आपण आता कुठं आहोत? याचा विचार परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी गंभीरपणानं करायला हवा. त्याचं कारण आपली चळवळ ठिसूळ पायावर उभी आहे. आपण कसोटीच्या क्षणी कचखाऊ धोरण स्विकारतो. हे अनेकदा सिद्ध झालेलं होतं. आज आपण परंपरावादी आणि सरंजामी शक्तिविरोधी सूर लावताना आपली वैचारिक बैठक किती पक्की आहे. याचं आत्मपरीक्षण करायला हवं. भारतातल्या परिवर्तनवादी चळवळींचा इतिहास हा चार्वाकापासून सुरु होतो. त्यांच्यापासून बहुतेक प्रबोधनकारांचे खून पाडले आहेत. राजेशाहीत त्या हत्या पचविल्या गेल्या होत्या. पण आधुनिक लोकशाही भारतातही परिवर्तनवाद्यांच्या हत्या होत आहेत? दाभोलकरांच्या हत्येनंतर धर्मांध शक्तींची धिटाई वाढलीय. याचा अर्थ परिस्थिती जैसे थे आहे काय? आपण धर्मवाद्यांचे वैरी नाही,की आपली स्पर्धा,कोणत्याही एका धर्माशी नाही. आपली चळवळ कोणाला शह देण्यासाठी नसून प्रबोधन आणि परिवर्तनासाठी आहे. समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, विवेकवाद आणि सहिष्णुता वाढावी यासाठी चळवळ काम करीत आहे. परंतु अलिकडच्या काळात राजकीय अभिनिवेश वाढीला लागला आहे. समाजमाध्यमांचा वापर लोकप्रबोधनासाठी होण्याऐवजी सूडाच्या भावनेतून लिखाण होत आहे. उथळपणा आणि प्रसिद्धी वाढीला लागलीय. ही अपेक्षा परिवर्तनवादी कार्यकर्त्यांकडून नाही. अनेक क्षेत्रं अशी आहेत, की जिथं समतेचे विचारच पोहचले नाहीत. लोक कर्मठपणाच्या पठडीतलं जीवन जगत आहेत. एकमेकांची उणीदुणी काढून मिथ्या धर्म फैलावत आहेत. आज कधी नव्हे, ती समाजनिष्ठ कार्यकर्त्यांची गरज निर्माण झालीय. भारत हा असा विचित्र देश आहे की, इथं लोकसंख्येचा प्रश्न आहे. समाज जाती-पोटजातींमध्ये विभागला गेलाय. शैक्षणिक किंवा आर्थिक प्रश्नांवर संघर्ष करायला गेलं तर, पुढारी जातींचे गठ्ठे एक करुन कोणत्याही प्रश्नावर,ऐक्य होऊ देत नाहीत. प्रश्न सुटला पाहिजे यावर एकमत झालं तरी, सत्तेतले आणि बाहेरचे जातीचे मुखंडे, समाजात ऐक्य होण्याच्या आतच आपापली जात वेगळी काढून सवतासुभा निर्माण करतात. त्यामुळं एकाच प्रश्नावर अनेक देशांची परिषद भरल्याचं दृश्य दिसतं. जरा कुठं आलबेल झाल्याची लक्षणं दिसू लागली की, जाती-धर्माची वात पेटवून,वणवा चेतवायचा. सध्या तेच सुरू आहे. कोणीही शहाजोग नाही.
