Saturday, 20 May 2023

सिद्धरामय्यांचा राज्याभिषेक....!

"काल सिद्धरामय्यांचा मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा राज्याभिषेक झालाय. ज्या मल्लिकार्जुन खर्गेना बाजूला सारत सिद्धरामय्या पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले, त्याच पक्षाध्यक्ष खर्गेच्या मदतीनं डी.के.शिवकुमार यांच्या ते वरचढ ठरलेत. आधी लोकदल, मग जनता पक्ष, जनता दल, जनता दल-सेक्युलर त्यानंतर काँग्रेस असा त्यांचा राजकीय पक्ष प्रवास घडलाय. दहा वर्षांपूर्वी ज्या अवस्थेत होते त्याच स्थितीत आज ते आलेत. तेव्हा समोर आव्हानं कमी होती आज ती वाढलीत. मजबूत विरोधीपक्ष सर्व आयुधं घेऊन उभा आहे. प्रशासन भ्रष्टाचारानं पोखरलेलंय. पक्षानं लोकांना भरमसाठ आश्वासनं दिलीत. त्याच्या पुर्ततेची गॅरंटीही दिलीय. केंद्राची वक्रदृष्टि असताना सत्ता सांभाळणं ही तारेवरची कसरत आहे. जनतेनं आणि पक्षानं त्यांच्यावर विश्वास दाखवलाय. त्यात ते खरे उतरतात की नाही हे पाहावं लागेल!"
--------------------------------------------

*काँ*ग्रेसच्या विरोधात आपला राजकीय प्रवास सुरु करणारे ७५ वर्षीय सिद्धरामय्या कर्नाटकातले काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा लोकांसमोर येताहेत. काँग्रेसनं जमिनीवरचे नेते म्हणून त्यांच्यावर राज्याची जबाबदारी सोपवलीय. सिद्धरामय्या यांचा राजकीय प्रवास अधिक रोमांचक आहे. १९८३ दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन काँग्रेस मुख्यमंत्री गुंडूराव यांनी जनतेचा विश्वास गमावला होता. 'जनता पक्षाची उमेदवारी म्हणजे विजयाची खात्री' असं त्यावेळी वातावरण होतं. त्यामुळं जनता पक्षाकडं उमेदवारीसाठी इच्छुकांची झुंबड उडालेली होती. त्यात सिद्धरामय्याही होते. त्यांनी वरिष्ठांकडं प्रयत्नही चालवला होता. पक्षात त्यांची बाजूनं ज्येष्ठ नेते अब्दुल नजीर होते. अध्यक्ष असलेल्या एच.डी.देवेगौडा यांनी मात्र सिद्धरामय्यांना विरोध केला. ते डाव्या विचारसरणीचे आणि मागासवर्गीय असल्यानं देवेगौडा त्यांना महत्व देऊ इच्छित नव्हते. कारण सिद्धरामय्यांनी कधीच देवेगौडांच्या दरबारात हजेरी लावलेली नव्हती. सिद्धरामय्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. नाराज सिद्धरामय्या आपले राजकीय गुरू अब्दुल नझीर यांच्याकडं आले. त्यांच्या सांगण्यावरून सिद्धरामय्यांनी मग म्हैसूरच्या चामुंडेश्वरी इथून अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. सिद्धरामय्यांनी 'शेतकऱ्यांचे वकील' म्हणून तेव्हा नावलौकिक मिळवलेला होता. त्यांनी काँग्रेसचे जयदेव राजेंचा ३ हजार मतांनी पराभव केला. १९८३ ला त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली. ९५ आमदारांचा जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष बनला. त्यांना बहुमतासाठी १८ आमदारांची गरज होती. सीपीआय आणि सीपीएमच्या तीन तीन आमदारांनी जनता पक्षाला पाठिंबा दिला. सिद्धरामय्यासह २२ अपक्ष निवडून आले होते. त्यातल्या अनेकांनी जनता पक्षाला पाठींबा दिल्यानं रामकृष्ण हेगडे हे मुख्यमंत्री बनले. हेगडेंनी सिद्धरामय्यांना कन्नड भाषा समितीचे अध्यक्ष बनवलं. सत्तेच्या राजकारणातलं हे त्यांचं पहिलं पाऊल ठरलं.
