मुंबई पोलिसांच्या इतिहासाचा विचार केल्यास एकेकाळी एन्काउंटरसाठी परिचित असलेल्या मुंबईची आठवण निघणं सहाजिक आहे. मुंबईतल्या टोळ्या आणि त्यांच्यातले द्वंद्व संपवण्यासाठी पोलिसांनी कसे मोठमोठ्या म्होरक्यांना कंठस्नान घातले, यावर तर अनेक सिनेमेही बनले आहेत. ते किती सत्य, हा विषय दुसराच, मात्र हो, एकेकाळी मुंबईत एन्काऊंटर हा शब्द तितकाच सर्रास उच्चारला जायचा, जितका आजही तो चर्चिला जातोय. इतिहासातील त्या पानांवर जाण्याआधी हैदराबादच्या घटनेच्या जवळ जाणारी एक घटना २८ वर्षांपूर्वी मुंबईत घडली होती, तिचा उल्लेख आवश्यक वाटतो. त्या घटनेचाही शेवट एन्काउंटरनं झाला होता.
२८ वर्षांपूर्वी पोलिसांनी केला होता एन्काउंटर
तारीख ७ एप्रिल १९९१. मुंबईतल्या आग्रिपाड्यात १३ वर्षीय मुलीवर बलात्काराची घटना घडली होती. बाली नांदिवडेकर -वय २७ वर्षं आणि बाबा परमेश्वर -वय २८ वर्षं असे दोन आरोपी तेव्हा 'बाबा-बाली' नावानं ओळखले जायचे. या प्रकरणातील आरोपींचा खात्मा करणाऱ्या अंबादास पोटे आणि सुधीर निरगुडकर या पोलीस अधिकाऱ्यांनी द एशियन एजच्या पत्रकार वृषाली पुरंदरे यांना तेव्हाचा घटनाक्रम सांगितला होता. नांदिवडेकर आणि परमेश्वर यांनी घरापर्यंत मुलीचा पाठलाग केला. त्यानंतर मुलीच्या वडिलांना पकडून ठेवलं. दोघांनाही मारून टाकण्याची धमकी दिली आणि मुलीला दारू, गांजा पाजून तिच्यावर आळीपाळीनं बलात्कार केला. या घटनेनं मुंबई हादरली होती. तत्कालीन डीसीपी अरूप पटनाईक यांनी दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी एक पथक तयार केलं. त्यात अंबादास पोटे आणि सुधीर निरगुडकर होते. नांदिवडेकर आणि परमेश्वर कलिन्यात आणखी एका गुन्ह्यासाठी येणार आहेत, अशी माहिती या पोटेंना मिळाली होती. त्यानुसार दोघेही कलिन्यात आरोपींची वाट पाहत लपून बसले. पोटेंना मिळालेली माहिती खरी ठरली होती. दोन्ही आरोपी तिथं आले. मात्र दोघंही कलिन्यातल्या अरूंद भागात घुसले. एका क्षणी आरोपींना कळलं की पोलीस आपला पाठलाग करतायत, कारण निरगुडकर पोलीस वर्दीतच होते. दोघेही पळू लागले. आम्ही त्यांना थांबण्याचं आवाहन केलं. आम्ही तिथं कुठलीच कारवाई करू शकत नव्हतो, कारण तो गर्दीचा परिसर होता, असं पोटेंनी पुरंदरेशी बोलताना सांगितलं होतं. त्याचवेळी पोटेंसोबत असलेले पोलीस कॉन्स्टेबल बाबा राणे हे दोन्ही आरोपींचा वेगवान पाठलाग करत होते. त्याचवेळी नांदिवडेकरनं बाबा राणेंच्या छातीवर चॉपरनं हल्ला केला आणि ते रक्तानं माखले. इतर पोलिसांनी त्यांना जवळील हॉस्पिटलला हलवलं. काही वेळानं परमेश्वरनं निरगुडकरांवर चॉपरनं हल्ला केला. तेही त्यात जखमी झाले. बाबा-बालीच्या या प्राणघातक पाठलागावेळी निरगुडकर आणि पोटेंनी त्यांच्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या आणि त्यात दोन्ही आरोपी जमिनीवर कोसळले.
