Monday, 20 December 2021

काशीतलं 'नमो'रंजन...!

"सदैव निवडणुकांच्या मोडमध्ये भाजपेयींनी 'काशी विश्वेश्वर धाम लोकार्पण सोहळा'च्या निमित्तानं हिंदुत्वाचा जागर आणि उत्तरप्रदेशासह पाच राज्याच्या निवडणुकांच्या प्रचाराचा शुभारंभ केलाय. तिकडं राहुल गांधींना 'मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही...!' असं म्हणत भाजपेयींच्या हिंदुत्वाच्या पीचवर येऊन खेळायला भाग पाडलंय. ते देवदर्शनासाठी मंदिरात जाताहेत, आपण जानवेधारी ब्राह्मण आहोत असं सांगताहेत, हिंदू आणि हिंदुत्ववादाची चर्चा करताहेत ही बाब लक्षणीय आहे. हा त्या पक्षाच्या दूरगामी रणनितीचा एक भाग असू शकतो. पण भाजपेयींनी लोकांच्या मनात हिंदुत्वाचं, राष्ट्रीयत्वाचं वातावरण तयार केलंय. याचा काँग्रेस कसा सामना करणार हा खरा प्रश्न आहे. याचा काँग्रेस आणि एकंदरीतच भारतीय राजकारणावर होणारा परिणाम काय असेल? या प्रश्‍नांची उत्तरं मात्र काळाच्या उदरातच दडलेली आहेत!"
---------------------------------------------------

*प्र*धानमंत्री नरेंद्र मोदींनी काशीत जाऊन गंगेत कडेकोट बंदोबस्तात आणि शेकडो कॅमेऱ्यांच्या साक्षीनं स्नान केलं, गंगास्नानानं त्यांच्या मनाची जळमटं दूर होवोत. विरोधकांविषयीची जी किल्मिषे त्यांच्या मनांत आहेत त्या नष्ट होवोत आणि काशी विश्वनाथ मंदिराप्रमाणेच लोकशाहीच्या मंदिराचाही जीर्णोद्धार व्हायला हवाय! अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. मोदी हे प्रधानमंत्री असल्यामुळंच त्यांचं गंगास्नान प्रकाशझोतात राहिलंय. नाहीतर गंगेत रोज लाखो लोक डुबक्या मारीतच असतात. प्रधानमंत्री मोदी यांची काशी यात्रा चांगलीच गाजलीय. दूरचित्रवाणीच्या सर्व वाहिन्यांनी त्यांच्या गंगास्नानाचं, महापूजेचं, गंगाआरतीचं थेट प्रक्षेपण करून देशातल्या भक्तांना दर्शन घडवलं. काशी हा मोदींचा मतदारसंघ आहे म्हणून नव्हे, तर मोदी काशीला जाऊन जे धार्मिक, आध्यात्मिक प्रयोग करीत असतात त्याची चर्चा बराच काळ लोकांमध्ये होत असते. प्रधानमंत्री मोदी अधूनमधून केदारनाथलाही जात असतात. केदारनाथच्या गुंफेत ध्यानमग्न बसलेल्या प्रधानमंत्र्यांची छायाचित्रं मग जगभरात प्रसारित होतात. मोदींची देशविदेशातली तीर्थयात्रा हा एक प्रकारे त्यांचा राजकीय सोहळाच असतो. काशी यात्रेदरम्यान गंगेत डुबकी मारल्याचं छायाचित्र तसंच जगभरात पोहोचलंय. वाराणसीत उभारलेल्या ‘काशीविश्वनाथ धाम’ प्रकल्पाचं लोकार्पण प्रधानमंत्री मोदी यांनी केलं. गंगा नदी आणि प्राचीन बाबा विश्वनाथ मंदिराला जोडणारा हा भव्य कॉरिडॉर आहे. भक्तांना गंगेतून थेट बाबा विश्वनाथाचं दर्शन घडावं, हे मोदींचं स्वप्न होतं. यासाठी ७०० कोटी रुपये खर्च करून मोदींच्या स्वप्नांची पूर्तता झालीय, पण काही कोटी रुपये उद्घाटन सोहळा आणि त्याच्या प्रसिद्धीवर उडाले आहेत. मोदी यांनी वाराणसी म्हणजे काशीनगरीचा संपूर्ण कायापालट करण्याचं मनावर घेतलंय. कायापालट करण्यासाठी इथली अनेक जुनी मंदिरं, घरं तोडण्यात आलीत. अरुंद रस्त्यांचा विस्तार करून ते रुंद