Saturday, 23 December 2023
विरोधकमुक्त 'अमृतकाळ...!'
Sunday, 17 December 2023
वरून दोस्ती, आतून कुस्ती....!
अस्वस्थ विरोधक, उध्वस्त विरोधक...!
Sunday, 10 December 2023
तेलंगणाच्या अंगणात....!
Saturday, 2 December 2023
सरकारपुढे आरक्षणाचे आव्हान...!
Saturday, 25 November 2023
गांधींचं व्यामिश्र, गुंतागुंतीचं व्यक्तिमत्व...!
"अंतर्यामी असणाऱ्या काळोखामुळं अनेकजण अंतर्यामी बघायचं टाळतात, अंतर्यामी बघायला घाबरतात, पण अंतर्यामीच्या या काळोखाला जो टाळू बघतो, घाबरतो त्याच्या जीवनात कधीच प्रकाश प्रकाशत नाही. जीवनात प्रकाश प्रगटायलाच हवा; यासाठी जीवनाची योग्य जाण असायलाच हवी; नाहीतर जे काही करण्याचं प्रयत्न करशील, ते व्यर्थ जातील. म्हणून म्हणतो, अंतर्यामी जा, जागेपणानं अंतर्यामी जा. ज्ञानाचा प्रकाश घेऊन अंतर्यामी जा. मग तुमच्यापुढं सारा जीवनमार्ग उजळलेलाच असेल, प्रकाश पुरेसा आहे की नाही, पावलात बळ आहे की नाही, ह्या फालतू गोष्टींत गुंतून बसू नका. पाऊल उचला, त्या पावलागणिक प्रकाश पडलेला तुम्हाला जाणवेल. तुम्ही चार पावलं टाकशील, तेव्हा प्रकाश तुमच्यापुढे चार पावलं पडलाय, असं तुम्हाला दिसेल. संविधान दिनाच्या निमित्तानं केलेलं हे गांधींचं स्मरण!"
----------------------------------------
*मे* रा मुल्क, मेरा देश, मेरा ए वतन l
शांती का, उन्नती का, प्यार का चमन l
जिसके पास बेमिसाल है l
मेरा तन, मेरा मन, l
ये वतन, ये वतन, ये वतन l
जाने मन, जाने मन, जाने मन ll
या गीतातल्या जानेमननं माझ्या मनांत सगळा गोंधळ केलाय आणि गाण्यातल्या मुल्क, देश, शांती, उन्नती, प्यार, चमन, तन-मन-वतन ह्या शब्दांचा मी भलताच अर्थ घेतलाय.
जिसका खून कभी ना हिला; ओ खून नही, पानी है l जो देश के काम न आये; ओ बेकार की जवानी है ll
आपल्या तरुण पिढीला 'रक्त आणि पाणी' ह्यातला फरक दाखवण्याची संधी आहे तरी कुठं? ३० जानेवारी १९४८ रोजी निःशस्त्र गांधीजींची नथुराम गोडसेनं गोळ्या घालून हत्या केली. त्या नथुरामच्या पानी-कम क्रूरतेला देशभक्तीचा मुलामा चढवण्याचं सध्याचे दिवस आहेत. त्यासाठी शरद पोंक्षे 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकातून रक्त आटवतोय; गल्ला जमवतोय. तर दुसरीकडं जगभरातले राष्ट्राध्यक्ष दिल्लीतल्या राजघाटावरचा गांधीजींच्या स्मृतिस्थळाला भेट देतात. तिथं माथा टेकवतात, नतमस्तक होताना म्हणतात, 'महात्मा गांधीजींचे विचार हीच भारताची ओळख असून, गांधी विचार ही जगाला मिळालेली एक देणगी आहे...!' यहुद्यांनी येशू ख्रिस्ताला क्रूसावर चढवून ठार मारलं, पण मरणावर मात करून ख्रिस्त उठला; जगभर पोहोचला. जगातल्या दीनदुबळ्या, दुःखी-पीडितांच्या अंतःकरणात मिसळला. गांधीजीही असंच सगळ्या दीनदुबळ्या, दुःखी, पीडितांच्या अंतःकरणात मिसळणारे महात्मा आहेत. पण काहींनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी गांधीजींच्याबद्धल गैरसमज पसरवून लोकांच्या अंतःकरणात नथुरामला जागा देण्याची नाटकं सुरू ठेवलीत. त्यांनी गांधीजींना विचार-कार्यातून दिसताक्षणी गोळ्या घालून संपवण्याचं सत्रच चालवलंय. त्यांना प्रेमाचं, बंधूभावाचं, शांतीचं, सत्याचं, मानवतेचं राज्य बहुधा नकोच आहे.
काँग्रेसीजनांना सत्तेवरून उतरल्यावर आलेलं शहाणपण समजून घेण्यासाठी समग्र गांधी चरित्र वाचायला हवंय. सानेगुरुजींनी सांगितलेल्या 'गांधीजींच्या गोड गोष्टी' आधी वाचल्या. मग त्यांचे सत्याचे प्रयोग वाचलं. माझं हे 'गांधी वाचन' पाहून मित्रानं त्याच्या संग्रहातलं गांधी विरुद्ध गांधी हे नाटकाचं पुस्तक दिलं. ते देताना म्हणाला, 'ह्यात तुला गांधीजी अधिक समजतील.' त्याचं म्हणणं अक्षरशः खरं ठरलं. माझं मन या नाट्यवाचनात खोल खोल गुंतलं. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या माणसानं आपल्या व्यक्तिगत जीवनात केवढ्या कठोरपणे स्वतःवर स्वतःच्या कुटुंबीयांवर काही निर्बंध घालून घ्यावे लागतात, हे समजून घ्यायचं, तर अजित दळवी यांनी लिहिलेलं गांधी विरुद्ध गांधी हे नाटक एकदा वाचायला हवंय. बायको, मुलगे, मुली, जावई, पुतणे, मेहुणे यांच्यासाठी आपल्या पदाचा, प्रतिष्ठेचा निर्लज्जपणे वाट्टेल तसा गैरफायदा घेणारे आणि लोककल्याणाच्या गोष्टी सांगत स्वतःच्या पुढच्या दहा पिढ्यांची तरतूद करणारे नेते आपण आजूबाजूला बघतोय. गांधीजींनी आणलेलं स्वातंत्र्य या स्वार्थी, मतलबी नेत्यांनी 'स्व'राज्य मानून फस्त करण्याचा उद्योग सगळ्यांच्या साक्षीनं चालवलाय. देशात आणि राज्यात कॉंग्रेस जाऊन भाजपची सत्ता आली; तरी ह्या 'स्व'राज्यातल्या स्वैराचारात काडीचाही फरक झाला नाही. गांधी विरुद्ध आपण सगळे असा जणू संघर्षच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरू झालाय की काय कळत नाही! या गांधी विरुद्ध गांधी नाटकात गांधीजी आणि त्यांचा संसार आहे. ज्या मुलीला आपल्या संसारात सर्वस्व समर्पित व्हायची इच्छा असेल, तिनं या पुस्तकातल्या 'बा'चा आदर्श ठेवायला हवा. बा म्हणजे कस्तुरबा गांधीजींची बायको. मेली बिचारी तुरुंगातच. गांधी झाले महात्मा!