सिद्धरामय्यांच्या राजकीय वाटचाल समजून घेण्यापूर्वी देवेगौडा यांनी त्यांच्याबद्धल काय म्हटलं होतं ते पाहू या. देवेगौडा प्रचंड चिडलेले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, श्रवणबेळगोळा इथं झालेल्या महाअभिषेक दरम्यान आपल्याला त्यांनी बोलू दिलं नाही. सिद्धरामय्यांची विचारसरणी संकुचित आहे. त्यांना राजकारणात पुढं आणून आपण खूप मोठी चूक केलीय! अशी टीका केली. इंग्रजी वृत्तपत्रांनी याला मोठी प्रसिद्धी दिली. नंतर बंगळुरुत प्रेसक्लबमध्ये बोलताना देवेगौडांच्या त्या वक्तव्याचा जोरदार प्रतिवाद केला. सिद्धरामय्या म्हणाले, एस.आर.बोम्मई, रामकृष्ण हेगडे, एम.पी.प्रकाश यांच्या सामूहिक नेतृत्वाखाली जनतापक्षानं निवडणूका जिंकल्यात. केवळ देवेगौडा यांच्यामुळं हे यश मिळालेलं नाही. आमच्या सर्वांच्या मेहनतीनंच सत्ता आली, त्यानंतरच ते मुख्यमंत्री बनले नंतर प्रधानमंत्री देखील झाले. मला राजकारणात पुढं आणण्यात देवेगौडा यांचा कोणताही हातभार लागलेला नाही. रामकृष्ण हेगडे यांनी माझ्यातल्या कार्यकर्त्याला जाणलं आणि सत्तेत संधी दिली. १९८३ मध्ये सिद्धरामय्यांनी अपक्ष निवडणूक लढविली, १९८५ च्या निवडणूक दरम्यान ते जनता पक्षात आले. या निवडणुकीत रामकृष्ण हेगडेंच्या नेतृत्वाखाली जनता पक्षानं १३५ जागा जिंकल्या. हेगडेंनी दुसऱ्यांदा निवडून आलेल्या सिद्धरामय्यांना आपल्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री बनवलं. त्यानंतरच्या एस.आर. बोम्मई सरकार मध्येही ते मंत्री राहिले. इथं सिद्धरामय्या यांचं म्हणणं खरं ठरतं. पण ही झाली नाण्याची एक बाजू. १९९४ मध्ये देवेगौडा जनता दलाची धुरा सांभाळत होते. त्यावेळी जनता दलात दोन गट पडले. एक गट देवेगौडा यांचा तर दुसरा रामकृष्ण हेगडेंचा! तोवर सिद्धरामय्या देवेगौडांच्या गटात सामील झाले होते. १९९४ च्या निवडणुकीत जनता दलाला ११५ जागा मिळाल्या. स्पष्ट बहुमत मिळाल्यानं मुख्यमंत्रीसाठी रस्सीखेच सुरू झाली. शेवटी हरकिसनसिंग सुरजित आणि बिजू पटनाईक यांच्या मध्यस्थीनं देवेगौडा मुख्यमंत्री बनले. इथूनच  हेगडेंच्या राजकारणाच्या अस्ताला प्रारंभ झाला. देवेगौडांच्या मंत्रिमंडळात सिद्धरामय्या अर्थमंत्री बनले. ते तेव्हा देवेगौडांच्या अत्यंत जवळचे समजले जाऊ लागले.
१९९६ दरम्यान एक नाटकीय घटना घडली आणि देवेगौडा यांचं नशीब फळफळलं. ज्योती बसुंचे पाय खेचल्यानंतर देवेगौडा प्रधानमंत्री बनले. देवेगौडा दिल्लीत गेल्यानं कर्नाटकात मुख्यमंत्री कोण होणार याचा संघर्ष सुरू झाला. देवेगौडांना वाटत होतं की, त्यांच्या विश्वासातल्या नेत्याकडं मुख्यमंत्रीपद जायला हवं. कारण त्यांना मिळालेलं प्रधानमंत्रीपद हे फार दिवस टिकणार नाही ते अळवावरचं पाणी आहे, म्हणून त्यांना परतल्यानंतर कर्नाटकातले दरवाजे उघडे हवे होते. इकडं हेगडेंचं म्हणणं होतं की, प्रधानमंत्रीपदासाठी मुख्यमंत्रीपदाचं बलिदान देवेगौडांना करायला हवं. मे १९९६ च्या अखेरीस जनता दल आणि संयुक्त मोर्चा यांच्यात तणाव झाला. १ जूनला वाजपेयीना बहुमत सिद्ध करायचं होतं. देवेगौडा संयुक्त मोर्चाचे नेते होते. वाजपेयी पायउतार कधी होतात याची प्रतिक्षा देवेगौडा करत होते. कर्नाटकात त्यांचा उत्तराधिकारी नेमण्यावरून संघर्ष सुरू झाला. जनता दलात फूट पडणं परवडण्यासारखं नव्हतं. त्यावेळी विधानसभेत ३४ लिंगायत आमदार जनता दलात होते. त्यांच्या मते वक्कलिंग समाजाचे देवेगौडा लिंगायत समाज आणि त्यांच्या आमदारांशी दुजाभाव करतात. जे.