"धर्म जागवणाऱ्या बाबी आपण मनापासून श्रद्धेनं करतो. ते गरजेचंही आहे. पण आजही सर्वधर्मसमभाव वा धर्मनिरपेक्षता याचं अवडंबर माजवून 'परमेश्वराला रिटायर करा!' असं म्हणणारी माणसंही आढळतात. ते एकीकडं आपण सानेगुरुजींचे अनुयायी असल्याचं सांगतात तर दुसरीकडं गुरुजींच्याच 'साधने'तल्या विचारांना हरताळ फासतात. प्रभू रामचंद्राशी मित्र-सखा म्हणून गप्पा मारणारे सानेगुरुजींचे विचार 'साधने'तूनच संपविले जाताहेत. ही शोकांतिका आहे. या विचित्र परिस्थितीत गुरुजींचा विचार हा किती मोलाचा आहे याची अनुभूती येईल. यासाठी पुन्हा नव्यानं सानेगुरुजी वाचायला हवेत, अनुभवायला हवेत. अनुकरण करायला हवंय. साधना साप्ताहिकाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्तानं हा संकल्प करायला काय हरकत आहे!"
------------------------------------------------
*सा* ने गुरुजींनी मूल्यात्मक समाजप्रबोधनाचं व्रत डोळ्यांसमोर ठेवून एका समर्पित ध्येयवादानं स्थापन केलेल्या साधना साप्ताहिकानं नुकतंच अमृतमहोत्सवी वर्धापनदिन साजरा केलाय. त्यानिमित्तानं साने गुरुजींच्या विचारांना दिलेला हा उजाळा! १५ ऑगस्ट १९४७ हा भारताप्रमाणे जगाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा दिवस आहे. कारण त्या दिवशी केवळ भारत नव्हे, तर एक-षष्टांश मानवता स्वतंत्र झाली. स्वातंत्र्यलढ्यात अनेक ध्येयवादी तरुण सहभागी झाले होते आणि त्या साऱ्यांच्या मनात त्या दिवशी ‘शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट’ हीच भावना होती. त्या पहाटेचा लालिमा क्षितिजावर रेंगाळत होता. त्याच ध्येयभारल्या काळात ‘साधना’ साप्ताहिकाचा जन्म झाला. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाच साने गुरुजींनी स्थापन केलेले ‘साधना’ही अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करतेय. ‘मराठी वृत्तपत्रांचा इतिहास’ या ग्रंथात रा. के. लेले यांनी म्हटल्याप्रमाणे, स्वातंत्र्यपूर्व काळातही साने गुरुजींनी खानदेशातून काही काळ ‘कॉंग्रेस’ नावाचं वृत्तपत्र चालवलं होतं. ते अल्पकाळच टिकलं. पुढे गांधीहत्येनंतर गुरुजींनी केलेल्या २१ दिवसांच्या उपोषणाच्या काळात त्यांनी १० फेब्रुवारी १९४८ पासून ‘कर्तव्य’ नावाचं सायंदैनिक मुंबईत सुरू केलं होतं. पण तेही जेमतेम चार महिने चाललं. त्यानंतर ‘साधना’ साप्ताहिकाचा छापखाना आणि प्रत्यक्ष पत्र मुंबईत उभं राहू शकलं, ते साने गुरुजी सत्कार निधीच्या रूपानं जो पैसा उभा करण्यात आला होता त्याच्या जोरावर! त्यांच्याच संपादकत्वाखाली १५ ऑगस्ट १९४८ रोजी ‘साधना’चा पहिला अंक प्रकाशित झाला. दुर्दैवानं त्यानंतर लवकरच ११ जून १९५० रोजी गुरुजींनी आपली जीवनयात्रा संपवली. आपल्या अखेरच्या पत्रात त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार आचार्य जावडेकर आणि रावसाहेब पटवर्धन यांनी ‘साधना’च्या संपादकपदाची धुरा सांभाळली. १९५५ साली जावडेकर निवर्तले आणि सर्व जबाबदारी रावसाहेब पटवर्धनांवर आली. त्यानंतर ‘साधना’ साप्ताहिक पुण्याला आले आणि पटवर्धन यांनी संपादकपद सोडल्यावर यदुनाथ थत्ते संपादक बनले, ते १९८० सालापर्यंत! पुढे ना. ग. गोरे, वसंत बापट, ग. प्र. प्रधान, दाभोलकर अशा कर्तृत्ववान संपादकांची मालिकाच ‘साधना’ला लाभली!" आज विनोद शिरसाठ हा तरुण त्यांची धुरा सांभाळतोय!
