Friday, 29 July 2022

हा खेळ कालापव्ययाचा...!

"उद्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या अस्तित्वाचा, ४० बंडखोर आमदारांचा, महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या सरकारचा, भाजपच्या महाशक्ती कलाकारीचा, सत्तासंघर्षाच्या तांडवात पिचलेल्या मराठी माणसांच्या, जनतापक्षासारखी शकलं शिवसेनेची होऊ नयेत अशी अपेक्षा धरणाऱ्या मध्यममार्गी जनसामान्यांच्या भावभावनांचा फैसला होणार आहे. उपसभापती झिरवळ यांच्यावर चुकीच्या पद्धतीनं दाखल झालेला अविश्वास प्रस्ताव सिद्ध झाला तर त्यांनी घेतलेली अध्यक्षपदाची निवडणूक अवैध ठरेल. जर झिरवळ यांच्यावरचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेला तर त्यांनी घेतलेला १६ जणांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय वैध ठरू शकतो. असा पेच निर्माण झालाय. पक्षांतरबंदी कायद्याचा तज्ज्ञांकडून घेतलेला हा धांडोळा!"
---------------------------------------------

'शिवसेना कुणाची' हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगात पोहोचलाय. पक्षांतरबंदी कायद्याचा उद्देश कोणता होता हे पाहणं, प्राप्त घटनात्मक पेचाचं विश्लेषण करण्यासाठी आणि संभाव्य निकालाचा अंदाजासाठी आवश्यक आहे. कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडणुकीला उभा राहतो तेव्हा तो त्या पक्षाच्या धोरणांशी, घटनेशी सहमत आणि बांधील असतो. निवडणुकीत मतं मागतानाही तो त्या पक्षाच्या नावानंच मतं मागतो. पक्ष संघटना उमेदवाराच्या पाठीशी राहून आपल्या कार्यकर्त्यांना प्रचारात उतरवत असते. पक्षाचे पारंपरिक मतदारही त्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. थोडक्यात, तो उमेदवार निवडून आला तर त्याच्या निवडीत, काही अपवाद वगळता, त्या पक्षाचं निर्णायक योगदान असू शकतं. असं असलं तरी निवडून आलेले बरेच उमेदवार काही लाभासाठी बिनदिक्कतपणे आपला पक्ष सोडून दुसर्‍या पक्षांत प्रवेश करत आलेले आहेत. अशाप्रकारे पक्ष सोडणं हे त्या पक्षाशी, आपल्या मतदारांशीही तो द्रोहच असतो, कारण मतदारांनी त्या उमेदवाराला ती व्यक्ती म्हणून, प्रामुख्यानं त्या पक्षाचा उमेदवार म्हणूनही निवडून दिलेलं असतं. अशा पक्षांतरांमुळं सत्तेतली सरकारं पाडापाडीचा खेळ सुरु झालेला आहे. त्यामुळं साहजिकच राजकीय आणि प्रशासकीय गोंधळ, अस्थिरता निर्माण होते.

आणीबाणीनंतर देशात आयाराम-गयाराम संस्कृती वाढीला लागली. त्यामुळं सरकारं अस्थिर बनू लागली. त्यामुळं पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात आला. पक्षांतरातल्या अप्रामाणिकपणाला आणि गोंधळाला आळा घालण्याच्या उद्देशानं तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या पुढाकारानं १९८५ मध्ये पक्षांतरबंदीचा कायदा अस्तित्वात आला. ५२ व्या घटनादुरुस्तीद्वारे या कायद्याच्या रूपानं घटनेच्या १० व्या परिशिष्टात ते समाविष्ट करण्यात आलं. घटनेत समाविष्ट करून या कायद्याचं महत्त्व तर अधोरेखित केलंच, पण या तरतुदी घटनेत समाविष्ट केल्यानं कायद्यात वारंवार होणाऱ्या दुरूस्तीलाही लगाम लावण्याचाही प्रयत्न केला. या कायद्याला २००३ मध्ये केलेल्या ९१ व्या घटनादुरुस्तीद्वारे आताचं रूप देण्यात आलं. पक्षांतराला प्रतिबंध हाच याचा मूळ उद्देश होता. या परिशिष्टाच्या परिच्छेद २ नुसार विधिमंडळ किंवा संसद यांचा सदस्य अर्थात आमदार किंवा खासदार हे खालील परिस्थितीत आमदार किंवा खासदार राहण्यास अपात्र ठरतात. १) सदस्यानं आपल्या राजकीय पक्षाचा स्वेच्छेनं त्याग केला असल्यास २) राजकीय पक्षानं किंवा त्या पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधीनं दिलेल्या निर्देशांच्या-व्हीपच्या विरुद्ध राज्याच्या विधिमंडळात किंवा संसदेत मतदान केलं किंवा मतदान करण्याचं टाळलं असल्यास. या तरतुदींवरून हे स्पष्ट होतं की मतदानविषयक निर्देश देणारा राजकीय पक्ष किंवा त्याचा अधिकृत प्रतिनिधी आहे, विधिमंडळातला पक्ष नव्हे. हे इथं नमूद करायला हवं. परिच्छेद १ मध्ये नोंदणीकृत राजकीय पक्ष आणि विधिमंडळातला पक्ष यांची स्पष्ट व्याख्या दिलेली आहे. विधिमंडळातला प्रतोद हा राजकीय पक्षाचा अधिकृत प्रतिनिधी असणं अपेक्षित आहे, विधिमंडळातल्या पक्षाचा नव्हे. थोडक्यात, विधिमंडळतल्या पक्षाचा, राजकीय पक्षाच्या प्रतोदाहून वेगळा प्रतोद असू शकणार नाही. त्यामुळंच एकनाथ शिंदे यांच्या गटानं नेमलेला प्रतोद कायदेशीर असू शकत नाही. म्हणूनच हा गट आपण मूळ शिवसेनेतच आहोत आणि आम्ही नेमलेला प्रतोद हा शिवसेनेचाच असल्याचा दावा करताहेत. परिशिष्टाच्या परिच्छेद ४ मध्ये पक्ष सोडूनही किंवा पक्षाचे मतदानविषयक निर्देश न पाळूनही आमदार किंवा खासदार सदस्यत्वास अपात्र होणार नाहीत, तिचा उल्लेख यात केलेला आहे. तो असा, मूळ राजकीय पक्ष इतर राजकीय पक्षात विलीन झाला किंवा अशा विलिनीकरणाद्वारे नवीन पक्षाची निर्मिती होऊन तो त्या पक्षाचा सदस्य किंवा नव्यानं झालेल्या पक्षाचा सदस्य बनल्यास तो सदस्य अपात्र ठरणार नाही. परंतु त्यासाठी विलीनीकरणाची पुढील अट पूर्ण करावी लागेल. ती अट अशी- जर विधिमंडळ पक्षाच्या एकूण सदस्यांच्या किमान दोन तृतीयांश एवढ्या सदस्यांनी या विलीनीकरणाला मान्यता दिली तरच त्या राजकीय पक्षाचं दुसऱ्या राजकीय पक्षात विलीनीकरण झालं असं समजण्यात येईल. थोडक्यात, इतर पक्षात सामील होणाऱ्या राजकीय पक्षाच्या किमान दोन तृतीयांश विधिमंडळ सदस्यांची अशा विलीनीकरणाला मान्यता देण्यातून झालेलं विलीनीकरण हेच पक्षांतर केलेल्या सदस्यांची अपात्रतेपासून सुटका करू शकते. अशा परिस्थितीत ज्या सदस्यांनी हे विलीनीकरण स्वीकारलेलं नाही त्यांचा गटही अपात्र होणार नाही. यावरून हे स्पष्ट होतं की उर्वरित गट कितीही छोटा असला तरी तो सदस्यत्वाला अपात्र ठरत नाही. त्याचं राजकीय पक्ष म्हणून अस्तित्व कायम राहतं. त्यामुळंच बंडखोर गट हा आम्ही शिवसेनेतच आहोत, हे आवर्जून सांगतो. मग तो कायदेशीररित्या मूळ शिवसेनेतून फुटला आहे हे कसं सिद्ध करता येईल, हा एक प्रश्न आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ यांनी शिवसेनेच्या मागणीवरून १६ बंडखोर आमदारांच्या विरुद्ध अपात्रतेची नोटीस काढलेली आहे, पण त्यात शिवसेनेच्या मिटींगला उपस्थित न राहिल्याचं कारण दिलेलं आहे. पण अपात्रतेसाठी १० व्या परिशिष्टात अशा प्रकारचं कारण उल्लेखित केलेलं नाही. त्यामुळं या नोटीसीनं सुरु होऊन पूर्ण झालेली कार्यवाही न्यायालयात टिकेल असं दिसत नाही. परंतु या नोटीसीला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली. अशी स्थगिती कायद्यानुसार देता येत नाही, असं घटनातज्ज्ञांचं मत आहे. कारण या परिशिष्टाच्या परिच्छेद ६ नुसार सदस्यांना अपात्र ठरविण्याचे सभापतींचे अधिकार अंतिम आहेत आणि ते न्यायालयीन निर्णयानं निश्चित झालेले आहेत. सर्वांत आधी दिलेल्या नोटिसीत असं कारण असलं तरी त्यानंतर मात्र घटनेनुसार ज्या कारणांमुळं सदस्य अपात्र ठरु शकतात अशी कारणं घडून आली आहेत. विधानसभेत अध्यक्ष निवडताना आणि एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वासदर्शक ठराव पारित होताना दोन्हीही गटांनी, आपल्या विरुद्ध गटानं जारी केलेल्या पक्षादेशांचं उल्लंघन केलेलं आहे. परंतु इथं दोन्हीही गट आपणच मूळ शिवसेना असून आपलाच गटनेता आणि प्रतोद हा मूळ शिवसेनेचा आहे असा दावा करतात. त्यामुळं मूळ शिवसेना कोणती या प्रश्नाचं उत्तर मिळण्यावरच कोणी पक्षादेशाचं उल्लंघन केलेलं आहे, हे सिद्ध होणार आहे. गटनेता आणि प्रतोद राजकीय पक्षाशी सबंधित विधिमंडळ पक्षाचे सदस्य त्यांच्यामधून एकाची गटनेता म्हणून नियुक्ती करतात. या निवडीला सभापतींकडून मान्यता घ्यावी लागते. परंतु या गटनेत्याच्या नियुक्तीला राजकीय पक्षाची मान्यता असणं अपेक्षित आहे. परंतु या मान्यतेचा स्पष्ट उल्लेख मिळत नसल्याचं दिसतं. प्रतोद या पदाचा घटनेत उल्लेख नसला तरी विधिमंडळ कामकाजातील संकेताप्रमाणे गटनेता प्रतोदाची नियुक्ती करतो असं मानलं जातं. पक्षादेश जारी करण्याच्या दृष्टीनं प्रतोदाचं विशेष महत्त्व असतं. घटनेच्या परिशिष्ट १० च्या परिच्छेद २ मध्ये 'राजकीय पक्ष किंवा त्यानं अधिकृत केलेला प्रतिनिधी' यांच्याच निर्देशांचा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. राजकीय पक्षाचं असलेलं महत्त्वच घटनेचा कायदा अधोरेखित करतो. या सर्व बाबींचा विचार केल्यास, गटनेता हा राजकीय पक्षाच्या निर्देशांविरुद्ध वागू शकतो असं वाटत नाही. मग राजकीय पक्षाची मान्यता न घेता गटनेता निवडणं किंवा प्रतोद नेमणे हे तर बंडखोरांच्या अधिकारक्षेत्राबाहेरची गोष्ट आहे, हेही लक्षात येतं. दोन्हीही गटांचे डावपेच आणि बंडखोरांच्या मागची शक्ती लक्षात घेता कायद्याच्या या तरतुदींचे बारकावे त्यांना माहित असल्यानंच ते सातत्यानं आम्ही शिवसेनेतच आहोत, असं म्हणत असतात. एवढंच नव्हे तर त्यांनी पक्षसंघटना ताब्यात घेण्याचे जोरकस प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी त्यांनी शिवसेनेत उभी फुट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

सध्याच्या काळात सत्ता आणि संपत्तीचा मोह पक्षनिष्ठेच्या वरचढ ठरत असल्यामुळं शिंदे गटाला यात यश मिळण्याची शक्यता निर्माण झालीय. प्रतिनिधी सभा ताब्यात येणं हा टप्पा पक्ष ताब्यात घेण्याच्या दृष्टीनं निर्णायक ठरणार आहे. याच प्रयत्नाचा भाग म्हणून शिंदेगटानं प्रतिनिधी सभेची बैठक बोलावल्याचं दाखवून शिवसेनेची मूळ राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणीची स्थापना केल्याचं सांगितलं आहे. पण या सभेची बैठक कोणी बोलवायची आहे, हे पक्षाच्या घटनेत नसलं तरी सर्व बैठकांच्या अध्यक्षस्थानी शिवसेनाप्रमुख असतात, त्यांच्या अनुपस्थितीत सभासद आपल्यांमधून एकाची अध्यक्षस्थानी निवड करू शकतात, अशी तरतूद मात्र घटनेत आहे. या तरतुदींचा फायदा घेऊनच ही बैठक बोलावल्याचं दिसतं. परंतु या बैठकीचा एकूण सदस्यांच्या 'एक तृतीयांश सभासद' हा कोरम पाळलेला आहे का? हे पाहावं लागेल. दुसरं म्हणजे बैठकीला शिवसेनाप्रमुखांची अनुपस्थिति कशी निश्चित केली आहे. शिवसेनाप्रमुखांनी या बैठकीला उपस्थित राहण्यास असमर्थता व्यक्त केली होती का? असे प्रश्न कायदेशीररीत्या लढल्या जाणाऱ्या लढाईत उपस्थित होणार आहेत. शिंदे यांनी जी नवीन कार्यकारिणी स्थापित केली आहे, तिच्या बैठका कशा होणार आहेत? कारण अशा बैठका बोलावण्याचा अधिकार तर पक्षघटनेनं शिवसेनाप्रमुखांना दिलेला आहे. असे अनेक प्रश्न निर्माण होत असले तरी शिंदे यांची संघटनेत एकूण बहुसंख्या आपल्या बाजूनं उभी करण्याचा प्रयत्न सुरु आहेत. आम्ही शिवसेनेतच आहोत आणि ही फूट नसून पक्षांतर्गत लोकशाहीतले मतभेद आहेत, असं सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो आहे. सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीच्या वेळी त्यांची ही भूमिका अधिक स्पष्ट झालेली दिसून येते. तसं असेल तर शिंदेगटाला पक्षाची घटना मान्य असायला हवी. त्यानुसार त्यांना शिवसेनाप्रमुखांचे अधिकार, पक्षाची प्रतिनिधी सभा आणि इतर तरतुदीही मान्य कराव्या लागतील. या पार्श्वभूमीवर शिंदेगटानं आपल्या पक्षप्रमुखांना, राष्ट्रीय कार्यकारिणीला किंवा प्रतिनिधी सभेला विचारात न घेता गटनेता निवडणं, प्रतोद निवडणं हे पक्षाच्या घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार केलं आहे, हेही त्यांना सांगावं लागेल. आता तर त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच भंग करून नवीन कार्यकारिणीची स्थापना केलीय. एवढ्या मोठ्या घटना पक्षांतर्गत लोकशाहीतल्या मतभेदांची उदाहरणे म्हणून सांगता येतील का? विधिमंडळातला पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नव्हे. त्याचप्रमाणे विधिमंडळातल्या पक्षाला राजकीय पक्षापासून पूर्णपणे स्वतंत्र अस्तित्वही असू शकत नाही. मग राजकीय पक्षाच्या विरुद्ध बहुसंख्येनं गटनेता निवडीला वैधता कशी प्राप्त होऊ शकेल, हा प्रश्न आहे. असं असूनही सरन्यायाधीशांनी 'बहुमतानं नेता बदलता येऊ शकतो, यासंदर्भात वाद निर्माण झाला तर विधानसभाध्यक्ष विधिमंडळ पक्षाचा नेता कोण, याची शहानिशा करू शकतो' अशी टिपणी केलीय, याचं आश्चर्य वाटतं. राजकीय पक्षात तुमचं बहुमत असल्यास प्रतिनिधी सभा ताब्यात घेऊन पक्षप्रमुख बदला आणि त्यानंतर इतर पक्षाशी समझोता करणं, गटनेता निवडणं इत्यादी बाबी करणं पक्षघटनेनुसार योग्य ठरू शकेल. आणि या सगळ्या घटनाक्रमाला पक्षांतर्गत लोकशाहीतले मतभेदही मानता येईल. 'अल्पमतातल्या पक्ष नेतृत्वाला बहुमतानं घेतलेले निर्णय रद्द करण्याचा अधिकार आहे का?' हा न्यायपिठाचा प्रश्नही आणखी नवीन प्रश्न निर्माण करतो. या प्रश्नाचा रोख विधिमंडळ पक्षाच्या बहुमतानं सर्व काही करता येईल, या निष्कर्षाकडं आहे की काय असं वाटतंय. हा प्रश्न उपस्थित करताना राजकीय पक्ष, त्याची घटना आणि राजकीय पक्षाचे निर्देश या बाबी गैरलागू ठरविलेल्या आहेत.

निवडणूक आयोगाची भूमिका, या प्रश्नातले बारकावे शिंदे गटाच्या लक्षात आलेले आहेत. म्हणूनच त्यांनी आपला पक्ष हा मूळ पक्ष आहे हे ठरविण्यासाठी आता निवडणूक आयोगाकडं धाव घेतलीय. त्यासोबतच त्यांचा पक्षात उभी फुट पाडून पक्षच ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. प्रतिनिधी सभा ताब्यात येणं हा टप्पा पक्ष ताब्यात घेण्याच्या दृष्टीनं निर्णायक ठरणार आहे. शिवसेनेतली उत्तरोत्तर वाढत जाणारी फुट ही त्या टप्प्याच्या दिशेनं होत असलेला प्रवास आहे. जरी पक्षसंघटना ताब्यात आली नाही तरी निवडणूक आयोगाचं, पक्षाचं आणि सर्व पदाधिकारी मोजण्याचं तसेच आमदार आणि खासदार यांच्या गणनेला अधिक महत्त्व देण्याचे डावपेच शिंदे गटाच्या फायद्याचं ठरू शकतात. गुणात्मकदृष्ट्‍या विचार करून मूळ पक्ष ठरविण्याचे युक्तिवाद केले जाऊ शकतात. कारण जनतेतून प्रत्यक्ष निवडून आलेले बहुसंख्य नेते हे शिंदे यांच्या बाजूनं असल्यानं गुणात्मकदृष्ट्‍या पक्ष त्यांच्याकडंच आहे या युक्तिवादाला महत्त्व दिलं जाऊ शकतं. त्यामुळं पहिल्या टप्प्यात निवडणूक चिन्ह गोठवून ठेवण्याचा निर्णय आयोग घेऊ शकतो. हा निर्णय ठाकरे यांच्यासाठी हानिकारक म्हणून शिवसेनेसाठी फायदेशीर ठरू शकतो. उद्धव ठाकरे देखील पक्षघटनेच्या आधारे त्यांना असलेल्या शिस्तभंगविषयक कार्यवाहीच्या अधिकारांचा उपयोग करून पक्षाशी निष्ठा नसणारे पदाधिकारी दूर करून आणि निष्ठावान पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून प्रतिनिधी सभा आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतीलच. तरीसुद्धा त्यांच्यामागे विधिमंडळ सदस्य आणि संसद सदस्य यांची संख्या एकनाथ शिंदेंच्या तुलनेत अत्यंत अल्प आहे. कायद्याच्या तरतुदी काहीही असल्या तरी त्यांचं निर्वचन-इंटरप्रिटेशन करताना ठाकरे यांच्याकडं असलेले या सदस्यांचं अल्पबळ त्यांच्या विरोधी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण काही झालं तरी सर्वोच्च न्यायालय दर्शवतं त्याप्रमाणे लोकशाहीत संख्याबळालाच महत्त्व आहे. शिवसेना फुटली नाही, असं मान्य केल्यास ज्याच्याकडं अधिक संख्याबळ आहे तीच शिवसेना असं मानलं जाईल का? असं झाल्यास हे संख्याबळ कोणतं, हे ठरवावं लागेल. हे संख्याबळ आमदार-खासदार यांच्या संख्येवरून नक्की करायचं की शिवसेनेच्या, आमदार खासदार यांच्यासहित, सर्व पदाधिकाऱ्यांची संख्या यावरून नक्की करायचं, हे प्रथम ठरवावं लागेल. एकंदरीत मूळ शिवसेना कोणती, हाच प्रश्न निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर सर्वोच्च न्यायालय तर देण्याची शक्यता नाही. हे उत्तर निवडणूक आयोगालाच द्यावं लागेल. म्हणूनच ठाकरे-शिंदे यांच्या भवितव्याचा फैसला निवडणूक आयोगाच्या दरबारातच होण्याची शक्यता आहे. त्यामुळंच दोन्हीही गट आता शिवसेनेच्या संघटनेवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं! शिवसेनेचं अस्तित्व हे आता सर्वोच्च न्यायालयात नाही तर ते निवडणूक आयोगाच्या रणांगणात ठरणार आहे. हे आता स्पष्ट झालंय. कारण शिंदेगटाच्या तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेना हा नोंदणीकृत राजकीय पक्ष कुणाचा? त्यावर अधिकार कुणाचा लोकप्रतिनिधींचा की पक्ष पदाधिकाऱ्यांचा? कार्यकर्ते-नेते यांना आदेश कोण देणार? कुणाची नेमणूक कोण करणार? यावर आता खल होईल. पक्षाची घटना, त्यातल्या तरतुदी, नियम-कायदे याचा किस पाडला जाईल. पक्षांत महत्व कुणाला, यासाठी झगडा होईल. 'शिवसेना' हा मूळ पक्ष आमचाच आहे असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहेत. याबाबत न्यायालयात आणि निवडणूक आयोगाच्या दरबारात जे काही ठरायचं ते ठरेल. या कायद्याच्या काथ्याकूटमध्ये उरलेली अडीच वर्षे सहज सरतील. याकाळात दोघांनाही पक्षबांधणीसाठीचा अवधी मिळेल. त्यानंतर जनतेच्या न्यायालयातच निवडणुकांच्या माध्यमातून याचा फैसला होईल. पक्ष, नेता आणि सत्ता कुणाकडे सोपवायची हे जनता ठरवत असते. तिच्या दरबारातच काय ते ठरेल! मात्र जनता पक्षाच्या चिंधड्या झाल्या तशा शिवसेनेच्या होऊ नयेत एवढीच मराठी माणसाची अपेक्षा आहे.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Tuesday, 26 July 2022

भाजपचं २०२४ साठी 'सोशल इंजिनिअरिंग....!'