करण्यात आलीय. मंदिर परिसराला भव्य असा आकार दिला जातोय. मोदी यांनी काशीच्या पवित्र भूमीवरून उत्तरप्रदेशसह पांच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा ‘शंख’ फुंकलाय. त्यांची ही काशी यात्रा प्रचारासाठीच असल्याची टीका विरोधकांकडून आता होतेय. सध्या सगळ्यांच्याच धार्मिक यात्रा राजकीय प्रचारासाठीच होत असतात हे देवांनाही ज्ञात झालं असेल. मोदी यांनी त्यांच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ दिला. औरंगजेबानं आक्रमण करताना मंदिरं तोडली. लोकांचं जबरदस्तीनं धर्मांतर केलं, तेव्हा छत्रपती शिवाजीराजांची भवानी तलवार या मोगलाईविरुद्ध भिडली. जेव्हा जेव्हा औरंगजेब निर्माण झाला तेव्हा शिवाजी महाराज ठामपणे उभे राहिल्याची आठवण मोदींनी करून दिली. शिवरायांशिवाय हिंदूंच्या लढ्याचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खास उल्लेख केला हे इथं महत्त्वाचं आहे. देशातल्या मंदिरांचा विध्वंस मोगलांनी केला. काशी, मथुरा, अयोध्या या धार्मिक स्थळांवर आक्रमणे करून ती नष्ट केली. सौराष्ट्रातलं सोमनाथाचं मंदिरही तोडलं. स्वातंत्र्यानंतर लगेचच सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सरदार वल्लभभाई पटेल यांनी घडवून आणला. हिंदुस्थानातल्या धार्मिक आणि तीर्थस्थळांचा विकास कोणी करत असेल तर त्यांचं कौतुक व्हायला हवं. राजकारण बाजूला ठेवून या विषयाकडं पाहायला हवं. काशीत बाबा विश्वनाथ धामचा विकास झाला. त्याचं श्रेय काशीचे खासदार असलेल्या प्रधानमंत्री मोदी यांनाच द्यावं लागेल. मोदींच्यापूर्वी अनेक हिंदुत्वप्रेमी खासदार तिथं निवडून गेले होते. काशीचा विकास करणं त्यांच्याही मनात होतं, पण ते सर्वजण प्रधानमंत्री नसल्यानं काशी विश्वनाथ धाम उपेक्षित राहिलं. काशीतल्या गल्ल्या, बोळ, लहान रस्ते, व्यापारीवर्ग यांच्यामुळं विकास अडकून पडला होता. जगभरातले भक्त त्या गल्लीबोळांतून धडपडत मंदिरापर्यंत कसेबसे पोहोचत होते. रस्त्यांचं रुंदीकरणही करता येत नव्हतं. पण मोदी काशीचे खासदार झाल्यापासून या कामांना गती मिळाली. अनेक अतिक्रमणे हटविण्यात आली. दूर केली गेली. त्याला विरोध करणाऱ्यांना मोडून काढलं गेलं. त्यामुळंच काशीचं मंदिर भव्य स्वरूपात जगासमोर आलंय. या प्रकल्पाचं भव्य स्वरूप राजकारणाचा, राजकीय विरोधाचा चष्मा उतरवून पाहायला हवंय! त्याचं कौतुक करायलाच हवं. पूर्वी विश्वनाथ प्रतापसिंह हे प्रधानमंत्री असताना त्यांनी काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या मार्गाचं विस्तारीकरण आणि मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा मास्टर प्लॅन तयार केला होता. त्यात मार्गावरील अनेक मंदिरं आणि अनेकांची घरं पाडली जाणार होती. त्यामुळं त्यावेळी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल, बजरंग दल आणि संघाच्या स्वयंसेवकांनी त्याला विरोध केला होता. आज मात्र त्याच विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आणि संघाच्या स्वयंसेवकांनी इथं जल्लोष केलाय हे इथं नमूद करायला हवंय.

