Friday, 17 August 2018

करुणानिधी: कलाईग्नर...!

'कलाईग्नर'म्हणजे कलेतील विद्वान! अशी ओळख असलेला नेता! देशात हिंदीचा प्रभाव गाजविणाऱ्या उत्तरभारतीयांच्या विरोधात उभं ठाकून, हिंदीविरोधी राजनीती स्वीकारून दक्षिण भारताच्या राजकारणावर, तामिळी लोकांवर करुणानिधी नावाचं गारुड जवळपास ७६ वर्षे वावरत होतं. दक्षिण भारतीय राजकारणातले प्रमुख विरोधी नेता म्हणून उभारी घेतलेले आणि त्याचबरोबर ब्राह्मणवाद विरोधी राजनीतीचे प्रतीक बनून राहिलेले करुणानिधी! त्यांचा कलेतील विद्वत्तेपासून राजकारणातील पितामह पर्यंतचा जीवन प्रवास अत्यंत रोचक असा राहिलेला आहे!"
------------------------------------------
द्रविड मुनेत्र कळघम अर्थात डीएमके चे प्रमुख मुथुवेल करुणानिधी यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी नुकतंच निधन झालं. त्यांच्या निधनानं दक्षिणी राजकारणातल्या एका प्रदीर्घ कालखंडाचा अंत झालाय. करुणानिधी देशातल्या सर्वात ज्येष्ठ राजकीय नेत्यांपैकी एक होते. पांच वेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेले करुणानिधी हे ६० वर्षे विधानसभेचे सदस्य होते. गेल्या २६ जुलैला त्यांनी डीएमके चे प्रमुख म्हणून ५० वर्षे पूर्ण केले होते. राजकारणातली षष्ठयब्दी आणि पक्षप्रमुखपदाचा सुवर्णमहोत्सव साजरा करणारे देशातले ते एकमेव नेते होते.

त्यांनी आपल्या किशोरावस्थेपासूनच सार्वजनिक जीवनाला प्रारंभ केला होता. त्यांची घरची सांपत्तिक स्थिती तशी फारशी चांगली नव्हती, पण विद्याभ्यासात विद्यार्थी म्हणून मात्र ते प्रचंड हुशार होते. त्यांचे कुटुंबीय तामिळनाडूतलं पारंपरिक वाद्य 'नादस्वरम' वाजवून आपलं गुजराण करीत. त्यामुळं संगीताप्रति त्यांची रुची असणं स्वाभाविक होतं. पण लहानपणी संगीत शिकण्यासाठी गेलेल्या करुणानिधी यांना जातीयवादाचा अनुभव यायला लागला. त्यांना त्यांच्या जातीमुळे फारशी वाद्ये वाजविण्याचे शिक्षण दिलं जात नव्हतं, यांचं त्यांना खूप त्रास होत होता. त्याचबरोबर कथित खालच्या जातीतल्या मुलांना कमरेच्यावर कोणतंही वस्त्र घालून मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता, या साऱ्या वातावरणाचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. जातीयतेचा विरोधात विद्रोह तेव्हापासूनच जागा झाला. त्या विद्रोहातूनच ते राजकारणाकडे आकृष्ट झाले. ते पेरियार यांच्या 'आत्मसन्मान' आंदोलनाशी जोडले गेले आणि द्रविडियन लोकांना आर्य ब्राह्मणांच्या विरोधी आंदोलनात सहभागी झाले. १९३७ साली तामिळनाडूत हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या अंमलबजावणी विरोधात करुणानिधी उभे ठाकले. त्यावेळी ते फक्त १४ वर्षाचे होते. त्या आंदोलनात त्यांनी हिंदी विरोधी घोषणा लिहिल्या. त्या खूपच गाजल्या. तेव्हापासून राजकारणासह लेखनाच्या कारकीर्दीलाही प्रारंभ झाला.