"कायम निवडणुकांच्या मोडमध्ये असलेल्या भाजपच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच 'सोशल इंजिनिअरिंग' साधत सामाजिक आणि जातीय समीकरण जुळवायला सुरूवात केलीय. ज्यामुळं विरोधकांची कोंडी झालीय. राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मु यांना तर जाट समाजाचे जयदीप धनखड यांना उपराष्ट्रपतिपदासाठी निवडलंय. भाजपकडं बहुमत असतानाही मराठा समाजाच्या एकनाथ शिंदेंना महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाची खुर्ची बहाल केली. गुजरातेत पाटीदारांचं आंदोलन मोडत हार्दिक पटेल याला पक्षात घेत, नवख्या भुपेंद्रभाई पटेलांना मुख्यमंत्री बनवलं. दक्षिणेतल्या चौघा कलावंतांना राज्यसभेवर घेत तिथंही ही गणितं घातली आहेत! आता लक्ष्य आहे ते उत्तराखंड आणि राजस्थान इथं सत्तांतर घडविण्याचं!"
----------------------------------

*काँ*ग्रेस पक्षाच्या पतनानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकांपासून नरेंद्र मोदी भाजपसाठी निवडणुका जिंकून देणारे हुकुमाचं पान ठरत आले आहेत. असं असलं तरी येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्षाची यंत्रणा मात्र प्रत्येक बारीकसारीक गोष्टीत खबरदारी घेताना दिसतेय. अधिकाधिक राज्यात भाजपची सरकारं येतील यासाठीही या यंत्रणेनं सतत प्रयत्न सुरू ठेवले आहेत. काही राज्यात साधनशुचिता बाजूला ठेवून पराभवाचं रूपांतर विजयात करण्याचा उद्योगही या यंत्रणेनं केलाय. निवडणुका तर त्या तशाही कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड, गोवा, उत्तराखंड इथंही जिंकल्या नव्हत्या पण या हरलेल्या निवडणुकातून विरोधकांना हटवून आपली सत्ता कशी आणायची याचे डावपेच दिसून आले आहेत. महाराष्ट्र हाती आलाय; आता लक्ष्य आहे ते उत्तराखंड आणि राजस्थान! पूर्वीचा शेटजी-भटजींचा भाजप राहिलेला नाही. हा नवा भारतीय जनता पक्ष आहे. पडद्यामागून काम करणाऱ्यांचं म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं म्हणणं मात्र काहीसं वेगळं आहे. उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पक्ष तिथल्या बहुसंख्यांक ठाकुरांना मुख्यमंत्रिपदी बसवत असेल तर केंद्रीय मंत्रिमंडळात राजनाथ सिंग यांना नंबर दोनचं महत्त्व देत आहे. गुजरातमध्ये नाराज झालेल्या पटेल समाजाच्या पाटीदारांच्या हाती सत्ता दिली. त्यासाठी हार्दिक पटेल यांनाही सामावून घेतलंय. तर महाराष्ट्रात मराठा समाजातल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी बसवलं. देशभरात मोठ्या संख्येनं असलेल्या ओबीसी-इतर मागासवर्गीयांची नाराजी ओढवू नये म्हणून मध्यप्रदेशात काँग्रेसची सत्ता हिसकावून घेत ओबीसी शिवराजसिंग चौहान यांच्याकडं मुख्यमंत्रिपद ठेवण्यात आलंय. उत्तरप्रदेश योगी आदित्यनाथ यांच्या हाती सोपवलाय. अत्यंत स्वाभिमानी आणि कट्टर समजले जाणारे राजपूत आपल्या साथीनं राहावेत म्हणून ज्योतिरादित्य शिंदे आणि नरेंद्रसिंग तोमर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आलंय. हरियाणा, राजस्थान आणि उत्तराखंड, उत्तरप्रदेशच्या काही भागात ज्येष्ठ जाट नेता भाजपला मदतीसाठी हवा होता. या गरजेपोटी पश्चिम बंगालचे राज्यपाल असलेल्या जगदीप जनखड यांना उपराष्ट्रपतीपद देऊ केलेलं आहे. जगदीप धनखड हे जाट आहेत. स्वतंत्र भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशाच्या इतिहासात उपराष्ट्रपती होणारे ते पहिले जाट असतील हरियाणातल्या युती सरकारात दुष्यंत चौताला हे जाट नेते उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचाही फायदा भाजपला होणार आहे.

*वनवासींची मतं जोडण्यासाठी मुर्मु यांची निवड*
ओडिशातल्या एका मागास जिल्ह्यातल्या अतिशय मागास अशा आदिवासी संथाल समाजातल्या भाजप नेत्या द्रौपदी मुर्मु यांनी काल १५ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीनं विरोधीपक्ष निवडणुकीपूर्वीच धराशायी झाला. नव्या राजकीय समीकरणासाठी भाजपनं त्यांची निवड केलीय. यांचं कारण छत्तीसगढ़, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यातल्या मिळून १०९ लोकसभा मतदारसंघात आदिवासी मतदारांचा मोठा प्रभाव आहे. शिवाय देशभरातल्या ४७ जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. त्यातला ३१ जागा या भाजपनं जिंकलेल्या आहेत. आता त्या सर्व जागा जिंकण्याचं ध्येय बाळगून ठेवून भाजपनं आदिवासी महिला द्रौपदी मुर्मु यांना राष्ट्रपतीपदासाठी निवडलं. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कुणी आदिवासी महिला देशाच्या सर्वांत मोठ्या पदावर पोहोचलीय. ही निवड सांकेतिक असली तरी भारताच्या आदिवासी समाजात याविषयी एक संदेश जाणार आहे. भारतात ८.५ ते ९ टक्के आदिवासींची लोकसंख्या आहे. मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगढ, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा यांच्यासारख्या राज्यात ती जास्त आहे. भाजपसाठी हे सगळे राज्य महत्त्वाचे आहेत. सलग दोनवेळा देशात भाजप सत्तेत आला आहे. अशास्थितीत विरोधी लाट येण्याची शक्यता स्वाभाविक आहे. त्यामुळं भाजप नव्या मतांच्या शोधात आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या निमित्तानं आदिवासी लोकांना आपली व्होटबँक बनवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यामध्ये ते यशस्वी होतील, असं सध्यातरी वाटतं. कारण संघसुद्धा या वनवासींसाठी याच दिशेनं वर्षानुवर्षे काम करतोय. येत्या २ वर्षात लोकसभेसह १८ राज्यात विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत. ओडिशा, कर्नाटक आंध्रप्रदेश, तेलंगणा, झारखंड, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यातल्या ३६० हून अधिक मतदारसंघात अनुसूचित जमाती, आदिवासींचा प्रभाव आहे. तिथं मुर्मु या सहाय्यभूत ठरतील असा भाजपचा होरा आहे. इथं लोकसभेच्या ४७ जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. भाजप हा पूर्वी उच्च, पुढारलेल्या जातींचा पक्ष मानला जाई. पण ज्यावेळी मोदींकडे सूत्रं आली, त्यावेळी त्यांनी जाणूनबुजून हे गृहितक बदलायला सुरुवात केली. प्रत्येक निवड आणि नेमणूक करताना सोशल इंजिनिअरिंग कशी साधली जाईल, शहरी पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपला गावकरी, वनवासी आणि परिघाबाहेरील लोकांपर्यंत पोहोचवायचा याचा विचार करूनच केलेली नेमणुका, निवड केल्याचं आपल्याला आढळून येईल. मागच्या वेळेला मागासवर्गीय रामनाथ कोविंद आणि आता आदिवासी द्रौपदी मुर्मु अशा 'पिछडा जाती'तल्यांना सर्वोच्च स्थानावर बसवलं गेलंय, हे लक्षांत घेतलं पाहिजे. आजवर आदिवासी, दलित, मुस्लिम, ओबीसी हे परंपरागत काँग्रेसचे मतदार राहिले आहेत. ते सारे आता काँग्रेसपासून दूर जाताना दिसताहेत तर दुसरीकडं मोदी आणि भाजप त्यांना जोडून घेण्याचं काम करताना दिसताहेत. या चालीनं विरोधक सैरभैर झाले आहेत.

*जाटांना सोबत घेण्यासाठी जनखड यांची निवड*
भाजपप्रणित एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीश धनखड यांची निवड भाजपनं केलीय. मोदी-शहा या जोडीच्या राजवटीत राजकीय वा घटनात्मक पदासाठी उमेदवाराची निवड करताना जात आणि प्रांत यांचा अधिक विचार करून राजकीय समीकरणांची, सोशल इंजिनिअरिंगची आखणी केली जाते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. जगदीश धनखड हे राजस्थानातल्या जाट समाजातले नेते असून त्यांच्या निवडीमागे हे प्रमुख कारणं असल्याचं सांगितलं जातंय. त्याचबरोबर बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर कुरघोडी करताना त्यांनी दाखवलेलं कौशल्य राज्यसभा नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयोगी पडेल असाही विचार यामध्ये दिसतोय. भाजपनं सत्तेसाठी मांडलेल्या जातीय समीकरणांमध्ये उच्चवर्णीयांसह दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजाला कळीचं स्थान आहे. राजस्थानात जाट समाज हा ओबीसी असून हरियाणा आणि उत्तर प्रदेशात या समाजाचा समावेश उच्चवर्णीयांमध्ये होतो. धनखड यांची निवड करून भाजपनं उत्तरेतल्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या जाट समाजाला पुन्हा आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय. हरियाणातल्या जाट शेतकऱ्यांचे बलाढ्य नेते चौधरी देवीलाल हे धनखड यांचे राजकीय गुरू! धनखड यांनी राजस्थानात जाट समाजाला ओबीसीचा दर्जा देण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाप्रमाणे हरियाणा आणि पश्चिम उत्तरप्रदेशात जाट समाज उच्चवर्णीय असतानाही ओबीसीचा दर्जा देण्याची आणि आरक्षणाची मागणी करत आहे, हेही महत्त्वाचं. २०२३ च्या डिसेंबर महिन्यात राजस्थानात विधानसभेची निवडणूक होणार असून २० टक्के जाट लोकसंख्येचा कल सत्ता मिळवण्यासाठी भाजपसाठी निर्णायक ठरेल. हरियाणात जाट समाजाचं प्राबल्य असूनही भाजपनं जाटेतर पंजाबी खत्री समाजातल्या मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्री केल्यानं नाराज झालेल्या जाट समाजाला धनखड यांच्या निवडीमुळं दिलासा मिळू शकेल. माजी उपराष्ट्रपती आणि भाजपचे दिवंगत नेते भैरवसिंह शेखावत यांच्यानंतर शेखावती प्रदेशातले धनखड हे दुसरे उपराष्ट्रपती असतील. संसदेतल्या दोन्ही सभागृहांतलं संख्याबळ ७८० असून बहुमतासाठी ३९० मतांची गरज आहे. भाजप आघाडीकडं ३९४ मते असल्यानं धनखड यांचा विजय निश्चित मानला जातो. त्यामुळं दोन्ही सभागृहांचे पीठासीन अधिकारी आता राजस्थानी असतील. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला हेही राजस्थानातल्या कोटा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. हरियाणाप्रमाणे राजस्थानातही जाट मतदारांचा कौल निर्णायक ठरतो. शेखावती प्रदेशात माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना जाट समाजाचा भक्कम पाठिंबा होता. एकेकाळी धनखड हे वसुंधरा राजे यांचे अत्यंत विश्वासू मानले जात. विद्यमान राजकीय परिस्थितीत वसुंधरा राजे आणि मोदी-शहा यांच्यातले मतभेद हे उघड गुपित आहे. भाजपअंतर्गत नव्या राजकीय समीकरणासाठीही धनखड यांच्यासारख्या जाट समाजातल्या राजकारणी व्यक्तीचा मोदी-शहांना लाभ होऊ शकतो, असं मानलं जातं. महाराष्ट्रातल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये धनखड यांनी ममता बॅनर्जी सरकारच्या निर्णयांना रोखण्याचा अनेकदा प्रयत्न केलाय. केंद्रीय नेतृत्वाशी एकनिष्ठ राहण्याचं फळ धनखड यांना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडीतून मिळाल्याचं मानलं जातंय.

*मराठा समाजाच्या शिंदेंकडे महाराष्ट्रची सूत्रं*
सध्या भाजप त्यातही प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचं २०१४ च्या लोकसभा निवडणुका कशा जिंकता येतील ३०० हून अधिक खासदार कसे निवडून येतील यावर लक्ष आहे. त्यांची सारी व्युहरचना ही त्यासाठीच आहे. उत्तरप्रदेशा खालोखाल महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक म्हणजे ४४ जागा आहेत. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना- भाजप यांची सत्ता होती पण निवडणूकपूर्व युती झालेली नव्हती. लोकसभा निवडणुकीला सामोरं जायचं असेल आणि राज्यातून ४० जागा मिळवायच्या असतील तर शिवसेनेशी युती करावी लागेल त्याशिवाय पर्याय नाही हे लक्षांत आल्यानंतर गृहमंत्री अमित शहा थेट मातोश्रीवर आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केवळ लोकसभाच नाही तर विधानसभेच्या निवडणुकीत युती करावी, त्यासाठी जागावाटप आणि पदांचं वाटप व्हावं असा आग्रह धरला. चर्चेअंती युतीचा फार्म्युला मंजूर झाल्यानंतर १७ फेब्रुवारी २०१९ ला अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि युतीचा फार्म्युला सांगितला. विधानसभा निवडणुकीनंतर मात्र या फार्म्युलात शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यावरून वाद झाला आणि युती संपुष्टात आली. महाविकास आघाडी निर्माण झाली आणि ती सत्तारूढ बनली. एवढं सगळं झाल्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पुन्हा युतीत येणार नाही, हे निश्चित असल्यानं पुन्हा शिवसेनेशी युती वा तडजोड करण्याऐवजी भाजपनं शिवसेना तोडायची, शिवसेनेतलं ठाकरेंचं वर्चस्व संपून टाकायचं असा निर्धार करून पावलं टाकली, हालचाली सुरू केल्या. शिवसेनेच्या पक्ष संघटनेऐवजी निवडून आलेले आमदार, खासदार यांना आगामी निवडणुकीसाठी भाजपची साथसंगत हवी आहे हे हेरून त्यांना हाताशी धरून शिवसेनेत बंड करायला लावलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचून त्यांचं महत्व कमी केलं. शिवाय त्यांच्यासमोर पक्ष संघटनेच्या अस्तित्वाचं आव्हान उभं केलं. महाराष्ट्रातलं सामाजिक समीकरण लक्षांत घेऊन शिवसेनेच्या बंडखोरांहून अधिक आमदार असतानाही देवेंद्र फडणवीस या ब्राह्मण माजी मुख्यमंत्र्यांकडं राज्याची सूत्रं सोपविली नाहीत तर राज्यात बहुसंख्येनं असलेल्या मराठा समाजातल्या एकनाथ शिंदे या शिवसेना बंडखोर आमदाराकडं मुख्यमंत्रीपद बहाल करून सामाजिक गणितं साधली. अन २०२४ च्या महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दिशेनं पावलं टाकलीत. शिवाय शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देऊन शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांचा राज्यातच बंदोबस्त करून टाकलाय. बंडानंतर शिवसेनेची झालेली दयनीय अवस्था पाहून पवारांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचीही पुन्हा नव्यानं बांधणी करायला घेतलीय. काँग्रेसपक्षही सावध झालाय.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Tuesday, 19 July 2022

विरोधीपक्ष विकलांग होतेय...!

"लोकशाहीत विरोधीपक्षांचं स्थान अनन्यसाधारण आहे. ती सशक्त करायची असेल तर विरोधीपक्षही मजबूत असायला हवा, मात्र दुर्दैवाने ते कमी होतेय. किंबहुना सत्ताधारी विरोधकांना संपविण्यासाठीच कार्यरत असल्याचं दृश्य दुर्दैवानं पाहावं लागतंय. पण त्याविरोधात विरोधक घट्ट पाय रोवून एकत्रितपणे उभा ठाकलाय असं दिसत नाही. कधी नव्हे इतके सत्तेच्या विरोधातले मुद्दे हाती असतानाही विरोधीपक्ष आंदोलनं करत नाहीत. लोकांना संघटित करत नाहीत. त्यांच्यातल्या पराभूत मानसिकतेनं त्यांना विस्कळीत, कमकुवत, विकलांग बनवलंय. सत्तेच्या विरोधात लढण्याची जिद्दच संपलीय. एकीकडे शक्तिशाली, बलाढ्य असा सत्ताधारी तर दुसरीकडं गलितगात्र, शक्तीहीन, विखुरलेला, कृश असा विरोधीपक्ष हे चित्र लोकशाहीच्या अस्तित्वासाठी घातक आहे. खिळखिळीत होऊ लागलेल्या लोकशाहीतल्या चारही स्तंभांनी निडर होऊन कार्यरत होण्याची गरज आहे!"
---------------------------------------------

*भा*रतीय विरोधी पक्ष आजच्या इतका विस्कळीत, कमकुवत, विकलांग कधीच नव्हता. तशीच सत्ताधारीही कधी नव्हे इतकी ताकदवान, शक्तिशाली बनलीय. सत्तेच्या विरोधातल्या आरोपांची चळत कधीच आजच्या एवढी मोठी नव्हती. संसदेपासून सर्वोच्च न्यायालय आणि रस्त्यावरच्या प्रश्नांबरोबर लोकशाहीच्या चारही स्तंभाचे प्रश्न उभे ठाकलेत. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. शिवाय प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, सनदी नोकरशाही, संवैधानिक संस्था, रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोग, वेगवेगळ्या ईडी, सीबीआय, एनआयए, या तपास यंत्रणा, हिंदुत्वाचा हट्ट, धर्माचं राजकारण, या साऱ्या बाबींचं निरीक्षण केलं तर दिसून येईल की, असे प्रश्न कधीच एकत्रितरीत्या उभ्या ठाकल्या नव्हत्या! प्रश्न असतानाही सत्ताधारी सदैव निवडणूक जिंकण्याच्या मोडमध्येच असतात. इथं केवळ निवडणुका जिंकण्याचा प्रश्न नाही. निवडणुका तर त्या तशाही कर्नाटकात जिंकल्या होत्या, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड, गोवा, उत्तराखंड इथंही जिंकल्या होत्या पण या जिंकलेल्या निवडणुकातून विरोधकांना हटवून आपल्या सत्ता कशी आणायची याचे कुटील डाव दिसून आले आहेत. यापूर्वी असं काही घडल्याची फारशी उदाहरणं नाहीत. विरोधीपक्षांकडून सध्या जे राजकारण खेळलं जातंय ती नरेंद्र मोदींना ताकद देणारी आहे! विरोधीपक्ष लोकतांत्रिक पद्धतीनं असंवैधानीक बाबींवर आंदोलनासाठी, संघर्षासाठी उभा झाला तरी त्याचा लाभ सरकारला मिळतोय असं दिसून आलंय. विरोधकांचा परिणामकारक विरोध फारसा दिसतच नाही. ही वस्तुस्थिती आहे. देशातल्या काही घडामोडी पाहिल्या तर असं दिसून येईल की, जासुसी करणारं इस्रायली सॉफ्टवेअर पॅगसेसेच्या प्रकरणात काय घडलं? लढाऊ फ्रान्सची राफेल विमान खरेदी प्रकरणात न्यायालयानं काय भूमिका घेतली? राजकीय पक्षांना निधी संदर्भातल्या इलेक्शन बॉण्ड प्रकरणात निवडणूक आयोगाला सोयीस्कररित्या कसं दूर लोटलं गेलं. याबाबत संसदच काय ते ठरवील, निवडणूक आयोगानं यात लक्ष घालू नये! असं न्यायालयानं सांगितलं. विविध राज्यात नेमलेल्या राज्यपालांकडं जे घटनात्मक अधिकार आहेत, त्याचा वापर सकारात्मक होतोय असं दिसतं नाही. त्यांच्याकडं संवैधानिक जबाबदारी असतानाही पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे राज्यपाल वागताना दिसताहेत. त्यासाठी त्यांना सत्ताधाऱ्यांकडून रिवार्डस दिली जाताहेत. जगदीप धनगड हे त्याचं उत्तम उदाहरण आहे!