एच पटेल यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी हेगडे गट हेच म्हणत होता. इकडं देवेगौडा सिद्धरामय्या यांच्या नावाचा आग्रह धरत होते. सिद्धरामय्या हे कुरुबा म्हणजे आपल्या धनगर समाजाचे होते. सामाजिक न्यायासाठी देवेगौडा सिद्धरामय्या यांचं नाव पुढं रेटत होते. जे.एच.पटेल, सिद्धरामय्या यांच्याशिवाय पी.जी.आर. सिंधिया, सी. बैरागौडा, आर.व्ही.देशपांडे हेही शर्यतीत होते. ११५ पैकी ८० आमदार सिद्धरामय्यांच्या पाठीशी होते. २९ मे १९९६ ला नेता निवड शांततेत व्हावं यासाठी दिल्लीतून शरद यादव यांना पाचारण केलं. विधिमंडळ सदस्यांची बैठक बोलावली. देवेगौडा, सिद्धरामय्या निश्चित होतें. त्यांनी व्यवस्थित मोर्चेबांधणी केली होती. मात्र बैठकीत मोठा संघर्ष झाला; देवेगौडा मतदानासाठी आग्रही होते. हेगडेंचा गट मात्र तयार नव्हता. हा वाद सोडविण्यासाठी पाच सदस्यांची समिती नेमण्याचं ठरलं. देवेगौडा,  हेगडे, बोम्मई, प्रदेशाध्यक्ष इब्राहिम आणि शरद यादव यांचा त्यात समावेश होता. हेगडेंनी पक्षात फूट पाडण्याची धमकी दिली. हेगडे ३४ लिंगायत आमदारांना घेऊन बाहेर पडले असते तर देवेगौडा प्रधानमंत्री पदापासूनही दुरावले असते शिवाय मुख्यमंत्री पदावरही पाणी सोडावं लागलं असतं. सिद्धरामय्यासाठी सारं काही पणाला लावायला देवेगौडा तयार नव्हते. अखेर त्यांना जे.एच. पटेल यांच्या नावाला संमती द्यावी लागली. इथं सिद्धरामय्या यांचा पत्ता कापला गेला. ८० आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे, त्यामुळं मुख्यमंत्रीपद आपल्यालाच मिळेल अशा खुशीत सिद्धरामय्या बैठकीला गेले. तिथं देवेगौडांचा सूर बदललेला होता. हेगडेंनी सिद्धरामय्यांची समजूत काढली. त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं गेलं. सिद्धरामय्या शांत राहिले.
१९९९ ला जनता दलात फूट पडली. जे.एच.पटेल, शरद यादव, नितीशकुमार जनता दल युनायटेड-जेडीयुत दाखल होऊन त्यांनी भाजपशी युती केली. भाजपच्या विरोधात उभं ठाकलेल्या देवेगौडांनी आपल्या पक्षाचं नाव ठेवलं जनता दल सेक्युलर-जेडीएस. अशा नाजूक अवस्थेत सिद्धरामय्या देवेगौडांच्या पाठीशी उभे राहिले. २००४ च्या निवडणुकीत त्रिशंकू विधानसभा निर्माण झाली  भाजप ७९ आणि काँग्रेसनं ६५ जागा मिळवल्या आणि ५८ जागा मिळवलेल्या जेडीएसच्या हाती सत्तेच्या किल्ल्या आल्या. जेडीएस आणि काँग्रेस यांची युती झाली, महाराष्ट्रातल्या फार्म्युल्याप्रमाणे काँग्रेसला मुख्यमंत्रीपद आणि जेडीएसला उपमुख्यमंत्रीपद द्यायचं निश्चित झालं. काँग्रेसचे धरमसिंग मुख्यमंत्री तर सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री बनले. देवेगौडांच्या परिवाराचा सत्तेत सहभाग असावा यासाठी देवेगौडांचे पुत्र जे.डी.रेवण्णा यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. आमदार असलेले दुसरे पुत्र कुमारस्वामी यांच्याकडं पक्षाची सूत्रं सोपवली. वर्षभरात त्यांनी पक्षावर पकड बसवली. मात्र त्यांचं लक्ष उपमुख्यमंत्रीपदावर होतं. त्यांनी सिद्धरामय्या यांना लक्ष्य केलं. त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या. कुमारस्वामी पक्ष कार्यालयात बसून परस्पर निर्णय घेत आणि सिद्धरामय्यांच्याकडं त्याच्या अंमलबजावणीचे आदेश देत. सिद्धरामय्या यांनी त्याकडं दुर्लक्ष केलं. दोघांमधला वाद वाढत गेला. थोरले देवेगौडा यात लक्ष घालतील, मुलाला समजावतील असं सिद्धरामय्यांना वाटत होतं. मात्र त्यांनी कुमारस्वामीच्या कारवायांना मुकसंमती दर्शवली. अखेर सिद्धरामय्यांनी बंड पुकारलं. २५ जुलैला हुबळीत अहिंदा रॅली काढली. मागासवर्गीय, दलित यांच्या एकजुटीला कानडीत 'अहिंदा' म्हटलं जातं. या रॅलीतल्या पिवळ्या झेंड्यावर लिहिलं होतं. 