"भाजपनं केवळ शिवसेनेच्या अंगावर सोडण्यासाठी म्हणून ज्यांना एकावर दोन फ्री अशा स्वरूपात घेतलं, ते तिघं उद्या भाजपसारख्या संस्कारी पक्षालाही डोईजड होतील! राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध प्रचार करून, शिवसेनेच्या साथीनं १९९५ ला भाजपनं राज्यात युतीची सत्ता आणली. आज मात्र हाच भाजप गुंड प्रवृत्तीचं अप्रत्यक्षपणे समर्थन करत, आम्ही 'त्यांच्या'मागे भक्कमपणे उभं आहोत... असं बजावताहेत! मागे विधानसभेत 'त्यांची कुंडली माझ्याकडं आहे', असं म्हणत, हातात कागद घेऊन गुन्ह्यांचा पाढा वाचणारे एकापाठोपाठ एक पुरावे सादर करणारे फडणवीस आज मात्र त्याच कुटुंबामागे बिनधास्तपणे उभं राहताहेत! 'आमच्याकडं गुंड, भ्रष्टाचारी आले तरी आम्ही त्यांचं शुद्धीकरण करु, पण सत्तेवर येऊच! वाल्याचा वाल्मिकी करू...!' असं म्हणत नारायण राणेसारख्यांना जवळ घेतल्यानं त्यांचा हा खेळ त्यांच्याच अंगाशी आलाय, हे मात्र खरं!"
---–----------------------------------------------
*गे* ल्या काही वर्षांत राजकारणाचं शुद्धीकरण होण्याऐवजी ते दिवसेंदिवस अधिक गढूळ होत चाललंय. शिवाय राजकारणातला विखार वाढत चाललाय. हा विखार केवळ दिखाव्यासारखा आहे. सत्तेत आल्यानंतर विरोधकांना वेसण घालण्यासाठी घटनात्मक संस्थांचा वापर-गैरवापर केला जातोय. भ्रष्टाचाराची प्रकरणं शेवटापर्यंत नेलीच जात नाहीत, हे राजकारण केवळ कुरघोड्या करण्यासाठी, विरोधकांना नमवण्यासाठीचं आहे. भ्रष्टाचाराचे, गैरव्यवहारांचे आरोप ज्यांच्यावर झाले, तेच उद्या पक्ष बदलून आपल्या पक्षात आले की साधू-संत बनून जातात. जर खरा विखार असता तर ज्यांच्यावर तुफान आरोप केलेत असे अनेक नेते कारागृहात दिसले असते. सीबीआय, ईडी, एनसीबी, आयकर अशा तपासयंत्रणांकडून छापेमारी होते, पण पुढं काहीही घडत नाही. केवळ चौकशा सुरू ठेवून भ्रष्टाचारी नेत्यांवर दबाव, कायम ठेवून राजकीय लाभ उठवायचा असं घडतं. दुर्दैवानं, राजकारण्यांनी केलेल्या या ‘विषपेरणी’तून समाजात जो विखार वाढत चाललाय, तो मात्र अत्यंत चिंताजनक आणि घातक आहे! इकडं 'आमच्याकडं गुंड, भ्रष्टाचारी आले तरी आम्ही त्यांचे शुद्धीकरण करु, पण सत्तेवर येऊच...! वाल्याला आम्ही वाल्मिकी बनवू...!' असाच काहीसा माज दाखवत भाजपनं २०१९ च्या दरम्यान अन्य पक्षातल्या नेत्यांना घेण्याचा सपाटा लावला. 'तुपासाठी उष्ट खाणाऱ्यां'ची एक फौजच भाजपत सामील झाली. कोकणचा वाघ म्हणवणाऱ्या आणि सत्तेसाठी तडफडणाऱ्या नारायण राणे पिता-पुत्रांनी 'शिवसेनेला नडायचं' असेल तर तिथं आम्हीच पाहिजे असं आभासी चित्र भाजपच्या श्रेष्ठींपुढं उभं करून आपली पोळी भाजून घेतली. दरम्यानच्या काळात राज्यातल्या भाजपत सुरु असलेली अंतर्गत धुसफूस आपल्या पदावर संक्रात आणणारी ठरु नये यासाठी देवेंद्र फडणवीस अन चंद्रकांत पाटील यांना सध्या बरीच कसरत करावी लागत होती. नारायण राणे यांनी फडणवीस यांच्यामुळंच मी भाजपत आलोय आणि फडणवीस यांच्यामुळंच मला मंत्रीपद मिळालंय याची कबुली अनेकदा माध्यमांसमोर राणेंनी दिलीय. आता मात्र भाजपच्या नेत्यांवर राणे आणि त्यांच्या पुत्रांच्या चुका, विकृत चाळे, वक्तव्य सावरता सावरता नाकीनऊ येत असल्याचं दिसतंय.