साने गुरुजी ही सदविचारांची, सदभावनेची साक्षात मूर्ती होती. गुरुजींना जेव्हा जाणवलं, आपला विचार, आपली भावना आपल्या भोवतीच्या माणसांनासुद्धा उमजू शकत नाही तेव्हा गुरुजींनी आपल्या जीवनालाच पूर्णविराम दिला. गुरुजी गेले आणि मग गुरुजींच्या सदभावनेवर, सदविचारांवर आणि गुरुजींच्या स्मृतीवरही गिधाडवृत्तीच्या शहाजोगांचे थवे तुटून पडले असं मला वाटू लागलंय. महात्मा गांधींचा खून गांधीद्वेष्ट्यांनी केला आणि गांधीतत्त्वाचा खून गांधीभक्तांनी केला. त्याचप्रमाणे सानेगुरुजींचीही ससेहोलपट साधनशुचितेच्या गजरात केली जातेय. सानेगुरुजींबद्धल लिहिताना पु. ल. देशपांडे यांनी जे लिहिलंय त्याचा प्रत्येकानंच विचार करण्याची गरज आहे, असंही मला वाटतंय. सानेगुरुजींना ज्यांनी मानलंच नाही, त्यांची कुचेष्टा करण्यातच ज्यांना आनंद वाटत होता अशांना सोडून द्या, पण जे स्वतःला सानेगुरुजींचे चेले, चाहते वा अनुयायी म्हणवून घेतात त्यांनी तरी पु. ल. देशपांडे यांच्या म्हणण्याचा विचार करायला हवाय. पु. ल. म्हणतात, 'गुरुजींचा जर कोणता दोष असेल तर त्यांना घाऊक तिटकारा करता येत नाही. हा जर दोष मानायचा असेल तर माझं काही म्हणणं नाही. 'राजकारण' या नावाखाली आपल्या बुद्धीशी, संस्कृतीशी, संस्काराशी किंवा आपल्या विचारांशी व्यभिचार चालतात; त्यांना जर आपण गुण मानत असू तर गुरुजींना नाही मानलं तरी चालेल. ढोंगीपणानं गुरुजींना मानू नये. जर मानायचं असेल तर गुरुजींच्या ज्या काही श्रद्धा होत्या त्या मानाव्या लागतील. प्रेमात आणि राजकारणात सगळंच काही चालतं अशा प्रकारची पळवाट काढून जगणार असाल तर तिथं गुरुजींचं नाव घेण्याचा अधिकार आपण गमावलाय असं स्वच्छ कबूल करा!' पण सानेगुरुजींचा ठेका आपल्याकडं आहे असा ठेका धरणारे अशी कबुली कशी देतील?
साने गुरुजी देव मानणारा देवमाणूस होता. आपल्या 'साधना' साप्ताहिकातूनच गुरुजींनी लिहिलंय, 'मी माझ्या मनाच्या मित्राशी म्हणजे प्रभू रामचंद्राशी बोलू लागलो. त्याला सांगितलं, देवा, मला कीर्ती नको, पैसा नको, काही नको. माझे हे क्षुद्र जीवन, ही अल्प जीवितवेली आपल्या कार्यक्षेत्रात चांगली होवो. ती निर्मळ राहो. ही एकच मनापासून माझी प्रार्थना आहे!' प्रभू रामचंद्राशी मित्र म्हणून संवाद साधणारे गुरुजी कुठे आणि परमेश्वराला रिटायर्ड करायला सांगणारे कुठे? गुरुजींची आई गेल्यानंतर हिंदू धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याबद्धल गुरुजींनीच 'श्यामची आई'मध्ये जे काही लिहिलंय ते अंधश्रद्धा निर्मूलनाची कुऱ्हाड चालवणाऱ्या उत्साही मंडळींनी तर अवश्य वाचायला हवं. गुरुजींनी श्यामच्या रुपात म्हटलंय, 'आईच्या पिंडदानाचा दिवस आला. आईच्या पिंडांना कावळा पटकन शिवेल की नाही, तिची काही इच्छा राहिली असेल का, असे विचार माझ्या मनात येत होते. पिंडाला कावळा शिवला नाही तर मृतात्म्याला शांती नाही असं म्हणतात. आम्ही नदीवर गेलो. पिंड तयार केले. सर्व विधी झाले. ते पिंड दर्भावर ठेवले. नदीवर कावळा दिसेना. भटजींनी काव काव करून कावळ्यांना आमंत्रण दिले... कावळे पिंडाजवळ बसत, शिवत ना. काय करावे? पिंडाभोवती घिरट्या घालत, स्पर्श करीत ना. मला वाईट वाटू लागले. मी म्हटले, 'आई! तुझी इच्छा असेल तर मी लग्न करीन. मी वैरागी होणार नाही!' पिंडदानाच्या प्रसंगी कसले रे हे विधी करता! ह्या अंधश्रद्धेनं फक्त भटांचं आणि कावळ्यांचं साधतं, असं म्हणून गुरुजींनी आपलं परखड पुरोगामीत्व प्रदर्शित केलं नाही. गुरुजी म्हणत, 'मी माणसांच्या डोक्यात नाही रिघत, त्यांच्या मनात रिघतो!' माणसाचं मन ठोकरून डोकेफोड करणारे ते नव्हतेच! गुरुजींनी 