Saturday, 30 November 2024

लोकशाहीचं चीरहरण अन् मतदारांचं अरण्यरुदन

"महाराष्ट्रातल्या निवडणुक निकालांचं वर्णन हे अकल्पित, अनाकलनीय, अविश्वसनीय असं केलं गेलं. पण महायुतीनं लोकसभेचा पराभव पचवून अवघ्या पाच महिन्यात जे काही केलंय त्याचं कौतुक करायला हवं. लाडकी बहिणसारख्या सवंग घोषणा, पैशाची मुक्त उधळण, कटेंगे-बटेंगे, एक-सेफ, कीर्तनकारांचं जागर, धर्मयुद्धाचा पुकार, छोट्या जातींचे मेळावे, महामंडळ, मराठ्यांबरोबरच बौद्धेतर दलितांचं केलेलं संघटन, जुंपलेल्या संघाच्या सर्व संस्था, मतांचं केलेलं 'मायक्रो मॅनेजमेंट' यानं यश सहजसाध्य झालं! लोकसभेतल्या यशानं हुरळून गाफील राहिलेली,अतिआत्मविश्वासानं बेफिकीर बनलेली महाआघाडी यामुळं अपयश पदरात पडलंय! निकालाच्या फेरफाराचे अनेक पुरावे सादर होताहेत. मात्र निवडणुक आयोगानं डोळे मिटलेत. असं असलं तरी लोकांच्या मनांत ईव्हीएमबाबत जो संशय निर्माण झालाय तो दूर कसा होणार? अन् कोण करणार?"
.........................................................
ज्येष्ठ विचारवंत आणि वयोवृद्ध नेते डॉ. बाबा आढाव यांनी गेल्या तीन दिवसापासून ईव्हीएम विरोधात महात्मा फुले यांच्या निवासस्थानी आत्मक्लेश आंदोलन सुरू केलंय. सरकारी तिजोरीतून लोकांना पैशांचं वाटप करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. सरकारला विरोधक नकोच आहे. सरकार जनतेची फसवणूक करतेय. इतकंच नाही तर ईव्हीएममध्ये नागरिकांनी टाकलेलं मत हे त्यांचंच आहे, याचा पुरावा नाही. राज्यघटना आणि लोकशाहीची सध्या थट्टा सुरू असल्याची त्यांनी टीका केली. ईव्हीएमवरील मतदान प्रक्रिया संशयास्पद म्हणत लोकशाहीचे वस्त्रहरण सुरू असल्याचे बाबा आढाव यांनी म्हटलयं. त्यांच्या उपोषण स्थळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी भेट घेतली. आणीबाणीत लेखक, साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, नोकरशहा, काही न्यायाधीशही सत्तेच्या विरोधात उतरले होते. १९७७ ला निवडणुक जाहीर झाली. जनता पक्ष बनला, तेव्हा एक मोठा वर्ग इंदिरा गांधींच्या विरोधात उभा होता. आज याची आठवण येतेय. गेल्या दहा वर्षाच्या काळात तेच विचारवंत, पत्रकार, लेखक, साहित्यिक, वकील, समाजसेवी, हे सारे मोदींच्या विरोधात असल्याचं जाणवतंय. यातले अनेकजण कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीत. पण त्यांना सुधारणा हवीय, उन्नती हवीय. ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, इन्कमटॅक्स या संवैधानिक संस्था स्वायत्त, स्वतंत्र हव्यात. प्रधानमंत्री कार्यालय, पत्रकार, पोलीस यांची भूमिकाही संविधानानुसार हवी. संविधान घोक्यात आल्याचं विरोधीपक्ष म्हणतोय. सत्ताधारी मात्र ते नाकारताहेत. पण सत्ता किती शक्तिशाली होऊ शकते, याचा अनुभव येतोय. आणीबाणी न पुकारताही मोदींच्या काळात ती अनुभवता येतेय. सत्ताधाऱ्यांना एखादं विधेयक संमत करायचं असेल तर त्यावर संसदेत विरोधकांना बोलू दिलं जात नाही. मतदान घेऊ देत नाहीत. रिफॉर्म म्हणत तीन कृषी कायदे आणले तेव्हा मतदानाचा आग्रह धरला पण, मतदान होऊ दिलं नाही. गेल्या अधिवेशनात एकाचवेळी दीडशे खासदारांना निलंबित करून हवी ती विधेयकं संमत केली गेली. संसदेत आणि बाहेरही विरोधकांचा आवाज दाबला जातोय. निवडणुकाही हडपल्या जाताहेत. निवडणुकांतून मोदींचा पराभव करणं अशक्य आहे, हे विरोधक समजून चुकलेत की, भाजपला पराभूत करणं हे एकट्यादुकट्याचं काम नाहीये त्यामुळं 'इंडिया आघाडी' बनवून विरोधक एकवटलेत. सत्ता ही साऱ्या संवैधानिक संस्था, मीडिया अन् न्यायपालिकाही सहज सत्तानुकुल करू शकते! सरकारच निवडणुक आयुक्तांपासून सारे नोकरशहा, संपादक हे सत्ताशरण होताहेत. याला निवडणूक जिंकल्याशिवाय इतर काहीच महत्वाचं नाहीये. त्यासाठी मग निवडणुकीत गडबड, गोंधळ, फेरफार होत असेल तर मोदी सरकारला पराभूत करणं कसं शक्य आहे? लोकांना वाटतंय की, आम्ही ज्यांना मतं दिलीत ती त्याला मिळालीच नाहीयेत. विरोधक पराभूत होतोय अन् सत्ता विजयी होतेय. आज हा प्रश्न मोठा चिंतनीय आणि गहन बनलाय असं विरोधकांचं म्हणणं आहे.
महाराष्ट्रातल्या निकालानंतर भाजप ईव्हीएममध्ये फेरफार करून जिंकतेय, असा आरोप काँग्रेसनं केलंय. तसं असेल तर हा ईव्हीएम घोटाळा देशभरातल्या लोकांना, विविध पक्षांना, सामाजिक, राजकीय लोकांना जाणवायला नकोय का? सोशल मीडियावर केवळ प्रतिक्रिया देऊन विरोधक गप्प बसणार आहेत का? लोकशाही वाचविण्यासाठी विरोधक इतके कमकुवत बनावेत ही शोकांतिका म्हणावी लागेल. संविधानानं सर्वांना मताधिकार दिलाय. मतं कुणाला दिलीत हे मतदारांना माहीत असल्यानं ते सोशल मीडियावर व्यक्त होताहेत. राजकीय पक्ष हे मतदारांचे विश्वस्त असतात त्यामुळं त्यांच्या मताधिकाराच्या संरक्षणाची जबाबदारी राजकीय पक्षांची आहे. पण आज मतदार जसं व्यक्त होताहेत तसंच तेही व्यक्त होताहेत! ईव्हीएममधल्या घोटाळ्यावर नेमकं काय करायचं हे त्यांना कळतच नाहीये. काँग्रेस नेत्यांनो, संसदेत तुमचं काही चालत नसेल तर मग तुम्ही संसदेच्या जवळच एखादा हॉल घेऊन सांगा की, उद्यापासून आम्ही इथंच बसू. इथूनच प्रस्ताव मांडू. सत्ताधाऱ्यांना संसदेत हवं तसं काम करू द्या. आम्ही मात्र तिथं जाणार नाही. लोकशाहीच्या मंदिरात लोकशाहीच शिल्लक राहिलेली नाहीये. या अधिवेशनात वक्फ बोर्ड बील, विमा क्षेत्रात एफडीआय १०० टक्के गुंतवणुक बील, मीडियावर नियंत्रण, रेल्वे रिफॉर्म, बँकिंग रिफॉर्म अशी अनेक विधेयकं येणार आहेत. तेव्हा विरोधक काय करणार? संसद तर सत्ताधाऱ्यांच्या कलानं चालते. विरोधक याला गांभीर्यानं घेत नसतील पण देश गांभीर्यानं घेतोय ना! लोक पाहताहेत, विरोधक असहाय, गलितगात्र बनलेत, ते प्रखर विरोध करू शकत नाहीत म्हणून लोक त्यांना कदाचित मतं देत नसतील. अशीही शक्यता आहे!
ईव्हीएम घोटाळ्याची प्रकरणं लोक सोशल मीडियावर प्रसारित करताहेत. नांदेडमध्ये लोकसभा, विधानसभा निवडणूक एकाचवेळी झाली. तिथं मतदानाच्या आकडेवारीत, निकालात फरक दिसून आलाय. कन्नडमधल्या तळनेर गावात ३१२ जणांनी मतदान केलं, मात्र तिथं सर्व उमेदवारांना मिळून ६०० हून अधिक मतं आढळून आली. नेवापुर मध्ये ७४७ मतदान झालं, त्यात एकाच उमेदवाराला ८१३ मतं पडलीत. इतरांना वेगळंच. दहिसरमध्ये मनसेच्या उमेदवाराला त्याच्या कुटुंबीयांचं, त्याचंही मत त्याला मिळालं नाही. नाशिकच्या आढवत गावातले गावकरी तर झुंडीनं विरोधासाठी बाहेर पडले. अक्कलकोट मध्ये रासपचे उमेदवार बंडगर यांना त्यांच्या दाड्याळ गावात त्याचंच मतं गायब झालंय! एक ना दोन अशा अनेक तक्रारींचा पाऊस पडलाय. झालेलं मतदान अन् मोजलेली मतं याचा शंभर मतदारसंघात मेळ लागत नाही, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्यात. निवडणुक प्रक्रियेशी छेडछाड झालीय. अशा बातम्या आल्यावर निवडणुक आयोगानं अशा पोस्ट करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार आहे. आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन मतदान आणि मतमोजणीचे आकडे लोक घेऊ लागले. त्यात पोलखोल होतेय असं लक्षात येताच आयोगानं बेवसाईटच बंद करून टाकली, हे काय दर्शवतं? सीएसडीएस या संस्थेनं एक सर्व्हे केला, त्यात मतदारांना विचारलं की, तुमचा ईव्हीएमवर विश्वास आहे का? तर ४५ टक्के लोकांनी सांगितलं की आमचा ईव्हीएमवर विश्वास नाहीये.