मध्यंतरी नारायण राणे केंद्रीयमंत्री असतानाही त्यांना अटक करुन जी काही कोकण यात्रा घडवून आणली ती अवघ्या देशानं पाहिली. मुख्यमंत्र्यांविषयी अवमानकारक शब्दप्रयोग केल्याची ती शिक्षा होती. आता हीच चूक पुन्हा पुन्हा नारायण राणे यांचे पुत्र नितेश-निलेश हे करताना दिसताहेत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सातत्यानं खालच्या पातळीवर टीका करणं यासाठीच जणू आपली आमदारकी आहे या थाटात ते वावरत असतात. टीका ही एखाद्याचं चारित्र्यहनन करणारी असते याचा साधा विवेकही त्यांच्या ठायी दिसत नाही. मुंबईतल्या हिवाळी अधिवेशनातही नितेश यांनी आदित्य ठाकरे यांना उद्देशून ‘म्याव म्याव’ असा आवाज काढणं अत्यंत लाजिरवाणं, शरमेचं आणि बालिशपणाचं होतं. 'नितेश राणे जे काही बोलले ते चूकच आहे. आम्ही त्याचं समर्थन करणार नाही!' अशा शब्दात फडणवीस यांनी नितेश यांना फटकारलं असलं तरी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील दोघांनीही अत्यंत सावधगिरीची भूमिका घेतलीय. कणकवलीतले शिवसैनिक संतोष परब यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी पुण्याच्या सचिन सातपुतेला दिल्लीतून ताब्यात घेतलं आणि त्यांनी हे सर्व नितेश राणे यांच्या इशाऱ्यावर घडवलं असं कबुलीनामा दिल्याचं समजतं. पोलिसांनी तीनदा नितेश यांना चौकशीसाठी हजर राहण्याविषयी सांगितलं, मात्र ते फिरकले नाहीत आणि आता आपल्याला अटक होणार या भीतीनं ते अधिवेशनाकडंही फिरकले नाहीत. त्यांच्या अटकपूर्व जामिनासाठी चार-पांच दिवसांपासून राणे- फडणवीसांची न्यायालयात धावपळ सुरु होती. 'आमच्याकडं या आम्ही तुमचं शुद्धीकरण करु...!' असा आत्मघातकी माज दाखवणं भाजपच्या चांगलंच अंगाशी आलंय. नारायण राणे यांना अटक केली तेव्हा पोलीस ठाण्यात बैठक मारत प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणारे प्रसाद लाड, प्रमोद जठार आता कुठंच दिसत नाहीत. एकंदरच राणे पुत्रांमुळं भाजप चांगलीच अडचणीत आलीय आणि ती पुन्हा पुन्हा अडचणीत येणार आहे!
