Saturday, 26 March 2022

गांधी परिवारानं आता पायउतार व्हावं...!

"केवळ काँग्रेसच्याच नव्हे तर भारतीय लोकशाहीच्या हितासाठी गांधी परिवारानं आता पक्षनेतृत्वावरून पायउतार व्हावं. किंबहुना त्यांनी राजकारणातूनच निवृत्ती घ्यावी. निवडणुकांतून काँग्रेसला ताकद उभं करण्याची क्षमता सोनिया, राहुल वा प्रियांका यांच्याकडं नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यांचं काँग्रेसमध्ये असणं हे भाजपला सहाय्यभूत ठरतंय, सरकारच्या अपयशांपासून लक्ष विचलित करणं शक्य होतंय. संरक्षणविषयक भ्रष्टाचारांना उत्तर देताना राजीव गांधी-बोफोर्सचे दाखले दिले जातात. ‘माध्यमांवर दडपशाही सुरू आहे आणि कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबलं जातंय,’ अशा आरोपाला इंदिरा गांधी-आणीबाणीचे दाखले दिले जातात. ‘चिनी सैन्यानं भारतीय भूमी काबीज केलीय, सैनिक मारले गेले आहेत,’ यावर नेहरू आणि १९६२ च्या युद्धाचे दाखले दिले जातात. अशी आणखीही उदाहरणं आहेत. हे थांबवायचं वाटत असेल तर गांधी परिवारानं राजकारणातून पायउतार व्हावं, हेच श्रेयस्कर आहे!"
---------------------------------------------------

१९६७ पासून काँग्रेसपक्षाचा सातत्यानं ऱ्हास होतोय, जी प्रक्रिया थांबवणं गांधी कुटुंबातल्या कुणाही नेत्याला शक्य झालेलं नाही. काँग्रेसची देशाला आवश्यकता आहे की नाही, किंवा काँग्रेस संपायला हवी की नाही हे वादाचे मुद्दे असू शकतात. मात्र, काँग्रेसच्या ऱ्हासातले सातत्य कुणी नाकारू शकत नाही. ज्यांना काँग्रेस संपावी असं वाटतं, त्यांनी फार काही करायची गरज नाही, कारण काँग्रेसचा प्रवास त्याच दिशेनं सुरू झालाय. ज्यांना काँग्रेस संपू नये असं वाटतं त्यांनी मात्र काँग्रेस राज्या-राज्यांत पुन्हा कशी रुजेल याची सविस्तर चर्चा आणि विस्तारीत कृती करण्याची आवश्यकता आहे. दिवसेंदिवस पक्षनिष्ठा दुर्मिळ होत चाललीय. काँग्रेसनं आपले कार्यकर्ते आणि नेते विचारसरणीच्या दृष्टीनं घडवलेलेच नाहीत. आज काँग्रेसची स्थिती तर निर्नायकी आहे. त्याला नायकच नाहीये. काँग्रेसमध्ये पक्षावर नितांत प्रेम करणारे आणि आणि तळमळीनं काम करणारे असंख्य कार्यकर्ते, नेते आहेत. करोडो तरुण नायकाच्या प्रतीक्षेत आहेत. काँग्रेसच्या मूलभूत विचारांना आधुनिक काळातल्या विचारांची जोड देऊन आणि केवळ नकारात्मक राजकारण न करता, सतत दिवसरात्र मोदी-शहांना शिव्या देत न बसता, काँग्रेसनं पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. या देशाला काँग्रेस विचारांची गरज आहे. पण सत्तेच्या आधाराविना जनतेसाठी काम करण्याची सवय काँग्रेसनं लावून घेतली, तरच त्याला भवितव्य आहे. जनाधार संपलेल्या आणि शरपंजरी अवस्थेतील काँग्रेसमध्ये संजीवनी आणायची असेल, गतवैभव प्राप्त करायचं असेल तर एखाद्या नव्या दमाच्या, जोमाच्या आणि जनाधार असलेल्या तरुणाकडं नेतृत्व द्यायला हवंय पण तसं होताना दिसत नाही. पक्षाच्या सार्वत्रिक ऱ्हासाचं सखोल विश्लेषण करून त्यावर उपाय योजना केली तरच पक्षाचं अस्तित्व राहील. अन्यथा शरपंजरी अवस्थेतच राहायला लागेल! देशात सर्वत्र पीछेहाट होत असताना, काँग्रेसी नेत्यांचं, काँग्रेसच्या कार्यकर्तृत्वाची टवाळी केली जात असताना मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत नाही. काँग्रेसनं रचलेला आधुनिक भारताचा पाया, आपल्या ध्येयधोरणांनी, निर्णयांनी देशाला दिलेला आकार या नव्यापिढीपुढं आणला जात नाही. काँग्रेसजनांमध्ये हतोत्साह आहे. पक्षाच्या नेत्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती नव्यापिढीपुढं ठेवण्याची गरज असताना मात्र काँग्रेस नेतृत्व भलत्याच गोष्टीत रममाण झालेलं दिसतंय. मूल्याधिष्ठित राजकारणाची कास धरण्याऐवजी खोट्या, फसव्या आणि तत्वहीन राजकारणातच गडबडा लोळताना दिसतेय. आपल्याकडं असलेल्या खणखणीत नाण्यासारख्या नेतृत्वाकडं डोळेझाक करीत इतरेजनांसारखं बागडताहेत याचं शल्य जुन्या जाणत्या काँग्रेसी मंडळींना वाटतंय. पण त्यांच्या मौलिक सल्ल्याकडं दुर्लक्ष केलं जातंय. पक्षाचा उज्ज्वल कार्यकाळ लोकांसमोर आणण्याची कधी नव्हे इतकी आज गरज निर्माण झालीय! सत्तेच्या, मतांच्या आणि संख्येच्या राजकारणात काँग्रेस पक्ष हा कमकुवत बनलाय हे जरी खरं असलं तरी जनतेच्या मनांत अजूनही एक हळवा कोपरा त्यांच्यासाठी शिल्लक आहे. त्याला पक्ष साद घालताना दिसत नाही. पक्षाला स्वकर्तृत्वाची ओळखच राहिलेली नाही. त्यामुळं त्यांचं वैभवशाली कार्य झाकोळलं गेलंय, त्यात भाजपनं त्यांची बदनामी विद्वेषाच्या माध्यमातून चालविलीय. ती रोखण्याची इच्छाशक्ती दिसत नाही.

गांधी कुटुंबियांचं काँग्रेसच्या आसपास असणं हे भाजपसाठी वरदानच ठरलंय. एका बाजूला, गांधी कुटुंबीयांकडून निवडणुकीत कोणतंही आव्हान उभं राहण्याची शक्यता दिसत नाही. दुसऱ्या बाजूला, गांधी कुटुंबीयांमुळं वर्तमानातल्या प्रश्नांपेक्षा भूतकाळातले राजकीय वाद वापरायची सोय भाजपला सहजपणे उपलब्ध होतेय. एकीकडं भारतातल्या सरंजामशाहीचा दिवसेंदिवस ऱ्हास होत असताना, देशातल्या सर्वांत दैदिप्यमान भूतकाळ असणाऱ्या काँग्रेसची धुरा मात्र एकाच घराण्यातल्या पाचव्या पिढीकडं असणं, ही मोठीच समस्या आहे. सध्याच्या या पिढीला काहीच न करता हे स्थान मिळालंय. त्यात भर म्हणजे त्यांच्याकडं वैकल्पिक राजकीय बुद्धिमत्तेचाही अभाव आहे, त्यामुळं मूळची गंभीर समस्या काँग्रेसला पूर्णत: दुबळं करणारी ठरतेय. प्रत्येक निवडणूक ही राजकीय पक्षाचं मूल्यमापन करणारी असते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकींच्या निकालांसंदर्भातलं बरंचसं भाष्य अनिवार्यपणे विजेत्यांवर म्हणजेच भाजपवर केंद्रित असायला हवंय, पण आपण प्रमुख पराभूतांवर म्हणजेच काँग्रेसवर लक्ष केंद्रित करत आहोत. एका बाजूला, उत्तरप्रदेशात आदित्यनाथ आणि भाजप सहजपणे पुन्हा निवडून आलेत, आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं लक्षणीय विजय मिळवलाय; तर दुसऱ्या बाजूला, काँग्रेसचा स्थिरगतीनं, धर्मनिरपेक्षतेसंदर्भात बहुधा कधीच भरून काढता येणार नाही असा ऱ्हास होत असल्याचं या निकालाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. उत्तरप्रदेशातून लोकसभेत ८० खासदार या राज्यातून जातात. आजचा उत्तरप्रदेश स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसप्रणित स्वातंत्र्य चळवळीचं प्रमुख केंद्र होतं. स्वातंत्र्यानंतर एखादा अपवाद वगळता भारताचे सारे प्रधानमंत्री याच राज्यातून निवडून आले आहेत. पण १९६० च्या दशकाअखेरीपासून उत्तरप्रदेशातल्या राजकारणावरची काँग्रेसची पकड दुबळी पडू लागलीय, १९८० च्या दशकापासून काँग्रेस हा या राज्यातला एक परिघावरचा घटक होऊन गेला.

गांधी परिवारातलं राजकारणात प्रवेश करणारं सर्वांत अलीकडचं व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रियांका गांधी. उत्तरप्रदेशात काँग्रेसचं भवितव्य नव्यानं घडवण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यांवर घेतली होती. प्रसिद्धीमाध्यमं आणि समाजमाध्यमानं या दौऱ्यांना उत्साहानं प्रसिद्धी दिली. प्रियांकांनी उत्तरप्रदेशला भेट दिल्यावर त्यांची प्रत्येक पत्रकार परिषद, प्रत्येक घोषणा उत्तरप्रदेशातल्या काँग्रेसच्या निवडणुकीय पुनरुत्थानाचेच जणू संकेत देणारे आहेत, अशा पद्धतीनं वार्तांकन केलं. अखेर प्रियांकांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला राज्यात केवळ दोन टक्के मतं मिळालीत आणि गेल्यावेळपेक्षाही कमी जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी झालेत. उत्तरप्रदेशात प्रियांकांचा काहीच प्रभाव पडला नसला, तरी किमान त्यांनी प्रयत्न केल्याबद्धल थोडं तरी श्रेय त्यांना देता येईल. पण पंजाबमध्ये तर काँग्रेस सत्तेवर होती; तिथं निवडणुकांना अगदी वर्षापेक्षाही कमी काळ उरलेला असताना राहुल गांधी यांनी लहरीपणे मुख्यमंत्री बदलला आणि पक्ष पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता स्वतःच धुळीला मिळवल्या. अमरिंदरसिंग काँग्रेसच्याच काही आमदारांना पसंत नसले, तरी राजकारणातला त्यांचा अनुभव दांडगा होता, आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी शेतकरी आंदोलनाच्या बाजूनं ठाम भूमिका घेतली होती. वर्षभरापूर्वी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांना पंजाबमध्ये विजयाची समसमान संधी होती. पण अमरिंदर यांच्या जागी तुलनेनं अनोळखी चरणजीतसिंग चन्नी यांची नेमण्यात आलं. त्यात भर म्हणजे राहुल गांधींनी विध्वंसक वृत्तीच्या नवज्योतसिंग सिद्धूचे लाड पुरवले, त्यामुळं चन्नी यांचं अप्रत्यक्ष अवमूल्यन झालं. यामुळं पंजाब काँग्रेसची संघटना अस्ताव्यस्त झाली. अखेर राज्यात आम आदमी पक्षानं काँग्रेसचा पूर्ण पराभव केला. गोवा आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांत भाजप सत्तेत होता, पण त्यांची सरकारं लोकप्रियता गमावून बसलेली होती; ही सरकारं भ्रष्ट आणि भावनाशून्य आहेत, अशी प्रतिमा निर्माण झाली होती. उत्तराखंडमध्ये लोकक्षोभ शमवण्यासाठी भाजपनं दोन मुख्यमंत्री बदलले. दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस हा मुख्य विरोधीपक्ष होता, पण दोन्ही ठिकाणी सत्ता परत मिळवण्यासाठी पुरेसं समर्थ आव्हान उभं करणं काँग्रेसला शक्य झालं नाही. तिसरं राज्य होतं मणिपूर. इथं एकेकाळी काँग्रेस हाच नैसर्गिक सत्ताधारी मानला जात होता, पण तिथं सुद्धा पक्षाला २० जागा कमी मिळाल्याचं दिसलं.

सध्याच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रीय राजकारणात प्रमुख दावेदार म्हणून पुन्हा येण्याची शक्यता नाही. २०१९ च्या निवडणुकांत राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला, तेव्हा त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मग त्यांची आई सोनिया गांधी या पक्षाच्या ‘हंगामी’ अध्यक्ष झाल्या. या घडामोडीला तीन वर्षे उलटल्यावरही पक्षाला अध्यक्ष निवडता आलेला नाही. त्यामुळं काँग्रेस गांधी घराण्याच्याच नियंत्रणात राहिला; याचे परिणाम आपल्या समोर आहेत. आठ वर्षांपासून सत्तेत असलेल्या मोदी सरकारनं अनेक बाबतीत बढाया मारल्यात आणि अनेक आश्वासनं दिल्यात. पण वस्तुनिष्ठ निकषांनुसार विचार केला, तर सरकारची कामगिरी असमाधानकारक आहे. या काळात विकासदर खालावलाय, बेरोजगारी प्रचंड वाढलीय; या सरकारनं हिंदू विरुद्ध मुस्लीम असं निर्घृण द्वंद्व उभं केलं; शेजारच्या देशांसंदर्भात आणि जागतिक पटलावर भारताचं स्थान घसरण्याला कारणीभूत ठरलं; याच सरकारनं आपल्या अत्यंत महत्त्वाच्या संस्था भ्रष्ट केल्या, खराब केल्या; नैसर्गिक पर्यावरणाचा विध्वंस केला. थोडक्यात, मोदी सरकारच्या कृत्यांमुळं भारताचं आर्थिक, सामाजिक, संस्थात्मक, नैतिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठं नुकसान झालंय. काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत असलेली अनिश्चितता आणि पक्षांतर्गत मतभेदांमुळं पक्ष कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला असून काँग्रेस पक्ष कमजोर झाला आहे, त्यामुळे पक्षात अमूलाग्र बदल करण्याची मागणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पत्र लिहून केली होती. २०१४ आणि २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. वर्ष उलटून गेली असली तरी काँग्रेस पक्षात कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाहीत. त्यामुळं पक्षाला मरगळ आलेली आहे. यासाठी काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षात आमुलाग्र बदल करण्याची मागणी केली होती. यामध्ये ५ माजी मुख्यमंत्री, काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य, विद्यमान खासदार आणि काही माजी केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी पाठवण्यात आलेल्या या पत्रात भाजपची चांगली प्रगती झाल्याचं मान्य करत देशातील तरुण नरेंद्र मोदींकडं आकर्षित झाले आहेत हेसुद्धा मान्य करण्यात आलं होतं. काँग्रेसचा मूळ आधार असलेल्या वर्गानं फिरवलेली पाठ आणि तरुणांचा अविश्वास यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह राहिलेला नाही. या पत्रात त्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष जो पूर्णपणे सक्रीय असेल आणि लोकांना दिसत राहील अशी मागणी केली. पक्षाचा पुनरुद्धार करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची निवडणूक, संस्थात्मक नेतृत्व यंत्रणा तातडीनं विकसित करण्याची गरज या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. या पत्रावर राज्यसभेतील विरोक्षी पक्षनेते गुलाम नबी आझाद, शशी थरुर, कपिल सिब्बल, मनिष तिवारी, महाराष्ट्रातले पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा यांच्यासह २३ नेत्यांच्या सह्या होत्या. जेव्हा देशासमोर स्वातंत्र्यानंतरचं सगळ्यात राजकीय, सामाजिक, आर्थिक संकट उभं असताना पक्षाचा ऱ्हास होतोय, अशी खंत या पत्रात या नेत्यांनी व्यक्त केली आहे. या पत्रात पक्षात आमूलाग्र बदलांची मागणी करत सत्तेचं विक्रेंदीकरण, राज्याच्या पातळीवर संघटना मजबूत करणं, स्थानिक पातळीपासून ते काँग्रेस कार्यकारिणीपर्यंत पक्षात सर्व पातळ्यांवर निवडणुका घेऊन यंत्रणा विकसित केली पाहिजे आणि संसदीय मंडळ तयार करण्याची मागणी करण्यात आली होती.