गांधींना हरिलाल नावाचा मुलगा होता. गांधींवर खूप प्रेम करणारा, पण स्वतःवर अधिक प्रेम करणारा. आपलं स्वतःचं वेगळेपण जतन करू बघणारा. गांधींनी आपल्याला हवं तसं जगू द्यायला हवं, असं मानणारा. 'गांधींसारखाच बॅरिस्टर होईन आणि छोटा गांधी म्हणून लोक आपल्याला मानतील,' अशी स्वप्नं बघणारा हरिलाल होता. त्या स्वप्नांसाठी गांधीजींबरोबर झगडताना तो उद्ध्वस्त झाला. गांधी-हरिलाल कस्तुरबा यांच्यातला संवाद वाचताना डोळे भरून येतात! गांधी आणि कस्तुरबा यांचं सारं मोठेपण असं नाटकातून साकारणं, ही साधी गोष्ट नाही. पण नाटककारानं ते प्रचंड ताकदीनं लिहिलंय. गांधी विरुद्ध गांधी हे पुस्तक वाचून झाल्यावर मित्र म्हणाला, 'या पुस्तकाऐवजी तुला हे नाटक दाखवता आलं असतं, तर खूप बरं झालं असतं. मी १७-१८ वर्षापूर्वी हे नाटक पाहिलंय. तेव्हा त्यात गांधीजी आपल्या सोलापूरचा अतुल कुलकर्णी होता आणि कस्तुरबा भक्ती बर्वे होती. त्यांच्या गांधी आणि कस्तुरबा यांच्या पुढ्यात हरिलाल उभा करणं ही तर प्रत्यक्षातल्यापेक्षाही नाटकात अधिक कठीण गोष्ट होती, पण किशोर कदम या नटानं तेव्हा मोठ्या ताकदीनं हे काम केलं होतं! गांधी विरुद्ध गांधी हे नाटक पुन्हा नव्यानं रंगमंचावर यावं, ही आज काळाची गरज आहे!
गांधीजींना त्यांच्याच भक्तांनी आणि त्यांचं नाव घेत राजकारणात धुडगूस घालणाऱ्यांनी खूप मळवून टाकलंय. विद्रूप वाटण्याएवढं बदलून टाकलंय. मूळ मूर्तीवर शेंदुराची पुटं चढवून चढवून त्या मूर्तीची सारी मंगलता, प्रेरकता दडवून टाकण्याची घाणेरडी प्रथा आपल्या देशात आहे. आपण दगडांनाही देव बनवून त्याला विविध लेप लावून गुदमरून सोडतो. तिथं देवमाणसांची काय कथा? गांधींना तर खूपच ओंगळ बनवलंय. गांधीजींच्या खऱ्या तेजाचं दर्शन या नाटककारानं घडवलंय. आपण धर्माच्या खोट्या रूपात स्वतःला फसवून घेणारे हरिलालच आहोत. आपली धर्मनिष्ठा आपल्याएवढीच खोटी आहे. संयम, निष्ठा, विवेक यांच्या विरोधातला उतावळा अतिरेक, स्वार्थ आणि बेदरकारी यांनी पुकारलेलं युद्ध गांधी विरुद्ध गांधीमध्ये आहे. गांधी विरुद्ध गांधीमध्ये कल्पनाविलास फार थोडा आहे. सत्य मात्र भरपूर आहे. कैदेत असूनही संभाजीराजे औरंगजेबला इस्लाम स्वीकारणार नाही, असं ठणकावून सांगत बलिदानाला तयार होतात; म्हणून ते 'धर्मवीर' झाले. हरिलालही एकप्रकारे धर्मवीरच! गांधीजींची फजिती व्हावी, म्हणून त्यानं इस्लाम धर्म स्वीकारला. मशिदीत त्यानं धर्मावर प्रवचनं दिली आणि मग पुन्हा काही काळानं मी पुन्हा मूळ धर्मात आलोय, आर्य धर्माचा सच्चा अनुयायी झालोय, असंही तो जाहीर सभा भरवून सांगू लागला. त्यानं आजच्या 'घरवापसी' वाल्यांसारखंच धर्मालाही आपल्या दावणीला जुंपलं होतं. हरिलालच्या या वर्तनानं गांधीजी अंतर्यामी विकल झाले; तर कस्तुरबा व्याकुळ झाल्या होत्या. पण दोघांनीही हरिलालचं स्वातंत्र्य मानलं होतं.
गांधी विरुद्ध गांधीमध्ये गांधीजींचा दुसरा मुलगा मणीलालही आहे. गांधीजींच्या आश्रमात राहाणाऱ्याला कसं मऊ मेणाहून विष्णुदास बनावं लागायचं, हे ह्या मणिलालच्या व्यक्तिरेखेतून छान दाखवलंय. मणिलालचं चालणं, बोलणं, वागणं अगदी गांधीजींसारखं! साच्यातला गणपती दुकानात विकायला मांडून ठेवतात, तसाच हा साच्यातला गांधी. पण गांधींमध्ये जे चैतन्य-प्रेम होतं; त्याचा पूर्ण अभाव असल्यासारखा लिबलिबीत मणिलाल नाटककारानं छान रंगवलाय. मणिलालची ही कठपुतळी रंगमंचावर अधिक प्रभावीपणे उभी राहिली असेल. गांधीजी असताना आणि ते गेल्यावरसुद्धा असे अनेक 'लिबलिबीत गांधी' गांधीचे चेले म्हणून वावरत होते, असं म्हणतात. गांधीजी जे करायचे ते सर्वस्व पणाला लावून करायचे. यशापयशाचीही पर्वा न करता करायचे. जाणीवपूर्वक करायचे आणि होणाऱ्या भल्याबुऱ्या परिणामाला अत्यंत धीटपणे सामोरं जायचे. राजकारणात, समाजकारणात आणि स्वतःच्या संसारातही! समाजकारणातले, राजकारणातले गांधीजी आपल्याला अॅटनबरो यांच्या 'गांधी' चित्रपटातून दिसतात. गांधी विरुद्ध गांधीमध्ये या महात्म्याच्या संसाराचं दर्शन घडतं. आजच्या किडलेल्या नीतिमत्तेबद्दल लोकात तिडीक निर्माण करण्याची ताकद ह्या नाटकात आहे. हे नाटक आजच्या मुलामुलींनी आवर्जून वाचायला हवं. नव्यानं रंगमंचावर आलं, तर नक्की पाहायला हवं.
देशासाठी तुरुंगात गेलेल्या दोघा देशभक्तांच्या मुली गांधीजींच्या आश्रमात राहात असतात आणि मणिलालबरोबर त्यांना तारुण्यसुलभ वागावंसं वाटतं. त्या तशी संधी घेतात. म्हणजे एकदा मणिलाल त्यातल्या एकीचे मोकळे केस ती पाठमोरी असताना हातात घेऊन हुंगतो. दुसरीला तिच्या सुंदर केसांबद्दल काही चावटसं ऐकवतो. गांधीजींच्या कानावर हे जातं आणि गांधीजी त्या दोन्ही मुलींची आणि मणिलालची कानउघाडणी करतात. प्रायश्चित्त म्हणून त्या मुलींचे ते सुंदर केस कापून टाकतात आणि स्वतः तीन दिवस अन्नपाणी न घेण्याचं ठरवतात. त्या मुली आणि मणिलाल रडून क्षमा मागतात, पण गांधी कठोरपणे आपला निर्णय अंमलात आणतात. आश्रमात मुली ठेवून जे देशभक्त कारागृहात गेले आहेत, त्यांच्या मुलींशी माझा गांधींचा मुलगाच जर प्रेमाचे खेळ खेळायला लागला, तर आश्रमाची काय स्थिती होईल? विश्वासानं मुली इथं ठेवणाऱ्या त्या देशभक्तांना केवढा धक्का बसेल? हे असं काही पुन्हा कधी घडू नये म्हणून गांधीजींनी कठोर होणं, हाच मार्ग होता. हा प्रसंग वाचताना मी थरारून गेलो. गांधीजींचं हे वागणं आपल्याला कासावीस करतं. आज देशभरात फोफावलेली वासनाकांडी वृत्ती रोखायची असेल, तर अशा कठोरपणे लोकनेत्याला वागणं भागच आहे, हे मानायलाच हवं. स्वतःशी प्रामाणिक असेल, त्याच नेत्याला एवढं कठोर होणं शक्य आहे. गांधी हे गांधी होते. त्यांनी ब्रह्मचर्याचा स्वीकार करण्यासाठी, नरेंद्र मोदींनी जसं जशोदाबेनला वाऱ्यावर सोडलंय; तसं गांधीजींनी कस्तुरबाला सोडलं नव्हतं.
