Tuesday, 27 September 2022

'शिवतीर्था'साठीचं रणकंदन...!

"अखेर न्यायालयाने शिवतीर्थावर दसरा मेळावा घ्यायची परवानगी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिलीय. महाराष्ट्राच्या राजकारणावर या निमित्ताने घोंघावणार शिवसेनेतल्या वादाचं वादळ काही काळापुरतं का होईना शमलंय! शिवसेनेत उभी फूट पडली. सत्तेचा हव्यास आणि लोभानं ज्या शिवसेनेच्या वटवृक्षाखाली ही मंडळी रुजली, वाढली आणि सशक्त झाली त्यांनीच त्या वटवृक्षावर कुऱ्हाड चालवलीय. त्यासाठी शत्रूंशी संधान साधून घाव घातला. ज्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर गेली ५६ वर्षे जोमाने होत होता त्यालाच आडकाठी आणण्याचा अश्लाघ्य प्रयत्न झाला. सत्तेचा दबाव टाकला गेला. न्यायालयानं लाखो शिवसैनिकांना न्याय दिला. पोलीस, महापालिका आणि सरकारला फटकारलं! त्यामुळं यंदा शिवसेनेच्या फुटीनंतर हा मेळावा होतो आहे  त्यात पक्षप्रमुख काय बोलतात याचीच उत्सुकता आहे!"
---------------------------------
शिवसेनेची ५६ वर्षांची दसरा मेळाव्याची परंपरा आहे. दरवर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काय होणार याची उत्सुकता शिवसैनिकांना असते. यासाठीच हजारो शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कवर दाखल होतात. राज्यात नोव्हेंबर २०२० मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी महत्वाचा आहे. ३० ऑक्टोबर १९६६ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर पहिला दसरा मेळावा घेतला होता. दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे एक समीकरण बनलं. त्याला आता ५६ वर्षे पूर्ण होतील. इतकी वर्षं शिवाजी पार्कवर हा दसरा मेळावा घेण्यात येतो. अनेक राजकीय पक्षांकडून दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येतं. पण एक पक्ष, एक नेता आणि एक मैदान हे शिवसेनेतच बघायला मिळतं. बाळासाहेबांचं शिवाजी पार्कवर प्रचंड प्रेम होतं. बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क या दोघांचा जन्म एकाचवेळी झाल्याच खूप कमी जणांना माहिती असेल. शिवाजी पार्कला पूर्वी माइन पार्क असं संबोधलं जात होतं. १९२७ साली या मैदानाचं नावं शिवाजी पार्क देण्यात आलं. याच साली बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला होता. संपूर्ण महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी झालेल्या आंदोलनात या मैदानाला विशेष महत्व प्राप्त झालेलं होतं. आचार्य अत्रे यांनी या शिवाजी पार्कला 'शिवतीर्थ' असं पहिल्यांदा संबोधलं होतं.

२००५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली आणि त्यावर सुनावणी होताना शिवाजी पार्क मैदान हे शांतता क्षेत्रात येत असल्यामुळे राजकीय सभांना परवानगी देऊ नये, असा युक्तिवाद करण्यात आला. या सभांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होत असल्याचही बोललं गेलं. त्यानंतर शिवसेनेच्या या राजकीय दसरा मेळाव्याला सांस्कृतिक कार्यक्रमाचं स्वरूप देण्यात आलं. ६० डेसीबलपेक्षा अधिक आवाजावर मर्यादा घातल्या गेल्या. पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर हजारो शिवसैनिकांची गर्दी होत असे. त्या दिवशी आधी शस्त्रपूजन करून नेत्यांच्या भाषणाला सुरुवात व्हायची. सर्वात शेवटी बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण व्हायचं. शिवसेना या पक्षात भविष्यातली रूपरेखा दसरा मेळाव्यात जाहीर केली जात असे. शिवसेनेने १९८९ मध्ये 'सामना' हे वर्तमानपत्र सुरू केलं. शिवसेनेची भूमिका ही दसरा मेळाव्यात स्पष्ट केली जात असे. याचं उदाहरण म्हणजे, १९९१ सालच्या दसरा मेळाव्यात भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना मुंबईत होऊ देणार नाही, असं बाळासाहेबांनी जाहीर केलं. तेव्हा तो कसा होऊ देणार नाही याचं कोणतंही नियोजन नव्हतं. तेव्हा शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे आणि प्रभाकर शिंदे यांनी वानखेडे स्टेडियमवर जाऊन मैदानावर 'पिच' उखडून टाकलं होत. त्यामुळे हा क्रिकेट सामना रद्द करावा लागला होता. दसरा मेळाव्यात पक्षाच्या भूमिकेला रुपरेखा देण्याची ही परंपरा उध्दव ठाकरे यांच्या काळातही कायम आहे.