शिवसेना, तृणमूल काँग्रेस, बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, तेलंगण राष्ट्र समिती, द्रविड मुन्नेत्र कळघम, भारतीय कम्युनिस्ट पक्ष-मार्क्सवादी आणि आम आदमी पक्ष, यांसारखे पक्ष ज्या भागांमध्ये मुख्य विरोधक म्हणून उभे आहेत, तिथं ते भाजपला आव्हान देऊ शकतात. पण काँग्रेसला हे वातावरण खरोखरच शक्य उरलेलं नाही, याचा दाखला गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड इथल्या निकालांनी मिळालाय. गांधींच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसचं दुबळेपण खासकरून सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दिसून येतं. उदाहरणार्थ, २०१९ च्या निवडणुकांमध्ये ज्या १९१ जागांवर भाजप आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची झुंज होती त्यातल्या केवळ १६ जागा काँग्रेसला जिंकता आल्या. एकीकडं नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून प्रधानमंत्रीपदासाठी राहुल गांधींना पुढं केलं जात होतं, आणि त्या अवस्थेत काँग्रेसनं लढवलेल्या एकूण जागांपैकी आठ टक्क्यांहून कमी जागांवर विजय मिळवला. गांधींचं काँग्रेसच्या आसपास असणं हे भाजपसाठी वरदानच ठरलंय. एका बाजूला, गांधी कुटुंबीयांकडून भाजपसमोर निवडणुकीत कोणतंही परिणामकारक आव्हान उभं राहण्याची शक्यता नाही. दुसऱ्या बाजूला, गांधी कुटुंबीयांमुळं वर्तमानातल्या प्रश्नांपेक्षा गतकाळातले राजकीय वाद राष्ट्रीय पटलावर वापरायची सोय भाजपला उपलब्ध होते. एकीकडं भारतातल्या सरंजामशाहीचा दिवसेंदिवस ऱ्हास होत असताना, देशाल्या सर्वांत देदिप्यमान भूतकाळ असणाऱ्या राजकीय पक्षाची धुरा मात्र एकाच घराण्यातल्या पाचव्या पिढीकडं असणं, ही मोठीच समस्या आहे. या पिढीला काहीच न करता हे स्थान मिळालंय, आणि त्यात भर म्हणजे त्यांच्याकडे राजकीय बुद्धिमत्तेचाही अभाव आहे, त्यामुळं मूळची गंभीर समस्या काँग्रेसला पूर्णच दुबळं करणारी ठरते. हांजीहांजी करणाऱ्यांच्या वर्तुळात जगणाऱ्या गांधी कुटुंबीयांना एकविसाव्या शतकातले भारतीय प्रत्यक्षात कसा विचार करतायत याची फारशी समज नाही. काहींनी राहुलना ‘शिकवून सुधारणा होणार नाही अशी सुमार व्यक्ती’ असं संबोधलं होतं. हे वर्णन कठोर असलं, तरी तितकंच अचूक आहे. राहुल वारंवार त्यांच्या वडिलांचे, आजीचे आणि आजोबांचे दाखले देतात, यावरून वर्तमानातल्या राजकारणात त्यांचं असणं सुसंगत नाही हे लख्खपणे स्पष्ट होतं. गांधी कुटुंबीयांना याची जाणीव असेल वा नसेल, तरी प्रत्यक्षात ते एकाधिकारशाहीचे सक्रिय वाहक झालेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

काँग्रेसमुक्त विरुद्ध संघमुक्त...!

"भारतीय जनता पक्षाच्या अनपेक्षितरीत्या विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर २०२४ मधल्या केंद्रीय सत्तेचा मार्ग सोपा झालाय. असं प्रधानमंत्री मोदींनी म्हटलंय. मात्र या निकालानं विरोधी पक्षातल्या शिडातली हवा निघालीय. प्रधानमंत्रीपदाची स्वप्न पाहात बंगालच्या ममता बॅनर्जी आणि तेलंगणाचे के.चंद्रशेखर राव सुरू केलेल्या भाजपविरोधातल्या आघाडीला खीळ बसलाय. त्यातच केजरीवाल यांनी पंजाब जिंकून यात उडी घेतलीय. प्रादेशिक पक्षाच्या जोडीला राष्ट्रीय पक्ष म्हणून आव्हान देणारा काँग्रेसपक्ष भुईसपाट झालाय. त्यांच्यातली उमेदच संपलीय. मग अशावेळी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नरेंद्र मोदींना कसं आव्हान दिलं जाणार आहे? भाजपविरोधी आघाडी अस्तित्वात आली तरी त्याचं स्वरूप काय असेल? विरोधकांची आघाडी कशी होती आणि कशी होईल याचा घेतलेला हा धांडोळा!"
---------------------------------------------------

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी भारतीय जनता पक्षानं काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उधळलेला भाजपचा वारू लोकसमेत स्पष्ट बहुमत मिळवूनच थांबला. विरोधात राहून स्वप्नांचा सौदागर बनणं सोपं असतं. प्रत्यक्षात सत्तेत काम करण्याची वेळ येते. तेव्हा मात्र आधीचा सगळा जोष बोथट होऊन जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी किंवा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं पाहिल्यानंतर त्याची प्रचिती येते. केंद्रातल्या मोदी सरकारला जवळपास आठवर्षं आणि राज्यातल्या उद्धव ठाकरे सरकारला अडीच वर्ष झाली आहेत. दोन्हीकडच्या नेतृत्वाची सरकार चालवताना होणारी दमछाक लपून राहिलेली नाही. निवडणुकीआधीची आश्वासनं किंवा सत्ताधाऱ्यांवर केलेली टीका त्यांच्यावरच उलटू लागलीय. त्यातच संघ परिवारातल्या म्हणजे भाजपच्या बंधू किंवा भगिनी संघटनाच भाजपपुढची संकट वाढवत आहेत. त्यामुळं सरकार अधिकच अडचणीत येतय. एरव्ही सरकारला अडचणीत आणण्याचं काम विरोधी पक्ष किंवा संघटना करीत असतात. इथं मात्र उलटंच घडताना दिसतंय. सरकारच्या परिवारातल्या संघटना आणि त्यांचे नेतेच सरकारला अडचणीत आणत आहेत. त्यामुळं यांच्याकडं देश चालवायला देऊन चूक केली, अशी भावना सामान्य माणसांमध्ये वाढीस लागलीय.

एकूणच अवघ्या दोन वर्षांत केवळ सराफ व्यावसायिकांनाच नव्हे तर सगळ्याच घटकांना 'एकही भूल, कमल का फूल' म्हणण्याची पाळी आलीय. आणखी दोन वर्ष देश भाजपच्या ताब्यात राहाणार असून एवढ्या काळात ते देश आणि कुठं नेऊन ठेवतील, अशी भीती सजग लोकमनात निर्माण झालीय. या पार्श्वभूमीवर तेलंगणा, बंगालचे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 'संघमुक्त भारत' या घोषणेकडं पाहावं लागेल. भाजपनं दिलेल्या काँग्रेसमुक्त भारताच्या घोषणेला दिलेलं हे उत्तर आहे. परंतु त्या दिशेनं वाटचाल करण्यात अनेक अडथळे आहेत.'संघमुक्त भारतासाठी सर्व भाजप विरोधकांनी एकत्र यायला हवं. देशाची लोकशाही वाचवण्यासाठी हे करणं आवश्यक आहे,' असं आवाहन करून ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'भाजपचं तत्त्वज्ञान फुटीरतावादी असून त्यांच्या विरोधात उभं राहाणं, हाच लोकशाही वाचवण्याचा मार्ग आहे. त्यामुळं धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्रित यावं. आपण कोणत्याही पक्ष, व्यक्तीच्या विरोधात नाही. मात्र संघ आणि भाजपच्या फुटीरतावादी धोरणाला आपला विरोध आहे,' असं त्यांनी स्पष्ट केलं. लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या पक्षासाठी आयुष्य वेचलेल्या नेत्यांना भाजपनं आता पक्षातून जवळपास दूर केलंय. धर्मनिरपेक्षता आणि जातीय सलोखा यावर विश्वास नसलेल्या लोकांच्या हातात पक्षाची सूत्र गेली असल्याचंही ममता बॅनर्जी यांचं म्हणणं आहे. काँग्रेसगमुक्त भारताची घोषणा केल्यानंतर भाजपनं सातत्यानं उन्मादानं त्या घोषणेचा घोष केला. नव्या भारतासाठीचा मंत्र गवसल्याचाच जणू भाजपवाल्यांचा आविर्भाव होता. परंतु हीच घोषणा जेव्हा त्यांच्यावर म्हणजे त्यांच्या मातृसंघटनेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर उलटली, तेव्हा मात्र भाजपचा तिळपापड झाला. संघाच्या पाठिंब्यासाठी भाजपचे अनेक नेते मैदानात उतरले. संघाच्या विरोधात असलेल्या नेत्यांनी एक दिवस संघ शाखेवर यावं, म्हणजे गैरसमज दूर होतील, असा सल्ला भाजपनं दिलाय. महाराष्ट्राची पाच राज्यं करण्याचा क्रांतिकारी प्रस्ताव मांडणारे संघाचे माजी प्रवक्ते मा.गो. वैद्य यांनी मागे एकदा 'ममता बॅनर्जी यांच्यावरच हे प्रयत्न उलटतील. जेव्हा मोठा विरोध होतो, तेव्हा संघ वाढल्याचा इतिहास आहे,' अशी प्रतिक्रिया दिली होती. भाजपचे प्रवक्त्यांनी, 'भाजपविरोधी आघाडी निर्माण करण्याच्या प्रयत्नांना आम्ही घाबरत नाही. मोदी सरकारला देशाच्या विकासापासून रोखण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असं स्पष्ट केलं. 'ममता वा इतर कुण्या नेत्याच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी काम करण्यास तयार आहेत काय, याचं उत्तर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी द्यावं,' अशी मागणी करून भाजपनं काँग्रेसच्या गोटात संशयकल्लोळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसही त्या सापळ्यात अडकली आणि राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस हाच भाजपचा प्रमुख विरोधक असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसतर्फे देण्यात आलं होतं पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. भाजपच्या प्रवक्त्यानी विरोधकांना संघ समजून घेण्याचं आवाहन करताना म्हटलं की, संघाच्या लोकांबरोबर तुमच्यापैकी काहींनी दीर्घकाळ काम केलं आहे. मात्र आताच संघमुक्त भारत घोषणा कशी देता ? त्यापेक्षा संघ थोडा समजावून घ्या, मग तुमचे गैरसमज दूर होतील' विरोधकांपैकी अनेकांनी यापूर्वी काँग्रेसविरोधाचं राजकारण केलं. आता ते काँग्रेसबरोबर जात असल्याची टीकाही भाजपनं केलीय. या सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर भारताचं राजकारण कसं कसं बदलत गेलं, ते लक्षात येतं राममनोहर लोहिया यांनी काँग्रेसविरोधात सर्व विरोधी पक्षाच्या आघाडीची संकल्पना मांडली होती. १९७५ ते ७७ या आणीबाणीच्या काळात अशी आघाडी साकारलीसुद्धा होती. परंतु ती दीर्घकाळ टिकली नाही. त्यानंतरच्या काळातही तिसरा मोर्चा, जनमोर्चा किंवा अशाच तत्सम नावांनी अनेक आघाड्या उभ्या राहिल्या आणि कोलमडल्या. जनता परिवारसारख्या आघाड्या तर उभ्या राहाण्याच्या आधीच कोलमडल्या. गेली ३०-३५ वर्ष देशात आघाड्यांचं राजकारण चालत असलं, तरी बहुतेक सगळ्या आघाड्या निवडणुकोत्तर आहेत. निवडणूकपूर्व आघाड्याही झाल्या, परंतु त्या कायम टिकल्या नाहीत, प्रादेशिक पक्षांनी आपापल्या स्थानिक सोयीनुसार आघाड्या केल्या किंवा मोडल्या. त्यामुळं आघाड्यांचं राजकारण यशस्वी होत नाही, हा भारतातला अलीकडचा इतिहास आहे. नेत्यांचे अहंकार, हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे. मात्र महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने ज्याप्रकारे भाजपविरोधात आघाडी उभी केली, ते उदाहरण पाहाता भूमिकेवर आधारित आघाडीचं राजकारण आगामी काळात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ममता बॅनर्जी आणि के. चंद्रशेखर राव यांनी भाजपेतर पक्षांच्या आघाडीचं जे सूत्र मांडलं आहे, त्यात नवीन
काहीच नाही. खरं तर, लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली १९९० मध्ये रथयात्रा निघाली आणि ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतली बाबरी मशीद पाडली, त्या घटनेनंतर भारतीय राजकारणाने मोठी कलाटणी घेतली आहे. राममनोहर लोहियांनी मांडलेला बिगर काँग्रेसवादही बाबरी जमीनदोस्त झाला, तेव्हापासून धर्मनिरपेक्षता मानणारे आणि धर्मवादी-जातीयवादी, असे सरळ सरळ दोन गट भारतीय राजकारणात पडले. विभागणी अशी असली तरीही, भाजपकडे अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा उदारमतवादी चेहरा होता. तोपर्यंत धर्मनिरपेक्ष विचारधारा मानणाऱ्या काही पक्षांनी भाजपशी जमवून घेतल होतं. स्थानिक राजकारणाचे काही संदर्भसुद्धा त्यामागे होते,