'अंडू देवराज अर्स, इंडू सिद्धरामय्या!' याचं मराठी अनुवाद होतं, 'तेव्हा देवराज अर्स आणि आता सिद्धरामय्या!' २००५ ला सिद्धरामय्यांना विधिमंडळ नेते पदावरून हटवलं गेलं. त्यांच्या जागी एम.पी.प्रकाश आले. पक्षविरोधी कारवाया करतात म्हणून सिद्धरामय्यांना पक्षातून काढून टाकलं. समर्थकांचं 'अहिंदा आंदोलन' म्हैसूरमध्ये हिंसक बनलं २० हून अधिक बसेसना आगी लावल्या गेल्या. अनेक ठिकाणी पोलिसांनी गोळीबार केला. इकडं सिद्धरामय्या देवेगौडांवर टीकेच्या फैरी झाडत होते. केवळ मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीपासून आपल्याला दूर ठेवण्यासाठीच देवेगौडा काँग्रेससोबत गेलेत. कुमारस्वामीना पुढं आणण्यासाठी आपल्याला दूर करताहेत. असा आरोप केला.

२००५ मध्ये जेडीएस विरोधात दुसरं बंड सिद्धरामय्यांनी केलं. त्यांनी सी.के.इब्राहिम, बी.के पाटील, सी.नरसिंहप्पा यांना आपल्याकडं वळवलं. नवा पक्ष काढला, 'अखिल भारतीय प्रगतिशील जनता दल...!' कर्नाटकाला हे नांव तसं परिचित होतं, कारण २००२ मध्ये रामकृष्ण हेगडें आणि एस.आर.बोम्मई यांनी याच नावानं पक्ष काढला होता. नंतर त्यांनी जेडीएसमध्ये तो विलीन केला. इकडं कुमारस्वामीचा प्रशासनात हस्तक्षेप वाढला, त्यांच्या कारवायांनी मुख्यमंत्री धरमसिंगही त्रासले. २००५ मध्ये पंचायत समित्यांच्या निवडणुकीत त्यांनी संधी साधली आणि सिद्धरामय्यांच्या पक्षाला काँग्रेसनं पाठिंबा दिला. त्यानंतर दोन महिन्यांतच कुमारस्वामीनं काँग्रेसला दिलेला पाठिंबा काढून घेतला आणि भाजपशी युती करून स्वतः मुख्यमंत्री बनले. जेडीएस-भाजप युती ही सिद्धरामय्यांसाठी संधी होती. ते समजून चुकले होते की, आपल्या पक्षाला समर्थन मिळणार. पक्ष विसर्जित केला आणि २१ जुलै २००६ ला दिल्लीला प्रयाण केलं. इथं कर्नाटकात वावड्या उठू लागल्या. २२ जुलैला सिद्धरामय्या काँग्रेस मुख्यालयात पोहोचले, त्यांनी काँग्रेस सदस्यता स्वीकारली. त्यासाठी खुद्द सोनिया गांधी, मनमोहनसिंग हजर होते. काँग्रेसप्रवेशानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, 'आपण कोणत्याही पदासाठी काँग्रेसप्रवेश केलेला नाही. मला कर्नाटकात चाललेल्या जेडीएस आणि भाजपच्या अनैतिक कारभाराला संपवायचं आहे. पण मला कोणतीच राजकीय महत्वाकांक्षा नाही असं नाही! राजकारणात येणारा प्रत्येकजण काही ना काही बनण्यासाठी येतो. आम्ही संन्यासी नाही...!' हे सांगत असताना त्यांच्यामागे उभे होते मल्लिकार्जुन खर्गे, एच.के.