"संस्कार घडविणाऱ्या संघाच्या मुशीत तयार झालेल्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे बुद्धिमान प्रवक्ते सुधान्शु त्रिवेदी यांनी आपल्या अकलेचे तारे तोडत शिवछत्रपतींचा उपमर्द करणारी वक्तव्ये केली आहेत. साहजिकच मराठी माणसांचा आणि उभ्या महाराष्ट्राचा संताप उसळून आलाय. भाजपच्या नेत्यांनी वेळीच आवर घालायला हवाय. आता हा संताप सुप्त आहे त्याचा जेव्हा आगडोंब उसळेल तेव्हा राज्यकर्त्यांची पळता भुई थोडी होईल. एकवेळ आपला अपमान, अवहेलना मराठी माणूस सहन करील मात्र शिवछत्रपतींचा तर कदापी शक्य नाही. याची किंमत राज्यकर्त्यांना मोजावी लागेल. मराठी माणसाच्या अस्मितेशी चालवलेला खेळ अवघड जाईल हे भाजपनं लक्षांत घ्यावं. होणाऱ्या परिणामाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी...!"
---------------------------------------------
"समूळ ग्रंथ पाहिल्या विण | उगाच ठेवी जो दूषण |
"गुण सांगता अवगुण | पाहे तो एक पढतमूर्ख || समर्थ रामदास.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना झालंय तरी काय? म्हातारचळ लागल्यासारखं काहीही बरळतात नंतर माफी मागतात. दर एक-दोन महिन्यांनी आपल्या वादग्रस्त विधानांमुळं बातमीचा मथळा बनतात. नुकतंच त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल असं म्हटलंय की, 'शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे गत काळात आदर्श होतं...!' याचा अर्थ असाच की, शिवाजी महाराजांची कर्तबगारी आज कालबाह्य झाली आहे! तशात सुधांशु द्विवेदी या भाजपच्या उठवळ गृहस्थानं शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला, पाच माफीपत्रे लिहली होती, असे तारे तोडलेत, शिवाय त्याची तुलना त्यांनी सावरकरांच्या माफीपत्रांशी केली आहे. राज्यपालांनी व्यासपीठावर बसलेल्या नितीन गडकरींची तुलना आधुनिक शिवाजी महाराज अशी केली आहे. त्याआधी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शिवाजी महाराज बनवलं होतं. भाजपच्या डोक्यात सत्ता गेली आहे. त्यामुळंच त्यांच्याकडून महाराष्ट्र द्वेष वारंवार होताना दिसून येत आहे. प्रधानमंत्र्यांनी हे जाहीर करावं, की आपण देशाचे प्रधानमंत्री आहोत. कारण गुजरातला सख्या लेकराचं प्रेम मिळत आहे. तर इतर राज्यांना सवतीच्या मुलाची वागणूक मिळत आहे. शिवाजी महाराज हे व्यक्ती नव्हते तर, ते एक व्यवस्थापन शास्त्रातलं विद्यापीठ होते. हे जगभर मान्य केलं गेलं आहे. आज व्यवस्थापनशास्त्राच्या अभ्यासक्रमात महाराजांच्या युक्त्या-क्लृप्त्यांचा समावेश केलेला आहे. अनेक युध्दे त्यांनी आपल्या शिस्तीच्या व्यवस्थापन शास्त्रामुळं जिंकली होती. त्यांचं हेरखाते सर्वात शक्तिशाली होतं. मावळे केवळ पगारी नोकर नव्हते. त्यांनी मित्रांना सैनिक केले होते. पण शिस्तीच्या बाबतीत त्यांची गय केली नव्हती. प्राणाची आहुती देणारे सैनिक निर्माण झाले होते. नांगरणाऱ्या पोरांच्या हातात तलवार देऊन लढाऊ बनवलं होतं. एवढं सारं ठाऊक असतानाही भाजप नेते वारंवार असं का वागत आहेत? की त्यांची कुप्रचाराची गोबेल्स चाचणी सुरु आहे. असं असेल तर त्यांची ती 'विनाशकाले विपरीत बुद्धी' असंच म्हणावं लागेल.
