Saturday, 14 January 2023

नृपशंभूराजांबद्धल अपसमज!

इथल्या मानबिंदूंची अवहेलना, अवमान, अपसमज निर्माण करून त्याच्या साथीनं आपला कमकुवत राज्यकारभारावरील जनतेचं, रयतेचं लक्ष इतरत्र वळविण्यात राज्यकर्ते धन्यता मानताहेत. शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी यांच्याबद्धल अनुदार काढा वा अपसमज पसरावा हा उद्योग गेले काही दिवस सुरू आहे. साधता त्यांच्या हाती संभाजी महाराज लागलेत. राजे स्वराज्य रक्षक होते की, धर्मवीर यावर वाद आरंभलाय. शंभूराजांबद्धल विकृत इतिहास लिहिला गेलाय. हे आता सिद्ध झालंय. पण मनुवादी अद्याप त्याच चिखलात लोळताहेत. शंभूराजांबद्धलचे असलेले अपसमज दूर करणारं हे लेखन आपल्याला निश्चित आवडेल...!
--------------------------------------------------
संभाजी महाराजांना कैद होईपर्यंत हिंदवी स्वराज्याचा कोणताही गड वा प्रदेश मोगलांच्या हाती पडला नव्हता. उलट उत्तरेकडचा आणि दक्षिणेकडचा मोगलीप्रदेशच संभाजीराजांनी बळकावला होता. मोगली सैन्याचं आक्रमण कल्याण-पुणे भागात नेहमीप्रमाणे शिवकालापासून अयशस्वीपणे चालूच होतं. त्यात मोगलांना संपूर्ण यश कधीच मिळालं नव्हतं. (संदर्भ: इतिहासकार वा. सी. बेंद्रे लिखित 'श्री छत्रपती राजाराम महाराज आणि नेतृत्वहीन 'हिंदवी स्वराज्याचा मोगलांशी झगडा'). संभाजीमहाराजांचा हा पराक्रम कोणत्याही मोजमापानं असामान्य कोटीतील होता. हे मान्यच करावं लागेल, शेवटी त्यांना घरभेद्यांच्या राजद्रोहामुळं अटक झाली, तरी जे देदीप्यमान आणि धीरोदात्त हौतात्म्य त्यांनी बाणेदारपणे स्वराज्यासाठी स्वीकारलं, त्यामुळं त्यांच्या निर्वाणानंतरही मराठी सेना एका धुंद अभिनिवेषात स्वराज्य रक्षणार्थ प्राणपणानं झगडत राहिली आणि २६ वर्षांत पुन्हा एकदाही आग्रा, दिल्ली या आपल्या सत्ताकेंद्रांचं तोंडही पाहावयास न मिळता गाझी औरंगजेबाला मराठीराज्याला तर धुळीत मिळवता आलं नाहीच, पण त्याला स्वतःलाच या महाराष्ट्र भूमीच्या धुळीत १७०७ मध्ये थकल्या-भागल्या स्थितीत, निराश मनानं अखेरचा विसावा घ्यावा लागला. आपल्या पराक्रमानं संभाजीमहाराजांनी मराठी स्वराज्य तर राखलंच, पण आपल्या धीरोदात्त मरणानंही स्वराज्याचं रक्षण करण्यास ते मराठी सैन्याचे स्फूर्तिदाते ठरले. 'संभाजीमहाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा दर्जा फार मोठा होता. त्यांच्या चारित्र्याला कलंकित करणारे सर्व आरोप असत्य कोटीतले अथवा द्वेषभावनेनं कल्पिलेले होते. समकालीन पुराव्यांनी ते तसे ठरतात. उलट तेच आरोप मंत्र्यांनाच लागू पडतात, हे ऐतिहासिक समकालीन साधनांनी सिद्धच होत आहे!' असं वा. सी. बेंद्रे स्पष्टच म्हणतात. (संदर्भ: बेंद्रे लिखित 'श्रीछत्रपती राजाराम महाराज आणि नेतृत्वहीन 'हिंदवी स्वराज्या'चा मोगलांशी झगडा').