या सर्व गोष्टींकडं आपण अधिक गांभीर्यानं पाहू लागलो तर देशातला विरोधक ज्या काही भूमिका घेताहेत त्यानं राजकीयदृष्ट्या सरकारला मदतच होतेय! शिवाय विरोधीपक्षांमधला अंतर्विरोध हाही याला कारणीभूत ठरतोय. विरोधक एकत्र येण्याऐवजी एकमेकाविरोधात भिडताहेत. आपण आपल्या कार्यकाळात केलेल्या गैरगोष्टी, व्यवहार भविष्यात उघड झाल्या तर आपल्यावर कारवाई होईल अशी भीती वाटत असल्यानं ते सारं लपविण्यासाठी विरोधक चूप बसताहेत. ईडीकडं विरोधकातल्या १२२ जणांची यादी असल्याचं सांगण्यात येतं. या १२२ जणांनी एकत्र येऊन 'करा आम्हाला अटक, टाका तुरुंगात!' असं म्हणत सामोरं का जात नाहीत? म्हणजे ईडीच्या कारवाया तरी थांबतील. कारवाईची टांगती तलवार उरणार नाही. ससेमिरा तरी संपेल! संसद, न्यायपालिका, कार्यपालिका, तपासयंत्रणा, हिंदुत्वाच्या नावावर उठवलेलं वादळ, लोकप्रतिनिधींना सत्तेसाठी फोडणं, राष्ट्रवादाचं गुणगान करणं, हे सारं सत्ताधारी खुलेआमपणे करत असताना त्याविरोधात उभं राहण्याऐवजी विरोधकांची नजर असते ती एकाच व्यक्तीवर ते म्हणजे प्रधानमंत्री मोदी यांच्यावर! त्यामुळं त्यांची प्रतिमाखंडन होण्याऐवजी ती अधिक उजळून लोकांसमोर येते. सरकारचा गैरकारभार, त्यांनी घेतलेले काही वादग्रस्त निर्णय, जाहीर केलेल्या धोरणांतला फोलपणा लोकांसमोर आणून मुद्द्यांच्या माध्यमातून लोकांना जागृत करणं, लोकांना आपल्याशी जोडणं हे सारं विरोधक करू शकतात, पण त्यांची पराभूत मानसिकता त्या आड येते. त्यांना केवळ राजकारणातला विजय आणि सत्ता हवी असते. ते केवळ राज्यसभा, विधानपरिषदेच्या सदस्यत्वासाठी झगडताना दिसताहेत. त्यांना संघर्ष करायला नकोय. रस्त्यावर उतरून लोकांच्या साथीनं लढा द्यायचा नाहीये. आज राजकीय विजयाच्या पारंपरिक पध्दती बदलल्या आहेत, सोशलमीडिया नावाचा भस्मासुर त्यात उतरलाय. त्याच्या माध्यमातून सामोरं जाण्यातही विरोधीपक्ष अपयशी ठरताहेत. वाढलेल्या महागाईचा मुद्दा ज्वलंत आहे, लोक त्रस्त झालेत, दिवसेंदिवस कराचा बोजा वाढतोय. बेरोजगारीनं अक्राळविक्राळ रूप धारण केलंय. तरुण वैफल्यग्रस्त बनू लागलेत. 'अग्निपथ आणि अग्निवीर' विरोधातल्या धगधगत्या आंदोलनातून त्याची प्रचिती आलीय. तिथंही विरोधीपक्षाचं अस्तित्व दिसलंच नाही!

करवसुली सध्या ज्याप्रकारे होतेय त्यानं देशभरातले व्यापारी-उद्योजक कमालीचे वैतागलेत. दररोज बदलत्या धोरणाची जीएसटी, आयकर, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर , कार्पोरेट करातली माफी, बँकांची बिघडलेली आर्थिक स्थिती, सर्वच बँकांतून एनपीएचं वाढलेलं प्रमाण, उद्योग-व्यापारातला दिवसेंदिवस वाढत चाललेला तोटा, इंपोर्ट-एक्स्पोर्टमध्ये होणारी वध-घट, खनिज उत्खनन त्यातही कोळशाचं उत्खनन कमी झालेलं दाखवून कोळसा आयात करायचं धोरण, सरकारनं औद्योगिक धोरणात एनसीएलटी, आयबीसीची निर्मिती का आणि कशासाठी केली, ज्यामुळं हजारो उद्योगधंदे दिवाळखोरीत निघाताहेत, त्या कंपन्या कोण खरेदी करतोय, त्यातून कुणाला फायदा होतोय, यासाठी विरोधीपक्षांनी पुढं यायला हवंय. दरम्यान देशात डिसइनव्हेसमेंट, प्रायव्हेटायझेशन, मोनोटायझेशन होतेय. अंबानी, अडाणी यांचे व्यवहार जोमानं सुरू आहेत, हे सारं येऊन पोहोचतं ते चलनावर, करन्सीवर! आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाच्या किंमतीवर! दिवसेंदिवस डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी होतेय. आज ती ८० रुपये इतकी कमी झालीय. त्यामुळं महागाई वाढतेय. हे सारे विषय लोकांसमोर आणणारा प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सत्ताधाऱ्यांसमोर इतका नतमस्तक का झालाय. पब्लिक सेक्टरच्या कंपन्यांच्या समस्या का वाढल्यात. असे एक ना अनेक मुद्दे असताना विरोधक सरकारला लक्ष्य करण्यात का कचरताहेत. सरकारला केलेला विरोध मीडिया हे दाखवणार नाही म्हणून विरोधक मुद्दे हाती असतानाही लढा उभारत नाहीत.

ज्या देशात कॅबिनेट मंत्री, राज्यपालांची भूमिका, राज्यसभेत कोणते सदस्य निवडून आणायचे, कुणाला हटवायचं, कुणाचं वय कधी होईल, कुणाकडून कोणतं काम करून घ्यायचं, हे देखील पीएमओमध्ये केंद्रीत झालंय, या सगळ्यांत देशातल्या ज्या संवैधानिक संस्था आहेत त्यांच्या प्रमुखांच्या नेमणुकाही एकाच 'दरबारा'तून होताहेत, जे घटनात्मकदृष्ट्या पूर्वी लोकांच्या समित्यातून घेतलेल्या निर्णयानुसार होत असे, तेही आता संपुष्टात येतेय. सीव्हीसी कोण असेल, सीएजी कोण असतील, सीबीआयचे प्रमुख कोण असतील, ईडीचे प्रमुख कोण असतील, सेबीचे प्रमुख कोण असतील, नीती आयोग कुणाच्या हाती असेल, इलेक्शन कमिशनमध्ये सर्वात वरिष्ठ स्थानावर कोण असेल, न्यायाधीशांची नियुक्ती कशी होईल, कोण करील, एका फटक्यात कुणालाही का अन कसं हटवलं जाईल, या साऱ्याचा आढावा घेतला तर लक्षांत येईल की पूर्वी या साऱ्या नेमणुका, नियुक्त्या या संवैधानिक पद्धतीनं बनवलेल्या समित्यांमार्फत होत होत्या. हे सारं आता बदललंय. एवढंच नाही तर याला समांतर पाहिलं तर लक्षांत येईल की, भाजपची सत्ता असतानाही त्यांची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अंकित असलेल्या चार संस्था ज्यांची नाळ भाजपशी जुळलेली आहे. भारतीय मजदूर संघ, स्वदेशी जागरण मंच, विश्व हिंदू परिषद, भारतीय किसान संघ या संस्था ज्या विषयासाठी निर्माण करण्यात आल्या होत्या ते सारे विषय सत्तेशी निगडित असतानाही ते कार्पोरेटायझेशनशी जोडलं. त्यामुळं या विषयांचं अस्तित्वच शिल्लक राहिलं नसल्यानं या संस्थांही संघाला, भाजपला नकोशा झाल्या आहेत. प्रचारकाच्या हाती सत्तेची सारी सूत्रं असतानाही याबाबतचा जाब विचारण्याची हिंमत, धाडस राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही झालेलं नाही!

हे आता कुठंवर जाणार आहे? प्रश्न केवळ अमर्याद सत्तेचा, असंसदीय परिस्थितीचा, देशातल्या संवैधानिक संस्थांच्या अस्तित्वाचा नाही तर, सामाजिक स्तरावरही दबाव संपवून टाकलाय. नव्या प्रकारची राजकीय संस्कृतीची निर्मिती करायची कला या सत्तेनं मिळवलीय. या राजनैतिक परिपेक्षात विरोधकांना संसदेच्या दोन्ही सभागृहात जशाप्रकारे किंमत दिली जातेय, याची जाणीव त्यांना होतेय असं दिसतं नाही. संसदेचं कामकाज कशा पद्धतीनं चालवली जातेय, संसदेच्या दोन्ही सभागृहात कशापद्धतीनं विधेयकं येतात ती कशी संमत केली जातात हे पाहिलंय. विधेयकं चर्चा घडवून वा चर्चा होऊ न देताही संमत केले जाताहेत. मग त्यासाठी संसदेचं कामकाज चालेलं काय, नाही काय, याची सरकारला फिकीरच नसते. संसदेची दोन्ही सभागृहं राजकीय सत्तेच्या हातातलं खेळणं बनलंय आणि विरोधक तिथं आपल्याला अपंग, विकलांग, गलितगात्र समजू लागलेत. विरोधक जणू आक्रसले गेलेत! या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण होतोय. विरोधकांचं अस्तित्व यापूर्वीच्या राजकारणात अत्यंत महत्वाचं राहीलेलं आहे. पण आजच्या स्थितीत ते राहिलेलं नाही, नगण्य बनलंय. लोकप्रतिनिधीच्या केल्या जाणाऱ्या खरेदी-विक्रीबाबत विरोधक नाराजी व्यक्त करतात पण त्यावर परिणामकारक उपाय ते शोधू शकत नाहीत. त्यांच्याकडं कसल्याही प्रकारची आंदोलनं नाहीत, आपल्यावर होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपातून पुन्हा नव्यानं उभारण्याची ताकद त्यांच्याकडं नाही. देशातल्या सगळ्या स्वायत्त तपासयंत्रणा या कायदेशीर, नियमानुसार स्वतंत्रपणे काम करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांच्या दबावानं करताहेत. असं आढळूनही त्या विरोधात कोणताच विरोधी पक्ष का उभा राहात नाही?

घटनात्मक संस्था ईडी, सीबीआय, आयकर एवढंच नाही तर कॅगचा अहवालही संसदेत सादर केला जात नाही. यावर विरोधक काहीच बोलत नाहीत! लोकशाही आणि संवैधानिकदृष्ट्या देश कमजोर होत असेल तर विरोधकांची भूमिका किती सक्षम असायला हवीय. हे त्यांना कुणी सांगायला हवंय का? त्यासाठी कशाप्रकारे आंदोलन करावं यांचं मार्गदर्शन करावं काय? एवढंच नाही तर सत्ताधाऱ्यांकडून हिंदुत्वाचं वादळ उभं केलं जातं असताना विरोधकांना कोणत्या बाजूला उभं राहायचं हेच मुळी कळत नाही. विरोध केला तर मुस्लिमांचं तुष्टीकरण केलं जात असल्याचा आरोप होण्याची भीती त्यांना वाटतेय. संघर्ष कसा करावा, विरोधासाठी काय करायला हवं या विचारापासून विरोधक दूर गेले जाताहेत. ते आपापसातल्या अंतर्विरोधानं अशा ताकतीला बळ पुरवतात की, जे विरोधकांना पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करताहेत. असाच प्रकार राष्ट्रवादाच्या निमित्तानं होतोय. देशातली कोण व्यक्ती राष्ट्रवादी नाही? सारेच स्वतःला राष्ट्रवादी समजतात पण राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. अखेर सर्वोच्च न्यायालयाला यात हस्तक्षेप करावा लागला. हा इंग्रजांच्या काळातला कायदा. जो महात्मा गांधींवरही गुदरला होता. पण यावर सत्ताधाऱ्यांनी काहीच मत प्रदर्शन केलं नाही कारण त्यांच्या हाती युएपीए हा आणखी एक कायदाही आहे त्याचा दुरूपयोग सत्ताधारी करतांना दिसतात. यात जामीन मिळण्यात मोठी अडचण असते. आजवर ह्या कायद्यानुसार चळवळीतले कार्यकर्ते, पत्रकार यांच्यावरच कारवाया झाल्या आहेत. एकही राजकीय पक्षाच्या अगदी विरोधीपक्षांच्या नेत्यावरही कारवाई झालेली नाही. पॅगसेसे सोफ्टवेअरच्या माध्यमातून केवळ विरोधकांचीच नाही तर न्यायाधीशांचीही माहिती सरकार गोळा केली जात होती, राज्य सरकारं पाडापाडीसाठी त्याचा वापर केला जात होता, असं उघडं झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्यावर काहीही म्हटलं नाही कारण सरकारनं सांगितलं की, हे सॉफ्टवेअर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं आणि गोपनीय असल्यानं काही माहिती देता येत नाही. यावर सर्वोच्च न्यायालय गप्प झालं! घटनाकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं, "भारतात संसदीय सरकार नाही, तर संसदीय लोकशाही आहे. प्रतिनिधित्व ही लोकशाहीची मूळ कल्पना आहे. संसदीय लोकशाहीत आपण कधीही बहुमताने शासन करू शकत नाही. बहुमताचा नियम सैद्धांतिकदृष्ट्या असमर्थनीय आणि व्यावहारीकदृष्ट्या अन्यायकारक आहे. अशा लोकशाहीत अल्पसंख्यांकांची मतं बहुसंख्यांक धुडकावू शकत नाहीत!" आज नेमकं त्याच्या विरोधात सरकारची ध्येयधोरणं आखली जाताहेत, तशी पावलं पडताहेत. मात्र याला विरोध करण्याची ताकद आणि मानसिकता विकलांग झालेल्या विरोधीपक्षांची राहिलेली नाही. हे देशाच्या आणि भारतीय मतदारांच्या दृष्टीने दुर्दैव आहे!
हरीश केंची.
९४२२३१०६०९

Monday, 11 July 2022

नैतिकतेचं सोवळं नेसून वावर....!

"हिंदू समाजात चारित्र्यवान, नीतिवान, समाजहितदक्ष, देशहिताचाच विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची संघटित शक्ती उभी करण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतोय. पण ह्या शक्तीचं दर्शन भ्रष्टाचार, गैरव्यवहार, वशिलेबाजी, फसवणूक, संघटित स्वार्थासाठी केली जाणारी आम जनतेची पिळवणूक, या नेहमीच्या सामाजिक प्रश्नात दर्शन घडलंय का? बँकांतून मोठ्याप्रमाणात संघाचे कार्यकते आहेत. तिथं जो महाभयंकर भ्रष्टाचार झालाय, या भ्रष्टाचाराला थांबवण्यासाठी संघातून तयार झालेले चारित्र्यवान, नीतीवान, समाजहितदक्ष, देशप्रेमी का पुढं आले नाहीत? बँकेतल्या ह्या भ्रष्टाचारावर प्रकाश टाकण्यासाठी तिथं काम करणाऱ्या संघ स्वयंसेवकांनी संघटितपणे कसे प्रयत्न करावेत याचा विचार संघ का करू शकला नाही? ह्याशिवाय वेगवेगळ्या औद्योगिक, शैक्षणिक, सरकारी क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराबद्धलही प्रश्न उपस्थित होईल.
---------------------------------------------------

'प्रभंजन'मधून भारतीय जनता पक्षाबद्धल जे काही मी लिहितो त्यानं नाराज झालेले चार तरुण मला भेटायला आले होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक होते. त्यांच्या मते 'संघानं घडवलेल्या हजारो कार्यकर्त्यांना सत्तेसाठी भाजपनं देशात आणि राज्यात जो व्यवहार चालवलाय तो पटत नाही, रुचत नाही; पण जे काही चाललंय ते थांबवा असंही त्यांना म्हणवतही नाही. 'तोंड दाबून मुका मार' असं जे म्हणतात तशी या कार्यकर्त्यांची अवस्था झालीय. काही कार्यकर्त्यांना जे काही चाललंय ते पटत नसलं तरी त्याशिवाय अन्य पर्याय नसल्यानं चाललंय, ते चांगलंच आहे असं मानावं लागतंय. तसं म्हणायची वेळ येईल, तेच म्हणावंही लागतंय!' माझ्याकडं आलेले तरुण राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणि भाजपत फरक असायचाच असं म्हणत होते. सत्ता हेही परिवर्तनाचं एक साधन आहे. संघाला समाजात जे घडवून आणायचंय, त्याला सत्ता भाजपच्या हातात असण्यानं सहाय्यच होईल. सध्या संघाच्या विचार-आचारानुसार काही गोष्टी घडत नसल्या तरी हळूहळू भाजपला संघ आचार-विचार आणि सरकारचा व्यवहार यात सुसंगती आणावीच लागेल. आज भाजपत संघातून घडलेल्या कार्यकर्त्यांखेरीज अन्य अनेकजण आहेत. त्यांच्यामुळं आणि काही प्रमाणात काही घटना दोषास्पद घडत असतीलही, पण हळूहळू सर्वांनाच संघविचार-आचार मानावेच लागतील, असं मानणारे ते तरुण होते. त्यांना केंद्र सरकारनं घेतलेल्या काही निर्णयांचं समर्थन करणंही अशक्य होत होतं, राज्यातल्या नेत्यांचं वागणंही रुचत-पटत नव्हतं. केंद्र सरकारचं मूल्यमापन आणि सरकारविरोधात कठोर टीका करणं योग्य नाही. त्यांना सांभाळून घ्यायला हवंय. सुधारणा करायला वेळ द्यायला हवाय, असा त्यांचा आग्रह होता. आपल्या विचारांशी ही मुलं प्रामाणिक होती. त्यांना राजकारणी मतलबी बुद्धीचा विलास दाखवायचा नव्हता. भाजप चुकत असेल, पण त्याला राज्य करू द्यायला हवंय असं त्यांना वाटत होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांची वेळोवेळी होणारी वक्तव्ये, संसदेतला गोंधळ, कश्मिरमधली परिस्थिती, नोटबंदी, जीएसटी, न्यायाधीशांचं प्रकरण, पाकिस्तान-चीनची घुसखोरी, महागाई, बेकारी, राज्यातली आंदोलनं अशा काही बाबी बोलण्यातून निघाल्या. त्या मुलांना माझं लिहिणं डाचत होतं तसंच सत्ताधाऱ्यांचं, भाजप नेत्यानं वागणंही डाचत होतं. मी त्यांना म्हटलं, 'संघ वा भाजप विरोधात लिहिताना त्यांचं सरकार कोलमडून पडावं, त्यांची सत्ता जावी असा माझा उद्देश निश्चितच नाही. पण जे गैर आहे ते गैर म्हणणं हे पत्रकारचं काम आहे आणि ते करण्याचाच माझा प्रयत्न आहे. पण मोदी, शहा, फडणवीस, भागवत यांच्यासह सारे भाजप नेते हे तत्वाधिष्ठित, मूल्याधिष्ठित राजकारण करण्याची भाषा करत होते. आपण संघात घडलेले कार्यकर्ते आहोत हे दाखवत होते, म्हणत होते. मंत्री असले तरी संघ शाखेवर जाऊन ध्वजप्रणाम करत होते. हे सारे वरून कीर्तन करतानाच त्यांच्या कारभाराचा मात्र तमाशा सुरू आहे. खुर्ची मिळावी म्हणून त्यांनी तत्वशून्य तडजोडी केल्याच होत्या. आता खुर्ची मिळाल्यावर मूल्यांना डावलण्याची त्यांची धिटाई वाढतेय. काँग्रेसचा चोरबाजार संपावा, मूल्याधिष्ठित राज्य असावं म्हणून लोकांनी भाजपला आपलंसं केलं, सत्तेवर बसवलं. पण निवडणूक काळात दिलेली आश्वासनं 'जुमला' म्हणत धुळीला मिळालीत, सामान्य माणसाला जीवन जगणं असह्य होऊ लागलंय. सोशल मीडियावर सरकारची लक्त्तर काढली जाताहेत. केवळ जनतेशीच नव्हे तर आपल्या कार्यकर्त्यांशी त्यांनी प्रतारणा केलीय असंच म्हणावं लागेल. हे सगळं इतक्या सहजपणे होऊ देण्यानं भाजपचं परिवर्तन हे पक्क्या बनेल, बातामारु, धोकेबाज, स्वार्थी राजकारण्यांत होईल म्हणून जे तत्व मानतात, मूल्यांची कदर करतात, साधनशुचितेचा आग्रह धरतात अशा सर्वांनी आपली नाराजी व्यक्त करायला हवी. ती वृत्तपत्रातून टीका करूनच व्यक्त व्हायला हवी असं नाही. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून, पत्रं लिहून त्याबाबत आपलं मत कळवूनही नाराजी व्यक्त करायला हवीय. तुम्ही तुमच्या बळानं नव्हे, आमच्या बळानं खुर्चीवर बसला आहात, स्वतःला सावरा, तुमच्यावर आमची नजर आहे हे लक्षात ठेवा. बहकू नका. तुम्हाला आम्ही मोकाट स्वार्थामागे धावू देणार नाही हे सातत्यानं लोकांनी लोकप्रतिनिधींना सांगायला हवंय. पक्षाचे धिंडवडे निघत घडताना सारे गप्प का? मी हे सांगण्याचं काम करतोय!'