२८ वर्षांपूर्वी मुंबईत या दोन्ही आरोपींना ठार करण्यात आलं होतं. त्यानंतर अंबादास पोटे पुढे डीसीपी म्हणून निवृत्त झाले, तर सुधीर निरगुडकर सध्या मेघवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. ही एक घटना झाली. मात्र, मुंबई शहरानं याआधीही एन्काउंटरचा अनुभव घेतला होता आणि तोही एक-दोन नव्हे तर शेकडोवेळा. गँगवॉर, गँगस्टर, डॉन, माफिया, मर्डर, स्मगलिंग हे शब्द मुंबई शहरात तेव्हा नेहमीचे झाले होते, असा तो क्रूर काळ होता. मात्र, यातल्या फक्त एन्काउंटरशी संबंधित बोलायचं झाल्यास, त्याची सुरुवात होते मन्या सुर्वेपासून.
मुंबईतलं पहिलं एन्काउंटर
मनोहर अर्जुन सर्वे उर्फ मुंबईतला एकेकाळचा कुख्यात गुंड मन्या सुर्वे. दादरमधील कीर्ती कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतलेल्या मन्या सुर्वेनं १९७०-८० दशकात मुंबईतल्या गुन्हेगारी विश्वात दबदबा निर्माण केला होता. दाऊद इब्राहिमला आव्हान देणारा डॉन म्हणून मन्या सुर्वेची ओळख निर्माण झाली होती. १० जानेवारी १९८० रोजी मुंबईतल्या आंबेडकर कॉलेजबाहेरच्या ब्युटी पार्लरजवळ मन्या त्याच्या गर्लफ्रेण्डसोबत आला होता. "आम्हाला मन्याला मारायचं नव्हतं. त्याला अटक करून न्यायापर्यंत पोहोचवायचं होतं. पण तिथल्या परिस्थितीनं स्वसंरक्षणासाठी आम्हाला बंदूक चालवावी लागली," असं मन्या सुर्वेचा एन्काउंटर करणारे माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांनी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितलं होतं. मन्या सुर्वेचा एन्काउंटर हा मुंबईसह देशातला पहिला एन्काउंटर मानला जातो.
१९८३ ची बॅच
मुंबईच्या या एन्काउंटर हिस्ट्रीतली मैलाची दगड ठरली ते १९८३ ची बॅच. वरिष्ठ पत्रकार हुसैन झैदी यांनी हिंदुस्तान टाइम्समधील लेखात १९८३ च्या बॅचला 'किलर बॅच' म्हटलंय. या बॅचनं मुंबईतील गुन्हेगारी विश्वात धडकी भरवली होती. प्रदीप शर्मा, प्रफुल्ल भोसले, विजय साळसकर, रवींद्र आंग्रे, अस्लम मोमीन या अधिकाऱ्यांना नाशिक पोलीस ट्रेनिंग स्कूलमधूये विशेष प्रशिक्षण देण्यात आलं होतं. ही बॅच १९८४ साली सेवेत दाखल झाली. प्रदीप शर्मा हे यंदाच्या विधानसभा निवडणुकीला उभे राहिले, तेव्हा (१८ ऑक्टोबर रोजी) बीबीसी मराठीनं निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्याशी बातचीत केली होती. त्यावेळी १९८३ च्या बॅचबद्दल बोलताना अरविंद इनामदार म्हणाले होते, "१९९०च्या दशकात मुंबईतील गँगवॉर खूप वाढलं होतं. त्यावेळी खास पथकं तयार केली. दाऊद इब्राहिमवर पहिल्यांदा धाड टाकून, तीन-साडेतीन कोटींचं सोनं जप्त केलं. नंतर अरुण गवळी, छोटा शकीलला अटक केली. त्यावेळी हे सर्व अधिकारी उत्तम काम करत होते. हे सर्व ग्रेट फायटर्स होते. त्यांना प्रशिक्षणच तसं दिलं होतं. दंगल, स्फोट, दहशतवादी हल्ला इत्यादी वेळी काय करावं, याचं नीट प्रशिक्षण दिलं होतं, तयारी करून घेतली होती. असंही इनामदार म्हणाले होते. अरविंद इनामदार यांचं नुकतंच ८ नोव्हेंबर २०१९ रोजी निधन झालं.
