अजित अनंतराव पवार हे महाराष्ट्र राज्यातले एक महत्वाचे राजकारणी आहेत. त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी नगर जिल्ह्यातल्या देवळाली प्रवरा इथं त्यांच्या आजोळी झाला. त्यांचं बालपण बारामतीला गेलं. त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण देवळाली, प्रवरा, नगर इथं पूर्ण केलं. ते पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातल्या काटेवाडी या गावाचे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत. अजितदादा पवार हे शरद पवारसाहेब यांचे मोठे बंधू अनंतराव पवार यांचे पुत्र आहेत. अनंतरावांनी प्रारंभीच्या काळात प्रख्यात चित्रपट निर्माते, व्ही. शांताराम यांच्या मुंबईतल्या राजकमल स्टुडिओसाठी काम केलं होतं. अजितदादा पवार यांचे आजोबा गोविंदराव पवार हे बारामती सहकारी सोसायटीत नोकरी करत होते आणि त्यांच्या आजी शारदाबाई पवार ह्या कौटुंबिक शेतीची देखभाल करीत होत्या. त्याचबरोबर त्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याही होत्या. त्यामुळं त्यांच्यावर पुरोगामी विचारांचे संस्कार झालेले आहेत. अजितदादांचे महाराष्ट्रातले माजी मंत्री पदमसिंह पाटील यांच्या भगिनी सुनेत्रा निंबाळकर पाटील यांच्याशी विवाह झालाय. त्यांना पार्थ आणि जय अशी दोन मुलं आहेत. अजितदादांनी पहिल्यांदा १९८२ साली जेव्हा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवड झाली तेव्हापासून अजितदादांच्या सक्रिय राजकारणाला प्रारंभ झाला. १९९१ मध्ये ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले, तेव्हापासून जिल्ह्याच्या राजकारणात वावरू लागले. तब्बल १६ वर्षे ते या पदावर कार्यरत राहिले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकास कामे केली. या काळात ते बारामतीतून लोकसभेचे खासदार म्हणूनही निवडले गेले. पण दिल्लीतलं राजकारण त्यांना भावलं नाही. मग त्यांनी देशाचे संरक्षणमंत्री बनलेले आपले काका शरद पवार यांच्यासाठी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी राज्यस्तरावरच राजकारण करायचं असा निर्धार केला आणि राज्य हेच आपलं कार्यक्षेत्र म्हणून निवडलं. सन १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४आणि २०१९ मध्ये बारामतीतून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून सतत निवडून आले आहेत. २०१९ मध्ये त्यांनी भाजपसह सर्व विरोधी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करून निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी २०१० ते २०१४ आणि २०१९ ते २०२१ असे दोन वेळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहीलंय. अजित पवार हे एका राजकीय प्रतिथयश कुटुंबाचे सदस्य आहेत. शरद पवार यांच्यासारख्या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून ते आले आहेत. त्यांचे काका शरद पवार हे आज तब्बल ६० वर्षे सक्रियपणे देशाच्या राजकारणातले प्रमुख सन्माननीय नेते राहिले आहेत. अजित पवार यांनी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून कॉमर्स पदवी संपादन केली आहे. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून व्यवसाय प्रशासन या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यांनी राज्य सरकारतल्या अनेक विभागांमध्ये विविध पदांवर काम केलेलं आहे. जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. पवार त्यांच्याकडं असलेल्या प्रशासकीय कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा प्रशासनावर जबरदस्त पकड आहे. राज्यातले वेगवेगळे सिंचन प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याचं श्रेय त्यांना जातं. पण जलसंपदामंत्री असताना सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले होते. कामामध्ये अनियमिततेच्या आरोपांसह अन्य वादांमध्येही ते अडकले होते. २०१९ मध्ये अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते २३ ते २६ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ८० तासांपेक्षा कमी काळ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात सर्वात कमी कालावधीचे ते उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्या या निर्णयानं सारे आश्चर्यचकित झाले होते. पुढे चार दिवसांनी त्यांनी वैयक्तिक कारण देत या पदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीनं सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी ते दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. कार्यक्षम प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक असला, तरीही कामाप्रमाणे त्यांची राजकीय कारकीर्द ही वाद, भ्रष्टाचाराच्या आरोपांसाठी प्रसिद्ध आहे. उपमुख्यमंत्रीपदासह त्यांना जलसंपदामंत्री, वित्त आणि नियोजन मंत्री अशा अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम करण्याचा अनुभव आहे. अजित पवार त्यांच्या एकूण राजकीय कारकिर्दीत अनेकदा वादात सापडले. २०१३ मध्ये महाराष्ट्र राज्य सिंचन प्रकल्पांचे कंत्राट देण्याच्या संदर्भात पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पुढे महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्यांना या आरोपांतून मुक्त केलं. अजित पवार हे त्यांच्याकडं असणारी हुशारी आणि राजकीय कुशाग्र बुद्धीसाठी लोकप्रिय आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सर्वांचा पाठिंबा मिळवून देण्याची त्यांच्याकडं क्षमता आहे. वादग्रस्त विधानांमुळं ते नेहमी चर्चेत असतात. भ्रष्टाचाराचे आरोप आणि अन्य बेकायदेशीर कामांमध्ये असलेल्या कथित सहभागावरुन त्यांच्यावर टिका होत असते. असं असूनही ते महाराष्ट्राच्या राजकारणातले एक महत्त्वपूर्ण लक्षवेधी नेते आहेत. राज्यामध्ये त्यांचे खूप समर्थक आहेत. त्यांच्याकडं एक सक्षम नेतृत्व आहे. त्या बळावरच ते मुख्यमंत्री होण्याची क्षमता राखून आहेत.