शिवसेनेमधल्या अनेक महत्त्वाच्या घटना दसरा मेळाव्यात घडल्या आहेत म्हणून शिवसेनेत दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व आहे. १९९६ साली राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवउद्योग सुरू करण्यात आला. त्याची घोषणा दसरा मेळाव्यात केली गेली. १९८२ साली गिरणी कामगारांच्या संप या संदर्भाने बाळासाहेब ठाकरे यांनी भाषण केलं. त्यावेळी दसरा मेळाव्याला त्यावेळी कॉंग्रेसमध्ये असणार्‍या शरद पवार आणि जॉर्ज फर्नाडिस यांना आमंत्रित केलं होतं. २०१० साली बाळासाहेब ठाकरे यांनी नातू आणि विद्यमान मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हातात तलवार देऊन राजकारणातलं 'लॉंचिग' दसरा मेळाव्यात केलं होतं. त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचं पूर्णपणे नेतृत्व हातात घेतलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांना वयानुसार सभांना जाणं शक्य होत नव्हतं. २४ ऑक्टोबर २०१२ साली झालेल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांना तब्येतीच्या कारणामुळे उपस्थित राहता आलं नव्हतं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केलं होतं. दसरा मेळाव्याच्या त्या 'भाषणात' कडक शब्दात टीका करणारे बाळासाहेब हळवे झालेले महाराष्ट्राने पाहीले. ते म्हणाले होते "तुम्ही मला इतके वर्ष सांभाळलं. आता उद्धवला आणि आदित्यला सांभाळून घ्या आणि महाराष्ट्रात उत्कर्ष घडवा". बाळासाहेब ठाकरे यांचं २०१२ मधल्या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांसाठी असलेलं ते शेवटचं भाषण ठरलं. दसरा मेळाव्याच्या भाषणात टीकेचं लक्ष हे प्रामुख्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असायचे. पण आज सत्तेत शिवसेना या दोन पक्षाबरोबर सामील आहे. त्यामुळे यावेळी उध्दव ठाकरे हे भाजपवर टीका करताना दिसतील. भाषणात टीकेची फटकेबाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करताना अडचणी येत होत्या कारण तेव्हा ते फक्त शिवसेनेचे नाहीत तर राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे याचं भान ठेवून त्यांना बोलावं लागत होतं. आता मात्र ते मुक्त आहेत, ते कुणावर टीकेची झोड उठवतात ते पाहावं लागेल अर्थात भाजप आणि शिंदे गट त्यांच्या रडारवर असतील. दोन वर्षे कोरोना काळात ते जरी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलले होते आता मात्र शिवसैनिकांनी खचाखच भरलेलं शिवाजी पार्क यावेळी असेल!. शिवसेनेच्या इतिहासात आतापर्यंत दोनवेळा दसरा मेळावा रद्द करण्यात आला आहे. २००६ साली मुंबईत जोरदार पाऊस पडत होता. शिवाजी पार्कवर चिखल झाला होता काही ठिकाणी पाणी साचलं होतं. यामुळे दसरा मेळावा रद्द करावा लागला होता. २००९
साली विधानसभा निवडणुका लागल्या होत्या. आचारसंहितेच्या काळात दसरा मेळावा घेणं शक्य नव्हतं तेव्हा तो पुढे ढकलण्यात आला होता.

