Friday, 21 February 2020

पुनःश्च नेहरु विरुद्ध पटेल!


 "राजकारणात लाळघोट्या लोकांची काही कमी नाही. वरिष्ठांना खुश करण्यासाठी काय बोलायला हवं आणि काय करायला हवंय हे अशा लुब्र्यांना चांगलं जमतं. हा प्रकार केवळ आजच होतोय असं नाही. राजकारणाचा स्तर जसजसा खालावत गेला तसतसं असले प्रकार वाढायला लागलेत. याला कुणीच अपवाद नाहीत, अगदी सुशिक्षित, उच्चपदस्थ मंडळी जेव्हा असं वागतात तेव्हा साऱ्यांचं लक्ष वेधलं जातं. आणीबाणीच्या काळाला कुण्या संतानं 'अनुशासन पर्व' म्हटलं होतं तर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तर त्यावेळच्या वीस कलमी कार्यक्रमाला थेट 'भगवदगीता' म्हटलं होतं. तेव्हा त्यावर टीकेचे आसूड ओढले गेले होते. सध्याच्या काळात तर या अशा वक्तव्यांचा सुकाळच झालाय. निवडणूक प्रचाराचा काळ तर स्वामीनिष्ठा दाखविण्याची अशा लुब्र्यांना सुवर्णसंधीच असते. यात बुद्धिजीवी, हुशार, मंत्रीही मागे नसतात. आज अशाच एका जुन्या मिथकावर शिळ्या कढीला ऊत आणला जातोय. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी हायकमांडला खुश करण्यासाठी त्यांचा प्रिय विषय 'नेहरूद्वेष' ओकलाय! एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं त्यांनी असं म्हटलंय की, "पंडित नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर मंत्रिमंडळ बनवताना सरदार पटेलांना वगळलं होतं, त्यांना पटेल हे मंत्रिमंडळात नको होते!"
-----------------------------------------------------

*पं* डित नेहरू विरुद्ध सरदार पटेल....! या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलंय. गेल्या काही वर्षांपासून जाणूनबुजून असं चित्र रंगविण्यात आलंय की, जणू काही नेहरू आणि पटेल हे एकमेकांचे जानी दुष्मन होते. नेहरूंच्या जागी पटेल ही कल्पना अनेकांना मनोहारी वाटते. पटेल जे देशाचे पहिले प्रधानमंत्री बनले असते तर....! अशा शब्दांनी अनेकांनी आपलं राजकारण रंगवलंय. गेल्या काही वर्षांपासून देशातला एक वर्ग असं मानत आलाय की, नेहरू, पटेल या दोन तलवारी एका म्यानात राहू शकल्या नाहीत. या दोघांमधील वादाचं चित्र सतत रंगवलं जातं. जाणीवपूर्वक इतिहासातील पानं उलगडून उलटसुलट अर्थ लावत वाद घातले जाताहेत. आताही असंच घडतंय, विद्वानांच्या मतभेदापासून ट्विटर वॉर पर्यंत हे जाऊन पोहोचलंय. याला कारण ठरलंय एक पुस्तक...! व्ही.पी.मेनन : द अनसंग आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया. या पुस्तकात असाच दारूगोळा भरलाय ज्यानं वाद पेटलाय. नेहरु-पटेलांना एकमेकांसमोर आणून उभं केलंय. मेनन यांची खापर नात नारायणी बसू हिनं हे पुस्तक लिहिलंय. व्ही.पी. मेनन हे ब्रिटिशांच्या काळातील सनदी अधिकारी होते. त्यांनी अनेक व्हाईसरॉयांच्या हाताखाली काम केलेलं आहे. फाळणीच्या तसेच स्वातंत्र्योत्तर काळात विशेषतः देशातली साडे पाचशेहून अधिक संस्थानं भारतात विलीन करण्यात महत्वाची भूमिका बजावलेली आहे. सरदार पटेलांसोबत त्यांनी बराच काळ काम केलं आहे. त्यांच्यातील परस्पर संबंध आणि राजकीय घडामोडीं आणि त्यांच्या सोबतीत घडलेले किस्से या पुस्तकात मांडण्यात आलेत. यावर आता वाद निर्माण झालाय.

