Wednesday, 31 July 2019

लीन कश्मीर....विलीन कश्मीर...!

*लीन कश्मीर... विलीन कश्मीर...!*
"भाजपेयीं सरकारनं घेतलेले मोठे निर्णय हे चुकीचे होते बरोबर हे समजायला काही काळ जावा लागतो. वरवर पाहता हे निर्णय अतिशय लोकप्रिय, बोल्ड जरी वाटत असलं तरी कालांतरानं त्यातला फोलपणा आणि त्याचे साईडईफेक्ट्स दिसू लागतात. नोटबंदी असो वा जीएसटी हे दोन्ही मोठे निर्णय घेतले गेले तेव्हाही असाच मोदींवर कौतुकाचा वर्षाव झाला होता. परंतु नोटबंदी फसली आणि काही काळानं तो एक मुर्खपणाचा निर्णय होता हे सिद्ध झालं. मोदींनी मात्र कधी त्यावर नंतर ब्र सुद्धा काढला नाही. पुढे काळवेळ न पाहता आणलेल्या जीएसटीनं तर नोटबंदीनं बिघडलेल्या अर्थव्यवस्थेला आणखीच रसातळाला नेलं. देशात कृत्रिम मंदी निर्माण झालीय. आता मोदी सरकारनं कश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा  शूरपणाचा आणि देशहिताचा वाटत असला तरी आगामी काळात त्याची नोटबंदीसारखीच गत होऊ नये एवढीच अपेक्षा! काळाच्या पोटात काय गुपित दडलंय हे हळुहळु कळेलंच!"
-----------------------------------------------
*"मी* झोपायला जातोय, 
उद्या सकाळी तुला श्रीनगरमध्ये
भारतीय सेनेच्या विमानांचा आवाज
ऐकू आला तर मला 
झोपेत असतानाच गोळ्या घाल...!"
हे शब्द होते कश्मीर संस्थानाचे राजे हरिसिंहाचे! 
२६ ऑक्टोबर १९४७ च्या रात्री त्यांनी आपल्या दिवाणांना अशी सूचना दिली होती. त्या दिवशी त्यांनी त्याचं कश्मीर संस्थान भारतात विलीनीकरण करण्याच्या दस्तऐवजावर सह्या केल्या होत्या... त्या घटनेला ७२ वर्षे उलटलीत, त्यानंतर आज कश्मीर संपूर्णपणे भारतीय संघराज्यात प्रत्यक्ष विलीन झालंय. आता सरकारचं आणि प्रत्येक भारतीयांचं लक्ष्य आणि धेय्य असेल ते तिथं शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची त्याचबरोबर पाकिस्ताननं कब्जात घेतलेला कश्मीरचा भूभाग मुक्त करण्याचा, भारतात विलीन करण्याचा...! भारतात विस्थापित झालेल्यांनी कधीही न पाहिलेलं हे एक दु:स्वप्न होतं. ज्यांच्यासोबत शेकडो वर्षे आपण राहिलो होतो त्यांच्यापासून दुरावले होतो. जी भूमी आपली मातृभूमी समजत होतो ती दुसऱ्याकडे सोपवायची होती. हा एक खूप मोठा भावनात्मक हल्ला होता. त्याकाळी कश्मीर तटस्थ होतं. पण पाकिस्ताननं आक्रमण केल्यानंतर राजा हरिसिंग यांनी भारतात ते विलीन करण्याचा मनसुबा जाहीर केला. त्यानंतर जे काही घडलं ते सर्वश्रुत आहे. तेव्हापासून भारतातल्या प्रत्येकाला असं वाटत होतं की, कश्मीरनं  इतर राज्यांप्रमाणे भारताशी मिळून-मिसळून जावं आणि पाकिस्ताननं कब्जात घेतलेला भाग आपण स्वतंत्र करून आपल्यात सामावून घ्यावा. केंद्रातल्या आताच्या भाजपेयीं सरकारनं कश्मीरला अनेक बाबतीत भारतापासून अलग राखणारं कलम ३७० रद्द करणारं विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत करून अभूतपूर्व अशी शूरवीरता दाखवलीय!