आपले आदरणीय राज्यपाल बहुधा आपल्या चाळ्यांमुळं चिरंजीव होणार अशी लक्षणं दिसत आहेत. पुराणकाळातील सप्त चिरंजीवांच्या यादीत ते आपल्या कृत्यामुळं समाविष्ट होतील अशी लक्षणं दिसत आहेत. हनुमान, बळी, परशुराम, महर्षी व्यास, बिभिषण, अश्वत्थामा, कृपाचार्य या चिरंजीवींची नावं आपल्या सत्कृत्यांमुळं अथवा दुष्कृत्यांमुळं अमर झालेली आहेत. म्हणूनच त्यांना चिरंजीव म्हणतात. हल्ली कलियुगात अशी थोर माणसं आढळणं दुर्मिळच आहे. पण आम्ही मराठी माणसं भाग्यवान आहोत. महाराष्ट्रात गेले तीन-चार वर्षे मनूचे आदरणीय हस्तक आपलं कसब पणाला लावून राज्यघटनेला डावलून लावत आहेत. गेल्या अडीच वर्षात राज्यातील प्रशासकीय प्रमुख म्हणून काय काम केलं होतं. त्याचं स्पष्ट चित्र नागरिकांसमोर आहे. त्यांनी जे उद्योग केले होते, त्यात थोर सत्यशोधक महात्मा फुल्यांच्या निंदेचा समावेश होतो. त्याचप्रमाणं 'जर बिगर मराठी भाषिक,महाराष्ट्राबाहेर गेले तर, महाराष्ट्र भिकारी बनेल!' असंही महाराष्ट्राच्या हिताचं बोलले होते. म्हणजे इथली भाकरी खायची आणि याच घराचे वासेही मोजायचे? पोट भरल्यावर मराठी द्वेषाची गरळ ओकायची. विरोधी पक्ष मराठी असूनही मूग गिळून गप्प आहेत. हे विशेष आहे. घटनात्मक पदाला राजकीय अभिनिवेश चिकटायला नको असे संकेत आहेत. तेच संकेत सरसकट पायतळी तुडविले जात आहेत. राजकीय पक्षांच्या माणसांची वर्णी लागली की, असंच होणार! कॉंग्रेसनंच ही प्रथा पाडली आहे. दोन वर्षांपूर्वी बारा विधानपरिषद आमदारांची यादी दिली होती. ती ड्रॉवरमध्ये तशीच पडून होती. अनेकदा मागणी करुनही निर्णय घेतले गेले नाहीत आणि रद्दही केली नव्हती. मात्र नवे मुख्यमंत्री आल्याबरोबर ती यादी रद्द करण्याचं पवित्र कार्य केलं आहे. घटना पायतळी तुडविताना सर्वोच्च न्यायालयाचं भयही त्यांना राहिलं नाही काय? आम्हाला वाटतं की, त्यांना हे सांगण्यात आलं असावं की, थोडं थांबा सरकार बदलतंय. मग आपण आपली मेजॉरटी विधानपरिषदेत बाराने वाढवू. त्याचंच पालन त्यांनी केलं आहे. एखादा आब्रुदार माणूस असता तर, राजीनामा देऊन घरी बसला असता. पण हे तंत-पंत असलेले, साडेतीन टक्क्यांचे रखवालदार इतकी मानहानी होऊनही या वयात कसं काय सहन करतात? त्यांनी मध्युगातल्या संस्कृतीचं गाठोडं जतन करून ठेवलेलं आहे. भले त्यामध्ये शिळ्या भाकरी का असेनात पण पारोशी पुस्तकं, अवैज्ञानिक व्रतं-वैकल्यं, अविवेकी कृती यांची रेलचेल आहे. कारण आताची दृश्ये ही पूर्वीच्या राजदरबाराप्रमाणे भासतात. राजगुरु आपल्या आसनावर,स्थानापन्न असून देवेंद्र इंद्र, त्यांना सल्ला विचारीत असतो. त्यानुसार राज्यशकट चालत असे. आता त्यात बदल झाला आहे काय? कारण आता देवेंद्र इंद्र राजगुरुंना सल्ला देत आहेत आणि राज्यसंकट चालत आहे? असं असावं काय? काही का असेना पैसे देऊनही इतर राष्ट्रांमध्ये वस्तू मिळत नाहीत. आपल्याकडं त्या निदान मिळतात तरी! जगभर मंदी आणि टंचाई असताना भारतात जाणवत नाही. असे जागतिक अर्थशास्त्री म्हणतात. याचा अर्थ दारिद्रय हीच सुबत्ता ही जीवनपद्धती आमच्या अंगवळणी पडली आहे. त्यामुळं आसपास कितीही सामाजिक, आर्थिक धरणीकंप होवो, आमच्या गरिबीच्या सुबत्तेला धक्का बसणार नाही. हे सारं वैदिक काळापासून चालत आलेलं होतं. मध्ये साठ वर्षे बंद झालं होतं. पण पुन्हा एकविसाव्या शतकात मध्ययुगाला गतवैभव प्राप्त झालं आहे. त्याची जाणीव राजगुरुंनी करुन दिली आहे. त्याचं हे श्रेय कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ते अजूनही कुरुक्षेत्र, हस्तीनापूर, गांधार युगात मनातल्या मनात राहतात. 'त्या सम हाच दुजा कोणीही नाही!' हीच चिरंजीव होण्याची पात्रता असावी. 'नाना दुःख नाना व्याधीl वृध्दपणे चळे बुध्दीll
“मला असं वाटतं की तुम्हाला कोणी विचारलं की तुमचे आदर्श कोण? किंवा तुमच्यासाठी हिरो कोण? तर तुम्हाला महाराष्ट्रातच ते भेटतील. बाहेर कुठे जायची गरज नाही. शिवाजी तर जुन्या युगातली गोष्ट आहे. डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत इथेच भेटतील!” असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आणि त्यावर अनेकांनी आक्षेप घेतलाय. त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली जातेय. राज्यपालांनी सर्व मर्यादा सोडल्यात, अशी टीका करत राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी केलीय. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनीही राज्यपालांना तात्काळ हटवण्याची मागणी केलीय. महाविकास आघाडीनं तर त्यांना विरोध केलाच पण मनसे आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि शिंदे गटातल्या काही आमदारांनीही राज्यपालांची हकालपट्टी करा, अशी भूमिका घेतलीय. राज्यपाल कोश्यारी १९ नोव्हेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यात शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डी लिट पदवीनं गौरवण्यात आलं. यावेळी या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. राज्यपालांची नेमणूक केवळ राष्ट्रपती करू शकतात. तसंच त्यांना हटवण्याबाबतचा निर्णय सुद्धा केवळ राष्ट्रपतींच्या हातात असतो. आपल्या देशात राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार काम करतात. त्यामुळे राज्यपालांची नेमणूक पंतप्रधानांच्या इच्छेनुसार होते. ज्या पक्षाचा प्रधानमंत्री त्या पक्षाचा राज्यपाल असतो हीच पद्धत दिसून येते. त्यामुळे राज्यपालांचा कार्यकाळ कायम करायचा की त्यांना हटवायचं याचा निर्णय ज्या पक्षाचा प्रधानमंत्री आहे त्यांचा असू शकतो. दुसरं म्हणजे, राज्यपालांना हटवण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा कोणालाही कोर्टातही दाद मागता येत नाही. कारण असा निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रपतींचा असतो. फार तर राष्ट्रपतींकडे विनंती अर्ज पाठवता येऊ शकतो. राज्यपालांच्या नेमणुकीचे किंवा त्यांना काढण्याचे कुठलेही नियम नाहीत. अगदी पोलीस कॉन्सटेबल किंवा कोणतंही पद भरण्यासाठी प्रक्रिया असते पण राज्यपाल या पदाबाबत अशी कुठलीच ठोस प्रक्रिया नाही. त्यांना काढायचे असल्यास त्यांना राजीनामा देण्यास सांगितलं जाऊ शकतं.
कोश्यारी यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्यानंतर अनेकवेळा कोश्यारींची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालंय. कोश्यारी यांच्या या वक्तव्यामुळं भाजप मात्र कोंडीत सापडते. या मुद्द्यावरून त्यांना मग स्पष्टीकरण द्यावं लागतं. राज्यपालांनी २९ जुलैला मुंबईतल्या अंधेरी पश्चिमेतल्या एका चौकाचं नामकरण करण्यात आलं. यावेळी त्यांनी मुंबई-ठाण्यातल्या गुजराती आणि राजस्थानी लोकांबद्दल कौतुकाचे उद्गार काढताना वादग्रस्त वक्तव्य केलं. 'महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले, तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही!' आपल्या या वक्तव्यावरून झालेल्या वादानंतर कोश्यारींनी स्पष्टीकरण दिलं. 'समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने कोश्यारी काही दिवसांपूर्वी अडचणीत आले होते. "चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं, तसंच छत्रपतींनी मला माझं राज्य तुमच्या कृपेने मिळालं आहे! असं समर्थांना म्हटलंय!", अशा आशयाचं वक्तव्य कोश्यारींनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांवरील आपलं विधान प्राथमिक माहितीच्या आधारे होतं. आता त्यासंबंधी नवीन निष्कर्ष समजल्याचं आणि तोच पुढे नेण्याचा आपला प्रयत्न असल्याचं सांगत त्यांनी सारवासारव केली होती. कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबतही उपमर्द करणारं वक्तव्य केलं होतं. कोश्यारी म्हणाले, 'सावित्रीबाईंचं लग्न १० व्या वर्षी झालं, तेव्हा त्यांच्या पतीचं वय हे १३ वर्ष होतं. कल्पना करा की लडके-लडकीया, मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील? लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील?' महात्मा फुले आणि सावित्रीबाई लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील? हा प्रश्न आहे. ज्योतिबांना अभ्यास करताना पाहून सावित्रीबाईंनी मला शिकवा असं सांगितलं. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ देशात रोवली. केवळ ८ वर्षांच्या संवादातून १७ वर्षांच्या सावित्रीबाईंनी पहिली कन्या शाळा काढली होती. हा इतिहास आहे. "भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वत:ला शांतीदूत समजायचे. त्यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ तो कमकुवतच राहिला!" असं विधान पंडित नेहरूंची अवहेलना करताना कोश्यारी यांनी केलं होतं. पंडित नेहरू यांच्याबाबत मला प्रचंड आदर आहे. पण त्यांचीही एक कमकुवत बाजू होती. ते शांतीदूत आहेत असं त्यांना नेहमी वाटायचं. देशासाठी त्यांचं योगदान मोठं आहे. पण त्यांच्या शांतीदूत या प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला. अटल बिहारी वाजपेयींचं सरकार वगळता आधीचं सरकार राष्ट्रीय सुरक्षेबद्दल गंभीर नव्हतं!' असं मत कोश्यारी यांनी व्यक्त केलं त्यावरूनही प्रचंड वादंग निर्माण झालं होतं. व त्यांना त्याची ना खंत ना खेद!