अजित पवारांच्या राजकिय जीवनातल्या काही घडामोडी या प्रामुख्यानं सांगाव्याच लागतील, त्याशिवाय त्यांच्या व्यक्तिमत्वाचं योग्य मूल्यमापन होणार नाही. म्हणून हे काही दाखले देतो आहे. अजित पवार यांनी १४ एप्रिल २०१३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी कराड इथं यशवंतरावांच्या समाधीस्थळी आत्मक्लेश उपोषण केलं होतं. ते त्यांनी केलेल्या धरणातल्या वक्तव्याबाबत! त्यांनी जे म्हटलं होतं, त्यातून प्रसिद्धीमाध्यमातून आणि जनतेतून प्रचंड रोष प्रकट झाला होता. त्यासाठीचा हा आत्मक्लेश होता. त्या आत्मक्लेशाबरोबरच त्यांनी यशवंतराव चव्हाणसाहेब समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता, त्यांचं जीवनचरित्र अभ्यासायला हवं होतं, त्यांचं राजकीय आणि प्रशासकीय कार्यकुशलता समजून घ्यायला हवी होती, दुर्दैवानं त्यांचा अभ्यास करण्याची वृत्ती असतानादेखील त्यांनी तो केला नसावा असं वाटतं. त्याचमुळं दहा वर्षांनंतरही पुन्हा त्यांना शरद पवारांच्या राजीनाम्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांच्या समोर येऊन कार्यकर्त्यांची जाहीर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली. त्यावेळी त्यांनी घेतलेली भूमिका ही योग्य जरी असली तरी, कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं ते उद्धट, उर्मटपणाचं वागणं होतं. शरद पवारांच्या राजीनाम्यानं कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या होत्या, ते हळवे बनले होते. अशावेळी त्यांना समजावून, त्यांची समजूत काढणं गरजेचं असताना अजितदादांचं दरडावणं अनेकांना रुचलं नव्हतं. अनेकांनी खासगीत तसं बोलूनही दाखवलं होतं. त्यांनी याबाबत दिलगिरी मागितली पण त्याचाही काही उपयोग झाला नाही, कारण जे निसटायचं ते निसटून गेलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचं व्हायचं ते नुकसानही होऊन गेलं. ते सावरणं एवढंच हाती राहिलं. अजित पवार यांच्या राजकारणाचा एकूण अभ्यास करताना थेट त्यांच्या नांदेडच्या सभेपाशी जावं लागतं. जिथं भर सभेत त्यांना जाहीरपणे प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराकडं जेव्हा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे कॅमेरे वळले, तेव्हा त्यांनी माध्यमांवर तोंडसुख घेतलं होतं. माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी दंडुक्याची भाषाही वापरली आणि त्यांचा शब्द प्रमाण मानून तिथं उपस्थित पोलिस अधिकाऱ्यानं संबंधित पत्रकाराला सभेतून बाहेर काढलं. त्यानंतर पत्रकार संघटनांनी अजित पवार यांच्यावर बहिष्काराचं अस्त्र उपसलं. त्याचवेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही बहिष्कार घालण्याचा आततायीपणा पत्रकारांनी केला. दोघांनीही या बहिष्काराला किंमत दिली नाही. शेवटी शरद पवार यांनी दिलगिरी व्यक्त करून प्रकरणावर पडदा टाकला होता. त्यानंतर इस्लामपूरजवळच्या एका सभेत चौदा वर्षांपूर्वी अजित पवार यांनी तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांना तंबाखू खाण्यावरून जाहीरपणे बरंच झापलं होतं आणि त्यानंतर चार दिवस प्रसारमाध्यमांनी नुसता गोंधळ घातला होता. त्यावर ‘अजित पवार हे आपले बंधुतुल्य मित्र आहेत आणि त्यांना तसं बोलण्याचा अधिकार आहे...!’, असं आर.आर.पाटील यांनी जाहीरपणे सांगितलं आणि त्या विषयावर पडदा टाकला. त्याचवेळी आर.आर.