*नेहरूंचा सरदारांसाठी आग्रह होता*
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री सरदार पटेल यांच्यातील नात्यावरून, परस्पर संबंधावरून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि इतिहासकार रामचंद्र गुहा हे सोशल मीडियावर एकमेंकाशी वाद घालताना दिसले. एका पुस्तकाचा संदर्भ देत जयशंकर यांनी जो काही दावा केला होता. त्याला गुहा यांनी उत्तर दिलंय. यासाठी एस जयशंकर यांनी व्ही.पी.मेनन यांच्या बायोग्राफीवरील एका पुस्तकाचा हवाला दिलाय. व्ही.पी.मेनन हे फाळणीच्या वेळी पटेल आणि नेहरू यांच्यासोबत काम करणारे अधिकारी होते. याच पुस्तकाचा उल्लेख करत त्यांनी ट्विट केलंय त्यात म्हटलंय की, 'पुस्तकावरून समजलं की नेहरुंना १९४७ च्या कॅबिनेटमध्ये सरदार पटेल नको होते. या गोष्टीवर वादविवाद व्हायला हवा. खास गोष्ट म्हणजे लेखक या आपल्या दाव्यावर ठाम आहेत.' याला उत्तर देताना इतिहासकार गुहा यांनी ट्विट केलंय की, 'हे एक मिथ आहे, ज्याचा खुलासा आधीच झालाय. या प्रकारे आधुनिक भारताच्या निर्मात्यांबाबत फेक न्यूज पसरवणं एका परराष्ट्र मंत्र्याला खरं तर शोभत नाही. हे काम भाजप आयटी सेलवर सोपवावं.' गुहा यांच्या ट्विटला उत्तर देताना पुन्हा एकदा जयशंकर यांनी गुहा यांच्यावर निशाणा साधलाय. त्यांनी लिहिलंय की, 'परराष्ट्रमंत्री देखील काही पुस्तकं वाचतात. चांगलं होईल की, काही प्राध्यापकांनी देखील असं काम केलं तर चांगलं होईल.' दरम्यान, इतिहासात पाहिल्यावर असं दिसतं की, १९४७ मध्ये सरकारच्या निर्मिती वेळी स्वतः जवाहरलाल नेहरू यांनी सरदार पटेल यांना पत्र लिहिलं होतं आणि त्यात त्यांच्याशिवाय कॅबिनेट अपुरं असेल असं म्हटलं होतं. नेहरू यांनी स्वतः सरदार पटेल यांना कॅबिनेट मंत्री होण्यासाठी विचारलं होतं. त्यासाठी त्यांना आमंत्रितही केलं होतं.