एकनाथ शिंदे यांच्या ऐतिहासिक बंडामुळं सध्या शिवसेनेत उभी फूट पडलीय. शिवसेनेचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी दोन गटांमध्ये विभागले गेल्यानं खरी शिवसेना कोणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे गटानं शिवसेनेवर दावा सांगितला असला तरी त्याची प्रत्यक्ष झळ आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचली नव्हती. परंतु, शिवाजी पार्कवर दरवर्षी होणारा दसरा मेळावा घेण्याचा हक्क आपला आहे, असं सांगत शिंदे गटानं ठाकरे यांच्यासमोर शड्डू ठोकला होता. केंद्र आणि राज्यात असलेली भाजपची सत्ता पाहता मुंबई महानगरपालिकेकडून दसरा मेळावा घेण्याचा हक्क शिंदे गटाच्या पारड्यात टाकला जाईल अशी भीती वाटल्यानं ठाकरे यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. तिथं न्याय मिळाला अन दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा झाला. तसे झालं नसतं तर शिवसेनेची अनेक दशकांची दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झाली असती. शिवाय शिंदे गटाकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा जरी घेण्यात आला असता तरी ठाकरे घराण्यातली व्यक्ती नसल्यानं त्याला फारसा अर्थ राहिला नसता. तब्बल ५६ वर्षांपासून शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा हे अतूट समीकरण आहे. बाळासाहेब ठाकरे हे दसरा मेळाव्याच्या दिवशी शिवसैनिकांना नवा कार्यक्रम द्यायचे. त्यामुळं शिवसैनिक दरवर्षी न चुकता विचारांचं सोनं लुटण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर आवर्जून यायचे. मात्र, आता महानगरपालिकेने शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला परवानगी दिली असती तर बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार असणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा पत्ता आपोआप कट झाला असता आणि शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झाली असती. तो उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का ठरला असता. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे स्थान हे अनन्यसाधारण आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून राज्यभरातले शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी आवर्जून शिवतीर्थावर येतात. १९६७ साली दादरमध्ये शिवसेनेची स्थापना झाली. त्याच्या दुसऱ्या वर्षापासूनच बाळासाहेब ठाकरे यांनी शिवतीर्थवर सुरु केलेली दसरा मेळाव्याची परंपरा आजतागायत कायम आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे दसरा मेळाव्याचे भाषण हे शिवसैनिक आणि राजकीय वर्तुळासाठी एकप्रकारची पर्वणी असायची. दसरा मेळाव्याच्या भाषणांमधून बाळासाहेब ठाकरे हे राज्यभरातील शिवसैनिकांना नवा कार्यक्रम देत असत. त्यानुसार शिवसैनिक पुढील कामाला लागायचे. शिवाजी पार्कातील दसरा मेळावा आणि शिवसेना हे समीकरण अतूट राहिले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या काळात त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे २०१२ साली बाळासाहेब ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात भाषण केले होते. परंतु, यंदा शिंदे-फडणवीस सरकारकडून उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेता येऊ नये, यासाठी त्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यासाठी पोलीस खाते आणि महापालिका यंत्रणेवर दबाव आणला होता. पण न्यायालयाने महापालिका, पोलीस आणि सरकारला फटकारून परस्पर चपराक दिलीय. न्यायालयात विपरीत घडलं असतं तर शिवसेनेची आन-बान-शान असलेल्या दसरा मेळाव्याची परंपरा पहिल्यांदाच खंडित झाली असती!