पाटील यांनी, ‘चौकटीच्या बातमीची हेडलाइन होऊ लागल्यामुळं गोंधळ वाढतोय..!’, अशी टिपण्णीही केली होती आणि ती प्रसारमाध्यमांच्या बदलत्या स्वरुपावर बोट ठेवणारी होती. त्याचीच पुनरावृत्ती दहा वर्षांपूर्वी झाली. तासगाव अर्बन बँकेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात तासगाव इथं बोलताना अजित पवारांनी गाव आणि तालुका पातळीवरच्या राजकारणासंदर्भात बोलताना 'टगेगिरी'चा उल्लेख केला होता. ‘एकवेळ आमदार-खासदार म्हणून निवडून येणं सोपं असतं; मात्र, तालुका पातळीवर निवडून येण्यासाठी खूप काही करावं लागतं. त्यासाठी गावानं ओवाळून टाकलेले टगे किंवा अर्कच कामी येतात. मी तालुका पातळीवर निवडून आलो आहे... त्याअर्थी मीही टग्याच आहे...!’ असं ते मिश्कीलपणे म्हणाले होते. ग्रामीण भागातल्या समारंभात गमतीनं केलेल्या या विधानावर कॅमेरे लावून बसलेल्यांनी गहजब केला आणि त्यानंतर तमाम इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी अजित पवारांच्या कोणत्याही कृतीसाठी ‘टगेगिरी’ हे विशेषण कायमचं जोडून टाकलं होतं.
त्यानंतर इंदापूर तालुक्यातल्या निंबोळीच्या सभेतल्या धरणासंदर्भातल्या वक्तव्याचंही तसंच झालं. गावाकडच्या सभेत विनोद करण्याच्या भरात तिथं अजित पवारांची जीभ घसरली. ग्रामीण ढंगात बोलताना भलतंच बोलून गेले. तिथं प्रसिद्धीमाध्यमातले कुणीच नव्हतं. पण इंदापूरच्या त्यांच्या परममित्रांनी त्या भाषणाची व्हिडीओ क्लिप वेगानं मुंबईत वृत्तवाहिन्यांना पोहोचवल्याचा इतिहासही सर्वज्ञात आहे. अजित पवाराचं ते वक्तव्य राज्यकर्त्याला शोभा देणारं नव्हतं, परंतु चूक लक्षात आल्यानंतर तीनदा माफी मागूनही अनेकांचं समाधान झालं नाही. पंचवीस वर्षे सार्वजनिक जीवनात असलेल्या एका नेत्याची संपूर्ण राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलल्यासारखी प्रसारमाध्यमं कामाला लागली होती. प्रसारमाध्यमांतल्या शहरी मानसिकतेच्या विशिष्ट वर्गातल्या मंडळींनी कोंडीत पकडून अजित पवारांना जेरीला आणलं होतं. अजित पवारांनीच नव्हे, तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या तमाम नेत्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ‘टवाळा आवडे विनोद’ अशी धारणा असलेले रामदासांचे अनुयायी नैतिकतेचे संरक्षक बनून सगळीकडं लक्ष ठेवून आहेत, तेव्हा बोलताना, उदाहरणं देताना किंवा विनोद करताना खूप काळजी घ्यायला हवी! मात्र एवढं सारं घडूनही अजितदादा त्याबाबत खबरदारी घेत नाही, बेधडकपणे बोलण्याचा त्यांचा स्वभाव त्या आड येतो. हे इथं लक्षांत घेतलं पाहिजे! अजित पवारांच्या राजकीय कारकीर्दीतला ऐतिहासिक निर्णय म्हणजे पुण्याच्या लाल महालातल्या दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्याचा! अजित पवार होते म्हणूनच हा पुतळा हटवण्याचा निर्णय अंमलात येऊ शकला, दुसऱ्या कुठल्या नेत्याकडून ते शक्यच नव्हतं. या कृतीमुळं त्यांनी छत्रपती शिवरायांच्या इतिहासातलं एक प्रदूषित पान कायमचं फाडून टाकलं. शिवरायांच्या जीवनातल्या बदनामीची कुजबूज संपवून टाकली. परंतु हाच निर्णय अनेकाच्या जिव्हारी लागला आणि अजित पवार प्रसारमाध्यमांच्या हिटलिस्टवर आले. दुर्दैव म्हणजे ज्यांच्या आग्रहाखातर अजित पवार यांनी हे धाडसी पाऊल उचललं होतं ती सगळी मंडळी मात्र अडचणीच्या काळात अजित पवारांच्या मागं उभे राहिले नाहीत. त्यांनी त्या प्रकरणातून काढता पाय घेतला!