त्या तरुणांनी हे ऐकल्यावर अशाप्रकारे सांगून काय होणार, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तेव्हा मी त्यांना गोळवलकर गुरुजी सांगत ती गोष्ट ऐकविली. ती गोष्ट अशी, एक विमानात एक पायलट आणि एक हवाईसुंदरी असे दोघेच योगायोगानं होते. पायलट त्या हवाईसुंदरीला वश करण्याची संधी शोधत होता, पण ती दाद देत नव्हती. त्याला आज संधी प्राप्त झाली होती. त्याने आपोआप विमान उडत राहण्याची व्यवस्था करून त्या हवाईसुंदरीवर झडप घातली. झटपट उरकून घ्यायची त्याची धडपड होती आणि ती हवाईसुंदरी जिवाच्या आकांतानं धडपडत ओरडत होती. पायलट तिला म्हणाला, 'कशासाठी एवढी बोंबाबोंब करतेस? कोण येणार तुझ्या मदतीला? आपण पंचवीस हजार फुटावर आहोत. विमानात आपण दोघेच आहोत. निमूटपणे माझी इच्छा पूर्ण कर. कुणाला काही कळणार नाही'. हवाईसुंदरीनं म्हटलं, 'माझ्या मदतीला कुणी येणार नाही, माझी बोंब कुणाला ऐकायला जाणार नाही हे सगळं मला कळतंय, पण हे तुझं विमान कधीतरी खाली उतरणार आहे. मी निमूटपणे तू जे करतो आहेस ते करू दिलं तर तुझ्या या करण्याला माझी संमती होती असंच म्हटलं जाईल. मी विमान उतरल्यावर तुझ्याविरुद्ध तक्रार करणारच. तेव्हा मला पहिला प्रश्न विचारला जाईल, तू काय केलंस? त्यावेळी मला ही बोंब मदत करेल. माझी तुझ्या कृत्याला मान्यता नाही हे दाखविण्यासाठी मला बोंब मारायलाच हवी. माझ्या सद्सदविवेक बुद्धीसाठी हे आवश्यक आहे...!' गैरगोष्टींबद्धलचा आपला संताप-विरोध व्यक्त झाला नाही तर गैरगोष्टीला आपलीही संमती आहे असं मानलं जाईल. म्हणून आपला विरोध, आपला निषेध व्यक्त व्हायला हवाय, नोंदला जायला हवाय. गुरुजींची ही गोष्ट लक्षात घेऊनच भाजपच्या कारभाराबद्धलची नाराजी नोंदवण्याची काळजी घेतली जायला हवीय. वाकडं पाऊल पडतानाच त्याला अडवायला हवंय, नाहीतर सरळ वाटही वाकडी होऊन जाते. महात्मा गांधी आपल्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्या मातब्बरांनाही मोकळे सोडत नसत. गांधींजीच्या नंतर गांधीवादी म्हणवणाऱ्यांनी हाच आग्रह ठेऊन सत्तेवरच्या खादीधाऱ्यांना लोकांपुढं उभं करण्याचं धैर्य दाखवलं असतं तर काँग्रेसमध्ये खादी घालून काळे धंदे करणाऱ्यांची गर्दी झालीच नसती. पण सत्ता हातात ठेवण्यासाठी काही तडजोडी करायलाच हव्यात असं मानून गांधीवादी, गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे कान-डोळे-तोंड बंद करून सर्वोदय साधू लागले आणि त्यांना गुंडाळून ठेऊन काँग्रेसवर व्यवहारी, व्यावसायिक मंडळींचा कब्जा झाला. तत्वनिष्ठ, मूल्याधिष्ठित राजकारण दूर ठेऊन तडजोडी करण्याची चटक जशी वाढेल तसे संघवाले राजकारणात लुडुबुडू नयेत हा आग्रहही वाढणार. तुमचं सुसंस्कृत, राष्ट्रनिष्ठ नागरिक बनवण्याचं काम सुरक्षितपणे चालावं म्हणूनच आम्ही आम्हाला वाटेल तशी सत्ता राबवतो आहोत. आमच्याकडं फार लक्ष देऊ नका, तुमचं काम संघस्थानावर चालू ठेवा, असं सांगून संघाच्या कार्यकर्त्यांना गुंडाळलं जाईल. याचा अनुभव अलीकडच्या काळात अनेकदा आलाय. भाजपची सत्ताधारी मंडळी, मंत्रीगण संघस्थानावर ध्वज प्रणामासाठी, कर्मकांड उरकायला अगदी गाजावाजा करून येत राहतील. पण खुर्ची कायम राहण्यासाठी नको त्या माणसांशी, नको त्या तडजोडी करून, नको तेवढी लाचारी आणि नको तेवढा उन्मतपणा दाखवीत काँग्रेसवाल्यांच्या थाटात कारभार करत राहतील. हे अनेक प्रकरणात दिसून आलंय.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सत्ताकांक्षा नाही. त्याला सांस्कृतिक-सामाजिक पुनरुथानाचं कार्य करायचं आहे आणि सुसंस्कारित, सुजाण, शिस्तबद्ध नागरिकांची समर्पित भावनेनं सर्व कार्य करणारी संघटित अशी शक्ती समाजात उभी करायचीय. ह्यासाठी आवश्यक तर सत्ताही हवीय असं मानणाऱ्यांनी भाजपला यासाठी निवडलंय. भाजपनं याचं भान ठेवलंय असं मात्र दिसत नाही. भाजपत सत्तातुरांची गर्दी झाली असून 'भय ना लज्जा' अशा थाटात ही मंडळी वागताहेत. त्यांच्या या वागण्याकडं संघाचे कार्यकर्ते डोळेझाक करणार आहेत का? संसदेत आणि विधिमंडळात आणि बाहेरही जे काही घडतंय ते पाहिल्यावर संस्कृतीचा सदासर्वदा उच्चार करणाऱ्या मंडळींनी जो शिमगा चालवलाय ते दिसून येतं. पत्रकारांतही 'संस्कृतीचा संस्कार' घडलेली बरीच स्वयंसेवक मंडळी असल्यानं आणि त्यांनी विविध प्रसिद्धीमाध्यमातून बालेकिल्ले बनविले असल्यानं अनेक गोष्टी सर्वसामान्य माणसांपर्यंत जाऊ न देण्याचं अथवा विशिष्ट पद्धतीनंच ठेवण्याचं काम चोखपणे पार पाडलं जातंय. बेफाम, बेताल बोलणाऱ्यांना लोकांपुढं जाहीरपणे क्षमायाचना करायला लावण्याची शिक्षा भाजपनेत्यांना द्यायला हवी होती. आम्ही उतणार नाही, मातणार नाही, स्वतःचा तोल जाऊ देणार नाही, विरोधकांबद्धल अपशब्द उच्चारणार नाही. लोकसेवेचं व्रत सोडणार नाही. संशय येईल अशाप्रकारे व्यवहार करणार नाही. असं वचन लोकांना देऊन त्यानुसार वागणारे आदर्श लोकप्रतिनिधी भाजपनं दिले असते तर खरोखरच राजकारणाचाच नव्हे तर देशाचा चेहरामोहरा बदलला असता. लोकांनी अन्य राजकारण्यांना मूठमाती दिली असती. सगळ्याच राजकारणी पक्षांना उमेदवार निवडताना विचार करावा लागला असता, पण दुर्दैवानं भाजपनेही 'आज रोख उद्या उधार' पाटी लावून दीड दांडीच्या तराजूनंच आपला धंदा चालवायचं ठरवलेलं दिसतं. रोज नव्या घोषणा आणि नवे वायदे सुरू आहेत. 'एक ना धड भराभर चिंध्या' ही म्हण आपलं घोषवाक्य बनवलं असतं तरी बिघडलं नसतं. असं वाटण्याइतपत धोरणांच्या फुलबाज्या उडवल्या जाताहेत. गेली अनेक वर्षे संघ हिंदू समाजात चारित्र्यवान, नीतिवान, समाजहितदक्ष, देशहिताचाच विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची संघटित शक्ती उभी करण्याचं काम करतोय. ह्या शक्तीचं संघटित दर्शन कुठल्या भ्रष्टाचार, गैरव्यवहार, वशिलेबाजी, संघटित स्वार्थासाठी केली जाणारी आम जनतेची पिळवणूक, फसवणूक या नेहमीच समोर येणाऱ्या सामाजिक प्रश्नात घडलं आहे, असं आजवर दिसून आलेलं नाही.

बँकांतून मोठ्याप्रमाणात संघाचे कार्यकर्ते काम करताहेत. बँकांमध्ये जो महाभयंकर असा भ्रष्टाचार घडला, या भ्रष्टाचाराला थांबविण्यासाठी संघातून तयार झालेले चारित्र्यवान, नीतीवान, समाजहितदक्ष, देशप्रेमी का पुढं आले नाहीत? ठीक आहे, हा भ्रष्टाचार उघड झाला नव्हता तेव्हा तो उघड होईल की नाही याचं भय वाटून हे लोक गप्प बसले असतील. पण तो भ्रष्टाचार हुडकण्यासाठी आज प्रयत्न होत आहेत. बँकेतल्या ह्या भ्रष्टाचारावर प्रकाश टाकण्यासाठी बँकातून काम करणाऱ्या सर्व संघ-स्वयंसेवकांनी संघटितपणे कसे प्रयत्न करावेत याचा विचार संघ का करू शकला नाही? ह्या सगळ्याच वेगवेगळ्या औद्योगिक, शैक्षणिक, सरकारी क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराबद्धलही उपस्थित होईल. कुठल्या क्षेत्रात भ्रष्टाचार, अन्याय, लाचखोरी, वशिलेबाजीला विरोध करण्याचा संघानं संघटितपणे प्रयत्न केलाय? हा प्रश्न संघालाच विचारायचा, कारण संघ हिंदू समाजाचं एका आदर्श, समर्थ, संघटित समाजात परिवर्तन करण्याचं व्रत घेऊन उभा आहे. संघाला अन्य संघटनांसारखं 'सत्ताकारण' करायचं नाही. संघ तत्वचर्चेपेक्षा आचरणावर अधिक भर देतो असं संघ प्रचारक सतत सांगतात. नैतिकतेचा टेंभाही ते सतत मिरवतात. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस आणि सध्याचे सरसंघचालक मोहनराव भागवत या सर्वांनी नैतिकतेचा मापदंड समाजापुढं आजवर ठेवलाय. 'समाज जीवनात कितीही भ्रष्टाचार असला तरीही सर्वसामान्यपणे संघ स्वयंसेवक, संघ संचालित संस्था भ्रष्टाचारापासून दूरच आहेत' असंही संघ प्रचारक, संघ पुरस्कर्ते म्हणतात. ज्याप्रमाणे राममंदिराच्या प्रश्नावर संघाचे स्वयंसेवक जिथं जिथं असतील तिथं तिथं प्रत्यक्ष कार्यासाठी उभे झाले; तर समाजाची आंतरिक शक्ती जागविण्यासाठी, सर्वसामान्य माणसांमध्ये नैतिक बळ वाढविण्यासाठी, देशाला पोखरणारा भ्रष्टाचार संपविण्यासाठी, निदान तो उघड्यावर आणण्यासाठी जिथं जिथं संघ स्वयंसेवक आहे तिथं तिथं तो कार्यक्षम का झाला नाही? सरकारी नोकरांमध्येही संघ स्वयंसेवक मोठ्या संख्येनं आहेत. सरकारी कचेऱ्यातली उदंड दप्तरदिरंगाई, भ्रष्टाचार, गैरव्यवहार थांबविण्यासाठी शक्य नसेल, पण उघड्यावर आणण्यासाठी संघ स्वयंसेवक संघटितपणे काही करू शकले नसते का? देश आणि राज्यातल्या परिस्थितीचा इथं उहापोह केला गेला. मात्र सर्वत्र अशीच परिस्थिती आहे. खासदार, आमदार, मंत्री अनेक ठिकाणी संपूर्ण महापालिका ताब्यात असतानाही इथल्या लोकांचं जीवन सुसह्य होईल असं काही घडताना दिसत नाही. जातीचा दाखला रद्द झालेल्या खासदारांना उन्माद चढलाय. ते आपल्यातच 'धर्मकार्या'त मश्गुल आहेत. त्यांना आवरणार कोण? दोन भाऊ एकमेकांविरुद्ध शीतयुद्ध खेळताहेत. महापालिकेत सत्ता कुणाची आणायची यासाठी दंड थोपटताहेत. सगळा कारभार रामभरोसे सुरू आहे. त्यामुळं नोकरशाही माजलीय. जनतेनं एवढं भरभरून दिलं असताना त्यांच्या नशिबी हा कर्मदारिद्रीपणा आलाय. इथं संघ स्वयंसेवकांनी, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या नेत्यांना आजवर का जाब विचारला नाही? कुणालाही न जुमानणारे हे नेते कार्यकर्त्यांना कसे जुमानणार? या सत्तातुरांना कोण आवरणार? संघाची शिस्त, वैचारिक बैठक, तत्वनिष्ठा, मूल्याधिष्ठित राजकारण आज कुठंतरी हरवलंय असं वाटण्यासारखी स्थिती दिसून येतेय!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Saturday, 9 July 2022

अखंड भारत की भारत महासंघ

"आपण जर प्रयत्नांना गती दिली तर पुढच्या १०-१५ वर्षात अखंड भारत निर्माण होईल...!" असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळं देशात चर्चांना उधाण आलं. त्यातही पुरोगामी, डावे अतिशय आक्रमकपणे भागवतांवर तुटून पडलेले दिसले. अखंड भारत हे संघानं पाहिलेलं अत्यंत जुनं स्वप्न आहे. भागवतांनी आपल्या भाषणात स्वामी विवेकानंद आणि महर्षि योगी अरविंद यांच्या स्वप्नातला भारत बनेल अशी अपेक्षा केली. योगी अरविंदांच्या पाँडेचेरी इथल्या आश्रमात आजही योगीजींच्या स्वप्नातला अखंड हिंदुस्थानचा नकाशा लावलेला आहे. या नकाशात आजच्या भारतासह खाली श्रीलंका, पूर्वेला ब्रह्मदेश म्हणजेच आजचं म्यानमार, बांगलादेश, नेपाळ, भूतान, तिबेट, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे सर्व प्रदेश भारताचा भूभाग म्हणून दाखवलेले आहेत. 

भारतावर इंग्रजांची एक हाती सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर इंग्रज अधिकार्‍यांच्या कार्यालयात जो तत्कालिन हिंदूस्थानचा नकाशा लावला जात असे त्यातही भारतासह हे सर्व प्रदेश भारताचेच भाग म्हणून दाखवलं जात होतं. संघालाही या सर्व भूभागांसह हिंदुस्थान व्हावा ही अपेक्षा राहिलेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळताना देशाचे तुकडे पाडावेत हे संघाला कधीच मान्य नव्हतं. नंतरच्या काळातही संघानं अखंड भारतासाठी कायम आग्रह धरला होता. त्यामुळं आज संघानं पुन्हा एकदा या मागणीकडं लक्ष वेधलंय. इंग्रजांनी भारतात सत्ता स्थापन करण्यापूर्वी असलेल्या हिंदुस्थानचे तुकडे होत आता श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश, भूतान, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि आजचा भारत असे तुकडे झालेले आहेत. यातला भारताचा भूभाग सर्वात मोठा असून इथली लोकसंख्याही लक्षणीय आहे. इंग्रजांनी देशाचे विभाजन करताना आजचा हा भारत हिंदूंसाठी आणि पाकिस्तान मुस्लिमांसाठी असंच विभाजन केलं होतं. त्यामुळं हा हिंदूंचा प्रदेश म्हणून ओळखला गेला. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर तत्कालिन राज्यकर्त्यांनी देशात सर्वधर्मसमभाव आणून सर्व धर्मियांसाठी इथं मोकळीक निर्माण केली. त्यामुळं इथं हिंदूंसोबत मुस्लिम, ख्रिस्ती, बौद्ध, पारशी अशा अठरापगड जाती धर्माचे लोक वास्तव्य करु लागले. असं असलं तरी आजही इथं हिंदूंचं लोकसंख्या निहाय वर्चस्व कायम राहिलंय.

देशाच्या स्वातंत्र्याला यंदा ७५ वर्षें होत आहेत. या काळात अनेकदा अखंड भारत पुन्हा व्हावा म्हणून मागणी केली. अर्थात तत्कालिन राज्यकर्त्यांनी त्या संदर्भात फारसं काही केलं नाही. तसा विचार करता काही करणं त्यांना शक्यही नव्हतं. याच काळात पाकिस्ताननं अतिक्रमण करुन काश्मीरचा काही भाग बळकावून घेतला. तर चीननं तिबेटवर हक्क प्रस्थापित केला. अशास्थितीत १९४७ पूर्वी हिंदुस्थानचा भूभाग असणारे हे सर्व प्रदेश जोडायचं झाल्यास लष्करी ताकदीच्या जोरावर हे सर्व भूभाग ताब्यात घ्यावे लागतील. या सर्व देशांशी लढाई करुन हे भूभाग भारताला जोडणं आजतरी अशक्यच आहे. २०१४ मध्ये देशात सत्तांतर झाल्यावर मोदी सरकारनं देशाची संरक्षण विषयक ताकद वाढवलीय. असं असलं तरी एकाच वेळी किंवा प्रसंगी टप्प्याटप्प्यानं या देशांशी लढून भूभाग मिळवणं अडचणीचं आहे. बांगलादेश, नेपाळ, तिबेट, भूतान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांवर भारतानं आक्रमण करुन देश ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तरी या देशांच्या सोबत जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणार्‍या चीनचा हस्तक्षेप टाळता येणार नाही. आपण एकाचवेळी पाकिस्तान आणि चीन या दोघांशीही लढण्याइतके सक्षम आहोत का याचा विचार होणं गरजेचं आहे. जरी लष्करी शक्तीच्या जोरावर या देशांना ताब्यात घेतलं तरी तिथली जनता भारताला आपलं मानेल का आणि भारतीय सुद्धा या जनतेला आपलं मानतील काय हा प्रश्‍नही निर्माण होणार आहे. हे सर्व देश हे जरी पूर्वी भारताचाच भूभाग असले तरी गेल्या पाऊणशे वर्षात आलेल्या चार पिढ्या हळूहळू भारताशी असलेला संबंध विसरुन गेलेल्या आहेत. त्यामुळं बंदुकीच्या जोरावर हे देश जरी ताब्यात घेतले; जे की सध्या अशक्य आहे. तरीही मनानं हे देश कधीच आपल्याशी जुळणार नाही. असं धरुन बांधून आणलेलं भारतीयत्व या परिसराच्या विकासासाठी पोषक नव्हे तर मारकच ठरणारं आहे. इथं आणखी एक महत्त्वाचा मुद्दा विचारात घ्यावा लागेल. भारतानं लष्करी ताकदीच्या जोरावर या देशांना आपले अंकित बनवलं तरी जागतिक दबाव वाढताच राहील. सुदैवानं नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपल्या राजनैतिक कौशल्याच्या जोरावर जागतिक स्तरावर भारताचा दबदबा निर्माण केलाय. मात्र असं असलं तरी हे सर्व देश ताब्यात घेतल्यावर जागतिक दबाव वाढेल आणि परिणामी त्या प्रदेशांना पुन्हा त्यांचं स्वातंत्र्य बहाल करावं लागेल. अन्यथा जागतिक स्तरावर असहकाराला भारताला सामोरं जावं लागेल.

हे सर्व मुद्दे लक्षात घेता आजच्या तारखेत तरी अखंड हिंदुस्थान लष्करी शक्तीच्या जोरावर निर्माण करता येईल काय याचं उत्तर नकारार्थीच मिळतं. तरीही भागवतांनी हे विधान केलंय त्यात काहीतरी तथ्य निश्‍चितच असणार भागवत हे संघासा़रख्या देशातल्या सर्व क्षेत्रात स्वतःचा दबावगट निर्माण करणार्‍या संघटनेचे प्रमुख आहेत. त्याशिवाय सर्वच टप्प्यांवर त्यांचा दांडगा अभ्यासही आहे. भागवतांच्या संकल्पनेत अखंड भारत कसा असू शकेल याचा विचार करणं गरजेचं ठरतं. इंग्रजांनी देशात सत्ता स्थापन केल्यानंतर १८५७ साली पहिलं बंड झालं होतं. २००७ साली त्याला १५० वर्ष पूर्ण झाली. साधारणतः २००२,२००३ या कालखंडात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार असताना २००७ मध्ये या स्वातंत्र्यलढ्याचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचा विचार झाला होता. त्यावेळी १८५७ मध्ये भारताचा भूभाग असलेल्या या सर्व देशांना सहभागी करुन घ्यावं असा प्रयत्नही झाला होता. मात्र ते शक्य झालं नाही. याच काळात संघाचे विचारवंत असलेले राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. श्रीकृष्ण गोपाळ काशीकर यांनी आपल्या डी. लिट. साठी नागपूर विद्यापीठाला सादर केलेल्या प्रबंधात भारत पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ या देशांचा एक महासंघ बनवला जावा आणि या पूर्ण परिसराच्या विकासासाठी संयुक्त प्रयत्न होऊन सांस्कृतिक आणि सामाजिक, आदानप्रदान केलं जावं असं सुचवलं होतं. दुर्दैवानं त्यावेळी तसं घडलं नाही. मात्र आज प्रयत्न केल्यास ती शक्यता नाकारता येत नाही.

इथं ब्रिटनचं आणि अमेरिकेचं उदाहरण देता येऊ शकतं. ब्रिटनमध्ये अनेक छोटे देश एकत्र येऊन त्यांनी महासंघ निर्माण केला. अनेक मुद्यांवर एकमत करत त्यांनी विकासाची नवी दालनं उघडली त्यासाठी देश वेगळे असले तरी एकच चलन वापरलं. तसाच प्रयोग युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांनीही केलाय. त्याच धर्तीवर जुन्या हिंदुस्थानपासून बनलेल्या या छोट्या मोठ्या देशांसाठी करता येऊ शकतो. याबाबत थोडं विस्तारानं सांगायचं झाल्यास या परिसरातल्या सर्व देशांच्या आजच्या स्थितीचा विचार करणं गरजेचं ठरतं. भारताबाबत बोलायचं झाल्यास २०१४ नंतर भारताची परिस्थिती बरीच बदललीय. नरेंद्र मोदी यांनी सत्तासुत्रं हाती घेतल्यानंतर देशाची ताकद वाढवण्याचा बर्‍यापैकी यशस्वी प्रयत्न झाला. २०१९ मध्ये पाक व्याप्त काश्मीर परिसरात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनं हे स्पष्ट झालं. त्याचबरोबर मोदींनी जागतिक स्तरावर चाणक्य नीति वापरत भारताची प्रतिमा सुधारली तसंच भारताचा दबावही वाढवला. त्याचसोबत देशाची अंतर्गत स्थितीही कोरोनाचं संकट आल्यावरही हाताबाहेर गेलेली नाही. ज्याप्रमाणे पाकिस्तान, श्रीलंका नेपाळ या देशात आर्थिक आणीबाणी घोषित करावी लागली तशी परिस्थिती सुदैवानं भारतावर आलेली नाही. या परिस्थितीत भारत या शेजारी देशांना मदतीचा हात पुढं करु शकला. ही भारताची जमेची बाजू म्हणावी लागेल. आधी नमूद केल्याप्रमाणे आज श्रीलंकेनं पूर्णतः दिवाळखोरी घोषित केलीय. पाकिस्तानातही आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. तिथं सत्तेसाठी होत असलेल्या भांडणांमुळं राजकीय अस्थैर्य आहे. पाकिस्तानात असलेले सिंध, बलुचिस्तान हे प्रांतही स्वतंत्र होण्यासाठी धडपडताहेत. अशावेळी भारत ज्याप्रमाणे १९७१ मध्ये बांगलादेशला पाकिस्तानपासून मुक्त होण्यासाठी ताकद देऊ केली त्याप्रमाणे या देशांनाही ताकद देऊन मुक्त करु शकतो. आज पाकव्याप्त काश्मीरमधल्या भारतविरोधी कारवाया करणार्‍या दहशतवाद्यांचं कंबरडं मोडण्याची भारताची तयारी झालेलीय. पाकिस्तानात राजकीय आणि आर्थिक अस्थैर्य असंच राहिलं तर पाकिस्तान मदतीसाठी भारताकडं केव्हाही हात पसरु शकतो. अशीच थोड्याफार फरकानं परिस्थिती बांगलादेशमध्येही निर्माण होऊ शकते. नेपाळ, तिबेट, भूतान आणि म्यानमार हे देश आजही भारताशी सौहार्द बाळगून आहेत. मध्यंतरी एका प्रकरणात म्यानमारनं भारतीय लष्कराला त्या परिसरात काही मदत केल्याचंही सांगण्यात आलं होतं. हे बघता या देशांची फारशी अडचण येणार नाही. अफगाणिस्तानमध्येही सर्वसामान्य मुस्लिम विरुद्ध तालिबानी या संघर्षात अफगाणी नागरिक कंटाळलेला आहे. अशावेळी राजकीय कुटनीतिचा वापर करुन तिथलीही परिस्थिती हातात घेता येऊ शकते. अर्थात हे काम सोपे नाही हे भागवतांनीही आपल्या भाषणात मान्य केलंय. राष्ट्रसाधनेत अनेक अडचणी येतात त्या अडचणी पार करत करत पुढं जायचं असतं अमृतासाठी समुद्रमंथन केलं. तेव्हा आधी विष हातात आलं होतं. ते भगवान शंकरांनी पचवल्यावरच पुढं अमृत मिळू शकलं होतं. याची आठवण करुन देत भागवतांनी अखंड भारत बनण्यासाठी संघर्ष अटळ असल्याचं स्पष्ट केलंय. त्यासाठी अहिंसेवर भर देताना हातात दंडूकाही ठेवण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली आहे. शेवटी देशातला सनातन धर्म म्हणजेच हिंदूधर्म हाच हे काम करु शकेल असंही त्यांनी म्हटलंय!.

