकतो. पण त्यासाठी संधीसाधू नव्हे तर राजकीय इच्छाशक्ती असलेल्यांनी पुढं यायला हवंय.

हरीश केंची.
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...