उदाहरणच द्यायचं तर, शरद यादव यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दलानेही भाजपशी आघाडी केली होती, नीतिशकुमार याच पक्षात होते. परंतु त्यांच्या या निर्णयाला लालूप्रसाद यादव यांच्या स्थानिक विरोधाचा पदर होता, नीतिश कुमार यांनी भाजपसोबत बिहारमध्ये सरकार चालवलं आहे. परंतु नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व भाजपनं स्वीकारल्यानंतर मात्र गणितं बदलली, नीतिश कुमार यांनी थेट विरोधी भूमिका घेऊन फारकत घेतली होती. संघवादाला विरोधाबरोबरच नरेंद्र मोदी यांच्याशी ईर्षा आणि प्रधानमंत्रीपदाचं स्वप्न हेही कारण होतं परंतु लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या लाटेपुढं सगळे पाचोळ्यासारखे उडून गेले. मोठ्या धक्क्यातून सावरून नीतिश कुमार यांनी पुन्हा बांधणी केली. लालूप्रसाद यादव यांच्याशी जुळवून घेतलं. कांग्रेसला सोबत घेतलं आणि नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या उधळलेल्या घोड्याला बिहारमध्ये लगाम लावला या विजयानं भाजपच्या सगळ्याच विरोधकांना आत्मविश्वास दिला. नरेंद्र मोदींना हरवता येतं, असा संदेश बिहारच्या विजयातून गेला. मोदींचा प्रभाव कमी झाल्याचं दिसून आलं. मात्र कालांतरानं नितीशकुमार भाजपच्या वळचणीला गेले. काँग्रेस आणि लालूप्रसाद यादव यांना दूर करून भाजपच्या सोबतीनं सत्ता राखली. सार्वत्रिक निवडणुकीतही ते एकमेकांचे सत्तासाथीदार राहिले आहेत. उत्तरप्रदेशाच्या विजयानंतर भाजपमध्ये उत्साह संचारलाय. केंद्र सरकारविरोधात नाराजी वाढू लागली आहे, असं वाटत असतानाच भाजपला पाचपैकी चार राज्यात यश मिळालंय. बघता बघता आणखी एखादं वर्ष निघून जाईल आणि पुढच्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागतील. ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी मोर्चेबांधणी आणि स्वतःचं मार्केटिंग सुरू केलं होतं, त्याच पद्धतीनं ते पुन्हा एकदा पावलं टाकण्यास सुरुवात केलीय

नरेंद्र मोदी यांच्या मार्केटिंगचं काम केलेले प्रशांत किशोर यांनी बिहारच्या निवडणुकीत नीतिश कुमार यांच्यासोबत काम केलं. तसंच त्यांनी बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्यासोबतही काम केलंय. त्यामुळे सगळं नियोजनबद्ध रीतीने पार पडलं. प्रशांत किशोर आता काँग्रेससोबत म्हणजे प्रियांका, राहुल गांधींसोबत शिवाय भाजपविरोधातल्या पक्षांसोबत काम करीताहेत. नीतिश कुमार यांना बिहार मधल्या कारभाराच्या आधारावर देशापुढे जायचं आहे. राज्यातला कारभार मुख्यमंत्र्याच्या नियंत्रणात असतो. त्यामुळं त्यांना ते फारसं कठीण जाणार नाही. उलट, देशाचा कारभार करताना नरेंद्र मोदींची कसोटी लागते आहे. परराष्ट्र धोरणापासून आर्थिक परिस्थितीपर्यंत अनेक बाबींवर आपलं नियंत्रण राहात नाही. अशावेळी निवडणुकीतली आश्वासनं सतत छळत राहातात. त्यामुळं लोकप्रियता टिकवण्याचं नव्हे, तर घसरणारी लोकप्रियता सावरण्याचं आव्हान नरेंद्र मोदी आणि भाजपसमोर असेल. त्याचवेळी भाजपविरोधी पक्षांची आघाडी उभी करण्याच ममता बॅनर्जी आणि के. चंद्रशेखर राव यांचे प्रयत्न सुरूच राहातील कांग्रेस त्या आघाडीत सहभागी झाली नाही, तरी काँग्रेसचंही प्राधान्य मोदींना हटवणं हेच राहील. त्यामुळं आवश्यक तिथं सहकार्य आणि काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढण्याचं धोरण ठेवलं जाईल. असं दिसतंय. पण अपयशामुळे लढण्याची उमेद कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये किती असेल हाही प्रश्न आहेच. तथापि, काँग्रेसमुक्त भारत शक्य नाही, त्याचप्रमाणे संघमुक्त भारतही शक्य नाही. संघमुक्त भारत म्हणजे भाजपला सत्तेवरून घालवणं, एवढाच तूर्तास या घोषणेचा अर्थ असू शकतो. "बिगर भाजप पक्षाच्या एकजुटीचा अर्थ विचारधारा आणि सुशासनासाठी किमान सामान्य कार्यक्रम तयार करणं एवढाच आहे. यामध्ये प्रधानमंत्रीपदाचे कुणी दावेदार नाही. त्याबाबतचा निर्णय जनतेच्या दरबारात होईल,' असंही ममता बॅनर्जी म्हणाल्यात.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Sunday, 20 March 2022

'काश्मीर फाईल्स'ची पाने...!

"काश्मीरपंडितांना हुसकावून लावलं, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले त्या वास्तवावर बेतलेला 'काश्मीर फाईल्स' चित्रपट प्रदर्शित झालाय. भक्तमंडळींबरोबरच, प्रधानमंत्री मोदीही त्याचं प्रमोशन करताहेत. ३७० कलम रद्द करताना काश्मिरी पंडितांची घरवापसी करू, सामाजिक सौहार्द निर्माण करू असा विश्वास सरकारनं पंडितांना दिला होता. पण तसं घडलं नाही. 'काश्मीर फाईल्स'नं दोन्ही समाजातल्या जखमेवरची खपली काढलीय. आता या जखमेतून पुन्हा भळाभळा रक्त वाहतेय. चित्रपटातल्या दृश्यांनी त्या घटना पुन्हा ताज्या झाल्यात. यामुळं कुणाचं काय साध्य झालंय हे समजून घ्यायला हवंय. अशा वातावरणात पंडितांची घरवापसी कशी होईल? सामंजस्यानं हा प्रश्न सुटला नाहीतर तेढ आणखी वाढेल अन पंडितांसाठी काश्मीरची दारं कायमची बंद होतील अशी भीती वाटते. हे पंडित 'आपलं हक्काचं घर पुन्हा मिळेल' या आशेवर जगताहेत. या सगळ्या प्रश्नांची दाहकता दाखवणारा 'काश्मीर फाईल्स' चित्रपट आपलं मन हेलावून सोडतो!"
---------------------------------------------------

मी लिहितो आहे ते 'काश्मीर फाईल्स' या चित्रपटाबद्धल, तेव्हा तुम्ही हा लेख पूर्ण वाचा. अर्धवट वाचून आपलं मत बनवू नका; पण या लेखासाठी माझी खास विनंती आहे. 'काश्मीर फाईल्स' हा चित्रपट प्रदर्शित झालाय, त्यानं मोठा वाद निर्माण केला गेलाय. चित्रपटाच्या बाजूनं काही लोक उभे आहेत तर काही विरोधात उभे ठाकलेत. ह्या चित्रपटाचं कथानक बेतलं आहे ते काश्मीरमधल्या घटनेवर. तिथल्या काश्मिरी पंडितांना जेव्हा काश्मीर घाटीतून हुसकावून लावलं. त्यावेळी घडलेल्या दुःखद, हृदयद्रावक घटनांचं वास्तव दाखवणारी जीवनकहाणी! त्यातल्या काही घटनांतून काश्मिरी पंडितांचं कशाप्रकारे उत्पीडन करण्यात आलं, याचं चित्रण आहे. केवळ हे चित्रण पाहून आपल्याला त्या भयानक घटनांचं दृष्यस्वरूप लक्षांत येईल पण त्यामागचा छुपा उद्देश आणि संदेश काश्मिरी पंडितांची दुर्दशा दाखविण्यापेक्षा अधिक काहीतरी भयानक दाखवलं गेलंय. चित्रपटात हिंसा घडताना त्या अत्यंत बीभत्स, भडक, भीतीदायक दृश्य चित्रित केली आहेत. 'सिनेमॅटिक लिबर्टी'च्या नावाखाली मूळ वास्तवाशी, इतिहासाशी छेडछाड करता येऊ शकतं, त्याला अधिक भडकपणे मनोरंजनासाठी, फॅन्टसीसाठी बदल केले जातात. हे आपण अनुभवलंय. अनेक ऐतिहासिक चित्रपटांतून अशाप्रकारचं स्वातंत्र्य घेतल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्यात गैर असं काही नाही. पण त्यासाठी एक मर्यादा पाळायला हवी. त्यातला बीभत्सपणा, भीतीदायक दृश्य पाहिलं तर असं वाटतं की, सेन्सारनं ही दृश्यं कशी काय संमत केलीत? सेन्सॉर मधल्या सदस्यांचं जर ह्या अशा दृश्यांवर लक्ष असतं तर यातली अनेक दृश्यं कापली गेली असती. कदाचित सेन्सॉरच्या सदस्यांना सत्ताधाऱ्यांकडून काही निर्देश दिले गेले असावेत. सेन्सॉर बोर्डानं प्रेक्षकांप्रती ही फसवणूक केलीय. या चित्रपटातल्या दृश्यांनी समाजजीवनावर, समाजस्वास्थावर होणाऱ्या विपरीत परिणामाची दक्षता घेतली गेली नाही. निर्मात्याला हे स्वातंत्र्य आहे की, त्यानं कोणता आणि कसा चित्रपट तयार करावा. हे त्याचं 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' आहे. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन! या चित्रपटाचं सादरीकरण, एक्सप्रेशन हे सत्यतेच्या मुलाम्यातून असत्य, खोटं सादरीकरण केलंय. ह्या घटनांतल्या तथ्यांना मी खोटं ठरवत नाहीये, पण मी हे जाणतो की, स्वातंत्र्योत्तर काळातच जम्मू काश्मीरमध्ये दशहतवाद, आतंकवाद वाढू लागला होता, असं नाही तर तो तिथं आधीपासूनच होता. पाकिस्तानच्या पाठींब्यावर जम्मूकाश्मीर लिबरेशन फ्रंट-जेकेएलएफ हे अतिरेकी संघटना इथं कार्यरत होती. काश्मिरी पंडितांना हुसकावून लावण्यात त्यांचा पुढाकार होता. त्या दहशतवादाचा बीभत्स चेहरा बनला होता. ही घटना सर्वाधिक दुःखदायक होती. पण या घटनेच्या समांतर अनेक घटना घडत होत्या. वर्षानुवर्षे एकत्र राहणाऱ्या काश्मिरी पंडित आणि मुसलमानांनी त्यांच्यातल्या सौहार्दाची जाणीव न ठेवता पंडितांना हुसकावून लावण्यात पुढाकार घेतला, त्यांच्यावर अत्याचार केले होते. काही मुसलमानांनी मोजक्या काश्मिरी पंडितांना वाचवलं, त्यांची सुरक्षा केली, त्यांना आपल्या घरात आसरा दिला. ह्या साऱ्या गोष्टी चित्रपटातून एका षडयंत्राप्रमाणे लपवल्या गेल्यात. गायब केल्या गेल्यात. असो या घटनेच्या मुळाशी जाऊन आपण समजावून घेऊ या!

