Monday, 22 August 2022

काँग्रेस सर्वसामान्यांची व्हावी

"काँग्रेसच्या भवितव्यावर मोठंच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. एकीकडं भाजपची वाटचाल 'शतप्रतिशत' च्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. तर काँग्रेसची वाटचाल 'भारत मुक्त'च्या दिशेनं होतेय. अर्थात या अवस्थेला काँग्रेस शीर्षस्थ नेत्यांपासून कार्यकर्ते सगळेच जबाबदार आहेत. समोर भाजप आणि मोदी-शहा यांचं मोठं आव्हान उभं असताना काँग्रेसमध्ये मात्र गटबाजी, आपापले नातेवाईक, सुभेदारी, गोतावळा सांभाळण्यातच धन्यता मानताहेत. सध्यस्थितीत जनमानसावर छाप पाडून पक्षात नवचैतन्य निर्माण करील, पक्षसंघटना मजबूत करील असं नेतृत्व काँग्रेसकडं दिसत नाही. काँग्रेसनं तरुणांमध्ये काम करण्याची गरज आहे. पक्षवाढीसाठी सामूहिक प्रयत्न हवेत. देशाला एक मजबूत विरोधी पक्षाची नितांत गरज आहे. एकाधिकारशाही, छुपी आणीबाणी देशाला परवडणारी नाही. कोणी काहीही म्हटलं तरी, देशव्यापी पक्ष म्हणून काँग्रेसकडंच आशेनं पाहिलं जातंय हेही तेवढंच सत्य आहे!"
---------------------------------------------------

पक्षांतर्गत निवडणुकांना काँग्रेसमध्ये सुरुवात झालीय. सप्टेंबरमध्ये पक्षाध्यक्ष निवडला जाईल. अशी चिन्हे आहेत. पण एकेक वरिष्ठ नेतेमंडळी आपली जबाबदारी सोडताहेत. कपिल सिब्बल पक्षातूनच बाहेर पडले. गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांनी पक्षानं सोपवलेली जबाबदारी सोडलीय. राजघराण्याप्रमाणं वंशपरंपरागत नेतृत्व आपल्याकडंच राखून ठेवणं आणि वर लोकशाहीच्या नावानं ढोल बडवणं ही संकुचितवृत्ती आजच्या काँग्रेसच्या अधःपतनाला जबाबदार आहे. राहुल गांधी आणि वरिष्ठ नेत्यांमधली खडाजंगी पक्षात दुफळी निर्माण करतेय. वरिष्ठांना राहुल यांचं नेतृत्व तकलादू वाटतंय; तर राहुल यांच्याकरिता पक्षातली वरिष्ठ मंडळी अडथळे वाटताहेत. काँग्रेसच्या उतरत्या काळात गांधी कुटुंबियांवर स्वकीयांकडून होणारी टीका जिव्हारी लागणारी असलीतरी ती रास्त आहे. काँग्रेसमधले शीर्षस्थ नेते पक्षाच्या नियोजनशून्य कारभारावर टीका करताना दिसतात. लोकशाही राष्ट्रात घराणेशाही कितीकाळ तग धरणार याचं आत्मपरीक्षण गांधी कुटुंबीयांनीच करायला हवं. महात्मा गांधी यांच्या स्वप्नातली ही काँग्रेस नक्कीच नाही. सर्वांना संधी मिळायला हवी यासाठी गांधीजी नेहमीच आग्रही असत. काँग्रेसला 'अच्छे दिन' येण्यासाठी सक्षम, कणखर नेतृत्वाची गरज आहे. राहुल यांचं कुचकामी नेतृत्व, पक्षश्रेष्ठींची चापलूसी करणारा एक गट आणि ज्येष्ठांचा ढासळत चाललेला संयम यामुळं काँग्रेस दिशाहीन ठरतेय. तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याची तसदी काँग्रेस नेतृत्वानं कधी घेतलेलीच नाही. त्याहीपलीकडं जाऊन पाहिल्यास, त्यांना तिथपर्यंत पोहोचू न देण्याचं गलिच्छ राजकारण स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी केल्याचं दिसून येतं. त्याचा परिणाम आज काँग्रेस भोगतेय. आज ना उद्या काँग्रेसला गांधी परिवार सोडून नेतृत्वाचा विचार करावाच लागणार आहे. आपल्या परिघाबाहेर जाऊन विचार न केल्यास काँग्रेसचे अधःपतन अटळ आहे.