*अखंड कश्मीर, खंड...खंड...विरोधक*
हिंदुस्थानात श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो. चातुर्मासातला हा उत्सवी काळ तो सुरू होण्यापूर्वीच भारतीय जनतेनं आनंद, उत्साह याची अनुभूती अनुभवली. भाजपेयीं सरकारनं जम्मू-कश्मीरसंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं. जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारे संविधानातलं कलम ३७० रद्द करुन टाकलं! या निर्णयानं अखंड भारतात ज्या लोकोपयोगी सोयीसुविधा, नियम, कायदे आहेत त्याचा लाभ त्यांना मिळत नव्हता. तो आता मिळेल. दुसऱ्या एका क्रांतिकारी निर्णयानं जम्मू-कश्मीर राज्य विखंडीत केलं गेलंय. ज्यात जम्मू-कश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश करण्यात आलेत. जम्मू-कश्मीरमध्ये भारतीय घटनेनुसार निवडणुका होतील आणि विधानसभा अस्तित्वात येईल. मात्र लडाखमध्ये विधानसभा असणार नाही; ते अंदमान-निकोबार द्वीपसमूहाप्रमाणे केंद्रशासित प्रदेश राहील. सरकारनं गेल्या महिन्यात रशियाशी असलेल्या राजनैतिक संबंधाला वेगळं वळण देऊन भारत-रशिया मैत्रीला नवा आयाम आणि मजबूती दिलीय. इसरोच्या माध्यमातून अंतरिक्ष विज्ञान तंत्रज्ञानाचा करार केलाय. त्याचवेळी भारताची बदललेली परराष्ट्र नीती जाहीर झाली होती. शिवाय यातही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हेच या घटनेचे मुख्य होते. नजीकच्या काळात संयुक्त राष्ट्रसंघात कश्मीरप्रश्नी भारताच्यावतीनं जगातल्या कोणत्यातरी महासत्तेकडील विशेषाधिकार-व्हेटो वापरण्याची गरज निर्माण होणार आहे. रशियानं यापूर्वीही अनेकदा संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या बाजूनं विशेषाधिकार वापरून भारताची बाजू भक्कम केलीय. काँग्रेसनं अनेकवर्षे सत्ता राबविली पण ३७० कलमाला हात लावण्याची हिंमत दाखवता आलेली नाही. भाजपेयीं त्यातही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची राजकीय इच्छाशक्तीचा हा परिणाम आहे. त्यामुळंच हा एक इतिहास बदलणारा प्रयत्न घडला. यानं आगामी काळात होणाऱ्या चार राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका जिंकण्याचा मार्ग मोकळा झालाय. काँग्रेस आज मृत:प्राय अवस्थेत आहे अशातही पक्षातले काही नेते भाजपेयीं सरकारच्या निर्णयाला पाठींबा देऊन स्वपक्षांचं अधिकच नुकसान करताहेत. कलम ३७० आणि ३५ अ रद्द करण्याच्या राज्यसभा आणि लोकसभेच्या निर्णयावर राष्ट्रपतींनी सही करून शिक्कामोर्तब करून टाकलंय त्यामुळं आता त्याची अंमलबजावणी केली जाईल.

*सरदार पटेल, आंबेडकरांचा विरोध*
कश्मीरबाबत लागू करण्यात आलेलं कलम ३७० हे नेहरूंचं पाप आहे, असं म्हटलं जातं. किंबहुना भाजपेयीं त्यांच्यावर सतत आरोप करताहेत. त्यांनी हे लक्षात ठेवावं की पंडित नेहरू यांचं धोरण, त्यांची विचारसरणी ही काही वाईट नव्हती. ते आदर्शवादी होते, स्वप्नशील होते, त्यांनी देशासाठी खूप काम केलेलं आहे. त्यासोबतच त्यांच्याकडून काही चुकाही झाल्यात;  त्या चुकांपैकी एक चूक होती ती कश्मीरबाबत त्यांनी स्वीकारलेलं कलम ३७०!  या ३७० कलमाचा मसूदा सरदार वल्लभाई पटेल आणि गोपाळकृष्ण अय्यंगार या दोघांनी मिळून तयार केला असला तरी सरदार पटेलांचं कलम ३७० कश्मीरसाठी लागू करण्याबाबत नेहरूंशी मतभेद होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील याबाबत सहमत नव्हते. आज ही ऐतिहासिक चूक दुरुस्त करण्याची संधी आलेली आहे भाजपेयीं सरकारनं हे ३७० कलम रद्द करण्याचं संपूर्ण ऑपरेशन अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गुप्त राखलं असलं तरीदेखील योग्य वेळेत ते पार पाडलंय. पण ह्या ३७० ची समस्या अशी होती की, ती आता सोडवली नसती तर, त्याची सोडवणूक कधीच झाली नसते. वा ती होऊच शकली नसती! पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट आणि बाल्टिस्तानला हे प्रांत पाकिस्ताननं अलग केलंय. शिवाय पाकव्याप्त कश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानची डेमोग्राफी-वस्तीचित्र बदलून टाकलंय. हे सारं पहात आपण कुठपर्यंत, कधीपर्यंत आणि का म्हणून गप्प राहायचं? असा सवाल जनामनात गेली काही वर्षे घुमत होता. सध्याचं सरकारनं त्याला उत्तर देतंय!

*त्यात तथ्यच नाही तर ऐतिहासिक असत्य*
सरदार पटेल भारताचे पहिले पंतप्रधान असते, तर काश्मीरचा एकही इंच भूभाग आज पाकिस्तानामध्ये नसता, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले होते. आज गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, काश्मीरचा प्रश्न वल्लभभाईंनी हाताळलाच नव्हता. थोडक्यात तो नेहरूंनी हाताळला आणि म्हणूनच सगळा बट्ट्याबोळ झाला, असे त्यांना सुचवायचंय. कश्मीरच्या महाराजांनी भारतात सामील व्हायचं की पाकिस्तानात , याबद्दल चालढकल चालवली होती. त्यावेळी नेहरूंना काश्मीरला भेट देणं गरजेचं वाटलं. नेहरूंऐवजी गांधीजींनी जावं असं लॉर्ड माऊंटबॅटन यांचं मत होतं. गांधींची भेट नेहरूंच्या भेटीपेक्षा कमी संकटाची ठरेल, असे पटेलांचं मत होतं. यावरून स्पष्ट होतं की, पटेल या प्रश्नात संपूर्णपणे रस घेत होते आणि ते त्यात गुंतलेही होते. काश्मीर प्रश्नाबाबत माझं आणि तुमचं  धोरणात्मक मतभेद नाहीत, परंतु अनेक लोकांना असंवाटतं की याबाबत आपल्यात मतभेद आहेत, असं सरदार पटेलांनी नेहरूंना लिहिलेल्या पत्रात स्पष्टपणे म्हटलेलं आहे. पटेल यांचे राजकीय सचिव व्ही. शंकर यांचे 'माय रेमिनिसेन्सेस ऑफ सरदार पटेल' हे पुस्तक आहे. त्यात शंकर यांनी म्हटले आहे की, जम्मू आणि काश्मीरचं काय करायचं, कुठे जायचं याचा निर्णय राजेंनी करायचा आहे. त्यांना जर वाटत असेल की, राज्याचे हितसंबंध पाकिस्तानात सामील होण्यामुळे जपले जाणार असतील, तर त्यांच्या मार्गात मी येणार नाही. 'इफ काश्मीर डिसाईड्स टु जॉईन दि अदर डोमिनियन हि वुड एक्सेप्ट  द फॅक्ट' असं पटेलांनी भारताचे पहिले संरक्षणमंत्री बलदेव सिंग यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 'गांधी-पटेल अ लाइफ' या राजमोहन गांधींच्या पुस्तकात हा उल्लेख आहे. ऑगस्ट १९५० मध्ये जयप्रकाश नारायण यांना सरदार पटेल म्हणाले की, कश्मीर हा प्रश्न सुटण्यासारखा नाही. 'सरदार पटेल सेंटेनरी व्हॅल्यूम-१' मध्येच हा संदर्भ आहे. थोडक्यात, पटेलांचा कश्मीरशी काहीही संबंध नव्हता, हे अमित शहा यांचे विधान खोटं आहे. पटेल असते तर काश्मीरबाबत काही वेगळं घडलं असतं आणि नेहरूंनीच सर्व वाटोळे केलं, असे जेे मोदी-शहांना सुचवायचं आहे, त्यातही तथ्य नाही. ते एक ऐतिहासिक असत्य आहे.