करुणानिधी यांनी द्रविड आंदोलनापूर्वी विद्यार्थी संघटना 'तामिळनाडू तमिळ मनावर मंडलम' ची स्थापना केली. त्यानंतर १९४२ मध्ये 'मुरसोली' नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. त्यावेळी ते कोईम्बतुर इथं राहात आणि नाट्यलेखन करीत. त्यांच्या त्या धारदार लेखनशैलीनं पेरियार आणि अण्णादुराई यांचं लक्ष वेधून घेतलं. त्याकाळी दक्षिण भारतातील राजकारणात पेरियार आणि अण्णादुराई ही जबरदस्त नावं होती. सी.एन.अण्णादुराई यांनी दक्षिण भारतातील ऐक्याच्या आधारे १९६२ मध्ये अलग 'द्राविडनाडू'ची मागणी केली होती. ती मागणी चिरडण्यासाठी मग वेगळा कायदा करावी लागला होता. करुणानिधी यांच्या लेखनशैलीनं प्रभावित झालेल्या या दोन राजकीय नेत्यांनी पक्षाचं मुखपत्र 'कुदीयारासु' याचं संपादक म्हणून जबाबदारी दिली. स्वातंत्र्यानंतर या दोन्ही नेत्यांत बेबनाव झाला त्यानंतर पेरियार आणि अण्णादुराई या दोघांचे मार्ग स्वतंत्र झाले. करुणानिधी यांनी अण्णादुराई यांच्यामागे जाण्याचा निर्णय घेतला. १९४९ मध्ये दोघांनी मिळून नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली आणि त्याचं नांव ठेवलं 'द्रविड मुनेत्र कळघम - डीएमके' करुणानिधी पक्षाचे कोषाध्यक्ष बनले.

राजकारणाबरोबरच करुणानिधी यांनी फिल्मी दुनियेत प्रवेश केला आणि 'राजकुमारी' नामक चित्रपटात संवादलेखन केलं, त्या संवादांना लोकांनी डोक्यावर घेतले. त्या संवादातून त्यांनी सामाजिक न्याय आणि प्रगतिशील समाज यांच्यावर कोरडे ओढले होते. करुणानिधी पूर्णतः राजकारणाशी जोडले गेले होते तरी चित्रपट उद्योगाशी असलेलं नातं तोडलं नव्हतं. १९५२ मध्ये 'परासाक्षी' नावाचा चित्रपट बनवला तो चित्रपट आर्य ब्राह्मणवादाच्या विरोधी विचारधारेवर आधारित होता. चित्रपटाच्या घणाघाती संवादातून त्यांनी अंधविश्वास, धार्मिक कट्टरता, सामाजिक व्यवस्था यावर प्रहार केले होते.

१९४७ पासून थेट २०११ पर्यंत ते चित्रपट उद्योगाशी संबंधित होते. दुसरीकडं स्वतःची राजकीय खेळीकडे झेपावत पहिल्यांदा १९५७ मध्ये विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली. आणि तामिळनाडूतल्या कुलीथालई या मतदारसंघातून  ते विजयी झाले.तामिळनाडूच्या विधानसभेत पहिल्यांदा निवडून जाणाऱ्या पंधरा सदस्यांमध्ये एक  करुणानिधी होते. तर आयुष्यातील शेवटची निवडणूक २०१६ मध्ये थिरुवायूर इथून लढविली होती. आपल्या राजकीय जीवनात त्यांनी १३ वेळा विधानसभेच्या निवडणुका लढवून त्या सर्वच्यासर्व जिंकल्या

त्यानंतरच्या दशकात तामिळनाडूत जबरदस्त उलथापालथ झाली. १९६७ मध्ये त्यांचा पक्ष डीएमके ला राज्यात पूर्ण बहुमत मिळालं. अण्णादुराई पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री बनले. त्यानंतर आजतागायत काँग्रेसला तिथं कधीच यश मिळालं नाही की त्यांचं पुनरागमन झालं नाही. त्याकाळात करुणानिधी नामक तारा तामिळनाडूच्या राजकारणात अखंडरित्या तळपत होता. अण्णादुराई यांच्या मंत्रिमंडळात अण्णादुराई आणि नेंदूनचेझियन यांच्यानंतरचे महत्वाचे स्थान करुणानिधी यांचे होते. डीएमकेच्या पहिल्या सरकारात करुणानिधी यांच्याकडं लोकनिर्माण आणि परिवहन खातं सोपविण्यात आलं होतं.