लोकसभेत भाजप बहुमताचा २७२ चा आकडा गाठू शकला नाही. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात फारसं यश मिळालं नाही. त्यानं विरोधक आनंदात मश्गूल झाले. अखिलेश यादव यांनी संसदेत सांगितलं की, 'मी उत्तरप्रदेशातल्या ८० च्या ८० जागा जरी जिंकल्या, तरी ईव्हीएमच्या विरोधात उभा राहीन. ईव्हीएमवर निवडणुका लढू अन् विरोधही करू...!'  याचा अर्थ तुमच्यात सत्तेला प्रखर विरोध करण्याची क्षमताच नाही. का तर प्रत्येकाची फाईल केंद्राकडं पडून आहे! अखिलेश यादव बोलत असताना राहुल गांधी बाकं वाजवत होते. हेच राहुल बाहेर मात्र राणा भीमदेवी थाटात ईव्हीएमवर ताशेरे ओढतात. मतदारांचा संताप आणि नेत्यांचा राग यात मोठं अंतर आहे. नेत्यांचं पोट भरलेलंय. त्यांना माहीत आहे की, राजकीय ताकद कशी बनते. सुप्रीम कोर्टानं, 'तुम्हाला लोकशाहीवर, त्याच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवावा लागेल. निवडणुक आलात की, ईव्हीएम योग्य अन् पराभूत झालात तर घोटाळा हे म्हणणं योग्य नाही...!' मग जनतेतून हा राग, आक्रोश का व्यक्त होतोय? नेते विरोध का करताहेत? विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय की, मोदींची लाट असताना २०१४ मध्ये ४३, तर २०१९ मध्ये ३९ जागा मिळाल्या पण आता त्यातल्या अर्ध्याच जागा मिळाल्यात हे कसं शक्य आहे. विरोधक ईव्हीएमवर निवडणुका लढवू अन् विरोधही करू असं म्हणत सत्तेपुढे तुम्ही गुडघे टेकताहात. हा दांभिकपणा नाही का? महाराष्ट्रात पानिपत होत असताना वायनाडमध्ये प्रियांका गांधींच्या विजयाचा जल्लोष केला जातो, पेढे भरविले जातात. म्हणजे नेत्यांना इथल्या पराभवाचं गांभीर्यच नाहीये.  
देशातली प्रगती हळूहळू कशी खुंटतेय. विकासाचा अर्थ 'कार्पोरेटस् चं भलं' असा का झालाय? अदानी, अंबानी यांचं नावं विरोधक घेतात पण त्यात गांभीर्य दिसत नाही. संविधानाचं पुस्तकं जाहीरपणे दाखवून एक उमेद, आशा जागवली जाते, पण ती उमेद, ती आशा तुमच्या राज्यातून का मिळत नाही? सारे राजकारणी आज एकसारखे बनलेत. मग ते सत्तेत असो नाहीतर विरोधात. ते जिथं असतील तसा तिथं त्यांचा विचार बदलतो. याचं उत्तम उदाहरण अजित पवार, शरद पवार आहेत. उद्धव ठाकरे उघडपणे 'अदानीना दिलेली कंत्राटं आम्ही रद्द करू..!' असा इशारा देतात. पण शरद पवार मात्र त्यावर एक अक्षरही बोलत नाहीत. ते अदानीना भेटतात, मुख्यमंत्र्यांकडे त्यांची रदबदली करतात. राहुल गांधी 'दलालांच्या हाती धारावीची जमीन सोपवली जातेय...!' असा आरोप करतात. पण काँग्रेसचेच मुख्यमंत्री अडाणीना कंत्राटं देतात. राजकारण्यांच्या दृष्टीनं नैतिकता ही मौल्यवान राहिलेली नाही.
इंडिया आघाडीनं, इतर पक्षांनी जाहीर करून टाकावं की, निवडणुका लढवत राहू, पराभूत होत जावू हीच लोकशाही आहे! जनतेच्या नशिबात असेल तेव्हा लोकशाही, सत्तापालट पारंपारिकरित्या होईल. त्याकडं विरोधक पाहणारच नाहीत. संजय राऊत, वडेट्टीवार हे पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडतात. तिकडं काँग्रेसचे कार्तिक चिदंबरम म्हणतात, 'मी तर ईव्हीएमवर जिंकतोय. मला यात काहीच गैर वाटत नाही...!' कारण त्यांचीही फाईल पीएमओत आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, 'मी इंजिनियर आहे, ईव्हीएममध्ये फेरफार होत नाही, हे मी ठासून सांगू शकतो..!' ईव्हीएममधून लोकभावनेशी खेळ खेळला जातोय. निवडणुक, मतदान हे केवळ राजकीय पक्षांशी निगडित नाही तर ती लोकांशीही निगडित आहे. शरद पवार, संजय राऊत संघाच्या, भाजपच्या 'पॉलिटिकल मॅनेजमेंट'चे कौतुक करतात. आज मात्र  ते ईव्हीएमवर राग काढताहेत. देशात नव्या राजकारणाची, आंदोलनाची गरज निर्माण झालीय असं लोकांना वाटतंय. महाराष्ट्रात ईव्हीएम, हिंदू-मुस्लिम, अदानी-अंबानींची कार्पोरेट लूट, भ्रष्टाचार, मुस्लिमांना मतदानापासून रोखणं, या साऱ्या प्रकाराशी निवडणुका कारणीभूत ठरताहेत. जय-पराजयात फेरफार केले जाताहेत. फक्त शेअर बाजारातच फेरफार होतो, कार्पोरेटस् मध्ये गोंधळ होतो, असं नाही तर निवडणुकांमध्येही गोंधळ होतोय. देशात संसदीय लोकशाही राबवली जात असल्यापासून पहिल्यांदाच मतदार, वृत्तपत्रे, राजकीय नेते या निकालाला अनाकलनिय, अकल्पित, अविश्वसनीय असं संबोधताहेत. पण हे असं यापूर्वीही घडलंय. इंदिरा गांधींना मोठं यश मिळालं तेव्हा, 'हा विजय गाईचा नाही, बाईचा तर नाहीच नाही, तो शाईचा आहे...! असं म्हटलं गेलं होतं, हे आठवत असेल. आताचे निकाल हे केवळ आश्चर्यचकित करणारे नाहीत, तर आश्चर्याच्या मर्यादेपलीकडे जाऊन निवडणूक इतिहासाचा पारंपारिक पॅटर्न मोडणारे आहे. फक्त ५ महिन्यांत, महायुती ही -१% वरून +१४% वर गेली आणि तीन-चतुर्थांश बहुमत मिळवलं. राज्याच्या सहा महसूल विभागातल्या मतदारसंघातून वेगवेगळा मतदानाचा कल दिसतो तो आता दिसला नाही. भाजपनं शहरी आणि ग्रामीण भागात समान कामगिरी केली, जी निवडणूक इतिहासात नवीन आहे. लोकसभेत पराभूत झाल्यानंतर विधानसभेत जोरदार विजय मिळणं हे निवडणुकीच्या इतिहासात 'असामान्य' आहे. असं सेफोलोजिस्ट म्हणताहेत.
हरीश केंची
९४२२३१०६०९
चौकट
*ईव्हीएमचा वितंडवाद*
ईव्हीएमला सर्वात आधी विरोध किरीट सोमैयानं केला होता. ईव्हीएम हॅक कसं होतं याच्या प्रात्यक्षिकासाठी एक खरं ईव्हीएम पैदा केल्यानं पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. मुळात प्रश्न ईव्हीएम हॅक होतं की नाही हा नाहीये. यंत्रणा विश्वासार्ह आहे का हा आहे. भाजप आज ईव्हीएमचं समर्थन करतेय यांच्याच नेत्यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलनं केली होती. भाजपचे प्रवक्ते खासदार जी.व्ही.एल.नरसिंहा राव यांचं लालकृष्ण अडवाणी यांनी प्रस्तावना लिहून प्रकाशित केलेलं 'डेमॉक्रॉसी अँट रिक्स' हे पुस्तक उपलब्ध आहे. ईव्हीएमला विरोध करणारी नरेंद्र मोदी यांची एक क्लिपदेखील सोशल मीडियावर फिरतेय. आजच्या कुठल्याही यंत्रणेवर विश्वास ठेवावा अशी स्थिती नाही. अगदी न्यायव्यवस्थादेखील. आणि हे पूर्ण आदर राखून मी लिहीतोय. 'प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट' वेशीला टांगून खुद्द चंद्रचूड यांनी ज्ञानवापीमध्ये सर्वेक्षण करण्याच्या निमित्तानं दार किलकिलं केलं आणि आता संभलमध्ये दंगल होतेय. अजमेर शरीफमध्ये कनिष्ठ न्यायालयानं तसंच निर्देश दिलेत. उखडून टाका सगळं...! चंद्रचूड म्हणतात, 'आमच्याकडून एखादा पक्ष सांगेल तसा निर्णय द्यायची अपेक्षा करू नका. आम्ही कायद्याची चिकित्सा करतो...!' मारून टाका लोकशाहीचा आत्मा आणि करा पोस्टमोर्टम. तुम्ही कशालाच बांधील नाही. ज्या देवाला अयोध्येच्या निर्णयाआधी तुम्ही कौल लावलात त्या देवालाही नाही. कारण तुम्ही खरंच पापपुण्याच्या, माणुसकीच्या, न्यायाच्या संकल्पनेच्या पलिकडं गेला आहात. जे पक्ष फोडले त्यांचं चिन्हं गोठवा ही साधी मागणी ना न्यायालय मान्य करत, ना निवडणूक आयोग. चिन्हाशी साधर्म्य असलेलं चिन्ह गोठवा हेसुद्धा मान्य केलं जात नाही. मग तेच चिन्ह विरोधी उमेदवाराच्या नावाशी साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळतं आणि विरोधी पक्ष हरतो. खुलेआम धर्माच्या नावावर मतं मागितली जातात आणि ज्या देशात एकेकाळी हा गुन्हा केला म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचा मताधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतला गेला होता त्या देशात बिनदिक्कतपणे धर्मयुद्ध पुकारत धर्माच्या नावावर मतं मागितली जातात. निवडणूक आयोग डोळे मिटून शेरोशायरी ऐकवत बसतात, सत्ताधाऱ्यांना निवडणुकीच्या तारखा बदलून देतात. बरोबर आहे. ईव्हीएम हॅक झालेलं नाहीये. यंत्रणाच कॅप्चर झाल्यात. आजवर कधीही मतदान करावं की करू नये असा संभ्रम मनांत निर्माण झाला नाही. आज मात्र तो झालाय.