*जयशंकर-रामचंद्र गुहा यांचं ट्विटर वॉर*
राष्ट्रनिर्मितीत महत्वाची भूमिका बजावलेल्यांबद्धल अशाप्रकारे वक्तव्य करणं देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांना, ज्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून-जेएनयूतून आंतरराष्ट्रीय संबंधावर पीएचडी केलेल्या जबाबदार माजी सनदी अधिकाऱ्याला न शोभणारं आहे. अशा व्यक्तीकडून असं वक्तव्य आल्यानं त्याला पुन्हा महत्व प्राप्त झालंय. जयशंकर यांनी लिहिलंय की, 'नुकतंच एका पुस्तकाचं प्रकाशन मी केलंय, त्याचे लेखक हे एक अभ्यासू आणि विश्वासार्ह लेखक आहेत. पुस्तकात त्यांनी म्हटलंय की, नेहरूंनी कॅबिनेटमध्ये स्थान मिळवणाऱ्या मंत्र्यांची जी यादी तयार केली होती त्यात सरदार पटेलांचं नावच नव्हतं!' जयशंकर ज्या पुस्तकाबाबत म्हणताहेत ते पुस्तक म्हणजे नारायणी बसू लिखित व्ही.पी.मेनन यांची बायोग्राफी आहे. त्यात अशाप्रकारचा उल्लेख आहे. जयशंकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये जणू काही आपणच प्रथमच जगासमोर ही बाब प्रकाशात आणतोय असा अविर्भाव दाखवलाय. लेखकानं पटेल यांच्यासारख्या ऐतिहासिक भारदस्त व्यक्तिमत्वाला इतक्या वर्षांनंतर न्याय दिलाय! अशीही मल्लिनाथीही त्यांनी केलीय. रामचंद्र गुहा यांच्याशिवाय शशी थरूर, जयराम रमेश या काँग्रेसी बुद्धिजीवी नेत्यांनी जयशंकर यांच्यावर सडकून टीका केलीय. त्यांनी आरोप केलाय की, जयशंकर यांच्यासारखे भाजपेयीं नेतेच नाही तर लष्करप्रमुख देखील भाजपच्या मोदी-शहा या हायकमांडची खूषमस्करी करण्यासाठी बेजबाबदार, बाष्कळ आणि बिनबुडाच्या कॉमेंट्स करताहेत. त्यांना असं वाटतं की, नेहरूंपासून राष्ट्रवादापर्यंत, हिंदुधर्मापासून सीएए पर्यंतच्या मुद्द्यांवर वक्तव्य केलं तर त्याची हेडलाईन बनेल. अशा उथळ कॉमेंट्स केल्या तर आपण हायकमांडच्या 'गुडबुक' मध्ये राहू! आपलं असलेलं स्थान टिकून राहावं, जमलंच तर त्यात बढती मिळावी अशीही त्यांची अपेक्षा असते. कित्येक नेते ज्यांना आजवर उमेदवारी मिळालेली नाही, सत्तेची पदं मिळालेली नाहीत अशी मंडळी आगामी निवडणुकीत आपल्याला उमेदवारी तरी मिळावी म्हणूनही बेफाम वक्तव्य करीत असतात. त्यांच्या या बेजबाबदार वक्तव्यामुळं देशाची एकता, अखंडता, सौहार्द, एकात्मता आणि शांतता यांच्यावर थेट प्रहार केला जातोय, याचा त्यांना सोयीस्कररित्या विसर पडलेला असतो.

*सरदार हे एक मजबूत स्तंभ: नेहरू*
भाजपेयींना दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत नामुष्की ओढवलीय. त्यांचा सुपडासाफ झालाय. अपमानजनक निकाल लागल्यानंतर अमित शहांनी देखील आपल्या अश्लाघ्य वक्तव्यांनी पक्षाला हा झटका बसलाय अशी कबुली दिलीय. कदाचित आम्ही नको ती वक्तव्य केल्यानेच आम्ही पराभूत झालोय. हरलो आहोत, असंही त्यांनी म्हटलंय. असामाजिक तत्व आणि गुंडांच्या तोंडी असलेली भाषा वापरल्यानं आधीच भाजपेयींना निवडणूक आयोगानं फटकारलंय शिवाय आता त्या प्रकरणी शिक्षा होण्याची शक्यता असल्यानं त्यापूर्वीच भाजपच्या हायकमांडनं देशातल्या नागरिकांची माफी मागीतलीय. पण अशी वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर पक्षानं कोणती कारवाई केलीय. हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. त्यांना मोकाट सोडलंय. जयशंकर यांच्या ट्विटचा प्रतिवाद करताना रामचंद्र गुहा यांनी म्हटलं आहे की, देश घडवणाऱ्या दोन महान नेत्यांबाबत अशाप्रकारे वक्तव्य केल्यानं त्यांना भाजपच्या आयटी सेलचा राजीनामा द्यायला हवाय. त्यांची ही फेक कॉमेंट्स पक्षाच्या आयटी सेल अंतर्गत येते आणि शिवाय ती रेकार्डवरही येतेय. गुहांनी एका स्वतंत्र ट्विटमध्ये त्या पत्राची प्रत टाकलीय ज्यात नेहरूंनी सरदार पटेलांना कॅबिनेटमध्ये सहभागी अशी विनंती करताना लिहिलंय की, 'सरदार पटेल हे माझ्या मंत्रिमंडळातील एक मजबूत आधारस्तंभ आहेत तेव्हा त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात सहभागी व्हावं!' जयशंकर यांनी त्यांच्या वक्तव्यावर काही पुरावे देण्याऐवजी शाब्दिक खेळ करत आणखी एक ट्विट केलं. त्यात गुहा यांना टोमणा मारलाय. 'परराष्ट्रमंत्र्याना पुस्तकं वाचण्याचीही संवय आहे. त्यांना मी जे प्रकाशित केलंय ते पुस्तक वाचण्याचा सल्ला देतोय...!' आता ट्विट करण्याची वेळ गुहांची होती. त्यांनी त्यांना प्रत्युत्तरादाखल ट्विट केलंय. ' साहेब, तुम्ही ज्या जेएनयू मधून पीएचडी केलीय, तिथं तुम्ही माझ्यापेक्षा अधिक पुस्तकं वाचली असतील. त्यात नेहरू आणि पटेल यांच्यातील पत्रव्यवहाराचं देखील पुस्तक आहे. ज्यात नेहरूंनी सरदार पटेलांना 'मजबूत स्तंभ' म्हणून संबोधून मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी आमंत्रण देताहेत. त्या पत्राची नक्कल या ट्विट सोबत पोस्ट केलीय.'