'श्यामची आई'ला स्मृतिश्राद्ध म्हटलंय ही गोष्टही त्यांच्या वारसदारांनी लक्षात हवी. सानेगुरुजींनी स्वातंत्र मिळाल्यानंतर तीन वर्षांच्या आतच आपलं जीवन संपवून टाकलं. महात्मा गांधींच्या विचारावर निष्ठा ठेवून गुरुजींनी आपल्या जीवनाची वाटचाल केली. १९२१ सालापासूनच खादी वापरत, स्वहस्ते सूत कातत. १९३० साली शाळेतली नोकरी सोडून कॉंग्रेस कार्यकर्ते म्हणून सत्याग्रह आंदोलनाच्या प्रचारात सहभागी झाले. त्यांना अटक झाली. १९३६ साली काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनासाठी तर त्यांनी जिवापाड मेहनत केली. गाव गाव, घर घर फिरून त्यांनी काँग्रेस लोकांच्या हृदयात बसवली. त्यांनी 'काँग्रेस' नावाचं साप्ताहिकही काढलं होतं. महात्मा गांधीचे विचार लक्षात न घेता देशाची फाळणी झाली, स्वातंत्र्य आलं, त्याबरोबरच दंगली आणि कत्तली यांचा हलकल्लोळ उठला. गुरुजींनी याच सुमारास काँग्रेस सोडली. ते समाजवादी पक्षाचं काम करू लागले. त्यासाठीच त्यांनी 'साधना' साप्ताहिक सुरू केलं. म्हणजे सानेगुरुजींनी व्यक्त केलेले राजकीय आणि सामाजिक विचार प्रामुख्यानं स्वातंत्र्यपूर्व काळातले वा स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दोन-अडीच वर्षातले सामाजिक, राजकीय परिस्थितीच्या अवलोकनातून अभ्यासातून बनलेले आहेत, ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल.
आज सर्वच पक्षाच्या बनेल राजकारण्यांनी आणि मतलबी मस्तवालांनी जो सर्वधर्मसमभावाचा आव आणला आहे तो गुरुजींनी मानला असता, असं मला वाटत नाही. अल्पसंख्याक म्हणून आज आपलं वेगळं अस्तित्व पुढे रेटत प्रत्येक गोष्टीत जो आडमुठेपणा केला जातोय तोही गुरुजींनी कधी खपवून घेतला असता, असंही मला वाटत नाही. समाजाला शिकवण्यासाठी, प्रसंगी महात्मा गांधींच्या म्हणण्याचाही आदरपूर्वक अस्वीकार करून प्राण पणाला लावण्याएवढा कणखर निर्धार गुरुजींनी दाखवला होता. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली या देशातल्या बहुजनांवर कुरघोडी करण्याचे मतलबी राजकारण खेळणाऱ्यांना गुरुजींनी साथ दिली नसती. गुरुजींना भारतीय राष्ट्रीयतेला आकार देण्यासाठी जातीधर्मनिरपेक्ष वातावरण या देशात हवं होतं. हा देश नाना भेदांनी खिळखिळा करण्यासाठी होत असलेला धर्मनिरपेक्षतेचा वापर गुरुजींनी धिक्कारलाच असता, नव्हे त्यासाठी संघर्षही मांडला असता. गुरुजींनी 'साधना'तूनच एका प्रसंगी म्हटलंय, 'मानवतेला धरून कायदे करताना कोणत्याही धर्माला आड येऊ देता कामा नये. भारतात स्त्रियांना स्वातंत्र्य हवं. हिंदू भगिनींचे आणि मुस्लिम भगिनींचे घुंगट जायला हवेत. मुसलमानांनीही एकापेक्षा अधिक बायका करू नयेत. ते म्हणतील, आमच्या धर्माला हात घालता? तर त्यांना नम्रपणे सांगावं की, कृपा करून पाकिस्तानात जा. अरबस्तानात स्त्रियांची संख्या अधिक होती म्हणून पैगंबरांनी तशी सूट दिली. हे कायदे त्रिकालाबाधित नसतात. मानव्याची विटंबना होता कामा नये. भारतातली स्त्री, मग ती कोणत्याही धर्माची असो, तिला आपण मुक्त झालो असं वाटलं पाहिजे. हिंदू कोड बिल, मुस्लिम कोड बिल असं न करता, सर्वांना बंधनकारक असा मानवतेचा कायदा करा!' सर्वधर्मसमभावाचा गजर करत अल्पसंख्याक म्हणून आपली आडमुठी घोडी पुढे दामटणाऱ्यांना अलगपणाची भावना ठेवणं ही राष्ट्राशी, मानवतेशी प्रतारणा आहे, असं गुरुजींनी बजावलं असतं. धर्मासंबंधात नाके मुरडण्याची सवय आमच्या सर्वधर्मसमभावींना लागलीय, पण धर्म हे कर्म सुधारण्याचं सर्वात प्रभावी हत्यार आहे. धर्मामुळेच माणसात माणूसपण जागवता येतं. गुरुजींना याची शिकवण त्यांच्या आईकडून मिळाली होती.
