Saturday, 19 June 2021

युतीसाठी मोदींची ठाकरेंकडे मनधरणी



"कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर असताना राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीची शक्यता निर्माण झाली असून त्यासाठी आता अमित शहांनी नाही तर खुद्द प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनीच पुढाकार घेतलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दिल्लीत अर्धातास एकांतात तर नुकतंच फोनवरून तब्बल ४० मिनिटं फोनवरून संपर्क साधून पुन्हा एकदा सेना-भाजप युतीचा प्रस्ताव दिलाय. नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणुका, कोरोना महामारी सावरण्यात आलेलं अपयश, विरोधी-प्रादेशिक पक्षाचं उभं राहणारं आव्हान या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सर्वात जुन्या मित्राला साद घातलीय. काँग्रेसची स्वबळाची उबळ, राष्ट्रवादीची सुरू झालेली जुळवाजुळव, आघाडी टिकवण्याची जबाबदारी एकट्या शिवसेनेची नाही ही शिवसेनेची कळकळ! यातून महाराष्ट्रात पुन्हा एकदा युतीचं सरकार येण्याची चिन्हं दिसताहेत. पण हे सारं शिवसेनेवर अवलंबून असणार आहे. त्यात नेतृत्वाचा कस लागणार आहे हे मात्र निश्चित!"
----------------------------------------------------------

*नु* कतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, आणि राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यांच्यासह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातले १२ प्रश्न घेऊन त्यांनी प्रधानमंत्र्यांना निवेदन दिलं होतं. त्याचवेळी मोदींच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची एकांतात अर्धातास भेट झाली होती. यावृत्ताबाबत कुणी काहीच बोललं नव्हतं. त्या दोघांतच चर्चा झाल्यानं अनेकांनी अनेक अंदाज बांधले आहेत. पण त्याला आधार मिळत नव्हता. सूर सापडत नव्हता. पण आता दोन दिवसांपूर्वीच खुद्द प्रधानमंत्र्यांनीच मातोश्रीवर फोनवर उद्धव ठाकरे यांच्याशी तब्बल ४० मिनिटं चर्चा केल्यानं पुन्हा एकदा सेना-भाजप युती होण्याचे संकेत मिळताहेत. शिवसेनेतल्या नेत्यांना यातलं काही माहीत असण्याची शक्यता नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या वक्तव्यातून सध्या काही दिवसांपासून प्रधानमंत्र्यांबाबत सौम्य भूमिका आणि त्यांच्याबद्धल चांगलं बोललं जातं असल्याचं आपल्याला जाणवलं असेलच. शिवसेनेची ही बदलती भूमिका या साऱ्या घडामोडीचे संकेत देणारी आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत सांगितलं होतं की, विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासोबत ८० तासाचं सरकार स्थापन करणं ही चूकच होती. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आणि भाजपच्या मतदारांना हे आवडलं नव्हतं अशी स्पष्ट कबुली पहिल्यांदाच दिली होती. शिवाय प्रधानमंत्र्यांना भेटायला गेलेल्या मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळात आपल्याला जायला आवडलं असतं असं त्यांनी म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. हे शिवसेना-भाजपतलं बदलत वातावरण खुपसं काही सांगून जातं. या साऱ्या घडामोडीला दिल्लीतल्या एका उच्चस्तरीय वरिष्ठ भाजपेयीं नेत्यानं याला दुजोरा दिला असून आगामी तीन-चार महिन्यात राज्यात शिवसेना-भाजपचं सरकार आलं तर आश्चर्य वाटायला नको; अशी शक्यता वर्तवली आहे. पण हे सारं शिवसेना, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर, त्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. आता चेंडू मातोश्रीच्या कोर्टात आहे. त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे. असं या नेत्यानं स्पष्ट केलं आहे!