धगधगतं ऐंशीचं दशक
१९८३ ची बॅच सेवेत आली, त्याचवेळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम देश सोडून पळून गेला होता. मुंबई मात्र गँगस्टर आणि माफियांशी झुंज देत होतीच. त्यामुळं १९८३ ची बॅच दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरुण गवळी यांच्या गँगशी लढा देत होती. "ऐशींच्या दशकात अंडरवर्ल्ड मोठ्या प्रमाणात होतं. म्हणजे, दाऊद इब्राहिम, अमर नाईक आणि अरुण गवळी यांच्या मोठ्या टोळ्या होत्या. आर्थिक गोष्टींवरून हे गँगवार सुरू होतं. त्यामुळं ज्यांना आपण एन्काउंटर म्हणतो, ते याच काळात अधिक सुरू झालं. ऐंशीच्या दशकात गोदीमधून स्मगलिंग चालायचं. त्यावेळी दुबईच्या कपड्यांना प्रचंड मागणी असायची. त्यावेळी हे कंटेनरच्या कंटेनर पळवायचे. त्यातून या टोळ्या तयार झाल्या. त्यातून मग आर्थिक व्यवहारातून गँगवार सुरू झाला. मात्र, हुसैन झैदी हे मुंबईतल्या एन्काउंटरच्या काळाची नव्वदीआधी आणि नव्वदीनंतर, अशी विभागणी करतात. नव्वदीच्या आधी एन्काउंटर तुरळक प्रमाणात व्हायचे. म्हणजे १९८२ साली इशाक बागवान यांनी मन्या सुर्वेला ठार केलं, १९८७ साली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काटधरेंनी रमा नाईकला ठार केलं, १९८७ साली पोलीस उपनिरीक्षक इमॅन्युअल अमोलिक यांनी मेहमूद कालिया यांना ठार केलं. मात्र, नव्वदीनंतर आणि विशेषत: १९९३ च्या स्फोटानंतर मुंबईत एन्काउंटर हे नेहमीचे झाले. त्यानंतर १९९५ साली पोलीस अधिकारी आर. डी. त्यागींनी गुन्हे शाखा आणि विभागीय उपायुक्तांना आदेश देऊन प्रत्येक विभागातील १० वॉन्टेड गुन्हेगारांची यादी तयार करायला सांगितली.
दुसरीकडे, तत्कालीन डीसीपी सत्यपाल सिंग आणि तत्कालीन डीसीपी परमबीर सिंग यांनी एन्काउंटर स्क्वॉड तयार केले, ज्यात १९८३ च्या बॅचचे अनेक अधिकारी होते. प्रफुल्ल भोसले, विजय साळसकर आणि प्रदीप शर्मा अशांकडे या स्क्वॉडचं नेतृत्त्व देण्यात आलं. या अधिकाऱ्यांना ताकद देण्यात आली आणि या तिन्ही अधिकाऱ्यांनी मुंबईतल्या माफियांविरोधात लढा सुरू केला. १९९३ नंतर मुंबईतली गँगवर संपवण्यासाठी पोलीस विभाग आणि तत्कालीन राजकीय नेतृत्त्वांनी केलेल्या प्रयत्नांमुळं हे संपुष्टात येण्यास सुरुवात झाली १९९८ नंतर गँगवार कमीच झालं, कारण तोपर्यंत काही गँगस्टरना पोलिसांनी ठार केलं होतं, तर दाऊद, छोटा राजनसारखे अनेकजण परदेशात पळून गेले होते. मात्र, परदेशातही या टोळ्याचं गँगवर कुठे ना कुठे सुरूच राहिलं. छोटा राजनवरील लंडनमधील हल्ला हा त्याचाच प्रकार होता.
'एन्काउंटर स्पेशालिस्ट'
पुढे हे अधिकारी 'एन्काउंटर स्पेशालिस्ट' म्हणून नावाजले. मात्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांच्यानुसार "पोलीस विभागात 'एन्काउंटर स्पेशालिस्ट' अशी काहीच गोष्ट नसते. सगळ्यांना सारखंच प्रशिक्षण दिलं जातं. एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी काही गोष्ट नसली तरी या अधिकाऱ्यांचं खबऱ्यांचं नेटवर्क मोठं होतं. त्याचा फायदा यांना कारवाईत व्हायचा. असं नेटवर्क सगळ्यांकडेच नसायचं. पोलीस विभागात 'एन्काउंटर स्पेशालिस्ट' अशी पदवी किंवा विशिष्ट गोष्ट नसली तरी त्यांच्या धाडसामुळं बाहेर त्यांची तशी ओळख निर्माण होते. अशा गोष्टींसाठी मनोबल कणखर असायला हवं तरच अशा कारवाया केल्या जातात. प्रत्येक एन्काउंटरची चौकशी होत असते, त्यावेळी पुरावे सादर करावे लागतात, आपली बाजू मांडावी लागते. त्यामुळे धाडस आणि मनोबल असल्याशिवाय कुणीही हे करू शकत नाही. अन्यथा, मुंबईत इतके पोलीस होते, सगळ्यांनीच हे का केले नाही. नेमक्याच जणांनी पुढाकार घेतला आणि अशा कारवाया केल्या, मुंबईतल्या गँगवॉरला संपवण्यासाठी प्रदीप शर्मा, दया नायक, सचिन वाझे, रवींद्र आंग्रे, विजय साळसकर यांच्यासारख्या अनेक मोठ्या अधिकाऱ्यांची नावं अग्रक्रमाने पुढे येतात.