*नेहरू महानच, पण काही चुका झाल्यात*
नेहरूंनी आपलं जीवन देशासाठी झिजवलंय. त्यांनी ज्या दोन-चार चुका केल्यात त्या दुर्लक्षून त्यांनी राष्ट्रासाठी जे महान कार्य केलंय त्याकडं इतिहासाचे अभ्यासक आणि समजदार वाचक हे त्यांची उपेक्षा करणार नाहीत. त्यांच्याकडून चूक झाली ती अशामुळं की ते खूपच सकारात्मक विचारांचे होते. चीन आणि पाकिस्तानसारख्या शत्रूंना पारखण्यात त्यांची चूक झाली. आजही अनेक राजकीय नेते, अभ्यासक, विश्लेषक यांच्यामते कश्मीरचा हा प्रश्न चर्चेनं सोडवायला हवा होता. बेशक... पण आजवर तो सुटलाय का? प्रत्येकवेळी चर्चा सुरू व्हायची अन प्रत्येकवेळी त्यात खोडा घातला जायचा. पुन्हा चर्चा सुरू व्हायची अन पुन्हा आपली फसवणूक! नवाझ शरीफ यांनी तर मनमोहनसिंग यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय आदरणीय राजपुरुषाला अपमानित केलं. अटलबिहारी वाजपेयी थेट लाहोरला गेले ते नवाझ यांच्याशी चर्चा करायला. बदल्यात काय मिळालं? कारगिलचा हल्ला...! तरीही भारतानं सतत पाकशी चर्चेचा सिलसिला सुरू ठेवला. पण पाकिस्ताननं प्रत्येकवेळी पाठीत खंजीर खुपसलाय! चर्चेची सुरुवात झाली की, पाठोपाठ दहशतवादी हल्ला झालाच म्हणून समजा. आपण कधीपर्यंत आणि कुठपर्यंत मार खायचा? हा सारा प्रकार भारतीय जनतेच्या गळ्याशी आला होता. भारतीयांचं मन विशाल आहे, ते खुल्या दिलाचे आहेत, उदार मनाचे आहेत. एक मागाल तर शंभर देतील! पण या शेजार राष्ट्राच्या दहशतवादी कारवायांनी ते त्रासले होते. म्हणून मग केंद्रातल्या वर्तमान भाजपेयीं सरकारनं राज्यसभेत ३७० वं कलम रद्द करण्याची घोषणा करताच प्रत्येक भारतीय आनंदित झाला. ठिकठिकाणी जल्लोष झाला. ही घटना देशवासियांच्या सात दशक जुन्या भावनांचा उद्रेक होता. गेल्या काही दशकापासून अविरत होत असलेली फसवणूक आणि अपमानास्पद घटनांपासून मिळणाऱ्या मुक्तीचं ते समाधान होतं!