एन ब्राह्मण झादगान-ए-जिंदादिल l
लालेह-ए-अहमर रुहे शान खाजिल ll
तब्झखीन-ओ-पुख्ताकार-ओ-सख्तकोश l
अझ-निगाह-ए-शान फरंग अंदर खारोश ll
अस्ल-ए-शान अझबाक-दामनगीर मस्त l
मतला-ए-एन अख्तरान कश्मीर मस्त ll
काश्मीरमधले ख्यातनाम कवी-शायर डॉ.अल्लामा इकबाल यांनी लिहिलेल्या या कवितेचा अर्थ असा की, जिंदादिल ब्राह्मणांचा हा वारस, त्यांच्या चमकत्या लालबुंद गालापुढं इथलं ट्युलिप फुल देखील खजील होत असेल. मेहनती, परिपक्व आणि चमकदार उत्कंठावर्धक डोळे असलेली ही मंडळी, त्यांचा एक कटाक्षही पाश्चिमात्यांना अस्वस्थ करून सोडतो. ते आपल्या विद्रोही भूमीचं जीवन आहे. हे नक्षत्रासमान अवकाश म्हणजे आपलं काश्मीर आहे....!
काश्मीर एक बहुसांस्कृतिक राज्य आहे. देशाच्या फाळणीनंतर मोठा फटका इथल्या संस्कृतीवर झालाय. इथली माणसं आपल्या धर्माच्या नावानं लढले. डॉ.अल्लामा इकबाल हे वडवा पंडित होते, सहादत हसन मंटोना वडवा पंडित होते. इथले मोठ्या संख्येचे मुस्लिम हे पूर्वी जुन्या पिढीतले काश्मिरी पंडित होते. परंतु फाळणीनंतर इथले लोक आपलं मूळ आणि कुळ विसरून संकुचित विचारधारेशी जोडले गेले. या संकुचिततेतूनच पंडितांसमोर विस्थापित होण्याचं भयंकर संकट उभं ठाकलं. पंडितांना पुनःप्रस्थापित करण्याचा प्रश्न देखील सुटलेला नाही. अशोककुमार पंडित यांनी 'काश्मीर अँड काश्मीर पंडिट्स' या पुस्तकात लिहिलंय की, १९८०च्या दशकात काश्मीरचा प्रश्न सोडविण्यासाठी योग्य वेळ होती, पण राजकीय इच्छाशक्ती कमी पडली. पत्रकार बलराज पुरी यांच्या मते, काश्मीर समस्या सोडविण्यासाठी दुसऱ्यांदा प्रयत्न करताना असाधारण राजकीय, सामाजिक प्रतिभेची, लोकतंत्रिक प्रणालीची गरज होती, पण जुनी-पुरानी धोरणंच प्रशासनाकडून राबविण्यात आली. त्यातून असा संदेश गेला की, काश्मिरी जनतेच्या इच्छा, आकांक्षा, भावना, मतांना सरकारच्या लेखी कोणतीच किंमत नाही! १९ जानेवारी १९९० ला हजारो पंडितांना आपल्या मातृभूमीतून पलायन करावं लागलं या अत्यंत दुःखद आणि पीडादायक घटनेला बत्तीस वर्षे उलटलीत. असं काय घडलं की, रातोरात पंडितांना काश्मीर सोडून पळून जावं लागलं. १९८३ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या फारुख अब्दुल्लांचं तर दिल्लीत इंदिरा गांधींचं सरकार होतं. इंदिरा गांधींनी अब्दुल्ला सरकार हटविण्यासाठी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल बी.के.नेहरूंवर दबाव आणत होत्या. १९८४ मध्ये एकेदिवशी इंदिरा गांधींनी अचानक त्यांची बदली केली. त्यांना गुजरातचे राज्यपाल म्हणून नेमलं. त्यांच्याजागी जगमोहन यांना राज्यपाल नेमण्यात आलं. इंदिरा गांधी गुलशाह नावाच्या नेत्याचं समर्थन करीत होत्या. अब्दुल्लांच्याजागी मुख्यमंत्री म्हणून त्यांची नेमणूक करण्याचा प्रयत्न त्या करीत होत्या. बी.के.नेहरूंना हटविल्याबरोबर गुलशाह यांच्या नेतृत्वाखाली १३ आमदारांनी राज्यपालांची भेट घेतली, त्यात खेमलता वजलू ह्याही होत्या. याच खेमलता वजलू यांनी म्हटलं होतं की, 'गुलशाह सत्तेवर आले तर इथल्या हिंदूंचं जीवन आणि मालमत्ता, संपत्ती असुरक्षित बनेल!' त्याच खेमलता ह्या गुलशाहसोबत होत्या. अब्दुल्ला सरकार पडलं, गुलशाह मुख्यमंत्री बनले. लोक या सत्ताबदलाच्या विरोधात होते. त्यातून आरंभलं 'गुल-ए-कर्फ्यु'! गुलशाह मुख्यमंत्री बनल्यानंतरच्या ९० दिवसातले ७२ दिवस इथं कर्फ्यु लागलेला होता. १९९० मधल्या काश्मिरी पंडितांच्या विस्थापिताची बीजं या कर्फ्युत सामावलेली होती. हा कर्फ्यु गुलशाहच्या राजवटीत लागल्यानं त्याला गुल-ए-कर्फ्यु म्हणून ओळखलं गेलं! ऑक्टोबर १९८४ मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली. राजकीय समीकरणं पुन्हा बदलली. राजीव गांधी मोठ्या बहुमतानं प्रधानमंत्री बनले. फारुख अब्दुल्ला यांनी आपल्या बालपणीचे मित्र राजीव यांच्याशी नातं प्रस्थापित केलं. यामागं त्यांचा हेतू सत्तेत पुनरागमनाचा होता. १९८५ संपताना गुलशाह समजून चुकले की, आता आपलं सरकार टिकणार नाही. मग त्यांनी धार्मिकतेचं पत्ता खेळला. आधुनिक इतिहासात हिंदूंच्या विरोधातली खूप मोठी दंगल त्यावेळी काश्मिरात झाली. ह्या दंगलीनं गुलशाह सरकार वाचू शकलं नाही. सरकार गेलं पण गेली कित्येकवर्षं एकमेकांशी सौहार्दपूर्ण संबंध असलेल्या हिंदू-मुसलमानांत काश्मीरमध्ये जे वैमनस्य निर्माण झालं ते आजतागायत संपलेलं नाही. १९८६ मध्ये अनंतनाग इथं झालेली हिंसा तर अत्यंत भयावह होती. त्याच दरम्यान शाह सरकार उध्वस्त झालं आणि तिथं राष्ट्रपती शासन लागू झालं. ऑगस्ट १९८९ मध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या महंमद युसुफ यांना गोळ्या घालून मारण्यात आलं. त्यानंतर भाजप नेता टिपूलाल टपलू आणि जस्टीस नीलकंठ गंजू यांची हत्या झाली. या सगळ्या घटनांनी पंडितांच्या मनांत भीती निर्माण झाली. १९९० मध्ये पुन्हा फारुख अब्दुल्ला यांना राजीनामा द्यावा लागला. पुन्हा हिंसेचा आगडोंब उसळला. आणि हजारो पंडितांना काश्मीर घाटी सोडून जम्मूत यावं लागलं.

हिंदुत्ववाद्यांची राजवट देशात असतानाही सरकारला कश्मिरमधून बेदखल केलेल्या पंडितांना हक्काच्या जागेसाठी साकडं घालावं लागतं, हेच मुळात संतापजनक आहे. काश्मीरचे कधी काळी ‘मालक’ असणार्‍या पंडितांच्या नशिबी आलेलं भिकार्‍याचं जिणं काही बदललं नाही. काश्मीरी पंडितांच्या मुद्द्यावरून काँग्रेस सरकारांच्या राजवटीत वर्षानुवर्षे रान उठवणार्‍या भारतीय जनता पक्षाचं आज केंद्रात सरकार आहे. तरी पण काश्मिरी पंडित आजही दहा बाय दहाच्या निर्वासित छावण्यांमध्येच विपन्नावस्थेत जगताहेत. मग सरकार बदलून उपयोग तरी काय झाला? काश्मीर खोर्‍यातल्या मुस्लिमांनी पाकिस्तानच्या पाठिंब्यावर पंडितांवर केलेले अनन्वित अत्याचार आणि हत्याकांडाचा विचार केला तरी पण अंगावर काटा येतो. काश्मीर खोर्‍यातून लाखो काश्मीरी पंडितांना इस्लामी दहशतवादामुळं बेघर व्हावं लागलं ही सार्वभौम भारतावर झालेली सर्वात मोठी जखम आहे. दुर्दैव असं की, काश्मीरी पंडितांच्या अश्रूंसह झेलमचं पाणी गेल्या ३२ वर्षांत पाकिस्तानात वाहून गेल्यानंतरही ही जखम आजही भळभळतीच आहे. १९८९ च्या डिसेंबर महिन्यापासून १९९५ पर्यंत सलग सहा वर्षे काश्मीर खोर्‍याचं संपूर्ण इस्लामीकरण करण्यासाठी काश्मीरी पंडितांचं, तिथल्या हिंदू आणि शिखांचं भयंकर शिरकाण झालं. हजारो काश्मीरी पंडित या हत्याकांडात मारले गेले. पंडितांच्या घरांवर तुमच्या स्त्रिया आणि मालमत्ता सोडून चालते व्हा, अशी पत्रके चिकटवण्यात आली होती. असंख्य हिंदू पंडितांच्या स्त्रियांवर त्यांच्या कुटुंबासमोरच बलात्कार करण्यात आले. इस्लामी दहशतवादी बंदुकीच्या जोरावर क्रूर अत्याचार करत असताना पंडितांनी जीव मुठीत धरून कश्मीर सोडले. दीड हजार मंदिरं काश्मीरी मुस्लिमांनी आणि अतिरेक्यांनी उद्ध्वस्त केली. काश्मीरी पंडितांच्या सहाशे गावांची नावं बदलून त्यांना इस्लामी नावं देण्यात आली. आपल्याच देशात आपलं घरदार, सफरचंदाच्या बागा, मालमत्ता आणि पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखलं जाणारं काश्मीर सोडून हिंदू पंडितांना कायमचं परागंदा व्हावं लागलं. हा सगळा अमानुष नरसंहार आपला देश हताशपणे बघत राहिला. या राक्षसी अत्याचारानंतर काश्मीरी पंडितांच्या नशिबी आल्या त्या फक्त नरकयातना. त्यालाही आता ३२ वर्षे उलटली. पनून कश्मीरनं याच पार्श्वभूमीवर केंद्रीय सरकारकडं तीन प्रमुख मागण्या केल्या होत्या. पहिली कश्मीर खोर्‍याचं विभाजन करा, झेलम नदीच्या उत्तर आणि पूर्व भागाला खोर्‍यातून तोडून तिथं काश्मीरी पंडितांचं स्वतंत्र राज्य स्थापन करा आणि त्यास केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा द्या, जम्मूचं स्वतंत्र राज्य करा आणि लडाखलाही काश्मीर खोर्‍यातून अलग करून तोही केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशा या प्रमुख मागण्या होत्या. यापैकी लडाखची मागणी मार्गी लागली. इतर मागण्यांकडं भाजप सरकार लक्ष देणार का? असा प्रश्न त्यांच्याकडून करण्यात आलाय.

आता या घटनेला ३२ वर्ष उलटलीत.तीन पिढ्या बदलल्या. अजुनही नि:ष्कासित झालेल्या पंडितांचा प्रश्न सुटलेला नाही. देशातच निर्वासित व्हावं लागणं याच्या वेदना कोणी नीट समजावून घेत नाही. हिंदुत्ववाद्यांना लोकभावना भडकवायचं साधन मिळतं याशिवाय त्यांच्या दृष्टीनं पंडितांचं काहीही अस्तित्व नाही. पंडितांच्या हत्याकांडाचा विषय निघताच इथल्या पुरोगाम्यांना लगेचचं गुजरातचा नरसंहार आठवतो. पण या सा-यात 'माणूस' मेलाय, बलात्कारीत झालाय याची जाण आणि भान राहत नाही. देशात आत्मसन्मानानं जगण्याचा सर्वांना अधिकार आहे. नरसंहाराची भूमिका असणा-यांना या व्यवस्थेत स्थान नाही. मग तो कोणीही असो. आज ३२ वर्ष उलटलीत पण पंडितांना त्यांच्या भुमीत जायचं साहस होत नाही. त्यांनी जगायचं कसं याचा मार्ग शोधला असला तरी त्यांची त्या भुमीशी असलेली नाळ अद्यापही जुळलेलीच आहे. त्या भुमीतुन हाकललं गेल्याचा शोक-संतप्त उद्गार अत्यंत स्वाभाविक आहेत. सरकारनं घटनेतलं ३७० आणि ३५ अ हे कलम रद्द केल्यानं इथल्या लोकांना भारताशी जोडून घेण्याचा प्रयत्न झालाय. त्यावेळी हुसकावून लावल्या गेलेल्या पंडितांना इथं आणलं जाईल, त्यांनी घरवापसी केली जाईल असं सांगितलं गेलं, पण अद्याप तसं घडलेलं नाही. विस्थापित काश्मीरींना इथं परतण्यासाठीचं वातावरण तयार करू शकलेलं नाही. मुसलमानांचं मतपरिवर्तन झालेलं नाही. ते व्हावं असा प्रयत्नही होत नाही. उलट अशाप्रकारच्या चित्रपटांनी या दोन समाजातलं वैमनस्य, दुरावा वाढणार आहे. त्यांची मनं जुळणार नाही, विश्वास वाटणार नाही. अशावेळी दोन समाजात द्वेष, तिरस्कार, नफरत पसरविणाऱ्या 'काश्मीर फाईल्स' सारख्या चित्रपटांवर बंधन यायला हवीत. मात्र असं न घडता त्याचं प्रमोशन खुद्द प्रधानमंत्री, सरकारातली नेते मंडळी करताहेत. हे अधिक गंभीर आहे. त्यांना काश्मीरमधलं, देशातलं वातावरण, हिंदू-मुस्लिम या दोन समाजात सामंजस्य निर्माण करायचं आहे की, हा दुरावा आणखी वाढवायचं हे समजेनासं झालंय. 'काश्मीर फाईल्स'नं हिंदू-मुस्लिम समाजात निर्माण झालेली जखम भरत आली असतानाच त्याची खपली काढली जातेय. आता या जखमेतून पुन्हा भळाभळा रक्त वाहिलं तर नवल वाटायला नकोय. जणू हेच सरकारला वाटतंय असं हे वातावरण आहे. काश्मीरमधलं वातावरण सुधारावं, तिथलं जनजीवन सामान्य व्हावं म्हणून सरकार प्रयत्नशील दिसत नाही. किंबहुना सरकारला तिथं अपयश आलंय. या चित्रपटाच्या वादविवादाच्या गोंधळात सरकारी मालमत्ता विकली जातेय, सरकारला जे काही करायचं आहे, ते करण्यासाठी लोकांचं लक्ष दुसरीकडं वळवलं जातंय. सरकार प्रत्येक गोष्टीचं केंद्रीकरण करताना दिसतेय. यावर मी काही बोलणार, लिहणार नाही. चित्रपटाच्या माध्यमातून एक समाजाविरोधात वातावरण तयार करून हाती काय लागणार आहे. यात कुणाचं भलं होणार आहे. चित्रपटाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या डोक्यात स्फोटकं भरली जाताहेत. याचा विस्फोट कधीही होऊ शकतो. द्वेषाच्या, नफरतच्या राजकारणातून बाहेर या. हिंदू असो, मुसलमान, शीख, ख्रिश्चन असो सगळ्यांना इथंच राहायचं आहे. सगळे वेगळं होऊच शकणार नाहीत. जणू तुम्हाला देवाचा शाप आहे की, तुम्हाला या सर्वांबरोबर राहावंच लागणारंय, जगावं लागणारंय. प्रेमानं एकत्रित राहणार की एकमेकांना आव्हान देत जगणार आहात, हा खरा सवाल आहे. असं असलं तरी तुम्ही अडचणीच्यावेळी एकमेकांच्या मदतीला येणारच आहात. मध्यरात्री घरी जाण्यासाठी रिक्षा-टॅक्सी थांबवाल तेव्हा तुम्ही हे पाहणार नाही की, चालक कोण आहे, हिंदू की मुसलमान! तुमच्यामागे गुंड लागले असतील तर तुम्ही ज्याची कुणाची मदत मागाल तेव्हा हे पाहणार नाही की, ते कोण आहेत? रस्त्यावर भटकताना तुम्हाला तहान लागली असेल अन जिथं कुठं पाणी दिसेल तेव्हा तुम्ही हे पाहणार नाहीत की, पाणी कुणाचं आहे! हिंदूचं की मुसलमानाचं, तुम्ही तिथं जाऊन पाणी मागणारच! मग एकदुसऱ्यासाठी मनं कशाला कलुषित करताहात? तेव्हा समजून घ्या हा चित्रपट 'प्रपोगंडा चित्रपट' आहे. अगदी तसाच ज्याप्रकारे तुमच्या व्हाट्सएपवर फेकन्यूज येतात. हा त्याप्रकारचा नवा फॉरमॅट आता आलाय. इथं पंडितांना हुसकावून लावताना हिंसा झालीय पण त्याचं भडक, बीभत्स, बटबटीत चित्रण केलं गेलंय. चित्रपटच सांगतोय की, ही डाक्युमेंट्री नाहीये तर तर फिक्शन आहे. म्हणून तुम्ही विचलित होऊ नका मन शांत ठेवा. तुमचं काहीच बिघडणार नाही. जिथं काही बिघडतंय तिथं लक्ष द्या.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Saturday, 12 March 2022

राजकीय नवसंस्कृतीचा उदय...!