कॉंग्रेस पक्षातल्या कार्यकर्त्यांनी गांधी-नेहरु कुटुंबातल्या व्यक्तींना आग्रह करुन कॉंग्रेसचं नेतृत्व करायला प्रेमाची सक्ती करु नये. कॉंग्रेसनं अशी संस्कृती नव्यानं तयार करावी की, जे सामुदायिक नेतृत्व मान्य होईल. कॉंग्रेस पक्ष हा खरंतर जमीनदार आणि सरंजामदार यांनी चालवलेला पक्ष झालाय. स्वातंत्र्यापूर्वीची राष्ट्रीय सभा ही कॉंग्रेस नव्हती. ते एक सर्व विचारांचं व्यासपीठ होतं, अगदी हिंदुत्ववादी, कम्युनिस्ट, समाजवादी, अमीर-उमराव असे सगळे त्यात होते. नंतरच्या काळात ही राष्ट्रीय सभा-काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर आणि दीर्घकाळ सत्ता उपभोगली पण पक्षबांधणी केली नाही. सभोवती जमा झालेला मेळा तसाच कॉंग्रेस नेतृत्वाला मायबाप सरकार म्हणत राहीला आणि नेतृत्व नेहरु-गांधी घराण्याकडं असं म्हणत राहीलं होतं. त्याची संवयच पडून गेलीय. मतदार विचारताहेत की, स्वातंत्र्याची किंमत पक्षानं कधीच वसूल केलीय. आणखी किती काळ कमाई खायची? नेहरू-गांधी कुटुंबाबाहेरील नवीन नेतृत्व केव्हा आणणार? कॉंग्रेसचा हिंदुत्ववाद हा वैदिक धर्माचा कट्टरतावाद नाही. हेच काय ते वेगळेपण आहे. म्हणूनच अल्पसंख्याक आणि दलित-आदिवासी त्यांचा आजही मतदार आहे. पण आता त्यांनाच मतदार म्हणून अपात्र करण्याचं कारस्थान सुरु झालंय. राहुल, सोनिया, प्रियंका या व्यतिरिक्त नवीन चेहरा तयार केला गेला नाही. राहुल इतकी वर्षे काय करीत होते? २०१४च्या पराभवानं कॉंग्रेसचं घर वाहून गेलं. ते सावरायचं सोडून सत्तावादी घटक उरलेले वासे-बांबू घेऊन पळत सुटले होते. सर्वच धर्मनिरपेक्ष संघटनांनी अजूनही आपापले अहंकार, सोडलेले नाहीत. लोकशाहीवादी असावं पण कुठवर? सर्वांना एकत्र ठेवण्यासाठीची किमान शिस्तही पाळू शकत नाही? प्रत्येकाला असं वाटतं. मला स्वतंत्र वलय आहे. ते काही प्रमाणात खरंही आहे. पक्षाची धुरा किमान दोन हजार दिवस आणि अठ्ठेचाळीस हजार तास राहुल गांधींकडं होती. ते पार्टटाईम राजकारणी आहेत अशी टीका त्यांच्यावर होते. त्याचं उत्तर कॉंग्रेसकडं नाही. हिंदी भाषिक पट्टयात हिंदुत्ववादी आणि दक्षिण पट्टयात भाषिक प्रादेशिक पक्ष आपापलं साम्राज्य सांभाळून आहेत. हिंदी पट्ट्यातले अखिलेश यादव, मायावती यांची सद्दी संपलीयॽ तेजस्वी यादव यांनी बऱ्यापैकी बाजी मारली. पण नापासाचे गुण कोणीही पाहात नाहीत. वरच्या इयत्तेत प्रवेश मिळाला नाही. हेच समजलं जातं. कॉंग्रेस, राष्ट्रवादी ही एकाच बापाची अपत्ये आहेत. पण तरीही त्यांची एकत्रित क्षमता किती? आता अशी वेळ आलीय की, सोनिया, राहुल, प्रियंका यांनी जाहीर करावं की, आमच्यापैकी कोणीही प्रधानमंत्री वा पक्षाध्यक्ष होणार नाही. आम्ही देशासाठी, राज्यघटनेच्या रक्षणासाठी देशभर फिरून जनजागृती करु. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट, ममता, तेजस्वी, अखिलेश यांना राहुल गांधींनी विश्वासात घेऊन देशाचा दौरा करावा. एवीतेवी गांधीजयंतीपासून देशभर पदयात्रा काढण्याचा निर्धार राहुल यांनी जाहीर केलाच आहे. अशीही सत्ता नाहीच तर निदान आपल्याकडं आशेनं पाहणाऱ्या जनतेला थोडासातरी दिलासा मिळेल असं काम होईल. पण या साऱ्या जरतरच्या गोष्टी आहेत. पक्षाच्या नेतृत्वाबरोबरच अनेक संस्थाही त्यांच्याच हातात आहेत त्यावर त्यांचा कब्जा आहे म्हणून त्यांना हा असा त्याग करता येत नाहीये हे याचं मूळ आहे.