परिवहन मंत्री म्हणून त्यांनी राज्यातील खासगी बस वाहतुकीचं राष्ट्रीयकरणं केलं आणि राज्यातल्या सर्व गावापर्यंत सार्वजनिक वाहतूक यंत्रणा उभी केली. ती त्याच्या कार्यकर्तृत्वातली एक मोठी उपलब्धी समजली जाते. दुसरीकडं तमिळनाडूची सत्ता त्यांच्या हाती येण्यासाठी जणू आसुसलेली होती. सत्ता स्वीकारल्यानंतर दोनच वर्षानंतर १९६९ मध्ये अण्णादुराई यांचं निधन झालं. त्यानंतर करुणानिधी तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. १९७१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा करुणानिधी मुख्यमंत्री बनले. त्यांच्या समग्र राजकीय कारकिर्दीत १९६९-७१, १९७१-७६, १९८९-९१, १९९६-२००१ आणि २००६-२०११ अशाप्रकारे ते पांच वेळा मुख्यमंत्री बनले.
दोन दिग्गज फलंदाज प्रदीर्घ वेळापासून क्रीझवर असतील, त्यांनी मोठी भागीदारी रचली असेल आणि त्यांच्यातला एकजण बाद झाला की दुसरा देखील फार काळ तग धरू शकत नाही. तो ही काही वेळातच बाद होतो असं एक गृहीतक आहे. असंच काहीसं राजकारणातही होतं. एकमेकांशी प्रदीर्घ वैर असणारे दोन दिग्गज तमिळ राजकारणी २०२० च्या  दशकात एका पाठोपाठ एक काळाच्या पडद्याआड गेले. दोघांनीही  परस्परांना इतके पाण्यात पाहिले होते की, सत्तेचा लंबक त्यांच्या बाजूला कलल्यावर त्यांनी परस्परास अत्यंत अपमानास्पद व धक्कादायक पद्धतीने अटक केली होती. जयललिता आणि करुणानिधी यांनी जे सुडाचे राजकारण केले ते इतके टोकाचे होते की, अनेक सामान्य लोकांनीही त्यात उडी घेत एकमेकांची डोकी फोडली होती. राजकारण ही एक विचारधारा न राहता सत्ताकेंद्रित व्यक्तीद्वेषमूलक वृत्ती म्हणून  रुजवण्यात या दोहोंनी समान हातभार लावला होता.
कमालीची भाषिक, प्रांतीय अस्मिता जोपासणारे करुणानिधी प्रारंभीच्या राजकारणात भोळसटच होते. ते तसे नसते तर त्यांनी पक्षात एमजीआरच्या रूपाने उंट घेतलाच नसता. एमजी रामचंद्रन करुणानिधींचे बोट धरून राजकारणात आले, द्रमुकचे नेते झाले आणि त्यांचे करुणानिधींशी बिनसल्यावर त्यांच्या महत्वाकांक्षा इतक्या जागृत झाल्या की, त्यांनी करुणानिधींच्याच विरोधात पक्ष काढला. द्रमुक फोडला आणि ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम हा पक्ष काढला. असे म्हणतात की, त्या दिवशी करुणानिधी त्यांचे गुरू  अण्णादुराई यांच्या तसबिरीला उराशी कवटाळून ढसाढसा रडले होते. एमजीआर आणि करुणानिधी यांच्यातलं इतकं वैर वाढत गेलं की, दोघेही आमने सामने निवडणुकीस उभे राहिले आणि त्यात करुणानिधींचा पराभव झाला. हा पराजय त्यांच्या अत्यंत जिव्हारी लागला आणि येथून पुढे त्यांनी एआयएडीएमके हा आपला सर्वोच्च शत्रू मानला. एमजीआर कालवश झाल्यानंतर जयललितांनी डीएमकेच्या द्वेषाची गादी पुरेपूर चालवली. 
करुणानिधी केवळ हिंदीद्वेष्टे होते असं म्हणणं म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वावर, कारकिर्दीवर अन्यायकारक ठरेल. त्यांचे हलाखीचे बालपण, त्यांच्या कुटुंबाची फरफट आणि एकंदर तत्कालीन भारतीय समाजव्यवस्थेतील विषमता पाहू जाता त्यांच्या विचारात काही गैर होते असं म्हणणे अयोग्य ठरेल. उत्तर भारत आणि दक्षिण भारत यात असलेली टोकाची सामाजिक - सांस्कृतिक तफावत आणि परस्परांप्रति असणारा संशयभाव याने या विचारसरणीस अधिक खतपाणी घातले. वयाच्या चौदाव्या वर्षी करुणानिधींनी केलेलं लेखन पाहू जाता त्यात त्यांच्यातला विद्रोही तरुण साफ झळकतो. त्यांची आशय, विषय,  मांडणी ही जातीय वर्चस्ववादाच्या विरोधात होती, किंबहुना हाच विचार त्यांनी आपल्या पक्षाचा पाया म्हणून रुजवला. 