*काँग्रेसची स्वबळाची उबळ, राष्ट्रवादीची जुळवाजुळव*
महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताहेत. महाराष्ट्रात ७० हजाराहून अधिक संक्रमीत रुग्ण होताहेत. त्यामुळं तिसरी लाट येण्याची चाहूल टास्कफोर्सला लागलीय त्यांनी तसे सरकारांना सुचवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यासाठी व्यस्त आहेत. तर प्रधानमंत्र्यांना ही महामारीच्या तिसऱ्या लाटेला थोपवतानाच लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेले दिसतात. २४ तास राजकारणात व्यग्र असलेल्या नेत्याला आपलं स्थान टिकवण्यासाठी प्रयत्नशील असणं स्वाभाविक आहे. त्यामुळंच त्यांनी अशा हालचाली सुरू केल्या आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घेऊन युतीसाठी मातोश्री गाठली होती. निवडणूकीनंतरच्या आणाभाका घेतल्या होत्या. पण निवडणुकीतल्या यशानंतर दिलेला शब्द टिकवण्यात आणि तो पाळण्यात अमित शहा यांनी टाळाटाळ केली. दिलेला शब्द फिरवला. त्यामुळं शिवसेनेकडं याबाबत अमित शहांशी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे तयार होणार नाहीत हे माहीत असल्यानं खुद्द प्रधानमंत्र्यांनीच यासाठी पुढाकार घेतल्याचं या वरिष्ठ नेत्यानं सांगितलंय! त्यानं पुढं स्पष्ट केलंय की, आगामी तीन चार महिने हे कोविडशी लढण्याचे आहेत. उद्धव ठाकरे यासाठी आग्रही आहेत. त्यामुळं त्यांनी याबाबत काहीच विचार केलेला नाही. पण जी काही राजकीय परिस्थिती राज्यात निर्माण होतेय त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या मनांत निश्चित काहीतरी सुरू आहे. काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष नाना पटोले आणि मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आगामी निवडणुका या स्वबळावर लढविणार असल्याचं जाहीर केलंय. तर वर्धापनदिनाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसनं आगामी निवडणुकांच्यासाठी जुळवाजुळव सुरू केलीय. फंड उभा करण्याचं काम सुरू झालंय. यामुळं राज्यात अस्थिरता तर येणार नाही ना? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं अनेक पत्रकारांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले आहेत. पण निवडणुकीला सामोरं जाण्याऐवजी सत्ता टिकवण्यासाठी पुन्हा एकत्र येण्यास काय हरकत आहे? अशाबाजुनं विचार सुरू आहे. पण यामुळं शिवसेनेची आणि उद्धव ठाकरे यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहणार आहे. त्यांच्या प्रतिमेलाही धक्का लागणार आहे.

*असा आहे मोदींचा शिवसेनेला प्रस्ताव*
देशात भारतीय जनता पक्षाचं मजबूत सरकार सत्तेवर असलं तरी त्यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या व्यतिरिक्त कुणी मंत्री कार्यरत आहे असं दिसतं नाही. प्रत्येक घडामोडीत या दोघांनाच पुढाकार घ्यावा लागतो आहे. पण शिवसेनेशी बोलताना अमित शहांचा उपयोग होणार नाही हे जाणून मोदींनीच यासाठी पुढाकार घेतला आहे. मोदींच्या मनांत शिवसेना आणि ठाकरे यांच्याबद्धल एक हळवा कोपरा आहे. गुजरात दंगलीच्यावेळी पक्षातले नेते त्यांच्याविरोधात असताना केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची पाठराखण केली होती. त्यामुळं त्यांनी उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र भेट घेतलीय आणि फोनवरून चर्चा केलीय. या चर्चेत जो प्रस्ताव नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर जो प्रस्ताव ठेवलाय त्याची माहिती देताना हा नेता म्हणाला की, *" प्रथम राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेनं बाहेर पडावं. त्यानंतर शिवसेना- भाजप युती एकत्र येईल. उद्धव ठाकरे वा शिवसेना ठरवील तो मुख्यमंत्री होईल आणि त्याच्या जोडीला भाजपचे दोन उपमुख्यमंत्री असतील. शिवाय मुंबई महापालिकेच्या निवडणुका या युतीतून लढविल्या जातील. त्यानंतर २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजप ३० तर शिवसेना १८ जागा लढविल. त्यानंतर सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत निम्म्या निम्म्या जागा शिवसेना- भाजप लढवतील...!"* असा हा प्रस्ताव दिला गेला आहे. पण यावर उद्धव ठाकरेंनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. भाजपला आता कोणतीच घाई नाही. तीन-चार महिन्यानंतर याबाबत विचार करून सांगा असं मोदींनी सुचवलं आहे. आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे महत्वाचं आहे. महाविकास आघाडीतल्या काँग्रेसच्या सततच्या स्वबळाच्या नाऱ्यानं आणि राष्ट्रवादीच्या कुरघोडीनं उद्धव ठाकरेंची मानसिकता काय असेल हे मोदींनी ओळखले आहे त्यामुळंच त्यांनी लोकसभेत महाराष्ट्रातून ४० जागांचं लक्ष्य ठेवलेलं असल्यानं त्यांनी उद्धव ठाकरेंना साद घातली आहे. त्याला उद्धव ठाकरे काय प्रतिसाद देतात हे महत्वाचं आहे.

*लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची मनधरणी*
नुकत्याच झालेल्या पाच राज्यातल्या निवडणुकीत भाजपला मिळालेला अत्यल्प प्रतिसाद, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश जवळपास सर्व हिंदीभाषिक प्रदेशात भाजपेयींसमोर अडचणी उभ्या आहेत. देशातल्या ३० राज्यांपैकी १० राज्यातच भाजपची सरकारे आहेत. कोरोनाच्या महामारीत भाजप सत्ताधारी राज्यात जी अनावस्था निर्माण झाली त्यामुळं तिथल्या लोकमानसात भाजपेयींबाबत नाराजी दिसून येते आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत या राज्यातून भाजपला अपेक्षित प्रतिसाद मिळेल असं वातावरण दिसत नाही. त्यामुळं उत्तरप्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा आहेत तिथं ४० जागा मिळाव्यात अशी अपेक्षा मोदींची असल्यानं त्यांनी शिवसेनेला साद घातली आहे. शिवसेनेशी युती असेल तरच या जागा जिंकता येईल अन्यथा इतर राज्यांप्रमाणे इथंही भाजपला धक्का लागू शकतो. असं वातल्यानेच मोदींनी हा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवला असल्याचं दिसतं. शिवसेनेच्या दृष्टीनं मुंबई महापालिका ही अत्यंत महत्वाची आहे. पोपटाचा जीव जसा एखाद्या ठिकाणी असतो तसा शिवसेनेचा जीव मुंबई महापालिकेत असल्यानं ती जिंकण्यासाठी शिवसेना काहीही करू शकते. पण विश्वासार्हतेचं काय? कार्यकर्त्यांची मन जुळतील का? नुकताच शिवसेना भवनासमोर जो शिवसेना- भाजप यांच्यात राडा झालाय त्यावर या नेत्याचं म्हणणं असं की, 'हेट अँड लव्ह' असा प्रकार असू शकतो. सत्ता मिळवणं हे मोदींचं साध्य असल्यानं ते जो निर्णय घेतील त्याला कार्यकर्ते समजून घेतील. कारण सेना-भाजप यात जे वितुष्ट निर्माण झालंय त्यालाही कारण राज्यातली सत्ता हेच आहे ना! आणि यानिमित्तानं राज्यात पुन्हा जर सत्तेची फळं चाखायला मिळाली तर ते कुणाला नकोय? त्यामुळं नाराजी ही तात्कालिक असेल. जर ३० वर्षे सडलेली युती पुन्हा अस्तित्वात आली, मोदींचा प्रस्ताव जर उद्धव ठाकरेंनी स्वीकारला तर सेनेचा मुख्यमंत्री कोण असेल? भाजपचे उपमुख्यमंत्री कोण असतील? देवेंद्र फडणवीस यांचं काय होणार? ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील की, केंद्रात जाणं श्रेयस्कर ठरवतील? हे सारे प्रश्न आज गुलदस्त्यात असले तरी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर सारं अवलंबून आहे. आणखी एक विशेष की, उद्धव ठाकरे यांना राज्याच्या राजकारणातच राहायचं आहे की, राष्ट्रीय राजकारणात उतरायचं आहे हे आगामी काळात दिसून येईल पण याचा निर्णय खुद्द उद्धव ठाकरे यांनाच घ्यायचा आहे.....!
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...