Saturday, 19 November 2022

देशसेवा हीच ईशसेवा...!


"अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी कमला हॅरिस आणि इंग्लंडच्या प्रधानमंत्रीपदी ऋषी सुनक यांची झालेली निवड ही भारतीयांना सुखावणारी आहे. इन्फोसिसच्या नारायण आणि सुधा मूर्ती यांचा ऋषी हा जावई असल्यानं अधिक प्रेम वाटणं साहजिकच आहे. याआधी अनेक आंतरराष्ट्रीय प्रथितयश उद्योगाच्या प्रमुखपदी भारतीयांची निवड झाली असल्यानं त्याचंही कौतुक आहे! जगातल्या सात राष्ट्राचे प्रमुख हे भारतवंशीय आहेत, याशिवाय १५ देशात २०० हून अधिक भारतीय राजकारणात मोठ्या पदावर आहेत तर ६० जण विविध देशांत कॅबिनेटपदावर कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय उद्योगाचे प्रमुखही भारतीय आहेत. अशाचप्रकारे अनेक परदेशातल्या मान्यवरांनी भारतात येऊन  भारतीयांची सेवा केलीय. सारं जीवन भारतीयांसाठी वाहिलंय हेही विसरता येणार नाही. ऋषी सुनक यांची निवड भक्त मंडळींनी नको तेवढं डोक्यावर घेतलं. इंग्रजांबद्धलचे
मतभेद आणि त्यांची दुष्कृत्ये बाजूला ठेऊन म्हणावंस वाटतं की, ब्रिटिशांचं कौतुक करायला हवंय. त्यांनी भारतीय वंशाचा प्रधानमंत्री स्वीकारला. आपण मात्र सोनिया गांधींच्या विरोधात त्या विदेशी म्हणून रान उठवलं होतं, हे विसरता येत नाही!"
---------------------------------------------------

*इं* डोनेशियातल्या बाली इथं झालेल्या जी-२० च्या परिषदेत भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांचं इंग्लंडचे प्रधानमंत्री ऋषी सूनक हे अभिनंदन करतानाचा फोटो सर्वच वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलाय. भारतासाठी ही निवड अभिनंदनीय तर आहेच शिवाय जबाबदारीचीही आहे. आपल्या देशाचं तटस्थ परराष्ट्रीय धोरण सांभाळण्याची कसरतही करावी लागणारी आहे. असो. एका विषयाकडं आपलं लक्ष वेधू इच्छितो की, भारतीय वंशाचे कमला हरिस असो वा ऋषी सूनक. ते आपल्या देशाशी प्रामाणिक आहेत. हे दिसून आलंय. अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी कमला हरिस यांची निवड झाली तेव्हा जेवढी चर्चा झाली नाही तेवढी चर्चा ही इंग्लंडच्या प्रधानमंत्रीपदी ऋषी सूनक यांची निवड झाल्यावर झाली. त्यांचं मूळ आणि कुळ शोधून काढलं गेलं. त्यांच्या पूर्वजांची उजळणी केली गेली, शिवाय त्यांची सासुरवाडी, इन्फोसिसचे नारायण मूर्ती-सुधा मूर्ती हे त्यांचे सासूसासरे, त्यांचं महाराष्ट्राशी, मराठीशी असलेलं नातं याचं गुणगान गायलं गेलं. त्यांची पूजाअर्चा, त्यांचं हिंदू असणं ह्या साऱ्या गोष्टी भक्तमंडळींनी आपल्या पोष्टीद्वारे भारतीयांपुढे टाकल्या. 'कमला हरिस', 'ऋषी सूनक' यांच्याप्रमाणेच सिंगापूरच्या राष्ट्रपती 'हलीमा याकूब', गुयानाचे राष्ट्रपती 'इरफान अली', मॉरिशसचे प्रधानमंत्री 'प्रविंद जगन्नाथ', दक्षिण अमेरिकेतल्या सुरीनामचे राष्ट्रपती 'चंद्रिकाप्रसाद संतोखी', सेशेल्सचे राष्ट्रपती 'वावेल रामकलावन', पोर्तुगालचे प्रधानमंत्री 'एन्टानिओ  कोस्टा', हे सारे मूळ भारतीय वंशाचे आहेत. अशाप्रकारे जगातल्या सात राष्ट्राचे प्रमुख भारतवंशीय आहेत, याशिवाय १५ देशात २०० हून अधिक भारतीय राजकारणात उच्चपदावर आहेत तर ६० जण विविध देशांत कॅबिनेटपदावर