Saturday, 16 November 2024

शिवसेनेचे मित्र आणि महाराष्ट्रधर्म...!

"आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करताना त्यांची वैविध्यपूर्ण वाटचाल डोळ्यासमोर येते. याचं कारण शिवसेना दुभंगल्यानंतर 'ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारधारा बदलली!' 'बाळासाहेबांचे विचार सोडले!' अशी टीका होतेय. मुळात त्यांची विचारधारा ही महाराष्ट्रधर्माची होती हे इथं स्पष्ट करायला हवं. शिवसेनेला तशी कोणतीच विचारधारा अस्पृश्य नव्हती. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रजा समाजवादी, रिपब्लिकन, दलित पँथर, कम्युनिस्ट इतकंच काय मुस्लिम लीगशीही शिवसेनेनं युती केली होती. शिवसेनेनं केलेल्या आघाड्या ह्या काळाच्या कसोटीवर उतरल्या. एवढ्या उलट-सुलट उड्या मारूनही शिवसेना टिकून कशी राहिली? त्याचं एक कारण म्हणजे शिवसेनेची कट्टर फौज आणि दुसरी, पक्षाला नसलेली सैद्धांतिक बैठक!"
....................................................
*भा*जप, मुस्लिम लीग, काँग्रेसचे विविध गट, प्रजा समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दलित पँथर, ह्यांच्यात काय साम्य आहे, असं विचारलं तर अनेक जण बुचकळ्यात पडतील. फार कमी लोकांना माहीत असेल की, महाराष्ट्रातल्या ह्या राजकीय शक्ती कधी काळी शिवसेनेच्या सोबत युतीत वा आघाडीत होत्या. इतकंच काय, भाजपसोबत सुद्धा शिवसेनेनं १९८४ मध्ये अगदी काही काळासाठी घरोबा केला होता. पण इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या भीषण दंगलीमुळं आलेल्या काँग्रेसच्या लाटेत, ही सेना भाजप युती वाहून गेली होती. नंतर, भाजपनं शिवसेनेशी काडीमोड घेतला पण त्यांचे बंध परत जुळले ते १९८९ मध्ये, ते सुद्धा हिंदुत्वाच्या विषयावर! यालाही एक घटना कारणीभूत आहे. ही युती २०१४ पर्यंत कायम राहिली. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे आणि आचार्य अत्रेंचा वाद नंतरच्या काळात इतका प्रचंड वाढला, कि त्या चिखलफेकीचे शिंतोडे अक्षरश: मुंबईतल्या जवळजवळ प्रत्येक मराठी घरात पोचले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी आचार्य अत्रे यांचा उल्लेख ‘वरळी नाक्यावरचं डुक्कर’ असं करून अत्र्यांच्या चेहऱ्याची साधर्म्य सांगणाऱ्या डुकराचं व्यंगचित्र मार्मिकमध्ये सतत काढलं होतं हे विशेष! तसं पाहिलं तर शिवसेनेच्या फक्त दोनच राजकीय भूमिका पहिल्या दिवसापासून आजवर कायम आहेत. त्या भूमिका म्हणजे मराठी माणसाचा घेतलेला कैवार तथा देशीवाद आणि टोकाचा कम्युनिस्ट विरोध! 
शिवसेनेच्या जन्माच्या पुढच्या वर्षी, म्हणजे १९६७ मध्ये, शिवसेनेने एक महत्त्वाची राजकीय भूमिका घेतली. भारताचे माजी संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांना ईशान्य मुंबईतून लोकसभेसाठी निवडणूक लढवायची होती. परंतु त्या काळात मुंबई काँग्रेसचे अनभिषिक्त सम्राट असलेले स.का.पाटील, यांनी मेननना उमेदवारी नाकारली आणि माजी सनदी अधिकारी स.गो.बर्वे यांच्या गळ्यात माळ पडली. शिवसेनेनं आपला कधीकाळचा स.का.पाटील विरोध विसरून, पाटील हे संयुक्त महाराष्ट्राचे आणि मुंबई महाराष्ट्रात ठेवण्याच्या विचाराचे कट्टर विरोधक मानले जायचे. शिवसेनेनं चक्क बर्वे यांना पाठिंबा जाहीर केला. १९६८ मध्ये शिवसेनेनं आपली पहिली वहिली मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली. ऑक्टोबर १९६६ च्या पक्षाच्या पहिल्या सभेमध्ये शिवसेनाप्रमुखांनी राजकारणाचा उल्लेख 'राजकारण म्हणजे गजकर्ण' असा केला होता हे विशेष! प्रारंभी निवडणुका न लढण्याचा निर्णय घेतला. कालांतरानं केवळ नागरी सेवा देण्यासाठी म्हणून महापालिकेच्या निवडणुक लढविली. त्यावेळेला शिवसेनेचा मित्रपक्ष होता तत्कालीन प्रजा समाजवादी पक्ष. शिवसेना आणि प्रजा समाजवादी यांची युती फक्त १९७० पर्यंत टिकली. १९७२ मध्ये शिवसेनेला एक नवा मित्र मिळाला तो म्हणजे रा. सु. गवई यांच्या नेतृत्वाखालचा रिपब्लिकन पक्ष. उल्लेखनीय गोष्ट अशी की नंतरच्या काळात शिवसेना आणि दलित पॅंथर यांचा रस्त्यावर टोकाचा संघर्ष झाला. अर्थात नंतरच्या काळात ह्याच दलित पँथरच्या मुशीत घडलेले नामदेव ढसाळ, रामदास आठवले आणि अर्जुन डांगळे यासारखे नेते ‘शिवशक्ती-भीमशक्ती’ चा नारा देऊन शिवसेनेच्या वळचणीला आले. १९७७ मध्ये सेनेनं काही काळ का होईना सेना आणि दलित पॅन्थर यांची युती झाली होती.
१९७२ मध्ये शिवसेनेचे अजातशत्रू नेते सुधीरभाऊ जोशी हे महापौर झाले तेसुद्धा चक्क मुस्लिम लीगच्या पाठिंब्यावर अर्थात नंतर महापौर जोशींना लीगच्या नगरसेवकांना एक सवलत द्यावी लागली ती म्हणजे सभागृहांमध्ये वंदे मातरम गायले जात असताना तटस्थ राहण्याची! याच मुस्लिम लीगसोबत शिवसेनेनं नंतर काही काळ युतीही केली होती. शिवसेनाप्रमुख आणि लीगचे तत्कालिन अध्यक्ष जी.एम.बनातवाला यांनी तर नागपाडामध्ये मस्तान तलावावर चक्क सभा घेतली. १९७५ ते १९८५ हे दशक शिवसेनेसाठी तसं फार अवघड होतं. १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी जाहीर केलेल्या आणीबाणीला शिवसेनेनं पाठिंबा दिला. आणीबाणीला विरोध करणाऱ्यांना तुरुंगात डांबले जात होते. लाखोच्या संख्येत असलेल्या शिवसैनिकांची तुरुंगवारी वाचविण्यासाठी आणीबाणीला पाठींबा देऊन टाकला होता. असं शिवसेनाप्रमुखांनीच नंतर सांगितलं होतं.१९७७ मध्ये शिवसेनेच्या एका गटाची मागणी धुडकावून शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि शिवसेनेलाही घरघर लागली. १९८० मध्ये शिवसेनेनं बाळासाहेबांचे मित्र असलेल्या काँग्रेसच्या बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांना मुख्यमंत्रिपदी पाठिंबा दिला. बाळासाहेबांनी तर श्रीवर्धनमध्ये त्यांचा प्रचारही केला होता. या पाठिंब्याच्या बदल्यात शिवसेनेला विधान परिषदेत काही जागा मिळाल्या. १९६९ च्या काँग्रेसमधल्या ऐतिहासिक फुटीनंतर शिवसेनेने काँग्रेसमधल्या विविध गटांचा, उदाहरणार्थ, इंडिकेट आणि सिंडिकेट, पाठिंबा घेऊन आणि देऊन महापालिकेतलं राजकारण पार पाडलं होतं. १९७७ मध्ये इंदिरा काँग्रेसच्या मुरली देवरांना मुंबईच्या महापौरपदासाठी पाठिंबा देण्याच्या विषयावरून ज्येष्ठ शिवसेना नेते आणि शिवसेनेचे मुंबईतले पहिले महापौर डॉक्टर हेमचंद्र गुप्ते यांनी तर जनता पक्षात प्रवेश केला. आज ह्याच मुरली देवरांचे पुत्र मिलिंद देवरा हे शिवसेनाप्रमुखांचे नातू आदित्य ठाकरे यांचा पराभव करण्यासाठी सरसावले आहेत.
ह्यात एक लक्षणीय गोष्ट अशी की शिवसेनेच्या पहिल्या मेळाव्याला स्टेजवर असणाऱ्या चार वेगळ्या पक्षाच्या नेत्यांपैकी एक होते ज्येष्ठ काँग्रेस नेते बॅरिस्टर रामराव आदिक!. आदिकांना १९७४ च्या लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने पाठिंबा दिला होता. शिवसेनेची तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यासोबत जवळीक होती. महाराष्ट्र प्रदेश आणि मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचा वाद जगजाहीर होता. दिल्ली दरबारी फंड गोळा करणाऱ्या रजनी पटेल, मुरली देवरा यांना मुख्यमंत्र्यांहून अधिक किंमत दिली जात असल्याने नाईक यांचा राग होता. शिवसेनेने परप्रांतीय विरोधात आंदोलन करीत असल्यानं ते काँग्रेसला पूरक ठरलं होतं. म्हणून मग शिवसैनिकांच्या आंदोलनांना पोलिसांनी अधिक त्रास न देता सौम्यता दाखविली. त्यामुळे शिवसेनेला ‘वसंतसेना’ हे नाव पडलं होतं, हेही तसं जगजाहीरच आहे. शिवाय शिवसेनेचे टीकाकार म्हणतात ही काँग्रेसच्या सांगण्यावरून शिवसेनेनं कम्युनिस्टांच्या अधिपत्याखालील कामगार संघटना खिळखिळ्या केल्या. अडचणीच्या गर्तेत सापडलेल्या शिवसेनेला ह्याच काँग्रेसनं १९८५ मध्ये नवसंजीवनी दिली. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि मुंबई काँग्रेसचे बॉस मुरली देवरा यांच्यात विळा भोपळ्याचा नातं. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट असल्याचा आरोप दादांनी केला. ह्यानंतर निर्माण झालेल्या मराठी माणसाच्या संतापावर शिवसेनेनं मुंबई महापालिकेत सत्ता हस्तगत केली. १९९२ ते ९७ हा अपवाद वगळता शिवसेना या महापालिकेवर सत्ता गाजवते आणि सत्तेच्या जोरावर शिवसेनेचे ‘पारितोषिक राजकारण’ - रिवॉर्ड इकॉनॉमी चालतं हे विशेष. अर्थात, ह्याच दशकात १९८० मध्ये शिवसेनेचे काँग्रेस सोबतचे रस्ते दुभंगले. 