"दिल्लीच्या सत्तासिंहासनाचा राजमार्ग असलेल्या उत्तरप्रदेशात दुसऱ्यांदा भाजपनं विजय मिळवलाय. तिथं आदित्यनाथ हेच पुन्हा 'राजयोगी' बनलेत. गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर ही राज्ये अलगदपणे खिशात घालत प्रधानमंत्री मोदींनी लोकसभेची ‘सेमीफायनल’ जिंकलीय. तर ‘पंजाब दा मूड’ही आम आदमी पक्षाच्या बाजूनं दिसून आलंय. 'आप'ला मिळालेलं यश राष्ट्रीय राजकारणातला टर्निंग पॉईंट ठरण्याची शक्यता आहे. या निकालानं नव्या राजकीय संस्कृतीचा उदय झालाय. यावेळी हिंदू-मुस्लिम विभाजन दिसलं नाही. पारंपरिक राजकारण संपलंय. स्वतःला अमुक एका जातीचे नेते समजणाऱ्यांच्या मागे त्यांच्याच जातीची मतं जायला तयार नाहीत. पंजाबमध्ये ३३ टक्के दलित मतं होती, काँग्रेसचा मुख्यमंत्री दलित होता तरी देखील लोकांनी काँग्रेसला नाकारलं, तेच उत्तरप्रदेशातही झालं. मौर्य, सैनी, चौहान, पटेल हे सारे अखिलेशच्या बाजूनं आले पण त्यांच्या जातीची मतं अखिलेशच्या झोळीत पडली नाहीत. मंडल-कमंडलचं राजकारणही संपुष्टात आलं. गेली ३०-४० वर्षे नेतृत्वहीन असलेल्या देशाला मोदींचं खंबीर नेतृत्व मिळाल्याचा विश्वास निर्माण झाला!"
------------------------------------------------------
*दे*शातलं राजकारण समजून घेण्याची राजकीय संस्कृती भाजपनं बदललीय. लोकमानस बदललंय, ती बदलल्यामुळे अपयश, कच्चे दुवे झाकलं जाणं हे भाजपला शक्य झालं. उत्तरप्रदेशात जे मतदान झालं ते प्रामुख्यानं योगीपेक्षा मोदींना पाहून झाल्याचं दिसतं. त्यामुळं योगीच्या चुका झाकून गेल्या. लोकांचा मोदींवर अधिक विश्वास दिसून आला. ही प्रतिमा मोदींनी गेल्या काही वर्षात निर्माण केलीय. म्हणूनच 'मोदी हैं तो मुमकीन हैं l' हे गृहितक निर्माण झालंय. हीच प्रतिमा मोदींच्या यशाचं गमक आहे. प्रतिमा निर्मिती होते याचा अर्थ सगळं खोटं असतं असं नाही. पण जे काही अणूएवढं असेल ते त्याहून कित्येकपट मोठं करून दाखवणं. म्हणजे 'प्रत्यक्षातून प्रतिमा उत्कट!' अशी प्रतिमा तयार करणं! हे त्यांच्या राजकारणाचं कौशल्य आहे. 'गटातटांच्यावर मी आहे. जातींच्या तटबंदीच्याही वर मी आहे. त्यापलीकडे मी आहे. मी फक्त देशाचा, राष्ट्राचा विचार करतो!' हे मोदींचं म्हणणं विश्लेषकांना पटत नाही पण सर्वसामान्यांचा त्यावर विश्वास बसतो. त्यांनी नोटबंदी केली, ती फसली पण लोकांच्या दृष्टीनं त्यात मोदींचा उद्देश चांगला होता. हे पटवून देण्यातही मोदी यशस्वी झालेत. याला त्यांची प्रचार यंत्रणा कारणीभूत आहे. त्यांचं वक्तृत्व आणि लोकांशी संवाद साधण्याचं, समजावून सांगण्याचं जे कौशल्य आहे त्याचा मोठा वाटा आहे. गेली ३०-४० वर्षें देशाला कणखर, खंबीर नेतृत्वच नाही अशी स्थिती होती नरसिंहराव यांच्यापासून मनमोहनसिंग यांच्यापर्यंत तसं कुणाचं मजबूत नेतृत्व लाभलं नाही वाजपेयींचं नेतृत्व होतं पण ते जनसामान्यांशी थेट भिडणारं नव्हतं. ते आधी कुठं मुख्यमंत्री राहिलेले नव्हते. त्यामुळं लोकांना मजबूत नेतृत्वाची आस लागली होती ती मोदींनी पूर्ण केली आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून, गुजरात मॉडेलचा गवगवा करीत प्रधानमंत्री म्हणून आल्यावर ते लोकांच्या मनात राहीले. त्यामुळं गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत केवळ मोदी आहेत म्हणून भाजपला मतं मिळाली आहेत. मोफत धान्य योजना ही काही आजची नाही, ती पूर्वीही होती पण ते मी तुम्हाला दिलं असं म्हणत त्यांनी लोकांना आपल्याशी जोडून घेतलं. हे कौशल्य मोदींमध्ये आहे. सरकारी योजनांचं थेट लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. मग ते घरं असोत, शौचालये, पाणी, औषधं, आर्थिक मदत असो, यांच्या त्यांनी जाहिराती केल्या. त्यामुळं हे सारं मोदींनी केलं अशी भावना निर्माण झाली. या योजनांचा फायदा किती लोकांना झाला हे अलाहिदा. पण गावातल्या एकाला जरी याचा लाभ झाला तरी त्याबाबत इतरांना विश्वास वाटतो.

आणखी एक गृहितक रुजविण्यात मोदी यशस्वी झालेत. हा देश बहुसंख्य असलेल्या हिंदूंचा आहे. राजकीयदृष्ट्या आपण एकत्र येणं काही गैर नाही. हा प्रचार केला गेला. जे साध्य करायचं होतं ते भाजपनं केलं असल्यानं यावेळी हिंदू-मुस्लिम वादाचा वापर त्यांनी निवडणुकीत केला नाही. ते आता लोकांनीच ते स्वीकारलंय. त्यामुळं या निवडणुकीत पहिल्यांदाच हिंदू-मुस्लिम विभाजन दिसलं नाही. शिवाय पारंपरिक राजकारणाचे दिवस आता सरलेत. मंडल-कमंडल प्रकारचं राजकारणही संपुष्टात आलंय. सांप्रदायिक ध्रुवीकरण न करताही भाजपनं मिळविलेला विजय हेच सांगतो की, आजवर जाती-पातींवर टिकलेली संस्थानं यापुढं सत्ता मिळवू शकणार नाहीत. राष्ट्रीय राजकारणाचं सूत्र घेऊन भाजपनं लहानमोठ्या सत्ताधीशांना एकापाठोपाठ उद्ध्वस्त केलंय आणि प्रत्येक राज्यात भाजपचा पाया मजबूत केला. पाच राज्यातल्या या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या-त्या राज्यातल्या जनादेशाची आजवरची परंपराही जनतेनं मोडीत काढली. स्वतःला राष्ट्रीय प्रवाहाशी जोडून घेण्याच्या प्रयत्नांमुळंच उत्तरप्रदेशात ३० वर्षांनंतर भाजपला सलग दुसऱ्यांदा सत्ता लाभली जी यापूर्वी कुणाला मिळाली नव्हती. त्याचवेळी योगींनी अखिलेश यादवांचं राजकारण मुस्लिम-यादव यांच्यापुरतं मर्यादित करून टाकलं. मोदी, योगी आणि केजरीवाल हे २०२४ साठी तीन चेहरे महत्त्वाचे ठरतील. अद्यापही लोकांच्या मनावर मोदींचं गारुड आहे. योगी आदित्यनाथ हा भाजपचा नवा ब्रँड आहेत. आम आदमी पक्ष केजरीवाल यांना त्यांची इच्छा असो नसो, २०२४ च्या निवडणुकीत आरूढ व्हायला भाग पाडणारच. इतर विरोधी पक्ष आता केजरीवालांना मोडीत काढू शकणार नाहीत. आज कोणत्याही नव्या राजकीय विचारधारेला मान्यता द्यायला लोक तयार आहेत. पण त्यासाठी हवंय विचार, संघटना आणि दृष्टी त्यातूनच पंजाबची हवा पालटली. केजरीवाल जिंकले. नवा पर्यायच नसेल तर जुन्यांचा कंटाळा आलेला असतानाही जनता सत्ताबदल करत नाही. उत्तर प्रदेशात तेच झालं. समाजवादी पक्षानं तळागाळातले प्रश्न लावून धरले पण तरी लोकांनी त्यांना नाकारलं.

काहीजण स्वतःला विशिष्ट जातीचे नेते समजतात पण त्यांच्यामागे त्यांच्याच जातीची मतं जायला तयार नाहीत. पंजाबमध्ये ३३ टक्के दलित मतं होती, काँग्रेसचा मुख्यमंत्री दलित होता, तरी देखील लोकांनी काँग्रेसला नाकारलं कारण, जातीची मतं जातीच्या नेतृत्वामागेच जाणार हे गृहीतक इथं चुकलं, तेच उत्तरप्रदेशातही झालं. यादव, मौर्य, सैनी, चौहान, पटेल, काहीप्रमाणात मुस्लिमही हे सारे अखिलेशच्या बाजूनं आले पण त्यांच्या जातीची मतं अखिलेशच्या झोळीत पडली नाहीत. मागासवर्गीय मतांवर अधिकार गाजवणाऱ्या मायावती आणि मुस्लिमांची मतांची बेगमी करणाऱ्या ओवैसीचा इथं सुपडा साफ झाला. आणि वास्तवातले प्रश्न कसे सुटणार याची काळजी लागलेल्या जनतेनं स्थानिक नेतृत्व नाकारत थेट राष्ट्रीय पक्षाकडं सत्ता देणं पसंत केलं. मोदींभोवतीच्या वलयाचं आकर्षण उत्तरप्रदेशच्या गल्लीबोळापासून उत्तराखंड, गोवा ते थेट मणिपूरपर्यंत दिसून आलं. शेतकऱ्यांचा गड असलेल्या पश्चिमी उत्तर प्रदेशात किसान आंदोलनाचं काहीच चाललं नाही. बेरोजगारी, महागाईच्या काळात मोफत रेशन आणि मोदींच्या अन्य योजनांनी लोकांना मोहात पाडलं. एकीकडं भगवे कपडे घालून आदित्यनाथ यांनी हिंदुत्वाचा नारा बुलंद केला तर दुसरीकडं अयोध्येत राममंदिर ते काशीचा कॉरीडॉर या साऱ्यातून जात मोदींनी खासगीकरण, कॉर्पोरेट दोस्तांना सार्वजनिक उद्योग कवडीमोल भावात विकणं सुरुच ठेवलं, देशाची दुरावस्था कायम राहिली तरीही २०२२ चे निवडणूक निकाल काही नवे संकेतही देत आहे. मोदींना आव्हान देण्यासाठी भाजपच्या अंतर्गत नव्यानं योगी योगींना उभं केलं जातंय आणि बाहेर भाजपच्या राजकारणाला आव्हान देण्यासाठी केजरीवाल यांचा पर्याय मूळ धरतेय. मायावतींचं राजकारण संपल्याचं दिसतंय. अखिलेशच्या राजकारणापुढं प्रश्नचिन्ह उभं केलंय. त्याहून सर्वांत मोठा प्रश्न काँग्रेसचा आहे. काँग्रेस अजूनही सावरलेली नाही. पाच राज्यांच्या जनादेशाचा संदेश स्पष्ट आहे. राष्ट्रीय राजकारणाच्या आश्रयानंच भविष्यात राज्य स्तरावरचं राजकारण चालेल. ज्याचं आजची प्रतिमा नरेंद्र मोदी यांची आहे. काँग्रेसला अस्तित्वासाठीच्या दृष्टिकोनाचा शोध घ्यावा लागेल. जुन्या पारंपरिक नेत्यांना जनता नाकारतेय; मग ते पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग असो की बादल परिवार की उत्तराखंडचे हरिश रावत! तिकडं हिंदू राष्ट्राच्या नावाखाली भाजपनं विकासाचा सगळा डोलारा खासगीकरणाच्या डोक्यावर नेऊन ठेवलाय. मोदींनी जाणूनबुजून नेहमी काँग्रेस आणि राहुल गांधी हेच आपले प्रतिस्पर्धी आहेत लोकांवर बिंबवलंय. लोकांच्या दृष्टीनं मोदींच्या तुलनेत राहुल अगदीच क्षुल्लक वाटतात त्यामुळं काँग्रेसचा ग्राफ आणखीनच खाली जातोय. प्रियांका गांधींनी 'लडकी हैं लेकिन लढ सकती हैं!' असं म्हणत महिलांना उमेदवाऱ्या दिल्या तरीदेखील इथं दारुण पराभव झाला. आपल्या योजनांच्या माध्यमातून महिलांनी मोदींना जवळ केल्याचं दिसलं. तीन महिन्यांपूर्वी काँग्रेस स्थापनेला १३६ वर्षे झाली. काँग्रेस स्थापनेनंतर ६२ वर्षांनी भारताला स्वातंत्र्य मिळालं. यंदा स्वातंत्र्याला ७५ वर्षे होतील. भाजपचा, जनसंघाच्या स्थापनेलाही काही महिन्यांपूर्वी ७० वर्षे झालीत. उत्तर प्रदेशातल्या निर्विवाद यशानं भाजपनं दिल्लीतल्या सत्तासिंहासनाचा राजमार्ग प्रशस्त केलाय.
सलग तिसऱ्या कार्यकाळाची उमेद कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केलीय.