*माउंटबॅटनांची साक्ष काढण्यात आली*
या वादासंदर्भात इतिहासात धांडोळा घेतल्यावर एक पुस्तक हाती लागलं, त्याचाच संदर्भ सतत दिला जातो. ते १९५९ मध्ये प्रसिद्ध झालेलं लेखक एच. व्ही हडसन यांचं ' द ग्रेट डिव्हाईड : ब्रिटन, इंडिया, पाकिस्तान' आहे; ज्यात लेखकानं मेनन यांची मुलाखत प्रसिद्ध करून असा दावा केलाय की, नेहरू सरदार पटेलांना कॅबिनेटमध्ये घेऊ इच्छित नव्हते. नेहरूंनी स्वतंत्र भारतासंदर्भात ब्रीफ करताना जे पत्र तत्कालीन लॉर्ड माउंटबॅटन यांना ऑगस्ट १९४७ मध्ये लिहिलं होतं, ते पत्र संदर्भ म्हणून नमूद केलंय. त्या पत्रात संभावित मंत्र्यांची जी नावं लिहिली होती त्यात सरदार पटेलांचं नाव नव्हतं. लेखक हडसन यांनी या पत्राबाबत थेट लॉर्ड माउंटबॅटन यांच्याशी संपर्क साधला होता. 'नेहरू पटेलांना आपल्या मंत्रिमंडळात सहभागी करू इच्छित नव्हते हे खरं आहे का? याबाबत तत्कालीन स्थिती काय होती यावर थोडासा प्रकाश टाकावा..!' अशी विनंती केली होती. त्याला उत्तर देताना माउंटबॅटन यांनी उत्तरादाखल लिहिलं की, ' आम्ही म्हणजे मी आणि नेहरू चहा पीत असताना गप्पांच्या ओघात मी त्यांना बजावलं होतं की, पटेलांच्या बाबतीत जे तुम्हाला वाटतं तो एक पेटता विषय आहे. माझी विनंती आहे की, ही बाब कुठंही लेखीच नव्हे तर गॉसिपमध्येही येता कामा नये.' पेटत्या विषयासाठी त्यांनी 'हॉट पोटॅटो' असा शब्दवापरलाय. जयशंकर यांनी जे पुस्तक प्रकाशित केलंय ते व्ही.पी.मेनन : द अनसंग आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया' यात त्यांनी लिहिलंय की, सरदार पटेलांचा उजवा हात समजले जाणारे व्ही.पी.मेनन यांना जेव्हा समजलं की, नेहरूंच्या मंत्रिमंडळाच्या यादीत सरदार पटेलांचं नांव नाही, तेव्हा ते माउंटबॅटनांना जाऊन भेटले आणि सांगितलं की, "जर असं घडलं तर देशात खूप मोठं वादळ निर्माण होईल, काँग्रेसचे दोन तुकडे होतील!" नंतर ते दोघे गांधीजींकडे गेले आणि नेहरूंच्या मंत्र्यांच्या यादीत सरदार पटेलांचं नाव समाविष्ट करण्यासाठी गांधीजींकडे रतबदली केली. त्यानंतर त्यांचा समावेश झाला. स्वातंत्र्यापूर्वी, स्वातंत्र्याची प्रक्रिया सुरू असताना, त्यानंतरच्या फाळणीच्या काळातील सारे दस्तऐवजांमध्ये नेहरूंनी सरदार पटेलांचं या सर्व काळातील महत्व, एक मजबूत स्तंभ म्हणत आदर व्यक्त केलाय. मंत्र्यांच्या यादीत सर्वात पहिलं नांव सरदार पटेलांचं होतं. एक नाही तर अनेक पत्रात ते आपल्याला आढळून येईल. जयशंकर यांच्यासारखी माणसं जी नेहरूविरोधी आहेत ते देखील असंच कुणाचं तरी वक्तव्य हा त्याबाबतचा पुरावा म्हणून पुढं करतात. पण तत्कालीन कागदपत्रं, नेहरूंचा मानस, त्यांची इच्छा त्याचबरोबर माउंटबॅटन, हडसन, व्ही.पी.मेनन यांची मतं सगळ्या बाबी स्पष्ट करतात की असं काहीही नव्हतं!

