Friday, 27 August 2021

नारायण....नारायण...!!



"गेले काही दिवस प्रसिद्धीमाध्यमांनी 'नारायण...नारायण..! असा घोषा लावलाय. आपल्याच मतदारसंघात तीनवेळा पराभूत झालेल्या आणि आपल्या बेताल वचवचीनं प्रसिद्धी झोतात राहिलेल्या नारायण राणे यांना भाजपेयींनी केंद्रीय मंत्रिपदाची झुल पांघरली. अन काय चमत्कार झाला पहा, बेडूकउड्या मारणाऱ्याला जणू हत्तीचं बळ आलं! गेली काही वर्षे कोकणात सतत हत्ती उच्छाद मांडत आहेत. त्याप्रमाणे सत्तेनं मदमस्त झालेला हा हत्ती राज्याचे परंपरा, संस्कार, राजकीय सहिष्णुता, वैचारिकता हे वैभव उध्वस्त करतोय. राणेंना वाटू लागलंय की, राज्यात आता केवळ आपणच भाजपेयींचे एकमेव नेते आहोत. फडणवीस यांनी अनेक गणांगांच्या खांद्यावर भाजपची केशरीवस्त्रं चढवलीय. पारंपरिक, पापभिरू, निष्ठावंत भाजपेयीं कार्यकर्ते आणि मतदार हे अखंडपणे सतरंज्या काढण्याघालण्याचं काम करत असताना अशा या गणांगांच्या स्वच्छन्दी चालीनं त्यांना काय वाटलं असेल? त्यांना नारायण राणे नावाचा भस्मासुर देत असलेल्या वेदना या भयंकर आहेत! म्हणूनच फडणवीसांनी वर्षावर बंद खोलीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलीय याला आता अनेक अर्थ प्राप्त झालेत..!"
--------------------------------------------------------
*आ* पण जे चुकीचं बोललो, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करायची सोडून केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर ‘हत्तीचं बळ’ आल्यासारखं उद्धटपणे वागण्याचा प्रयत्न नारायण राणे यांनी केलाय. तो निंदनीयच आहे! राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्धल केलेल्या वादग्रस्त विधानामुळं त्यांच्याविरोधात तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत. राणे यांना अटक झालीय, आता त्याचा फायदा कोणाला होईल? राणे, शिवसेना, भाजपा की फडणवीस यांना यातल्या एकेका मुद्द्याचं विश्लेषण करू या. नारायण राणे यांचा प्रवास शिवसेना ते भाजपा व्हाया काँग्रेस असा झालेला आहे. मूळचे शिवसैनिक असलेल्या राणे यांच्यात ती आक्रमकता ठासून भरलेली आहे. काँग्रेसमध्ये संधी मिळत नसल्यानं त्यांनी २०१८ ला भाजपत प्रवेश केला. पुढं त्यांना भाजपेयींनी राज्यसभेवर निवडून आणलं. गेले तीन वर्ष भाजपामध्ये फारशी संधी न मिळालेले राणे शांत आणि संयमी वाटत होते. परंतु, केंद्रात मंत्रीपदी वर्णी लागल्यापासून नारायण राणे यांच्यातला उद्धटपणा, आक्रमकपणा पुन्हा उफाळून वर आलेला दिसतोय. संसदेचं अधिवेशन संपल्यावर राणे यांनी 'जनआशीर्वाद यात्रा' सुरू केलीय. याच यात्रेदरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना असंसदीय भाषेचा प्रयोग केला आणि त्यातून शिवसैनिक चिडले. केंद्रात मंत्री झाल्यानंतर राणे ज्या पद्धतीनं आक्रमक झाल्याचं दिसून येतं ते बघता राणेंनी भाजपत आपलं बस्तान बसवायला सुरुवात केलीय, असं म्हणता येईल. कोकणातल्या अतिवृष्टीनंतर पाहणी दौर्‍यात त्यांनी विरोधीपक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना ज्या 'ए तू गप रे...!' या भाषेत गप्प बसवलं होतं, तिथं अधिकारी न आल्यानं 'तुमचा सीएम बीएम गेला उडत...!' असं वक्तव्य केलं होतं. हे सारं पाहता आता राणे फडणवीस यांनाही जुमानणार नाहीत असं दिसतं. 