काँग्रेसच्या आजच्या अवस्थेचं सर्वाधिक दु:ख पक्षाच्या तत्त्वांवर, कार्यक्रमांवर आणि घोषणांवर विश्वास ठेवून आयुष्यभर काम केलेल्या सामान्य कार्यकर्त्यांना होत आहे. काँग्रेसचं सरकार गेल्यापासून गेली आठ वर्षे हा कार्यकर्ता दिशाहीन, नेतृत्वहीन बनलाय. राष्ट्रीय नेतृत्वानं खंबीर राहून संघर्षाचं सातत्य ठेवलं आणि संवाद साधला तर कार्यकर्त्यांची उमेद वाढते. तीच त्यांची उमेद सामान्य मतदारांना मतपेटीपर्यंत घेऊन येते. काँग्रेसमधलं हे सारं चक्रच बिघडून गेलंय. राहुल गांधी यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन तीन वर्षांपूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तरीही आज तेच स्वतःला काँग्रेसचे अनिभिषिक्त नेते समजतात. असं असेल तर मग ते पक्षाचं अध्यक्षपद का स्वीकारत नाहीत? राहुल गांधी हे अध्यक्षपद स्वीकारत नाही म्हटल्यावर काही नेत्यांना हे पद मग प्रियांका गांधी यांनी स्वीकारावं असं वाटू लागलं. सोनिया गांधी यांच्यावर हंगामी अध्यक्षपदाचा भार किती काळ ठेवणार आहेत. पक्षाची वरिष्ठ मंडळी अध्यक्षपदाचा विचार गांधी कुटुंबाच्या परिघाबाहेर का नेत नाहीत. राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर पक्ष गांधी कुटुंबाचं नेतृत्व न स्वीकारता सातवर्षें चालत होता. केंद्रातलं सरकारही चालवत होता. मग आजच काँग्रेस नेत्यांना आत्मविश्वास का वाटत नाही. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. ज्या २३ ज्येष्ठांनी 'वैचारिक बंड' केले, त्यात गेहलोत नव्हते. त्यांचं नाव गांधी कुटुंबाच्या मनात असेल तर ते लवकर निश्चित करावं. सार्वत्रिक निवडणुका फार दूर नाहीत. त्यांनाही पुरेसा वेळ मिळायला हवा. पक्षाचे अध्यक्षपद घ्यायचं नाही; पण पक्षात अखेरचा शब्द हा आपलाच असावा, ही राहुल यांची अपेक्षा दिसते. 'जी-२३' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी आजवर अध्यक्षांना अनेक पत्रं पाठविलीत. यातल्या काही नेत्यांना नवी जबाबदारी देऊन चुचकारण्यात आलं. मात्र, कपिल सिब्बल यांनी वेगळा मार्ग स्वीकारत समाजवादी पक्षाकडून राज्यसभेची खासदारकी पदरात पाडून घेतली. गुलाम नबी आझाद हे आधीपासूनच नाराज आहेत. जम्मू-काश्मीर काँग्रेस समितीतल्या नेमणुकांनी त्यांचा रोष उफाळून आला. त्यांनी तिथल्या प्रचार समितीचं नेतृत्व सोडून दिलंय. त्यांच्यानंतर कालच्या रविवारी आनंद शर्मा यांनीही हिमाचल प्रदेशाच्या सुकाणू समितीचे प्रमुखपद सोडून दिलं. 'स्वाभिमान सोडून आपण काम करू शकत नाही', असं शर्मा यांनी म्हटलंय. राहुल वा प्रियांकांना पक्षाचं अध्यक्षपद नको असेल आणि सोनिया गांधी निवृत्त होणार असतील तर नव्या अध्यक्षाच्या कारभारात गांधी कुटुंबाचा हस्तक्षेप तरी होता कामा नये. त्यांना स्वतंत्रपणे काम करून देणं अपेक्षित आहे. मानेवर गांधी घराण्याचा ज्यू ठेवून पक्ष विस्ताराचं काम करणं अवघड होईल!