हे सर्व मुद्दे लक्षात घेत अखंड भारत म्हणजेच भारतीय संस्कृती प्रमाण मानणार्‍या देशांचा समूह किंवा संघराज्य ही संकल्पना ठेवून पुढं गेल्यास संघाचं स्वप्न पुढील १५ वर्षात साकारणं शक्य आहे. युरोप खंडात असलेले अनेक छोटे देश ब्रिटनच्या नेतृत्वात एकत्र आले आणि त्यांनी काही समान मुद्दे घेत एकत्रित कारभार सुरु केला. तिथं त्यांनी विकासाची समाननिती निश्‍चित केली सर्व देशांचं एकच चलन निश्‍चित केलं आणि आर्थिक व्यवहारांची व्यवस्थाही एकसारखी केली. त्यातून हे सर्व देश विकासाची वाटचाल सुलभ करु शकले असाच प्रयोग अमेरिकेत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका इथेही झाला होता. आजही तो यशस्वीपणे राबवला जातो आहे. याच धर्तीवर आशिया देशांचा भारतीय महासंघ गठित केला जाऊ शकतो. सध्याची स्थिती बघता आणि भारतीय नेतृत्व बघता असं घडणं अगदीच अशक्य नाही. असं झालं तर हा विशाल भूप्रदेश एकत्रितपणे विकासाची वाटचाल करु शकेल सर्वात महत्त्वाचे म्हणजे संरक्षणावर होणारा अकारण खर्च कमी होईल. आज भारतात नेपाळच्या सीमेवर पोलिस तैनात असल्यानं जो वर्षाचा खर्च होतो तितकाच पाकिस्तानच्या सीमेवर लष्कर ठेवावं लागल्यामुळं एका दिवसात खर्च होतो. हे सर्व देश एकत्र आले तर हा लष्करावर होणारा खर्च सर्वच देशांना विकासासाठी वापरता येईल आणि सर्वच प्रदेश नजीकच्या भविष्यात विकसित म्हणून पुढे येऊ शकतील. विरोध करणार्‍या कथित पूरोगामी विचारवंतांनी हे सर्व मुद्दे लक्षात घेत त्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आणि व्यक्त केलेली भविष्यवाणी तपासावी आणि या मार्गावर वाटचाल करण्यासाठी सहकार्य करावं. तेच या जुन्या हिंदुस्थानमधल्या प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीनं हितावह ठरणार आहे!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

भाजप शिवसेनेचा मित्र नव्हे शत्रूच...!

शिवसेनेबरोबर युती केल्यामुळे भाजपला महाराष्ट्राच्या सत्तेची चव १९९५ मध्ये चाखायला मिळालीच; शिवाय केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी त्या काळात कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या राज्यातून ‘युती’चे भरघोस खासदारही निवडून आणता आले. महाराष्ट्रातील युतीच्या राजकारणावर बाळासाहेब असेपर्यंत शिवसेनेचाच वरचष्मा होता आणि कोणत्याही वादात बाळासाहेबांचाच शब्द अंतिम ठरत असे. मात्र, २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने थेट बहुमत मिळवले आणि शिवसेनेचे ग्रह फिरले!
---------------------------------------------------

गेल्या पाच वर्षांत शिवसेनेने आपली जी अवस्था स्वकर्तृत्वाने करून घेतली, तशी परिस्थिती या मराठी माणसांच्या संघटनेची पहिल्या चार-साडेचार दशकांत कधीही झाली नव्हती. बाळासाहेब राजकीय तडजोडी जरूर करत असत; पण तरीही त्यांच्या शब्दाला वजन असे आणि मुख्य म्हणजे त्यांनी कोणतीही भूमिका घेतली, तरी शिवसैनिकांच्या त्यांच्यावरील निष्ठेवर तसूभरही परिणाम होत नसे. बाळासाहेबांच्या निधनाच्या जवळपास एक तप आधी म्हणजेच एकविसावे शतक उजाडले, तेव्हाच विविध कारणांमुळे संघटनेची सूत्रे ही उद्धव यांच्या हातात गेली होती आणि तेव्हापासूनच बाळासाहेबांच्या बिनधास्त राजकारणाऐवजी तडजोडींचे राजकारण सुरू झाले होते. हे राजकारण मैदानातून दिवाणखानी मसलतींचे झाले. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातच शिवसेनेला दोन जबर तडाखे बसले. पहिला तडाखा हा आज भारतीय जनता पक्षात सामील होऊन, संयमाचे धडे गिरवू पाहणारे नारायण राणे यांनी दिला होता. शिवसेनेत पदांचे वाटप हे पैसे घेऊन केलं जाते, असा जाहीर आरोप त्यांनी केला तेव्हा त्यांचा रोख हा उद्धव यांच्याच दिशेने होता. त्यानंतर राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली. त्या बातम्यांवरची धूळ पुसली जाण्याआधीच राज ठाकरे हे “विठ्ठलाभोवती जमलेल्या बडव्यांवर” अत्यंत तिखट शब्दांत टीकास्त्र सोडत शिवसेनेतून बाहेर पडले. छगन भुजबळ यांनी १९९१ मध्ये शिवसेनेला अखेरचा “जय महाराष्ट्र!” केला, तेव्हाच खरे तर ही शिवसेनेतील मोठी फूट आहे, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यानंतर अयोध्येतील “बाबरीकांडा’नंतर मुंबईत १९९२-९३ मध्ये झालेल्या दोन दंगलींत घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या जोरावर शिवसेना मंत्रालयात आपली शाखा उघडण्यात यशस्वी झाली होती. मात्र, भारतीय जनता पक्षाशी ‘युती’ केल्यानंतरच राज्याची सत्ता शिवसेना भागीदारीत मिळवू शकली होती, हेही वास्तवच आहे. राणे आणि पाठोपाठ राज ठाकरे शिवसेनेबाहेर गेल्यानंतर शिवसेनेने मुंबई महापालिकेवरचे आपले राज्य राखले. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने दगाफटका केल्यानंतरही एकहाती राज्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि राज यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याशी लढून’ ६३ जागा जिंकल्या. हे सारे असले तरी या काळात बाळासाहेबांचा करिष्मा अबाधित होता. त्याचबरोबर बाळासाहेबांच्या निधनामुळे दु:खी झालेल्या शिवसैनिकांनी बाळासाहेबांची पत कायम राखण्यासाठी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत अटीतटीची झुंज दिली होती.

पण त्यानंतरच्या पाच वर्षांत, सारेच काही बदलून गेले. त्यामुळे गेल्या सरकारमध्ये सेना सत्तेत असूनही, भाजप जे देईल त्यात समाधानी मानणारा पक्ष अशी सेनेचे परिस्थिती झाली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपबरोबरची तथाकथित युती कायम राहावी म्हणून ज्या काही कोलांटउड्या मारल्या त्या याच अगतिकतेची साक्ष आहेत. त्याचीच परिणती आता शिवसेनेला सत्तेसाठी ज्या पक्षांशी गेल्या तीन दशकांत उभा दावा धरला होता, त्याच कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांसोबत बैठका कराव्या लागत आहेत. महाराष्ट्राच्या गेल्या सहा-सात दशकांच्या राजकीय वाटचालीत “शिवसेना” नावाचा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे. तो कळला नाही, तर या पक्षाची दिशा आणि दशा मांडणे अवघड आहे. १९५० च्या दशकात “मुंबईसह संयुक्‍त महाराष्ट्र” म्हणजेच मराठी भाषिकांचे स्वतंत्र राज्य स्थापन व्हावे म्हणून मराठी माणसाला दिल्लीस्थित कॉंग्रेस नेत्यांचा आडमुठेपणा आणि महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांचा करंटेपणा यामुळे उग्र आंदोलन करावे लागले. शिवसेनेची स्थापना ही या आंदोलनाची अपरिहार्य म्हणावं लागेल अशी परिणती होती. त्याचं प्रमुख कारण म्हणजे संयुक्‍त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर या आंदोलनासाठी कॉम्रेड एस. ए. डांगे, साथी एस. एम. जोशी आणि आचार्य अत्रे यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या “संयुक्‍त महाराष्ट्र समिती’त फूट पडली. त्याची एक परिणती मराठी माणसाचे प्रश्‍न लावून धरणारे बलशाली नेतृत्व शिल्लक न उरण्यात झाली. त्यामुळे हवे असलेले भाषिक राज्य मिळाल्यानंतरही “आपले प्रश्‍न काही सुटत नाहीत” अशी भावना मुंबईतील मराठी माणसाच्या मनात निर्माण झाली. कोणी या संघटनेच्या स्थापनेमागे आणखी काही कारणं असल्याचं सांगतात. पण, या पार्श्‍वभूमीवर मराठी माणसांच्या हक्‍कांचा विषय अजेंड्यावर आणणारी “शिवसेना” स्थापन झाल्यामुळे साहजिकच मराठी माणसाला एक भावनिक आधार सापडला होता, यात शंकाच नाही. त्यात आणखी एक बाब म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व हे प्रस्थापित सर्वच राजकीय नेत्यांपेक्षा वेगळे आणि मुख्य म्हणजे अत्यंत आक्रमक होते. बाळासाहेबांची वेशभूषा, त्यांच्या तोंडातील पाईप, त्यांच्या भाषणाची “करायला पायजेलए” अशा गुळगुळीत वाक्‍यांपलीकडली बिनधास्त शैली आणि मुख्य म्हणजे ‘मार्मिक’मधील बोचऱ्या व्यंगचित्रांमुळे त्यांच्याभोवती निर्माण झालेले वलय आदी विविध कारणांमुळे मुंबई-ठाणे परिसरातील मराठी माणसांचा एक मोठा समूह त्यांच्याकडे ओढला गेला. त्यात बेरोजगार मराठी युवकांचा भरणा मोठा होता. आता हीच संघटना आपले प्रश्‍न सोडवू शकेल, अशी भावना किमानपक्षी मुंबई तसंच ठाणे परिसरातल्या मराठी माणसाच्या मनात निर्माण झाली होती. शिवसेनेनं अगदी सुरुवातीच्या काळातच मुंबईतील तृतीय श्रेणीच्या म्हणजेच स्टेनोग्राफर, टायपिस्ट, पीए आदी पदांवर मोठ्या संख्येनं काम करत असलेल्या दाक्षिणात्यांच्या विरोधात उग्र आंदोलन पुकारलं. त्यातून मराठी अस्मितेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. हे सर्व राजकारण बाळासाहेब केवळ भावनिक मुद्दे उपस्थित करून पुढे नेत होते आणि त्यांच्या भोवतीची गर्दी वाढत होती. शिवसेनेला सुरुवातीच्या काळात जे काही जोरकस पाठबळ मिळाले, ते या अशा भावनिक मुद्यावरच आणि ठाकरे यांनीही पुढे आपला भावनिक राजकारणाचा बाज कधी सोडला नाही.

शिवसेनेच्या पहिल्या चार दशकांतील प्रवासावर एक धावती नजर टाकली तरी सहज लक्षात येते की त्या काळातील शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना होती. त्या चार दशकांत बाळासाहेबांचा “करिष्मा’ हेच शिवसेनेच्या भात्यातील ब्रह्मास्त्र होते. या चार दशकांत बाळासाहेबांनी अनेक वेळा परस्पर विरोधी आणि एकमेकांना छेद देणारे निर्णय घेतले. मात्र, त्या त्या क्षणाला घेतलेल्या कोणत्याही निर्णयानंतर शिवसैनिक बाळासाहेबांच्या पाठीशी ठामपणेच उभे राहत असत. उदाहरणच द्यायचं झालं तर ते १९७० या दशकात बाळासाहेबांनी कॉंग्रेसशी असलेल्या आपल्या संबंधांबाबत मारलेल्या कोलांटउड्यांचे देता येईल. ते दशक उजाडण्याआधीच १९६९ मध्ये कॉंग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. साहजिकच मुंबई महापालिकेत सत्ताधारी असलेल्या कॉंग्रेसमध्येही दोन गट निर्माण झाले होते आणि कधी या तर कधी त्या गटाशी साटेलोटे करत बाळासाहेबांनी प्रथम डॉ. हेमचंद्र गुप्ते मग सुधीर जोशी आणि नंतर मनोहर जोशी अशा आपल्या तीन नेत्यांना मुंबईच्या महापौरपदावर निवडून आणण्यात यश मिळवले होते. मात्र, १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर करताच, बाळासाहेब त्या निर्णयास पाठिंबा देऊन मोकळे झाले! पुढे १९७७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या पक्षाचा मोठा पराभव झाला आणि त्या स्वत:ही लोकसभेवर निवडून येऊ शकल्या नाहीत. त्यानंतर वर्षभरातच म्हणजे महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा आणीबाणीत कॉंग्रेसची पाठराखण करणारी शिवसेना बाळासाहेबांनी मुंबईच्या मैदानात उतरवली. मात्र, तेव्हाच्या जनता पक्षाच्या लाटेत मुंबईकरांनी शिवसेनेला पालापाचोळ्यासारखे दूर भिरकावून दिले. पुढे मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील जनता सरकार कोसळले आणि मध्यावधी निवडणुका घेणं भाग पडले. जनता पक्षातील फुटीनंतर लोकांनी इंदिरा गांधींना प्रचंड बहुमतानं निवडून दिले आणि सत्तेवर येताच इंदिराबाईंनी महाराष्ट्रातील शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘पुरोगामी लोकशाही दला’चं सरकार बरखास्त केले. त्यानंतर राज्यातही निवडणुका झाल्या. तेव्हा बाळासाहेबांनी अचानक पवित्रा बदलला आणि एक वेगळाच डाव टाकला. अवघ्या दोन वर्षांपूर्वी कॉंग्रेसच्या विरोधात मैदानात उतरलेल्या बाळासाहेबांनी शिवसेनेला मैदानाबाहेर ठेवत थेट कॉंग्रेसची पालखी खांद्यावर घेतली. अर्थात, त्या बदल्यात बाळासाहेबांनी शिवसेनेसाठी विधान परिषदेच्या दोन जागा पदरात पाडून घेतल्या होत्या! शिवसेनेने त्या काळात घेतलेली ही वेगवेगळी वळणं आणि मारलेल्या कोलांटउड्या यावर आताच्या तरुण शिवसैनिकांचा विश्‍वासही बसणे अवघड आहे. पण हीच शिवसेना त्यानंतरच्या अवघ्या दहा वर्षांत म्हणजेच भाजपशी १९८९ मध्ये केलेल्या युतीनंतर कॉंग्रेसविरोधातील राज्यातील सर्वात मोठ्या पक्षाचे स्थान मिळवू शकली. त्यामुळेच शिवसेना हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक “अपघात” नव्हे तर “चमत्कार” असल्याचे मानले जाते.

मराठीकारणाकडून हिंदुत्वाकडे
प्रबोधनकारांच्या १९७३ मध्ये झालेल्या निधनानंतर मात्र शिवसेनेचा बाज पूर्णपणे बदलला. प्रबोधनकार हे ब्राह्मणी संस्कृतीच्या पूर्ण विरोधात होते आणि दलित तसंच मागासवर्गीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रमही हाती घेतले होते. शिवसेनेने आपल्या राजकीय प्रवासात प्रथमच दलित विरोधी प्रखर भूमिका घेतली, ती प्रबोधनकारांच्या निधनानंतरच. प्रबोधनकार गेले त्याच वर्षी म्हणजे १९७३ मध्ये मुंबईत होऊ घातलेल्या एका लोकसभा पोटनिवडणीकीच्या पार्श्‍वभूमीवर बीडीडी चाळ परिसरात दलित पॅंथर तसेच शिवसैनिक यांच्यात मोठा दंगा झाला. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यास बाळासाहेबांनी तीव्र विरोध केला होता. या साऱ्याचीच अपरिहार्य परिणती ही अखेर बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा झेंडा महाराष्ट्रात भाजपच्या आधी आपल्या खांद्यावर घेण्यात झाली होती. त्यास कारणीभूत ठरली ती मुंबईतील विलेपार्ले मतदारसंघात १९८७ मध्ये जाहीर झालेली विधानसभेची एक पोटनिवडणूक. या निवडणुकीत शिवसेनेनं मुंबईचे तत्कालीन महापौर रमेश प्रभू यांनी उमेदवारी दिली होती. त्या आधी १९८५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका भाजपने शरद पवार यांनी उभ्या केलेल्या “पुरोगामी लोकशाही दला’त सामील होऊन लढवल्या होत्या. साहजिकच या पोटनिवडणुकीत भाजपचा पाठिंबा हा ‘पुलोद’च्या म्हणजेच जनता पक्षाच्या उमेदवाराला होता. या निवडणुकीच्या प्रचारात बाळासाहेबांनी “गर्व से कहो हम हिंदू है!’ ही विश्‍व हिंदू परिषदेची घोषणा घराघरांत नेली. तो काळ रामजन्मभूमी मुक्‍ती आंदोलनासाठी विश्‍व हिंदू परिषदेने उभारलेल्या आंदोलनाचा होता आणि बाळासाहेबांनी तोच विषय आपल्या अजेंड्यावर घेतला होता. भाजप तोपावेतो या आंदोलनात थेट सामील झालेला नव्हता. रमेश प्रभू निवडून आले आणि प्रमोद महाजन यांना बदलत्या राजकारणाची चाहूल लागली. भाजप या आंदोलनात उघडपणे सामील झाला नाही तर या “मंदिर वही बनायेंगे!’ आंदोलनाचा सारा फायदा शिवसेना उठवू शकेल, हे प्रमोद महाजनांच्या लक्षात आले होते. त्यांनीच लालकृष्ण अडवाणी यांना ते पटवून दिले आणि अखेर हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे झालेल्या अधिवेशनात भाजपने या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि १९८९ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी थेट युती केली.

त्यानंतर काय झाले हा इतिहास आहे!
शिवसेनेबरोबर युती केल्यामुळे भाजपला महाराष्ट्राच्या सत्तेची चव १९९५ मध्ये चाखायला मिळालीच; शिवाय केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी त्या काळात कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या राज्यातून ‘युती’चे भरघोस खासदारही निवडून आणता आले. महाराष्ट्रातील युतीच्या राजकारणावर बाळासाहेब असेपर्यंत शिवसेनेचाच वरचष्मा होता आणि कोणत्याही वादात बाळासाहेबांचाच शब्द अंतिम ठरत असे. मात्र, २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने थेट बहुमत मिळवले आणि शिवसेनेचे ग्रह फिरले! भाजपला आता मित्रपक्षांची फारशी फिकीर उरलेली नव्हती. त्यामुळेच २०१४ मध्ये लोकसभा काबीज केल्यानंतर पुढच्या चारच महिन्यांत सामोऱ्या आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने शिवसेनेशी असलेली युती नेमकी रौप्यमहोत्सवी वर्षाचा मुहूर्त साधत तोडली. शिवसैनिकांचा संताप उफाळून आला आणि अखेर प्रखर झुंजीत शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले! मोठ्या उत्साहात शिवसेनेनं विरोधीपक्षनेतेपदाच्या लाल दिव्याच्या गाडीचा स्वीकार केला. शिवसेना आणि शिवसैनिक यांची मूळ प्रकृतीच प्रस्थापितविरोधी राजकारणाची असल्यामुळे आता राज्याला कडवा विरोधी पक्ष मिळाल्याचे वातावरण तेव्हा उभे राहिले होते. मात्र, महिनाभरातच उद्धव ठाकरे यांनी भूमिका बदलली आणि विधानसभेतील अवघी शिवसेना आपल्या ६३ आमदारांना घेऊन त्याच लाल दिव्याच्या गाडीतून थेट सत्ताधारी बाकांवर जाऊन बसली. शिवसेनेच्या तडजोडीच्या राजकारणास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती तेव्हापासूनच! शिवसेनेचे खरे शत्रू हे आपणच आहोत आणि आपल्याला महाराष्ट्रात शतप्रतिशत सत्ता मिळवायची असली, तर समान ‘व्होट बॅंक’ असलेल्या शिवसेनेचे पाय कापल्यावाचून ते होणार नाही, याची जाणीव भाजपला आहेच! तीच गत शिवसेनेची आहे; भाजपचा राज्यात वाढत असलेला पाया हाच शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या वाटेवरचा मोठा अडसर आहे, हे शिवसैनिकही जाणून आहेत. मात्र, केवळ सत्तेसाठीच भाजपबरोबर राहण्याच्या आपल्या दुराग्रहामुळे भाजपला आपलेच खच्चीकरण करण्याची संधी मिळाली, हे शिवसेनेला उमगले नाही. विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेबाबतही शिवसेना आपला मुख्यमंत्रीपदाचा आग्रह सोडायला तयार नाही, हे लक्षात आल्यावरही भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी शिवसेनेशी जराही संपर्क साधला नाही. तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तेपासून कोसो मैल दूर असलेले कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष चर्चेत आले आहेत. अर्थात, कोणाला हा उद्धव यांचा “ठाकरी बाणा’ वाटूही शकेल! मात्र, आता या तीन पक्षांना सरकार स्थापनेत अपयश आले आणि मध्यावधी निवडणुका सामोऱ्या आल्या तर त्यात शिवसेनेची अवस्था काय होईल? त्यामुळेच गेल्या तीन दशकांच्या या तथाकथित ‘युती’तील अंतर्गत कंगोरेही सामोरे आले आहेत आणि भाजप हा शिवसेनेचा मित्र नसून खरा शत्रूच आहे, यावरच शिक्‍कामोर्तब झाले आहे.