'रोज मरे त्याला कोण रडे...!' अशी एक म्हण आहे, यानुसार भाजपनं राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पडणार अशी भाकीत कितीही मार्गानं आणि कितीही क्लृप्त्या लढवून केली तरी सर्वसामान्यांना त्याचा फारसा फरक पडेनासा झालाय. 'घरचं झालं थोडं अन त्यात व्याह्यानं धाडलं घोडं...!' अशी काहीशी सामान्य नागरिकांची अवस्था आहे. राजकीय कुरघोड्यांकडं डोळे लावून बसायला आता इथल्या चाकरमान्यांना वेळ नाही. त्यातही महाविकास आघाडीनं सत्ता स्थापन झालेल्या दिवसांपासून भाजपनं गत दोन वर्षात केलेल्या विविध भविष्यवाणीचा समाचार घेत ठामपणानं एकत्रित राज्यकारभार सुरु ठेवलाय. घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच…! तद्वतच संसार तोही तीन वेगळ्या विचारांचा म्हणजे थोड्याफार कुरबुरी होणारच, पण तुटेपर्यंत ताणलं तर नुकसान आपलंच आहे आणि शेजारी लबाड कोल्हा दबा धरुन बसलाच आहे याची पुरती जाणीव तिन्ही पक्षांना असल्यानंच विरोधकांकडं सोयीनं दुर्लक्ष करीत, महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षे सक्षमतेनं पूर्ण केली आहेत. अर्थातच या दोन वर्षात राजकीय नुकसानही महाविकास आघाडीला पचवावं लागलंय. ही फक्त नेतृत्वाची नाही तर पहिल्यांदाच अशारीतीनं सत्तेवर आलेल्या आघाडीची सर्वंकष परीक्षा होती. भाजपच्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या नेत्यांना पहाटेचा शपथविधी अवघ्या काही तासांत संपुष्टात आल्याची सल अजूनही सलते आहे. तर १०६ चे सर्वाधिक बलाबल असतानाही भाजपला विरोधी बाकावर बसावं लागतंय, तेही पाचवर्षे, ही सहन होणारी बाब नाही. फडणवीसांना तर आपण आता मुख्यमंत्री नाही याचा विसर पडताना दिसतो. इतर नेत्यांचंही तसंच आहे. आपण सत्तेत नाही हेच अद्याप भाजपच्या पचनी पडलेलं नाही. त्यातच राजकीय हेतूनं उड्या मारणारे ज्यांना अनेक उपहासात्मक नावानं संबोधलं जातं असे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनीही दोन वर्षात किमान १०० वेळा सरकार पडणारच अशी भविष्यवाणी केलीय; अगदी आताही त्यांनी मार्च २०२२ मध्ये राज्यात भाजपचं सरकार येणार अशी आवई उठवून दिलीय. त्यांच्या या बडबडण्याकडं खुद्द भाजपनंही दुर्लक्ष केलंय! वास्तविक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अवमानकारक शब्दप्रयोग केल्याची अद्दल त्यांना सरकारनं चांगलीच घडवलीय. आपण केंद्रीयमंत्री आहोत, जणू आपल्याला आता वाट्टेल ते बोलण्याची परवानगीच मिळालीय अशा थाटात बोलणारे राणे त्यानंतर बरेच वरमल्याचं दिसतं. राणेंच्या अटकनाट्यानंतर अवघ्या कोकणात तर त्यांची नाचक्की झालीच, शिवाय गोळवलकर गुरुजींच्या साक्षीनं ते भाजपसाठी त्रासदायकच ठरणारंय, भविष्यात त्यांना काही अंतरावरच ठेवणंच योग्य ठरणार आहे, असा इशाराच जणू भाजपच्या वरिष्ठांना मिळालेला दिसतोय. कदाचित म्हणूनच तर अटकनाट्यानंतर झालेल्या भाजप राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या निवडीत राणेंना काहीसं डावललं गेलं होतं. त्यांच्या विधानालाही कोणत्याच भाजप नेत्यानं पाठिंबा दिलेला नव्हता. तसंच नुकतंच त्यांनी केलेल्या भविष्यवाणीकडंही चक्क फडणवीसांपासून सर्वांनीच पाठ फिरवल्याचंच, जाणीवपूर्वक दुर्लक्षच केल्याचं स्पष्ट झालंय!