१९८७ मध्ये झालेल्या विलेपार्लेच्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेनं हिंदुत्वाची झूल अधिकृतपणे पांघरली. त्याच्या आदल्या वर्षी शरद पवार यांनी आपली काँग्रेस-एस इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन केली होती. तेव्हा पवारांच्या मागे असणारा वर्ग हा गावोगावी असणाऱ्या काँग्रेसमधल्या सरंजामशाही नेत्यांशी संघर्ष करत होता. हा बिथरलेल्या वर्ग मग शिवसेनेसोबत गेला. नंतरच्या काळात शिवसेनेचे नेते म्हणून उदयाला आलेले बसमतचे डॉ. जयप्रकाश मुंदडा हे मूळचे काँग्रेसचे-एस चे. १९८२ मध्ये पवार आणि मुंबईचे बंदसम्राट, शिवसेनेचे कधी काळचे राजकीय विरोधक जॉर्ज फर्नांडिस हे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उपस्थित होते. ह्याच पवारांना १९९० च्या दशकात बाळासाहेब खास ठाकरी शैलीत मैद्याचं पोतं, बारामतीचा ममद्या कसं म्हणत हे लोकांना आठवतं…! तर, काळाची पावलं ओळखून भाजप नेते प्रमोद महाजन यांनी शिवसेनेसोबत युतीचं पाऊल उचललं. आज भाजपच्या मित्रपक्षांची यादी मोठी असली, तरीसुद्धा हिंदुत्वाच्या विषयावर मित्र असलेला शिवसेना हा भाजपचा एकमेव नैसर्गिक मित्र होता.  ही भगवी युती टिकून राहिली २०१४ पर्यंत. आणखी एका गोष्टीची आठवण द्यायची तर २००७ आणि २०१२ ही दोन उदाहरण देता येतील. मराठी राष्ट्रपती हा मुद्दा घेत शिवसेनेनं प्रतिभाताई पाटील यांच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला साथ दिली होती. त्याचीच पुनरावृत्ती २०१२ मध्ये प्रणब मुखर्जी यांच्याबाबतीत झाली. गमतीचा भाग म्हणजे मित्रपक्ष असलेल्या भाजपनं मुखर्जींना नाही तर पी.ए.संगमांना पाठिंबा दिला होता. तसंच २००८ मध्येही राष्ट्रवादीशी युती करण्याचा अल्पजीवी प्रयत्न शिवसेनेनं केला होता. 'पब्लिक मेमरी इज शॉर्ट' असं म्हणतात. शिवसेनेनं केलेल्या अश्या आघाड्या ह्या काळाच्या कसोटीवर उतरल्या. पण एवढ्या उलट-सुलट उड्या मारून पण शिवसेना टिकून कशी राहिली? त्याची एक कारण म्हणजे शिवसेनेची कट्टर फौज आणि दुसरी, पक्षाला नसलेली सैद्धांतिक बैठक. १९८४ त्याकाळात समाजवादाशी फ्लर्ट करणाऱ्या बाळासाहेबांनी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात शिवसेनेची राज्यव्यापी बैठक बोलावली होती. त्याला संबोधित करायला उपस्थित होते ते भारतातले कम्युनिस्टांचे भीष्माचार्य कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे. तेंव्हा डांगे ह्यांची कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मधून हकालपट्टी झाली होती. आपल्या भाषणात डांगे साहेब म्हणाले होते कि, 'शिवसेनेची सैद्धांतिक बैठक नाही, आणि त्यामुळे अशी संघटना तग धरणे मुश्किल असते!'  म्हणूनच सतत भूमिका बदलणं भाग पडलं होतं. आज जी ठाकरे सेनेवर बाळासाहेबांचे विचार सोडले असं जे म्हटलं जातंय ते गैरलागू ठरतेय!
चौकट
*भाजपची गरज आणि शिवसेनेची अपरिहार्यता*
१९८७ मध्ये विलेपार्लेची पोटनिवडणूक काँग्रेसच्या हंसराज भुग्रा यांच्या निधनाने जाहीर झाली. त्यासाठी शिवसेनेने डॉ. प्रभू यांना उभे केले. ते त्यावेळी मुंबईचे महापौर होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रभाकर कुंटे, जनता पक्षाचे प्राणलाल व्होरा उभे होते. तेव्हा जनसंघ जनता पक्षात आणि शिवसेनेच्या विरोधात होता.  शिवसेनेच्या एका प्रचारसभेत शिवसेनाप्रमुख ठाकरे यांनी गर्वसे कहो हम हिंदू है! अशी घोषणा दिली आणि मतदारांना हिंदूत्वावर मतं मागितली. या पोटनिवडणुकीत डॉ. प्रभू यांचा विजय झाला, ते निवडून आले. त्याविरोधात काँग्रेसचे प्रभाकर कुंटे हे कोर्टात आणि निवडणूक आयोगाकडे गेले. तिथं हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून डॉ. प्रभू यांची निवड कोर्टानं रद्द केली, तर निवडणूक आयोगानं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि डॉ. रमेश प्रभू यांचा मताधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतला. हिंदुत्वाचा प्रचार करून मतं मागितली यावर असा निर्णय होण्याचा देशातला पहिलाच प्रकार होता. पण य घटनेनं हिंदू मतांचे लक्ष शिवसेनेकडे वेधले गेले. हिंदूत्वावर मतं मागण्याला कचरणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघ सरसावले. हिंदुत्वाचा प्रचार केल्यानंतर मतं मिळू शकतात हे लक्षांत आल्यानंतर संघाशी संबंधित पत्रकार ग.वा.बेहरे, दि.बा गोखले, विद्याधर गोखले आणि प्रमोद महाजन यांच्या मातोश्रीवरच्या फेऱ्या वाढल्या. त्यांनी शिवसेनाप्रमुख ठाकरे यांना युती करायची गळ घातली. केवळ मराठीचा आग्रह धरून आपला पक्ष विस्तारणार नाही हे माहीत असल्यानं त्यांनी हिंदुत्वाचा प्रचार अवलंबला होता. दरम्यान भाजपने आपला 'गांधीवाद समाजवाद सोडून हिंदुत्वाचा स्वीकार करण्याचे हरियाणातल्या राष्ट्रीय अधिवेशनात घेतला. त्यासाठी प्रमोद महाजन आग्रही होते. अशाप्रकारे १९८९ मध्ये भाजपची गरज आणि शिवसेनेची अपरिहार्यता यामुळं शिवसेना भाजप युती झाली ती २०१४ पर्यंत टिकली. काही दिवसांच्या खंडानंतर ती २०१९ पर्यंत टिकली! 
हरीश केंची
९४२२३१०६०९

आओ फिर से दिया जलाएँ.... ll

"आज बुधवारी मतदान आहे. कौरव पांडवांचं महाभारत आरंभलंय. विस्कटलेल्या, उध्वस्त महाराष्ट्राला सावरण्याची जबाबदारी मतदारांवर आलीय. मतदान हे दुधारी शस्त्र आहे, त्यानं रक्षण तरी होईल, नाहीतर उध्वस्त तरी! १८ ते ४० वयाच्या मतदारांची जबाबदारी मोठी आहे, की पुढचं आयुष्य कसं असावं हे ठरवून मतदान करावं लागणारंय. चाळिशीतल्यांचं आयुष्य आता उतरणीला लागलेलंय. तरीही सर्वांना महाराष्ट्र सावरण्यासाठी नवनिर्माणाची कास धरावी लागणारंय. रणांगणात समोर कोण आहे हे न पाहता, स्वत:ला पेटावं लागेल अन् इतरांना पेटवावं लागेल. शिवाय बेबंदशाही संपवून लोकशाही, महाराष्ट्रधर्माची पुनर्स्थापना, मराठी रयतेच्या भल्यासाठी मंबाजी, तुंबाजी आणि सालोमालो या प्रवृत्तीशी झगडावं लागेल! त्यांना संपवावं लागेल!
....................................................