'भाजपत मीच नेता आहे!' अशीच राणे यांची देहबोली दिसतेय. फडणवीस यांच्या यात्रेत ज्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक माध्यमांना सोबत घेऊन फडणवीस यांनी ते सतत चर्चेत राहतील याची काळजी घेतली होती, तशीच काळजी राणे देखील घेताना दिसताहेत. त्यामुळं राणे यांच्या यात्रेतही प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र मीडियातून उभं राहतेय. खरं तर केंद्रीय मंत्रिमंडळासाठी फडणवीस यांनीच राणे यांच्यासह अन्य तिघांची शिफारस केली होती. अर्थात राणे यांनीही जाहीरपणे फडणवीस यांचे जाहीर आभार मानले आहेत. परंतु, ज्या पद्धतीनं राणे भाजपला 'हायजॅक' करताहेत ते पाहता राणे ही भविष्यात भाजपेयीं आणि फडणवीस यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतील. परंतु राणे यांच्या आक्रमक स्वभावाला वेसण घालू शकेल एवढी राजकीय ताकद फडणवीस यांच्यासह राज्यातल्या कुठल्याही भाजपेयीं नेत्यात नाही. राणे यांना केवळ आणि केवळ प्रधानमंत्री मोदी आणि अमित शहा हेच कंट्रोल करू शकतील. त्यामुळं या घडामोडीनंतर मोदींकडून राणे यांना समज दिली गेल्यास आश्चर्य वाटणार नाही. मुख्यमंत्री यांच्याबद्धल अपशब्द वापरू नये, अशा शब्दात प्रधानमंत्री मोदी यांनी याआधीही भाजपेयींना समज दिलेली आहे. राजकीय विरोध असणं वेगळं आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं वेगळं. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे, याचा विसर पडत चाललाय की काय असं गेल्या काही दिवसातील घडामोडीवरून दिसतंय. प्रसाद लाड, गोपीचंद पडळकर हे याची दुर्दैवी उदाहरणं आहेत.

फडणवीस यांनी गेल्या काही वर्षात अनेक गणांगांच्या खांद्यावर भाजपची केशरीवस्त्रं चढवलीय. पारंपरिक, पापभिरू, निष्ठावंत भाजपेयीं कार्यकर्ते आणि मतदार हे अखंडपणे सतरंज्या काढण्याघालण्याचं काम करत असताना अशा या गणांगांच्या स्वच्छन्दी चालीनं त्यांना काय वाटलं असेल? त्यांना नारायण राणे नावाचा भस्मासुर देत असलेल्या वेदना या भयंकर आहेत. आयुष्यभर शेकडो गुन्हेगारी आरोपांनी सज्ज असलेल्या, ज्याची वाभडी खुद्द फडणवीसांनी विधीमंडळात काढली अशा नेत्याला एकतर आपलं म्हणायचं, त्यासाठी इतरांच्या मागे ईडी, सीबीआय आदी यंत्रणांना लावायचं. वर त्यांची केंद्रात थेट मंत्रिपदी पदोन्नती करायची आणि नंतर 'जनआशीर्वाद' यात्रेच्या निमित्तानं त्याचा पाहुणचार करायचा. हे त्या भाजपेयीं कार्यकर्त्यांसाठी डागण्या असल्यासारखं आहे. तसं या महाशयांना एकदा नव्हे तर तीनदा साधा आपला विधानसभा मतदारसंघ राखता आलेला नाही. चिरंजीवाचाही दोनदा लोकसभेत दारुण पराभव झालाय. काँग्रेसलाही नकोसा झालेल्या या नेत्याला डोक्यावर घ्यावं लागणं ही आजच्या भाजपेयींची शोकांतिका आहे. राणे हे महाराष्ट्राचे सोडा कोकणचेही नेते होऊ शकलेले नाहीत. राणे यांच्यातील उपयुक्ततेची जागा उपद्रवानं घेतलीय, पण त्यांची उपद्रवक्षमता अशीच राहिली तर ती शिवसेनेसाठी कमालीची उपयुक्त ठरणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. राणे यांची सध्या चाललेली बकबक पाहून शिवसेनेला हायसं वाटत असेल मात्र भाजपेयी हाय खातील. ज्या ज्या वेळेला शिवसेनेला अंगावर घेणारा नेता विरोधकातून उभा राहिला त्या त्या वेळी शिवसैनिक अधिक त्वेषानं उभा ठाकलाय. हा इतिहास आहे. त्याचं दर्शन नुकतंच घडलंय. राणेंचा अद्वातद्वा वक्तव्यानं राज्यभरातले शिवसैनिक कसे पेटून उठले हे भाजपेयींनी अनुभवलं आहेच. 