"कोरोना व्हॅक्सिनचं नियोजन आणि वितरण यात घोळ घातला जातोय. कोरोना संक्रमित लोकांची संख्या प्रतिदिन दोन-अडीच लाखावर जाऊन पोहोचलीय. बेड उपलब्ध होत नाहीत. जणू आपण 'कोरोनाचा विश्वगुरु' बनतोय आपल्या बेपर्वाईनं! सरकार यात आपला काही दोष आहे असं मानत नाही. आणि लोकही त्यांना प्रश्न विचारत नाहीत. गेल्यावर्षी कोरोना आला तेव्हा मध्यप्रदेश सरकार पाडलं गेलं. आता कोरोना आलाय तर महाराष्ट्रातलं पाडलं जातंय! तुमच्या नेत्यांना निवडणुका जिंकता येतात. पराभूत झालेल्या निवडणुकीतून सरकारही बनवता येतं. निवडून आलेलं सरकार पाडताही येतं. सरकार बनवता येत असलं तरी मात्र ते चालवता येतं असं म्हणणं धाडसाचं ठरेल! गेल्यावर्षी देशात कोरोनाचे पाच हजार रुग्ण होताच देशभर लॉकडाऊन लावलं गेलं. आज तशाच रुग्णांची संख्या दोन-अडीच लाख बनलीय. लोकांच्या मनाचा थरकाप उडालाय; पण त्यावर कोणतीच दक्षता घेतली जात नाहीये. उलट नेते सध्या निवडणुकांच्या मूडमध्ये आहेत. प्रचारात दंग आहेत. या स्थितीला सरकार, त्यातले नेते नव्हे तर असं सरकार आणणारे, तुमच्या माझ्यासारखे त्यांना मतं देणारे ४० टक्के मतदार हेच जबाबदार आहेत!"
---------------------------------------
*का* य कोरोनाची भीती वाटतेय ना.....?
मला तर वाटतेय, तुम्हाला वाटतेय का? मी ज्यांना ओळ्खतोय अशांपैकी अनेकजण कोविड पॉझिटिव्ह बनलेत, काही रुग्णालयात आहेत. काही मृत्युमुखी पडलेत. शेजारचा रमाकांत, पुतण्या अरविंद यांचं अकाली निघून जाणं मनाला घोर लावून गेलंय! साऱ्यांनाच या महामारीनं आपल्या विळख्यात घेतलंय. हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत, ऑक्सिजन मिळत नाही. अनेकजण असे आहेत की, त्यांची तब्येत बरी नाही, पण त्यांच्या टेस्टसाठी ३-४ दिवस थांबावं लागतंय. हे मी एखाद्या राज्याबाबत बोलत नाही तर सर्वसाधारण देश पातळीवरचं बोलतोय. म्हणून तुम्हाला विचारतोय की, भीती वाटतेय का? वाटतेय ना? आपण स्वतःला कधी प्रश्न विचारलाय का की ही भीती का वाटतेय? आपण एकदातरी विचार केलाय का? गेल्यावर्षीचं समजू शकतो की व्हायरस नवा होता, कुणालाच त्याची माहिती नव्हती. पण जे याबाबत काही सुचवत होते, त्यांची टिंगलटवाळी केली जात होती. सरकार आणि त्यांच्या भक्तांच्या टोळ्याना आज त्या साऱ्या खऱ्या वाटताहेत. एक वर्षानंतरही आपली राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा जिथल्या तिथंच आहे. उलट ती आणखी कोलमडलीय! मग तुम्ही काहीच विचारणार नाही का? भीती वाटतेय ना तुम्हाला? पण ती कशासाठी वाटतेय? मला सरकारच्या भूमिकेवरून भिती वाटत नाही तर, ती वाटतेय ती तुमच्यामुळे इतर सगळ्यांना भीती वाटतेय...! त्या ४० टक्के लोकांना सांगू इच्छितो की, देशातले साठ टक्के लोक जे भोगताहेत ते तुमच्यासारख्या ४० टक्के लोकांमुळं! कारण आपण कधीच आरोग्यसेवेचा हा 'मुद्दा' होऊच दिला नाही. शिक्षणाचा 'मुद्दा' होऊ दिला नाही. पण कश्मीर हमारा आहे... तिथं प्लॉट खरेदी करायचाय! तुमच्यासाठी हे महत्त्वाचं होतं. तुम्हाला मुसलमानांना आपल्या कह्यात ठेवायचं होतं ना! ठेवलं का? आज स्मशानात कुणाच्या चिता जळताना दिसताहेत? मुसलमानाच्या? कोविड हा कदाचित धर्म पाहून येत असावा! गेल्यावर्षी मीडियानं असंच सांगितलं होतं ना, की कोविडला अमुक एक धर्म फोफावतोय. तुम्हाला जेवढी कब्रस्तान आहेत तेवढ्या स्मशानं हवी होती. ते कशासाठी? तुमच्या सगेसोयऱ्यांच्या मरणासाठी? यासाठीच मतं दिली होती ना! तुमच्यासारखी ४० टक्के मंडळी ४ टक्के लोकांच्या भ्रमात येतात, जे तुम्हाला व्हॉट्सऍप पाठवतात. त्यातून तुमचं ब्रेनवॉश केलं जातं. त्यामुळं ६० टक्के लोकांना हे सारं भोगावं लागतंय. ते लोक तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत!