*भरी दुपहरी में अँधियारा l सूरज परछाईं से हारा l*
*अंतरतम का नेह निचोड़ें l बुझी हुई बाती सुलगाएँ l*
*आओ फिर से दिया जलाएँ ll*
*हम पड़ाव को समझे मंज़िल l लक्ष्य हुआ आँखों से* *ओझल l*
*वर्तमान के मोहजाल में l आने वाला कल न भुलाएँ l*
*आओ फिर से दिया जलाएँ ll*
*आहुति बाक़ी यज्ञ अधूरा l अपनों के विघ्नों ने घेरा l*
*अंतिम जय का वज्र बनाने l नव दधीचि हड्डियाँ* *गलाएँ l*
*आओ फिर से दिया जलाएँ ll*
*ले*खाचा मथळा हा कविकुलभूषण अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेचा आहे. सद्यस्थितीत ती एकदम फिट्ट बसतेय. त्या कवितेचीच अनुभुती सध्या येतेय. राजकारणाची अधोगती झालीय, पार चिखल झालाय, राजकीय, सामाजिक सहजीवन नासलंय, सडलंय. हे सावरणारा चेहरा आजतरी दिसत नाही. सामान्य बुद्धी, शक्ती, कर्तृत्वाच्या माणसांना आलेलं महत्त्व हीच दुःखाची आणि चिंतेची बाब आहे. साहित्यिक, पत्रकार, विचारवंत, भाष्यकार, प्रत्यक्ष कृतीतून आदर्श घडवणारे कर्मवीर, महर्षी, महात्मे अशा नररत्नांची खाण महाराष्ट्र होता आणि तेव्हाच तो भारताचा आधार होता. आज महाराष्ट्राचा आत्मा झोपलाय, त्याला झोपवण्याचं काम गेल्या ६०-७० वर्षांत झालंय. मराठी भाषा, उद्योग, अर्थकारण, रंगभूमी, चित्रपट, राजकारणाप्रमाणेच यशस्वी होण्याच्या खुब्या गवसलेली सुमार कुवतीची माणसं कटीवर स्थानापन्न झालीत. ती गाजताहेत, वाजताहेत, पण महाराष्ट्राची मात्र सर्व क्षेत्रात पिछेहाटच होतेय. राजकारण आणि राजकारणी  बेहिशेबी, बेधुंद, बेताल, बेछूट, बनलेत. कोणताही विधिनिषेध राहिलेला नाही. नैतिकता कशाला म्हणतात याचा पत्ताच नाही. सौहार्द, सामंजस्य, सहिष्णुता, सहकार्य, सविनय काहीही उरलेलं नाही. एकमेकांचे कपडे फाडण्यात सारे दंग आहेत. निंदानालस्ती, शिव्यांची लाखोली वाहण्यात सारेच मश्गूल आहेत. सामान्य मतदार मात्र असहाय्यपणे हे सारं काही पाहतोय. ज्येष्ठ कविवर्य विंदा करंदीकर यांच्या 'सब घोडे बारा टक्के..!' या कवितेची आठवण यावी अशी स्थिती आहे. येत्या बुधवारी मतदान आहे. निवडणुकांचा निकाल काय अन् कसा लागणार याची चिंता डोक्यावर घेऊन मी हे लिहितोय असं वाटलं ना तुम्हाला? प्रिय वाचकहो, तसं काही नाही! निवडणुकीत काय होणार त्याची मला मुळीच चिंता नाही. राज्यात महाविकास आघाडी त्यातल्या काँग्रेससह कोलमडली काय अन् महायुती भाजपसह कोलमडली काय त्याचं सुखदुःख मला नाही. भलती ओझी डोक्यावर घेऊन कशासाठी उगाच आपलं डोकं पिकवून घ्यायचं? महाविकास आघाडी आली म्हणून आपल्याला काही जहागिरी मिळायची नाही आणि महायुती आली तरीही काही मिळायचा प्रश्न नाही. पण राजकारणावर आपली बुद्धी इकडेतिकडे कलू न देता जे वाटलं ते, आणि वाटतं ते तितक्या पोटतिडकीनं लिहायचीही आता सोय उरलेली नाही. आजवर मी जे काही लिहिलं ते माझ्या मनाला पटलं म्हणूनच. शरद पवारांची बदनामी, निंदानालस्ती, त्यांच्या व्यंगावर बोलून त्यांना संपवण्याचा विडा उचलून काहींनी कुभांडं रचण्याचा सपाटा लावलाय. मी त्यांची भांडी फोडली. शरद पवारांची काम करण्याची तडफ, त्यांचा लोकसंपर्क, त्यांची सर्व प्रश्नांच्या मुळाशी जाण्याची धडपड, प्रतिस्पर्ध्यांचं मर्म हेरून नेमका त्यावर घाव घालण्याची त्यांची कुवत आणि राजकारणासाठी सर्वशक्तीनिशी झुंजण्याची त्यांची तयारी महाराष्ट्रातच नव्हे, तर साऱ्या भारतात अतुलनीय आहे. महाराष्ट्रात त्यांच्या जवळपास येऊ शकेल असा कुणीही नेता नाही. फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार ह्या तिघांच्या तिकडीनं काही प्रमाणात पवारांचंच अनुकरण करून पक्षाला ताकद देण्याचा प्रयत्न दोन-तीन वर्षात केलाय. शरद पवारांनाही आज सत्ताधाऱ्यांनी नव्हे, त्यांच्याच पक्षातल्या सुमार कुवतीच्या, परप्रकशित नेत्यांनी, फाजिल महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्यांनी संकटात आणलंय. गाडीखालून चालणाऱ्या कुत्र्याच्या कुवतीचे काही आमदार, पक्ष जणू आपल्या बळावरच चालतोय अशा मिजाशीत शरद पवारांना विरोध करत बाहेर पडलेत. या अशा सामान्य बुद्धी, शक्ती, कर्तृत्वाच्या माणसांना आलेलं महत्त्व हीच महाराष्ट्राच्या दृष्टीनं सर्वांत दुःखाची आणि चिंतेची बाब आहे. 
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात ऐन रंगात आलाय. सारेच घुमायला, झुंजायला लागलेत. एकमेकांचे गळे धरण्यासाठी सरसावलेत. सत्ताधाऱ्यांना लक्ष्मीचा वरदहस्त लाभलाय. त्याची तिची तर मनसोक्त उधळण सुरूय. रोडावलेल्या प्रसिद्धिमाध्यमांना सुगीचे दिवस आलेत. त्यामुळं नुसता हल्लकल्लोळ माजलाय! आताशी महाराष्ट्रानं कुणाला येत्या पाच वर्षासाठी 'आपले भाग्यविधाते' म्हणून निवडायचंय हे मतदारांनी ठरवलेलं असेलच. पण खरोखर महाराष्ट्राचं भाग्य या विधानसभेवर निवडून जाणाऱ्या २८८ लोकांच्याच हातात आहे का? महाराष्ट्राच्या विधानसभेत खरोखर महाराष्ट्राच्या कल्याणाच्या प्रश्नावरच लक्ष दिलं जातं? निवडून गेलेले विधानसभेत कितीवेळ असतात, काय बोलतात, कसं बोलतात याकडं कधी मराठी माणूस लक्ष देतो? आमदार म्हणून जे निवडून येतात ते तिथं करतात काय, याचा आढावा वर्षाच्या अखेरीला मतदार घेतात का? काही आमदार आपल्या कामाचा हिशोब दरसाल आपल्या मतदारांना देतात ही गोष्ट खरीय, पण हा हिशोब द्यायचीसुद्धा फॅशन झालीय असा अनुभव अनेकांनी दिलेले हिशोब चाळल्यावर येतो. घडलेल्या कामाचं श्रेय उपटण्याचा आणि न झालेल्या गोष्टींची जबाबदारी झटकण्याचा प्रकार चतुराईनं या हिशोबपत्रकात केलेला असतो आणि ह्या पत्रिका दिमाखदार छापून घेण्यासाठी प्रायोजक देखील मिळवलेले असतात. योजक आणि प्रायोजक मिळवण्याच्या खुब्या आत्मसात करणं हा राजकीय हुशारीचाच भाग आहे. अशा खुब्या हेरणारे हुशार महाराष्ट्रात खूप पसरलेत. 
सावली मंत्रिमंडळ कल्पना इकडंही हवी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? ह्या प्रश्नात जणू महाराष्ट्राचं, मराठी समाजाचं सारं भवितव्य गुंतलंय असं वाटावं, अशा उत्साहानं जिकडेतिकडे ह्या प्रश्नाचा विचार चाललाय. मुख्यमंत्र्याला रिमोट कंट्रोलनं नाचवण्याचं कुणी ठरवलंय, कुणी आवळ्याभोपळ्याची मोट बांधून हे पद कुणाला मिळावं, कुणाला मिळू नये याचा निर्णय घेण्याइतपत बळ संपादन करण्यासाठी झटताहेत; अर्थात ते एकमेकाला! मुख्यमंत्री अमुक झाला तरच महाराष्ट्रात रामराज्य अवतरेल असं मानण्याजोगी खरोखरच परिस्थिती आहे का? विरोधी पक्षाला महाराष्ट्रात बहुमत मिळेल असं जे जनताकौल दिले गेलेत त्या कौल देणाऱ्यांनीही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचेच नाव घेतलंय, असंही आपण बघितलंय. बहुमत विरोधी पक्षाला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कसं शक्य आहे? पण लोकांना अशक्यही शक्य वाटावं अशीच एकंदरीनं परिस्थिती आहे. 'दगडापेक्षा वीट मऊ' या नात्यानं अथवा ओंडका राजा नको, आपल्याला खाऊन टाकणारा बगळासुद्धा चालेल असं मानणाऱ्या बेडूक बुद्धीनं असो, लोक मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच हवेत असं म्हणत असावेत. मुख्यमंत्रीपदावरचा माणूस सारं काही ओढून नेण्याची कुवत असणारा असावा, असंही लोकांना वाटत असावं. महाराष्ट्रानं गेल्या साठ वर्षांत डझनभर मुख्यमंत्री सोसले आहेत. अगदी शिवाजीराव निलंगेकर, बाबासाहेब भोसलेसुद्धा काही काळ आपण चालवून घेतले. 'पालापाचोळा' मंत्रिमंडळे आली आणि गेली. मंत्रीपदाची कुणीकुणी हौस फेडून घेतली, हीसुद्धा माहिती मराठी माणसाच्या विनोदप्रियतेची साक्ष देऊन जाईल. असो. पण महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाचा नेता कोण असावा, महाराष्ट्राचा विरोधी पक्ष कसा असावा यावर आपण गंभीरपणे का विचार करत नाही? निवडणुका लढताना आपलीच सत्ता येणार असा भ्रम डोक्यात शिरल्यानं दगडगोट्यांनाही आपल्याशिवाय या मराठी जनतेचा कुणी वाली नाही असं वाटलं तर हरकत नाही; पण निवडणुका झाल्या, सगळ्या पर्भाच्या पाण्यातल्या म्हशी एकदाच्या बाहेर पडल्या, कुणाचं बळ किती यावर अंदाज करण्याची जरुरी उरली नाही, एकदा आमदार म्हणून विधानसभेत कोण बसणार हे नक्की झालं की, मग शांत चित्तानं पाच वर्षे सत्ताधारी पक्षाशी कसा संघर्ष द्यायचा याचा विचार करून हा संघर्ष अधिक प्रखर आणि नेमका करण्यासाठी आपल्या सगळ्यांचं नेतृत्व कुणाकडं असावं याचा सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन विचार करायला काय हरकत आहे? विधानसभेत विरोधी पक्षांनी आपला एकच गट मानून सत्ताधारी पक्षाला समाजहिताच्या गोष्टी करण्यासाठी अंकुश ठेवून सतत योग्य मार्गावर ठेवण्यासाठी का झुंजू नये? विधानसभा एकदा निश्चित झाली, मग कशासाठी पुंजकेपुंजके करून विरोधी पक्षानं आपलं वेगळं अस्तित्व जपायचं? निवडणुकीत वेगवेगळे झेंडे नाचवण्याचा प्रकार होतो तो काय साधतो? विरोधी पक्षाचं नेतेपद ही मानाची जागा आहे आणि ती जागा प्राप्त होणाऱ्याला मंत्र्याप्रमाणेच अनेक लाभ प्राप्त होतात ही गोष्ट खरी आहे. ह्या जागेवर त्यासाठी हक्क सांगणारे असणारच. पण विरोधी पक्षालाही सत्ताधारी पक्षाएवढेच लोकशाहीत महत्त्व आहे. विरोधी पक्ष जेवढा समर्थ, जेवढा जागरूक आणि एकसंध असेल तेवढा त्याचा प्रभाव अधिक, त्याचा धाकही अधिक! म्हणूनच सत्ता ज्यांच्या हातात असते ते सदैव विरोधी पक्षात 'आपली माणसे' धुंडाळतात, त्यांना महत्त्व प्राप्त होईल असं राजकारण लढवतात आणि आपला मार्ग साफ करून घेतात. गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षाच्या नेतेपदी आल्यावर जाहीरपणे म्हणाले होते, 'मुख्यमंत्र्यांच्या खिशात नसलेला मी विरोधी पक्षनेता आहे...!'