हे सारं खरं असलं तरी विरोधकांचं म्हणणंही लक्षांत घ्यायला हवंय. त्यांच्या मते, काशी विश्वनाथ धाम लोकार्पण सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'गुलामीच्या न्यूनगंडातून देश बाहेर!' असे उद्गार काढलेत. ही बातमी वाचल्यावर दिवसभरात प्रधानमंत्री मोदींनी या सोहळ्याला हजेरी लावून संविधानातल्या धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत तत्त्वाला सुरुंग लावलाय असं त्यांना वाटतं. संविधानाच्या २५ व्या अनुच्छेदानुसार धर्मस्वातंत्र्याचा हक्क आणि धर्माला मुक्तपणे प्रकट करण्याचा हक्क प्रदान करण्यात आलेला असला तरी २८ व्या अनुच्छेदानुसार सरकारी पैशातून कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणं किंवा सहभागी होणं याला मज्जाव करण्यात आलेला आहे, हे आपल्या प्रधानमंत्र्यांना माहीत नसेल काय? तसंच नागरिकांची मूलभूत कर्तव्ये या ५१ व्या अनुच्छेदात 'धार्मिक, भाषिक आणि प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडं जाऊन भारतातल्या सर्व जनतेत सामंजस्य, बंधुभाव वाढीला लावणं, त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी आणि सुधारणावादाचा विकास करणं!' असंही सांगितलेलं आहे. असं असतानाही दिवसभर अंधश्रद्धायुक्त कर्मकांड करून प्रधानमंत्री मोदींनी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या तत्त्वालाच तिलांजली दिली नाही काय? असा सवाल त्यांनी केलाय. 'काशी विश्वनाथ धाम'च्या लोकार्पण सोहळ्याला मोदींचा वैयक्तिक पाठिंबा असला तरी सरकारनं या प्रकल्पापासून दूर राहणं हेच धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीनं सुसंगत ठरलं असतं. कारण धर्मनिरपेक्षता हा आपल्या संविधानाचा मूलाधार आहे. म्हणूनच आपल्या हातून धर्मनिरपेक्षतेला बाधा येईल अशी कुठलीही कृती होणार नाही याची काळजी प्रधानमंत्र्यांनी घ्यायला हवी होती. पण तेच सांप्रदायिक प्रवृत्तीनं वागत असतील तर धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व पायदळी तुडवलं गेलं तर नवल ते काय! आपला देश धर्मनिरपेक्षता पाळणारा आहे हे लक्षात ठेवून सोमनाथ मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला पंडित नेहरू उपस्थित राहिले नव्हते याचं इथं स्मरण होतं. काशी विश्वेश्वर हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. पूर्वी वाराणसी काशी विश्वनाथ मंदिर होते. हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर क्रूर आक्रमक कुल्बउद्दीन ऐबक यानं पाडलं. या मंदिराच्या ठिकाणी मशीद उभारली. अनेक वर्षे दुर्लक्षित आणि मुस्लिमांद्वारे प्रतिबंधित राहिल्यानंतर अकबराच्या काळात तोरडमल या अभिमानी राजानं या मंदिराचं पुनर्निर्माण केलं. अनेक शतकं तशीच गेल्यानंतर तिथं अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथाचं मंदिर बांधलं. घाट बांधली, सुधारणा केल्या. राजा रणजितसिंग या हिंदू देशाभिमानी राजानं त्या मंदिराच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला होता. परंतु तो मुसलमानांनी लूटमार करून नेला. १६ व्या शतकात इथंच संत एकनाथानी आपला 'श्रीएकनाथी भागवत' हा वारकरी संप्रदायाचा महान ग्रंथ लिहीला. हा इथला इतिहास आहे.

