Saturday, 5 March 2022

आजही चरणसिंगाचं आव्हान कायम


केंद्रातील सत्तेचं दार उत्तरप्रदेशच्या निवडणूकीच्या माध्यमातून उघडलं जातं, असं म्हटलं जातं. ते खरंही आहे. म्हणूनच प्रधानमंत्री आणि त्यांचं अख्ख मंत्रिमंडळ तिथं प्रचारात दंग आहे. पंजाबमध्ये आपल्या जीवाला धोका आहे असं म्हणणाऱ्या प्रधानमंत्र्यांना वाराणशीत तब्बल साडेचार तास रोड शो केला. तिकडे युक्रेनवर रशिया हल्ले करतोय, हजारो भारतीय विद्यार्थी तिथं अडकलेत. पण आम्ही मात्र सत्तेसाठी झगडतोय. 'रोम जळतोय अन निरो फिडेल वाजवतोय!' याची प्रचिती यावी अशाप्रकारे प्रधानमंत्री मंदिरात डमरू वाजविण्याचा आनंद घेताहेत. उत्तरप्रदेशातल्या निवडणुका या सर्व राज्यकर्त्यांच्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत. भाजपला इथं अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांचं आव्हान उभं ठाकलंय. उच्चशिक्षित जयंत चौधरी हे चरणसिंग यांचे नातू आहेत. याच चरणसिंग यांनी उत्तरप्रदेशातलं काँग्रेसचं पहिल्यांदा अस्तित्व संपवलं होतं, पक्षाचं वर्चस्व मोडीत काढलं होतं, हा इतिहास आहे. त्याचा हा धांडोळा!
--------------------------------------------------

ही गोष्ट त्या काळातली आहे, जेव्हा उत्तरप्रदेशात काँग्रेसचाच बोलबाला होता आणि गोविंद वल्लभ पंत हे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होते. उत्तरप्रदेशच्या राजकारणाला त्यांच्यामुळं स्थैर्य मिळायचं. पण ते केंद्रात गृहमंत्रीपद स्वीकारून दिल्लीत गेले त्यानंतर राज्यात काँग्रेसची शक्ती कमी व्हायला सुरुवात झाली. पंत यांच्यावर नेहरू एवढे अवलंबून होते की, उत्तरप्रदेशात पंत यांना आव्हान निर्माण होऊ नये म्हणून त्यांचे अत्यंत जवळचे रफी अहमद किडवाई यांना त्यांनी दिल्लीत नेलं होतं. चरणसिंह हे गोविंद वल्लभ पंत यांना प्रचंड मानणारे होते. पंत यांना वाईट वाटेल असं काहीही ते करत नव्हते. पंत दिल्लीला जाईपर्यंत चरणसिंह यांनी अशी राजकीय भूमिका घेतली नव्हती ज्या भूमिकेसाठी ते आज सगळीकडे ओळखले जातात. उत्तरप्रदेशच्या सत्तेच्या उठाठेवीत चंद्रभानू गुप्ता चरण सिंह यांच्यापेक्षा डोईजड ठरत होते आणि काँग्रेसमध्ये चरणसिंह यांच्या तुलनेत गुप्ता यांच्या समर्थकांची संख्या खूप जास्त होती. "नंतर चरणसिंह यांच्यावर संधीसाधूपणाचे जे आरोप लागले ते उत्तर प्रदेशच्या राजकारणात टिकण्यासाठी एकप्रकारे त्यांच्यासाठी गरजेचं बनलं होतं! असं चरणसिंह यांची आत्मकथा लिहिणारे पॉल ब्रास यांनी त्यांच्या 'अॅन इंडियन पॉलिटिकल लाईफ, चरणसिंह अँड काँग्रेस पॉलिटिक्स' यात मध्ये लिहिलं आहे. भारताच्या राजकीय इतिहासात चौथ्या सार्वत्रिक निवडणुकांनी चांगलीच खळबळ माजवली होती. तिथूनच काँग्रेसचं पतन आणि त्यांना पर्याय म्हणून सशक्त पण विभागलेल्या विरोधकांचा उदय व्हायला सुरुवात झाली होती. या निवडणुकीत प्रथमच काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळण्यात अपयश आलं होतं. ४२३ सदस्यांच्या उत्तरप्रदेश विधानसभेत १९८ जागांसह ते सर्वात मोठा पक्ष बनले होते, मात्र मुख्यमंत्री सी.बी.