गोपीनाथ मुंडे त्यांच्या ह्या बोलण्यानुसार वागले, पण त्यांनी आपल्या सांगण्यानं मुख्यमंत्रीपदासाठी धडपडणाऱ्या विरोधी पक्षातल्या त्यांच्याच काही मित्रांची केवढी पंचाईत करून टाकली होती. विरोधी पक्षाच्या कार्यपद्धतीचाही काही फेरविचार होण्याची जरुरी आहे. विरोधी पक्षातल्या मंडळींनी कामकाजावर बहिष्कार किती वेळ टाकायचा, सभात्याग किती वेळा करायचा यालाही काही मर्यादा असावी. सभात्याग करण्यात विरोधी पक्षाचंच नव्हे, तर सत्ताधारी पक्षाचे सदस्यही एवढे तरबेज झालेत की, विधानसभेत अनेक वेळा आवश्यक एवढी गणसंख्याच फक्त असते. बहुतेक सारे सदस्य न जाहीर केलेला सभात्याग करून 'इतर कामे' करायला सटकलेले असतात. हजेरीची नोंद झाली की, आपण मोकळे झालो ही जी भावना आमदारात आहे ती बदलायला हवी. आमदारांना विधानसभेत हजर राहण्याचं बंधन पक्षानं घालायला हवं. रिकाम्या बाकांपुढे कामकाज चालवण्याचा प्रकार शक्य तेवढा कमी व्हायला हवा. विरोधी पक्षाच्या आमदारांनीच खरं तर या दृष्टीनं स्वतःला बदलायला हवं. आपल्या आमदारांना यासाठी योग्यप्रकारे मार्गदर्शन करण्याची काही व्यवस्था यासाठी पक्षांनीच करायला हवी. पत्रकार, विधानसभेच्या कामात कर्तृत्व दाखवणारे माजी आमदार, निवृत्त सरकारी अधिकारी, पत्रकार यांच्याकडून आमदारांना याबद्दल मार्गदर्शन घडू शकतं. विविध राजकीय विचार आणि त्या विचारानुसार येणारे वेगळेपण असणारच, पण विधानसभेच्या कामकाजात त्याची अडचण येण्याची शक्यता नाही. विरोधी पक्ष म्हणून जबाबदारीनं काम करून दाखवण्याचा प्रयत्न गेल्या कित्येक वर्षांत झालेलाच नाही. विरोध करायचा म्हणजे बहिष्कार घालायचा, सभात्याग करायचा अथवा बोंबाबोंव करून कामकाज अशक्य करून टाकायचं. लाल निशाण गट नावाचा एक छोटा कम्युनिस्ट विचारसरणी मानणारा पक्ष ज्या जिद्दीनं विधानसभेत आपलं काम करायचा ती जिद्द सर्वच पक्षांनी स्वीकारायला हवी. काही व्यक्ती अभ्यासू असतात. अत्यंत नेकीनं विधानसभेत वागतात. पण ज्यावेळी अशा वृत्तीचे आमदार एकत्र येतील तेव्हा त्यांचा प्रभाव शतपट वाढेल. 'शॅडो कॅबिनेट' सावली मंत्रिमंडळ ही कल्पना प्रत्यक्षात आणायला हवं. महाराष्ट्रात अत्यंत प्रभावीपणे ही गोष्ट करता येणे शक्य आहे. 
रिमोट कंट्रोल लोकांच्याच हातात असतो. कदाचित असा प्रयोग होऊन मुख्यमंत्री, अर्थमंत्री, सहकारमंत्री, कायदेमंत्री, गृहमंत्री अशी सावली मंत्रिमंडळाची पर्यायी योजना विरोधकांनी लोकांपुढे ठेवली असती तर पक्षांत जी फाटाफूट झाली ती टळलीही असती. नुसतं एका व्यक्तीला एक पद चिकटवलं, की झालं 'सावली मंत्रिमंडळ' असा मात्र प्रकार होऊन चालणार नाही. ज्या व्यक्तीला जे पद मिळेल त्यानं त्या खात्याचा कारभार जाणून त्या खात्याबद्दल आपल्या ज्या कल्पना असतील त्याबद्दल तज्ज्ञांचा, शासकीय अधिकाऱ्यांचाही सल्ला घेऊन आपलं धोरण स्पष्ट करायला हवं. सरकारचा जो मंत्री असेल त्या मंत्र्याच्या धोरणाला जरूर तेव्हा शह देऊन, जरूर तेव्हा दुरुस्त्या सुचवून, जरूर तेव्हा विरोध करून आपलं आणि आपल्या पक्षाचं त्या विशिष्ट खात्याबाबतचं धोरण कसं अधिक लोकहिताचं आहे याची साक्ष लोकांपुढं ठेवायला हवी. ह्या पर्यायी मंत्र्याला सहाय्य करण्यासाठी पर्यायी राज्यमंत्री, एवढंच नव्हे आमदारांपैकी तीन-चारजणांची सहाय्यक तुकडीही देण्याची पक्षानं व्यवस्था करायला हवी. सत्ता राबवण्यासाठी आम्हीसुद्धा तयार आहोत, हे अशाप्रकारे लोकमानसावर ठसवता येतं. चांगले शासक होण्याची कुवत कुणात आहे याची परीक्षा यामधून घडली असती आणि मुख्य म्हणजे सत्ताधारी मंडळींना या सावली शॅडो मंत्रिमंडळाचा वचक वाटला असता. बोंबाबोंब करण्यात आणि दांडगाई करून कामकाज बंद पाडण्यात पटाईत असणारे आमदार विधानसभा सुरू झाली की दिसतात. विधानसभेत ज्यांचा युक्तीवाद ऐकावा, भाषणे ऐकावी अशा आमदारांची संख्या दिवसेंदिवस कमी होतेय. उमेदवारी मागणाऱ्यांची झुंबड उडते. दोन शब्द नीट बोलता- लिहिता न येणारे आणि कुठलेही समाजकार्यही न करणारेसुद्धा आमदार होण्यासाठी पुढे सरसावतात, याचं कारण या गोष्टींचंच भांडवल असणारे विधानसभेत दिसतात. लोकशाही नुसतीच आपण सवंग केलेली नाही, ती पुरेपूर अपंग करण्याचाही पराक्रम आपण करून दाखवलाय. यात बदल घडवण्यासाठी आता काही करता आलं तर करण्याची जरुरी आहे. सत्तेवर कुणीही येवो, विरोधी पक्ष म्हणून बसण्याची वेळ ज्यांच्यावर येईल त्यांनी विरोधी पक्ष म्हणूनही आम्ही सत्ताधारी पक्षाएवढेच, किंबहुना त्याहून अधिकच जबाबदार आहोत हे लोकांना पटेल एवढी लोकाभिमुख प्रभावी कर्तबगारी दाखवण्याची तयारी करावी. सरकार जे करू शकत नाही ते करून दाखवण्याची कुवत आपल्यात आहे याची नुसती चुणूक जरी विरोधी पक्षानं दाखवली तरी लोक त्याची कदर करतात. हे लोकांनी वेळोवेळी दाखवून दिलंय. खरा रिमोट कंट्रोल लोकांच्याच हातात असतो हे राजकारण्यांना का कळत नाही?
अटलजींनी म्हटल्याप्रमाणे, 
*कौरव कौन कौन पांडव, टेढ़ा सवाल है,*
*दोनों ओर शकुनि का फैला कूटजाल है।*
*धर्मराज ने छोड़ी नहीं जुए की लत है।* 
*हर पंचायत में पांचाली अपमानित है।* 
*बिना कृष्ण के आज महाभारत होना है,* 
*कोई राजा बने, रंक को तो रोना है।"*
हरीश केंची
९४२२३१०६०९

Saturday, 9 November 2024

बोलघेवड्यांना आवरा....!


"आता लोकशाहीच्या या उत्सवात काहींच्या अंगात शिमगा संचारलाय. मुद्दे नसल्यानं गुद्देही उपसले जाताहेत. कुणीही, काहीही बरळत राहतोय, हे सध्या खूप वाढलंय. कुणी कुणावर टीका करावी, याचा घरबंद, संकेत राहिलेले नाहीत. वरिष्ठ त्यांना आवरण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळं अशांना ऊत आलाय. खोके, बोके, खोट्या धर्माभिमानाच्या, निंदानालस्तीच्या उधळणात लोकांचे मुद्देच हरवलेत. सातत्यानं विरोधकांबद्दल अवमानकारक वक्तव्यं केली जाताहेत. विरोधी विचारही असतो याला छेद दिला जात असल्यानं सभा, बैठका उधळल्या जाताहेत. बेताल वक्तव्य करून, मुक्ताफळं उधळून प्रसिध्दी मिळवताहेत. लोकशाहीत प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, विरोधकांवर टीका व्हायला हवी, पण नेत्यांनी अशा बेताल, बेछूट, बेधुंद वाचाळवीर नेत्यांना, बडबोल्यांना आवरायला हवंय..!"
...................................................