ऐंशीच्या दशकातले करुणानिधी आणि तत्पूर्वीचे करुणानिधी यात जमीन अस्मानचे अंतर आहे. उत्तरेतले काँग्रेसचे एकहाती अस्तित्व संपुष्टात यायला आणि करुणानिधींचे राजकीय सूर बदलायला एकच गाठ पडली. करुणानिधी प्रारंभी वाटायचे तितके साधे, सोपे, भोळे राजकारणी नंतर राहिले नव्हते, युपीए एक आणि  युपीए दोन च्या काळात त्यांनी मनमोहनसिंग सरकारला कमालीचे छळले होते. वारंवार सत्तेतून बाहेर पडायची धमकी देऊन ते ब्लॅकमेल करत. राज्यात सत्तेत येण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊन राज्याचे अर्थकारण बिघडवणारी आश्वासने द्यायची आणि त्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी केंद्राला पिळत राहायचे हा फॉर्म्युला तमिळनाडूने ठसठशीतपणे राबवला. त्यांचे राजकीय कटाक्ष अत्यंत कुचकट आणि स्पष्ट असत. स्टेजवर पाया पडायला येणाऱ्यांनाही ते प्रसंगी उताणे पाडत. त्यांच्या भाषणांचा एक स्तर ठरलेला होता, करुणानिधींनी जयलालितांची टिंगल केली पण बोलताना तोल ढासळू दिला नाही. मुरासोली मारन, ए. राजा, कनीमोझी यांच्यातली गुंतागुंत सोडवताना त्यांनी स्वतःला व पक्षाला झळ बसू दिली नाही. त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या नंतरचा राजकीय वारसा कुणाकडे राहील यावरून देखील त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही ज्यामुळे डीएमकेची फुट टळली गेली. 
करुणानिधींनी तमिळ जनतेवर मनापासून प्रेम केले याला कोणी नाकारू शकत नाही. त्यांचे तमिळप्रेम इतके अफाट होते की राजीव गांधीची हत्या झाल्यानंतर देखील ते एलटीटीईची आणि प्रभाकरनची बाजू उघडपणे घेत. श्रीलंकेत पाठवलेले भारतीय शांतीसेनेचं सैन्य मागे घ्यावे म्हणून त्यांच्या पक्षाने थेट रस्त्यावर उतरून आंदोलने केली होती. 'तमिळ इलम'ला तमिळनाडूच्या विधानसभेत ठराव करून मान्यता देण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नव्हते. जहाल शीख अतिरेक्यांनी खलिस्तानची स्वप्ने पाहिली पण राजकीय दृष्ट्या त्यांना जे जमले नव्हते ते करुणानिधींनी उघडपणे करून दाखवले होते. तमिळ हित आणि तमिळ अहंकार यांचा ते कमालीच्या टोकाच्या भूमिकेतून पुरस्कार करत. 
स्वातंत्र्योत्तर तमिळनाडू आणि सत्तरच्या दशकानंतरचा तमिळनाडू यात फारसे अंतर नव्हते. इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी करताना तमिळ तरुणास समान संधी मिळावी यासाठी त्यांनीप्रयत्न केले. त्यांच्या राजकीय भूमिकांच्या शेड्स इतक्या गडद झाल्या की जयललितांना  सत्तेत आल्यावर करुणानिधींच्याच वाटेवरुन मार्गक्रमण  करावे लागले. साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर करत, पर्यटन आणि शेती यावर त्यांनी विशेष भर दिला त्याची फळे आज तामिळनाडूत पाहता येतात. स्वतःचे धार्मिक विचार तिळमात्रही मवाळ न करता त्यांनी राज्यातील धार्मिक ध्रुवीकरण होऊ दिले नाही हे त्यांच्या राजकारणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्यांच्यातला विद्रोही साहित्यिक त्यांनी मरू दिला नाही, त्यांची भाषणे जशी टाळ्या घेणारी आणि गर्दीवर जादू करून खिळवून ठेवणारी असत तशीच त्यांची लेखणी देखील धारदार होती. 