आज राष्ट्रीय राजकारणात चार मुख्य प्रवाह आहेत. पहिला सगळ्यांत शक्तिशाली बनलेला भाजपचा. दुसरा, स्वत:चं अस्तित्व आपल्याच कर्मानं क्रमाक्रमानं पुसट करत चाललेला काँग्रेसचा. तिसरा, आपापल्या प्रांतात प्रादेशिक सत्ता आणि नंतर राष्ट्रीय राजकारणातल्या भूमिकेची स्वप्ने पाहणाऱ्या डझनाहून अधिक अशा प्रादेशिक पक्षांचा आणि चौथा, सत्तेची आकांक्षा बाळगणाऱ्या आम आदमी पक्षाचा! जगातल्या सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताच्या स्वातंत्र्याचा शताब्दी महोत्सव होईल, तेव्हा भारतीय राजकारणाचा आजचा हा प्रवास लोकशाहीला कितपत लाभदायक असेल! वारंवार पराभव होऊनही घराणेशाही आणि प्रादेशिक अस्मिता नाकारणारी दृष्टी यातून काँग्रेससहित भारतातले सारे राजकीय पक्ष बाहेर पडायला तयार नाहीत. बहुतेकांनी आपले प्रादेशिक पक्ष आपापल्या मुलाबाळांच्या नावे केले आहेत. त्यांच्यात राष्ट्रीय पातळीवर एकत्र येण्याची तर दूरदृष्टी नाहीच; पण आपल्या पक्षातही घराण्याच्या बाहेरचं नेतृत्व फुलविण्याची उदारता देखील नाही. दक्षिण भारतात कर्नाटक आणि महाराष्ट्र वगळता भाजपला मोठं यश मिळालेलं नाही. आज तमिळनाडू, केरळ, आंध्र, तेलंगण, बंगाल, उडिशा या प्रमुख राज्यांमध्ये भाजपला फारसं स्थान नाही. एकेकाळी, या सर्व राज्यांतून काँग्रेस हा बलाढ्य पक्ष होता. जातीपातींच्या राजकारणाची उग्रता, हिंदुत्वाचा अतिआग्रह, मुस्लिमांचा टोकाचा अनुनय आणि केंद्रातल्या सत्तेसाठी उत्तरेतल्या काही राज्यांमध्ये सर्वस्व पणाला लावण्याची राजकीय सक्ती, हे सारं देशासाठी मुळीच हिताचं नाही. काँग्रेसचं सर्व राज्यांमधलं अस्तित्व आणि कमी-अधिक प्रभाव हे देशाच्या समतोल वाटचालीसाठी अनेक दशकं अतिशय उपकारक ठरली होती. मात्र आणीबाणीनंतर ही प्रक्रिया खंडित झाली. जनता पक्षाची निर्मिती आणि झालेली शकलं, पाठोपाठ संपलेलं अस्तित्व, दुसरीकडं भाजपचा प्रभावही देशात सर्वदूर पसरलेला नाही. 'हिंदुत्व मवाळ केलेला भाजप आणि घराणेशाहीला निरोप दिलेला काँग्रेस पक्ष' हे भारताच्या मध्यममार्गी राजकारणाचं खरं आदर्श रूप आहे. दुर्दैवाने ते आज आढळून येत नाही. प्रत्यक्षात आज लोकशाहीच्या मजबुती करणासाठी विरोधकांच्या संभाव्य आघाडीतलं काँग्रेसचं स्थान या निकालांनी आणखी नगण्य झालंय हे लक्षांत घ्यावं लागेल. कुण्या एकाकाळी काँग्रेसचं देशात एकखांबी अंमल होता. त्याची परिणीती हुकूमशाहीत झाली होती. हे भारतीयांनी अनुभवलं आहे. भाजपची वाटचाल त्यादिशेनं तर नाही ना? असं वाटावं अशी स्थिती आहे.

याशिवाय प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. दक्षिणेकडील राज्ये प्रादेशिक अस्मितांच्या प्रश्नावर यश मिळताहेत हे पाहून देशातल्या अनेक राज्यातून प्रादेशिक पक्षाचं अस्तित्व दिसू लागले. सर्वसत्ताधीश असलेल्या काँग्रेसनं त्या प्रादेशिक अस्मितांवर फुंकर घालण्याऐवजी सवतासुभा उभा केला त्यामुळं अस्मिता अधिक टोकदार झाली. जागोजागी प्रादेशिक पक्ष उभे राहिले. आजच्या या निवडणुकीनं या प्रादेशिक पक्षांना विचार करण्याची वेळ आणलीय. तृणमूल काँग्रेस, शिवसेनेनं राष्ट्रीय पक्ष बनण्याच्या नादात गोव्यात उत्तरप्रदेशात निवडणुका लढवल्या पण त्यांचा अपमानजनक दारुण पराभव झालाय. आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये यश मिळालं तरी गोव्यात त्यांचा सुपडा साफ झाला. या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस सोडून इतर प्रादेशिक पक्षांची आघाडी स्थापन करण्याचे वचन दिलं आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र, छत्तीसगड, तमिळनाडू, बंगाल या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतलीय. राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी समान कार्यक्रमांच्या आधारावर सर्व विरोधीपक्षांनी एकत्र यावं असं म्हटलं आहे. त्याला कितपत यश मिळतं हाही एकप्रश्नच आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीत आप, तृणमूल आणि शिवसेनेची कामगिरी पाहिल्यानंतर प्रादेशिक पक्षांनी भाजपला मागे सोडलं तरी स्पर्धा करता येणार नाही, असं दिसतं. मात्र पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला जे काही यश मिळालं आहे तेअकल्पनिय तर आहेच, पण त्यांचा हा विजय राष्ट्रीय राजकारणातला टर्निंग पॉईंट ठरण्याची शक्यता निर्माण झालीय. याचा विचार प्रादेशिक पक्ष करणार आहेत का हा खरा सवाल आहे. या निवडणूक निकालाच्या धामधुमीत याकडं विश्लेषकांचं लक्ष गेलेलं दिसत नाही. पंजाबमधल्या विजयामुळं आता ‘आप’ला ७ खासदार राज्यसभेत पाठवता येतील. म्हणजे त्यांच्या राज्यसभा खासदारांची संख्या ही १० होईल. भाजप, काँग्रेस आणि तृणमूलनंतर तो राज्यसभेतला चौथ्या क्रमांकाचा पक्ष होईल! त्यामुळं भाजपची राज्यसभेतली ताकद कमी होणार आहे, त्यामुळं भाजपसमोर विधेयक मंजूर करण्यात, कायदे करण्यात अडचणी निर्माण होणार आहेत. शिवाय उत्तरप्रदेशात भाजपच्या कमी झालेल्या ५७ जागा, इतर राज्यातही सत्ता मिळाली असली तरी जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळं राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाजपला इतर पक्षांना सोबत घ्यावं लागणार आहे. भाजपला राजमार्गावर यश मिळालं असलं तरी कोंडी वाढणार आहे, ती मोदींसाठी डोकेदुखी ठरेल, हे इथं लक्षात घ्यायला हवं!
हरीश केंची
९४२२३१०६०९

Saturday, 5 March 2022

आत्ममग्न राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार!

"कधी नव्हे इतकी अस्वस्थता सामान्यांच्या मनांत निर्माण झालीय. देशातला राज्यकारभार दोघांच्या तालावर हाकला जातोय तर राज्यात बारभाईंच्या! देशात द्विचालकानुवर्तीत राजकारणानं हुकूमशाहीची चुणूक दिसतेय तर राज्यात बारभाईंचा सावळागोंधळ! 'परिस्थितीचं झालं थोडं अन न्यायालयांनी दामटलं घोडं!' बारभाईच्या कारभाराला न्यायालयात एकापाठोपाठ थपडा बसताहेत. हे कमी होतं म्हणून की काय राज्यपालांनी आपले रंग उधळलेत. मराठी माणसाचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपतींबद्धल, सावित्रीबाईबद्धल जे उद्गार काढलेत त्यानं मराठी मन व्यथित झालंय. आता तर त्यांनी विधिमंडळातलं अभिभाषणच अर्धवट सोडलंय. तिकडं युक्रेनमध्ये आपले विद्यार्थी अडकलेत त्यांना सोडविण्यासाठी सत्ताधाऱ्यांची मुत्सद्देगिरी दिसत नाही. ते निवडणूक प्रचारात दंग आहेत. सतत 'इलेक्शन मूड' असलेला राजा आत्ममग्न आहे, प्रजा हे सारं दिसत असतानाही आंधळी बनलीय तर सारा दरबार अधांतरी आहे, कुणाचा पायपोस कुणाला नाही!
---------------------------------------------------

जगात तिसरं महायुद्ध होतेय की काय अशी भीती व्यक्त केली जातेय. रशिया, अमेरिका आणि चीन या तीन बलाढ्य राष्ट्रांच्या वादात सारं जग ढवळून निघतेय. याची चाहूल लागूनही आपण आत्ममग्न आहोत. सत्तापिपासू निवडणुकीत व्यग्र आहेत. जीव मुठीत धरून युक्रेनच्या सीमेबाहेर येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणण्याचा प्रयत्न होतोय, पण युद्धजन्य स्थितीतून तिथल्या भारतीयांना बाहेर पडतांना मोठ्या संकटांना तोंड देत महामुश्किलीने रोमानिया, पोलंड वा इतर काही देशांच्या सीमेवर अन्नपाणीविना हजारो मैल चालत यावं लागतंय. तिथं महासंकटातून पोहोचलेल्याना आणण्याचं काम केलं जातंय. तिथं मंत्री जाताहेत. परतणाऱ्यांना मोदी झिंदाबादच्या घोषणा देण्यास सांगितलं जातंय पण ते विद्यार्थी भारतमातेचा जयजयकार करतात मात्र मोदींचा करायला नाकारताहेत. याच्या चित्रफिती व्हायरल झाल्या आहेत. पण आपलं सरकार आपली पाठ थोपटून घेण्यातच धन्यता मानतेय. 'मोदींच्या विनंतीवरून भारतीयांना परतण्यासाठी रशियानं सहा तास युद्ध थांबवल्याच्या' पोस्ट सोशल मीडियावरून भक्तमंडळी करताहेत. त्यांना परराष्ट्रखात्यानंच पत्रक काढून असं काही नसल्याचं जाहीर केलं. जर मोदी युद्ध थांबवू शकले असते तर त्या विद्यार्थ्यांना रशियामार्गे भारतात का आणलं नाही. वा त्यांची मदत का घेतली नाही. त्या भारतीयांचे हाल तरी झाले नसते. याउलट रशियानं तीन हजार बंधक असल्याचं सांगितलंय. त्यांचं काय?याचं भक्तांकडं उत्तर नाही. जर सहा तास युद्ध मोदींनी थांबवलं असेल तर सहातासानंतर ते पुन्हा सुरू करायला मोदींनी सांगितलं का? किती बालिश प्रकार हा! तिकडं विद्यार्थी संकटात असताना प्रधानमंत्र्यांना साडेचार तास वाराणशीत रोड शो करायला वेळ आहे. आज ते पुण्यात विविध उपक्रमांच उदघाटन करण्यासाठी येताहेत. उदघाटन कसलं; तो तर महापालिका निवडणुकीचा प्रचारच ते करताहेत. त्यासाठीच ते इथं येताहेत. २०१६ ला महापालिका निवडणुकीपूर्वी ते पुण्यात आले होते. त्यांनी मेट्रोचं भूमिपूजन केलं होतं. त्यानंतर भाजपची सत्ता इथं आली. 'पुण्यात जे पिकतं ते इतरत्र फोफावतं' हा समज असल्यानं पुणं, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक या लगतच्या महापालिका जिंकायच्या या उद्देशानं हा दौरा आहे. यात वावगं असं काहीच नाही. कारण प्रधानमंत्री कायम इलेक्शन मूड मध्येच असतात. असो.