पटेल, धरमसिंग व इतर नेते. सिद्धरामय्यांनी काँग्रेसविरोधात आपलं राजकीय जीवन सुरू केलं होतं. २० वर्षाहून अधिक काळ त्यांनी काँग्रेसला विरोध केला. २००८ मध्ये कर्नाटकात धरमसिंग हे जरी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष असले तरी पक्षाची धुरा सिद्धरामय्यांच्याकडं होती. दोन्ही युत्या तोडलेली जेडीएस संकटात होती. सिद्धरामय्यांनी जेडीएसच्या बालेकिल्ल्यात जाऊन जेडीएसला आव्हान दिलं. धरमसिंग हैद्राबाद कर्नाटकातले मोठे नेते होते. ते तिथं काँग्रेसला मजबूत करत होते. २००८ मध्ये तिरंगी लढतील भाजपला ११० जागा मिळाल्या, तर काँग्रेसनंही ८० जागा जिंकल्या. मात्र  २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपयश आलं. २८ पैकी केवळ ६ जागा मिळाल्या. सिद्धरामय्या या निकालांनी खुश होते. या सहापैकी दोघे त्यांना राज्यात आव्हान देत होते. एक होते धरमसिंग ते बिदरमधून लोकसभेवर निवडून गेले. दुसरे मल्लिकार्जुन खर्गे जे गुलबर्गातून निवडून आले. एस.एम.कृष्णा २००८ मध्ये राज्यसभेत गेले होते. आता सिद्धरामय्यांच्या समोर एकमेव आव्हान होतं ते डी.के.शिवकुमार यांचं! पक्षानं त्यांना कार्यकारी अध्यक्ष बनवलं.

२०१३ ची निवडणुक ही सिद्धरामय्यासाठी एक सुवर्णसंधी होती. भाजपनं २००८ ते २०१३ तीन मुख्यमंत्री दिले. दरम्यान यडीयुरप्पानी भाजपपासून अलग होत नवा पक्ष काढला. त्या निवडणुकीत १२२ जागा मिळवून काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलं. पक्षानं निवडणुकीपूर्वीच सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलं होतं. तरीही २०१३ मध्ये मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे मुख्यमंत्री होणार होते. सात वर्षांपूर्वी देवेगौडांच्या पक्षातून काढून टाकण्यात आलेल्या सिद्धरामय्या यांनी खर्गे यांच्यावर मात करत मुख्यमंत्री बनले. तेव्हाही अशीच स्थिती होती जशी आज आहे. तेव्हाही दोघे शर्यतीत होते. एक मल्लिकार्जुन खर्गे जे केंद्रात मंत्री होते आणि दुसरे होते सिद्धरामय्या, केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली, जी.परमेश्वर यांचीही नावं चर्चेत होती. एकमत न झाल्यानं पक्षानं ए.के.अँटनी, मधूसुदन मिस्त्री, व्हीलिरीओ आणि जितेंद्रसिंग यांना पर्यवेक्षक म्हणून पाठवलं. आमदारांच्या मतांमुळं सिद्धरामय्या मुख्यमंत्री बनले. जे खर्गे पक्षात नव्यानं आलेल्या सिद्धरामय्यांकडून पराभूत झाले होते. ते आज अशा भूमिकेत आहेत की, ते सिद्धरामय्यांचं राजकीय आयुष्य संपवू शकत होते. पण त्यांनी सिद्धरामय्यांच्या पारड्यात आपलं वजन टाकलं. पूर्वी १३ मे २०१३ रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची पहिल्यांदा शपथ घेतली. पाचवर्षाचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला. तब्बल ४० वर्षांनंतर असं घडलं होतं. देवराज अर्स यांच्यानंतर ते दुसरे मुख्यमंत्री बनले ज्यांनी ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. पाच वर्षानंतर २०१८ मध्ये काँग्रेस-जेडीएसच्या युतीत पुन्हा सत्तेत आली. मुख्यमंत्री कुमारस्वामी बनले. वर्षभरानंतर भाजपनं सत्ता हिसकावून घेतली आणि सिद्धरामय्या विरोधीपक्षनेते बनले. सिद्धरामय्या हे एक मास लीडर आहेत  केवळ आपल्याच नाही तर सर्व जातीतल्या मतदारांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. असं असूनही त्यांनी मागच्यावेळी दोन मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यांच्या पारंपरिक चामुंडेश्वरीमधून त्यांचा पराभव झाला होता. पण बादामधून ते विजयी झाले होते. आता ते वरुणातून निवडणुक लढवली आणि यश संपादन केलंय. काल दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. त्यांना शुभेच्छा...!!
हरीश केंची,
९४२२३१०६०९




No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...