*वाखाणणी बरोबरच टीकाही हवीच*
काँग्रेस आणि इतर कित्येक पक्ष 'नेहरू ब्रँड' आदर्शवादी विचारांत फसलेले आहेत. त्यांनी ३७० कलम रद्द करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नाला विरोध करून देशवासीयांच्या भावना धुडकावल्या आहेत. त्यांची स्थिती आधीच तशी चांगली नाही. त्यात हा विरोध त्यांना नुकसानच पोहोचविल. यात शंका नाही की. त्यांनी नेहमीच हो ला हो म्हणण्याची गरज नाही. जेव्हा 'मोब लिंचिंग' होईल त्याला विरोध करायलाच हवा. जनतेकडून चूक झाली तर तिचा कान पकडलाच हवा, ही प्रबुद्ध शासकाची निशाणी आहे, पण जेव्हा देशाच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा असेल, अखंडतेचा प्रश्न असेल तेव्हा जनतेच्या भावनेची उपेक्षा करणं हे अस्वीकृत आणि घृणा निर्माण करणारं बनेल! भारताच्या सार्वभौमत्वाबाबत आणि अखंडतेबाबत मतभिन्नता असायला नकोय. जगातलं असं एक उदाहरण दाखवा की, जिथल्या जमिनीबाबतचा वाद शांततेनं सुटलाय. मग ती एखाद्या शहराची विवादित जमीन असो नाहीतर दोन देशामधील विवादित जमीन असो. अशा वादात नेहमीच बलशाली असलेल्याचीच जीत झालीय. त्यात 'शक्तिमेव जयते'चंच सूत्र लागू होतं. चीननं १९६२ मध्ये भारतावर हल्ला करून ८६ हजार ४०० चौरस किलोमीटर बळकावलाय.   आजतर त्यानं अरुणाचल आणि सिक्कीमवर दावा सांगितलाय. आधीच त्यानं तिबेट गिळलाय. अशांच्यासमोर तुम्ही शांततेनं वाटाघाटी करायला बसला तर पुढं जाऊन ते अख्खा देशच गिळतील. चिनी ड्रॅगन आणि पाकिस्तान यांचं धोरण असंच आहे की त्यांच्यासमोर आपण शांततेनं वागलो तर देशाच्या इंच इंच भूमीवर ते आपला दावा सांगतील. मग कधीपर्यंत वाटाघाटी, चर्चेनं प्रश्न सुटतील म्हणून वाट पाहायची? देशातील लोक दहशतवादमुक्त भारत इच्छितात. कश्मिरातच नव्हे तर संपूर्ण देशात लोकांना शांतता हवीय! कलम ३७० रद्द करण्याची केंद्र सरकारची भूमिका एकाबाजूला आहे; तर दुसरीकडं कश्मीरचं भविष्य! जे आज सरकारकडून सांगितलं जातंय तसं तिथं घडलं नाही तर लोक सरकारलाच जबाबदार धरतील. निश्चितपणे सरकारनं जर चांगला निर्णय घेतला तर त्याची प्रशंसा व्हायला हरकत नाही पण भविष्यात अयोग्य काम केलं तर त्याच्यावर टीका करण्याचा अधिकार जनतेला नक्कीच आहे. ज्याप्रमाणे देशात आर्थिक मंदी जाणवतेय त्याबाबतही सरकारची समीक्षा आणि मूल्यमापन व्हायलाच हवंय. त्याबाबत टीका-टिपण्णीही व्हायला हवीय.

*कश्मीरचे राजे काय म्हणतात?*
देशात आज राजेशाही अस्तित्वात नाही. तरीही राजपरिवाराचे वंशज स्वतःला राजे असल्याचं मानतात. कश्मीरचे राजे हरिसिंग यांनी स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन करण्याबाबतच्या दस्ताऐवजावर सही केली होती. त्यांचे पुत्र करणसिंह हे कश्मीरचे तथाकथित राजे आहेत. ८८ वर्षाचे डॉ. करणसिंह हे काँग्रेसचे सदस्य आहेत. ते राज्यसभेचे सदस्य तसेच कश्मीरचे गव्हर्नरही होते. त्यांनी भाजपेयीं सरकारनं घेतलेल्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली असली तरी या निर्णयाचं स्वागत करून काही अपेक्षाही व्यक्त केल्यात. त्याचबरोबर त्यांनी हे ही म्हटलं होतं की, कश्मीर हा भारताचा भाग आहे आणि भारताचाच भाग राहायला हवाय. पण सरकारनं रातोरात त्याचं असलेलं 'स्पेशल स्टेटस' हिसकावून घेणं शक्य नाही. हे त्यांचं मत केंद्र सरकारनं ३७० वं कलम रद्द करण्यापूर्वीचं होतं!

*श्यामाप्रसाद मुखर्जी यांना खरी श्रद्धांजली*
श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा मृत्यू कश्मीरमध्ये संशयास्पदरीत्या झाला होता. मुखर्जी हे नेहरूंच्या सरकारात मंत्री होते. पण कश्मीरबाबत त्यांचं नेहरूंशी मतभेद होते. त्यामुळं त्यांनी मंत्रिपदाचा १९५० मध्ये राजीनामा देऊन ते कश्मीरमध्ये पोहोचले होते. ३७० वं कलम लागू झाल्यानं कश्मीर भारताचं अभिन्न अंग असतानाही अलग घटना, अलग ध्वज याच्याविरुद्ध मुखर्जी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी आंदोलन केलं होतं. कश्मीरमध्ये शेख अब्दुल्ला यांचं सरकार होतं. त्यांनी मुखर्जी यांना तुरुंगात डांबलं. तुरुंगवासात असतानाच १९५३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या डॉक्टरांना वा नातेवाईकांना कळविण्यात दिरंगाई केली होती. त्यामुळं त्यांच्या मृत्यूबाबत अनेक शंका, प्रश्न निर्माण झाले होते. ज्याची उत्तरं आजपर्यंत मिळालेली नाहीत. कश्मीरचं एकीकरण हे त्यांचं स्वप्न आज मात्र पूर्ण झालंय. कलम ३७० रद्द करून त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण केली गेलीय असंच म्हणावं लागेल! १९४७ फाळणीनंतर लाखो शरणार्थी भारतात आले आणि ते वेगवेगळ्या राज्यात निर्वासित म्हणून राहिले. त्यातले अनेकजण कश्मीरमध्येही निर्वासित गेले. इतर राज्यात गेलेल्या निर्वासितांना भारतीय नागरिकत्व मिळालं. पण कश्मीरमध्ये गेलेल्यांना ते मिळालं नाही. ते आजही आऊटसाईडर आणि शरणार्थीच राहिलेत. त्यांना तिथं घर खरेदी करण्याचाच नव्हे तर मत देण्याचाही अधिकार आजपर्यंत मिळालेला नाही. सरकारी महाविद्यालयात त्यांना प्रवेश मिळत नाही की, सरकारी नोकरी! ३७० वर चर्चा होते पण ३५ अ वर क्वचितच होते. ते नेमकं काय आहे हे अनेकांना माहीत नाही. ३५ अ कडे लोकांचं लक्ष जाऊ नये म्हणून त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी त्याचा समावेश राजघटनेत करण्याऐवजी ते परिशिष्टमध्ये टाकलं गेलंय. त्यात ते लपवलं गेलंय. आता राष्ट्रपतींच्या सही नंतर कलम ३७० हटवलं गेलंय. त्याचा फायदा किती हे संसदेत अमित शहांनी सांगितलं. नरेंद्र मोदींनी 'मनकी बात' मध्ये सांगितलंय. त्याची पुनरुक्ती इथं नकोय. पण आपण एवढी इच्छा करू शकतो की, कश्मीरमध्ये आता विकास, शांती आणि समृद्धीचा सूर्य उगवेल. कश्मीर आपलं आहे आणि कश्मीरीही आपलेच आहेत आणि राहतील. अमेरिका आणि ब्रिटननं यहुदींना दोन हजार वर्षांनंतर त्यांचं मूल निवासस्थान इस्रायलमध्ये पुनःस्थापित केलं. त्याप्रमाणं कश्मीरमधून विस्थापित झालेल्या पंडितांना पुन्हा कश्मीरमध्ये पुनःस्थापित करावं ही तमाम भारतीयांची अभिलाषा...!