कोकणात दापोलीला शाळेसाठी गुरुजी काही दिवस राहात होते. तिथं त्यांनी डोक्यावर केस वाढवले होते. त्या काळात मुलांनी, विशेषतः विद्यार्थ्यांनी असे केस राखणं वडीलधाऱ्यांना मान्य नव्हतं. गुरुजी सुट्टीत घरी आले. त्यांच्या डोक्यावरचे केस बघून वडील रागावले. त्यांनी डोकं तासडून घेण्याचा आदेश दिला. गुरुजी रागावले. आईनं त्यांना विचारलं, 'आई-बापाना बरं वाटावं म्हणून हजामत करण्यासही तू तयार नसावेस. आई-बापांच्या धर्मभावना दुखविल्या जाऊ नयेत म्हणून इतकंही तू करू नयेस का?' त्यावर गुरुजींनी म्हटलं, 'केसात कसला ग आहे धर्म?' आई म्हणाली, 'धर्म प्रत्येक गोष्टीत आहे. काय खावं, काय प्यावं यातही धर्म आहे. केस तरी तू का रे ठेवतोस? मोहच तो. मोह सोडणं म्हणजे धर्म!' आणि मग गुरुजी श्यामच्या आईची कथा ऐकणाऱ्या आपल्या साथींना म्हणतात, 'मित्रांनो! माझ्या आईला त्यावेळेस मला नीट पटवून सांगता आलं नसेल; परंतु आज मला सारं कळतंय. प्रत्येक गोष्टीत धर्म आहे. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणं, सत्य, हित आणि मंगल यासाठी करणं म्हणजेच धर्म. बोलणं, चालणं, बसणं, उठणं, ऐकणं, देखणं, खाणं, पिणं, झोपणं, न्हाणं, धुणं, लेणं, सर्वात धर्म आहे. धर्म म्हणजे हवा, धर्म म्हणजे प्रकाश. आपल्या जीवासी धर्माची हवा कुठंही गेली तरी हवी!' मला वाटतं, गुरुजींचं 'श्यामची आई' या सगळ्या निधर्मी सज्जनांनी वाचायला हवी. अगदी रोजच्या रोज! सानेगुरुजी पुन्हा नव्यानं समजून घ्यावेत एवढे खरंच महत्वाचे आहेत का? राजकीय संघटना आणि राजकीय विचारप्रणाली यांच्या भूमिका आणि दृष्टीकोन यातला साचेबद्धपणा ओलांडून समाज समजून घेण्याची सानेगुरुजी आठवण आहेत. राजकीय संघटनेचा कार्यकर्ता होणं म्हणजे आपल्या सत्सदविवेकबुद्धीशी फारकत घेणं नव्हे, आपल्या प्रश्न विचारण्याच्या अधिकारावर पाणी सोडणं नव्हे, आपल्याला उमगलेल्या सत्याला बाजूला सारणं नव्हे ही आठवण सानेगुरुजींची राजकीय कारकीर्द करून देते. राजकीय निष्ठा किंवा बांधीलकी सर्वंकष असू शकत नाही, असता कामा नये याचा परिपाठ सानेगुरुजींच्या आयुष्यात दिसतो.