तुम्ही आरोग्यसेवेचा सवाल तुमच्या नेत्यांना कधी विचारलाच नाही. कोविडसाठी पीएम फंडात किती पैसे आलेत हेही विचारलं नाही. प्रवासी मजदूरांबाबत सवाल विचारला नाही. घरी परतताना किती लोक मेले याचा त्यांच्याकडं याचा डेटा कसा नाहीये? तुम्ही प्रत्येकवेळी मीडियावर भरोसा केलात, पण त्यांनीही याबाबत सवाल विचारले नाहीत. मग आता का घाबरताहात? भीती वाटतेय ना तुम्हाला...! तुम्ही तुमच्या आवडत्या नेत्यांबाबत हजारो पोस्ट करा, पण जेव्हा आरोग्यसेवा आणि शिक्षणाचा विषय येईल तेव्हा अशा नेत्यांवर तुमचं प्रेम उफाळून का येतं? २०१४ च्यावेळी तुम्ही लोकांना भ्रमित करत होतात की, बघा गॅसचे दर किती वाढलेत? पेट्रोल-डिझेलचे दर किती भडकलेत? आज त्याची काय स्थिती आहे? ती कितीही बिघडली तरी तुम्हाला काहीच फरक पडत नाही का? म्हणजे तुम्हाला फक्त तुमचे नेतेच हवेत बस्स...! म्हणजे तुम्ही साऱ्या देशाला मूर्ख बनवलंत; त्यात आम्हीही बनलोत, सगळेच बनलेत! सतत '७० वर्षात काय केलं?' असा घोषा तुम्ही करता. बस्स झालं....! ते आता राहू द्या ७ वर्षाचा हिशेब द्या. आम्ही सरकारला काही विचारत नाही, तर त्या ४० टक्के लोकांना विचारू जे २०१४ मध्ये ३१ टक्के होते. त्या ४० टक्के लोकांनी आम्हाला सांगावं की, कोविडच्या या महामारीत एवढी माणसं का मरताहेत? अशा लोकांसमोर हात जोडावं, कळवळून सांगावं, हवं तर नाक घासून सांगावं अन म्हणावं की, आपल्या आई-वडिलांना, भावा-बहिणींना वाचवा! तुम्ही ज्या मुद्द्यावर मतं देता, त्यावर मीडिया फिरतो, इतर पक्षही मग याच मुद्द्यात लडबडतात! का तर तुम्ही अशाच गोष्टीवर मतदान करताहात. तुम्हाला रिझविण्यासाठी मग सगळेच अशाच मुद्द्यांकडं गेले. कुणाला दुर्गापाठ करायचाय, कुणाला हनुमान चालिसा वाचायचीय, तर कुणाला जय श्रीराम म्हणायचंय!