गुप्ता यांना विजय मिळवताना अक्षरशः नाकी नऊ आले होते. अवघ्या ७३ मतांनी त्यांचा विजय झाला होता. दुसरा सर्वांत मोठा पक्ष जनसंघाकडे काँग्रेसच्या तुलनेत अत्यंत कमी ९७ जागा होत्या, त्यामुळं काँग्रेसनं ३७ अपक्ष आणि इतर लहान पक्षांच्या साथीनं कसंबसं सरकार स्थापन केलं होतं, पण त्यावर पहिल्या दिवसापासून प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले होते. विजयी झालेल्या ३७ अपक्षांमध्ये १७ काँग्रेसचे होते, त्यामुळंही काँग्रसेला फायदा झाला होता. याच वातावरणात चरणसिंह यांनी नेता पदासाठी सीबी गुप्ता यांना आव्हान देण्याचा निर्णय घेतला होता. पण केंद्रानं हस्तक्षेप करत चरणसिंह यांना माघार घेण्यासाठी राजी केलं होतं. त्यामुळं सी.बी.गुप्ता बिनविरोध काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडून आले होते. पण जेव्हा मंत्रिमंडळ स्थापन करण्याचा विषय समोर आला तेव्हा चरणसिंह यांनी सी.बी.गुप्ता यांच्याकडे त्यांच्या काही समर्थकांऐवजी स्वतःच्या काही समर्थकांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याची मागणी केली. 'चरणसिंह यांची अशी इच्छा होती की, सी.बी. गुप्ता यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात राम मूर्ती, मुजफ्फर हुसेन, सीताराम आणि बनारसीदास यांना समाविष्ट करू नये, पण गुप्ता यांनी त्यांचं ऐकलं नाही. "उदित नारायण शर्मा आणि जयराम वर्मा हे चरण सिंह यांचे अत्यंत निकटवर्तीय होते, त्याचा मंत्रिमंडळात समावेश करावा अशी त्यांची इच्छा होती. पण गुप्ता यांनी तेही मान्य केलं नाही!' असं सुभाष कश्यप यांनी त्यांच्या 'द पॉलिटिक्स ऑफ डिफेक्शन:अ स्टडी ऑफ स्टेट पॉलिटिक्स इन इंडिया' मध्ये म्हटलं आहे.

'मी २६ मार्चला होळीच्या दिवशी चरणसिंह यांना भेटायला गेलो होतो. पण ते अशा लोकांबरोबरच होते, ज्यांना त्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करायचं होतं. त्यावेळी त्यांच्याशी बोलणं शक्य नव्हतं. त्यामुळं मी परत गेलो. मी त्यांना म्हटलं की, आपण २ एप्रिलला बोलू या. पण त्याच्या एक दिवस आधी १ एप्रिललाच चरणसिंह यांनी पक्ष सोडला. हे मला समजलं!' असं नंतर चंद्रभानू गुप्ता यांनी त्यांचं आत्मचरित्र 'ऑटोबायोग्राफी: माय ट्रायफ्स अँड ट्रॅजिडीज' मध्ये लिहिलं होतं. 'मी चरणसिंह यांच्या सल्ल्यानं जयराम वर्मा यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी तयारही झालो होतो. त्याशिवाय सीताराम यांच्याशिवाय चरणसिंहांच्या विरोधकांना मंत्रिमंडळात समाविष्ट न करण्याच्या मुद्द्यावरही राजी झालो होतो. पण तरीही काही फायदा झाला नाही. चरणसिंह यांना मी त्यांना एकटं पाडत असल्याची भीती होती!' असं त्यांनी लिहिलंय. तोपर्यंत चंद्रभानू गुप्ता यांच्याकडेही पूर्ण बहुमत नव्हतं आणि संयुक्त विधायक दलचे नेते रामचंद्र विकल यांच्याकडेही बहुमत नव्हतं. तरीही राज्यपाल गोपाल रेड्डी यांनी गुप्ता यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं. चरण सिंह यांनी गुप्ता यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आणि बिगर काँग्रेसी पक्षांबरोबर चर्चा सुरू केली. ३ एप्रिलला त्यांनी संयुक्त विधायक दलाचे नेते म्हणून निवडण्यात आलं. या आघाडीचे नेते चरणसिंह असले तरी यातील सर्वाधिक ९८ सदस्य जनसंघाचे होते. ते या आघाडीतील दुसरा घटक पक्ष सोशलिस्ट पार्टीपेक्षा दुपटीपेक्षा अधिक होते. त्यांच्या सदस्यांची संख्या चरणसिंह यांच्या पाठिशी असलेल्या आमदारांच्या संख्येपेक्षा पाचपटीनं अधिक होती!' असं सुभाष कश्यप यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे. 