चौकट.....
*कश्मीरप्रश्न आणि संयुक्त राष्ट्रसंघ*
काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी कश्मीर इतिहासाची माहिती घेऊन बोलणं अपेक्षित होतं. संयुक्त राष्ट्रसंघात असलेला हा प्रश्न अंतर्गत कसा? असं विचारून स्वतःचं आणि पक्षाचं हसं करून घेतलं. ३७० जसं केलं, तसं ते ७२ वर्षानं आता रद्दही झालंय. पंडित नेहरूंनी सरदार पटेलांवर सक्ती केल्यामुळं त्यांनी हे ३७० चं भूत उभं करून हरिसिंगच्या गळ्यात बांधलं असं म्हणणं योग्य नाही. पटेल इतके दूधखुळे नव्हते. या प्रश्नात स्वतः गांधीजींनी लक्ष घालून हरिसिंहाचं मन वळविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी नेहरूंनी स्वतःकडं कश्मीरचं खातं घेतलं होतं ही गोष्ट खरी आहे. कश्मीरचं त्यांना विशेष प्रेम असल्यानं त्यांनी त्यात जास्त लक्ष घातलं आणि पटेलांना इतर संस्थानांकडं पाहायला सांगितलं. हे ही खरं आहे. पटेलांनी ५६२ संस्थानं विलीन करून घेतली. त्यासाठी तयार केलेल्या सामीलनाम्याचा मसुदा सर्वांसाठी सारखा होता. ज्या ३७० व्या कलमाला आता रद्द करण्यात आलं आहे, ते कलम आधी आलं आणि मग पाकिस्तानी आक्रमणाविषयी नेहरूंनी संयुक्त राष्ट्रसंघात जाण्याचा निर्णय घेतला. हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. पुढं २० जानेवारी १९४८ रोजी संयुक्त राष्ट्रसंघानं भारत आणि पाकिस्तानला शस्त्रसंधी करायला सांगितलं. याचाच अर्थ असा की, ३७० व्या कलमाशी पाकिस्तानचा किंवा संयुक्त राष्ट्रसंघाचा काडीमात्र संबंध नाही. संयुक्त राष्ट्रसंघानं जेव्हा दोन्ही देशांना युद्धबंदी करायला सांगितलं, तेव्हा पाकिस्तानला त्यांनी आपल्या सैनिकांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या हल्लेखोऱ्यांना ताबडतोब मागे घेण्यास बजावलं. हे सैन्य मागं घेतलं की, संपूर्ण भारतीय सैनिकांच्या अधिपत्याखाली असलेल्या कश्मीरमध्ये सार्वमत घेतलं जावं. असा संयुक्त राष्ट्रसंघाचा ठराव ४७ सांगतो. त्याआधी राष्ट्रसंघानं ठराव क्र. ३९ अन्वये एक आयोग स्थापन केला.  त्यात भारतानं निवडलेला एक, पाकिस्ताननं निवडलेला एक आणि राष्ट्रसंघाचा एक अशा तिघांनी काम करायचं असं ठरलं. तो ठराव शांततापूर्ण मार्ग निघावा, असं आवाहन करणारा होता. काँग्रेसच्या सदस्यांनी ही पार्श्वभूमी समजावून घ्यायला हवी. ४७ क्रमांकाच्या ठरावात नेमलेला आयोग पांच सदस्यांचा होता.  आधीचा आयोग कामच करू शकलेला नव्हता. पांच सदस्यांच्या आयोगात अर्जेंटिना, बेल्जियम, कोलंबिया, चेकोस्लोव्हाकिया आणि अमेरिका, असे पांच देशांचे प्रतिनिधी होते.

- हरीश केंची
९४२२३१०६०९

Saturday, 27 July 2019

जिथं सत्ता तिथं निष्ठा...!