गेले काही दिवस राज्यपाल प्रसिद्धीमाध्यमांतून गाजताहेत. आधी त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्धल विचित्र उद्गार काढले. त्यानंतर 'मराठी राज्य भाषा दिनी' औरंगाबादेत तापडिया सभागृहात झालेल्या 'समर्थ साहित्य परिषदे'त रामदासाच्या 'गुरू'पट्टीनं शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाला मापणं, हा राज्यपालांचा आगाऊपणाच होता. म्हणूनच शिवप्रेमी-भक्तात संताप निर्माण झाला. 'कोण शिवाजी? त्यांना रामदास गुरू म्हणून लाभले नसते तर ते घडलेच नसते!' असं आपल्या अकलेचे तारे त्यांनी तोडले. हे कमी होतं म्हणून की काय त्यांनी विधिमंडळातलं अभिभाषण अर्धवट सोडलं. राज्याच्या कारभारात 'राज्यपाल' आपल्या 'पक्षीय' निष्ठेची तंगडी घालून मंत्रिमंडळानं मंजूर केलेल्या निर्णयावर अंमलबजावणीसाठीची स्वाक्षरी करताना कशी अडवाअडवी करू शकतो; मुख्यमंत्र्याला निर्णयातल्या त्रुटी दाखवून, जाब विचारून; सरकारच्या व्यवहाराबद्धल लोकमानसात संशय कसा निर्माण करू शकतो; त्याचे धडे गेली २ वर्षे पश्चिम बंगालचे ममता बॅनर्जींचे सरकार आणि महाराष्ट्रातील ’ठाकरे सरकार’ अनुभवत आहेत. 'रा.स्व. संघ' संस्कारित भगतसिंह कोश्यारी हे ५ सप्टेंबर २०१९ पासून 'राज्यपाल' आहेत. त्यांची नेमणूक राष्ट्रपतींनी केली असली, तरी निवड केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या सूचनेनुसार केलीय. ही नेमणूक झाली तेव्हा राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात होता. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि त्यांच्या छत्रछायेत ७७ वर्षांच्या कोश्यारींना वृद्धापकाळ घालवता येईल, ह्या हिशोबानं त्यांना 'राज्यपाल'पदी बसवण्यात आलं. पण घडलं उलटं! कोश्यारी अपशकुनी ठरावेत, अशाप्रकारे त्यांनी पहाटेच्या मुहूर्तावर केलेला 'देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार'चा शपथविधी ८० तासांत उलटला आणि 'महाविकास आघाडी'च्या 'ठाकरे सरकार'चा शपथविधी त्यांना करावा लागला. तेव्हापासून विरोधी पक्षनेते झालेल्या फडणवीस यांना सरकारवर सोयीनं तीर मारण्यासाठी कोश्यारींना 'राज्यपाल'पदाची 'नथ' वापरू देण्याचं काम लागलं. ह्या सहकार्यात कोश्यारी आपल्या पक्षीय निष्ठा लपवू शकले नाहीत. कारण त्यांचा राजकीय प्रवास हा उत्तराखंडातला 'भाजप'चा कार्यकर्ता ते ’राष्ट्रीय उपाध्यक्ष' असा आहे. १९९७ मध्ये ते उत्तरप्रदेश राज्याच्या विधान परिषदेत 'आमदार' म्हणून निवडून गेले. २००० मध्ये उत्तरप्रदेशाचे विभाजन होऊन उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली. ते उत्तराखंड 'भाजप'चे पहिले प्रदेशाध्यक्ष झाले आणि पहिल्या मंत्रिमंडळात मंत्रीही झाले. २००१-०२ या काळात ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर २००२ ते ०७ या पाच वर्षांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. २००८ मध्ये ते राज्यसभा 'खासदार’ झाले आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते नैनिताल मतदारसंघात विजयी होऊन 'खासदार'ही बनले. ह्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत ते 'संघ-भाजप'शी एकनिष्ठ राहिले. त्यांच्याकडून 'राज्यपाल' म्हणून निःपक्षपातीपणाची अपेक्षा करणं, हे संघाच्या 'काळ्या टोपी' ऐवजी डोक्यावर 'गांधी टोपी' घाला, असं व्यर्थ सांगण्यासारखं आहे. प्रश्न टोपीचा नाही, तर टोपीखालच्या डोक्याचा आहे. संघ संस्कारितांच्या जे डोक्यात असेल, ते खाजगीत बाहेर येईल. पण ते जाहीरपणे बोलण्याचं टाळतील. मात्र अशी कामं कोश्यारी यांच्यासारख्यांकडून कशी परस्पर होतील, ते पाहणं हीच तर संघ-शिकवण आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गोंधळात केवळ दोन मिनिटेच अभिभाषणाचा काही भाग वाचून सभागृह सोडल्यानं घटनात्मक कर्तव्य त्यांनी पूर्ण केलं नाही, अशी टीका सुरू झालीय. महाराष्ट्रात असा प्रकार पहिल्यांदाच घडला असला तरी राज्यपालांनी अभिभाषण पूर्ण न वाचताच सभागृह सोडण्याचं अलीकडच्या काळात अनेक प्रकार घडले आहेत. अगदी महाराष्ट्रात असा प्रकार घडला त्याच्या २४ तास आधीच गुजरातमध्ये राज्यपाल देवव्रत आचार्य यांनी अभिभाषण वाचन अर्धवट थांबविलं आणि सभागृह सोडलं होतं. राज्यपालांचं अभिभाषण ही घटनात्मक प्रक्रिया असली तरी सुरु होणाऱ्या तेलंगणा विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी राज्यपालांच अभिभाषणच ठेवलेलं नाही. केरळमध्ये गेल्याच आठवड्यात राज्यपालांच्या अभिभाषणावरून पेच निर्माण झाला होता.असो.

हे सारं घडत असताना राज्यात सारंकाही आलबेल आहे असं म्हणवत नाही. अनेक प्रश्न रेंगाळले आहेत तर काही प्रलंबित आहेत. राज्यातलं मराठा आरक्षण, ओबीसींचं राजकीय आरक्षण, एसटीचं सरकारीकरण, विधानसभा अध्यक्षाची निवड, विधानपरिषदेतल्या बारा आमदारांची नियुक्ती, एमपीएससीच्या नेमणुका, असे अनेकप्रश्न हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय. तिकडं अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्याचा प्रकार, वाझे प्रकरण, शंभर कोटीच्या खंडणीचा आरोप, वरिष्ठ पोलीस अधिकारी परमवीरसिंह यांचं प्रकरण, अनिल देशमुख, नवाब मलिक, व इतरांवर ईडीची कारवाई, आर्यन खान-समीर वानखेडे प्रकरण, काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, बलात्काराचा आरोप, किरीट सोमय्या यांचं एकापाठोपाठ एक आरोपाचं सत्र, न्यायालयात गेलेल्या प्रत्येक प्रकरणात सरकारला आलेलं अपयश. रोज उठून संजय राऊत, किरीट सोमय्या, चंद्रकात पाटील, फडणवीस आणि त्यांची ब्रिगेड यांच्या पत्रकार परिषदा, मुख्यमंत्र्यांचं आजारपण, प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचा वाढलेला माज. परीक्षांचा गोंधळ आणि त्यातला भ्रष्टाचार एक ना दोन अशा अनेक गोष्टींनी राज्यातला सामान्य नागरिक स्थंभीत झालाय. महाविकास आघाडी म्हणजे बारभाईंचा कारभार झालाय. मुख्यमंत्र्यांचं लक्ष नाही, उपमुख्यमंत्रीच सारा गाडा हाकताहेत. मंत्रिमंडळात समन्वय राहिलेला दिसत नाही. सरकार म्हणून कुणी विरोधकांनी उपस्थित केलेल्या सामोरं जाताना दिसत नाही. राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांनी आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी केली. खरं तर त्यांनी आपलं अभिभाषण सुरू ठेवायला हवं होतं, पण तसं त्यांनी केलं नाही. सरकारनं तयार केलेलं भाषण न वाचताच त्यांनी राष्ट्रगीत न होऊ देताच त्यांनी सभागृह सोडलं. हे त्यांचं राज्यपाल म्हणून आजवरच्या सरकारविरोधातल्या भूमिकेला साजेसं वागणं होतं. राजकारणात काहीही घडू शकतं इतकी अस्थिरता आज आहे. दाखवलं जातंय तेवढं वैचारिक मतभेद आता राहिलेले नाहीत. मुळात कुणीही कुठल्याही राजकीय विचाराशी निष्ठेनं बांधलेला नाही. मूल्याधिष्ठित राजकारण नाहीसं झालंय. अगदी भाजपचे कार्यकर्ते, नेते धरून हे म्हणता येईल. आज सर्वत्र चलती आहे ती भुरट्या राजकारण्यांची! सत्तेसाठी शक्य होईल ते सारं करण्याचा पक्का इरादा करूनच आता लोक राजकारणात पडतात. सारं काही करतात आणि आव मात्र तत्त्व-निष्ठेचा, निःस्वार्थी जनसेवेचा आणतात. जो मिळेल तिथं मिळेल तेव्हा हात धुऊन घेतो तोच वारंवार माझे हात स्वच्छ आहेत अशी ग्वाही देतो, हे आता सगळे जाणतात. लोक बोलत नाहीत त्याची कारणंही आता सगळ्यांनाच ठाऊक आहेत. कोण कुठे होते नि आता कुठे पोहोचले ह्या गोष्टी काय लोकांना दिसत नाहीत? महिना ओलांडताना खिशाचा तळ पुनःपुन्हा चाचपून भोके पडलेल्या विजारी घालणारे आपण म्हणजे कंडक्टरनं बसचे तिकीट देताना साडेतीन रुपयांऐवजी तीन रुपये घेतले तरी लॉटरी लागल्याचा आनंद होणारे! ज्यांना खरोखर लॉटरीच लागलीय त्यांच्याकडं बघत 'देवा दया तुझीही, ही शुद्ध दैव लिला, लागो न दृष्ट आमची, त्यांच्याच वैभवाला l'असं म्हणत बसण्याखेरीज आणखी काय करणार! मुद्दा आहे, सत्तेसाठी सारं काही करायला तयार असणाऱ्या सत्तानिष्ठ राजकारण्यांचा!

देशातली आजची एकूण राजकीय परिस्थिती पाहता हिटलरच्या वागण्याची आठवण येते. एक दिवस हिटलर पार्लमेंटमध्ये कोंबडा घेऊन आला आणि सर्वांच्या समोर त्याची एक एक पिसं खेचून काढू लागला. कोंबडा वेदनेनं विव्हळत होता, सुटण्यासाठी तडफडत होता. एक एक करून हिटलरनं त्याची सर्व पिसं खेचून काढली नंतर कोंबड्याला जमीनीवर फेकुन दिलं. त्यानंतर खिशातून काही दाणे काढून कोंबड्याच्या समोर टाकून सावकाशपणे पुढं पुढं चालू लागला. तो कोंबडा दाणे खात खात हिटलरच्या मागं मागे चालू लागला. हिटलर सारखं सारखं दाणे टाकत होता आणि कोंबडा ते खात त्याच्या मागून चालत होता. शेवटी तो कोंबडा हिटलरच्या पायाजवळ येऊन उभा राहिला. हिटलरनं स्पीकरकडं पाहीलं आणि महत्वाचं वाक्य बोलून गेला, 'लोकशाही असलेल्या देशातल्या जनतेची अवस्था ही या कोंबड्यासारखी असते. त्यांचे नेते जनतेचं सर्व काही लुटून घेतात, आणि त्यांना लुळपांगळं, पार गरीब करून टाकतात आणि त्यानंतर त्यांच्या पुढ्यात थोडं थोडं तुकडा टाकत राहतात आणि नंतर त्यांच दैवत बनतात!
ही गोष्ट खरी असो नाहीतर काल्पनिक, पण वास्तव मात्र नाकारता येत नाही! आज भारतातल्या लोकांची अवस्था ही हिटलरच्या त्या कोंबड्यासारखी आहे. पुराणात अमृतमंथन नावाचा एक शब्द आला आहे. त्या सागराच्या मंथनामध्ये देव आणि दानवांनी समुद्र घुसळून काढला आणि त्यातून अमृतकुंभ हाती लागला, अशी ती कथा आहे. पण त्या घुसळणीतून फक्त अमृतच हाती लागलेलं नव्हतं. त्यातून हलाहल नावाचं अतिशय दाहक विषही समोर आलेलं होतं. त्याचं काय करायचं, असा गंभीर प्रश्न उभा ठाकला आणि ते भोलानाथ शंकरानं एकट्यानं पिऊन पचवलं, असंही कथेत म्हटलेलं आहे. म्हणून तर अमृतापेक्षाही ‘हलाहल पचवणं’ हा शब्दप्रयोग अधिक वापरात आला. घुसळण्यातून प्रत्येकवेळी अमृतच, किंवा आपल्याला हवं तेच हाती लागतं असं नाही. पण जे हाती लागेल ते पचवून पुढे जाता आलं पाहिजे, हा त्यातला आशय आहे. पण ती घुसळण चालू असतं, तेव्हा हलाहल सुद्धा हाती लागण्याची शक्यताही अनेकांच्या पचनी पडत नाही. मग हलाहल समोर आलं, तर अशा लोकांची अवस्था काय होईल? त्या कथेतला आशय म्हणून महत्वाचा आहे. अमृताची अपेक्षा जरूर करावी, पण त्यावरच विसंबून भविष्याकडं बघू नये. हलाहल पचवण्याची तयारीही ठेवण्यात शहाणपणा असतो. मात्र भावनाविवश लोकांना त्याचं भान रहात नाही. ते फक्त अमृताखेरीज काहीच हाती लागणार नाही; अशा आशेवर जगतात. किंवा हलाहलाची कल्पनाही सहन करू शकत नाहीत. परिणामी त्यांच्या पदरी निराशा किंवा वैफल्य आल्यास नवल नसतं. लोकशाहीच्या युगात आणि निवडणूकीच्या मंथनात आपल्या हाती सर्वोत्तम काही असेल तेच लागेल; अशी प्रत्येकानं अपेक्षा जरूर बाळगली पाहिजे. पण प्रत्येकाचे सर्वोत्तम वेगवेगळं असतं आणि म्हणूनच सर्वांनाच मंजूर होईल असं सर्वोत्तम वा अमृत हाती लागण्याची शक्यता जवळपास नसते. एकाची अपेक्षा पुर्ण होते आणि इतरांना हलाहल पचवण्याची वेळ येते!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

आजही चरणसिंगाचं आव्हान कायम


केंद्रातील सत्तेचं दार उत्तरप्रदेशच्या निवडणूकीच्या माध्यमातून उघडलं जातं, असं म्हटलं जातं. ते खरंही आहे. म्हणूनच प्रधानमंत्री आणि त्यांचं अख्ख मंत्रिमंडळ तिथं प्रचारात दंग आहे. पंजाबमध्ये आपल्या जीवाला धोका आहे असं म्हणणाऱ्या प्रधानमंत्र्यांना वाराणशीत तब्बल साडेचार तास रोड शो केला. तिकडे युक्रेनवर रशिया हल्ले करतोय, हजारो भारतीय विद्यार्थी तिथं अडकलेत. पण आम्ही मात्र सत्तेसाठी झगडतोय. 'रोम जळतोय अन निरो फिडेल वाजवतोय!' याची प्रचिती यावी अशाप्रकारे प्रधानमंत्री मंदिरात डमरू वाजविण्याचा आनंद घेताहेत. उत्तरप्रदेशातल्या निवडणुका या सर्व राज्यकर्त्यांच्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत. भाजपला इथं अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांचं आव्हान उभं ठाकलंय. उच्चशिक्षित जयंत चौधरी हे चरणसिंग यांचे नातू आहेत. याच चरणसिंग यांनी उत्तरप्रदेशातलं काँग्रेसचं पहिल्यांदा अस्तित्व संपवलं होतं, पक्षाचं वर्चस्व मोडीत काढलं होतं, हा इतिहास आहे. त्याचा हा धांडोळा!
--------------------------------------------------