विरोधकांनी या कॉरिडॉर लोकार्पण सोहळ्यात मोदी जे म्हणाले, 'औरंगजेबासारख्या जुलमी शासकानं काशी विश्वेश्वर देवळाचा सांस्कृतिक वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता!' त्यावर आपलं मत व्यक्त केलंय. ते स्पष्ट करतात की, काशी विश्वेश्वराच्या देवळाच्या बाबतीत औरंगजेबावर करण्यात आलेल्या आरोपाची वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. डॉ. पट्टाभिसीतारामय्या यांनी त्यांच्या 'द फेदर्स अॅण्ड द स्टोन' या सुप्रसिद्ध ग्रंथात पुराव्यानिशी ती त्यांनी सिद्ध केली आहे. थोडक्यात ती सत्यकथा अशी आहे की, बंगालकडं निघालेल्या औरंगजेबाबरोबर हिंदू राजे आणि त्यांच्या राण्या होत्या. काशीजवळ आल्यावर त्या राण्यांना गंगास्नान करावंसं वाटलं. त्यांच्या विनंतीला मान देऊन औरंगजेबानं बनारसला तळ ठोकला. राण्या पालखीतून गंगेवर गेल्या. त्या स्नान करून दर्शनासाठी मंदिरात जाऊन आणि पूजापाठ करून परत आल्या. पण कच्छची राणी मात्र परतली नाही. तिचा शोध घेतल्यावरही ती सापडली नाही. हे औरंगजेबाच्या कानावर येताच तो संतापला आणि राणीला शोधण्यासाठी त्यानं सरकारी अधिकारी पाठवले. बराच शोध घेतल्यानंतर देवळातल्या गणेशाच्या मूर्तीजवळ ते गेले. ती मूर्ती हलवल्यावर त्यांना तळघरात जाण्याचा जिना दिसला. तिथं जाऊन पाहिलं तर त्यांना ती राणी तिथं अश्रू ढाळत बसलेली दिसली. कारण विश्वनाथ मंदिरातल्या पुजाऱ्यानं तिचा विनयभंग केला होता. हे समजल्यावर औरंगजेब संतापला आणि विश्वनाथाचं मंदिर तिथून हलवून दुसरीकडं बांधण्याचा हुकूम जारी केला. संबंधित पुरोहिताला कठोर शिक्षा ठोठावण्यात आली. आता यात औरंगजेबाचं काय चुकलं होतं? तसंच औरंगजेबानं देवळाचा विध्वंस केला नव्हता हेही यावरून कळतं. असं या ग्रंथात नमूद केलंय. पण एकंदरीतच गेल्या सात वर्षात हिंदुत्ववादी भाजपेयीं सरकार देशात आल्यापासून मुस्लिमद्वेष मोठ्याप्रमाणात सहेतुकपणे वाढवण्यात आलेला आहे. त्याला बरेचदा भाजपेयीं नेते खतपाणी घालत असतात. त्यातून प्रधानमंत्रीही सुटलेले नाहीत. राममंदिर काय किंवा काशीविश्वेश्वर मंदिर काय, अशाप्रकारे हिंदूंची अस्मिता जागृत करून मुस्लिमांना कसं ठेचलं असा उन्माद मोठ्या प्रमाणात हिंदूंच्या मनात निर्माण केला जातोय. हे खचितच आपल्या प्रधानमंत्र्यांना शोभा देणारं नाही. बहुसंख्याकांचं लांगूलचालन करणाऱ्या भाजपेयीं सरकारची वृत्ती पाहता या देशाचे आणखीन तुकडे तर होणार नाही ना, अशी साधार भीती वाटायला लागते. हे विरोधकांचं म्हणणं तेवढंच महत्वाचं ठरतंय!