बहुतेकजण कॉंग्रेसचं वय १८८५ पासून मोजतात. खरंतर ते चुकीचं आहे. सर अॅलन ह्यूम यांनी जी राष्ट्रीय सभा स्थापन केली होती. तिचा आणि १९४७ नंतरच्या कॉंग्रेसचा राजकीय पक्ष म्हणून काहीही संबंध नव्हता. १८८५ साली सांस्कृतिकदृष्ट्या व्यापक असा मंच तयार झाला होता. कॉंग्रेसला फारच मागं न्यायचं झालं तर १९२५ नंतर कॉंग्रेस खऱ्या अर्थानं गांधीजींच्या मार्गानं चालू लागली होती. त्याचवेळी संघाचीही स्थापना झाली. हिंदुत्ववादी तर टिळकांच्या निधनानंतर काँग्रेसमधून बाहेर पडले होते. कम्युनिस्ट पक्षाची स्थापनाही त्याचवेळी झाली होती. उरलेली कॉंग्रेस ही गांधी कॉंग्रेस म्हणून ओळखली जात होती. १९३४ नंतर कॉंग्रेस अंतर्गत समाजवादी चूल निर्माण झाली. त्यांना कॉंग्रेसची पोरं म्हणूनच ओळखलं जातं होतं. परंतु त्या पंधरा वर्षांत या पोरांनीच कॉंग्रेसपक्ष चालविला होता. जयप्रकाश नारायण, डॉ राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, अशोक मेहता, ना.ग.गोरे, एसेम जोशी, साने गुरुजी, आचार्य नरेंद्र देव असा जबरदस्त समाजवादी गट कॉंग्रेस पक्षांतर्गत काम करत होता. कॉंग्रेस जरी गांधींच्या नेतृत्वाखाली काम करीत होती तरी कॉंग्रेस अंतर्गत जसा समाजवादी विचारांचा गट होता तसाच उरलेल्यांमध्ये एक गट हिंदुत्ववादी विचारांचा होता. त्यांचे म्होरके सरदार पटेल आणि डॉ. राजेंद्रप्रसाद होते. त्यांचा समाजवादी गटाला विरोध होता; इतकंच नव्हे तर, आचार्य नरेंद्र देव यांना कॉंग्रेसचं अध्यक्ष होऊ दिलं नाही. अन्यथा त्यावेळी समाजवादी गटानं कॉंग्रेस सोडली नसती तर आज चित्र वेगळं दिसलं असतं. पंडित नेहरुंही सरदार पटेल गटापुढं हतबल होते. १९५० नंतर सत्तेत मश्गूल असलेल्या कॉंग्रेसनं संघटना बांधणीकडं लक्षच दिलं नाही. त्याआधी तर संघटना अशी स्थितीच नव्हती. जो स्वातंत्र्याच्या बाजूनं तो कॉंग्रेसवाला असा सरळ हिशोब होता. १९५२ साली भरभरुन मतं मिळवून कॉंग्रेस सत्तेवर आली. काँग्रेसनं स्वातंत्र्याच्या कष्टाची कमाई १९७७ पर्यंत खाल्ली. ज्या समाजवाद्यांनी खस्ता खाल्ल्या त्यांची अवस्था आणखीन बिकट झाली होती. त्यांची ओळख कॉंग्रेस म्हणून होती. समाजवादी म्हणून त्यांना वेगळी ओळख नव्हती. सगळेच विद्वान होते. पण सतरा आचारी एकत्र आले की, स्वयंपाकाची नासाडी तर होणारच. तशी अवस्था समाजवाद्यांची झाली. १९७७ नंतर कॉंग्रेसला धक्का देऊ शकतो हे सर्वच विरोधकांना समजलं होतं. पण त्यांच्या गुणांपेक्षा कॉंग्रेसच्या चुकांनी ते सत्तेवर आले होते. इंदिरा गांधी या शेवटच्या कॉंग्रेस नेत्या ठरल्या की ज्यांना जनसमुदायात देशभर स्थान होतं. इतकंच नव्हे तर, त्यांच्या मृत्यूनंही कॉंग्रेसला तारलं होतं. राजीव गांधी लोकनेते नव्हते तर 'सज्जन