"लोकशाही सशक्त, सक्षम व्हावी, आयाराम-गयारामामुळे निर्माण होणारी अस्थिरता रोखण्यासाठी म्हणून पक्षांतर बंदीचा कायदा अंमलात आला. पण सध्या त्याच कायद्याला हरताळ फासत संधीसाधू राजकारण्यांनी हा कायदा कसा तकलादू झालाय आहे, याचं प्रत्यंतर घडवलंय. राज्यात विखेपाटलांचं उदाहरण ताजं असतानाच गोव्यात आणि कर्नाटकात या कायद्याचे धिंडवडे काढलेत. अटलबिहारी वाजपेयी यांनी यातल्या काही तरतुदी बदलल्या पण त्यांच्याच अनुयायांनी त्या तरतुदी गुंडाळून ठेवल्यात. पण हा कायदा आणखी मजबूत करावा अशी कोणत्याच पक्षाची मानसिकता दिसत नाही. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी साऱ्यांना त्यातल्या चोरवाटा हव्या आहेत. आजच्या स्थितीत पक्षांतरबंदी कायदा निष्फळ ठरतोय!"
-----------------------------------------------
*आ* पल्याकडे पक्षांतराची परंपरा नवीन नाही. सध्या दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत तेच घडते आहे. पक्षांतरामागे केवळ पुन्हा निवडून येणे, सत्तेचे पद मिळणे यापलिकडे दुसरी काही प्रबळ इच्छा नसते. पक्षांतराने राज्याचं काही भले होईल याची कोणतीही खात्री नाही. पावसाळ्यातील कावळ्याच्या छत्र्या जशा अल्पायुषी असतात, तसेच यातील बव्हंशी मंडळींचे होईल. ४० वर्षांपूर्वीचा ‘तो’ दिवस भारतीय राजकारणाच्या स्थित्यंतराचा होता. पक्षीय निष्ठा बिनधास्त भिरकावण्याचा होता. तोपर्यंत वैचारिक राजकारण चालत असल्याने साऱ्या देशालाच ‘तो’ मोठा धक्का होता. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या या तोडफोडीच्या धोरणावर देशभर टीका होत होती. परंतु, त्यानंतर पक्षांतर हा जणू शिरस्ता बनला.

*पक्षांतरानं राजकारणाविषयी घृणा!*
आयाराम-गयाराम ही संकल्पना तेव्हापासूनच प्रचलित झाली. त्या घटनेला आज तब्बल ४० वर्षे उलटली अन् गोवा, कर्नाटकातील अशाच ताज्या घाऊक पक्षांतराच्या प्रकाराने पक्षांतराचा हा पट झरझर नजरेसमोरून गेला. इंदिरापुत्र राजीव गांधी यांच्याच काळात पक्षांतराला आळा घालण्याचा कायदा केला गेला. पक्षांतर बंदी कायद्यानंतर खरेतर ही वैचारिक अवनती थांबणे अपेक्षित होते, पण झाले भलतेच! पक्षांतरामुळे काही नेत्यांना पदे जरूर गमवावी लागली. पण त्यामुळे पक्षांतराच्या प्रक्रियेत काहीही फरक पडला नाही. एका कायद्याचे हे अपयश राजकारण्यांनी वारंवार त्याचा भंग करून अधोरेखित केले. सर्वत्र आलेल्या पक्षांतराच्या लाटेमुळे राजकारणाविषयीची सर्वसामान्यांमधील घृणा वाढण्यास मदतच झाली आहे. हरियाणात बिगर काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री बनलेले भजनलाल यांनी १९८० साली जनता पार्टीच्या सर्व आमदारांसह काँग्रेसमध्ये उडी मारली व मुख्यमंत्री झाले. पुढे तीन वर्षानंतर आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री एन. टी. रामाराव उपचारासाठी अमेरिकेत गेले असताना केंद्रातील काँग्रेस सरकारने एन. भास्करराव या अर्थमंत्र्यालाच फोडून मुख्यमंत्री केले होते. हा लढा नंतर राष्ट्रपती भवनात १६१ आमदारांची ऐतिहासिक परेड करण्यापर्यंत गेला अन् केंद्राला हात पोळून माघार घ्यावी लागली. भारतीय संसदेच्या इतिहासातील काळे दिवस म्हणूनच या घटनांकडे पाहिले जाते. पुढे एवढ्या मोठ्या प्रमाणावर म्हणजेच असे घाऊक पक्षांतर झाले नाही, पण पक्षनिष्ठेची ऐशीतैशी करण्याची फॅशन मात्र तेव्हापासून रूढ झाली. सन १९९१-९२ मध्ये छगन भुजबळांनी सतरा आमदारांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र केला तेव्हाही महाराष्ट्र हादरला होता. पुढे नारायण राणेंनीही आमदारांना फोडण्यासाठी मोठी यातायात केली. त्यात काही आमदारांना पदे गमवावी लागली होती. राणेंनी तर भुजबळांची री ओढण्याचाही अयशस्वी प्रयत्न करून पाहिला. सुरेश जैन हे तर पक्षांतराचे मेरूमणी म्हणावे लागतील, कारण त्यांनी अनेकदा पक्षांतरे केली. अर्थात प्रत्येकवेळी त्यांनी पदाचा राजीनाम देत पुन्हा जनतेचा कौल घेतला हे त्यांचे विशेष!