कार्यरत आहेत. परदेशात भारतीय जे कर्तृत्व गाजवत आहेत त्याचं कौतुकच आहे याबरोबरच अनेक आंतरराष्ट्रीय उद्योगांच्या प्रमुखपदी भारतीय कार्यरत आहेत. जसे की, गुगलचे 'सुंदर पिचाई', मायक्रोसॉफ्टचे 'सत्य नडेला', ट्विटरचे 'पराग अग्रवाल', ज्यांना नुकताच राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी आलेले सीईओ श्रीराम कृष्णन, आयबीएमचे अरविंद कृष्णा, अडॉबचे शंतनू नारायण, व्हीएमवेअरचे रघु रघुरामन, ही आणि अशी अनेक भारतीय मंडळी परदेशात उच्च स्थानावर कार्यरत आहेत. त्यामुळं नव्यापिढीला परदेशातल्या नोकऱ्या खुणावताहेत. आपल्यासाठी ही कौतुकाची बाब असली तरी जशी ही मंडळी परदेशात जाऊन कार्यरत आहेत, तसेच अनेक परदेशी, विदेशी मान्यवरांनी भारतात येऊन भारतीयांसाठी समर्पित भावनेनं कार्य, सेवा केलेली आहे. भारत ही त्यांनी आपली कर्मभूमी मानलीय. त्यांनी आपली जन्मभूमी, मातृभूमी या संकल्पनेच्या पलीकडं जाऊन इथं जीवितकार्य केलंय. जन्मानं भारतीय नसलेल्या, पण मनानं भारतीय बनलेल्या काही व्यक्तींचं स्मरण सध्याच्या राष्ट्रवादी भावना टोकदार होत जातानाच्या काळात करणं हे ‘आयडिया ऑफ इंडिया’च्या अधिक जवळ जाणारं आहे. हे लक्षांत घेतलं पाहिजे. आपल्या राज्यघटनेत माणसामाणसांत भेदभाव नको, हे नमूद करताना अनुच्छेद १५ मध्ये धर्म, वंश, जात, लिंग याबरोबरच जन्मस्थानाचाही उल्लेख आहे. हा उल्लेख भारताच्या 'हे विश्वाची माझे घर' म्हणणाऱ्या विश्वव्यापी मानवतावादी दृष्टिकोनाचा एक आविष्कार आहे. म्हणूनच एखाद्या व्यक्तीच्या जन्मस्थळाबाबत संकुचित विचार करणं, त्यावरून त्याला कमी लेखणं, त्याला अव्हेरणं, हा मुद्दा राजकीय अजेंडा करणं हे राज्यघटनेच्या विरोधी ठरतं. मुळात व्यक्तीचं लहान असणं वा मोठंपण हे तिच्या कार्यकर्तृत्वावर ठरत असतं. प्राचीन काळात दक्षिण भारतात जन्मलेले बोधीवर्मन यांनी चीनमध्ये जाऊन तिथल्या बुद्धधर्माला मार्गदर्शन केलं होतं. तसंच राहुल सांस्कृतायन या महापंडितानं नेपाळ, चीन, तिबेट, श्रीलंका, इराण आणि रशियात जाऊन तिथं राहून कार्य केलं तर धर्मानंद कोसंबी या सुपुत्रानं युरोपात प्राचीन भारतीय संस्कृतीच्या प्रचार प्रसाराचं कार्य केलं होतं हे कसं विसरता येईल? पोरबंदर इथं जन्मलेल्या महात्मा गांधींनी नागरी हक्काच्या लढ्याची सुरुवात दक्षिण अफ्रिकेतून केली होती. त्यानंतर भारतात येऊन त्यांनी राष्ट्रकार्य उभारलं होतं. आपल्या सोलापूरचे महामानव डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांनी आपलं महान कार्य चीनमध्ये करत तिथंच अखेरचा श्वास घेतला हे विसरता येत नाही! भारतात जन्मलेल्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सदस्य असलेल्या बाळाजी हुद्दार यांनी स्पेनमध्ये जाऊन जॉन स्मिथ या नावानं तिथल्या जनरल फ्रँकोच्या फॅसिस्ट सत्तेच्या विरोधात लोककल्याणकारी कार्य केलं. हुद्दार यांचं हे महान कार्य संघाला काही पटलं नाही. त्यांनी भारतात परतल्यानंतर हुद्दार यांना संघानं दूर राखलं. पुढे जाऊन त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. त्याचप्रमाणे भारताबाहेर जन्मलेल्या अनेक विदेशी मान्यवरांनींही आधुनिक भारताच्या जडणघडणीत योगदान दिलंय. हे इथं नमूद करायला हवंय!