राजपुत्र' म्हणून त्यांना मान मिळाला. त्यांनाही कॉंग्रेसचं नेतृत्व करता आलं नाही. ते राजकारणात स्थिरावयाच्या आतच घात झाला. तशी कॉंग्रेसची सद्दी इंदिरा गांधीनंतर संपली होती. राजीव गांधींना निर्माण झालेल्या तत्कालीन परिस्थितीनं प्रधानमंत्री बनविलं होतं. लोकमतांचा गठ्ठा त्यांना मिळाला होता. परंतु त्यांची चवही मतदारांनी चाखली होती. इंदिरा पुत्र म्हणूनच त्यांची ओळख होती. कॉंग्रेसला ओहोटी याच काळात लागली होती. जहाज बुडणार तेवढ्यात राजीव गांधींची हत्त्या कामी आली. त्यानंतरची काँग्रेसची परिस्थिती आपण पाहतो आहेच. 'भाकरी का करपली?' याचं उत्तर बिरबलानं पाचशे वर्षांपूर्वी दिलं होतं. ६०-७० वर्षाचा काळ उलटलाय, नेहरू-गांधींचा महिमा नव्या पिढीवर आता तेवढा राहिलेला नाही त्यामुळं काँग्रेसनं आता पुन्हा नव्यानं सुरुवात करायला हवीय. त्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. नेतेमंडळी गांधी घराण्यालाच कवटाळून बसलेत.

देशाची राजकीय प्रकृती ती नेहमीच तोळा मासा राहिलेली. आता तर सत्ताधारी लोकशाही तिरडीवर ठेवायच्या तयारीला लागलेत असं वाटावं अशी परिस्थिती निर्माण झालीय. या अवस्थांचं केंद्र दिल्ली राहिलेली आहे. पूर्वी डॉ. लोहियांनी दिल्लीला 'छैलछबेली, रंगरंगीली' असं म्हटलं होतं. अशा दिल्लीतल्या सत्ताधारी इंदिरा गांधी यांनी विरोधकांना देशद्रोही म्हणत असत आणि बिगर राजकीय आंदोलन असेल तर यामध्ये विदेशीशक्तीचा हात होता असं म्हणत असत. अशाच प्रकारच्या आंदोलनांना प्रधानमंत्री बनलेल्या अटलबिहारी वाजपेयींनी देशातलं वातावरण 'हुकूमशाहीकडं आगेकूच' असल्याचं म्हटलं होतं. आता दररोज वाजपेयींच्या तसबिरीपुढं झुकून नमस्कार करणारे मंत्री कसे वागताहेत हे दिसतंय. सगळे राजकारणी चहाटळ आणि हरामखोर असतात. त्यांना सर्वच घटनात्मक संस्था दावणीला बांधायच्या असतात. १९७५ साली जे आणीबाणीत भोगलं त्याची आता याद कॉंग्रेसवाल्यांनाही नको आहे. इतका भयानक अपमान लोकशाहीचा इंदिरा गांधींनी केला होता. १९७५ सालची भयानक आणीबाणी राजकीय होती. सामाजिक नव्हती. त्यामुळं राजकारण्यांमध्ये लाथाळ्या होत होत्या. मात्र आजची परिस्थिती राजकीय कमी आणि समाजासमाजामध्ये फूट पाडणारी अधिक आहे. जेव्हा एखादा समाज दुभंगला जाऊन त्याच्यात मानसिक फाळणी होती, तेव्हा एकाच सीमेच्या आत अनेक देश तयार होतात. त्याची झळ देशानं १९४७ साली सोसलीय आणि त्याची फळं आपण अजून भोगतोय. पण आज शांतता राखायला इथं गांधीजी नाहीत. शासनात पंडित नेहरू नाहीत आणि विरोधकांत जयप्रकाश नाहीत. आता समाज पुरुषानंच गांधी बनावं, नेहरु व्हावं आणि लोकनायकत्व स्विकारावं!
हरीश केंची
९४२३१०६०९




No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...