अजितदादांचे नुकतंच न झालेलं तथाकथित बंड हे भाजपत जाण्यासाठी नाही तर पक्ष पुढे कोणाच्या नेतृत्वात चालेल, यासाठी होतं! विरोधीपक्षनेते अजित पवार हे प्रफुल्ल पटेल यांच्यासह अमित शहांना दिल्लीत भेटले, त्यांनी ४० आमदारांच्या सह्या घेतल्या या बातम्या एका विशिष्ट उद्देशानं पेरल्याचं एव्हाना अजित पवार आणि पक्षातल्या त्यांच्या निकटवर्तीयांच्या चांगलंच लक्षात आलं असावं. प्रत्यक्षात तसं काहीही घडलेलं नव्हतं. या अफवा पसरवण्याचा रस्ता भुलाभाई देसाई मार्गावरून ठाण्यापर्यंत जातो. 'जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादीतच राहणार...!' असं अजितदादांनी स्पष्ट केल्यानंतर ते पक्षातल्या तीन मोठ्या नेत्यांसह ताजमध्ये गेले. ते चहा प्यायला, खलबतं करायला गेले ही बातमी खरीच होती; पण त्यावेळी त्यांच्या मागावर असलेल्या राष्ट्रवादीच्याच एका नेत्यानं ही बातमी पद्धतशीरपणे माध्यमांपर्यंत पोहोचवली. तो नेता कोण होता हे शोधलं तर बरीच उकल होईल. स्पष्टीकरण दिल्यानंतरही अजितदादांबद्धल संशयाचं वातावरण कायम राहावं हा त्यामागचा उद्देश होता. अजित पवारांनी जे केलं ते बंड होतं; पण भाजपसोबत जाण्यासाठी नव्हतं. पक्ष पुढं कोणाच्या नेतृत्वात चालणार, अजित पवारांच्या की सुप्रिया सुळेंच्या? हा सर्वांत कळीचा मुद्दा आहे. २०१९ च्या बंडाच्या वेळी अजित पवारांच्यासोबत थेट नसलेले प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे हे बड़े नेते यावेळी सोबत होते. किंबहुना बंडापेक्षा यावेळी राष्ट्रवादीचे नेते, आमदार अधिक संख्येनं त्यांच्याभोवती एकवटलेले दिसताहेत. याचा अर्थ पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी सुप्रिया यांच्यापेक्षा अजितदादांना अधिक पसंती आहे हा मेसेज पवार साहेबांना देण्याचा उद्देश चार पाच दिवसांतल्या त्या घडामोडींमागे होता. पक्षाच्या भावी नेतृत्वाबाबत आमची पसंती अजित पवार यांना असेल असा इशाराच यानिमित्तानं पक्षातल्या नेत्यांनी थोरल्या साहेबांना दिला. सुप्रियाताईंचा आदर करू, पण नेतृत्व अजितदादांचं हवंय...!' असे संकेत दिले गेले. हे सगळं बघता अजितदादांच्या हालचालींकडं पक्षाचा उत्तराधिकारी होण्यासाठीची लढाई म्हणून बघता येईल. पुण्यातून अचानक नॉट रिचेबल होणं, कार्यक्रम रद्द करून मुंबईतल्या देवगिरी बंगल्यात थांबणं, तिथं काही नेत्यांशी चर्चा करणं, यातून त्यांनी वातावरण तापवलं ते मुळात पक्षनेतृत्वाला इशारा देण्यासाठी! राष्ट्रवादीचा जीव विधानसभा निवडणुकीत आहे आणि नेतृवाच्य या दोन पर्यायांपैकी अजित पवार हे त्यात पक्षाला अधिक चांगलं यश मिळवून देऊ शकतात, असं वाटणारे नेते त्यांच्याभोवती एकवटले असल्याचं दिसतं. त्यांच्यावर पक्षाच्या एकाही नेत्यानं नाराजी व्यक्त केलेली नाही, हेही महत्त्वाचं आहे. भविष्यात पक्ष अजितदादाकडं जाईल की सुप्रियाताईंच्या हातात? हे कळेलच!