लंडनच्या दक्षिणपूर्व भागात १८२९ साली जन्मलेल्या 'अ‍ॅलन ऑक्टोव्हियन ह्यूम' या इंग्रज गृहस्थानं स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांना इंग्रज सरकारच्या प्रशासनात प्रतिनिधित्व असावं यासाठी त्यांच्याच पुढाकारानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली आहे. स्कॉटलंडमध्ये १७७९ साली जन्मलेले 'माऊंटस्टुअर्ट एलिफिन्स्टन'  १८१९ ते १८२७ या भारताच्या पारतंत्र्याच्या काळात मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते. त्यांनी भारतात शिक्षण संस्थांच्या निर्मितीची पायाभरणी केली. १८२९ साली लंडनमध्ये जन्मलेल्या 'जॉर्ज युली' या स्कॉटिश व्यापाऱ्यानं भारतात येऊन भारतीयांच्या नागरी हक्क चळवळीला समर्थन दिलं होतं. शिवाय १८८८ साली झालेल्या काँग्रेसच्या अलाहाबाद इथल्या अधिवेशनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषविलं होतं. 'अल्फ्रेड वेब' हे जन्मानं तसे आयरिश. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १८९४ सालच्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 'आयझ्ॉक बट' या आयरिश संसद सदस्यानं आर्यलंडच्या ‘होम गव्हर्नमेंट असोसिएशन’च्या धर्तीवर भारतात होमरूल लीगची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. या साऱ्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे 'अ‍ॅनी बेझंट'! १ ऑक्टोबर १८४७ साली लंडनमध्ये जन्मलेल्या अ‍ॅनी बेझंट यांनी १९१६ साली भारतात लोकमान्य टिळकांच्या सहकार्यानं होमरूल लीगची स्थापना केली. त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचंही कार्य केलं होतं. बेझंट यांनी भारतीयांसाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख लोकमान्य टिळकांनी केलाय. जवाहरलाल नेहरूंच्या सामाजिक नि राजकीय कार्याची सुरुवात होमरूल लीगमधूनच झाली होती. अ‍ॅनी बेझंट यांनी इथं थिऑसिफिकल सोसायटीचीही स्थापना केली. बनारसला सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली, पं. मदन मोहन मालवीय यांच्या सहकार्यानं याच कॉलेजचं रूपांतर १९१७ साली बनारस हिंदू विद्यापीठात झालं. स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या भगिनी निवेदिता म्हणजे मूळच्या 'मार्गारेट एलिझाबेथ नोबल'. त्यांचा जन्म उत्तर आर्यलंडमध्ये २८ ऑक्टोबर १८६७ साली झाला. त्यांनी रामकृष्ण शारदा मिशनची स्थापना केली. बंगाल प्रांतात भारतीयांच्या सामाजिक आणि राजकीय हक्कासाठीही त्या लढल्या होत्या.