खरे तर हा घाणेरडा खेळ भाजपने सुरू केला… सत्ता मिळाल्या बरोबर सुरवातीला स्वांतत्र लढा, नेहरू, गांधी यांच्यावर प्रचंड प्रमाणावर एखाद्या चेकाळलेल्या समूहाने बेलगाम टिका करावी अशी टिका अत्यंत हिन पातळीवर जाऊन करण्यात आली. यात पदाधिकारी, संविधानक पदावरील व्यक्ती पण मागे राहिल्या नाहित. तदनंतर राहूल गांधीना लक्ष करण्यात आले. तदनंतर हि मंडळी सावित्रीबाई, महात्मा फुले, शिवरायांवर सुद्दा बिनदिक्कत टिका करू लागली. पक्षातील धुरिणांनी सोयीस्कर मौन बाळगले. पण त्या मुळे लोक खरा इतिहास शोधू लागले. ज्यांचा इतिहासच मुळात काळाकुट्ट आहे अशा काचेच्या घरातं रहाणाऱ्या मंडळींची पंचाईत झाली. आज सत्ता व त्याचा दूरपयोग करून ते जनतेची तोंडे बंद करू पहात आहेत. उद्या या उलट सत्ता गेली, कि सर्व इतिहासाचे पुन्हा उत्खनन होणारचं हि काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तेव्हा काळी झालेली यांची तोंडे लपवायलां, यांना जागा रहाणारं नाही. यांनी सुरू केलेला हा खेळ यांच्याच अंगलट येणारं आहे. अशा या राज्यपालांना राष्ट्रपतींनी, प्रधानमंत्र्यांनी समज द्यायला हवीय, पण असं घडणार नाही कारण त्यांची मतं अशीच आहेत. त्यांना अभिप्रेत असलेलं सारं काही राज्यपाल करताहेत मग त्यावर कारवाई कशी होणार? राज्यात सत्तेवर आलेलं सरकार हे बेकायदेशीरपणे अस्तित्वात आलेलं असल्यानं त्यांच्याकडं स्वाभिमान उरलेलाच नाही. मग महाराष्ट्रांची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले-सावित्रीबाई, नेहरू यांची अवहेलना, उपमर्द करणाऱ्या राज्यपालांबाबत साधा निषेध करण्याएवढी मानसिकता राहिलेली नाही. पण मराठी माणूस आणि महाराष्ट्र हा अशा बाबी सहन करणारा नाही. त्यांनी नाराजी व्यक्त केली आहेच आता त्याविरोधात महाराष्ट्र बंदच्या हालचाली सुरू झाल्यात. भाजपच्या नेत्यांनी वेळीच अशा उथळ नेत्यांना आवरायला हवंय. तसं नं करता अशा वक्तव्याची पाठराखण करताना ते दिसताहेत, हे त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही.
हरीश केंची,
९४२२३१०६०९
Subscribe to:
Post Comments (Atom)
अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!
शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...
-
"शी S...S... कर्नाटकातली ही घटना अत्यंत शरमेची, किळसवाणी आणि धक्कादायक आहे, जनता दलाच्या प्रज्ज्वल रेवण्णा या खासदारानं तब्...
-
"तुम्हाला ट्राफिक हवालदारनं पकडलंय का? तो पैसे डायरेक्ट घेत नाही, एक टपरी असते, तिथं तो पैसे द्यायला लावतो. भाजप हा ट्राफिक...
-
"आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करताना त्यांची वैविध्यपूर्ण वाटचाल डोळ...
No comments:
Post a Comment