नथुराम गोडसेला 'देशभक्त' करण्याचा डाव आता संसदेपर्यंत पोहोचला असताना गांधी विरुद्ध गांधीसारखं पुस्तक माझ्या हाती यावं, हा चमत्कार नाही; आपल्या अंतरीच्या आवाजाला लाभलेला हा प्रतिसाद आहे, असंच मला वाटतंय. लोकांना आता उथळता नकोय, अथांगता हवीय. आपण सगळेच हरिलाल, मणिलाल होतोय. खोट्या विजयाचं, खोट्या सत्तेचं, खोट्या शूरतेचं, खोट्या स्वच्छतेचं, खोट्या नीतिमत्तेचं नाना नमुने बघून बावरलेल्या आपल्या मनाला आधार देण्यासाठी 'अच्छे दिन' ऐवजी गांधीजींसारख्या महात्म्याचीच देशाला जरुरी आहे. त्या महात्म्याकडं हे नाटक आपलं लक्ष वेधतं. हे नाटक नव्याने रंगमंचावर आलं तर ते आपल्या तरुण पिढीसाठी उपकारक ठरेल. मला ठाऊक आहे, काही वाचकांना हे गांधीपुराण आवडणार नाही. हे गांधीपुराण नाही, हे तुमचं माझं पुराण आहे. गांधी हे केवळ निमित्त आहे. मला तुम्हाला जागवायचंय. जीवनाचा अर्थ समजावून घेण्याची ओढ तुमच्यात निर्माण करायचीय. सॉक्रेटिसनं म्हटलंय, जे जीवन नीट जाणलं गेलं नाही, ओळखलं गेलं नाही ते जीवन जगणं व्यर्थच गेलं. जीवनाला अर्थ हवा. कशासाठी आपण जगतोय? या प्रश्नाचं उत्तर आपल्यापाशी हवं. ज्यांच्यापाशी हे उत्तर नसतं, ते हरिलाल होतात. मोहामागे धावतात. व्यसनात गुरफटतात. आपलं खोटेपण आपल्यापासूनच छपवण्यासाठी अधिक खोटेपणानं वागतात! आणि ज्यांच्यामध्ये असं भरकटण्याएवढं साहस नसतं, ते लिबलिबीत मणिलाल बनतात! स्वतःला मारून मढ्यासारखं जगतात. तुम्हाला तुमच्या अंतर्यामी बघायला लावण्याचा माझा हा प्रयत्न आहे. अंतर्यामी असणाऱ्या काळोखामुळं अनेकजण अंतर्यामी बघायचं टाळतात, अंतर्यामी बघायला घाबरतात, पण अंतर्यामीच्या या काळोखाला जो टाळू बघतो, घाबरतो त्याच्या जीवनात कधीच प्रकाश प्रकाशत नाही. जीवनात प्रकाश प्रगटायलाच हवा; यासाठी जीवनाची योग्य जाण असायलाच हवी; नाहीतर जे काही करण्याचं प्रयत्न करशील, ते व्यर्थ जातील. म्हणून म्हणतो, अंतर्यामी जा, जागेपणाने अंतर्यामी जा. ज्ञानाचा प्रकाश घेऊन अंतर्यामी जा. मग तुमच्यापुढं सारा जीवनमार्ग उजळलेलाच असेल, प्रकाश पुरेसा आहे की नाही, पावलात बळ आहे की नाही, ह्या फालतू गोष्टींत गुंतून बसू नका. पाऊल उचला, त्या पावलागणिक प्रकाश पडलेला तुम्हाला जाणवेल. तू चार पावलं टाकशील, तेव्हा प्रकाश तुझ्यापुढं चार पावलं पडलाय, असं तुम्हाला दिसेल!
मनातला, जीवनातला अंधार संपवून टाकायची इच्छा करून तुम्ही ध्येयाच्या दिशेनं पहिलं पाऊल टाका. 'मी वेडा आहे' असं नेहमीच म्हटलं जातं. माझा वेडेपणा तुम्हाला शहाणं बनवत असेल, तर मला त्यात आनंद आहे. अभिमानही आहे. तुम्हाला एका शहाण्या वेड्याची गोष्ट सांगतो. वेड्यांच्या एका इस्पितळाच्या खिडकीत हातात मासे पकडायचा गळ घेऊन एक वेडा बसला होता. एक शहाणा त्या इस्पितळाजवळून जात होता. त्याला त्या वेड्याची गम्मत करायची हुक्की आली. त्यानं विचारलं, 'काय, किती मासे पकडले?' वेड्यानं उत्तर दिलं, 'तू धरून अकरा!' आणि त्यानं त्या शहाण्याला प्रश्न केला, 'तू का नाही इस्पितळात दाखल होत?' शहाण्यानं फणकाऱ्यानं म्हटलं, 'मी कशाला वेड्याच्या इस्पितळात दाखल होऊ?' वेड्यानं त्याला उलट प्रश्न केला, ' इथं पाणी नाही, मासेही नाहीत, तरी तू मला कसं विचारलंस, किती मासे पकडले म्हणून?' शहाण्यानं तोऱ्यानं म्हटलं, 'मग तू गळ टाकून कशाला बसला आहेस?' वेड्यानं हसून म्हटलं, 'हो, तुझ्यासारख्या वेड्यांना पकडण्यासाठी हा गळ आहे. म्हणून तर म्हटलं ना, तू धरून अकरा लागले गळाला! आता बस विचार करत शहाणा कोण आणि वेडा कोण?' कदाचित, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला गांधी विरुद्ध गांधी नाटकात मिळेल. म्हणून त्याचं पुस्तक मी तुम्हालाही वाचण्यासाठी आग्रह करतोय. त्यानं तुमच्या मनावरची खूपशी जळमटं साफ होतील. बाकीच्या स्वच्छतेसाठी 'मोदींची स्वच्छता मोहीम' आहेच!
जी २० देशांच्या नेत्यांनी राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहत महात्मा गांधींचे आवडते भक्तिगीत 'वैष्णव जन तो तेणे कहिये, जे पीड पराय जाने रे...' हे गायल्याचं पाहायला मिळालं. जगात बायबल नंतर सर्वाधिक ग्रंथ लिहिले गेलेत ते महात्मा गांधींवर. त्यामुळं देशात गांधींच्या खून्याचे गोडवे गायले जात असतील, मात्र जगभरातल्या मान्यवरांना गांधीजींसमोर नतमस्तक होताना त्यांना धन्यता वाटते, जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं, यातच सारं आलं. म्हणूनच वाटतं की, गांधीजी हाच सकारात्मक जीवनाचा मंत्र आहे....! देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं हा गांधींच्या ध्येयाचा एक भाग होता. खरं तर त्यांना चांगल्या मानवी जीवनाचं मर्म शोधून काढायचं होतं. स्वत:तलं हिणकस वजा करत करत कोणताही सामान्य माणूस दिव्यत्वापर्यंत पोहोचू शकेल अशी त्यांची धारणा होती. त्या प्रवासाची दिशा आणि मार्ग शोधून काढण्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. या सगळ्याची झळ कुटुंबाला लागणं अपरिहार्य होतं! ‘गांधी विरुद्ध गांधी’ या नाटकामधल्या बाप-मुलाच्या नात्याचं वैशिष्ट्य हे आहे, की वडिलांची फारशी चूक दिसत नसतानाही मुलाचं दु:ख तुम्हाला स्पर्श करून जातं. त्या काळी किती वडिलांचा मुलांशी संवाद होता? गांधींसारख्या नित्यनव्या उद्योगांत, चळवळीत गुंतलेल्या माणसाला मुलासाठी किती वेळ देता येणार? गांधींच्या शब्दाखातर फिनिक्स आश्रमात किंवा टॉलस्टॉय फार्मवर येऊन राहणारे, काम करणारे कितीतरी जण होते. त्या सर्वाना डावलून इंग्लंडमधल्या शिक्षणासाठी स्वत:च्या मुलाचं नाव गांधींनी पुढं करायला हवं होतं का? किंवा कौटुंबिक मालमत्तेवरचा हक्क सोडल्यावरही हरिलालला पेढीवर बसू द्यायला हवं होतं का? मग आजच्या राजकीय पुढाऱ्यांच्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला असता? काल संविधान दिन झाला. संविधानाने आपल्याला जे अधिकार दिलेत, कर्तव्य दिलीत ते अधिकार जसे काढून घेतले जाताहेत. तसंच आपण आपली कर्तव्यही विसरत चाललो आहोत. संविधान दिनाच्या निमित्तानं केलेलं गांधींच्या विचारांचं स्मरण....!