याशिवाय अमेरिकेत फिलाडेल्फिया इथं १६ ऑगस्ट १८८२ रोजी जन्मलेले 'सॅम्युअल स्टोक्स' हे १९२२ साली वडिलांचा विरोध पत्करून भारतात आले. गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झाल्यानं त्यांनी भारतात सिमला इथं स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली कार्य केलं. हिंदू धर्म स्वीकारून पुढं त्यांनी 'सत्यानंद' हे नाव स्वीकारलं आणि अखेरपर्यंत भारतातच कार्य केलं. सध्याच्या काळातल्या काँग्रेस नेत्या विद्या स्टोक्स ह्या त्यांच्याच वंशज आहेत. आणखी एक विदेशी मान्यवर 'विल्यम वेडरबर्न', यांचा जन्म इडिनबरा इथं २५ मार्च १८३८ साली झाला. ते लिबरल पार्टीचे सदस्य होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत त्यांनी मोठी भूमिका बजावली. ते मुंबईच्या न्यायालयात न्यायाधीश होते. लॉर्ड रिपन यांनी भारतीयांच्या राजकीय हक्कांसाठी घेतलेल्या निर्णयाचं त्यांनी समर्थन केलं आणि इथल्या सामाजिक सुधारणांना उत्तेजन दिलं होतं. सन १९१० साली काँग्रेसमध्ये हिंदू मुस्लीम जमातवाद्यांचा संघर्ष सुरू झाला, तेव्हा हिंदू मुस्लीम ऐक्यासाठी त्यांनी स्वत: प्रयत्न केले. भारतीय समाजजीवनाशी समरस झालेल्या 'मेडीलीन स्लेड' म्हणजे समाजसेविका मीराबेन! यांचा जन्म १८९२ साली इंग्लंडमध्ये झाला होता. महात्मा गांधींचं शिष्यत्व स्वीकारून त्या १९२० मध्ये भारतात आल्या. भारतीय स्वातंत्र्यलढ्याला समर्थन देण्यासाठी त्यांनी आपली जन्मभूमी सोडली होती. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रत्येक कार्यात आणि लढ्यात हिरिरीनं भाग घेतला. इंग्लंडला झालेल्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधींसोबत त्या भारताच्या प्रतिनिधी म्हणून सहभागी झाल्या. सेवाग्राम आश्रमाच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. गांधीजींची गोलमेज परिषद, सिमला करार, कॅबिनेट मिशन, संविधान सभा, भारताची फाळणी आणि गांधीजींची हत्या, या प्रत्येक समरप्रसंगात मीराबेन ह्या गांधीजींबरोबर होत्या. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी गांधीजींबरोबर  कारावासही भोगला. त्यांच्या या भारतीय सेवाकार्याबद्धल त्यांना १९८१ साली भारत सरकारनं पद्मविभूषण या नागरी सन्मानानं गौरविण्यात आलं होतं. केंब्रिज इथं १२ जानेवारी १८८४ रोजी जन्मलेल्या नलिनी सेनगुप्ता म्हणजे 'एडिथ अ‍ॅलन ग्रे' या तिथं शिकत असताना त्या जतींद्र मोहन सेनगुप्ता यांच्या प्रेमात पडल्या आणि नंतर त्या दोघांनी लग्न केलं. जतींद्र यांनी कोलकात्यात वकिली सुरू केली, पाठोपाठ काँग्रेसच्या कार्यात स्वत:ला झोकून दिलं. एडिथ यांनी नलिनी हे नाव स्वीकारलं आणि त्यांनीही पूर्णवेळ काँग्रेसचं काम सुरू केलं. असहकार आंदोलनात नलिनी यांनी अतुलनीय योगदान दिलं. कारावासाची सजा भोगली. मिठाच्या सत्याग्रहात काँग्रेसच्या अनेक नेत्यांना बंदिवान केलं गेलं. काँग्रेसच्या १९३३ च्या कोलकाता इथल्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष पं.मदन मोहन मालवीय होते, पण त्यांना अटक झाल्यावर नलिनी यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडलं गेलं. त्यावेळी पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, मदन मोहन मालवीय, राजेंद्रप्रसाद, नेताजी बोस यासारखे सर्व ज्येष्ठ नेते कारावासात असताना युरोपात जन्मलेल्या आणि भारतीयांसाठी काम करणाऱ्या या महान विदुषीनं भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व केलं होतं!