*नेहरू द्वेषानं पछाडलेल्या मंडळीची काव काव*
नेहरू, गांधी, पटेल यांच्याविषयी अशाप्रकारची चर्चा सुरू झाली की, नेहरू द्वेषानं पछाडलेली मंडळी काव काव करत 'जर सरदार पटेल प्रधानमंत्री बनले असते तर देशाची ही अवस्था झाली नसती!' असं म्हणायला सुरुवात करतात. सध्याचे प्रधानमंत्रीही असंच वक्तव्य संसदेत करतात. दुसरी नेहमी चर्चिली जाणारी गोष्ट अशी की, १९४५ मध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत १५ पैकी १२ जणांचं मत होतं की, सरदार पटेल प्रधानमंत्री व्हावेत. याला ३ सदस्य गैरहजर राहिले होते. या बैठकीत गांधीजींनी पटेलांना आपलं मत नेहरूंना देऊन त्यांच्या पाठीशी उभं राहायला सांगितलं. गांधीजींप्रती अपार श्रद्धा असल्यानं चेहऱ्यावर कोणताही भाव प्रदर्शित न करता एखाद्या स्थितप्रज्ञासारखं गांधीजींचं म्हणणं स्वीकारलं. त्यांनीच मग नेहरूंना प्रधानमंत्री म्हणून नांव सुचवलं. ही बाब वारंवार समोर आणून गांधीजी आणि नेहरूंना लक्ष्य केलं जातं. देशाच्या फाळणीला गांधीजी आणि नेहरू कसे जबाबदार आहेत याबाबत नको ती भाषणं करून, लोकांची दिशाभूल करीत अनेक लोक आताशी पुढारी बनलेत. देशात घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर 'गांधीजी आजही प्रसंगानुरूप आवश्यक ठरताहेत.' तरीदेखील अशा भाकड गोष्टी चघळत बसण्यातच मश्गुल असलेल्यांना सर्वसामान्यांच्या गरजा, अपेक्षा काय आहेत हे बघण्याकडं कुणाला स्वारस्य आहे! असे अनेक वादविवाद चिरंतन राहतील. इतिहासतज्ञ जो इतिहास आहे, ज्याचे पुरावे आहेत, त्याचा स्वीकार करतात पण नेहरूंना व्हिलन ठरवून त्यांच्या द्वेषानं पछाडलेली मंडळी जे वास्तव नाही तेच चघळण्यात धन्यता मानतात. कारण देशासमोरच्या गंभीर प्रश्नांवरून लोकांचं लक्ष इतरत्र वळविण्यात त्यांना रस असतो.

- हरीश केंची,
९४२२३१०६०९



No comments:

Post a Comment

लडाख आंदोलनामागचे वास्तव

"भारताच्या उत्तरेकडे वसलेला एक केंद्रशासित प्रदेश म्हणजे स्वर्गाची अनुभूती म्हणजे लडाख. शांत, प्रसन्न, आल्हाददायक लडाख मात्...