पांढऱ्या शुभ्र रेशमी लुंगी सदऱ्याचा पेहराव करणारे, गळ्यात सदैव तलम पिवळे उपरणे बाळगणारे, डोळ्यावर त्याच जुनाट पद्धतीची काळसर गॉगल फ्रेम वापरणारे आणि अखेरच्या काळात व्हीलचेअरवर जखडले गेलेले करुणानिधी भारतीय राजनीतीतील प्रांतीय राजकारणाचा वरचष्मा वाढवणारे द्रष्टे नेते होते. आयुष्यभर एकाच टिपिकल ठाशीव पद्धतीचे राजकारण करणारे करुणानिधी सार्वजनिक जीवनात देखील एका साचेबध्द पद्धतीने जगत. करुणानिधी त्यांचे आयुष्य आपल्या अभिनव आणि बंडखोर शैलीत जगले. त्यांनी आपल्या मुलाचे नाव स्टॅलिन ठेवले होते, सर्व जातीच्या लोकांना पुजारी होण्याचा अधिकार दिला होता, धर्माचे पाखंड त्यांनी अक्षरशः मोडीत काढले होते. पेरियार रामस्वामी यांच्यानंतर खऱ्या अर्थाने वंचित, शोषितांच्यासाठी ते लढले. ते एक लढवय्ये कार्यकर्तेही होते आणि जनमानसाच्या नसांवर पकड असणारे अभूतपूर्व नेतेही होते. त्यांची वेशभूषा, देहबोली आणि संवादफेक आजही तमिळनाडूच्या तरुणांचे आकर्षण आहे.
मृत्यूपश्चात वैर संपते म्हणतात. करुणानिधींनी ते कृतीतून दाखवून दिले होते. त्यांनी अम्मांच्या परिवारात आग लावण्याचे काम केले नाही, त्यांच्यातले वाद मिटवण्यासाठी ते पडद्यामागून सक्रीय होते. आपल्याकडे कुणाचे निधन झाले की त्याचा अपार उदोउदो होतो वा केवळ पूर्वग्रहदुषित वृत्तीने टीका होते, पण त्यावर सटीक लिहिलं, बोललं जात नाही. आपण असं करत नसू तर भावी पिढ्यांपुढे गतकाळाचे सच्चे चित्र कधीच दिसणार नाही याची नोंद आपली प्रसारमाध्यमे आणि मिडिया कधी घेणार की नाही हा प्रश्नही जाता जाता विचारावा वाटतो. असो.
करुणानिधींचे निधन झाले तेव्हा किशोरांपासून ते वृद्धापर्यंतचे त्यांचे समर्थक शोकाकुल झाले होते, मुळात ही सगळी माणसे भडक ठेवणीची. त्यांचे सिनेमे, गाणी, कविता, ग्रंथ, साहित्य, शिल्पे, चित्रे या सर्वात त्याचा प्रत्यय येतो. त्यामुळे आपल्या आवडत्या नेत्याचे मरण हा देखील तिकडे सोहळा ठरतो. शक्य तितक्या भव्योदात्त पद्धतीने त्याला अलविदा करण्याकडे त्यांचा कल असणं साहजिक आहे. आपले गुरु अण्णादुराई यांच्या समाधीशेजारीच आपल्याला दफन केलं जावं ही करुणानिधींची अंतिम इच्छा पुरी झाल्याने सकल तमिळ जनतेचा शोक बऱ्यापैकी आवरला गेलेला.  नावाप्रमाणेच करुणेचा निधी असणारा हा कलैग्नार - कलेचा भक्त, थलैवा - नेता त्यांना पुन्हा कधीच दिसणार नाही हे जरी कटूसत्य असले तरी त्यांनी कडवटपणा माथी घेऊन जिद्दीने राबवलेल्या धोरणांना, योजनांना यशाचे मूर्त स्वरूप लाभून तामिळनाडू हे देशातील सर्वात वेगाने विकास करणारे व आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते असलेले राज्य ठरलेय. आधी जयललिता गेल्या आणि पाठोपाठ करुणानिधीही  गेले, मग तमिळ अस्मितेचे पुढे काय होणार आणि तिची ध्वजा कुणी त्याच तडफेने पेलू शकेल की नाही याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. करुणानिधी गेले त्याला पाच वर्षे पूर्ण झालीत, आज करूणानिधी यांची १०१ वी जयंती! तामिळनाडूचे आताचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सर्वांना चकित करत आपण कलैग्नार करुणानिधींचे सच्चे वारसदार असल्याचे सिद्ध केलेय. या पार्श्वभूमीवर राजकीय सामाजिक दृष्ट्या मराठीचं बेवारस असणं अगदी उठून दिसतं जे क्लेशदायकही आहे.



No comments:

Post a Comment

मराठीच्या मरणकळा.....!

"पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधासाठी उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू येत्या पाच तारखेला मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येताहेत. ...