'जनआशीर्वाद' यात्रा या भाजपेयींच्या पक्षीय कार्यक्रमाची सुरुवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर माथा टेकवून झाली. भाजपेयींच्या या कृतीचा एकच अर्थ निघतो की, ज्या नेत्याच्या स्मृतीस्थळावर डोकं टेकवून जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात करता येईल असा एकही नेता दुर्दैवानं भाजपमध्ये किंवा संघाच्या विचारधारेत आजतागायत निर्माण झालेला नाही. महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या कुबड्या घेऊनच भारतीय जनता पक्ष मोठा झाला आणि आजही जगातला नंबर वनचा पक्ष म्हणुन बढाया मारणाऱ्या भाजपला जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात करण्यासाठी शिवसेनाप्रमुखांच्याच समाधीवर माथा टेकवावा लागतोय. शिवसेनाप्रमुखांच्या कुबड्या घेतल्याशिवाय आजही महाराष्ट्रातला भाजप राजकारण करू शकत नाही. मला वाटतं हा भारतीय जनता पक्षाचा आणि मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचा सर्वांत मोठा पराभव आहे. डॉ. केशव हेडगेवार, श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दिनदयाळ उपाध्याय, नानाजी देशमुख किंवा माधवराव गोळवलकर गुरुजी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नेतेमंडळी संघाच्या स्वयंसेवकांना किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रातःस्मरणीय असली तरी त्यांना सर्वसामान्य जनतेतून कधीही जनाधार मिळालेला नाही किंवा ते लोकप्रिय ठरून देशाच्या तळागाळात सर्वदूर पोहचू शकलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेत अटलबिहारी वाजपेयी हा एकमेव असा नेता निर्माण झाला, जो जनतेमध्ये लोकप्रिय ठरला आणि तळागाळापर्यंत पोहोचला. मात्र वाजपेयींची सर्वसमावेशक उदारमतवादी प्रतिमा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या किंवा अगदी भाजपेयींच्या देखील गळ्यातला काटा बनते. त्यामुळं वाजपेयींच्या स्मृतीस्थळावर माथा टेकवून जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात करावी, असं भाजपच्याच कार्यकर्त्यांना वाटत नाही ही सर्वात मोठी शोकांतिका म्हणावी लागेल! जेव्हा प्रश्न कट्टर हिंदुत्वाचा येतो तेव्हा नजरेसमोर एकच नाव येते ...हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...! त्यांच्या स्मृतीस्थळावर माथा टेकवल्याशिवाय हिंदुत्वाची चौकट पूर्णच होऊ शकत नाही, याची जाणीव असल्यामुळंच भाजपला जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर माथा टेकवून करावी लागली.

भाजप आणि अन्य पक्षातील काही नेत्यांना अजूनही असं वाटतं की फडणवीस हे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री नसावेत. जेव्हा कधी भाजपेयींचं सरकार सत्तेवर येईल, त्यावेळी भाजपचे मुख्यमंत्री फडणवीस नसावेत, असं मानणारा एक मोठा गट भाजपमध्ये सक्रिय आहे. तसाच तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतदेखील आहे. त्यामुळं राणेंचं महत्व वाढणार असेल तर ते या पक्षांना किंवा या लोकांसाठी फायद्याचंच आहे. अर्थात राणेंची ताकद वाढणं हे शिवसेनेसाठी खास करून कोकणात पायावर दगड मारून घेण्यासारखं असेल. राणेंकडं आता मंत्रिपद आहे, पाठीशी केंद्राची ताकद आहे. त्या बळावर राणे कोकणातून शिवसेनेला भुईसपाट करण्याची भीती सेनेला वाटते. परंतु, राणे यांच्या निमित्तानं फडणवीस यांचं महत्त्व कमी होणार असेल तर ते सर्वच पक्षांना हवंय. अर्थात फडणवीस यांना महाराष्ट्रातून हद्दपार करणं हे कोणालाही शक्य नाही. ज्यांना फडणवीस माहिती आहेत किंवा तसा दावा करतात त्यांना माहित आहे की राजकीय नेता म्हणून फडणवीस हे किती कठोर आहेत. राजकीय विरोधकांना कसे संपवायचं हे फडणवीस गेल्या पाच सहा वर्षांमध्ये चांगलेच शिकले आहेत. त्याचे प्रत्यक्ष रिझल्ट २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत देखील बघायला मिळालं होतं. त्यामुळं येणाऱ्या भविष्यात भाजपमधील राजकीय चित्र काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल!

शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी हातमिळवणी केल्यानंतर भाजप विरुद्ध शिवसेना अशी थेट राजकीय दरीच महाराष्ट्रात निर्माण झालीय. मांडीला मांडी लावून बसणारे हे दोन पक्ष आता एकामेकांचे तोंडही पाहण्याच्या मनस्थितीत नाहीत. शिवसेनेला नेतृत्व करण्याची संधी न देण्याच्या भाजपेयींच्या अट्टहासामुळं ह्या दोन पक्षांमधील वितुष्ट वाढत गेलं. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून दाखवण्याचं लक्ष्य निश्चित करून शिवसेनेची संयमीत वाटचाल सुरू आहे. आपली सत्ता आल्यानंतर शिवसैनिकांमध्ये उत्साह आला; पण दोन वर्षांत त्यांनी कधी माज दाखवला नाही. भाजपसोबतही संबंध बिघडवले नाहीत. जेवढं दूर राहायला हवं तेवढं भाजपेयींपासून अंतर राखून शिवसेनेनं राज्यशकट हाकलंय. आता महापालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. सुमारे १८ महापालिकांच्या निवडणुका २०२२ साली होणार आहेत. शिवसेनेनं आपली साथ सोडलीय म्हणून नाराज असलेल्या भाजपेयींनी महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू केलीय. तसे सर्वच पक्ष त्या कामाला लागले आहेत. निवडणुका जवळ येता येता आपल्यावर ‘बुमरँग’ होईल असं वर्तन एखाद्या पक्षाच्या नेत्यानं केलं तर त्या पक्षाला त्याची जबर किंमत मोजावी लागते, याचा अनुभव असलेले महाराष्ट्रातील राजकीय नेते महापालिकांच्या निवडणुका समोर पाहून जनाधार मिळवण्याचा संयत प्रयत्न करत आहेत. त्यात कुठंही उन्माद दिसून येत नाही. महाराष्ट्रात भाजपला सत्ता स्थापन करणं अवघड वाटत असताना शिवसेनेशी पुन्हा नातं जुळवायचं की दोन हात करायचं ते अजूनही भाजपेयींनी ठरवलेलं नसताना नारायण राणे यांच्यासारखे नेते भाजपेयींच्या अडचणीत वाढ करत आहेत. राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी जे विधान केलेय, ते अत्यंत आक्षेपार्ह आहे. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा भाजपलाच महागात पडण्याची शक्यता आहे. कोकणला बॅ. नाथ पै यांच्यासारख्या विचारवंतांचा समृद्ध वारसा लाभला आहे. मधू दंडवते सलग पाच वेळा कोकणातून संसदेत गेले, सुरेश प्रभूंसारख्या नेत्याला दिल्लीत बोलावून मंत्रिपद दिलं जातं. अशा भूमीतल्या वैचारिक प्रवाहाला राणे यांनी विरूद्ध दिशेनं वळविण्याचा प्रयत्न केलाय, असंच म्हणावं लागेल. आपण काय बोलतो त्याचं भान न ठेवता केंद्रीय मंत्री म्हणून वक्तृत्वात जो शिष्टाचार हवा, तो राणे यांच्या बोलण्यातून कुठंच दिसला नाही, दिसतही नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात त्यांनी केलेल्या विधानांमुळं राणे यांना अटक केली गेलीय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एका मंत्र्यानं पातळी सोडून एका मुख्यमंत्र्याच्या विरोधात असं वक्तव्य करावं, हे अशोभनीयच आहे. फडणवीस यांनी राणे चुकीचं बोलल्याचं मान्य केलंय. आपण जे चुकीचं बोललो, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करायची सोडून केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर ‘हत्तीचे बळ’ आल्यासारखे वागण्याचा प्रयत्न राणे यांनी केलाय. तो निंदनीयच आहे! मंत्रिपद मिळाल्यानंतर भाजपचे महाराष्ट्रातील नेते त्यांना कवडी मोलाचे वाटू लागले आहेत. राणे यांची त्यांच्याशीही बोलण्याची भाषा बदलली. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री म्हणून राणे यांनी ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरण्यापूर्वी किमान आपल्या पदाचा विचार करायला हवा होता. राडा करणारे राणे आता नको आहेत. वयाच्या ६७व्या वर्षी केंद्रात जे मंत्रिपद मिळालंय त्या पदाचा मान ठेवून, कोकणातल्या समृद्धतेचं भान ठेवून आता वागणे अपेक्षित आहे. सिंधुदुर्गातील कवी अजय कांडर यांच्या ‘हत्ती इलो’ ह्या कोकणातील सामाजिक आणि राजकीय स्थिती मांडणाऱ्या कवितेची या निमित्तानं प्रकर्षानं आठवण येते. कोकणात गेल्या काही वर्षांत जसा हत्तींनी उच्छाद मांडला, तसाच काहीसा प्रकार कोकणच्या राजकीय पटलावर होतोय का, असं भासण्याजोगी ही स्थिती आहे. कोकणातील समृद्धता, सामाजिक प्रश्न, परंपरा, वैभव हे सारं चुकीच्या व्यक्तीच्या हाती जातंय का? कोकणातील वैचारिक स्तरावरही राजकीय हत्तींचा हा उच्छाद अनुभवण्याची वेळ कोकणवासीयांवर आली आहे की काय, असा प्रश्नही पडू लागतो. 
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...