'आपण मुख्यमंत्री होऊ शकलो नाही...!', याची खंत अजित पवारांनी सर्वप्रथम जाहीरपणे व्यक्त केली ती, दोन महिन्यांपूर्वी! एका दैनिकाच्या व्यासपीठावरच्या मुलाखतीत. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी दोन गंभीर विधानं जाहीरपणे एकाचवेळी केलीत. माध्यमांनी तिकडं जरा दुर्लक्षच केलं. पहिलं विधान होतं, 'एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्रीपदावरून जाणार...!' दुसरं होतं, '२०२४ कशाला? अगदी आताच मुख्यमंत्री होणे मला आवडणार आहे...!' हे जे आहे, ते उगाच नाही! अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे दोन महिन्यांपूर्वी लागावेत आणि आता तर उद्याही आपण मुख्यमंत्री होऊ, असं त्यांनी म्हणावं, हे एवढं साधं सोपं नव्हतं. लवकरच काही तरी घडणार असं त्यांना वाटत होतं, पण तसं घडलंच नाही. त्यानंतर 'मरेपर्यंत अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत असतील...!' असं त्यांनी म्हटलंय. तसं असेलही, पण तोवर राष्ट्रवादी कॉंग्रेस कोणासोबत असेल? की, स्वतंत्ररित्या सत्तेवर येईल, हा खरा प्रश्न आहे! आज जी चर्चा सुरू आहे, ती साधारणत: तसंच २०१९ च्या निवडणूक निकालानंतर ठरलं होतं. आताचे मध्यस्थ प्रफुल्ल पटेल हेच तेव्हा त्याचे सूत्रधार होते. पण, पावसात भिजलेल्या शरद पवारांना तेव्हा लगेच तसं करणं गैरसोईचं होतं. त्यामुळं कॉंग्रेस आणि शिवसेनेसोबत चर्चेचं गुऱ्हाळ चालू ठेवायचं. शिवसेना-कॉंग्रेसला खलनायक करायचं आणि बराच काळ जाऊ द्यायचा. 'राज्याला इतक्या दिवसांपासून सरकारच नाही...!', हाच मुद्दा तीव्रपणे मांडत राहायचा. चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि बांधापर्यंतही! त्यानंतर महाराष्ट्राच्या हितासाठी कोणतं का असेना, पण सरकार स्थापन झालं पाहिजे, असं म्हणत भाजपला पाठिंबा द्यायचा. देवेंद्र मुख्यमंत्री नसतील, एवढी अट असेल आणि राज्यात भाजप-राष्ट्रवादीचं सरकार असेल. केंद्रातही सत्तेत वाटा मिळेल. असं तेव्हाच सगळं ठरलं होतं. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं या त्यांच्या मनसुब्यावर आता पाणी फेरलं गेलंय!
२०१९ ला जेव्हा 'उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतील...!' अशी घोषणा शरद पवारांनी केली, तेव्हा काहीही अंतिम झालेलं नव्हतं. उलट ज्या बैठकीनंतर ही घोषणा पवारांनी केली, त्या बैठकीत नाराजी व्यक्त करत मल्लिकार्जुन खर्गे पवारांवर बरसले होते. सरकार स्थापन होणार नाही, हेच तेव्हा अधोरेखित झालं होतं. पण, कात्रजचा घाट दाखवण्यासाठी पवारांनी पत्रकारांना हेडलाइन देऊन टाकली. वेळकाढूपणा करायचा आणि मग साळसूदपणे भाजपला पाठिंबा द्यायचा, हे नक्की होतं. २०१४ मध्ये निकाल पूर्ण लागण्यापूर्वी शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर केला होता. तेव्हाही हे जाहीर करणारे प्रफुल्ल पटेलच होते. भाजपसोबत जायचं हे तेव्हाच ठरलं होतं. २०१९च्या निवडणुकीनंतर ते पक्कं झालं होतं. पण, काकांच्या या वेळकाढूपणालाच बापडे अजित पवार कंटाळले. ही खेळी आहे, हे लक्षात न आल्यानं ते फसले. आणि, पहाटेच.....! पण त्यांना आता पहाट म्हटलेलं आवडत नाही! राजभवनात पोहोचले. तेही काकांना न सांगता. काकांना भाजपसोबत जायचं होतंच. पण, त्यांची प्रक्रिया वेगळी होती. तिथंच सगळं फसलं. मग घड्याळाचे काटे उलटे फिरले. पवारांनी मांडलेला डाव अजित पवारांनी उधळून लावला. पुन्हा 'खंजीर खुपसला' सुरू झालं. शरद पवारच 'व्हिलन' झाले. ज्या खंजीरानं पवारांची पाठ चार दशकं सोडली नव्हती. ज्या खंजीरानं पवारांची पाठ चार दशकं सोडली नव्हती, तो खंजीर पुन्हा अवतरला. पावसात भिजून सगळे डाग धुतले गेलेले शरद पवार मग मात्र उभे राहिले आणि सरकार उभं करूनच स्वस्थ बसले. अर्थातच नायक ठरले! नंतर हे शिवसेनेच्या दुहीतून सरकार पडलं. पवार हेच गृहमंत्री असूनही, मंत्री आणि आमदार गुवाहाटीला चालल्याचं कोणाला समजलं नाही. जे व्हायचं ते झालं. गौतम अदानी पवारांना बारामतीत भेटले आणि नेमकं त्यानंतर दोन दिवसांत सरकार पडलं! शरद पवारांनी सरकार बनवलं. वाचवलं मात्र नाही. महाविकास आघाडी सरकार अखेर पडलं. अजित दादांनी भाजपसोबत सरकार बनवलं असतं तर, राज्यात घडलेलं हे सत्तासंघर्षातलं नाट्य रंगलं नसतं! आणि राष्ट्रवादी सत्तेत राहिली असती. हे त्यांच्या सहकाऱ्यांना राहून राहून वाटतं.