हा समाज 'जेता' म्हणून कधीच ओळखला जात नव्हता. पराभूत मनोवृत्तीचा समाज म्हणूनच जाणला जात होता. एक विस्कळीत समाजरचना असलेला भूभाग म्हणून ओळखला जात होता. आर्य, हूण, कुशाण, पोर्तुगीज, फ्रेंच, मोगल इत्यादी आक्रमकांनी, ओळखलं होतं की, या परिस्थितीशरण लोकांवर, राज्य करणं अवघड नाही, कारण एक राष्ट्र ही भावना कधीच नव्हती. ब्रिटीशांच्या राजवटीत एक राष्ट्र भावना अंकुरीत झाली होती. या समाजाला पहिल्यांदा महात्मा गांधींनी घराबाहेर काढून निषेध व्यक्त करायला शिकवलं होतं. भारतीय समाजपुरुषाची प्रतिमा शोषिक आहे, सहनशील आहे. याचा अर्थ तो परिवर्तनशील नाही, असं नव्हे. तो जादा स्थितीवादी आहे. त्यामुळं वैज्ञानिक दृष्टिकोन स्विकारणं जड जातं. जातीपातीनं समाजाच्या खापा करुन ठेवल्या आहेत. त्यामुळं संकुचित धर्मवाद जोपासला गेलाय. धर्मवाद म्हणजेच राष्ट्रवाद असा संस्कार झालाय. ब्रिटीशांच्या राजवटीमुळं फ्रेंच राज्यक्रांतीची तत्वं आणि इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीमुळं यंत्रयुग अवतरलं. नाहीतर बैलगाडी आणि टांगा बराच काळ घेऊन प्रवास करावा लागला असता. पहिली आगगाडी ठाणे-मुंबई सुरु झाली, तेव्हा तर लोक घाबरून तिकडं फिरकत नव्हते. त्यांनी अफवा पसरवली होती की, गाडीत माणसं कोंबून खतम करतात. बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी स्वतः गाडीतून प्रवास करुन लोकांचं प्रबोधन केलं होतं. आपल्याकडं प्रबोधनकारांची परंपरा जुनी आहे. आधुनिक काळाची सुरुवात राजाराम मोहन रॉय यांच्यापासून सुरु झाली होती. जोतीराव फुले, महादेव गोविंद रानडे, लोकहितवादी, बाळशास्त्री जांभेकर, नाना शंकरशेट, दादाभाई नौरोजी, आगरकर, केशवराव ठाकरे ते थेट डॉ दाभोलकरांपर्यत येऊन ठेपते.
समाज परिवर्तनाची गती कमी असली तरी, आशादायक आणि आश्वासक चित्र आहे. पण समाजपरिवर्तन म्हणजे केवळ भाषणबाजी किंवा शिबिरं घेणं नव्हे. त्याला सहलीचं स्वरुप येतं. मानवी मनाचं मनातल्या मनात स्थलांतर करणं एवढं सोपं नाही. बदल आणि परिवर्तन यामध्ये,जमीन-आस्मानचा फरक आहे. आपल्याला परिवर्तन हवंय, बदल नकोय. एक शर्ट काढून दुसरा घातल्यासारखा! मेघा पाटकर यांनी संघर्षातून सेवा केलीय. सेवेतून विश्वास निर्माण केलाय. विश्वासामुळं परिवर्तन होतेय. ही प्रक्रिया सोपी नक्कीच नाही.पण दुश्प्राप्यही नाही. बाबा आढावांनी कष्टकऱ्यांना ठामपणे बजावलं की, भाकरी महत्वाची आहे, जात नव्हे! सुरुवातीला कुरकुरणाऱ्या हमालांना प्रबोधनातून बाबांनी जातीतला फोलपणा उघड करुन दाखवला होता. आज हमाल, कष्टकऱ्यांचा एकच धर्म आणि जात आहे. सार्वजनिक सत्यधर्म बाबांनी साठ-पासष्ठ वर्षे खस्ता खाल्ल्या आहेत. त्यांना पत निर्माण करुन दिलीय. विश्वासार्हता प्राप्त केलीय. म्हणून प्रबोधन आणि परिवर्तन होतेय. ही न थांबणारी प्रक्रिया आहे. परिवर्तनवादी चळवळीपुढं मोठं आव्हान आहे. पण आम्ही जर वरवरचं तोंडी लावण्यापुरतं 'पार्टटाईम सोशलवर्कर' म्हणून स्वतःला मानत असू तर ती चळवळीशी धोकेबाजी आहे. आपण चळवळीला हर तऱ्हेनं मदत करु शकतो. आपला प्रपंच सांभाळून आपण प्रबोधन करु शकतो. सगळ्यात अवघड सुरुवात घरापासून होते. आपल्या कुटुंब सदस्याचं जो प्रबोधन करु शकत नाही. तो इतरांचं काय परिवर्तन करणार?