ही गोष्ट त्या काळातली आहे, जेव्हा उत्तरप्रदेशात काँग्रेसचाच बोलबाला होता आणि गोविंद वल्लभ पंत हे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होते. उत्तरप्रदेशच्या राजकारणाला त्यांच्यामुळं स्थैर्य मिळायचं. पण ते केंद्रात गृहमंत्रीपद स्वीकारून दिल्लीत गेले त्यानंतर राज्यात काँग्रेसची शक्ती कमी व्हायला सुरुवात झाली. पंत यांच्यावर नेहरू एवढे अवलंबून होते की, उत्तरप्रदेशात पंत यांना आव्हान निर्माण होऊ नये म्हणून त्यांचे अत्यंत जवळचे रफी अहमद किडवाई यांना त्यांनी दिल्लीत नेलं होतं. चरणसिंह हे गोविंद वल्लभ पंत यांना प्रचंड मानणारे होते. पंत यांना वाईट वाटेल असं काहीही ते करत नव्हते. पंत दिल्लीला जाईपर्यंत चरणसिंह यांनी अशी राजकीय भूमिका घेतली नव्हती ज्या भूमिकेसाठी ते आज सगळीकडे ओळखले जातात. उत्तरप्रदेशच्या सत्तेच्या उठाठेवीत चंद्रभानू गुप्ता चरण सिंह यांच्यापेक्षा डोईजड ठरत होते आणि काँग्रेसमध्ये चरणसिंह यांच्या तुलनेत गुप्ता यांच्या समर्थकांची संख्या खूप जास्त होती. "नंतर चरणसिंह यांच्यावर संधीसाधूपणाचे जे आरोप लागले ते उत्तर प्रदेशच्या राजकारणात टिकण्यासाठी एकप्रकारे त्यांच्यासाठी गरजेचं बनलं होतं! असं चरणसिंह यांची आत्मकथा लिहिणारे पॉल ब्रास यांनी त्यांच्या 'अॅन इंडियन पॉलिटिकल लाईफ, चरणसिंह अँड काँग्रेस पॉलिटिक्स' यात मध्ये लिहिलं आहे. भारताच्या राजकीय इतिहासात चौथ्या सार्वत्रिक निवडणुकांनी चांगलीच खळबळ माजवली होती. तिथूनच काँग्रेसचं पतन आणि त्यांना पर्याय म्हणून सशक्त पण विभागलेल्या विरोधकांचा उदय व्हायला सुरुवात झाली होती. या निवडणुकीत प्रथमच काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळण्यात अपयश आलं होतं. ४२३ सदस्यांच्या उत्तरप्रदेश विधानसभेत १९८ जागांसह ते सर्वात मोठा पक्ष बनले होते, मात्र मुख्यमंत्री सी.बी.गुप्ता यांना विजय मिळवताना अक्षरशः नाकी नऊ आले होते. अवघ्या ७३ मतांनी त्यांचा विजय झाला होता. दुसरा सर्वांत मोठा पक्ष जनसंघाकडे काँग्रेसच्या तुलनेत अत्यंत कमी ९७ जागा होत्या, त्यामुळं काँग्रेसनं ३७ अपक्ष आणि इतर लहान पक्षांच्या साथीनं कसंबसं सरकार स्थापन केलं होतं, पण त्यावर पहिल्या दिवसापासून प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले होते. विजयी झालेल्या ३७ अपक्षांमध्ये १७ काँग्रेसचे होते, त्यामुळंही काँग्रसेला फायदा झाला होता. याच वातावरणात चरणसिंह यांनी नेता पदासाठी सीबी गुप्ता यांना आव्हान देण्याचा निर्णय घेतला होता. पण केंद्रानं हस्तक्षेप करत चरणसिंह यांना माघार घेण्यासाठी राजी केलं होतं. त्यामुळं सी.बी.गुप्ता बिनविरोध काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडून आले होते. पण जेव्हा मंत्रिमंडळ स्थापन करण्याचा विषय समोर आला तेव्हा चरणसिंह यांनी सी.बी.गुप्ता यांच्याकडे त्यांच्या काही समर्थकांऐवजी स्वतःच्या काही समर्थकांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याची मागणी केली. 'चरणसिंह यांची अशी इच्छा होती की, सी.बी. गुप्ता यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात राम मूर्ती, मुजफ्फर हुसेन, सीताराम आणि बनारसीदास यांना समाविष्ट करू नये, पण गुप्ता यांनी त्यांचं ऐकलं नाही. "उदित नारायण शर्मा आणि जयराम वर्मा हे चरण सिंह यांचे अत्यंत निकटवर्तीय होते, त्याचा मंत्रिमंडळात समावेश करावा अशी त्यांची इच्छा होती. पण गुप्ता यांनी तेही मान्य केलं नाही!' असं सुभाष कश्यप यांनी त्यांच्या 'द पॉलिटिक्स ऑफ डिफेक्शन:अ स्टडी ऑफ स्टेट पॉलिटिक्स इन इंडिया' मध्ये म्हटलं आहे.

'मी २६ मार्चला होळीच्या दिवशी चरणसिंह यांना भेटायला गेलो होतो. पण ते अशा लोकांबरोबरच होते, ज्यांना त्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करायचं होतं. त्यावेळी त्यांच्याशी बोलणं शक्य नव्हतं. त्यामुळं मी परत गेलो. मी त्यांना म्हटलं की, आपण २ एप्रिलला बोलू या. पण त्याच्या एक दिवस आधी १ एप्रिललाच चरणसिंह यांनी पक्ष सोडला. हे मला समजलं!' असं नंतर चंद्रभानू गुप्ता यांनी त्यांचं आत्मचरित्र 'ऑटोबायोग्राफी: माय ट्रायफ्स अँड ट्रॅजिडीज' मध्ये लिहिलं होतं. 'मी चरणसिंह यांच्या सल्ल्यानं जयराम वर्मा यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी तयारही झालो होतो. त्याशिवाय सीताराम यांच्याशिवाय चरणसिंहांच्या विरोधकांना मंत्रिमंडळात समाविष्ट न करण्याच्या मुद्द्यावरही राजी झालो होतो. पण तरीही काही फायदा झाला नाही. चरणसिंह यांना मी त्यांना एकटं पाडत असल्याची भीती होती!' असं त्यांनी लिहिलंय. तोपर्यंत चंद्रभानू गुप्ता यांच्याकडेही पूर्ण बहुमत नव्हतं आणि संयुक्त विधायक दलचे नेते रामचंद्र विकल यांच्याकडेही बहुमत नव्हतं. तरीही राज्यपाल गोपाल रेड्डी यांनी गुप्ता यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं. चरण सिंह यांनी गुप्ता यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आणि बिगर काँग्रेसी पक्षांबरोबर चर्चा सुरू केली. ३ एप्रिलला त्यांनी संयुक्त विधायक दलाचे नेते म्हणून निवडण्यात आलं. या आघाडीचे नेते चरणसिंह असले तरी यातील सर्वाधिक ९८ सदस्य जनसंघाचे होते. ते या आघाडीतील दुसरा घटक पक्ष सोशलिस्ट पार्टीपेक्षा दुपटीपेक्षा अधिक होते. त्यांच्या सदस्यांची संख्या चरणसिंह यांच्या पाठिशी असलेल्या आमदारांच्या संख्येपेक्षा पाचपटीनं अधिक होती!' असं सुभाष कश्यप यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे. 'चरणसिंह यांना या आघाडीचे नेते बनवलं होतं. भारतीय जनसंघाचे रामप्रकाश उपमुख्यमंत्री होते. तर दुसऱ्या मोठ्या पक्षाला महत्त्वाचं अर्थ खातं दिलं होतं!' असं त्यांनी लिहिलं आहे. चरणसिंह यांना काँग्रेसमधून फोडण्यात राजनारायण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, असं म्हणतात. ते अनेकदा दिल्लीहून लखनऊला गेले. चरणसिंह यांच्यावर काँग्रेसमधून राजीनामा न देण्यासाठी बनारसीदास सारख्या अनेक नेत्यांचा दबाव होता, पण राजनारायण यांनी त्यांना राजी केलं. संयुक्त विधायक दल आघाडीचं सरकार हा भारतीय राजकारणातला अनोखा प्रयत्न होता. त्यात कट्टर डाव्यांपासून कट्टर उजव्या अशा नेत्यांचा समावेश होता. पॉल ए ब्रास त्यांच्या पुस्तकात सांगतात, 'स्वतंत्र पार्टी पूर्णपणे उजव्या विचारसरणीचा पक्ष होता. त्यांचे १३ पैकी ५ आमदार रामपूरमधून विजयी झाले होते. त्यांचे नेते अख्तरअली यांना अबकारी आणि वक्फ प्रकरणांमध्ये मंत्री बनवण्यात आलं होतं!' ते संयुक्त विधायक दल सरकारच्या मंत्रिमंडळातील एकमेव मुस्लीम मंत्री होते. या निवडणुकीत प्रथमच काँग्रेसला मुस्लिमांनी साथ दिली नाही, असं त्यांनींच मला सांगितलं होतं. 'विरोधकांच्या तुलनेत तेव्हाही काँग्रेसमध्ये मुस्लिमांची संख्या अधिक होती, पण ही काँग्रेसपासून मुस्लीम दुरावण्याची सुरुवात होती. कारण आधी काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये जवळपास आपोआत पाठिंबा मिळत होता!' असं पॉल ए ब्रास यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.

संयुक्त विधायक दल सरकारला पहिलं आव्हान हे चंद्रभानू गुप्ता यांच्या नेतृत्वात काँग्रेसने त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला तेव्हा मिळालं. पण हा प्रस्ताव अपयशी ठरला. सरकारच्या बाजूनं २२० आणि विरोधात २०० मतं पडली होती. पण सुरुवातीपासूनच या आघाडीत फूट पडू लागली होती. जनसंघ सर्वांत मोठा घटकपक्ष होता म्हणून चरणसिंह यांनी त्यांना शिक्षण, स्थानिक प्रशासन आणि सहकार हे तीन विभाग दिली होते. नंतर चरणसिंह यांनी ही खाती घेऊन त्यांना सार्वजनिक कार्य आणि पशुपालन खाते दिले. साहजिकच जनसंघाला हे आवडलं नाही. माकपनं सरकारी कर्मचाऱ्यांच्या कपातीवर सर्वात आधी सरकारला विरोध केला. संयुक्त सोशालिस्ट पार्टीने इंग्रजी हटवण्यासाठी आंदोलन सुरू केलं तेव्हा चरणसिंह यांच्याशी त्यांचे तीव्र मतभेद झाले. हे मतभेद एवढे वाढले की, दोन कॅबिनेट मंत्र्यांनी इंग्रजी हटवण्याच्या मुद्द्यावर अटक करून घेत, सरकारची खुलेआम बदनामी केली. ५ जानेवारी, १९६८ ला एसएसपीनं देखील संयुक्त विधायक दल सरकारमधून बाहेर पडायचं ठरवलं. 'एसएसपीच्या मंत्र्यांनी राजीनामे आपल्याकडे न देता राज्यपालांकडे दिले यावर चरण सिंह यांनी आक्षेप घेतला!' असं कृष्णनाथ शर्मा यांनी त्यांच्या 'संविद गव्हर्नमेंट इन उत्तरप्रदेश' यात लिहिलं आहे. चरणसिंह यांच्या मार्गातील सर्वांत मोठा काटा होते, संयुक्त सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष अर्जुनसिंह भदोरिया. भदोरिया प्रजा सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष होते आणि कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते तरीही एसएसपी पक्ष त्यांच्या मागे असायचा. "विधानसभेत एसएसपीचे नेते आणि आघाडी सरकारच्या समन्वय समितीचे सरचिटणीस उग्रसेन यांनी त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निर्देशांचं पालन करत राजीनामा दिला आणि एसएसपीच्या सर्व सदस्यांना संयुक्त विधायक दलमधील सर्व पक्षांना बाहेर पडण्यास सांगितलं!' असं कृष्णनाथ यांनी लिहिलं आहे. १८ फेब्रुवारी १९६८ ला चरणसिंह यांनी राज्यपालांना राजीनामा देत विधानसभा बरखास्त करून नव्यानं निवडणुका घेण्याची शिफारस केली. राज्यपालांनी त्यांची शिफारस मान्य केली नाही आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. तसं पाहता चरणसिंह यांचं सरकार केवळ काही महिने चाललं. मात्र त्यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले आणि नंतर मुख्यमंत्री बनलेले रामप्रकाश यांनी म्हटलं की, 'चौधरी चरणसिंह चांगले प्रशासक आहेत. पण ते प्रशासनात राजकीय विचारांची पर्वा करत नाही, त्यामुळं कधी कधी अडचणी येतात. 'चरणसिंह यांच्या मंत्रिमंडळातील प्रजा सोशलिस्ट पार्टीचे एकमेव प्रतापसिंह यांनीही चरणसिंह यांचं कौतुक करत म्हटलं होतं की, चरणसिंह हे एक महान नेते होते. त्यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकत नव्हते!' दुसरीकडे काँग्रेस नेते नवलकिशोर होते. त्यांनी चरणसिंह यांच्यावर जातीवादी असल्याचा आरोप केला. चरणसिंह यांना हे एवढं जिव्हारी लागलं की, त्यांनी ही मुलाखत छापणारं वृत्तपत्र नॅशनल हेराल्ड विरोधात कायदेशीर कारवाईची धमकी दिली.

चरणसिंह आणि इंदिरा गांधी यांच्यातील दुराव्याची सुरुवात इथूनच झाली. चरणसिंह यांनी इंदिरा गांधींना पत्र लिहिलं. 'या निवडणुकीत काँग्रेसला केवळ १९८ जागा मिळाल्या. तर विरोधकांना २२७ जागांवर विजय मिळाला आहे. मी लगेचच विरोधी पक्षांबरोबर गेलो असतो तर हा आकडा २७५ च्या पुढं गेला असता. पण मी तसं केलं नाही! त्यामुळं चंद्रभानू गुप्ता यांच्या विरोधात विधिमंडळ नेता म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पण तुमच्या संदेशवाहकांनी मला तसं करण्यापासून अडवलं तर मी माझं नाव मागे घेतलं. एवढंच नाही तर मीच नेतेपदासाठी चंद्रभानू गुप्ता यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला!' असं त्यांनी पत्रात लिहिलं. एवढंच नाही तर त्यांनी इंदिरा गांधींना आणखी एक पत्र लिहिलं. त्यात त्यांनी लिहिलं की, "ते जेव्हा आघाडी सरकारचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी केवळ इंदिरा गांधीच्या विरोधातील आंदोलन मोडून काढलं नाही तर त्यांचे सहकारी राज नारायण आणि इतरांना अटक करून तुरुंगातही पाठवलं. 'मात्र, इंदिरा गांधी आणि चरणसिंह यांच्यातील हा दुरावा कमी होऊ शकला नाही. चरणसिंह केंद्रात गृहमंत्री बनले तेव्हा त्यांनी इंदिरा गांधींना अटक करून तुरुंगात टाकलं. 'मोरारजी देसाईंच्या विरोधातील मोहिमेत इंदिरा गांधींनी आधी त्यांना साथ दिली. पण काही दिवसांतच ते पंतप्रधान बनले त्यानंतर काही दिवसांत त्यांनी सरकारचा पाठिंबा मागे घेतला!'
हरीश केंची,
९४२२३१०६०९

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...