महाराष्ट्रातल्या राजकारणाची दिशा आणि वाटचाल ठरवण्यात महत्त्वपूर्ण ठरलेल्या घटकांमध्ये शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा निश्चितपणे उल्लेख करता येईल. दरवर्षी दसरा मेळाव्यात होणारे बाळासाहेब ठाकरे यांचे झंझावाती भाषण हे जनतेच्या आकर्षणाचा विषय असायचे. बाळासाहेब ठाकरे यांची प्रत्येक सभा ही विरोधकांची पिसं काढणारी घणाघाती आणि आक्रमक असायची. मात्र, बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्यातल्या भाषणाचे स्थान हे काही वेगळेच असायचे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी रावण दहनानंतर बाळासाहेब ठाकरे यांना ऐकण्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान गर्दीने तुडूंब भरलेले असायचे. यावेळी शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द ना शब्द कानात साठवून ठेवायचे. दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी दिलेला आदेश हा शिवसैनिकांसाठी कायमच प्रमाण राहिलेला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचे राजकीय वारसदार असलेल्या उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याला संबोधित करायला सुरुवात केली. बाळासाहेब ठाकरे गेले असले तरी दसरा मेळाव्याची जादू ही जराही ओसरलेली नाही. त्यामुळे विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवसैनिक प्रत्येकवर्षी शिवतीर्थावर गर्दी करत होते. दसरा मेळावा हे विशेषत: उद्धव ठाकरे यांच्यासाठी शक्तीप्रदर्शनाचं उत्तम माध्यम होते. दसरा मेळाव्यामुळे अनेक ज्येष्ठ शिवसैनिक पक्षाशी कायमचे बांधले गेले. त्यामुळे बाळासाहेब गेल्यानंतरही एखादी परंपरा असल्याप्रमाणे जुनेजाणते शिवसैनिकही दसरा मेळाव्यासाठी दरवर्षी शिवतीर्थावर हमखास जमतात. शिवसेनेच्या दुसऱ्या एखाद्या उपक्रमाला किंवा कार्यक्रमांना खचितच इतके सातत्यपूर्ण यश मिळाले असेल. त्यामुळे दसरा मेळावा हा शिवसेना पक्षाची ओळख झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण पक्षावरच दावा सांगितल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर मूळ शिवसेनेचे अस्तित्त्व टिकवण्याचे अत्यंत बिकट आव्हान उभे ठाकले आहे. घटनात्मक पेचांमुळे शिवसेना पक्ष कोणाचा, याचा निवाडा आता सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या हातात गेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्याकडून प्रत्येक पाऊल हे जपून टाकले जात आहे. कोणतीही राजकीय कृती ही भविष्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रभाव टाकू शकते. त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट कोणतीही गोष्ट आपल्या विरोधात जाणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत आहे. याच द्वंद्वातून दसरा मेळाव्याचा पेच निर्माण झाला होता. पण न्यायालयाने हा पेच सोडवत शिवतीर्थाचं माप ठाकरे गटाच्या पारड्यात टाकलं!

आतापर्यंत शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला परवानगी मिळणे, हा केवळ औपचारिकतेचा भाग होता. शिवसेनेने परवानगी मागितली किंवा नाही, पण दसरा मेळावा शिवतीर्थावर होणारच, हे समीकरणच बनून गेले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने यंदा पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेकडे दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी अगोदरच अर्ज केला होता. महापालिकेने नेहमीप्रमाणे एका झटक्यात हा अर्ज मंजूर केला नाही. तर दुसरीकडे शिंदे गटानेही दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज दाखल केला. ज्या गटाला दसरा मेळाव्याची परवानगी मिळेल, तीच खरी शिवसेना, असा संदेश त्यामधून जाऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर लढाईत हा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे शिवतीर्थावर कोणाच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळणार, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील असं चित्र निर्माण झालं होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवतीर्थावर दसरा मेळावा होत आहे. शिवसेनेची ही ५६ वर्षांची परंपरा आहे. यापूर्वी चार दिवसांत परवानगी दिली जात होती. यंदा पत्र देऊन एक महिना उलटल्यानंतरही पालिकेने परवानगी दिलेली नाही. त्यामुळं शिवसैनिक नाराज झाले होते. जर परवानगी नाही मिळातील तर ६० च्या दशकात ज्या प्रमाणे बाळासाहेब ठाकरेंनी फियाट गाडीवर उभं राहून भाषण केलं होतं त्याप्रमाणेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही शिवाजी पार्क मैदानात गाडीवर उभं राहून सभा घेतील, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली होती, पण तशी वेळच आली नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना शिवाजी पार्क मैदान आणि दसरा मेळावा हा विषय आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रतिष्ठेचा बनला आहे, असं राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. उद्धव ठाकरे दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यास यशस्वी ठरल्यास बाळासाहेबांचे वारसदार आणि खरी शिवसेना ही त्यांचीच असल्याचं ते सिद्ध करु शकतात. याचा फायदा मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये होऊ शकतो.
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...