शिवसेनेतली एकनाथ शिंदेंची फितुरी,भाजपसोबत सत्तास्थापन, उद्धव ठाकरेंचा राजीनामा, न्यायालयात उभा राहिलेला झगडा, या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात हे शिंदे सरकार टिकणार नाही. असं सांगितलं जात होतं. न्यायालयीन निकालानंतर सरकार तरलं तरी ती मोठी नामुष्की असणार. न्यायालयाचा निकाल भाजपच्या मनासारखा लागेलाही, पण या सरकारबद्धल महाराष्ट्रात सहानुभूती नाही, असा निष्कर्ष भाजपनंच केलेल्या सर्वेक्षणातून त्यांना मिळालाय. महाविकास आघाडीनं उभं केलेलं आव्हान मोठं आहे. उद्धव ठाकरेंची प्रचंड प्रतिमा भाजपला छळते आहेच, पण पवारांनाही त्याचा आनंद नक्कीच नाही. उद्धव यांच्यावर खापर फोडून सरकार पडल्यानं, उद्धव अपयशाचे धनी होतील आणि सरकार स्थापन केल्याचं श्रेय मात्र आपल्याकडंच राहील. हा होता पवारांचा होरा. झालं मात्र उलटंच. सगळं राहिलं बाजूला, उद्धवच हीरो झाले. आज उद्धव हाच महाविकास आघाडीचा चेहरा आहे. तो कोणत्याही पवारांपेक्षा अथवा पटोले-थोरात-चव्हाणांपेक्षा मोठा झालाय.
शिवसेना फोडल्याचा भाजपलाही फार काही फायदा झालेला नाही. उलटपक्षी ते भाजपसाठी एक ओझं होऊन बसलंय. हा गोंधळ वेळीच संपवला नाही तर राज्यात भाजपची स्थिती भयंकर वाईट होईल. या स्थितीत नवी समीकरणं आकार घेत आहेत. एनडीटीव्हीवरील शरद पवारांची मुलाखत बोलकी होती.
दिल्लीतल्या विरोधकांच्या एकजूट बैठकीतही पवार नव्हते.
मध्येच उद्धव ठाकरेंसोबत त्यांची अचानक बैठक झाली.
'कुटुंबातील सदस्यांकडून भाजपसोबत यावं', असा दबाव येत असल्याचं शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले. संजय राऊत यांनी 'सामना'त तसं जाहीरपणे म्हटलंय. कुटुंबातले सदस्य म्हणजे सुप्रिया अथवा रोहित नक्कीच नाहीत. ते अर्थातच अजित पवार! अजित पवार ज्या दिवशी गायब होते, त्यानंतर त्यांची देहबोलीच बदललीय. यापूर्वीही विधिमंडळात ते जाणवत होतंच. अचानकपणे अजित पवारांचा 'टीआरपी' सध्या वाढलेलाय. आता अजित पवारांनी भाजपसोबत जावं. पहाटे फसलेला प्रयोग पुन्हा दिवसाढवळ्या करावा, अशी कल्पना होती. न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वीच हे सरकार बरखास्त करावं. नवं सरकार स्थापन व्हावं. यावेळी अजित पवार स्वतः मुख्यमंत्री असतील! अशी शक्यता वर्तवली जात होती. मुख्यमंत्री होण्याचं त्यांचं अपुरं स्वप्न अजित पवारांनाही त्रास देतेय. २००४ मध्ये कॉंग्रेसपेक्षा अधिक जागा मिळूनही केवळ अजित मुख्यमंत्री नको म्हणून काकांनी राष्ट्रवादीकडं उपमुख्यमंत्रीपद घेतल्याची त्यांची तक्रार आहे. अजित पवारांची जी एक मुलाखत प्रसिद्ध झाली, त्यात अजित पवार पहिल्यांदाच तसं स्पष्टपणे म्हणालेत. अजित पवारांना इतक्या दिवसांनंतर कंठ फुटावा, हा योगायोग नाही. हे तेव्हापासूनच शिजतंय. आता अजित पवारांचं ते अपुरं स्वप्न पूर्ण होईल तेंव्हा होईल. शिंदेच्या सेनेला बरोबर घेऊन भाजपला लोकसभेच्या निवडणुका लढवताना अडचणी येणार आहेत. पूर्वी शिवसेनेला सोबत घेऊन ४२ जागा जिंकल्या आहेत. त्या २०२४ मध्ये कमी झाल्या तर केंद्राची सत्ता हातातून जाण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी, ग्रामीण भागात वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादीला सोबत घेतलं तर अपेक्षित यश २०१४ मध्ये मिळेल म्हणूनच भाजपनं अजित पवारांवर मुख्यमंत्रीपदाचं जाळं टाकलं होतं. पण शरद पवारांच्या राजीनाम्यानं या सगळ्या प्रयत्नावर पाणी फेरलं गेलंय. अजित दादांना आता आपली इच्छापूर्तीसाठी आपली उपद्रवमूल्य अधिक जोमानं पुन्हा सुरू करावी लागतील!