*म*हाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांच्या उमेदवार निवडीचा घोळ संपून आक्रमक प्रचाराला आरंभ झालाय. उथळ आणि उठवळ नेते एकमेकांवर आरोपांची, निंदानालस्तीची राळ उठवताहेत. नुकतंच भाजपचे सदाशिव खोत यांनी कॅन्सरमुळे शरद पवारांच्या चेहऱ्यावर झालेल्या व्यंगाची खिल्ली उडवली. एक बिनडोक नेता हे हीन दर्जाचं भाष्य करतो तेव्हा व्यासपीठावरचे गृहमंत्र्यांसारखे वरिष्ठ, याशिवाय इतर जबाबदार नेते त्याला हसून मूक प्रतिसाद देतात, तेव्हा सार्वत्रिक प्रचार किती आणि कुठवर घसरलाय याची जाणीव होतेय! ही आपली संस्कृती आहे का? सर्वपक्षीय नेत्यांनी अशा भाषेत बोलणाऱ्यांना प्रमोट करणं बंद करायला हवं. सर्वच पक्षातल्या नेत्यांना आताशी राज्यात संस्कृती, नीतिमत्ता, शिवरायांचा महाराष्ट्रधर्म नकोय, फक्त हवीय ती सत्ता, म्हणून ते सारे सत्तेसाठी कोणतीही गोष्ट करायला तयार होताहेत. याचाच अर्थ सत्ताधारी महाराष्ट्रधर्म, संस्कृती विसरून गायपट्ट्यातली संस्कृती इथं आणतेय, असं चित्र निर्माण झालंय. वेळीच हे रोखायला हवंय. मनसे नेते राज ठाकरे यांनी नागपुरातल्या सभेत "राजकारणातल्या सर्वच पक्षाच्या वाचाळवीरांनी नुसता गोंधळ घातलाय. सुसंस्कृत महाराष्ट्राची ही मंडळी धिंडवडे काढताहेत. अशा वाचाळवीरांना, बडबोल्यांना प्रसिद्धीमाध्यमांनी वेळीच रोखून आवर घातला पाहिजे. टीआरपीसाठी विविध वाहिन्या आणि प्रसिद्धी मिळत असल्यानं अशांचा जोर वाढलाय. लोकांना हे आवडत नाही. साऱ्याच पक्षांच्या नेत्यांनी अशा बेछूट, बेताल, बेधुंद वाचाळवीरांना आवर घातला पाहिजे...!" असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. राहुल गांधींनी परदेशात आरक्षणासंदर्भात काहीसं वक्तव्य करताच, ते पुरेसं समजून न घेताच इथल्या काही नरपुंगवांनी त्यांची जीभ छाटण्याची, जीभेवर चटके देण्याची भाषा केलीय. त्यावेळी "अशा या वाचाळवीरांना आता आवरा...!" असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. मात्र त्याच सभेत मुख्यमंत्र्यांनी या बोलघेवड्यांना बजावण्याऐवजी त्याचं कौतुक करत पाठीशी घातलं अन् आपली संस्कृती दाखवून दिली. राजकारणात बेताल वक्तव्यांची परंपरा ही काही नवीन नाही. आजवर अनेकांनी बेछूट आणि बेताल वक्तव्यं करण्याचे उच्चांक प्रस्थापित केलेत. किंबहुना कोण जास्तीत जास्त बेताल आणि बेजबाबदार वक्तव्य करू शकतो, याची सध्या जणू स्पर्धाच लागलीय. विशेष म्हणजे अशा वक्तव्यांची मक्तेदारी कोणत्याही एका विचारधारेची नाही. त्यामुळं सगळेच पक्ष आणि संघटनांशी संबंधित अनेक या स्पर्धेत आहेत. आज जरी वाचाळवीरांना आवरा म्हणत असले तरी पूर्वीचं अजित पवारांचं धरणाबाबतचं विधान असेल, राम कदम यांचं दहीहंडी दरम्यान मुलीं पळवून नेण्याबाबत केलेलं वक्तव्य, प्रशांत परिचारकांचं सैनिकांच्या पत्नींबाबतचं वादग्रस्त वक्तव्य, रावसाहेब दानवेंचं शेतकऱ्यांना ‘साले’ म्हणणं, प्रज्ञा सिंह-ठाकूर यांनी माजी एटीएस प्रमुख शहीद हेमंत करकरे यांच्या बाबतीत केलेलं विधान किंवा महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याची देशभक्त म्हणून केलेली भलामण, बागेश्वर धामचे धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराजांचं संत तुकाराम यांच्याबद्दलच वक्तव्य, ईश्वरापेक्षा कोणताच वैज्ञानिक मोठा नाही, असं म्हणणारे गोवर्धन मठ पुरी पीठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेलं विधान, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, सदाशिव खोत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवारांबाबत केलेली आक्षेपार्ह विधानं, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त आणि हीन दर्जाचं केलेलं वक्तव्य, भूतपूर्व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबद्धल केलेली विधानं, चंद्रकांतदादा पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांची केलेली निर्भत्सना, देवेंद्र फडणवीस यांचं टरबूज, फडतूस अशी केली जात असलेली संभावना... ही अशी लांबलचक यादी संपणारी नाहीये, उलट यात भरच पडेल. आशिष शेलार, अतुल भातखळकर यांच्यासह नव्यानं भाजपत आलेले चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, अनिल बोंडे, प्रसाद लाड, राणा दाम्पत्य, मोहित कंबोज, नारायण राणे, आणि त्यांची दोन्ही मुलं, शिवसेनेचे संजय राऊत, भास्कर जाधव, मनसेचे संदीप देशपांडे, गजानन काळे, अजित पवार राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी, शरद पवार राष्ट्रवादीचे मेहबूब शेख, शिंदेसेनेचे संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, ज्योती वाघमारे, शिवाय काँग्रेसचे नाना पटोले, मणिशंकर अय्यर, सॅम पित्रोडा आणि काही नेत्यांची वक्तव्यं नेहमीच आक्षेपार्ह असतात. मात्र पक्ष नेतृत्वाकडून याची फारशी दखल घेण्याचं सौजन्यही दाखवलं जात नाही. उलट 'त्यांची ती स्टाईल आहे...!' असं म्हणत पाठराखण केली जाते. त्यामुळं अशांचा माज आणखी वाढतो.
राजकीय पक्षांचा एकूण विचार केल्यास भाजपमध्ये वाचाळवीरांची संख्या इतरांच्या तुलनेनं अधिक आहे. अनेक दिवसांपासून या पक्षाचे नेते पक्षाला चर्चेत ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करताहेत. नेत्यांची अशी वादग्रस्त विधानं ‘चुकून’ बोलली जातात, प्रसारमाध्यमं त्यांचा ‘विपर्यास’ करतात, का ती प्रसिद्धीसाठी ‘जाणीवपूर्वक’ केली जातात, हा संशोधनाचा विषय आहे. काही वक्तव्यं ही अनावधानानं बोलण्याच्या ओघात झालेली असावीत, हे मान्य केलं तरी किमान वक्तव्य केल्यानंतर आपण काहीतरी चुकीचं बोललोय, हे मान्य करून दिलगिरी व्यक्त करण्याचं धाडस तरी दाखवणं गरजेचं आहे, परंतु काही अपवाद वगळता हा समजूतदारपणा फार अभावानंच आढळतो. काही वेळा माध्यमांचा खोडसाळपणा जरी ध्यानात घेतला तरी बहुतेक विधानं ही जाणीवपूर्वक अथवा वाद निर्माण करण्यासाठी केलेली आपल्याला आढळून येतात. आपली स्वामीनिष्ठा दाखविण्यासाठी ही धडपड दिसते. महापुरुषांचा विषय सामाजिक अस्मितेचा असून शिक्षण, आरोग्य, महागाई, रोजगार या विषयांवरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी अशी बेताल वक्तव्य केली जात असल्याचं दिसतं. संविधानानं आपल्याला दिलेलं भाषण-स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अधिकार आहेतच. परंतु स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे! घटनेनं जसे अधिकार दिलेत, तशी काही कर्तव्यंही सांगितलीत. याचा त्या वाचाळवीरांना सोयीस्कर विसर पडलाय. मालवणमध्ये नारायण राणे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची 'घरात घुसून मारून टाकीन...!' ही धमकी गृहमंत्री फडणवीसांना ती राणेंची स्टाईल वाटते. नारायण राणेंवर कारवाई करण्याऐवजी फडणवीस त्याची भलामण करताना पाहून आश्चर्य वाटतं. तेच का हे फडणवीस ज्यांनी विरोधी पक्षात असताना सत्ताधाऱ्यांना भाषेवरून वेठीला धरलं  होतं!
पूर्वी राजकीय नेत्यांवर आरोप-प्रत्यारोप होत होते. चिखलफेकही होत होती. एका मर्यादेत एकमेकांच्या चारित्र्यावर चिखलफेक व्हायची किंवा एखाद्याच्या चारित्र्याबद्दल खुबीनं संशय निर्माण केला जायचा. वैयक्तिक विधानं फारशी होत नव्हती. जी काही टीका होत होती, आरोपाचा धुराळा उडवला जायचा तो सार्वजनिक आयुष्यातल्या भूमिकांवरून होत होता. सध्या हेतुपुरस्सर ‘सेन्सेशन’ निर्माण करण्यासाठी चिथावणीखोर, एखाद्याचा अवमान करणारं, अश्लील वक्तव्य करण्याचा प्रकार सर्रास वाढीला लागलाय. विरोधी नेत्यांचं चारित्र्यहनन करण्याचा उद्योग साऱ्यांनीच आरंभलाय. खुद्द प्रधानमंत्री मोदींसारख्या ज्येष्ठ नेत्याची संसदेतली टीका टिपण्णी, जाहीर सभेत शरद पवार यांना 'भटकती आत्मा' म्हणणं, उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुखांचा 'नकली वारस' म्हणणं. त्यांना पवार, ठाकरे यांनी त्याच पातळीवर उतरून प्रतिक्रिया देणं, हे सारं विचित्र आहे. ज्येष्ठांनीच असं वागायला सुरुवात केली तर मग त्यांच्या चेल्याचपट्यानी तर अगदी खालचा स्तर गाठला तर कोण कुणाला जाब विचारणार? विधिमंडळाच्या सभागृहातही राजकीय अभिनिवेष व्यक्त करताना धमकीवजा इशारे दिले जातात. हा प्रकार अस्वस्थ करणारा आहे. भारतात बहुपक्षीय घटनात्मक लोकशाही आहे आणि प्रत्येकाला स्वत:ची काही राजकीय मतं, भूमिका आहेत, हे मान्यच आहे आणि तेच भारतीय लोकशाहीचं खरं सौंदर्य आहे. परंतु स्वत:ला विशिष्ट धर्माचं, पंथाचं किंवा राजकीय पक्षाचं म्हणवून घेणाऱ्यांची विधानं ही अत्यंत संतापजनकच आहेत. परंतु अशा नेत्यांच्या वक्तव्याचं समर्थन जेव्हा केलं जातं, हे त्याच्यापेक्षाही अधिक क्लेशदायक आहे. प्रत्येकाची काही एक राजकीय आणि वैचारिक भूमिका असू शकते, किंबहुना असायलाच हवी. असं का मानलं जात नाही? परंतु देशासाठी प्राणांची आहुती देणारे शहीद, महापुरूष, संत, नेत्यांचं ज्येष्ठत्व, सांस्कृतिक परंपरा या बाबतीत तरी आपण आपला राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून थोडी संवेदनशील भूमिका घेतली जाणार की नाही, हा खरा प्रश्न निर्माण होतो.