अशा परिस्थितीत वास्तविक संभाजीमहाराजांनी राज्याचा विध्वंस केला, असं म्हणणं म्हणजे आपण कारस्थानी सरकारकून यांनी केलेलं पाप लपवण्यासाठी खोट्या कंड्या पिकवणं होय. हा प्रकार केवळ व्यक्तिगत नामुष्कीमुळं आलेला अपवाद दूर करण्याचा राजद्रोही प्रयत्न होय असंही वा. सी. बेंद्रे नमूद करतात. स्वराज्याचा विध्वंस संभाजी महाराजांनी केला नाही. तो विध्वंस आण्णाजी दत्तो, राहूजी सोमनाथ, प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत अमात्य आदी कारस्थानी हिंदू मूलतत्त्ववादी सरकारकून आणि त्यांच्या बगलबच्चांनी केला. त्यात मोरोपंतांचे चिरंजीव निळो मोरेश्वर, शंकराजी नारायण वगैरे प्रमुख व्यक्ती आणि सामान्य ब्राह्मण येत नाहीत. त्यांना थोरल्या महाराजांनी केलेल्या अनेक लोककल्याणकारी सुधारणा जाचत होत्या आणि राज्यातली सामाजिक स्थिती पूर्वपदावर नेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. 'रामचंद्रपंतानं हिंदवी स्वराज्याची मूळ उद्दिष्टे आणि राजपत्रातले, व्यवहारातलं वगैरे तपशिलात बदल करून इस्लामी राज्यबंधारणेतल्या फारसी पदव्या आणि लेखनात फारसी भाषेतली विचारसरणी, राज्याभिषेक शककालाच्या नोंदींऐवजी सुहुर सनाच्या आणि इस्लामी तारीख महिन्यांचा पुन्हा वापर केला आणि महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्र राज्य हे देवाब्राह्मणांचे राज्य या नवीन विचारसरणीचा प्रचार करून जातीच्या आचारधर्मात संभाजी महाराजांनी केलेल्या सुधारणांना मूठमाती दिली.' (संदर्भ: 'श्रीछत्रपती राजाराम महाराज आणि नेतृत्वहीन "हिंदवी स्वराज्याचा मोगलांशी झगडा") असं वा. सी. बेंद्रे जे दाखवून देतात त्यावरून हे सिद्धच होतं की, शिवकालातच हिंदू मूलतत्त्ववाद्यांचं ग्रहण स्वराज्यास लागलं होते! संभाजी महाराजांनी ते आपल्या हयातीत तरी खग्रास होऊ दिलं नाही. संभाजीमहाराजांच्या बाणेदार आणि तेजस्वी कारकीर्दीचा अत्यंत दुर्दैवी भाग म्हणजे अखिल हिंदुस्थान विरुद्ध छोटे मराठी हिंदवी स्वराज्य, असा अत्यंत विषम सामना झडला असतानाही संभाजीराजांनी स्वपराक्रमानं आपलं छोटं राज्य रक्षिलं, त्याकरिता वेदनामय हौतात्म्य पत्करलं, तरी संभाजीराजांना मुळात तसे नसताना बराच काळ व्यभिचारी, व्यसनी, राज्य विध्वंसणारे असं ठरवण्यात हिंदू सनातन्यांना यश आलं आणि ज्यांनी प्रत्यक्ष प्रजाप्रिय राजाला ठार मारण्याचे अनेक वेळा प्रयत्न केले, राजाला पकडून देण्यासाठी शत्रूला मदत केली. ज्यांनी राज्याचा मोठा हिस्सा शत्रूला खुशाल देऊन टाकण्याचा स्वार्थी डाव टाकला, बलाढ्य शत्रूशी लढा देण्यापेक्षा भेकडपणे त्याला शरण जाऊन त्याची मांडलिकी पत्करण्याचे व्यूह रचले, ते भ्रष्ट, कपटी, पाताळयंत्री पीटर पॅन कूपमंडूक वृत्तीचे मूलतत्त्ववादी, हिंदू सनातनी सरकारकून मात्र इतिहासात करड्या आणि करारी स्वभावाचे आणि जाणकार म्हणवून रंगवले गेले. आपले जातिनिष्ट, अनीतिमान, विषमवादी वर्णवर्चस्व येनकेनप्रकारे कायम राखणे हेच ज्यांचं अंतिम ध्येय, त्यांना आमजनतेला प्रगतीपथावर नेणाऱ्या समता, स्वातंत्र्य आदि उज्वल कल्पनांचं कसले अप्रूप!