*लोकप्रतिनिधींची निष्ठा लोकांप्रती असावी*
'लोकप्रतिनिधी' म्हणून निवडून आलेल्या नेत्याचं दायित्व सर्वप्रथम ही लोकांच्याप्रती, आपल्याला निवडून दिलेल्या मतदारांच्याचप्रती असायला हवी. प्रामाणिकपणा आणि सेवावृत्ती ही त्याच्यात असायला हवी. पण मतांसाठी लोकांच्या चरणी लीन होणारे नेते निवडून आल्यानंतर मात्र  आपली निष्ठा ही मतदारांऐवजी त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थाप्रती असल्याचं दिसून येतं. शिवाय त्यांच्या पक्षासाठीची निष्ठा ही देखील अधिकच टोकदार बनते. स्वतःच्या मनाला पटेल, सद्सदविवेकबुद्धीला रुचेल असं वागण्याऐवजी राजकिय पक्षांच्या, पक्षनेत्याच्या धोरणानुसार, मर्जीनुसार, पसंतीनुसार चालावं लागतं. लोकशाहीच्या राज्यव्यवहारात हे कितपत योग्य आहे? असा सवाल सामान्य मतदारांमध्ये मनांत निर्माण होणं सहजशक्य आहे. जनतेच्या, मतदारांच्या माध्यमातूनराजकीय पक्षाला मान्यता मिळते, सत्ता मिळते ते त्या राजकीय पक्षाच्या नावानं! त्यातल्या नेत्याच्या हातीच सत्तेची सारी सूत्रं येतात. पण सभागृहातल्या हुशार, कर्तबगार, सर्वसंमत नेता कितीही लोकप्रिय असला तरी त्याच्या हाती ती सूत्रं येऊ शकत नाहीत. किंबहुना पक्षाच्या नेतृत्वाचा तसा प्रयत्न होतानाही दिसत नाही. केवळ बहुमत धारण करणाऱ्या पक्षाच्या नेत्यालाच हे पद मिळू शकतं; ते ही वरिष्ठांच्या मर्जीनुसार! लोकशाहीच्या ज्या अनेक व्याख्या प्रचलित आहेत, त्यापैकी एक 'बहुसंख्य लोकांनी केलेली हुकूमशाही ती लोकशाही !' असाही आहे. लोकशाहीत ज्या काही त्रुटी आहेत त्यापैकी ही एक आहे. लोकांजवळ दुसरा कोणताच पर्याय, विकल्प राहिलेला नाही. राजेशाही, तानाशाही आणि साम्यवादशाही नको असेल तर या साऱ्या त्रुटीसह लोकशाही स्वीकारावीच लागते. आपल्या घरातही प्रत्येकाला स्वातंत्र्य, स्वायत्तता असते पण त्यालाही मर्यादा असतात. कुणालाही आणि कसंही वागण्याची तिथं मुभा नसते. घरातल्या ज्येष्ठांना, पालकांना जे रुचेल, भावेल वा ते ठरवतील तसंच राहायला लागतं. तिथंही कुरबुरी होतच असतात. तसंच राजकारणातही घडतं असतं. वाद-प्रतिवाद, सुंदोपसुंदी, कुरघोडी हे तर राजकारणात घडलं नाही तरच नवल!

*'सत्तासुंदरी'साठी पक्षांतराची होड!*
राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर आमदार आणि खासदार अनेकदा 'सत्तासुंदरी'साठी पक्षांतर करतात. त्यामुळं स्थिर सरकारंही अनेकदा अस्थिर बनतात. काहीवेळा  आमदार-खासदारांच्या धमकीला शरण जाऊन नेत्याला 'जम्बो' मंत्रिमंडळ बनवावं लागतं. सर्वच पक्षांचे नेते या आयाराम-गयारामांच्या घडामोडीं, पक्षांतरामुळे निर्माण होणाऱ्या अस्थिरतेनं त्रस्त बनले होते. त्यामुळं सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत, एकमतानं 'पक्षांतरबंदी' कायदा आणला. आमदार-खासदारांच्या दडपणाला बळी पडता येऊ नये म्हणून सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या १५ टक्क्यांहून अधिक मंत्र्यांची संख्या असता कामा नये अशीही तरतूद या कायद्यात केली. आता पाहावं लागेल की, पक्षांतरबंदी कायदा असतानाही तो धाब्यावर बसवून, त्यातील तरतुदींचा गैरअर्थ लावत राजकीय पक्षांकडून आमदार-खासदार यांची खरेदी-विक्री होते आहे. त्यानं सर्वच राजकीय पक्षाचे नेते कधीतरी कंटाळतील याकडं सर्वसामान्य मतदारांना पाहत बसावं लागेल. आता सर्वसत्ताधीश असलेल्या भाजपेयींच्यावतीनं विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना 'आपलंसं' करून घेतलं जातंय! विरोधकांच्या आमदारांना-खासदारांची पळवापळवी सुरू आहे. आंध्रप्रदेशच्या तेलुगु देशम पक्षाच्या चार राज्यसभा खासदारांना भाजपेयीं बनवलंय. गोव्याच्या दहा काँग्रेसी आमदारांना पक्षांत घेतलंय. कर्नाटकात १५ आमदार भाजपचं दार ठोठावताहेत. कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करायच्यावेळी त्यांनी अनुपस्थित राहून भाजपची सत्ता आणली. आता मध्यप्रदेशाची पाळी आहे. महाराष्ट्रात तर काँग्रेसचा विरोधीपक्ष नेता राधाकृष्ण विखे पाटील हेच भाजपात प्रवेश करते झाले आणि थेट कॅबिनेट मंत्रीच बनले. अशा एखाद दुसऱ्या घटना तर दररोज कुठे ना कुठे होत असतात. महाराष्ट्र, हिमाचल प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणूक होताहेत तेव्हा तर या घटना अधिक मोठ्याप्रमाणात होतील. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आवक शिवसेना-भाजपत सुरू झालीय. राष्ट्रवादीचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी मातोश्री गाठून थेट शिवसेनेत आलेत तर पिचडांचे चिरंजीव भाजपेयीं होण्यासाठी वर्षावर तिष्ठत उभे आहेत. होतील.