नॅशनल हेराल्ड आणि गांधी परिवार

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या राजीव गांधी फाऊंडेशन, राजीव गांधी धर्मादाय संस्था आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या संस्थांची चौकशी होणार आहे. या संस्थांनी परदेशी देणग्या स्वीकारताना विविध कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आणि प्राप्तिकर कायद्याचा भंग केल्याच्या आरोपाबाबत ही समिती तपास करणार आहे. आर्थिक गैरव्यवहारविरोधी कायदा (पीएमएलए), प्राप्तिकर कायदा, परदेशी देणग्यांसंदर्भातील नियंत्रण कायदा (एफसीआरए) या तीन कायद्यांतल्या तरतुदींचा या संस्थांनी उल्लंघन केल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. गुन्हे अन्वेषण विभाग, प्राप्तिकर विभाग, वित्त मंत्रालय, नागरी विकास मंत्रालय आणि गृह मंत्रालयाचे सदस्य आंतरमंत्रालयीन समितीत असतील. संबंधित तीन संस्थांना मिळालेल्या देणग्यांचे स्रोत, त्या कोणत्या देशांतून मिळाल्या, याची माहिती घेऊन त्यातील कथित अनियमिततेची चौकशी करण्याची जबाबदारी या समितीवर आहे. राजीव गांधी फाऊंडेशन जून १९९१ मध्ये तर, राजीव गांधी धर्मादाय संस्था २००२ मध्ये स्थापन करण्यात आली. गांधी कुटुंबाशी संबंधित संस्थांनी २००५ मध्ये चीनकडून मोठ्या देणग्या घेतल्या असून, त्यातून चीनचे आर्थिक आणि व्यापारी हितसंबंध जपण्याचं राष्ट्रविरोधी कृत्य करण्यात आल्याचा आरोप भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीर भाषणात केला होता. डॉ.मनमोहनसिंग सरकारच्या काळात १०० कोटींचा प्रधानमंत्री राष्ट्रीय मदतनिधीही फाऊंडेशनमध्ये वळवण्यात आला असून, गांधी कुटुंबाचे हित जपल्याचाही आरोप भाजपनं केला होता. भारत-चीन संघर्षांच्या मुद्द्यांवर सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांनी सातत्यानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपनं गांधी कुटुंबाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. आता थेट केंद्र सरकारनं गांधी कुटुंबाशी निगडित तीन संस्थांची चौकशी सुरू केली आहे. या संस्थांच्या संचालक मंडळावर राहुल गांधी, प्रियंका गांधी-वढेरा, माजी प्रधानमंत्री डॉ.मनमोहनसिंग तसेच माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम हे सदस्य आहेत.

गांधी कुटुंबाशी संबंधित तिन्ही संस्थांच्या आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण झाले असून, कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना सरकारी बंगला सोडण्याची नोटीस बजावणं, ‘नॅशनल हेराल्ड’ या काँग्रेसच्या मुखपत्राच्या आर्थिक व्यवहार प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधी यांची चौकशी करणं, आता तीन संस्थांची चौकशी करणं, हे सगळे केंद्राचे निर्णय ‘राजकीय सूडबुद्धी’तून घेण्यात आले आहेत. विवेकानंद फाऊंडेशन, ओव्हरसिज फ्रेंड्स ऑफ बीजेपी, इंडिया फाऊंडेशन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या आर्थिक स्रोतांची मोदी सरकार चौकशी का करत नाही? ‘पीएम केअर फंड’ला चिनी संस्थांकडून शेकडो कोटींचा निधी मिळाला, त्याची चौकशी करणार का, असे प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केले आहेत. निवडणूक कर्जरोख्यांच्या माध्यमातून मिळालेल्या ७ हजार कोटींच्या देणग्यांचा तपास का केला जात नाही? भाजपच्या देणग्या ५७० कोटींवरून २,४१० कोटींवर गेल्या. भाजपच्या उत्पन्नात ५०० टक्क्यांनी वाढ झाली, त्याचीही चौकशी मोदी सरकारनं करावी, असे आव्हान काँग्रेसनं दिलं आहे. तर भाजपनं चौकशी योग्य असल्याचं म्हटलं आहे. राजीव गांधी फाऊंडेशनच्या आर्थिक व्यवहारांसंदर्भात काही माहिती उघड झाली असेल तर त्याची चौकशी करणं गरजेचं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेहमीच पारदर्शकतेला प्राधान्य दिलं आहे. त्यामुळं ही चौकशी करणं योग्य आहे, असं भाजपनं पत्रकार परिषदेत सांगितलं.

सर्व जग आपल्यासारखंच आहे, असं मोदींना वाटतं. प्रत्येकाला विकत घेता येतं किंवा दडपता येतं, असा त्यांचा समज आहे. पण सत्यासाठी लढणाऱ्यांना विकत घेता येत नाही आणि दडपताही येत नाही, हे मोदींना कधीच समजणार नाही. नेहरु-गांधी कुटुंबियांशी संबंधित राजीव गांधी फाउंडेशन सहित अन्य तीन ट्रस्टचे आर्थिक व्यवहार तपासणं आणि परदेशी देणग्यांचे स्रोत शोधण्यासाठी केंद्र सरकारनं आंतर मंत्रालय समिती स्थापन केली आहे. या ट्रस्टनी पीएमएलए कायदा, प्राप्तीकर कायदा आणि एफसीआरएचे उल्लंघन केल्याचं सरकारचं म्हणणं आहे. चीनच्या घुसखोरीनंतर काँग्रेसनं मोदी सरकारवर चौफेर टीका केली असताना भाजपनं प्रत्युत्तर म्हणून राजीव गांधी फौंडेशनला चीनच्या दुतावासाकडून देणग्या मिळत होत्या असा आरोप केला होता. या आरोपानंतर सरकारकडून तातडीनं अशी आंतर मंत्रालय समिती स्थापन करण्यात आली. या टीमचे नेतृत्व ईडीचे एक विशेष महासंचालक करतील. त्यांच्यामार्फत राजीव गांधी फौंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टचे आजपर्यंत झालेले सर्व आर्थिक व्यवहार तपासले जाणार आहेत. वास्तविक राजीव गांधी फाउंडेशनला मिळालेल्या देणग्यांचे तपशील या पूर्वीही सार्वजनिक होते आणि त्यात संशोधन पाठ्यवृत्तीसाठी चीनसह अनेक देशांकडून सरकारी मदत मिळत होती. २००५-०६च्या वार्षिक अहवालात या फाउंडेशनच्या देणगीदारांमध्ये चीनच्या दुतावासाचा उल्लेख होता.

प्रधानमंत्री मोदींनी स्थापन केलेला पीएमकेअर्सबाबत सार्वजनिक माहिती अद्याप दिली जात नाहीत. अनेक माहिती अधिकार पीएमओनं फेटाळले आहेत. देणगीदारांची नावं जाहीर करावीत अशी काँग्रेसकडून सातत्यानं मागणी केली जात असूनही सरकार त्याबाबत मौन बाळगून आहे. राजीव गांधी फाउंडेशन हा एक थिंक टँक असून त्याअंतर्गत राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ कंटेम्पररी स्टडीजला चीनसह युरोपीय युनियन, आयर्लंड सरकार व संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यांच्याकडून देणग्या मिळालेल्या आहेत. १९९१मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर या फाउंडेशनची स्थापना करण्यात आली होती. त्याचा उद्देश आधुनिक, धर्मनिरपेक्ष आणि प्रगतीशील भारताचा दृष्टिकोन साकार करणं. तसंच समता, लोकशाही संवाद, लोकशाही सिद्धांत आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा यांना प्रोत्साहन देण्याचा होता. या फाउंडेशनच्या अध्यक्ष सोनिया गांधी असून त्यात माजी प्रधानमंत्री डॉ.मनमोहनसिंह, राहुल गांधी, प्रियंका गांधी, माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम, नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष मॉटेंकसिंग अहलुवालिया, सुमन दुबे, अशोक गांगुली आणि संजीव गोयंका हे सदस्य आहेत. राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना २००२ मध्ये करण्यात आली होती. त्याचा मुख्य उद्देश उत्तरप्रदेश आणि हरियाणामध्ये ग्रामीण विकासांना मदत करणं हा होता. या ट्रस्टच्या प्रमुख सोनिया गांधी असून त्यात राहुल गांधी, अशोक गांगुली, बन्सी मेहता हे सदस्य आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दीप जोशी कामकाज सांभाळतात. सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसनं सांगितलं की, राजीव गांधी फाउंडेशनला कोणतीही बाब लपवण्याची गरज नाही आणि ते घाबरतही नाहीत. पण सरकारनं या चौकशी बरोबर विवेकानंद फाउंडेशन, ओवरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी, इंडिया फाउंडेशन आणि आरएसएससारख्या अन्य संस्थांचीही चौकशी करावी असं काँग्रेसनं म्हटलं आहे.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ५५ कोटींचा गैरव्यवहार याबाबत सुब्रमण्यम स्वामी यांनी आरोप केला होता २०१२ मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी एक याचिका दाखल करून काँग्रेस नेत्यांवर फसवणुकीचे आरोप केले होते. २००८ मध्ये एजेएलची सगळी प्रकाशनं बंद केली. या कंपनीवर ९० कोटींचं कर्जही झालं होतं. त्यानंतर काँग्रेसने यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक कंपनी स्थापन केली. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह मोतीलाल व्होरा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रोडा हे कंपनीत संचालक होते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे या कंपनीचे ७६ टक्के शेअर्स होते. काँग्रेस पक्षाने या कंपनीला ९० कोटींचं कर्जही दिलं होतं. या कंपनीने एजेएलचं अधिग्रहण केलं होतं. २०१५ मध्ये, ईडीने नॅशनल हेराल्ड केस बंद केली. पण सरकारला ते आवडले नाही आणि त्यांनी संबंधित ईडी अधिकार्‍यांना सेवेतून काढून टाकले. त्यांच्याजागी नवे अधिकारी नेमले आणि केस पुन्हा उघडली. हे महागाई, बेरोजगारी आणि इतर समस्यांपासून लक्ष हटवण्यासाठी आहे. पण आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही, असे काँग्रेसनं म्हटलंय. नॅशनल हेराल्ड प्रकरण इक्विटी व्यवहारात २ हजार कोटींहून अधिक मालमत्तेच्या कथित गैरव्यवहाराशी संबंधित आहे. काँग्रेसचे मुखपत्र, नॅशनल हेराल्ड, यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवणाऱ्या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) च्या संपादनामध्ये फसवणूक, कट रचणे आणि गुन्हेगारी विश्वासाचा भंग केल्याचा आरोप या प्रकरणात ठेवण्यात आला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना काही दिवसांपूर्वीही नोटीस बजावण्यात आली आहे. एप्रिलमध्ये, ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणातील मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात माजी केंद्रीय मंत्री पवन बन्सल, ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची चौकशी केल्याचे म्हटले आहे.

इक्विटीचा व्यवहार...५० लाखाचे २ हजार कोटी!
सोप्या भाषेत सांगायचे तर, नॅशनल हेराल्ड प्रकरण हे एका इक्विटी व्यवहाराशी संबंधित आहे. ज्यामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी केवळ ५० लाख रुपये देऊन २ हजार कोटी रुपयांच्या असोसिएटेड जर्नल्सच्या मालमत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड, यंग इंडिया लिमिटेड आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नावाचा समावेश आहे. पं. जवाहरलाल नेहरू यांनी १९३८ मध्ये नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र सुरु केले होतं. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड -एजेएल द्वारे प्रकाशित, हे वृत्तपत्र स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाचे मुखपत्र बनले होतं. एजेएलने आणखी दोन वृत्तपत्रे प्रकाशित केली, त्यातलं एक हिंदी आणि एक उर्दू भाषेतलं होतं. 'नॅशनल हेरॉल्ड' हे वृत्तपत्र इ.स. २००८ मध्ये बंद पडले. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड ही कंपनी सुरू करण्याची पंडित नेहरूंचीच संकल्पना होती. १९३७ मध्ये, नेहरूंनी आपल्या भागधारकांच्या रुपात इतर ५ हजार स्वातंत्र्यसैनिकांसह कंपनी सुरू केली. कंपनी कोणत्याही व्यक्तीच्या मालकीची नव्हती. २०१० मध्ये, कंपनीचे १,०५७ भागधारक होते. त्या कंपनीला नुकसान झाले आणि २०११ मध्ये तिचे होल्डिंग्स यंग इंडियाकडे हस्तांतरित करण्यात आले. एजेएलने २००८ पर्यंत इंग्रजीमध्ये नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र, उर्दूमध्ये कौमी आवाज आणि हिंदीमध्ये नवजीवन प्रकाशित केले. २१ जानेवारी २०१६ रोजी, एजेएलने ही तीन दैनिके पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

यंग इंडिया लिमिटेडची स्थापना २०१० मध्ये काँग्रेस पक्षाचे तत्कालीन सरचिटणीस राहुल गांधी यांनी संचालक म्हणून केली होती. राहुल गांधी आणि त्यांची आई सोनिया यांच्याकडे कंपनीचे ७६ टक्के शेअर्स आहेत, तर काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे उर्वरित २४ टक्के शेअर्स आहेत. या कंपनीची नोंदणी नवी दिल्लीमधील आयटीओमधील
हेराल्ड हाऊसच्या पत्त्यावरच करण्यात आलेली. माजी कायदा मंत्री शांती भूषण आणि अलाहाबाद आणि मद्रास उच्च न्यायालयांचे माजी मुख्य न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांच्यासह अनेक भागधारकांनी आरोप केला की वायआयएलने एजेएल 'अधिग्रहित' केले तेव्हा त्यांना कोणतीही सुचना देण्यात आली यांच्यासह अनेक भागधारकांनी आरोप केला की वायआयएलने एजेएल 'अधिग्रहित' केले तेव्हा त्यांना कोणतीही सूचना देण्यात आली नाही आणि त्यांच्या वडिलांद्वारे असलेले शेअर्स विकले गेले. एजेएल हस्तांतरित करण्यात आले. नॅशनल हेराल्ड प्रकरणात सुब्रमण्यम स्वामींनी सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, पत्रकार सुमन दुबे आणि टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदा यांच्यावर आरोप केले आहेत. 'यंग इंडिया' कंपनीने इ.स. २०१० मध्ये ते विकत घेतल्यानंतर काँग्रेसने 'नॅशनल हेराल्ड'ला ९० कोटींचे कर्ज दिले होते. 'द असोसिएटेड जर्नल'ची संपत्ती हडपण्यासाठी ते अवघ्या ५० लाखांत खरेदी केल्याचा आरोप भाजपनेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. यंग इंडिया कंपनीचे प्रत्येकी ३८ टक्के शेअर्स सोनिया आणि राहुल यांच्या नावावर असल्यामुळे प्रकरणाला महत्त्व आले आहे. भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१३ साली दिल्ली सत्र न्यायालयात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नॅशनल हेराल्ड प्रकरणात आयकर विभागाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी सुरु केली होती. गांधी कुटुंबीयांकडे नॅशनल हेराल्डची मालकी असताना फसवणूक आणि आर्थिक अनियमितता झाल्याचे या तक्रारीत म्हटले होते.
जून २०१४ मध्ये महानगर दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये प्राथमिक पुराव्यांच्या आधारे सर्व आरोपींना सन्मस बजावले. ऑगस्ट २०१४ मध्ये ईडीने या प्रकरणामध्ये मनी लॉण्ड्रींग झालं आहे की नाही यासंदर्भात तपास सुरु केला. सप्टेंबर २०१५ मध्ये ईडीने या प्रकरणाचा पुन्हा तपास सुरु केला. डिसेंबर २०१५ मध्ये पतियाला कोर्टाने सोनिया आणि राहुल गांधींना जामीन मंजूर केला. फेब्रुवारी २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये आरोपींविरोधातील कारवाई रद्द करण्याची याचिका फेटाळली. मे २०१९ मध्ये ईडीने या प्रकरणामध्ये १६ कोटी ३८ लाखांची संपत्ती प्रकरणामध्ये ताब्यात घेतली. जून २०२२ मध्ये ईडीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी सोनिया गांधींना समन्स बजावले आहेत.

'दलित पँथर' चा सुवर्ण महोत्सव...!