भारतीय अदिवासी समाजासाठी अतुलनीय योगदान देणारे 'वेरीयर एल्विन' हे जन्मानं ब्रिटिश होते. त्यांचा जन्म १९०२ साली इंग्लंडमध्ये झाला होता. भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारलं, पंडित नेहरूंनी त्यांची नियुक्ती पूर्वोत्तर राज्यातल्या जमातींचे मुख्य सल्लागार म्हणून केली होती. त्यांनी गांधीजींच्या प्रभावातून १९३५ साली हिंदूू धर्म स्वीकारला आणि गोंड समाजाच्या विकासासाठी पूर्ण आयुष्य वाहून घेतलं. त्यांना १९६१ साली पद्मविभूषण या नागरी सन्मानानं गौरविण्यात आलं. तिथल्या वेगवेगळय़ा जमातींच्या आयुष्यावर लिहिलेल्या त्यांच्या अनेक ग्रंथांना साहित्य अकादमीचा सन्मानही मिळालेला आहे. रशियात जन्मलेल्या 'हेलिना ब्लाव्हास्त्सकी'. इंग्लंडमध्ये जन्मलेल्या 'कँथरीन मेरी हेलीमन' म्हणजे सरलाबेन आणि इंग्लंड ही जन्मभूमी असलेले 'चार्ल्स फियर अँड्रज' म्हणजेच दीनबंधू हे गांधीवादी नेते! त्यांच्याबरोबरच नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आयएनएच्या स्थापनेत मदत करणारे आणि जन्मानं जपानी असणारे 'इव्हांची फुजीवारा', मॅडम भिकुबाई कामा या भारतीय पारशी महिलेला सहकार्य करणारे जन्मानं फ्रेंच असणारे 'जॉन लोंग्ये' यांचाही सन्मान भारतीयांनी करायला हवाय! निसर्ग संवर्धक 'जिम कॉर्बेट', लेखक 'रस्कीन बाँड' यांचा जन्म देखील भारतातलाच. बाँड यांचे वडील भारतीय वायुदलात नोकरीवर होते. भारत सरकारनं रस्कीन बाँड यांना १९९९ साली पद्मविभूषण हा नागरी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. अगदी अलीकडच्या काळातील उदाहरण म्हणजे गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात निवर्तलेल्या आपल्या सातारच्या 'गेल ऑमवेट'. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १९४१ रोजी अमेरिकेत झाला होता. पण चळवळीतले कार्यकर्ते भारत पाटणकर यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांनी भारतीय ग्रामीण महिलांचं सशक्तीकरण, दलितांचे हक्क, जातीव्यवस्थेच्या विरोधातला लढा, पर्यावरण संरक्षण या क्षेत्रात त्यांनी अतुलनीय योगदान दिलं. याच यादीत सोनिया गांधींचाही समावेश करता येईल. इटलीत जन्मलेल्या सोनिया ह्या राजीव गांधींशी लग्न करून भारतात आल्या. त्यांनी काँग्रेसला पडत्या काळात सावरलं. गोरगरीब भारतीयांच्या हिताचे कायदे करण्यात पुढाकार घेतला. त्या सर्वार्थानं भारतीयत्वच जगल्या. स्वत:चं जन्मस्थळ काय असावं हे  कोणाही सजीव प्राण्याच्या हाती नाही, पण कार्यकर्तृत्व प्रत्येकाच्या हाती आहे. यात अजून एक महत्वाच्या नावाचा उल्लेख करावासा वाटतो. लॅारेन्स विल्फ्रेड उर्फ जगप्रसिध्द आर्किटेक्ट 'लॅारी बेकर' हे पण जन्मानं ब्रिटीश होते. महात्मा गांधींच्या संपर्कात आल्यावर त्यांनी भारतात राहायचा निर्णय घेतला आणि गरीबांसाठी खुप उत्कृष्ट दर्जाच्या स्वस्त आणि इको फ्रेंडली घरांची रचना केली. 'मदर तेरेसा', 'लॉरी बेकर' अशा भारताबाहेर जन्मलेल्या आणि भारत आपली कर्मभूमी असलेल्या अराजकीय व्यक्तींचाही उल्लेख करता येईल. सगळे मतभेद आणि त्यांची दुष्कृत्ये बाजूला ठेऊन म्हणावं लागतं की, ब्रिटिशांचं कौतुक करायला हवंय. त्यांनी भारतीय वंशाचा प्रधानमंत्री स्वीकारला. पण आपण सोनिया गांधींच्या विरोधात रान उठवलं होतं, सहज आठवलं म्हणून....!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...