हरीश केंची,
९४२२३१०६०९
Saturday, 18 November 2023
परवशता पाश दैवे..... !
"राज्यात एक फुल दोन हाफ सरकार!" अशी टीका होतेय. सामाजिक सौहार्दाचं वातावरण बिघडतंय. नेते म्हणवणारे मंत्री बाह्या वर करत एकमेकांविरोधात सरसावलेत. दोन हाफ पैकी एका हाफला राज्यातल्या समस्यांपेक्षा पक्षनिष्ठा, पक्षसेवा महत्वाची वाटतेय. त्यासाठी ते निवडणुक प्रचार सांभाळत परराज्यात प्रवास करताहेत. दुसरे हाफ आपण आजारी आहोत असं म्हणत आपलं अंग काढून घेताहेत. शिवाय पक्ष बळकावण्यासाठी, आपलं स्थान टिकविण्यासाठी दिल्लीश्वरापुढे कुर्निसात करण्यात ते मश्गूल आहेत. दिल्लीश्वरांनीच त्यांना सुभेदारी बहाल केली असल्यानं त्यांच्याशीच निष्ठा वाहण्यासाठी ते सदैव तयार असतात. बिचारे एक फुल दिल्लीश्वराचे 'मांडलिक' असल्यानं त्यांचा आटापिटा सुरू आहे. ते शेतीसाठी थेट गावीही जातात. साऱ्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडलंय. मराठी माणूस असाच दबला तर, खात्रीपूर्वक समजा की, शिवछत्रपतींचा महाराष्ट्र संपला!"
-----------------------------------
*बा*हुबली चित्रपटात माहिष्मती संस्थानातल्या युद्धसदृश्य दृष्यात प्रभास हा नायक धनुर्धारी अमरेंद्र बाहुबली नायिका अनुष्का शेट्टी म्हणजेच देवसेनेला आपल्या धनुष्यातुन तिरंदाजी करताना एकाचवेळी तीन बाण कसे सोडायचे याचं प्रात्यक्षिक देताना एक मंत्र ऐकवतो. नाद्वे..... मणीबंधम.... बहिर्मुखम....! त्याच धर्तीवर आपल्या राज्यात डंकापती दिलीश्वरानं महाराष्ट्रावर चाल करताना तीन अस्त्र सोडण्याची किमया साधलीय! एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार अशा ह्या एक फुल, दोन हाफ 'एदेअ ' शस्त्रानं सत्तेसह महाराष्ट्रात राजकीय युद्ध आरंभलंय..! सत्तेसाठी सारं काही म्हटल्यावर राजधर्म, न्याय, नीती, हा सारा कल्पनेचा खेळ वाटायला लागतो. मग या खेळासाठी नैतिकता पणाला लावली जाते. सत्य असत्याची चाड राहात नाही. अशीच स्थिती सध्या राज्यात आहे. कुणाचा पायपोस कुणाला राहिलेला नाही. स्वतःच आसन स्थिर नसताना जनतेच्या स्थिरस्थावराचा विचार कुठे येतो? गरीब बिचारी मुकी जनता तिला कुणीही आणि कसंही हाका. ती सहन करतच जगतेय! खरं तर दिवाळीची आतुरतेने वाट पाहणारे आपण उद्भवलेल्या परिस्थितीत नको ती दिवाळी म्हणण्याची वेळ आपल्यावर आलीय. राज्यात पावसानं ओढ घेतल्यानं दुष्काळी स्थिती निर्माण झालीय. जातीय विद्वेष तर भयानक रूप धारण करण्याच्या आवेशात आहे. महागाईचा आगडोंब उसळलाय. मात्र याची जाणीव सत्ताधाऱ्यांना नाही!
राजकारणाचा तर खेळखंडोबा झालाय. विश्वस्त, प्रतिनिधी या शब्दांचा अर्थच राजकारणी विसरलेत. आपण लोकसेवक आहोत याचं भानही राहिलेलं नाही. केवळ स्वार्थ साधण्यासाठी त्यांना सत्ता हवीय. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा एवढं एकच उद्दिष्ट ठेवून राजकारणी कार्यरत आहेत. आम्ही सेवक नाही, तर मालक आहोत, अशा अविर्भावात ते वावरताहेत. अशांच्या मनात गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी, गरजू यांच्या बाबतीत राजकारण्यांची मने संवेदनशील होतील का? दिवसेंदिवस माणूस जगणंच विसरून गेलाय. दुःख, अडचणी, समस्या, आजारपण, आर्थिक समस्या, बेरोजगारी, महागाई, वाहतुकीची कोंडी, फसवणूक, स्त्रियांवरील अत्याचार, जातपात, अवकाळी पाऊस, महापूर, घाणेरडं राजकारण अशा किती तरी समस्यांनी माणूस ग्रासलाय. कोरोनानं पिच्छा सोडलाय, असं अजून म्हणता येत नाही. रोज नवनव्या आजारांनी लोकांना घेरलंय. वयोवृद्धांच्या समस्या वेगळ्याच आहेत. गेल्या दोन वर्षात अनेक जिवाभावाची, जवळची माणसं कायमस्वरूपी मुकलीत. या साऱ्यांतून सर्वसामान्य माणूस सावरायचा प्रयत्न करतोय; पण माणूस आत्मविश्वासच गमावून बसलाय. अशा आत्मविश्वास गमावून बसलेल्या लोकांना कुणाच्या तरी पाठबळाची अत्यंत गरज आहे. माणसाला सुख, शांती, समाधान, राहायला घर, पोटाला चार घास, स्वस्त औषधोपचार, हाताला यश, मुलाबाळांचे शिक्षण इतक्याच माफक अपेक्षा आहेत. तमाम बळीराजाचं दुःख, कष्ट यातून काहीही केलं तरी सुटका होतं नाही. कधी कमी पाऊस तर कधी तुफान पाऊस. होत्याचं नव्हतं करणारा पाऊस. एकदा पेरणी करताना नाकी नऊ येते. इथं तर दुबार, तिबार पेरणी करण्याची वेळ येऊ लागलीय. पिकलंच तर माती मोल किमतीला विकावं लागत आहे. यंदा पावसानं ओढ घेतलीय, त्यामुळं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. शेतीत काही उगवलच नाही तर काय करावं त्यानं? विकास होतोय, चकचकीत रस्ते, पूल होताहेत. बुलेट ट्रेन, मेट्रो अनेक शहरात धावू लागल्यात. विमानतळ विकसित होताहेत. शहरांच्या हद्दवाढी करून सिमेंटची जंगले उभी राहाताहेत; पण माणूस स्वास्थ्य हरवत चाललाय. अभिमान, स्वाभिमान बाजूला ठेवून सुख, शांती समाधान शोधण्यासाठी तो धडपडतोय; मात्र त्याच्या नशिबात निराशेशिवाय काहीच पडत नाही. गेल्या काही वर्षात श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी अधिकच रुंदावत चाललीय. विकासाची गंगा काही मोजक्याच लोकांच्या घरात जातेय. त्यांच्या विकासाचा दर बुलेट ट्रेनपेक्षाही अधिक आहे. माणूस निसर्ग नियमांना अनुसरून वागायचं विसरलाय. हवा, पाणी, ध्वनी अशा प्रत्येक गोष्टीचं प्रदूषण करतोय. पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. त्यामुळं दिवसेंदिवस माणसाचा श्वास कोंडतोय. पर्यावरणाच्या संबंधी थोडं तरी शहाणपण माणसाला येईल का? त्यासाठी प्रयत्न करायला हवेत!