'चरणसिंह यांना या आघाडीचे नेते बनवलं होतं. भारतीय जनसंघाचे रामप्रकाश उपमुख्यमंत्री होते. तर दुसऱ्या मोठ्या पक्षाला महत्त्वाचं अर्थ खातं दिलं होतं!' असं त्यांनी लिहिलं आहे. चरणसिंह यांना काँग्रेसमधून फोडण्यात राजनारायण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, असं म्हणतात. ते अनेकदा दिल्लीहून लखनऊला गेले. चरणसिंह यांच्यावर काँग्रेसमधून राजीनामा न देण्यासाठी बनारसीदास सारख्या अनेक नेत्यांचा दबाव होता, पण राजनारायण यांनी त्यांना राजी केलं. संयुक्त विधायक दल आघाडीचं सरकार हा भारतीय राजकारणातला अनोखा प्रयत्न होता. त्यात कट्टर डाव्यांपासून कट्टर उजव्या अशा नेत्यांचा समावेश होता. पॉल ए ब्रास त्यांच्या पुस्तकात सांगतात, 'स्वतंत्र पार्टी पूर्णपणे उजव्या विचारसरणीचा पक्ष होता. त्यांचे १३ पैकी ५ आमदार रामपूरमधून विजयी झाले होते. त्यांचे नेते अख्तरअली यांना अबकारी आणि वक्फ प्रकरणांमध्ये मंत्री बनवण्यात आलं होतं!' ते संयुक्त विधायक दल सरकारच्या मंत्रिमंडळातील एकमेव मुस्लीम मंत्री होते. या निवडणुकीत प्रथमच काँग्रेसला मुस्लिमांनी साथ दिली नाही, असं त्यांनींच मला सांगितलं होतं. 'विरोधकांच्या तुलनेत तेव्हाही काँग्रेसमध्ये मुस्लिमांची संख्या अधिक होती, पण ही काँग्रेसपासून मुस्लीम दुरावण्याची सुरुवात होती. कारण आधी काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये जवळपास आपोआत पाठिंबा मिळत होता!' असं पॉल ए ब्रास यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.

संयुक्त विधायक दल सरकारला पहिलं आव्हान हे चंद्रभानू गुप्ता यांच्या नेतृत्वात काँग्रेसने त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला तेव्हा मिळालं. पण हा प्रस्ताव अपयशी ठरला. सरकारच्या बाजूनं २२० आणि विरोधात २०० मतं पडली होती. पण सुरुवातीपासूनच या आघाडीत फूट पडू लागली होती. जनसंघ सर्वांत मोठा घटकपक्ष होता म्हणून चरणसिंह यांनी त्यांना शिक्षण, स्थानिक प्रशासन आणि सहकार हे तीन विभाग दिली होते. नंतर चरणसिंह यांनी ही खाती घेऊन त्यांना सार्वजनिक कार्य आणि पशुपालन खाते दिले. साहजिकच जनसंघाला हे आवडलं नाही. माकपनं सरकारी कर्मचाऱ्यांच्या कपातीवर सर्वात आधी सरकारला विरोध केला. संयुक्त सोशालिस्ट पार्टीने इंग्रजी हटवण्यासाठी आंदोलन सुरू केलं तेव्हा चरणसिंह यांच्याशी त्यांचे तीव्र मतभेद झाले. हे मतभेद एवढे वाढले की, दोन कॅबिनेट मंत्र्यांनी इंग्रजी हटवण्याच्या मुद्द्यावर अटक करून घेत, सरकारची खुलेआम बदनामी केली. ५ जानेवारी, १९६८ ला एसएसपीनं देखील संयुक्त विधायक दल सरकारमधून बाहेर पडायचं ठरवलं. 