दरम्यान 'मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही..!' असं वक्तव्य राहुल गांधी यांनी एका महागाईविरोधी मोर्चात केलं. नेमकं त्याचवेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काशीविश्वेश्वर करिडॉरच्या उद्धाटनाच्या निमित्तानं आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेचा जागर केलाय. भारतीयांनी ह्या दोन्ही घटना पहिल्या. धर्मनिरपेक्षतेचा अतिरेकी वापर करून आपल्या पायावर धोंडा पाडून घेतलेल्या कॉंग्रेसीना आता हिंदुत्वाच्या पीचवर येऊन खेळायला भाजपेयींनी भाग पाडलंय. वास्तविक मवाळ आणि कट्टर हिंदुत्वामध्ये अत्यंत पातळ अशी सीमारेषा आहे. अजाणतेपणानं का होईना ही रेषा ओलांडली गेल्यास अल्पसंख्यांक समुह नाराज होण्याचा धोकादेखील आहेच. सर्वात महत्वाची बाब म्हणजे उघडपणे मुस्लीमहितवादी भुमिका असणारा ओवेसी बंधूंचा ‘एआयएमआयएम’ हा पक्ष देशाच्या अनेक प्रांतांतून पाळंमुळं घट्ट करण्याची चाचपणी करतोय. बिहारात, महाराष्ट्रात याचा परिणाम दिसून आलंय. अत्यंत कट्टर विचारसरणी असणारा हा पक्ष भविष्यात अल्पसंख्यांकबहुल भागात रूजण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे भाजपेयींना मतांच्या ध्रुवीकरणासाठी अपेक्षित असल्यानं ते त्यांच्या त्या प्रयत्नाला खतपाणी घालताना दिसतात. खरंतर काँग्रेसची व्होटबँक असलेला मुस्लिम समाज आज तिकडं वळताना दिसतोय, अशावेळी काँग्रेसकडं मवाळ हिंदुत्ववादी चेहरा असला तरी तो अल्पसंख्यांकांचं एमआयएमकडं होणारं मतांच धृवीकरण रोखू शकणारा ठरू शकतो का हा खरा सवाल आहे. एका अर्थानं काँग्रेसनं मवाळ वा बेगडी हिंदुत्ववादी रूपं घेतली तरी ते लाभदायक ठरेलच याची शाश्‍वती देता येणार नाही. राहूलजींचे पणजोबा जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या कार्यकाळात हिंदुत्वाला थारा दिला नाही. त्यांच्या आजीनं इंदिरा गांधींनी याचा वेळ पडल्यावर राजकीय लाभासाठी उपयोग करून घेतला. त्यांचे वडील राजीव गांधी यांना यातून काँग्रेसला लाभ होण्याऐवजी त्यांच्या काही निर्णयांनी इथं भाजपची पायाभरणीच झाली. त्यांची आई सोनिया गांधी यांनी अल्पसंख्यांकवादाचा लाभ घेतला. यामुळं आता राहूलजींकडं कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं आली असतांनाच ते देवदर्शनासाठी मंदिरात जाताहेत, आपण जानवेधारी ब्राह्मण आहोत असं सांगताहेत, हिंदू आणि हिंदुत्ववादाची चर्चा करताहेत ही बाब लक्षणीय आहे. पण मोदी काशी विश्वनाथ, केदारनाथ, इथल्या मंदिरात जातात. नेपाळ आणि मॉरिशससारख्या देशात गेल्यानंतर तिथल्या मंदिरांत पूजा करतात. परदेश दौर्‍यातही ते मंदिर आणि गुरूद्वारात जातात हे दिसून आलंय. यामुळं मोदी हे देशातल्या सर्वात मोठ्या धार्मिक समुहाला म्हणजेच हिंदूंना ‘आपले’ वाटतात. इकडं कॉंग्रेस मात्र अद्यापही अल्पसंख्यांकवादी प्रतिमेतून बाहेर पडलेला नसल्यानं राहूल यांनी हा पवित्रा घेतला असावा. हा या पक्षाच्या दूरगामी रणनितीचा एक भाग असू शकतो. पण भाजपेयींनी लोकांच्या मनात हिंदुत्वाचं, राष्ट्रीयत्वाचं वातावरण तयार केलंय. याचा काँग्रेस कसा सामना करणार हा खरा प्रश्न आहे. याचा काँग्रेस आणि एकंदरीतच भारतीय राजकारणावर होणारा परिणाम काय असेल? या प्रश्‍नांची उत्तरे मात्र काळाच्या उदरातच दडलेली आहेत.
हरीश केंची
९४२२३१०६०९


No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...