'टिट फॉर टॅट' म्हणत, 'दलितांवर अत्याचार घडेल तिथंच उत्तर द्यायचं', अशा आक्रमक ध्येयानं पछाडलेल्या बंडखोर तरुणांनी दलित पँथरची स्थापना केली, त्याला आता ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. ४८ वर्षांपूर्वी, म्हणजे १० जानेवारी १९७४ ला दलित पँथरच्या मोर्चावर दगडफेक झाली होती आणि त्यात भागवत जाधव नावाचा पँथर मृत्युमुखी पडला होता. दलित पँथर नामक भारताच्या सामाजिक इतिहासातल्या जळजळीत प्रतिक्रियेचा घेतलेला हा धांडोळा.
पँथरची पहिली झेप
प्रत्येक देशामध्ये अनेक चळवळी होऊन जातात. परंतु अशाकाही चळवळी असतात, की ज्यामुळे सर्व समाज त्या चळवळीची मुख्य घोषणा आणि मागण्या यांचा विचार करायला सुरुवात करतो. त्याचे दीर्घकालीन परिणाम होतात. त्यापैकी ‘दलित पॅंथर’ ही एक थरारक व झंझावाती चळवळ! १९७२ मध्ये ‘नवाकाळ’मध्ये छोटीशी बातमी आली. प्रत्येक देशामध्ये अनेक चळवळी होऊन जातात. परंतु अशाकाही चळवळी असतात, की ज्यामुळे सर्व समाज त्या चळवळीची मुख्य घोषणा आणि मागण्या यांचा विचार करायला सुरुवात करतो. त्याचे दीर्घकालीन परिणाम होतात. त्यापैकी ‘दलित पॅंथर’ ही एक थरारक व झंझावाती चळवळ! १९७२ मध्ये ‘नवाकाळ’मध्ये छोटीशी बातमी आली. दलितांमधील महत्त्वाचे लेखक एकत्र येऊन एका क्लासरूममधील मीटिंगमध्ये रिपब्लिकन पक्षामध्ये असलेले नाकर्ते नेतृत्व आणि त्याला पर्याय कोणता, याचा विचार करण्यासाठी जमणार होते. राजा ढाले, ज. वि. पवार, नामदेव ढसाळ, अविनाश महातेकर, लतिफ खाटिक आदी साहित्यिक मंडळी, तसेच बाबूराव बागूल, भाई संगारे इत्यादी मंडळी चर्चेला बसणार होती. तिथे त्यावेळच्या रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाने दलितांच्या प्रश्नांवर घेतलेली बोटचेपी भूमिका आणि त्याच्याकडून कॉंग्रेस पक्षाचे केले जाणारे लांगुलचालन याविरोधात ठराव मंजूर करण्यात आला. राजा ढाले उत्तम साहित्यिक, कवी आणि नव्या पद्धतीने भित्तीपत्रिका चालवीत होता. ‘विद्रोह’ त्याचे नाव. ‘विद्रोह’मध्ये त्याच्या उत्तम हस्ताक्षरात असलेले लेख, कविता आणि  विचार करायला लावणारी धक्कादायक रेखाचित्रे नियमित वा अनियमितपणे प्रसिद्ध होत होती. नामदेव कवी म्हणून हळूहळू प्रसिद्ध व्हायला लागला होता. या सर्वाच्या खळबळीमागे त्यावेळेस संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात दलितांवर होणारे अत्याचार हे मुख्य कारण होते. त्याविरोधात आरपीआय, काँग्रेस किंवा कुठलाच विरोधी पक्ष ठोस पावले उचलण्यास तयार नव्हता. म्हणून जमलेल्या या बंडखोर मंडळींनी ‘ब्लॅक पॅंथर’च्या धर्तीवर गोऱ्यांच्या वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या चळवळीसारखी महाराष्ट्रात स्वसंरक्षणासाठी आणि ब्राह्मणवादाला शह देण्यासाठी संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तिचे नाव- ‘दलित पॅंथर.’ योगायोगाची गोष्ट म्हणजे पूर्वीसुद्धा शूद्रांचा काही अंशी ‘दलित’ असाच उल्लेख केला जात होता. पण यावेळी ‘दलित’ हा शब्द व्यापक अर्थाने वापरला गेला. संघटना स्थापन झाल्याची नोंद प्रत्येकाने घेतली आणि हीच दलित पॅंथरची पहिली झेप होती.
या संघटनेचे संस्थापक सामान्य परिस्थितीतून तसेच अतिशय गरीब वर्गातून आलेले, जगण्याची धडपड करणारे असे होते. सर्वामध्ये बंडखोरी ठासून होती. त्यांनी ती कृतीत उतरवून दाखवली. भारतीय स्वातंत्र्याला २५ वर्षे झाली तेव्हा १९७२ मध्ये राजा ढाले यांनी ‘साधना’ साप्ताहिकात एक दाहक लेख लिहिला. या देशात गरीबांना जगता येत नाही. किलवेनमनी (तामिळनाडू) येथे ४२ दलित, भूमिहीन शेतकऱ्यांची जमीनदारांकडून हत्या करण्यात आली. महाराष्ट्रात अनेक गावांत दलित स्त्रियांची नग्नावस्थेत धिंड काढण्यात आली. याबद्दलचा उद्रेक म्हणून खळबळजनक शीर्षकानिशी तो लेख प्रसिद्ध झाला होता. ज्या देशात दलित स्त्रियांची अब्रू झाकली जात नाही, तिथे तिरंग्याचा काय उपयोग, अशा अर्थाचा  तो लेख होता. ढालेंच्या त्या लेखामुळे दलित समाजात, विशेषत: तरुणवर्गात आणि पुरोगामी समाजातही अक्षरश: भूकंप झाला. नामदेव ढसाळ तेव्हा मुंबईतील रेड लाइट एरियात राहत होता. दलितांना नाइलाजाने  वेशीबाहेरच्या वस्त्यांमध्ये राहावे लागे. तसेच त्यालाही गोलपिठय़ाला राहावे लागत होते. वडील पेशाने खाटिक. दिवसाची तुटपुंजी मजुरी आणि मटण कापताना उरलेले मटण व खिमा घेऊन ते घरी यायचे. नामदेवचा ‘गोलपिठा’ असा जन्मला. बहुतेक दलित साहित्यिक, लेखक, कवी हे उपेक्षित,झोपडपट्टीत, माटुंगा लेबर कॅम्पपासून ते माझगाव खड्डा, सातरस्ता, बीडीडी चाळी इत्यादी वस्त्यांमध्ये राहत होते. २५ वर्षांच्या स्वातंत्र्याचा अभिमान बाळगणाऱ्यांना ढालेंची तिरंगा झेंडय़ाविषयीची ही प्रतिक्रिया धक्का देणारी होती. कोणते खरे स्वातंत्र्य, हा प्रश्न दलित पॅंथरने सर्वासमोर ठेवला आणि तिथून वेताळ पंचविशीची कथा सुरू झाली. या प्रश्नाला राजा विक्रमाला उत्तर देणे अशक्य होते, तसेच सामान्य माणसांना आजही त्याचे उत्तर मिळणे अशक्य आहे.
पॅंथरच्या झंझावाती काळातील पहिला मोर्चा आव्हानात्मक होता. वरळीतील राजा ढालेंच्या एका ख़ळबळजनक भाषणाला पाठिंबा देण्यासाठी व त्यांच्यावर पोलिसांनी केलेल्या पाशवी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी तो उग्र मोर्चा भोईवाडा-परळ भागात काढण्यात आला होता. त्यावेळी निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. हा मोर्चा अगदी वेगळ्या प्रकारे काढलेला होता. सभाबंदी आणि जमावबंदी लागू होती. त्याही परिस्थितीत पोलिसांचा निषेध करण्यासाठी सुमारे २० हजार दलित स्त्री-पुरुष आणि तरणीबांड पोरे प्रचंड संख्यने बिळातून उंदीर यावेत तसे चाळींच्या घळीतून तसेच दोन इमारतींच्या मधल्या जागेतून अचानक एकत्रित झाले. सणसणीत घोषणा देत संचारबंदी मोडून मोर्चा निघाला. मोर्चावर लाठीचार्ज झाला. मोर्चावरच्या या लाठय़ांचे वळ मात्र सर्व दलित समाजावर बसले. पुढे वरळीत अनेकदा काही उपद्रवी शक्तींनी मुद्दाम दंगली घडवून आणल्या. वरळीच्या चाळींत दोन जमातींमध्ये दंगल पेटवली गेली. त्यावेळी प्रथमच जाहीररीत्या लोकन्यायालय स्थापन केले गेले आणि अ‍ॅड्. निलोफर भागवत यांनी वरळीच्या दंगलीत ११ दलित गोळीबारात का मारले गेले, याबद्दलचा अहवाल तयार केला.
दलित पॅंथरने ‘दलित’ या शब्दाला व्यापक अर्थ दिला. त्याचे तरंग महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाच्या अनेक प्रांतांतील तळागाळातील समाजांत उठले. पॅंथर त्यावेळी आणि आजही तरुणांना नुसते आकर्षित करीत नाही, तर विचार करायला लावते. पॅंथरच्या मोर्चातील घोषणांमुळे मूळ प्रश्नाला हात घालण्याची एक सवय लागली. ‘तस्करी अर्थरचनेवरील दलित पॅंथरचा घणाघाती घाव’ ही अविनाश महातेकरांनी लिहिलेली पुस्तिका अत्यंत गाजली. पॅंथरने भुकेकंगाल दलितांना रस्त्यावर आवाज देऊन राहण्याचा हक्क व जगण्याचा हक्क झगडून मिळवण्यास आणि ताठ मानेने उभे राहण्यास शिकवले. १९६७ मध्ये सर्वत्र पडलेला दुष्काळ तसेच पंचवार्षिक योजना अपयशी ठरल्याने मोठय़ा प्रमाणात वाढलेली बेकारी,  लोकसभेने नेमलेल्या इलाया पेरुमल कमिटीचा दलितांवरील अत्याचारांबद्दलचा धक्कादायक रिपोर्ट आणि शासकीय उदासीनता यामुळे प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता. ७२ मध्ये महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला होता. ज्यामुळे असंतोषाचे रूपांतर उद्रेकात होऊ नये म्हणून जगातील पहिले सामाजिक औषध- रोजगार हमी योजना आणली गेली. गावा-गावांमध्ये दलितांचा रस्त्यावरची खडी फोडण्याच्या कामासाठी वापर करून घेतला गेला. ग्रामीण भागातून मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या मोठय़ा शहरांमध्ये दलितांचे लोंढे आले. त्यातल्या बहुतेकांनी पॅंथरचे झेंडे रोवून आपला निवारा तयार केला आणि जगण्याचा हक्क मिळवला. पॅंथर चळवळीचा हा फार मोठा परिणाम होता.
पॅंथरचा जाहीरनामा जसा गाजला, तशाच या लहान लहान चळवळीही गाजल्या. सिद्धार्थ होस्टेलच्या एका खोलीमध्ये दोन दिवस कोंडून घेऊन राजा ढाले, नामदेव व मी असा तिघांनी चर्चा करून तो जाहीरनामा तयार केला होता. पॅंथरच्या पहिल्याच उद्रेकाच्या काळात सर्व डाव्या संघटना आणि दिल्लीतून विचारणा करण्यात आली की, आता त्यांना नेमके पाहिजे आहे तरी काय? तेव्हा आपोआप उत्तर गेले की, दलित समाज सर्व ठिकाणी, अगदी सार्वजनिक क्षेत्रातल्या नोकऱ्यांमध्येसुद्धा एक टक्क्य़ापेक्षाही कमी आहे. दलितांसाठी राखीव जागा पाहिजेत आणि त्या निश्चित करायला पाहिजेत. या मागणीचा परिणाम होण्यास थोडा कालावधी गेला, परंतु शंभर बिंदू नामावलीचे रोस्टर आले. सुरुवातीला रोस्टरच्या जागा कशा भरायच्या, हा प्रश्न होता. प्रस्थापित उच्चवर्णीयांनी आरंभीच्या काळात रोस्टरचा चलाखपणे उपयोग करून दलितांना राखीव जागा मिळणार नाहीत अशी खबरदारी घेतली. नंतर थोडीफार परिस्थिती बदलली. आज जागोजागी खासगी क्षेत्रामुळे आणि सार्वजनिक क्षेत्र जवळजवळ नामशेष होत चालल्याने राखीव जागा अदृश्य झाल्या आहेत. मधल्या काळात नोकरशाहीने रोस्टरचे प्रमाण आणि जागा खाऊन टाकल्या. दलित समाजातून रोस्टरचा फायदा मिळवलेले खूप तरुण होते. परंतु राखीव जागांचा व्यापक उपयोग करण्याचे आणि अभ्यास करण्याचे धाडस त्यांनी दाखविले नाही.
दलित पॅंथर चळवळीचा केवळ दलित पुरुषांवरच नाही, तर महिलांवर आणि सभोवताली असलेल्या इतर जातीजमातींवरही प्रचंड प्रभाव पडला. दलित पॅंथरला केवळ तीन वर्षांचा काळ जाहीरपणे चळवळ करण्यासाठी मिळाला. नंतर आणीबाणी आली. आणीबाणीला पॅंथरनेच प्रथम विरोध केला. सर्वच समाजांतील युवक आणीबाणीच्या विरोधात एकवटले होते. पॅंथरच्या मोठय़ा नेतृत्वाच्या एका गटाने जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीस पाठिंबा दिला. आधीच गिरणी कामगारांच्या एका मोर्चातील सहभागामुळे हाडाचा कम्युनिस्ट कोण, यावरून वादंग निर्माण झाला होताच. तिथूनच पॅंथरचे नेतृत्व दुभंगण्यास सुरुवात झाली. वास्तविक समाजाला आपले प्रश्न बेधडकपणे सोडवणारे नेतृत्व, संघटना पाहिजे  होती. पण नंतरच्या काळात त्याला उतरती कळा लागली. दलित चळवळीमध्ये प्रामुख्याने गरीब वस्तीतील, चाळींमधील आणि झोपडपट्टय़ांतील नेतृत्व आपोआप तयार झाले होते. प्रत्येक शाखेला ‘छावणी’ हा पर्यायी शब्द दिला गेला होता. वस्त्यांमध्यल्या सभेत दहा माणसे असोत की दहा हजार असोत- पोटतिडकीची, बोधप्रद आणि समाजाने आंदोलनात सहभाग घ्यावा याकरता त्वेषाने भाषणे होत. भाषणाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा फुले, शाहूमहाराज आणि इतर सामाजिक क्रांतिकारकांना अभिवादन केले जाई.  सर्वानाच- अगदी डाव्या पक्षांनादेखील चकित करणारे, कोणताही पक्ष न फोडता आणि कुणाच्या नेतृत्वाखाली न जाता स्वयंभू पद्धतीने ही चळवळ उभी राहिली. या चळवळीवर त्यावेळची जागतिक परिस्थिती, पॅरिसमधील विद्यार्थ्यांचा उठाव, व्हिएतनामचे युद्ध, चीनमधील सांस्कृतिक क्रांती यांचा जसा परिणाम झाला होता, तसाच विद्रोही साहित्याचाही खोलवर परिणाम झालेला होता. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर महिला दलित पॅंथरमध्ये सामील झाल्या. याचे मुख्य कारण दलित स्त्रियांवर अत्याचार होत होते. हातात सायकलची चेन आणि काठय़ा घेऊन त्यांचे संरक्षण करण्यासाठी दलित तरुण उभे ठाकले. गावातील नरबळी अथवा स्त्रियांची नग्न धिंड काढणे अशा अमानुष अत्याचारांच्या विरोधात त्यांनी केवळ भाषणेच केली नाहीत, तर संबंधित गावांत जाऊन अत्याचार करणाऱ्या लोकांना त्यांनी जाबही विचारला. अत्याचारास याप्रकारे तात्काळ उत्तर देण्याचा हा प्रकार तेव्हाच्या जुन्या पद्धतीने मोर्चे काढणे आणि बंदच्या राजकारणापेक्षा वेगळा मार्ग दाखवणारा होता.
पुढे निवडणुकीच्या राजकारणात पॅंथरसारखी चळवळ संकुचित पावली. वरळीतील लोकसभेच्या पोटनिवडणुकीवर दलितांवरील अत्याचारांचा निषेध म्हणून २० हजार मतदारांनी बहिष्कार टाकण्याचा पहिला प्रयत्न झाला. आणि त्याचा राजकीय अर्थ सत्ताधाऱ्यांनी समजून घेतला. जरी पॅंथर संघटना पुढे सक्रीय स्वरूपात राहिली नाही तरी मराठवाडय़ातील दंगलीच्या वेळी दलितांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पॅंथर चळवळ तसेच सर्वच समाजांतील जागृत झालेल्या तरुणांनी आणीबाणीला केलेला प्रखर विरोध हा सगळा प्रकार सत्ताधाऱ्यांचा थरकाप उडवणारा होता. म्हणूनच मुद्दाम मराठवाडय़ातील दंगली घडवून आणल्या गेल्या. दलित वस्त्या बेचिराख केल्या गेल्या त्या याच कारणामुळे. यातूनच पुढे संपूर्ण महाराष्ट्रात भूमिहीनांचे सत्याग्रह आणि नामांतरासाठी झालेला लढा, महाराष्ट्रातील रस्त्यांवर नाकेबंदी करणारी चळवळ मोठय़ा प्रमाणात घडून आली. हा जसा काळाचा परिणाम होता, तसाच पॅंथरच्या विचारांचाही. ही आंदोलने शांततेच्या मार्गाने झाली. दलितांनी कधीही अतिरेक केला नाही किंवा ती अतिरेकी चळवळही नव्हती. म्हणूनच आजही सर्वसामान्यांना पॅंथरसारखा दरारा असणारी संघटना मनापासून हवी आहे. आजही दलित तरुण आखीव पद्धतीने लिहिलेल्या पॅंथरच्या जाहीरनाम्याकडे अभ्यासू वृत्तीने पाहतात. त्यातली धनदांडग्यांच्या वर्चस्ववादाला व ब्राह्मणवादाला आव्हान देणारी भूमिका त्यांना पटते. कारण ते वास्तव आहे. आजही दलित समाजातील बहुसंख्य लोक म्हणतात की, बाबासाहेब आंबेडकरांनी राखीव जागांची घटनात्मक तरतूद केली, पण त्याचा आटणारा प्रवाह पॅंथरने रोखला आणि त्याला रोस्टर स्वरूपात प्रत्यक्षरूप दिले. आम्ही हे केले, हे लोकांनी सांगितले, हेच या चळवळीचे यश म्हणता येईल.
मात्र, फक्त शहरी वस्तीमधून निर्माण होणारे नेतृत्व फार काळ टिकत नाही, हे सत्यही उमगले. डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वाच्या शैलीत हा महत्त्वाचा भाग होता. त्यांनी शहरी आणि गावकुसाबाहेरच्या, वेशीबाहेरच्या लोकांना उठवले, जागृत केले आणि संघर्ष करायला शिकवले. भारतीय स्वातंत्र्यानंतर सामान्य लोकांनी काय काय कमावले आणि काय गमावले, याचे प्रतिबिंब पॅंथर चळवळीत कमी-अधिक प्रमाणात दिसते. पॅंथरने दलितांना राजकीय लाचारी सोडून स्वाभिमान शिकवला. वास्तविक पाहता १९७० ते ८० च्या दशकात झालेल्या चळवळींमध्ये खूप मोठे धक्के बसले. त्यात अपयश आले तरी त्यावेळच्या नेतृत्वाला संपूर्ण दोष देता येत नाही. जहाल प्रश्नांविरुद्ध तत्काळ लढणे आवश्यक होते. जागतिक पातळीवर सर्व राष्ट्रांमध्ये हेच दिसते. पण त्यातून नेतृत्वाने धडे घेतले पाहिजेत. चिरेबंदी संघटना आणि लवचिक, सर्वव्यापी विचारांची बैठक ही आजच्या काळाची नितांत गरज आहे. सरतशेवटी जेव्हा मूर्ख म्हातारा डोंगर हलवतो आणि खणतो, तेव्हा डोंगर वाढत नाही, पण समाज मात्र हलतो.

१९७२ ला स्थापन झालेल्या दलित पँथरची बीजं त्या आधीच्या १६ वर्षांतल्या घडामोडींत होती. त्यामुळं त्या १६ वर्षांत, म्हणजे १९५६ पासून १९७२ पर्यंत नेमक्या काय घटना घडल्या, यावर नजर टाकल्यास दलित समाजातल्या काही तरुणांना पँथरसारख्या संघटनेच्या स्थापनेची गरज का वाटली असावी हे लक्षात येतं. त्यामुळं तिथूनच आरंभ करायला हवा. ६ डिसेंबर १९५६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबंडेकर यांचं निधन झालं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर १० महिन्यांनी, म्हणजे ३ ऑक्टोबर १९५७ ला बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या 'शेड्युल कास्ट फेडरेशन' नागपूरच्या दीक्षा भूमीवर बरखास्त करण्यात आलं आणि रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली. या नव्या पक्षाचे अध्यक्ष झाले बॅ. एन. शिवराज, तर भैय्यासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड, दादासाहेब रूपवते, अॅड. बी. सी. कांबळे इत्यादी बाबासाहेबांसोबत काम केलेली मंडळी यात होती. पण डॉ. आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला रिपब्लिकन पक्ष एका वर्षातच फुटला. ३ ऑक्टोबर १९५८ ला या पक्षाचे दोन गट पडले.

रिपब्लिकन पक्षाची पहिली फूट
रिपब्लिकन पक्षाची ध्येय-धोरणं तयार न झाल्याची खंत व्यक्त करत वर्षभरातच अॅड. बी. सी. कांबळे यांच्यासह दादासाहेब रुपवते आणि इतर काही नेते बाहेर पडले. उरले ते दादासाहेब गायकवाड आणि आणखी काही नेते. कांबळे आणि गायकवाड अशा दोन गटात वर्षभरातच रिपब्लिकन पक्षाचे आणखी तुकडे झाले. पुढे दोनाचे चार, चाराचे पाच होत होत रिपब्लिकन पक्ष विविध गटांमध्ये फुटत गेला. रिपब्लिकन पक्षाचे आजही अनेक गट-तट दिसतात, त्याची सुरुवात इथून झाली. रिपब्लिकन पक्षातलं आर. डी. भंडारेंसारखे नेते १९६५ च्या सुमारास काँग्रेसवासी झाले. त्यानंतर दादासाहेब रुपवतेही काँग्रेसमध्ये गेले. असं करत कुणी कम्युनिस्टांच्याजवळ, तर कुणी काँग्रेसच्याजवळ रिपब्लिकन पक्षाचे नेते जात राहिले आणि पर्यायानं रिपब्लिकन पक्ष खिळखिळा होऊ लागला. या सगळ्या घटनांनी दलित समाजाची घोर निराशा होत गेली. त्यात स्वातंत्र्यानंतरचं हे पहिलं दशक होतं. स्वतंत्र भारताची नवी यंत्रणा तळागाळात आता कुठे पोहोचू पाहत होती, त्यात दीन-दलितांपर्यंत पोहोचण्यास बराच अवधी लागत होता. किंबहुना, पोहोचतच नव्हती किंवा पोहोचू दिली जात नव्हती. त्याचवेळी, दलितांवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत होत्या. त्यामुळं बाबासाहेबांच्या अनुपस्थितीत पोरका झाल्याची भावना दलित समाजात निर्माण झाली होती. या सर्व निराशाजनक घटनांसह ७० चं दशक उजाडलं. या दशकानं दलित समाजाला वेठीस धरलं होतं. त्यातच मागासवर्गीयांसाठी नेमलेला एलिया पेरुमल समितीचा अहवाल संसदेत सादर झाला.

एलिया पेरुमल यांचा कानठळ्या बसवणारा अहवाल
दलित अत्याचारांवरून केंद्र सरकारला धारेवर धरण्यात आल्यानंतर १९६५ साली या विषयावर अभ्यासासाठी दाक्षिणात्य खासदार एलिया पेरुमल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली. या समितीनं ३० जानेवारी १९७० रोजी आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला. मात्र, तो इतका स्फोटक होता की, तो संसदेच्या पटलावर ठेवण्यास सरकार साशंक होता.
अखेर विरोधकांच्या पाठपुराव्यानंतर एलिया पेरुमल समितीचा अहवाल १० एप्रिल १९७० रोजी संसदेच्या पटलावर ठेवण्यात आला. एखाद्या बॉम्बस्फोटाप्रमाणे कानठळ्या बसाव्यात, कानाचे पडदे फाटले जावेत, तसं या अहवालामुळं जनमानसात संताप व्यक्त झाला. त्यातही विशेषत: दलित समाजात! असं काय होतं, या अहवालात, तर दलितांवर होणाऱ्या अत्याचारांच्या क्रूर पद्धती आणि त्यांची तळपायाची आग मस्तकात जावी अशी आकडेवारी समोर आली होती. दलित स्त्रियांची नग्न धिंड काढणं, पाणवठे बाटवले म्हणून बेदम मारहाण करणं, पाटलासमोर चांगले कपडे घालून आला म्हणून चाबकानं मारणं, बलत्कार, गुप्तांगांना चटके, दलितांच्या पाणवठ्यांवर विष्ठा टाकणं असे नाना प्रकार या एलिया पेरुमल समितीच्या अहवालातून समोर आलं होतं. हे एकीकडं होत असताना, त्याचवेळी महाराष्ट्रात दलित अत्याचाराची एकामागोमाग एक प्रकरणं समोर येत गेली. १९७० च्या आसपास महाराष्ट्रात घडलेल्या या काही घटनांचा उल्लेख नामदेव ढसाळ त्यांच्या 'दलित पँथर : एक संघर्ष' या त्यांच्या पुस्तकात केलाय. दलित तरुणांमध्ये आग पेरणाऱ्या त्या घटनांमधली एक घटना होती पुण्यातली. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात बावडा गावी अस्पृश्यांवर बहिष्कार टाकण्यात आला होता. सरकार यातल्या गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप होत होता. कारण ज्या शहाजीराव पाटलांनी अस्पृश्यांवर बहिष्कार टाकला होता, त्यांचे भाऊ शंकरराव बाजीराव पाटील हे महाराष्ट्र सरकारामध्ये राज्यमंत्री होते. राज्यमंत्री शंकरराव पाटलांनी राजीनामा द्या अशी मागणी होत असतानाच, परभणीतल्या ब्राह्मणगावात १४ मे १९७२ ला बौद्धवाड्यातल्या दोन स्त्रियांना नग्न करून गुप्तांगावर बाभळीच्या काट्याचे फटके मारत गावभर धिंड काढण्यात आली. या स्त्रियांचा गुन्हा असा होता की, सोपान दाजीबा नामक व्यक्तीच्या विहिरीवर पाणी पिणं, पुढं ब्राह्मणगावची घटना असो वा गवई बंधूंचं डोळे काढण्याची घटना असो. एकामागोमाग एक घटना महाराष्ट्राभर घडत होत्या. या सगळ्या घटनांमुळं दलित समाजातले तरुण अस्वस्थ होत होता. आणि या सगळ्याची परिणिती झाली संतप्त दलित तरुणांच्या जळजळीत प्रतिक्रियेत! अर्थातच ती प्रतिक्रिया होती ते म्हणजे ....दलित पँथर!