आज मंदिर-मशीद बंद आहेत. आमचे डॉक्टर, नर्सेस, कोरोना सेवक जे रात्रंदिवस तुमच्यासाठी झगडताहेत. दिवसरात्र काम करताहेत. त्यांच्यासाठी तुम्ही केवळ थाळ्या वाजवल्यात. तुम्हाला त्यांच्यासाठी काही करायचं नाहीये. पण जेव्हा आपल्या घरात एखाद्याचा मृत्यू होतो, तेव्हा आपण त्या डॉक्टरांना शिव्या देतो, अख्खं हॉस्पिटल डोक्यावर घेतो. तुम्ही त्यांच्याकडं जाऊन बोंबलता ना! त्यांच्यावतीनं मी विचारतोय, का बोंबलताय? तुम्ही मंदिरासाठी मतदान केलं होतं ना! एका धर्माला आपल्या कह्यात ठेवण्यासाठी मतं दिली होती ना! आज आपल्या आई-वडिलांना, भावा-बहिणींना वाचविण्यासाठी डॉक्टरकडं का जावं लागतंय? तुम्ही आरोग्यसेवा, दवाखाना, हॉस्पिटल यांचा कधी मुद्दाच केला नाहीत. तुम्ही कधी पाहिलंय कोणत्या सरकारनं तुमच्या आरोग्यसेवेवर किती खर्च केलाय! गेल्या वर्षभरात तुम्हाला काहीच फरक पडलेला नाहीये. २०२० हा पुन्हा २०२१ 'मृत्यू' म्हणून अवतरलाय! वाईट वाटतंय, तसंच भीतीही वाटतेय. आपल्यालाच आपली काळजी घ्यावी लागणारंय. मास्क वापरावा लागेल. तुम्ही कधी विचारलंय प्रधानमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना तुम्ही मास्क का नाही वापरत? '६ गज दूरी...!' हा डॉयलॉग कुठं गेलाय? त्यांच्या भाषणावर टाळ्या वाजवता, त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकता, ते आजही मास्क वापरत नाहीत, निवडणुकीत प्रचाराच्या सभा घेताहेत. रॅली काढताहेत. पाच राज्यातच नाही तर उत्तरप्रदेशातही पंचायतीच्या निवडणुका आहेत. या निवडणुका एकत्रित घेण्याची विनंती नाकारली जातेय. होऊ घातलेल्या निवडणूका पुढं ढकलल्या जात नाहीत. या निवडणुका कितपत महत्वाच्या आहेत? प्रचार करणाऱ्या नेत्यांची तब्येत बिघडली तर त्यांना जगातल्या चांगल्यातल्या चांगल्या हॉस्पिटलमधून उपचार केले जातील, तुमच्या आमच्याचं काय? तुम्ही आम्ही तेच करू अन सगळीकडं विचारत बसू 'बेड आहेत का बेड...!'
बघा काय स्थिती आलीय... मला भिती वाटतेय... तुम्हाला नाही वाटत का? आता तुम्हालाच आम्ही जबाबदार धरू. सरकारला जबाबदार धरणं आता खूप झालं! सरकार असंच काही अस्तित्वात येत नाही. सरकार तुमच्यामुळं अस्तित्वात येतं. तुम्ही सरकारची जबाबदारी-अकौंटबिलिटी निश्चित करता. जेव्हा शेतकरी आंदोलन करतात तेव्हाही आपण आपल्या नेत्यांची खुशमष्कीरी करण्यात दंग असता. तुमचा नेता कधीच कुठं चुकत नाही. अशीच तुमची भावना असते, तुम्ही दुसऱ्याला शिव्या देण्यातच धन्यता मानता! देशाचे नेते, चुकत नसतील तर ते जबाबदार नाहीत तर तुम्ही ४० टक्के लोकच जबाबदार आहात! त्या एक एक व्यक्तीच्या मृत्यूला! ते या जगात नाहीत ते तुमच्यामुळं! त्यांच्या मृत्यूची हाय लागल्यावाचून राहणार नाही. कारण तुम्ही कधीच आरोग्यसेवेचा मुद्दा उपस्थित केला नाही. तुम्ही केला नाही म्हणून मग मिडियानंही तो बनवला नाही. मिडियानंही तेच केलं जे तुम्हाला हवं होतं. जिथं तुमच्या नेत्याचं सरकार आहे तिथं तुमच्याबाबत असं काही घडलं तर मीडिया तुमचं ऐकणार नाही. सरकारही ऐकणार नाही. हे असं सरकार तुम्हीच बनवलंय. क्षमा करा मी कोणत्याच सरकारला दोष देत नाही तर आपल्यालाच दोष देतोय. आताही आम्ही सुधारलो नाही ना तर मग प्रतीक्षा करा. निवडणुका होताहेत. दीदी....ओ SS दीदी..... सारखं होताहेत. मुद्दे काय असावेत हे तुम्हाला चांगलं माहितीय. कुणाला कशाला जबाबदार धरायला हवंय? मी तुमच्यावर आरोप करतोय की, तुम्ही ४० टक्के लोक यासाठी आरोपी आहात. राहिलेले ६० टक्के लोकही तुम्हालाच आरोपी करताहेत. तुम्ही समजू नका की तुम्ही बहुमतात आहात. त्यात कधी बदल होईल हे समजणारही नाही!