पोलीस अधिकाऱ्यांमधील अंतर्गत वाद
मुंबईतल्या एन्काउंटरची जशी चर्चा झाली तशी एन्काउंटर स्पेशालिस्टमधील वादांचीही झाली. त्यातला गाजलेला वाद म्हणजे प्रदीप शर्मा विरुद्ध विजय साळसकर यांचा. काही दिवसांपूर्वी प्रदीप शर्मा यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना साळसकर आणि माझ्यात जमत नाही, हे माध्यमांनी जे पसरवलं होतं, असं सांगितलं होतं. तसं खरंतर काहीच नव्हतं. आमची भांडणं फक्त खबऱ्यांवरून व्हायची. त्याचा खबरी असेल तर मी त्याला ट्रॅप करायचो, माझ्या बाजूला वळवायचा प्रयत्न करायचो. माझे खबरी तो वळवायचा. अबोला असं काही नव्हतं, ते म्हणाले
शहीद विजय साळसकर हे माझे जिवलग मित्र होते. पोलीस प्रशिक्षणात आडनावाच्या पहिल्या अक्षरापासून स्क्वॉड तयार केले जातात. त्यांचं साळसकर आणि माझं शर्मा आडनाव, त्यामुळं १९८३ मध्ये पोलीस प्रशिक्षणासाठी आम्ही एकाच स्क्वॉडमध्ये होतो. वर्षभर एकत्र राहिलो, मुंबईत आल्यानंतरही बरीच वर्षं एकत्र होतो. क्राईम ब्रांचलाही आम्ही एकत्र काम केलंय. काही मोठमोठे ऑपरेशनही आम्ही एकत्र केलेत. विजय साळसकरांसोबत केलेली कामं आजही आठवतात. सगळ्यांत जास्त इन्फर्मेशन नेटवर्क असणारा अधिकारी म्हणून आजही विजय साळसकरांना मी मानतो. माझ्यापेक्षा शंभर पटीनं जास्त नेटवर्क त्यांचं होतं, असं शर्मा यांनी त्या मुलाखतीत बोलले होते.
वादातला एन्काउंटर
मात्र जिथे एन्काउंटर हा शब्द आला, तिथे वाद येणारच. मुंबईतलेही बरेच एन्काउंटर वादग्रस्त ठरले. त्यातील लखन भैय्या एन्काउंटरची सर्वाधिक चर्चा झाली. २००९ साली रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैय्या यांच्या हत्येप्रकरणी प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह एकूण १३ पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, चार वर्षं ठाणे मध्यवर्ती कारागृहात काढल्यानंतर ३०१३ साली प्रदीप शर्मांची सुटका झाली.
महाराष्ट्रातील पहिला एन्काउंटर अहमदनगरमध्ये!
मन्या सुर्वेचा एन्काउंटर हा महाराष्ट्रातील पहिला एन्काउंटर मानला जात असला तरी काहींच्या मते तसं नाहीय. मन्या सुर्वेचा एन्काउंटर हा मुंबईत नोंद झालेला पहिला एन्काउंटर आहे. मात्र महाराष्ट्रात याआधीही एन्काउंटर झाला होता. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे गावगुंड असलेल्या किसन सावजी याचा एन्काउंटर करण्यात आला होता. पीएसआय वसतं गिरीधर ढुमणे यांनी सावजीचा खात्मा केला होता.
Subscribe to:
Post Comments (Atom)
अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!
शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...
-
"शी S...S... कर्नाटकातली ही घटना अत्यंत शरमेची, किळसवाणी आणि धक्कादायक आहे, जनता दलाच्या प्रज्ज्वल रेवण्णा या खासदारानं तब्...
-
"तुम्हाला ट्राफिक हवालदारनं पकडलंय का? तो पैसे डायरेक्ट घेत नाही, एक टपरी असते, तिथं तो पैसे द्यायला लावतो. भाजप हा ट्राफिक...
-
"आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करताना त्यांची वैविध्यपूर्ण वाटचाल डोळ...
No comments:
Post a Comment