महाराष्ट्रातल्या राजकीय परंपरा अत्यंत चांगल्या आहेत. पक्ष एकमेकांवर टीका करतात. पण त्यांची वैयक्तिक मैत्री असते. याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. आता मात्र वैयक्तिक द्वेष, तिरस्कार याचं राजकारण होतंय. तरुण पिढीला तर बोलण्याचं भान राहिलेलं नाही. कोणत्याही नेत्याबाबत एकेरीच भाषेत बोललं जातं, ते चुकीचं आहे. कदाचित असं खालच्या दर्जाचं बोललो तर लोकांचं मत आपल्याबद्धल चांगलं होईल असं त्यांना वाटत असावं. पण तसं नाही. मतदार निवडणुकीत जागा दाखवत असतात. भाजपनं अशा बेताल नेत्यांना आवरायला हवं. आज ते इतर पक्षांवर बोलत आहेत. उद्या ते त्यांच्याही अंगलट येऊ शकतं. आम्ही जे करतो त्याचं फार कौतुक होतंय, प्रसारमाध्यमं त्याला उचलून धरतात यातच राजकारणाचं मर्म आहे असं त्यांना वाटतं. मात्र अशा प्रसिद्धीसाठी पडद्यामागे काय व्यवहार होतात हे सर्व जनतेला माहित आहे. ही थिल्लर पब्लिसिटी आहे. तुम्ही काय बोलता यावर तुमचं व्यक्तिमत्त्व ठरत असतं. हा फक्त नव्या पिढीचा दोष नाही, तर खालपासून वरपर्यंतच्या लोकांचा हा दोष आहे. वरिष्ठही तसंच बोलत असल्यानं खालचे नेतेही त्याचं अनुकरण करतात. त्यामुळं त्यांच्याकडूनही वेगळी अपेक्षा करता येत नाही, हेच भाजप नेत्यांच्या वक्तव्यावरून दिसून येतं. ठाकरे सरकारला एक प्रबळ विरोधक म्हणून स्वतःची इमेज भाजपत करण्याची धडपड राणे पिता-पुत्रांच्या फारशी कामी आलेली दिसत नाही. एकीकडं अनंत संघर्षानंतरही महाविकास आघाडी मजबूत आहे, तर दुसरीकडं भाजपच्या राज्यातल्या नेत्यांवर दिल्लीतल्या वरिष्ठांची नाराजी उघड होवू लागलीय. कोणापेक्षा आपण मोठे आहोत हे सांगण्यासाठी आधी आपली प्रतिमा, कर्तबगारी वाढवावी लागते. दुसऱ्याची रेघ पुसून आपली रेघ मोठी आहे, हेसिद्ध होत नसतं, तर आपली रेघ ठसठशीत आणि मोठी काढावी लागते हा साधा नियम, ही दुनियादारी भाजपमधल्या आयारामांना उमगलेली दिसत नाही. त्यातच सतत शरद पवार, उद्धव ठाकरेंवर, त्यांच्या कुटुंबियावर टीका करुन आयारामांनी भाजपची डोकेदुखी वाढवून ठेवलीय. ठाकरे सरकारला स्थिरावण्यासाठी हे आयारामच कारणीभूत असल्याची कुजबुजही आता भाजपत सुरु आहे. त्यातूनच जुनं आणि नवं असा नवा अंतर्गत विसंवाद रंगू लागलाय.