मराठ्यांनी सदैव राष्ट्राचा विचार केला. आपल्याबरोबर राष्ट्र मोठं व्हावं म्हणूनच मराठे धडपडले. पानपतावर अब्दालीची झुंड रोखण्यासाठी मराठ्यांची एक पिढीच्या पिढी मारता मारता मरावे अशी झुंजून मेली. अब्दालीला पुन्हा भारताकडे वाकडी नजर करून बघायची हिंमत होणार नाही, असा चोप मराठ्यांनी दिला. मराठे पानपतावर मोडले, पण हे राष्ट्र, इथला समाज आणि धर्म त्यांनी सावरला. मराठ्यांची समशेर हा भारताचा आधार होता म्हणूनच मराठे मोठ्या ताठ मानेनं शिलंगणाला निघायचे. पण महाराष्ट्र धर्म आपण विसरलो. आपसातल्या लाथाळ्यात आणि कुणाचं तरी अनुयायीत्व मिरवण्यात आम्हाला समाधान वाटू लागलंय. मग आमच्या पाठ्यपुस्तकांतून मराठी माणसाचा मोरू प्रवेशला. 'नवरात्र संपले. दसरा झाला, दिवाळी आली. मोरूचा बाप मोरूला म्हणाला, उठ... पालख्या उचलण्याचं, सतरंज्या घालण्याचं, मुजरे करण्याचं काम इमानदारीनं करायला तयार हो....!' महाराष्ट्रापेक्षा मोदी मोठे ही 'स्वामी'निष्ठा यातूनच निर्माण झाली असावी का? वास्तविक, हे राष्ट्र मोठं करण्याचे काम आम्ही करतो म्हणूनच मराठ्यांच्या भूमीला महाराष्ट्र हे नाव आहे, असं छातीठोकपणे सांगणारी आणि त्यानुसार विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजवणारी माणसं महाराष्ट्रात झाली आहेत. त्या कर्तृत्ववान मराठी पुत्रांमुळेच 'महाराष्ट्र आधार या भारताचा' हा विश्वास निर्माण झाला. महाराष्ट्राचं वैभव तळपू लागलं. त्याचा जेव्हा अभाव जाणवला तेव्हा महाराष्ट्रावर अन्याय लादला गेला आणि त्या अन्यायानंच अंगार पेटावा तसा मराठा धगधगून उठला होता. महाराष्ट्र मिळाला, पण मराठी माणूस मात्र संपत गेला. आज त्याचीच अवहेलना होतेय. सत्तेवर बसलेल्यांना आपल्याच माणसाकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. दिल्लीश्वरा पुढे कुर्निसात करण्यातच ते मश्गूल आहेत, त्यातच धन्यता मानताहेत दिल्लीश्वरांनीच त्यांना सुभेदारी बहाल केली असल्यानं त्यांच्याशीच निष्ठा वाहण्यासाठी ते सदैव तयार असतात. त्यांनी ज्या मराठी माणसाच्या जीवावर, त्यांच्या मतांवर वाटचाल आरंभली होती. त्याचा त्यांना विसर पडलाय. हिंदुत्वाचं ढोंग आणि अवडंबर माजवणाऱ्या, त्यातूनच रक्तपिपासू शोषक व्यवस्थेचा वडवानल पेटवून देणाऱ्या हिणकस राजकीयवृत्तीच्या भाजपसमोर काँग्रेस नेते, राहुल गांधींच्या नफरत छोड़ो, भारत जोड़ो यात्रेतून आपसूकच एक फार मोठं आव्हान उभं ठाकलेलंय. त्यामुळंच, या विषमता आणि विद्वेषवादी लोकांना, प्रथमच देशातल्या गरीबी, बेरोजगारी तरीही, अजून कंत्राटी-कामगार पद्धतीतल्या आणि 'अग्निपथा'तल्या 'अर्धरोजगारी'वर ते मूग गिळूनच आहेत, आर्थिक-विषमतेवर बोलण्यासाठी कंठ फुटलाय! लक्ष्मीपुत्र गुजराथ्यांच्या बुलेट ट्रेनसाठी भाजपच्या 'मांडलिक' मुख्यमंत्र्यांचा आटापिटा सुरूय. सदा खोत आणि गोपी पडळकर या भाजपवाल्यांच्या नादानं संप करणार्या मराठी एस.टी. कामगारांनो, आता, फक्त छातीच पिटा! मराठी कामगारांचा आवाज जर, असाच दबला; तर, खात्रीपूर्वक समजा की, शिवछत्रपतींचा महाराष्ट्र संपला!
आज राजकीय क्षेत्र हे जणू भंगाराचं दुकान झालेलंय. कोणीही लोकप्रतिनिधी येतो आणि तागड्यात बसून स्वतःला भंगार भावात विकतोय. मतदारांना स्वतःची लाज वाटते की नाही ठाऊक नाही. कारण आपण अशा भंगार लोकप्रतिनिधींना मतं दिलीत; पण हे लोकप्रतिनिधी मात्र बेशरम आहेत. ऊरुसाच्या आधी तमासगीर मैदानात छावण्या टाकून रंगीत तालमी करतात. कोणाला कोणती भूमिका द्यायची ठरवतात. बाहेरुन कलाकार पळवून आणतात. प्रत्यक्ष तमाशाच्या आधीचा तमाशा त्या मैदानावर होतो. आधी आदर करणाऱ्याची नंतर निंदा होते. ऊरुस संपला की सगळे थकून भागून गारेगार होतात. आपसात लग्नही जुळवून आणतात. पुढच्या ऊरुसापर्यंत छान संसार करतात. पटलं नाहीतर शेजारच्या छावणीत जातात. त्याला व्याभिचार नाही म्हणत. घरवापसी म्हणतात. सध्या राजकीय फडावर हाच भंगार मालाचा लिलाव सुरुय. मतदारांचं या दलालांना काही घेणं देणं नाही. त्याला गृहीत धरुन सगळा नासवा-नासवीचा धंदा राजरोसपणे सुरुय. विशेष म्हणजे मतदार थिएटरमध्ये बसल्यासारखं हे बघतोय, टाळ्या पिटतोय. कपट कारस्थानाला हुशारी, चाणक्यनीती समजतोय. कोणाला तरी शिव्या घालतोय. कोणाला तरी मत देतोय. पुन्हा पुढच्या खेळाचं तिकीट काढतोय. खरं तर आपल्या समाजाची मनोदशाच समजत नाही. सकाळी उठून पोटाची खळगी भरण्यासाठी त्याची रोजगार यात्रा सुरु होते. तो मजूर अड्डयावर स्वतःला भाकरीच्या भावात भाड्यानं देतो. आणि राजकारणी तिकडं तारांकित हॉटेलात जनतेच्या पैशावर डुकरासारखं चरताहेत गाढवासारखं लोळताहेत. आपला समाज पराभूत मनोवृत्तीचा आहे, लढाईच्या आधीच हत्यारं खाली ठेवणारा, कितीही दुर्धर प्रसंग आला तरी कोपऱ्यातल्या कोपऱ्यात जागा करून राहणारा, पण मानेवरचं जोखड भिरकावून देत नाही. 'ठेविले अनंते तैसेचि राहावे चित्ती असू द्यावे समाधान!' अशा परिस्थिती शरण समाजाचा निस्तेज चेहरा पाहावत नाही. गलितगात्र लोळागोळा झालेल्या समाजात दंगली घडविण्यासाठी प्राण कोण फुंकतो कोण जाणे. पण तो नक्कीच देशाचा हितचिंतक नाही. सामान्य नागरिक जोपर्यंत लोकशाहीतल्या आपल्या मतांचं मूल्य समजत नाही. राज्यघटनेबाबत साक्षर होत नाही. तोपर्यंत फडावर अशाप्रकारच्या तमाशाची रंगीत तालीम होतच राहणार. राजनेत्यांची, लोकप्रतिनिधींची दलाली आणि लिलावही होत राहतील. इथं कोणीही शहाजोग नाही. सगळ्यांची संस्कृतीही एकच आहे. हे आम्ही नेहमीच म्हणतो आणि मतदार जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत म्हणत राहणार. ब्रिटीश काळात गुन्हेगारांची वस्ती ही कुसाबाहेर, गावाबाहेर होती. स्वातंत्र्यानंतर आता ती गावात आलीय, एवढाच काय तो फरक झालाय! विनायक दामोदर सावरकर यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या संगीत 'संन्यस्त खडग' या नाटकात त्यांनी लिहिलेलं आणि मास्टर दीनानाथ यांनी गायलेलं गीतातले शब्द आजच्या परिस्थितीलाही लागू पडताहेत!
परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला ।
सजिवपणी घडती सारे । मरण-भोग त्याला ॥
असुनि खास मालक घरचा । म्हणति चोर त्याला ॥
सौख्य-भोग इतरा सारे । कष्ट मात्र त्याला ॥
मातृभूमि त्याची त्याला । होत बंदिशाला ॥
हरीश केंची
९४२२३१०६०९
भाजपचं 'कमंडल हारी'.....!
"बिहारच्या जातीनिहाय आकडेवारीने देशात पुन्हा एकदा मंडल राजकारणाने उचल खाल्लीय. याची जाणीव संघाला आणि भाजपला यापूर्वीच आली होती. म्हणूनच त्यांनी संघटनात्मक बदल केले. जातीनिहाय जनगणना केल्यानंतर जे आकडे समोर आले, त्यातून वास्तव लक्षात आल्यानं संविधानातल्या आरक्षणाचा फेरविचार करायला हवा, असं म्हणणारा संघ-भाजप आता मागासवर्गीयांवर हजारो वर्षे अन्याय झालाय अशी भूमिका घेऊ लागलेत. संघ-भाजप आपल्या मूळ विचारधारा लपवतील आणि धार्मिक भावना जागृत करून जातीवादात नव्हे तर केवळ हिंदुत्ववादातच कसं भलं आहे. हे इतर समाजावर बिंबवतील. म्हणजे हिंदुत्वाचं ओझंही वाहणार नाहीत, पण 'मंडल'च्या दिशेनं वाटचाल करतील याचाच अर्थ ब्राह्मणवादाचा झगाही राहील आणि 'मंडल'ची फिलॉसॉफीही!"
--------------------------------------------
*जा* तनिहाय गणना...! सध्या सर्वत्र आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाचा हा संवेदनशील विषय समोर आलाय! यात बिहारनं अत्यंत मोठं पाऊल टाकलंय. जातनिहाय सर्वेक्षणाचे आकडे जाहीर करुन मोठी राजकीय खेळी केलीय. त्यांच्या 'मंडल' राजकारणाच्या पुनरागमनाचे काय परिणाम होतील हे येत्या काळात दिसून येईल. देशात प्रथमच बिहार सरकारनं अशी जात गणना करुन आकडे जाहीर केलेत. याआधी कर्नाटक, तेलंगणा सरकारनं जात गणना केली होती. पण त्याचे आकडे जाहीर केले नव्हते. २०११ मध्येही केंद्र सरकारनं जात गणना केली होती. त्याचे आकडे हाती आल्यानंतर ते जाहीर केले नाहीत. मात्र बिहारमध्ये नितीशकुमार, लालू यादव यांच्या एकत्रित सरकारनं ही मोठी खेळी करत लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा डाव खेळलाय. त्यातून ८४ टक्के मागासवर्गीय असल्याचं दिसून आलंय. त्यामुळं भाजपचे धाबे दणाणलेत. देशात शेवटची जातनिहाय गणना झाली ती १९३१ मध्ये. त्यानंतर कुठलाही जातनिहाय आकडा उपलब्ध झालेला नाही. कांशीराम यांनी म्हटल्याप्रमाणे 'जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी !' हा नारा देत ओबीसींकडून ही मागणी केली जात होती. मंडल विरुद्ध कमंडलचं राजकारण बिहारमध्ये पुन्हा सुरु झाल्याचं मानलं जातंय. आता त्याचे वारे देशभर वाहणार असल्यानं सारेच चिंतित आहेत. मंडल विरुद्ध कमंडल या राजकारणाला गेल्या तीन दशकांचा इतिहास आहे. कमंडलचं राजकारण म्हणजे हिंदू धर्माच्या नावाखाली अस्मिता जागी करणं हे भाजपच्या फायद्याचं ठरलंय. तर मंडल कमिशनच्या उदयानंतर देशात ओबीसींच्या राजकारणानं जोर धरला. लोकसभा निवडणुकीपूर्वी आता पुन्हा नितीशकुमार, लालूप्रसाद यादव भाजपला मंडलच्या मैदानात खेचू पाहतायत. काँग्रेसकडून तर सातत्यानं जातनिहाय गणनेची मागणी करुन भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय. मोदी सरकार ओबीसींचं एवढं हित पाहत असल्याचा दावा करते तर मग ते जातनिहाय आकडे जाहीर का करत नाहीत असा सवाल राहुल गांधींनी लोकसभेतही उपस्थित केला होता. महाराष्ट्रातही अशा जातनिहाय गणनेची मागणी अनेक वर्षांपासून होतेय. मविआच्या काळात तसा ठरावही विधानसभेत करण्यात आला होता, पण केंद्र सरकारनं तो फेटाळला. आता महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बिहारमुळे हा दबाव वाढू शकतो. बिहारमध्ये खुल्या प्रवर्गाची संख्या १५ टक्के आहे. त्यामुळं आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडण्यासाठीची मागणी जोर धरु शकते. सरकारी योजनांचा लाभ योग्य प्रमाणात वाटला जावा, निधीची तरतूद त्या त्या घटकांसाठी योग्य प्रमाणात व्हावी यासाठी जातनिहाय जनगणनेची शिफारस केली जाते. आता जर बिहार सरकारनं हे आकडे जाहीर केले. तर त्या पोतडीतून एकाच वेळी अनेक राजकीय मुद्द्यांचा स्फोट होऊ शकतो. शिवाय पाच राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जातनिहाय गणना हा कळीचा मुद्दा ठरु शकतो. महाराष्ट्रात मराठा, कुणबीसह ओबीसी आरक्षणाचा वाद पेटला असताना अशी जातनिहाय गणना झालीच तर त्या आकड्यांमधून मोठी उलथापालथ होऊ शकते हे काही वेगळं साांगायला नको. ओबीसी ही देशातली मोठी व्होट बँक आहे. आणि ओबीसी समुदाय आणि भाजप जवळ असल्याचं मानलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही ओबीसी समुदायामधून येतात. मागील लोकसभा निवडणुकीचा कल सांगतो की, भाजपला ओबीसी समुदायाची मते १० वर्षात दुप्पट झाली. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २२ टक्के ओबीसी मतं मिळाली होती, जी २०१९ मध्ये वाढून ४४ टक्के झाल्याचा अंदाज निवडणुकीनंतरच्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला होता. लोकसभेतल्या ३०३ खासदारांपैकी ८५ ओबीसी आहेत. देशभरातल्या १,३५८ भाजप आमदारांपैकी २७ टक्के आमदार ओबीसी आहेत. १६३ विधान परिषद आमदारांपैकी ४० टक्के ओबीसीतील आहेत.