शिवरायांप्रमाणेच शिवरायांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी राजे यांच्याबद्दल ते युवराज असल्यापासून फार मोठ्या प्रमाणावर अपसमज प्रचलित होते. तपस्वी इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रे यांनी आपल्या ४०-४२ वर्षांच्या अथक संशोधनानंतर १९६० मध्ये संभाजीराजांवर संभाजी महाराज हे पुस्तक प्रसिद्ध होईपर्यंत जवळपास २७० वर्षांच्या काळात हे अपसमज अस्तित्वात होते. बेंद्रे यांच्या पुस्तकानंतर डॉ. कमल गोखले यांचंही संभाजी महाराजांवरील किटाळ दूर करणारं शिवपुत्र संभाजी हे अप्रतिम पुस्तक १९७१ मध्ये प्रसिद्ध झालं. त्याही नंतर १९९० मध्ये छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ, डॉ. जयसिंगराव पवार यांच्या संपादनानं प्रकाशित झाला. त्यात अनेक इतिहासकार आणि इतिहास अभ्यासक यांचे संभाजी महाराजांसंबंधित लेख मिळवून डॉ. पवारांनी प्रत्येक लेखाचा गोषवारा तर दिलाच, पण संभाजीमहाराजांवर आधी लिहिल्या गेलेल्या सर्व लिखाणांचा परामर्ष घेणारं फार सुरेख असं प्रदीर्घ प्रास्तविक लिहिलं आहे. वरील नमूद तिन्ही पुस्तकांनी, संभाजी महाराजांची मलिन केली गेलेली प्रतिमा साधार पुराव्यांनिशी पूर्णपणे पुसून टाकून, संभाजी महाराज मूलतः कसे साहसी आणि झुंझार सेनानी, कर्तव्यदक्ष राजा आणि प्रजाप्रिय होते, तसंच शिवपुत्र म्हणून शोभेल असंच त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं आणि त्यांनी औरंगजेबासारख्या सामर्थ्यशाली शत्रूबरोबरच पोर्तुगीज आणि सिद्दी या सागरी सत्ताधाऱ्यांशी एकाच वेळी दिलेल्या ८-९ वर्षांच्या शौर्यशाली आणि स्फूर्तिदायक लढ्यानंतर स्वराज्य रक्षणाकरिता दुर्दैवी पण धैर्यशाली हौतात्म्य कसं पत्करलं, याचं मोठं गौरवशाली आणि यथार्थ चित्रण केलं आहे. वास्तव असं असताना माझ्यासारख्या इतिहासाच्या अभ्यासकाला याच विषयावर पुन्हा लिहिण्यासाठी धाडस करण्याचं काही कारण नव्हतं, पण...