चौकटीत उल्लेख केलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा कुणी जपला असेल तर तो त्यांचे मानसपुत्र असलेल्या शरद पवारांनी! यशवंतरावांचे हे वाक्य काना, मात्रा, वेलांटी, उकार आणि विरामचिन्हेसुद्धा न बदलता आज जसंच्या तसं शरद पवार यांच्याही तोंडी शोभू शकेल. परंतु अजित पवार यांच्या तोंडी ते शोभणार नाहीत. कारण शरद पवार यांच्या सहा दशकांच्या राजकीय प्रवासात अनेक चढउतार आहेत. त्यांनी स्वकर्तृत्वावर अनेक संस्था उभ्या केल्या आहेत, अनेकांना बळ दिलंय. कठिणातल्या कठीण परिस्थितीवर अनेकदा मात केलीय, अगदी मृत्युवरही! शून्यातून पुन्हा सगळं उभं केलंय. अजित पवार यांच्या कारकीर्दीत उत्कर्ष आहे तो सत्तेत असताना मिळत गेलेल्या पदांचा. बाकी सगळा उतारच आहे. सत्ता होती, तोवर त्यांचं कर्तृत्व दिसून येत होतं, सत्ता गेल्यानंतर ते निष्प्रभ झाले. गेलेली सत्ता मिळवण्यासाठी आपलं कौशल्य, ताकद पणाला लावतानाही ते कधी दिसले नाहीत. स्वत:वरच्या आरोपांचा प्रतिवादही आक्रमकपणे करू शकले नाहीत. नेता दबंग असला तरच कार्यकर्ते त्याच्यामागं उभे राहातात, परंतु अजित पवार यांची दबंगगिरी सत्तेच्या बळावर चालली होती. विरोधात ते नेहमी सत्तेच्या दहशतीखाली राहिलेत. सत्ताधाऱ्यांनीही त्याचा फायदा उचलून आपली मुळं घट्ट रोवताना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक फांद्या छाटून टाकल्या. अजित पवारांनी थोडं दक्षिणेकडं, आंध्रप्रदेशकडं वळून जगनमोहन रेड्डीकडं पाहिलं असतं तरी जनमताच्या जोरावर सत्तेला कसं भिडायचं असतं, हे त्यांना कळलं असतं. परंतु ते मैदानात उतरलेच नाहीत, त्यामुळं पाठीमागची गर्दी ओसरत गेली. निवडणुकीच्या तोंडावर ती पुन्हा गोळा करण्यासाठी शरद पवार यांना मैदानात उतरावं लागलंय, तेही राजीनाम्याच्या माध्यमातून! शरद पवार यांच्या वयाचा विचार करता पुढच्या निवडणुकीत ते आतासारखे सक्रीयपणे प्रचारात फिरू शकतील की नाही याबाबत शंका वाटल्यावाचून राहात नाही. अशा काळात राष्ट्रवादी काँग्रेसकडं खंबीर नेतृत्वाचा पर्याय असायला हवा होता. तो पर्याय अजित पवार हेच असतील असं सात-आठ वर्षांपूर्वीपासून वाटत होतं, परंतु त्यांच्या राजकारणाची घसरण पाहता आज तसं म्हणणं धाडसाचं ठरेल. अजित पवार यांना खरोखर भविष्यात पक्षाचं नेतृत्व करायचं असेल तर स्वकर्तृत्वानं ते सिद्ध करावं लागेल आणि हे सिद्ध करण्यासाठी संघटना बांधणी आणि निवडणुकीतलं यश याव्यतिरिक्त तिसरा कुठलाही पर्याय नाही. रुसवे फुगवे करून हट्ट पुरवून घेता येतात, मात्र नेता बनता येत नाही! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या हयातीतच उद्धव यांच्याकडं पक्षाची सूत्रं दिली. ती त्यांनी सक्षमपणे पार पाडल्याचं दिसून आलंय. थोरल्या पवारांनीही असंच आपल्या हयातीत अजित पवारांकडं पक्षाची सूत्रं सोपवून त्यांना सक्षम करणं गरजेचं आहे. शरद पवारांनी पक्षाची वाटचाल आपल्या नेतृत्वाशिवाय सक्षमपणे होते आहे हे सिद्ध करण्यासाठी अजित पवारांकडे द्यायला हवीत. आणि आपल्या समोरच अजित पवार मुख्यमंत्री होतील असं पाहावं!