अलीकडे देशभरात लोकांना ‘देशभक्त’ आणि ‘देशद्रोही’ ठरविण्याची चढाओढ लागलेली असताना स्वत:ला ‘देशभक्त’ म्हणवून घेणारे लोक वादग्रस्त वक्तव्याचं निर्लज्जपणे समर्थन करतात. चुकीचं वक्तव्य करणारी व्यक्ती ही फक्त आपल्या धर्माची, ठराविक राजकीय विचारधारेशी संबंधित आहे, म्हणून तिचं समर्थन होणार असेल तर त्यांची कीव करावीशी वाटते. कारण अजून तरी या समाजाची सद्सद्विवेकबुद्धी जागृत आहे. आपल्या वक्तव्याचा राजकीय पक्षाला फायदा होईल किंवा नुकसान होईल एवढा संकुचित विचार करणारा हा समाज नक्कीच नाही. काही गोष्टी राजकारणापलीकडे असतात आणि त्याबद्दल प्रत्येकानं एक ठाम भूमिका घेणं नितांत आवश्यक आहे. स्वत:ला सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणवून घेणारा समाजाकडून अशी ठोस भूमिका घेतली जात नाही, हीच खरी शोकांतिका आहे. परंतु हा देश अनेक वैचारिक आक्रमणे पचवूनही आज ठामपणे उभा आहे. या देशातले सर्वसामान्य नागरिक अशा बेताल, असंवेदनशील वक्तव्यांना आणि व्यक्तींना पाठीशी घालणार नाहीत, हा आशावाद अजून तरी नक्कीच जिवंत आहे. स्वातंत्र्य मिळविताना महापुरुषांनी धर्मनिरपेक्षतेला सर्वधर्मसमभावाचं तत्त्व जोडलं होतं. त्यात सर्व धर्म, जाती आणि जागतिक मानवतावादी मूल्यांची कदर करण्याचं तत्त्व देशात उभं केलं होतं. पण त्यामुळंच आपल्या लोकशाहीप्रधान समाजात राक्षसी हव्यास बाळगणारी धर्मांधता निर्माण होऊन देशात भीती आणि असंतोषाची लाट निर्माण होतेय, तेव्हा स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतर आपण कोणत्या मार्गानं पुढं जात आहोत, असा विचार करावाच लागतो. आपला राष्ट्रवाद हा वंशवादाचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी नव्हता आणि जातीय भावनांना खतपाणी घालून लोकांमध्ये राग, द्वेष आणि तिरस्कार उत्पन्न करण्यासाठी तर त्या मार्गानं आपल्याला जायचं नव्हतं. दुर्दैवानं राजसत्तेच्या आकांक्षेनं विविध समाजांमध्ये दरी निर्माण केली जातेय. एका बाजूला मणिपूर जळतेय, तर दुसऱ्या बाजूला धार्मिक, सामाजिक भेदभाव निर्माण करून तिरस्काराची मोहीमच सुरू करण्यात आलीय. पोलिस स्वस्थ बसून आहेत, सरकारी अनास्थेवर प्रश्न उपस्थित केले जाताहेत. किंबहुना सरकारलाच असं विभाजन आणि धार्मिक ध्रुवीकरण तर नकोय ना? असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहात नाही. यासाठी 'व्होट जिहाद'सारखे शब्द वापरले जाताहेत.
‘Democracy is Government by Discussion’ असं जॉन स्टुअर्ट मिल या विचारवंतानं म्हटलंय, पण आपल्या लोकशाहीतला ‘संवाद’ हरवलाय, माजलाय तो नुसता कर्णकर्कश्श कलकलाट! बहुसंख्य राजकारण्यांची बेताल, बेछूट, असंस्कृत ‘मुक्ताफळं’ जी ऐकताना उबग आलाय. राजकारणाचा ढळलेला तोल, वाढलेली मग्रुरी, चंगळवाद आणि हरवलेला ‘सुसंस्कृतपणा’ कुणाही संवेदनशील लोकशाहीवाद्याला फार अस्वस्थ करणारा आहे. राजकारण म्हणजे केवळ यथेच्छ शिवीगाळ असा समज वेगानं पसरतोय. हा समज देशव्यापी झाला, तर उद्या लोक मतदानालाच न फिरकण्याची भीती आहे. असं जर खरंच घडलं, तर लोकशाहीत लोकच नसतील. लोकशाहीतला सुसंवाद हरवत चाललाय, सुसंस्कृपणा लोप पावतोय, हे चित्र अस्वस्थ करणारं आहे. राजकारण्यांची भाषा, वागणं, राहणी आणि मग्रुरी ही चिंताजनक आहे. पूर्वी त्यात कळकळ होती, तळमळ होती आणि चिंताही. सध्या राजकारणाचा स्तर खूपच खालावलाय. राजकारण म्हटलं की, आरोप–प्रत्यारोप होणारच, सत्ताधारी आणि विरोधकांत राजकीय कलगीतुरा रंगणारच, पण मनुष्य आणि प्राण्यांचे अवयव तसंच अ-संसदीय भाषा तेव्हाच्या राजकारणात खरंच नव्हती. शब्दांच्या धडाडत्या तोफांतून मारा करून सभागृह आणि मैदानी सभा गाजवणारे आचार्य अत्रे, जांबुवंतराव धोटे, केशवराव धोंडगे, प्रमोद नवलकर, रामभाऊ म्हाळगी, एन.डी. पाटील, छगन भुजबळ, मृणालताई गोरे, अहिल्या रांगणेकर, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे असे अनेक नेते सभागृहात पाहता आले. त्यांचा सुसंस्कृतपणा अनुभवता आला आणि जनतेप्रती त्यांच्या हृदयांच्या गाभाऱ्यातून आलेल्या कळकळीची आणि क्वचित क्रोधाचीही प्रचिती घेता आली. वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, शरद पवार, सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख, मनोहर जोशी अशा अनेक सत्ताधारी नेत्यांचा आणि त्यांच्या मंत्रीमंडळातल्या सहकाऱ्यांचा सुसंस्कृतपणाही डोह खोल होता. मंत्रीपद भूषवलेल्या शेषराव वानखेडे, रफीक झकेरिया, शिवराज पाटील चाकुरकर, सुधीर जोशी, शंकरराव गेडाम, सुंदरराव साळुंके, शंकरराव गेडाम, नितीन गडकरी, दिग्विजय खानविलकर, आर. आर. पाटील, भारत बोंद्रे... अशी किती तरी नावं या संदर्भात घेता येतील. निवडणुकीच्या रिंगणात सुसंस्कृत, शिष्टाचारी आणि विवेकी उमेदवार अभावानंच दिसत असल्यानं संवेदनशील, विचारी माणूस आणि तरुण वर्ग जर मतदानापासून जर दूर राहिला, तर त्यांना दोष देणार तरी कसा? ‘सुसंस्कृत राजकारण’ का लोप पावलं. ‘एक मारेन’, ‘थोबाड फोडेन’, ‘कानफटात लगावेन’, ‘कुणाचे तरी गाल’, ‘अमुक एक नेता म्हणजे देवाला सोडलेले वळू’ आणि ‘म्हसोबाला सोडलेले बोकड’, अशी भाषा आली.
राजकीय अध:पतनाचं केवळ राज्यस्तरीयच नव्हे, तर राष्ट्रीय स्वरूपही ‘कुरूप’ झालेलंय. आपल्या बहुसंख्य मतदारांच्या मनात राजकारण्यांविषयी तिरस्कार आहे, काहीच्या मनात घृणाही, पण आपण या दिव्य लोकांना मतदान का करतो, चांगल्या उमेदवारांना निवडून का देत नाही, यासंदर्भात आपण कधीच किमानही गंभीर नसतो. अनेकजण तर मतदानालाही जात नाही अन् राजकारणी कसे वाईट आहेत, याच्या पोस्ट समाजमाध्यमांवर टाकण्यात धन्यता मानतो. एकापेक्षा एक ‘हुच्च’ राजकारणात दिसताहेत. देशातल्या अशा सुमारे १०७ लोकप्रतिनिधीविरुद्ध ‘हेट स्पीच’ प्रकरणी गुन्हे दाखल झालेत आणि त्यापैकी ४२ ‘संस्कृतीरक्षक’ भाजपचे आहेत! अशा बहुसंख्य राजकारण्यांमुळे, राजकारण म्हणजे केवळ यथेच्छ शिवीगाळ असा समज वेगानं पसरतोय. हा समज देशव्यापी झाला, तर उद्या लोक मतदानालाच न फिरकण्याची भीती आहे. असं जर खरंच घडलं, तर मग लोकशाहीत लोकच नसतील! हे चित्र अस्वस्थ करणारं आहे!
हरीश केंची
९४२२३१०६०९


मोदींच्या सौगाताची खैरात...!

"एकीकडे औरंगजेबाच्या कबरीचा घातलेला गोंधळ, आजवर भक्तांनी मुस्लिमांबाबत व्यक्त केलेला टोकाचा द्वेष, तिरस्कार, वक्फ दुरुस्ती ...