काळाची आणि सत्तासंपादनाच्या आसक्तीपोटी मोठमोठ्या राजकीय पक्षांना आपल्या विचारधारेशी फारकत घेण्याची वेळ येते. भाजपची ओळखच एका विशिष्ट वैचारिक भूमिकेशी निगडित असेल अन ती बदलण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याची दखल घेणं महत्वाचं ठरतं. भाजपनं आपलं वैचारिक अधिष्ठान केवळ सत्तेसाठी बदलण्याचा प्रयत्न आजवर केलाय. मध्यप्रदेश आणि इतर पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ ला लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होताहेत. त्यासाठी मूळ विचारांशी फारकत घेत नव्या दिशेनं वाटचाल सुरू केलीय. जवळपास ३३ वर्षांपूर्वी सामाजिक संघर्ष देशात उभा राहिला होता, ज्यानं इथली सत्ता उलथून टाकली होती. ते 'मंडल'चं युग होतं. त्याविरोधात भाजपनं तेव्हा 'कमंडल'चं आव्हान उभं केलं होतं. त्याकाळी 'मंडल' आणि 'कमंडल'च्या राजकारणानं देशातलं वातावरण पुर्णतः बदलून गेलं होतं. 'मंडल'नं जातीवर आधारित राजकारण करणाऱ्यांसाठी एक वेगळी वाट दाखवली होती. 'कमंडल'नं भाजपला एक हिंदुवादी पक्ष किंबहुना एक उच्चवर्णीय तेही ब्राह्मणवादानं ओतप्रोत भरलेला पक्ष म्हणून दाखविण्याची संधी मिळवून दिली. तर काँग्रेस हा मुस्लिम तुष्टीकरण करणारा पक्ष असल्याचं चित्र उभं केलं गेलं. जातीवादी पक्षांवरही आरोप केले गेले. या तुलनेत या सगळ्यांपासून भाजपनं स्वतःची ओळख निर्माण केली ती 'राष्ट्रीय' आणि 'हिंदुत्ववादी' पक्ष म्हणून! त्याचबरोबरीनं संपूर्ण देशालाच आपल्या हिंदुत्वाच्या कवेत घ्यायला सुरुवात केली. पण आता जातीनिहाय जनगणनेचे आकडे प्रसिद्ध झाले त्यामुळं त्यांचं मूळ उद्दिष्टासह वैचारिक अधिष्ठानही बदलतंय, उराशी कुरवाळलेलं 'कमंडल' टाकून द्यावं लागतंय. कधीकाळी कडाडून विरोध केलेल्या 'मंडल'चं राजकारण आत्मसात करायला भाजपला आणि संघाला भाग पडलंय. पक्षाच्या संघटनात्मक घडामोडींकडं पाहिलं तर लक्षांत येईल की, तिथं आता वरिष्ठपदांवर ब्राह्मण व्यक्ती दिसत नाहीत. तिथं जाणूनबुजून जातीय समीकरण केल्याचं दिसतं. त्याचं प्रत्यन्तर मोदींच्या मंत्रिमंडळातही दिसलं. आज मोदींच्या मंत्रिमंडळात २७ ओबीसी मंत्री तर डझनभर मागासवर्गीय मंत्री आहेत. इथं एक बाब लक्षांत घ्यावी लागेल की, संघ ज्या 'मंडल राजनीती'ला बदलू पाहात होता, मात्र त्यात संघ अपयशी ठरला. आता ती राजनीती संघाच्या कक्षेबाहेर गेलीय. सत्तेसाठी संघालाच बदलायला लावण्यात राजनीती यशस्वी ठरलीय! विकासाच्या राजनीतीसमोर 'कमंडल'चं राजकारण मागे पडलंय. हाती असलेली सत्ता राखण्यासाठी 'कमंडल' त्यागून संघ-भाजपला 'मंडल' स्वीकारावं लागलंय !
३३ वर्षांपूर्वी तत्कालीन प्रधानमंत्री व्ही.पी. सिंग यांच्या राजकारणातून 'मंडल आयोगाचं' आंदोलन उभं राहिलं होतं. तेव्हा त्या 'मंडल' आयोगाच्या जातीय शिफारशीं विरोधात भाजपनं कंबर कसली होती. तेव्हापासून २०१४ पर्यंत भाजप हेच सांगत होती की, देशातलं जातीचं राजकारण बंद व्हायला हवंय. गरीबांना सर्वप्रकारच्या सुविधा मिळायला हव्यात आणि सक्षम असणाऱ्यांना वेळीच संधी आणि हक्क मिळायला हवाय. पण वास्तव लक्षांत आल्यानं ही परिस्थिती बदलली. दिल्लीतल्या बैठकीत जे संघ-भाजपचं विचारमंथन झालं त्यात संघानं हे मान्य केलं की, अयोद्धेतलं राममंदिर, कश्मीरचं कलम ३७०, तीन तलाक याशिवाय नरेंद्र मोदींची छबी वापरल्यानंतर सहज विजय मिळेल असं वाटत असतानाच काही राज्यात भाजपचा पराभव झालाय! या पराभवानं भाजपच्या अजेंड्यातले हे सारे मुद्दे बाजूला गेलेत. १९९०-९३ च्या दरम्यान सारी स्थिती अनुकूल असतानाही संघ-भाजपला सत्तेचं सोपान गाठता आलेलं नव्हतं. मात्र २०१४ मध्ये ओबीसी-तेली समाजाच्या नरेंद्र मोदींनी संघाला अभिप्रेत असलेलं यश मिळवलं आणि आजवर राखलं. आता त्यालाही आव्हान मिळतेय. शताब्दीच्या उंबरठ्यावर असलेला संघ इथंच धाराशायी झाला! संघाला भाजपनं धडा शिकवलाय की, स्वीकारलेल्या ब्राह्मणवादाचा आता त्याग करा, उच्चवर्णीयांचा आग्रह सोडून द्या. हिंदुराष्ट्रांची निर्मिती वा हिंदुत्ववादी पक्षाची सत्ता संघाला राखायची असेल तर वेगवेगळ्या प्रांतांतून संघानं जे प्रचारक नेमले आहेत ते बदलून टाका. संघानं भाजपचं ऐकलं, आत्ता देशभरात जे काही प्रचारक दिसताहेत त्यात ओबीसी, एससी, एसटी जातीचे दिसतील. ब्राह्मण अभावानंच आढळतील. पूर्वी संघ प्रचारक हे एकजात ब्राह्मण असायचे. 'मंडल'ला संघानं भाजपच्या माध्यमातून स्वीकारलंय ते सत्तानुकूल वातावरण होईल या उद्देशानं! हे सारं पाहताना असं जाणवतंय की, ब्राह्मणवादीच आता 'मंडल'चा आग्रह धरताहेत. ते 'कमंडल'ला दूर सारताहेत. यापूर्वी 'मंडल-कमंडल' वादाचा लाभ कुणाला झाला? 'कमंडल'चा फायदा देशातल्या हिंदूंना झाला नाही अन 'मंडल'चा फायदा मागासवर्गीयांनाही मिळाला नाही. मात्र या मुद्द्यावरून देशभरात राजकारण मात्र पेटलं होतं. त्याची पुनरावृत्ती होतेय अशी स्थिती निर्माण झाल्यानं भाजप गोंधळून गेलाय.