दलित युवक आघाडी ते दलित पँथर
सत्तरच्या दशकात वडाळ्याच्या सिद्धार्थ विहार वसतिगृहात दलित युवक आघाडीचा जन्म झाला. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचंच हे वसतिगृह होतं. वसतिगृहे ही चळवळीची केंद्रेच असतात. विशेषत: बाबासाहेबांच्या चळवळीची वैचारिक धुरा वाहून नेण्याचं काम ह्या वसतिगृहानं केलंय. हे म्हणणं खरंही मानायला हवं. कारण दलित पँथरची बीजं या वसतिगृहात जन्मलेल्या दलित युवक आघाडीतच सापडतात. कारण दलित पँथरमध्ये पुढे सक्रिय झालेले सर्व कार्यकर्ते आधी कमी-अधिक प्रमाणात दलित युवक आघाडीशी संबंधितच होते. तर या दलित युवक आघाडीनं पुण्याल्या बावडा बहिष्काराबाबत चर्चा झाली. सिद्धार्थ विहारमध्ये राजा ढाले, भगवान झरेकर, वसंत कांबळे, लतिफ खाटीक, काशिनाथ तुतारी, अनंत बच्छाव वगैरे लोक होते, त्यांनी युवक आघाडी काढली. तिनं मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा आयोजित केला. मुख्यमंत्र्यांना निवेदन वगैरे दिल्यावर त्यांनी सांगितलं की, तिथे बावडा इथं जाऊन आम्हाला रिपोर्ट द्या. त्यावर ज. वि. पवार यांचं म्हणणं होतं की, आम्ही तिथं जाऊन रिपोर्ट द्यायचा, तर मग सरकार कशासाठी आहे? त्यांच्याकडं पोलीसयंत्रणेसह. सगळी यंत्रणा आहे. त्यामुळं सरकारनंच हा रिपोर्ट बनवायला हवा. या बैठकीतून नामदेव ढसाळ आणि ज. वि. पवार बाहेर पडले. या दोघांनीही दलित पँथरच्या स्थापनेच्या कल्पनेचा विचार सारखाच मांडला आहे. सिद्धार्थ विहारमधल्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर अन्याय-अत्याचार करणाऱ्यांवर जरब बसवणारी अंडरग्राऊंड चळवळ असावी असा विचार झाला. नामदेव ढसाळ आणि ज. वि. पवार हे कामाठीपुऱ्यात जवळ-जवळ राहत. ज. वि. पवार बँकेत कामाला होते. एकदा कार्यालयात जाताना नामदेव ढसाळ सोबत होते आणि त्यावेळी रस्त्यातच दक्षिण मुंबईतल्या अलंकार सिनेमा ते ऑपेरा हाऊस दरम्यान दलित पँथरची कल्पना सूचली.
ज. वि. पवार हे त्यांच्या 'आंबडकरोत्तर आंबडकरी चळवळ'च्या चौथ्या खंडात ही माहिती दिली आहे. या माहितीबाबत अर्जुन डांगळेंचे आक्षेप आहेत आणि त्यांनी 'दलित पँथर : अधोरेखित सत्य' या त्यांच्या पुस्तकात त्याबाबत विस्तृतपणे बाजू मांडलीय.

'पँथर'च का?
'दलित पँथर' म्हटल्यावर या शब्दांतच एक आक्रमकता जाणवते. त्यावेळची स्थिती आणि दलित पँथरची रणनीती पाहता, तिला तसं रूपही प्राप्त झालं होतं. मात्र, आजही दलित समाजात पँथरविषयी आपुलकीची भावना दिसतेय, पण दलित पँथर हे शब्द कुणी टिपलं, ज्याला इंग्रजीत कॉईन केलं म्हणतो. त्याविषयीही सुद्धा वेगवेगळे दावे आढळतात. राजा ढालेंचं कायम असं म्हणणं होतं की, अमेरिकेतल्या ब्लॅक पँथरचं वृत्त असलेले टाइम्सचे अंक मी आणत होतो. त्यावर चर्चा होत होती. त्यातून हे नाव पुढं आलं. मात्र, नामदेव ढसाळांनी हा दावा अमान्य केला होता. दलित पँथरमध्ये पुढे सक्रीय राहिलेले प्रल्हाद चेंदवणकर आणखी वेगळी मांडणी करतात. शरणकुमार लिंबाळे यांच्या 'दलित पँथर' पुस्तकात यासंबंधी चेंदवणकरांचा लेख समाविष्ट आहे. चेंदवणकर लिहितात, "१९७१ साली महाडमध्ये बौद्ध साहित्य संमेलन झालं होतं. बाबूराव बागूल संमेलनाध्यक्ष होते. इथं एका परिसंवादात डॉ. म. ना. वानखेडे यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीय साहित्याबद्धल माहिती दिली. ही माहिती अनेकांसाठी नवीन होती. अमेरिकेतला कृष्णवर्णीय आणि भारतातला दलित यांची तुलना करून डॉ. वानखेडेंनी कृष्णवर्णीय माणूस आता कसा जागृत झालाय, यावर भाष्य केलं होतं. सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी संतप्त कृष्णवर्णीय तरुणांची 'ब्लॅक पँथर' ही लढाऊ संघटना उभारलीय. दलित साहित्यिकांना कदाचित या वाटेनं जावं लागेल, असंही डॉ. वानखेडेंनी त्यावेळी सांगितल्याचं चेंदवणकर नोंदवतात. अर्जुन डांगळे लिहितात की, 'दलित पँथर' हे नाव त्यावेळी इतकं चर्चेत होतं की, ते नेमकं कधी आणि कुणाला सुचलं हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नाही. समजा दलित पँथर नामदेव ढसाळ किंवा ज. वि. पवार यांनी सूचवला असेल तरी त्यावर त्या दोघांचाही मालकी हक्क नव्हता. एका समुहभावनेचा त्यांच्याकडून झालेला तो उच्चार होता. सांघिक सहमती घोषणेला ते एक निमित्तमात्र होतं.

'ब्लॅक पँथर' काय होती?
अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांची 'टिट फॉर टॅट' ही जशास तसे भूमिकेची 'ब्लॅक पँथर' नावाची संघटना होती. ह्यू. पी. न्यूटन, बॉबी शील, लिराय जोन्स, अँजेला डेव्हिस इत्यादी क्रांतिकारक या संघटनेचे लढवय्ये होते. ऑकलँड भागात ही चळवळ सुरुवातीला वाढली. सतत गोऱ्या शिपायांचा, लष्कराचा त्रास, पोलिसांच्या हल्ल्यात मारलं जाणं इत्यादींचा मुकाबला करण्यासाठी 'ब्लॅक पँथर'ची स्थापना करण्यात आली होती. ते शस्त्राचा वापर करत. विघटनवादाचे आरोप ठेवून 'ब्लॅक पँथर'च्या अनेक कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबलं गेलं. फासावर लटकवलं गेलं. साम्य असं की, ब्लॅक पँथरप्रमाणेच दलित पँथरही अल्पायुषी ठरली. पण सामाजिक इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी आपली नोंद केली, हे नमूद करायला हवं. पँथरच्या पहिल्या मेळाव्यानं दलित पँथरची महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला दखल घ्यायला भाग पडलं.

पँथरचा मेळावा आणि 'काळा स्वातंत्र्य दिन'
९ जुलै १९७२ रोजी मुंबईतल्या कामाठीपुऱ्यात दलित पँथरचा पहिला जाहीर मेळावा झाला. ज.वि.पवार हे याच भागात राहायचे. त्यांनीच कामगार कल्याण केंद्राचा हॉल या पहिल्या मेळाव्यासाठी उपलब्ध करून दिला होता. पुढं या मेळाव्याला उपस्थित असणारे सारे नेते दलित पँथरचे संस्थापक मानले गेले. या मेळाव्यातच १५ ऑगस्ट १९७२ चा रौप्यमहोत्सवी स्वातंत्र्यदिन 'काळा स्वातंत्र्य दिन' म्हणून साजरा करावा, अशी भूमिका जाहीर करण्यात आली. यासाठी दलित वस्त्यांमधून सभा, बैठका सुरू झाल्या. स्वातंत्र्यदिनी काळे झेंडे, फिती बांधण्याची आवाहनं करण्यात आली. दलित पँथर 'काळा स्वातंत्र्यदिन' साजरा करणार असल्याची बातमी पुण्यात पोहोचली आणि 'साधना' साप्ताहिकाचे पत्रकार डॉ. अनिल अवचट मुंबईत सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये आले. यासंबंधी लेखन देण्याची मागणी अवचटांनी केली. त्यानुसार दलित पँथरमधल्या अनेकांनी तसं लेखन दिलं. तेही कुठेही काटछाट न करण्याच्या अटीवर. यातल्या राजा ढाले यांचा 'काळा स्वातंत्र्य दिन' हा लेख प्रचंड गाजला तो दलितांमध्ये स्फूर्तीच्या अंगानं आणि विरोधकांमध्ये टीकेच्या अंगानं! दलित महिलांवर अत्याचार झाल्यावर पैसे देऊन सुटका होत असे, याविरोधात राजा ढाले यांनी आपल्या लेखातून प्रहार केला होता. या लेखावर दलित समाजातून स्वागत, तर अनेकांनी टीका केली. लेखिका दुर्गाबाई भागवतांनीही या लेखावर टीका केली होती. त्यामुळं बराच विरोध होऊ लागला. 'साधना'चे तत्कालीन संपादक यदुनाथ थत्ते यांना राजीनामा द्यावा लागला. ढालेंचा मजकूर चुकून छापल्याचं म्हटलं गेलं. या लेखानंतर राजा ढाले हे नाव प्रकर्षानं पुढे आलं आणि ते प्रसिद्ध झालं. तर काळा स्वातंत्र्यदिनासाठी १४ ऑगस्टलाच मुंबईतील आझाद मैदानात दलित पँथरसह १०-११ पुरोगामी संघटना एकत्र जमल्या होत्या. दलित पँथरचेच कार्यकर्ते जास्त होते. कारण त्याआधीच्या घडामोडींनी आणि राजा ढालेंच्या लेखानं दलित पँथरविषयीचं कुतुहल कमालीचं वाढवलं होतं. त्यात नामदेव ढसाळांचं सडेतोड भाषण एव्हाना सर्वांपर्यंत पोहोचलं होतं. १४ ऑगस्टला रात्री १२ वाजता आझाद मैदानातून विधान भवनाच्या दिशेनं मोर्चा निघाला. काळ्या घोड्याजवळ आल्यानंतर तिथं पर्यायी विधिमंडळ भरवण्यात आलं आणि दलित अत्याचारांना पायबंद घालू न शकणाऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला. या पर्यायी अधिवेशनात हुसैन दलवाई विधानसभा सदस्य बनले होते. पुढे ते वास्तवातही विधानसभेचे सदस्य बनले आणि राज्यसभेपर्यंत पोहोचले. या कार्यक्रमाचा वृत्तांत भाऊ तोरसेकरांनी 'मराठा' दैनिकातल्या त्यांच्या 'युवक जगत'मध्ये सविस्तर लिहिलं होतं. यानंतर मधल्या काळात दलित पँथरनं बरीच आंदोलनं केली, अत्याचाराच्या घटना घडल्यावर तिथं सर्वांत आधी पोहोचण्याचा प्रयत्न केला, पीडित कुटुबांना आधार देण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे, तर इतरही अनेक गोष्टी दलित पँथरच्या पाठपुराव्यामुळं झाल्या. त्यातलं एक महत्त्वाचं म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचं साहित्य प्रकाशित करण्यासाठी सरकारला तयार करणं. बेकारी, बेरोजगारीबाबतही दलित पँथरनं आवाज उठवला. शंकराचार्यांवर जोडा फेकणं असो, वा इंदिरा गांधींविरोधात निदर्शनं असो, अशा बऱ्याच गोष्टी पँथरनं केल्या. दलित पँथरच्या कार्यकर्त्यांची प्रखर भाषणं आणि आक्रमक कृतींमुळं सामाजिक वातावरण ढवळून निघालं होतं. दलित पँथरच्या वाटचालीतला महत्त्वाचा टप्पा म्हणजे मध्य मुंबईतीतली पोटनिवडणूक होय.

'गावात बहिष्कार टाकणाऱ्यांवर मुंबईत बहिष्कार'
आर. डी. भंडारे मध्य मुंबईतून काँग्रेसचे खासदार होते. एकेकाळी ते रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष होते, किंबहुना संस्थापक सदस्य होते. मात्र, १९६६ साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर आर. डी. भंडारेंना १९७४ रोजी काँग्रेसनं बिहारचं राज्यपाल केलं. त्यामुळं मध्य मुंबईत पोटनिवडणूक जाहीर झाली. १३ जानेवारी १९७४ रोजी पोटनिवडणूक होणार होती.काँग्रेसकडून बॅ. रामराव आदिक, भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून कॉ. अमृत डांगेंच्या कन्या कॉ. रोझा देशपांडे, हिंदुसभेकडून विक्रम सावरकर आणि जनसंघाकडून डॉ. वसंतकुमार पंडित उभे होते. मात्र, मुख्य लढत होती आदिक वि. देशपांडे यांच्यात, म्हणजे काँग्रेस विरुद्ध कम्युनिस्ट. काँग्रेसनं रामराव आदिकांना तिकीट देण्याचं एक कारण हेही होतं की, ते महात्मा फुल्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे जवळपास दहा वर्षे अध्यक्ष होते. मध्य मुंबईत दलित मतं परिणामकारक होती. त्यामुळं आदिकांना उमेदवारी देण्यात आल्याची त्यावेळी चर्चा झाली. काँग्रेसच्या रामराव आदिकांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा तर होताच, सोबत शिवसेनेचाही पाठिंबा होता. शिवाजी पार्कात शिवसेना स्थापनेच्या सभेला रामराव आदिक व्यासपीठावर उपस्थित होते, हे लक्षात घेतल्यावर शिवसेनेचा पाठिंबा समजण्यास सोपं जातं. मात्र, दलित समाजात एव्हाना लोकप्रिय ठरलेल्या दलित पँथरच्या भूमिकेची सगळ्यांनाच उत्सुकता होती. कारण आधी नोंदवल्याप्रमाणे या मतदारसंघात दलित मतांवर बराचसा निकाल अवलंबून होता. ५ जानेवारी १९७४ रोजी दलित पँथरनं वरळीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात जाहीर सभा ठेवली. याच सभेत दलित पँथरनं वाढत्या जातीय अन्यायाविरोधात आणि सरकारच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ निवडणुकीवर बहिष्काराची भूमिका घेतली. 'गावांमध्ये आमच्यावर बहिष्कार टाकणाऱ्यांवर मुंबईत बहिष्कार टाकतोय' अशी भूमिका दलित पँथरनं यावेळी जाहीर केली.

वरळीची दंगल आणि दोन पँथरचा मृत्यू
मध्य मुंबईच्या पोटनिवडणुकीवर बहिष्काराची घोषणा दलित पँथरनं केल्यानंतर हे जवळपास स्पष्ट झालं की, काँग्रेसला हक्काची 'दलित मतं' मिळणार नव्हती आणि त्यांना पराभव समोर दिसू लागला होता. याच रागातून या सभेत नामदेव ढसाळांचं भाषण सुरू असताना मैदानाशेजारील बीडीडी चाळींच्या गच्चीवरून शिवसैनिकांनी दगडफेड सुरू केली. मात्र, त्याही स्थितीत नामदेव ढसाळांनी भाषण सुरू ठेवलं होतं, नंतर राजा ढाले भाषणाला उभे राहिले. दगडफेक करणाऱ्या गुंडांना आव्हान देत भाषण सुरू केलं की, हिंमत असेल तर समोर येऊन हल्ला करा. ढालेंच्या भाषणानं वातावरण तापलं. शिवसैनिकांनी सभेवर दगडफेक करून सभा उधळली आणि पोलिसांनी लाठीमार सुरू केला. राज ढाले यांनाही यात मारहाण करण्यात आली. याचे पडसाद वरळी, नायगाव, भायखळा, दादर, परळ, डिलाईल रोड इथल्या दलित वस्त्यांमध्ये उमटले. या दरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चर्मकार समाजातील रमेश देवरुखकर या तरुण पँथरचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ चार-पाच दिवसांनीच म्हणजे १० जानेवारी १९७४ रोजी नायगाव, दादरमधून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा परळ रस्त्यावरून जात असताना, मोर्चावरही दगडफेक झाली आणि यात दुसरा पँथर मृत्युमुखी पडला, तो म्हणजे, भागवत जाधव. भागवत जाधव यांच्या डोक्यावर दगडी पाटा टाकण्यात आला. त्यांचा जागीच श्वास गेला. ढसाळांसह भाई संगारे, प्रल्हाद चेंदवणकर, लतिफ खाटीक, ज. वि. पवार यांनाही पोलिसांनी अटक केली. पुढे नियोजितपणे १३ जानेवारी १९७४ रोजी निवडणूक झाली आणि त्यात दलित पँथरच्या बहिष्काराचा परिणाम दिसून आला. काँग्रेसच्या बॅ. रामराव आदिकांचा पराभव झाला आणि भाकपच्या कॉ. रोझा देशपांडे विजयी झाल्या

रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य आणि दलित पँथरला धक्का
दलित पँथरच्या फुटीकडं वळताना, मध्य मुंबईच्या पोटनिवडणुकीनंतरची एक घडामोड महत्त्वाची आहे. कॉ. रोझा देशपांडेंच्या विजयाचा हादरा जसा काँग्रेसला बसला, तसा रिपब्लिकन पक्षातल्या गटा-तटातल्या नेत्यांनाही बसला. कारण दलित पँथरची निवडणुकीच्या रिंगणातली ताकद त्यांना कळून चुकली होती. मग पुढे काँग्रेसच्या पुढाकारानं रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झालं. २६ जानेवारी १९७४ रोजी अशा ऐक्याची घोषणा चैत्यभूमीवर करण्यात आली. २० फेब्रुवारी १९७४ रोजी एकसंध रिपब्लिकन पक्षाचा मोठा मोर्चाही मुंबईत काढण्यात आला. रिपब्लिकन हा आंबेडकरी जनतेचा कायमच जिव्हाळ्याचा विषय असल्यानं त्यांनी या ऐक्याचं स्वागत उत्साहानं केलं. परिणामी दलित पँथरच्या चळवळीला हा मोठा धक्का होता. कारण काँग्रेसप्रणित हे ऐक्य दलित पँथरला मोठा शह होता.

आणि पँथर फुटली!
दलित पँथर फुटीचं एक प्रमुख कारण सांगितलं जातं, नामदेव ढसाळ प्रणित जाहीरनामा. या जाहीरनाम्यातून नामदेव ढसाळ हे कम्युनिस्ट विचारांकडं दलित पँथरला झुकवण्याचा प्रयत्न करतायेत, असा आरोप करण्यात आला होता. राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांच्यात हा वाद प्रामुख्यानं झालं.'जाहीरनामा की नामा जाहीर?' असा नवाकाळ वृत्तपत्रात लेख लिहून राजा ढालेंनी नामदेव ढसाळांविरोधात उघड आघाडीच उघडल्याचं अर्जुन डांगळे लिहितात. त्यातूनच पुढे राजा ढालेंनी १९७४ साली नागपूरच्या मेळाव्यात नामदेव ढसाळांना दलित पँथरमधून काढण्याची घोषणा केली. मात्र, यावर नामदेव ढसाळांची बाजू अशी होती की, "माझा जो जाहीरनामा आहे, तो इकॉनॉमिकली, सोशली, पॉलिटिकली ते सर्व तीनही स्तरांवर दलित अशी आंबेडकरांची स्वतंत्र मजूर पक्षाची कॉन्सेप्ट होती किंवा रिपब्लिकन पक्षानंतर जी त्यांच्या डोक्यात होती, तिला पूरक जाणारा आहे. राजा ढालेंनी ज्या दिवशी सांगितलं की, बुद्धिस्ट हाच पँथर त्या दिवशीच ही संघटना फंडामेंटालिस्ट झाली. खुद्द बुद्धाचा विचार असा नाही. त्याच्या काळात साठ-सत्तर संप्रदाय होते. त्यांच्यात चर्चा चालत. 'दलित पँथर फुटीवर अर्जुन डांगळेंचं विश्लेषण असं की, नामदेव ढसाळ यांच्यावर जसं डाव्यातल्या कम्युनिस्टांचं गारूड होतं, तसंच राजा ढाले यांच्यावर समाजवाद्यांचं होतं. ते प्रा. मे. पुं. रेगेंच्या सल्ल्यानुसार वागत. इथंच दलित पँथरच्या फुटीचं कारण असल्याचं डांगळे सांगतात. नंतर १९७७ साली दलित पँथरच्या बरखास्तीची घोषणा झाली आणि राजा ढालेंनी मासमूव्हमेंट नावाची संघटना सुरू केली. दुसरीकडं, नामदेव ढसाळ मात्र दलित पँथरच्या बॅनरखालीच काही काळ वावरत राहिले. त्यानंतर १० एप्रिल १९७७ रोजी औरंगाबादमध्ये पँथरचं पुनरुज्जीवन करण्यात आलं, ते 'भारतीय दलित पँथर' नावानं! यात प्रा. अरुण कांबळे, रामदास आठवले, गंगाधर गाडे, एस .एम. प्रधान, दयानंद म्हस्के इत्यादी नेते होते. या नव्या 'भारतीय दलित पँथर'तर्फे १२ ऑगस्ट १९७७ रोजी नामांतराच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या मोर्चानं नवे 'पँथर' समोर आणले. त्यातले रामदास आठवले आज केंद्रात मंत्री आहेत. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रश्नात भारतीय दलित पँथरनं महत्वाची भूमिका बजावली होती. मूळ दलित पँथर उण्या-पुऱ्या तीन-साडेतीन वर्षांचीच होती. शेवटचे काही महिने अंतर्गत वादात आणि मग बरखास्ती. पण या तीन-साडेतीन वर्षांनी दलित समाजाला आत्मसन्मानासाठी लढण्याची प्रेरणा दिली. आजही दलित पँथरचं नाव काढल्यावर कुणाही बंडखोर तरुण-तरुणीच्या अंगावर लढण्याच्या उर्मीचे शहारे उभे राहतात. दलित पँथर टिकायला हवी होती, म्हणणारे बरेच जण आजही दिसतात. मात्र, पँथर फुटली कशी, याचं चिंतन होत नाही. कुणीतरी म्हटलंय ना, यशाला हजारो बाप असतात, अपयश पोरकं असतं, तसं आहे हे.! पण मत-मतांतरे कितीही असली, तरी पँथर बनून दलित अत्याचारांविरोधात उभ्या केलेल्या लढ्याला विसरता येत नाही, हेही तितकंच खरं!

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...