दुर्दैवानं दलित चळवळीतले काही गट महात्मा गांधींबद्धल मनात अढी धरुन आहेत. पण डॉ बाबा आढाव यांचं हे वैशिष्ट्य आहे की, त्यांनी आपल्या विचारमंचावर शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर आणि गांधी यांना बरोबरीचं स्थान दिलंय. समाजामध्ये कार्य करणाऱ्या अनेक संघटना आहेत. पण समाजाच्या अडचणी सोडवण्याच्या मोबदल्यात समाजामध्ये दुहीचे विचार थोपवित आहेत. नेमका हाच फरक परिवर्तनवादी चळवळीमध्ये आणि परंपरावादी संस्थांमध्ये आहे. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर भारतातही एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला राजा राममोहन रॉय या आधुनिक समाजसुधारकानं कायद्याच्या सहाय्यानं सतीच्या क्रूर प्रथेला आळा घातला होता. पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात राजस्थानमध्ये राजकुॅंवर नावाची महिला सती गेली होती. तीचं समर्थन शंकराचार्यांनी निर्लज्जपणे केलं होतं. कायदा करुन जरुर सहकार्य मिळतं, पण प्रबोधन होत नाही. त्यासाठी शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर-गांधी यांचा विचार मंचच हवा. पूर्वी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विज्ञान शिबिरं होत असत. परिवर्तनवादी चळवळीला जोडून असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये जाणीवपूर्वक भारतीय राज्यघटनेची मूल्ये जोपासली जात होती. ती राज्यघटना साक्षरतेची सुरुवात होती. पण आता प्रक्रिया रेंगाळल्यासारखी झालीय. राष्ट्रीय एकात्मता परिषद, विषमता निर्मूलन शिबिरातून प्रबोधनवादी कार्यकर्ते शिदोरी घेऊन जात असत. पण आता गरज असताना शैथिल्य आल्यासारखं वाटतं. विद्रोही साहित्य संमेलनं, विद्रोही साहित्य सांस्कृतिक संमेलनं होत असतात, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. पण हे परिवर्तनाचे चिराग एकत्रित यावयास हवेत. यांची विभागणी, सवतासुभा न परवडणारा आहे. भटक्या विमुक्तांमध्ये, आदिवासींमध्ये, काही धार्मिक परंपरावादी घुसलेलेत. ते त्यांच्या मनाला काय खाद्य पुरवत आहेत? हल्ली दलित-आदिवासी लेखकांमध्येही साहित्य संमेलनाच्या नावाखाली परंपरावादी कातडं पांघरुन घुसलेत.हे परिवर्तनवादी चळवळीसाठी अवघड होऊन बसलंय.मानवी मनाचं शिल्प घडविण्यासाठी जी निष्ठा आणि कौशल्य लागतं त्याचा अभाव परिवर्तनवादी चळवळीमध्ये आहे. म्हणूनच सुरुवातीला म्हटलं होतं की, ठिसूळ पायावर उभी आहे. याचा गांभीर्यानं विचार करणं आवश्यक आहे. सर्व परिवर्तनाची बेटे, एकत्र येऊन द्वीपसमूह तयार होण्यास पर्याय नाही!
हरीश केंची,
९४२२३१०६०९
Subscribe to:
Post Comments (Atom)
अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!
शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...
-
"शी S...S... कर्नाटकातली ही घटना अत्यंत शरमेची, किळसवाणी आणि धक्कादायक आहे, जनता दलाच्या प्रज्ज्वल रेवण्णा या खासदारानं तब्...
-
"तुम्हाला ट्राफिक हवालदारनं पकडलंय का? तो पैसे डायरेक्ट घेत नाही, एक टपरी असते, तिथं तो पैसे द्यायला लावतो. भाजप हा ट्राफिक...
-
"आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करताना त्यांची वैविध्यपूर्ण वाटचाल डोळ...
No comments:
Post a Comment