डॉ. कमल गोखले यांच्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिताना थोर इतिहास संशोधक महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी म्हटलं आहे, 'ऐतिहासिक पंडित हा मानवी इतिहासाच्या सूक्ष्म अवलोकनानं, मननानं आणि चिंतनानं परिष्कृत झालेली प्रतिभा वापरतो!' ख्यातनाम ललित लेखक आणि इतिहास अभ्यासक शिवाजी सावंत यांनीही, डॉ. जयसिंगराव पवार संपादित संभाजीमहाराजांच्यावरच्या 'स्मारक ग्रंथा'तल्या आपल्या लेखात म्हटलं आहे, ‘इतिहासातील व्यक्तिरेखा आपणास हवा तेवढा सोयीच्या कालखंडाचा तुकडा घेऊन कधीच नीट समजत नाहीत, हे माझं पूर्ण अभ्यासानंतरचं नम्र आणि ठाम मत आहे. त्यासाठी इतिहासात सततचा जो एक दीर्घ आणि मूक अंतःस्त्रोत असतो त्याची नस नेमकेपणी ललित लेखकाला गवसावी लागते. फक्त ललित लेखकालाच नव्हे, प्राधान्येकरून इतिहासकाराला अशी नस, कारण आणि परिणाम, सत्य आणि आभास, यांचा पडताळा येण्यासाठी सापडणे अधिक गरजेचं आहे, हे सांगण्याची गरज नाही.' असेच पण अधिक स्पष्टपणे आपले विचार मांडताना, हिंदू धर्म ग्रंथांचे एक चिकित्सक अभ्यासू आणि विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे म्हणतात. 'इतिहासातील एखाद्या घटनेचा अन्वयार्थ लावताना त्या घटनेकडे एक सुटी घटना म्हणून पाहाता येत नाही. ती घटना घडवणाऱ्या आणि त्या घटनेची नोंद करणाऱ्या लोकांचे सामाजिक हितसंबंध, त्यांची परंपरा, त्यांच्या प्रकृती इत्यादी असंख्य घटक ध्यानात घेऊनच त्या घटनेचं स्वरूप समजून घ्यायचं असतं!' या दृष्टीनं विचार करता मला असं आढळून आलं की, महाराणी सोयराबाई यांची, युवराज संभाजीला बाजूला सारून किंवा राज्याची वाटणी होऊन, छत्रपतींच्या रायगडावरील मूळ तख्ताचा वारसा, आपला मुलगा राजाराम याला मिळावा ही भावना, सर्वसाधारण सावत्र मातांची पूर्वापार दृष्टोत्पत्तीस आलेली प्रवृत्ती पाहाता एक वेळ सहज समजू शकतं. तथापि, थोरल्या महाराजांनी जाणते आणि विश्वासू म्हणून नेमणुका केलेली त्यांच्या प्रधानमंडळातली आणि इतर ज्येष्ठ मंडळीपैकी मोरोपंत, आण्णाजी दत्तो, प्रल्हाद निराजी, बाळाजी आवजीसारख्यांनी. दिल्लीच्या बलाढ्य मोगल बादशहाची जंगी फौज मराठी राज्यावर ते पूर्णतः नेस्तनाबूत करण्याच्या इराद्यानं लवकरच चालून येणार हे स्पष्ट होत असताना, राजारामांसारख्या केवळ ९-१० वर्षांच्या आणि हा त्यांचा प्रयत्न राजाराम ४-५ वर्षांचे असल्यापासूनच चालू होता अननुभवी आणि नाजूक प्रकृती आणि प्रवृत्तीच्या राजपुत्राचा पक्ष, आपलं शौर्य, साहस, युद्धकुशलता आणि कर्तव्यपरायणता सिद्ध केलेल्या आणि मातब्बर औरंगजेबाच्या चौफेर आक्रमणास प्रभावशालीपणे पायबंद घालण्यास सर्वथा समर्थ असलेल्या जे पुढे सिद्धही झालं, युवराज म्हणून आधीच संबोधित झालेल्या संभाजीराजांच्या विरोधात, तेही बहुतांशी फार गंभीर न भासणाऱ्या कारणांसाठी का धरावा आणि त्यासाठी त्यांचं चारित्र्यहनन करून त्यांच्या खुनाचं प्रयत्न करण्यापर्यंत, त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत परिश्रमानं स्थापन केलेल्या सार्वभौम हिंदवी स्वराज्याचा मोठा हिस्सा औरंगजेबाचा पुत्र अकबर याला आंदण देण्याची योजना आखण्यापर्यंत, एवढंच नव्हे, तर संभाजीराजांना पकडून देण्यासाठी मोगलांना मदत करण्यापर्यंत का मजल मारावी याचा बोध केवळ तत्कालीन कारणांवरून नीट होण्यासारखा नाही. काही इतिहासकारांनी फक्त एवढंच म्हटलं आहे की, 'त्यांनी ते स्वार्थासाठी केलं. पण त्या पलीकडं जाऊन आधीच्या कोणत्याही इतिहासकारानं कट करणाऱ्यांच्या अंतस्थ हेतूचा शोध घेण्याचा, त्यांचा नेमका स्वार्थ कार्य होता. हे जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत नाही.