राणे-शिवसेना वाद गेली १६ वर्षे राज्याच्या राजकारणात घोंगावत आहे. खरं तर हा वाद राणे-शिवसेना नव्हे; तर नारायण राणे-उद्धव ठाकरे असाच राहिलाय. उद्धव ठाकरेंवर टीका करून शिवसेना सोडून राणे कॉंग्रेसमध्ये सामील झाले, तेव्हा राणेंची तळकोकणात मजबूत संघटनात्मक ताकद होती. तेव्हा राणेंनी मालवणमधून लढलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या बड्या नेत्यांना त्या काळात प्रचारासाठी फिरणेही मुश्कील झालं होतं. राजकारणातल्या बोलभांड माणसांत नारायण राणेंचा समावेश होतो. मुख्यमंत्री, तीनवेळा विरोधीपक्षनेते, महसूलमंत्री आणि आता केंद्रीयमंत्री. राणे अशी पदं सांभाळताना त्यांची मुलंही वाचाळ, उद्धटपणे वागताहेत त्यांना हे आवरता आलेलं नाही. राणे शिवसेनेत असताना कोकणात त्यांचा दरारा होता. त्यांच्या विरोधात बोलायची कुणाचीच हिंमत नव्हती, कारण त्यांच्यासमोर सत्यविजय भिसे, श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, अंकुश राणे अशी काही प्रकरणं असायची. शिवसेनेतून त्यांना काढून टाकल्यानंतर हा दबदबा मात्र हळूहळू कमी झाला. मी गेली ४०-४५ वर्ष राणेंचं राजकारण पाहतोय. राणेंच्या विरोधात जिथं उमेदवारी अर्ज भरायला उमेदवार सापडायचा नाही, तिथंच राणेंना तब्बल २ वेळा पराभूत करण्याचा चमत्कार शिवसेनेनं केलाय. तर राणेंच्या मुलाला दोनदा लोकसभा निवडणुकीत पराभूत केलंय. विनायक राऊत, वैभव नाईक, उदय सामंत, दीपक केसरकर, सतीश सावंत, संदेश पारकर, अशा काही शिवसैनिकांनी राणेंना हैराण केलंय. उद्धव ठाकरे फार क्वचितच राणेंवर टीकाटिप्पणी करतात. राणें मात्र दररोज उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घेत असतात. राणेंचा बालेकिल्ल्यातल्या कणकवली-सिंधुदुर्गातल्या जिल्हा बँकेची सत्ता हाती आली असली तरी, तिथली राणेंची अवस्था केविलवाणी झालीय. याला राणेंचा स्वतःचा अहंकार आणि त्यांच्या मुलांची मग्रुरी जबाबदार ठरलीय. मध्यंतरी नारायण राणेंना अटक, तेही केंद्रीयमंत्री असतांना झाली. हे त्यांच्यावर पर्यायानं मोदींच्या मंत्र्यावर केलेला वार होता. जेवणाच्या ताटावरून उठवून राणेंना अटक केली. आताही त्यांना जबाबासाठी नोटीस बजावलीय. तिकडं अटकपूर्व जामीन फेटाळला गेल्यानं नितेशच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे. नितेश सध्या वॉन्टेड आहे. नितेशला उचलण्यासाठी पोलिसांनी मोठी फिल्डिंग लावलीय. नितेशचा पुण्यातला कार्यकर्ता सचिन सातपुतेच्या मुसक्या दिल्लीत आवळल्या आहेत. त्यानं नितेशच्या सांगण्यावरून परबवर हल्ला केलाय. असा जबाब पोलिसांना दिलाय. नितेशच्या पीएला सातपुतेनं ३३ वेळा फोन केल्याचं पोलिसांनी म्हटलंय. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांनी 'सावज टप्प्यात आलं की, त्याची शिकार केल्याशिवाय मी राहात नाही...!' असं म्हटलं होतं. त्याची प्रचिती सध्या येतेय. उध्दव ठाकरे संयम ठेवून लक्ष्य साधत असतात. राणेंवर लक्ष्य साधण्याची संधी त्यांना शोधावी लागत नाही तर ती राणेच त्यांना देतात!
हरीश केंची
९४२२३१०६०९
Subscribe to:
Post Comments (Atom)
अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!
शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...
-
"शी S...S... कर्नाटकातली ही घटना अत्यंत शरमेची, किळसवाणी आणि धक्कादायक आहे, जनता दलाच्या प्रज्ज्वल रेवण्णा या खासदारानं तब्...
-
"तुम्हाला ट्राफिक हवालदारनं पकडलंय का? तो पैसे डायरेक्ट घेत नाही, एक टपरी असते, तिथं तो पैसे द्यायला लावतो. भाजप हा ट्राफिक...
-
"आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करताना त्यांची वैविध्यपूर्ण वाटचाल डोळ...
No comments:
Post a Comment