चौकट १
राजकारण करताना नेमकं काय करावं लागतं यावर महाराष्ट्राचे लोकनेते यशवंतराव चव्हाण यांनी म्हटलं होतं "राजकारणाचा प्रपंच करताना केवळ आपल्याच लोकांचं नाही तर दुसऱ्याचंही अंतःकरण जाणून घ्यावं लागतं. आपण आणि आपले सहकारी अडचणीत तर येणार नाहीत ना याची खबरदारी घ्यावी लागते. येणारा काळ समय योग्य आहे की अयोग्य हे ओळखावं लागतं. सतत फटकळ राहून चालत नाही, प्रसंगी नम्रपणानं वागावं लागतं. योग्य लोकांची पारख करावी लागते. राजकारणात वावरणाऱ्या लोकांमध्ये प्रामाणिक आणि फितूर अशा दोन्ही व्यक्तिमत्वाची माणसं गृहीत धरावी लागतात. कुणा सहकाऱ्यांमध्ये दोष आढळला, तर तो त्याचा अवगुण मानावा लागतो. वेळप्रसंगी त्याकडं आणि त्याच्या कृत्याकडं काणाडोळा करावा लागतो. विरोधकांशी लढताना त्यांच्याच शस्त्रानं लढावं लागतं आणि तसं करणं कित्येकदा आवश्यकही असतं. व्यक्तिगत राजकारण, पक्ष, सामाजिक, राजकीय घडामोडी याबाबत दूरदर्शीपणानं काही कयास बांधावे लागतात आणि पुन्हा सर्वांना बरोबर घेऊन पुढं जावं लागतं!’ आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण यांनी मांडलेलं हे चिंतन आहे.
चौकट २
यशवंतराव चव्हाण यांनी वेळोवेळी विविध घटकांसाठी काही ना काही सांगितलंय. राजकारणासंबंधी त्यांनी म्हटलंय, ‘राजकारणात यशस्वी होणं एक कष्टसाध्य काम आहे. संघटनेतल्या कार्यकर्त्यांमध्ये स्नेहाचं जाळं विणावं लागतं, माणसं सांभाळावी लागतात, वाढवावी लागतात आणि त्यासाठी असंख्यांच्या मनाची जपणूक वर्षानुवर्ष करावी लागते. पण त्यांतले काही थोडे, पण मोठे लोक त्यांच्या महत्त्वाकांक्षेला किंचितसा ओरखडा जाताच वैरभावाचा फणा उभारतात. (चिंतन - माझ्या आयुष्यातील आशा-निराशेचे क्षण) नेता आणि नेतृत्वासंदर्भात यशवंतरावांनी म्हटलंय, ‘नेता असणाऱ्याला, नेतृत्व करणाऱ्याला सर्वांच्या अग्रभागी, शिरोभागी राहावं लागतं, पण ते श्रेणीनं, सर्वांच्या शिरोभागी म्हणजे प्रत्यक्ष डोक्यावर नव्हे. तसा तो डोक्यावर बसून राहिला, तर त्याला ज्यांचं नेतृत्व करावयाचंय, त्यांच्या भावना, आशा-आकांक्षा स्वभावातःच तो पायदळी तुडवू लागतो. असं घडलं, म्हणजे त्या नेत्याबद्धलचा, नेतृत्वाबद्धलचा आदर संपुष्टात येतो. इतकंच नव्हे, तर ते नेतृत्वही संपुष्टात येतं. ज्याला नेतृत्व करावयाचंय, त्यानं अशी काही पथ्यं पाळली पाहिजेत...! (चिंतन – जीवनाचे पंचामृत) यशवंतरावही माणूसच होते. त्यांच्याकडंही राग, लोभ, संताप वगैरे भावना होत्या. आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केलेल्या यशवंतरावांनाही आयुष्यात खूप अवहेलना सहन करावी लागलीय. तशा भावना त्यांनी अपवादानंच व्यक्त केल्यात. मात्र एकदा एका जाहीर समारंभात ते म्हणाले होते, ‘महाराष्ट्रात मी माकडांची माणसं बनवली, माणसांचे सरदार बनवले, त्यांच्या हातात सहकार, पंचायतराज व्यवस्था या साधनांच्या तलवारी दिल्या आणि त्याच तलवारी घेऊन ते माझ्यावर वार करायला निघाले आहेत....!’
हरीश केंची,
९४२२३१०६०९
Subscribe to:
Post Comments (Atom)
अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!
शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...
-
"शी S...S... कर्नाटकातली ही घटना अत्यंत शरमेची, किळसवाणी आणि धक्कादायक आहे, जनता दलाच्या प्रज्ज्वल रेवण्णा या खासदारानं तब्...
-
"तुम्हाला ट्राफिक हवालदारनं पकडलंय का? तो पैसे डायरेक्ट घेत नाही, एक टपरी असते, तिथं तो पैसे द्यायला लावतो. भाजप हा ट्राफिक...
-
"आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करताना त्यांची वैविध्यपूर्ण वाटचाल डोळ...
No comments:
Post a Comment