खरं म्हणजे, संभाजीराजांना विरोध करणाऱ्या प्रधानमंडळातल्या धुरिणांच्या धार्मिक प्रवृत्ती, त्यांचे सामाजिक हितसंबंध, त्याबाबतीत इतिहासात दृग्गोचर झालेली परंपरा आणि सतत आढळून येणारा दीर्घ आणि मूक अंतःस्रोत. तसंच या घटना नोंदणाऱ्यांचा कल आणि प्रवृत्ती इत्यादी घटनांचा सूक्ष्म अभ्यास करून कारणमीमांसा शोधायला हवी होती. मात्र ज्येष्ठ लेखक, इतिहासकार व विचारवंतांनी वर नमूद केलेल्या त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, इतिहासाचा एक अभ्यासक या नात्यानं मी जेव्हा याबाबतीत मागोवा घेतला. तेव्हा एक वेगळीच कारणमीमांसा माझ्या दृष्टोत्पत्तीस आली आणि तीच जनतेसमोर यावी, या हेतूनं मी या लेखनास हात घातला. संभाजीराजांसारख्या स्वतंत्र व सार्वभौम राज्याच्या अधिकृत वारसानं मोगलांसारख्या शत्रूस मिळणं, हा लहानसहान अपराध होऊ शकत नाही. हे मीही जाणतो. पण हे स्वराज्याच्या हितासाठी रचलेल्या गुप्त राजकीय डावाच्या अनुषंगानं असेल तर? मात्र काही इतिहासकारांनी जे म्हटलं आहे की, संभाजी राजे मोगलांस मिळाल्यानं त्यांना राज्यपद देण्यास प्रधानमंडळातल्या धुरिणांचा विरोध होता, हे काही मला पूर्णार्थानं बरोबर वाटत नाही. संभाजीराजे मोगलांकडं १३/१२/१६७८ रोजी गेले. त्यांचा दिलेरखानाशी पत्रव्यवहारही थोरले महाराज ऑक्टोबर १६७६ मध्ये कर्नाटक स्वारीवर गेल्यानंतर सुरू झाला. पण त्याआधी १६७५ पासूनच त्यांच्याविरुद्ध अनेक खोट्यानाट्या वावड्या उडवून त्यांचं चारित्र्यहनन आणि बदनामी करून, त्यांना युवराज म्हणून स्वाभिमानानं स्वराज्यात जगणं अशक्य करून, त्यांना पित्याच्या मनातून उतरवून, त्यांच्या मराठी राज्याच्या सिंहासनावरच्या हक्काला बाधा आणण्याचा गंभीर आणि मेटाकुटीचा प्रयत्न काही ज्येष्ठांनी केला, तेव्हाच त्यांनी गुप्त राजकीय डावाची भक्कम पूर्वपीठिका तयार झाल्यावर अखेरचं असं हे पाऊल उचललं. अर्थात, त्यामुळं त्यांच्या विरोधकांना आपल्या विरोधासाठी एक सबळ कारण मिळालं; तरी ते त्यांच्या विरोधाचं मूळ कारण नव्हे. इतरही काही कारणं देण्यात येतात, पण तीही सर्व नंतरची आहेत. मुळात संभाजीराजांच्या हक्काला वेगळ्याच कारणांसाठी विरोध होत होता. ती कारणं काय होती, याचा खुलासा अनेकांनी आपल्या पुस्तकातून केलाय. पण ते मोगलांना मिळाले म्हणून प्रायः त्यांना विरोध झाला, असं म्हणणं म्हणजे इंग्रजी वाक्यप्रचाराप्रमाणे Putting the Cart before the horse - घोड्याच्या पुढे गाडी लावणे असा होईल. संभाजीराजांनी असा निर्णय कोणत्या परिस्थतीत आणि काय कारणानं घेतला, याचाही ऊहापोह अनेक इतिहासकारांनी केलाय. नृपशंभूबाबत झालेले अपसमज दूर करण्यासाठी, लिहिण्यासाठी मला ज्या इतिहास संशोधक, इतिहास अभ्यासक यांच्या ग्रंथांचा आणि लेखांचा आधार मिळाला, आभार मानले पाहिजेत.
- हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...