'राजकारणाच्या या कुरुक्षेत्रावर भाजपनं नेहमीच राममंदिर, ३७० कलम आणि समान नागरी कायदा याचा आग्रह धरलाय. यापैकी दोन मुद्दे राबविण्यात संघ आणि भाजपला यश लाभलंय. आता त्यांच्या अजेंड्यावरचा समान नागरी कायदा तेवढा शिल्लक राहिलाय. यात आणखी दोन मुद्दे नव्यानं जोडले गेलेत, एक 'धर्मपरिवर्तन कायदा' आणि दुसरा 'लोकसंख्या नियंत्रण कायदा'! हे कायदे आताच विधानसभांच्या निवडणुक काळात करायचं की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या काळात एवढाच काय तो प्रश्न भाजपसाठी उरलाय! ३३ वर्षाच्या या कालावधीत संघानं आपली 'हिंदुत्ववादी' ओळख उच्चवर्णीयांच्या माध्यमातून, ब्राह्मणवादातून निर्माण केली. भाजपनं आपला उत्कर्ष, वाढ, विस्तार आणि सत्तासंपादन यासाठी संघाचा बेमालूमपणे वापर केला. पण आता संघ 'मंडल'च्या वाटेवरून जाण्याचा विचार करतोय! सरसंघचालक भागवत यांनी याचं सूतोवाच नुकतंच केलंय. काही वर्षांपूर्वी गोविंदाचार्य यांनीही संघाला सोशल इंजिनिअरिंगचा सल्ला दिला होता. त्यावेळी अडवाणी हे 'कमंडल'च्या रथावर आरूढ झालेले होते. गोविंदाचार्य भाजपला समजावून सांगत होते की, उत्तरेकडील राज्यात सत्ता मिळवायची असेल तर इथं जातीय समीकरणं साधायला हवीत. पण दिल्लीत वाजपेयी-अडवाणी हे 'कमंडल'वर स्वार झालेले होते. हळूहळू संघ-भाजपनं उभं केलेलं 'कमंडल'चं आयुष्य संपुष्टात आलं. हिंदू-मुस्लिम वादाच्या राजकारणातून देशातले मुस्लिम, अल्पसंख्याक भाजपपासून दुरावले. 'आम्हाला मुस्लिमांच्या एकाही मतांची गरज नाही!' असा संदेश मुस्लिमांपर्यंत पोहोचविण्यात भाजप यशस्वी झाला. याबरोबरच देशात भाजप हाच एकमेव हिंदुत्वाचा पक्ष असल्याचं लोकांवर बिंबवलं गेलं. आता भाजप का बदलतोय हे पाहिलं तर लक्षांत येईल की, आज भाजप 'कमंडल'च्या साथीनं सत्तेवर आहे तर 'मंडल'चे आग्रही विरोधीपक्षात आहेत! मात्र आगामी काळात हिंदुत्वाच्या, 'कमंडल'च्या आश्रयानं सत्ता राखता येणार नाही, तर प्रसंगी सत्ता गमवावी लागेल याची जाणीव, अनुभूती भाजपला झालीय. 'धर्मपरिवर्तन' आणि 'लोकसंख्या नियंत्रण' यावर कायदे करावे लागतील. संघाचं 'जातीय समीकरण' आणि भाजपचं 'राजकीय समीकरण' यात या दोघांचा मूलाधार असलेला ब्राह्मण समाज हा मात्र त्यांच्या दृष्टीनं आताशी अस्पृश्य झालाय! ब्राह्मण अशासाठी अस्पृश्य झालेत की, त्यांना आता पदं देण्यात काही हशील नाही, ब्राह्मणांना पदं दिली नाहीत तरी ते आपल्याला सोडून काँग्रेस वा इतर कुणाकडं जाणं केवळ अशक्य आहे. ते आपल्या बरोबरच राहतील; त्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. असं संघ-भाजपला वाटतं. संघ-भाजप आपल्या विचारधारा लपवतील आणि धार्मिक भावना जागृत करून केवळ आपणच हिंदुत्ववादी पक्ष आहोत हे इतर समाजावर बिंबवतील. म्हणजे हिंदुत्वाचं ओझंही वाहणार नाहीत, पण 'मंडल'च्या दिशेनं वाटचाल करतील याचाच अर्थ ब्राह्मणवादाचा झगाही राहील आणि 'मंडल'ची फिलॉसॉफीही!
जातीय जनगणनेचे वास्तव समोर आल्यानं भाजपला सतांतर्गत ब्राह्मणीझमचा वापर करणं आता घातक ठरू शकेल. सत्तेसाठी आता 'मंडल'च्याच दिशेनंच जावं लागणार आहे. सत्तेसाठी जातीय समीकरणं जातीच्या अनुकूल करावी लागतील. छोट्या छोट्या जातींना सोबत घ्यावं लागेल अन त्यांच्या नेत्यांना हे समजून द्यावं लागेल की तुम्ही आमच्याबरोबर आला नाहीत तर तुमचं अस्तित्वच शिल्लक राहणार नाही. दिल्लीतली केंद्राची सत्ता हिंदी भाषिक भागातून येते. त्यामुळं इथल्या निवडणुका महत्वाच्या ठरतात. त्या जिंकण्यासाठी भाजप आपला चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न करतोय. ब्राह्मणी-उच्चवर्णीय चेहरा पुसून तो बहुजनी करायचा प्रयत्न सुरू झालाय. भाजपनं नव्यानं जी कार्यकारिणी गठीत केलीय त्यात ब्राह्मण दिसणार नाहीत याची खबरदारी घेतलीय. जनरल सेक्रेटरींची नांवं बघा. भुपेंद्र यादव, अरुणसिंग, विजय वर्गीय, दुष्यंतकुमार गौतम, डी.पुरंध्रेश्वरीदेवी, सी.टी. रवी, तरुण चुग, दिलीप सैकिया, एम.एल.संतोष, विनोद तावडे. यात कुणीही ब्राह्मण नाहीत. राष्ट्रीय सचिवांच्या यादीत एकमेव ब्राह्मण आहेत हरीश द्विवेदी आहेत. इतरांची नाव बघा अरविंद मेनन, पंकजा मुंढे, ओमप्रकाश दुर्वे, अनुपम हजरा, नरेंद्रसिंग, विजया रहाटकर, अलका गुजर! सोशल इंजिनिअरिंगच्या खटाटोपासाठी इथं बहुजनांना नेमलंय. केवळ भाजपनंच पक्ष संघटनेत बदल केलेत असं नाही तर संघानंही आपल्या विविध राज्यातल्या प्रचारकांमध्येही बदल केलेत. संघाच्या जडणघडणीत डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी यांनी जी मेहनत घेतली, वाढ, विस्तारासाठी खस्ता खाऊन संघाला आचार, विचार आणि आकार दिलाय ते सारं आता बदलतंय. संघाच्या साथीनं मोदींच्या माध्यमातून आलेली सत्ता राखण्यासाठी संघही आता बदलतोय. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांत मोदी 'मंडल'च्या साथीनं जर का सत्तेवर आले तर पुढील अनेक वर्षे भाजप सत्तेवर राहील. असा संघाचा कयास आहे. २०२५ मध्ये संघ शताब्दी साजरी करील तेव्हा 'कमंडल', हिंदुत्व, ब्राह्मणवाद याचा पाठपुरावा संघ करणार नाही. संघ तोच मार्ग स्वीकारील जो सत्तेचा सोपान असेल; त्यात 'मंडल'ची प्राथमिकता असेल, जातीय समीकरणं असतील. पहिल्यांदाच अशी स्थिती संघ-भाजपच्या जीवनात आलीय, जिथं 'मंडल' सर्वात अग्रभागी असेल तर 'कमंडल' दूर फेकलेलं असेल! मात्र 'मंडल' उराशी बाळगून काम करणाऱ्या, मूल्याधिष्ठित राजकीय पक्षांच्यासमोर एक वेगळं आव्हान असेल की 'मंडलहरण' झाल्यानं स्वतंत्ररित्या निवडणुका जिंकणार कशा? तेव्हा जिंकणं तर दूर पण त्यांना आपली अनामत रक्कम वाचविण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल ज्यांनी 'मंडल'च्या विचारानं आजवर पक्ष चालवलाय!
हरीश केंची
९४२२३१०६०९
मोदींच्या सौगाताची खैरात...!
"एकीकडे औरंगजेबाच्या कबरीचा घातलेला गोंधळ, आजवर भक्तांनी मुस्लिमांबाबत व्यक्त केलेला टोकाचा द्वेष, तिरस्कार, वक्फ दुरुस्ती ...
-
"शी S...S... कर्नाटकातली ही घटना अत्यंत शरमेची, किळसवाणी आणि धक्कादायक आहे, जनता दलाच्या प्रज्ज्वल रेवण्णा या खासदारानं तब्...
-
"आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करताना त्यांची वैविध्यपूर्ण वाटचाल डोळ...
-
"माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 'अवस्था ना घरका ना घाट का' अशी झालीय. त्यांना सहनही होत नाही अन् सांगताही येत न...