सानेगुरुजी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी होते, कॉंग्रेसचे सदस्य होते, मात्र १९३६ मध्ये स्थापन झालेल्या प्रांतिक स्तरावरच्या कॉंग्रेस सरकारच्या शेतकरी आणि कामगारविषयक धोरणांची कठोर समीक्षा करताना त्यांनी कच खाल्ली नाही. राष्ट्रीय प्रश्नांवर एकमत व्हावं यासाठी सामाजिक समता आणि सामाजिक न्याय यांना दुय्यमत्व देणं त्यांना मान्य नव्हतं. शेतकरी, कामगारांच्या लढ्यात ते कम्युनिस्टांच्या सोबत होते मात्र भारताच्या स्वातंत्र्यासाठी पूरक भूमिकेपेक्षा रशियाधार्जिणी भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी भारतीय कम्युनिस्टांवर जोरदार टीका केली. ते समाजवाद्यांचे साथी होते, मात्र धर्माविषयीच्या त्यांच्या जाणीवांवर रामकृष्ण परमहंस यांच्या दृष्टीचा प्रभाव होता. धर्म म्हणजे काय हे समजून न घेता तो नाकारणं त्यांना मान्य नव्हतं. ते भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म यांच्या जीवनदृष्टीचे निस्सीम चाहते होते, मात्र हिंदू म्हणून जन्माला आल्यानं आपोआप ती दृष्टी आत्मसात होते आणि आपोआप आपण महान होतो, हा भ्रम ते नाकारत होते. हिंदू धर्मातली उदारता प्रकट करण्यासाठी आपल्याला आपला व्यवहार आमूलाग्र बदलावा लागेल, याची ते वारंवार आठवण करून देत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल त्यांना आदर होता आणि त्याचवेळी या कार्याला पूरक आणि तरीही वेगळ्या भूमिका घेताना त्यांनी संकोच बाळगला नाही. महात्मा गांधींच्या विचारांचे ते पाईक होते, मात्र महात्मा गांधींच्या राजकीय निर्णयांचे आज्ञापालन करण्याऐवजी स्वतःचा ‘आतला आवाज’ ऐकत गांधींच्या सूचनांचा आज्ञाभंग करणं त्यांनी अधिक रास्त मानलं. विचारप्रणालीनं आखून दिलेल्या शिस्तीच्या बाहेर विचार करण्याचं धारिष्ट्य सानेगुरुजींनी वारंवार दाखवलं. आजच्या भाषेत सांगायचं तर ‘आऊट ऑफ बॉक्स’, ‘इनोव्हेटिव्ह थिंकिंग' करण्याची प्रचंड उर्जा सानेगुरुजींकडे होती. अशाप्रकारच्या चिंतनातून निर्माण होणारे प्रश्न विचारण्याची निर्भयताही त्यांच्याकडे होती. असे अडचणीचे प्रश्न विचारणारे सानेगुरुजी आणि त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न त्यांच्या समकालीनांना भाबडे वाटले. सानेगुरुजींना राजकारणातलं काही कळत नाही असं त्यांनी ठरवलं आणि सानेगुरुजींनीही ते मान्य केलं. त्यांच्या आयुष्याच्या शेवटी शेवटी त्यांनी लिहिलेल्या पत्रात ‘पॉलिसी, थिअरी, लाईन काय आहे माझ्याकडं?’ हा विषादाचा स्वर सातत्यानं उमटताना दिसतो. यातला दुःखाचा भाग असा की आजही आपल्याला सानेगुरुजींचं मूल्यमापन करताना आपण स्वीकारलेल्या चौकटीला तपासून पहावंसं वाटत नाही. आपली विचारांची चौकट, आपली राजकीय विचारधारा, आपल्याला समजलेलं सत्य परिपूर्ण आहे यावर आपल्या सर्वांचा आत्यंतिक आणि ठाम विश्वास आहे. त्यामुळे सानेगुरुजींच्या नेणीवेत आपल्याला ब्राह्मण्य दिसतं, त्यांच्या धर्मविषयक जाणिवांत आपल्याला छुपं हिंदुत्व दिसतं. सत्यापेक्षा विचारप्रणालीशी प्रामाणिक राहाण्याचा आपला अट्टाहास एवढा आहे की सानेगुरुजी किंवा त्यांच्यासारख्या ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करणाऱ्या व्यक्तीचे मुद्दे गांभीर्यानं घेण्यापेक्षा ‘तिचे वैचारिक गोंधळ आहेत’ असा निवाडा करणं आपल्याला अधिक प्रशस्त वाटतं. अशा प्रकारची शेरेबाजी न करता आणि त्याचवेळी स्वतःच्या भावना दुखावून न घेता चिकित्सकपणे सानेगुरुजींकडं आणि खरंतर आपल्या सगळ्याच भूतकाळाकडं बघण्याची गरज आहे.
हरीश केंची,
९४२२३१०६०९
No comments:
Post a Comment