सध्या आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतोय. कोरोनाच्या व्हॅक्सिनचं नियोजन आणि वितरण यात घोळ घातला जातोय. कोरोना संक्रमित लोकांची संख्या प्रतिदिन दोन-अडीच लाखावर जाऊन पोहोचलीय. जणू आपण 'कोरोनाचा विश्वगुरु' बनतोय आपल्या बेपर्वाईनं! आपलं सरकार यात काहीच आपला दोष आहे असं मानत नाही. आणि लोकही त्यांना प्रश्न विचारत नाहीत. गेल्यावर्षी कोरोना आला तेव्हा मध्यप्रदेश सरकार पाडलं गेलं. आता कोरोना आलाय तर महाराष्ट्रातलं पाडलं जातंय! तुमच्या नेत्यांना निवडणुका जिंकता येतात. पराभूत झालेल्या निवडणुकीतून सरकारही बनवता येतं. निवडून आलेलं सरकार पाडताही येतं. त्यासाठी परिवारातल्या सगळ्या संस्थांना कामाला लावलं जातं. सरकार बनवता येत असलं तरी मात्र ते चालवता येतं असं म्हणणं धाडसाचं ठरेल! गेल्यावर्षी कोरोनाच्या पाच हजार रुग्ण होताच देशभर लॉकडाऊन लावलं गेलं होतं. आज तशाच रुग्णांची संख्या दोन-अडीच लाख बनलीय. पण त्यावर कोणतीच कार्यवाही, दक्षता घेतलेली नाही. याचं कारण वित्तमंत्री म्हणतात, 'त्यानं आमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो...!' गेल्यावर्षी हे लक्षांत आलं नव्हतं का? १ लाख ७३ हजार १२३ हून अधिक लोक मृत्युमुखी पडलेत. हे कुणाचं रक्त सांडलंय! याची फिकीर कुणाला नाही. आता तर गर्दी रोखण्याऐवजी सरकारच्या संमतीनंच गर्दीला आमंत्रण दिलं गेलंय. हरिद्वारचा कुंभमेळा असो नाहीतर बंगालसह पाच राज्याच्या निवडणुकातील प्रचार असो. लोकांना गर्दीसाठी बोलावलं जातंय. १३० कोटी भारतीयांपैकी केवळ ११ कोटी ४४ लाख लोकांचं लसीकरण झालंय. सरकार किती बेफिकीर आहे त्याची अनेक उदाहरणं आहेत. वर्षभरात पुन्हा दुसरी, तिसरी लाट येईल असं सांगितलं जात असताना सरकार गेल्यावर्षी ही महामारी नाहीच असं म्हणत होतं. जानेवारी २०२० मध्ये विरोधीपक्षानं या महामारीची संभाव्य कल्पना दिली होती पण त्याकडं दुर्लक्ष केलं गेलं. गेल्यावर्षी विदेशातून लस मागवून घ्या असं म्हटलं असताना 'ते विदेशी कंपन्यांचे दलाल आहेत...!' अशी संभावना केली होती. आज मात्र विदेशी लससाठी पायघड्या घातल्या जाताहेत.असा विचित्र प्रकार चाललाय. तुमचे नेते मात्र निवडणुकीच्या मूडमध्येच आहेत. त्यांना देशातल्या या कोविड महामारीची भयाण वास्तवता कोण कधी सांगणारंय....! ज्याची देशाला गरज आहे असे मुद्दे आपण हाती घेतलेच नाहीत. शिक्षण, आरोग्यसेवेसारख्या विषयांना कधी महत्वचं दिलं नाही. साऱ्या भावनिक मुद्द्यांमध्ये आपण लडबडतो आहोत. त्यामुळं कोविडच्या महामारीत आपण गलितगात्र झालो आहोत. साऱ्यांचा जीव टांगणीला लागलाय...! आतातरी आपल्या राजकारणाचे, निवडणूक जिंकण्याचे विषय बदलले पाहीजेत... आरोग्य नि एकूणच नागरी प्रश्न येथून पुढे महत्त्वाचे मानले गेलेच पाहीजेत..... काळजी घ्या.....
हरीश केंची
९४२२३१०६०९
Subscribe to:
Post Comments (Atom)
वंदे मातरम..! वंदे मातरम...!!
"वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला शतकोत्तर सुवर्णमहोत्सव निमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहात त्यावर चर्चा घडवून आणली गेली. या ...
-
"भारतीय राजकारणाला एक घातक वळण लागलंय. निवडणुका जिंकण्यासाठी लोकांवर फुकटच्या रेवड्या उधळल्या तर सत्ता लाभते हा प्रवाद आता ...
-
"माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 'अवस्था ना घरका ना घाट का' अशी झालीय. त्यांना सहनही होत नाही अन् सांगताही येत न...
-
"पुण्यात जातीअंतासाठी लोक 'एकता मिसळ'च्या माध्यमातून एकत्र येत असताना ब्राह्मण महिलांनी 'जय परशुरामा'च्या घ...
No comments:
Post a Comment