'एसएसपीच्या मंत्र्यांनी राजीनामे आपल्याकडे न देता राज्यपालांकडे दिले यावर चरण सिंह यांनी आक्षेप घेतला!' असं कृष्णनाथ शर्मा यांनी त्यांच्या 'संविद गव्हर्नमेंट इन उत्तरप्रदेश' यात लिहिलं आहे. चरणसिंह यांच्या मार्गातील सर्वांत मोठा काटा होते, संयुक्त सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष अर्जुनसिंह भदोरिया. भदोरिया प्रजा सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष होते आणि कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते तरीही एसएसपी पक्ष त्यांच्या मागे असायचा. "विधानसभेत एसएसपीचे नेते आणि आघाडी सरकारच्या समन्वय समितीचे सरचिटणीस उग्रसेन यांनी त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निर्देशांचं पालन करत राजीनामा दिला आणि एसएसपीच्या सर्व सदस्यांना संयुक्त विधायक दलमधील सर्व पक्षांना बाहेर पडण्यास सांगितलं!' असं कृष्णनाथ यांनी लिहिलं आहे. १८ फेब्रुवारी १९६८ ला चरणसिंह यांनी राज्यपालांना राजीनामा देत विधानसभा बरखास्त करून नव्यानं निवडणुका घेण्याची शिफारस केली. राज्यपालांनी त्यांची शिफारस मान्य केली नाही आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. तसं पाहता चरणसिंह यांचं सरकार केवळ काही महिने चाललं. मात्र त्यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले आणि नंतर मुख्यमंत्री बनलेले रामप्रकाश यांनी म्हटलं की, 'चौधरी चरणसिंह चांगले प्रशासक आहेत. पण ते प्रशासनात राजकीय विचारांची पर्वा करत नाही, त्यामुळं कधी कधी अडचणी येतात. 'चरणसिंह यांच्या मंत्रिमंडळातील प्रजा सोशलिस्ट पार्टीचे एकमेव प्रतापसिंह यांनीही चरणसिंह यांचं कौतुक करत म्हटलं होतं की, चरणसिंह हे एक महान नेते होते. त्यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकत नव्हते!' दुसरीकडे काँग्रेस नेते नवलकिशोर होते. त्यांनी चरणसिंह यांच्यावर जातीवादी असल्याचा आरोप केला. चरणसिंह यांना हे एवढं जिव्हारी लागलं की, त्यांनी ही मुलाखत छापणारं वृत्तपत्र नॅशनल हेराल्ड विरोधात कायदेशीर कारवाईची धमकी दिली.

चरणसिंह आणि इंदिरा गांधी यांच्यातील दुराव्याची सुरुवात इथूनच झाली. चरणसिंह यांनी इंदिरा गांधींना पत्र लिहिलं. 'या निवडणुकीत काँग्रेसला केवळ १९८ जागा मिळाल्या. तर विरोधकांना २२७ जागांवर विजय मिळाला आहे. मी लगेचच विरोधी पक्षांबरोबर गेलो असतो तर हा आकडा २७५ च्या पुढं गेला असता. पण मी तसं केलं नाही! त्यामुळं चंद्रभानू गुप्ता यांच्या विरोधात विधिमंडळ नेता म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पण तुमच्या संदेशवाहकांनी मला तसं करण्यापासून अडवलं तर मी माझं नाव मागे घेतलं. एवढंच नाही तर मीच नेतेपदासाठी चंद्रभानू गुप्ता यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला!' असं त्यांनी पत्रात लिहिलं. एवढंच नाही तर त्यांनी इंदिरा गांधींना आणखी एक पत्र लिहिलं. त्यात त्यांनी लिहिलं की, "ते जेव्हा आघाडी सरकारचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी केवळ इंदिरा गांधीच्या विरोधातील आंदोलन मोडून काढलं नाही तर त्यांचे सहकारी राज नारायण आणि इतरांना अटक करून तुरुंगातही पाठवलं. 'मात्र, इंदिरा गांधी आणि चरणसिंह यांच्यातील हा दुरावा कमी होऊ शकला नाही. चरणसिंह केंद्रात गृहमंत्री बनले तेव्हा त्यांनी इंदिरा गांधींना अटक करून तुरुंगात टाकलं. 'मोरारजी देसाईंच्या विरोधातील मोहिमेत इंदिरा गांधींनी आधी त्यांना साथ दिली. पण काही दिवसांतच ते पंतप्रधान बनले त्यानंतर काही दिवसांत त्यांनी सरकारचा पाठिंबा मागे घेतला!'
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...