*पक्षांतर हा लोकशाहीद्रोह समजावा*
निवडून आलेली व्यक्ती, लोकप्रतिनिधी ही खरं तर मुक्त, स्वतंत्र असायला हवी. पण तसं न होता तो लोकप्रतिनिधी, आमदार-खासदार हा त्या राजकीय पक्षाचा गुलाम होतो ही काही फार चांगली बाब नाही. एखाद्या प्रश्नावर आपली भूमिका व्यक्त करण्याबरोबरच पक्षाच्या निर्णयांना, धोरणांना, कार्यक्रमांना आणि भूमिकांना जनतेच्या भल्यासाठी विरोध करण्याची मोकळीक त्याला असायलाच हवी. आज ती नाही. आज सरकार निश्चित करतं की, सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी, प्रचार करताना जे काही सहाय्यभूत ठरतील असे सवंग निर्णय घेतले जातात. त्यामुळे पक्षाच्या, वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकांनाच त्याला मुकसंमती द्यावी लागते. ही एक बाजू तर दुसरीकडं निवडून आलेले लोकप्रतिनिधी त्यांना मिळालेल्या अधिकारांनी पक्षनेत्यांना वेठीला धरायला, ब्लॅकमेल करायला लागतात. मला मंत्री केलं नाही तर मी विरोधीपक्षात जाऊन बसेन अशी दादागिरी करायला लागतात हे अधिक गंभीर आहे. चिंताजनक आहे. शेवटी सत्तेसाठी संतुलन राखण्याचा, मेळ घालण्याचा हा प्रश्न आहे. सदस्यांना तेवढं स्वातंत्र्य असेल पण त्यांनी आमदारकी वा खासदारकीची शपथ घेताना ज्या निष्ठा, इमानदारीच्या भूमिका व्यक्त केल्या होत्या त्या पाळल्याशिवाय त्याची त्यातून सुटका व्हायला नकोय. जो पक्षाच्या नांवे, पक्षाच्या कार्यक्रमाच्या आधारे निवडणूक जिंकलेला असेल तर लगेच पक्षत्याग करून इतर पक्षात जाऊन पोटनिवडणुकीत पुन्हा जिंकून येऊन विरोधी पक्षाच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो ही बाब कोणत्याच पक्षानं चालवून घेता कामा नये. पण अशा घटनांना राजकीय पक्षच खतपाणी घालताना दिसताहेत. देशाच्या अनेक राज्यात अशा घटना घडल्या आहेत. नियम आणि कायद्यातील तरतुदींचा, त्रुटींचा फायदा घेत स्वतःच्या पक्षाशी आणि जनतेशी त्यांनी केलेला हा द्रोह आहे, लोकशाहीद्रोह आहे असं समजलं जायला हवं!

*विरोधकांना शक्तीहीन करण्याची खेळी*
मिझोराम, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक इथं ज्या घटना घडताहेत त्यातून पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदींचा पुनर्विचार व्हायला हवाय. पण सध्या असा काही बदल त्यात होण्याची शक्यताच नाही. भाजपेयींनी 'मांजर ज्याप्रमाणे उंदराला खेळवत खेळवत नामोहरम करतं' अगदी तशीच नीती स्वीकारली आहे. *विरोधीपक्ष हा यापुढं केवळ नावापुरताच राहायला हवाय.* *विरोधकांमध्ये जे सक्षम, ताकदवान, निवडून येण्याची क्षमता असलेले नेते असतील त्यांना आपल्यात सामावून घ्यायचंय.* *इथं निवडणुका होतील पण विरोधीपक्ष एवढा कमकुवत असेल की, सत्ता जाण्याची चिंताच असणार नाही. विरोधकांकडे निवडणूक लढवतील असे नेते असतील, पण निवडून येतील असे नेते असणार नाहीत, नव्यानं निर्माण होणार नाहीत याबाबत दक्षता घेतली जाईल.* महाराष्ट्रात ४८ पैकी ४२, गुजरातमध्ये २६ पैकी २५, राजस्थानमध्ये २५ पैकी २५, मध्यप्रदेशात २९ पैकी २८, दिल्लीत ७ पैकी ७ असे वा इतर राज्यातील जे काही आकडे आहेत ते विरोधकांनी खुश व्हावं असं काही नाही. कर्नाटकात नुकतंच जे काही घडलं, जे काही राजकीय डावपेच खेळले गेले, न्यायालयीन झगडे उभे केले गेले, आमदारांचे राजीनामानाट्य रंगवलं गेलं त्याच्या या साऱ्या घटनांनी लोकशाहीचे धिंडवडे निघालेत, अगदी लोकशाहीचं वस्त्रहरण झालंय!

*राजीनाम्यानंतर पांच वर्षे निवडणूक नाही*
निवडून आलेले आमदार राजीनामा देऊ शकतील का आणि दिला तरी त्यामागचा त्यांचा हेतू, इरादा आणि परिणाम काय असतील हे विचारण्याचा अधिकार लोकांना असायला हवा की नको? आमदारांचा राजीनामा हा ऐच्छिक आणि व्यक्तिगत कारणातून दिलेला असावा. आणि त्या राजीनाम्यानं सत्ताधारी आणि विरोधीपक्षावर कोणताही परिणाम होणारा नसावा. पक्षांतरबंदी कायदा आणण्यामागे हा शुद्ध हेतु होता! अनेकदा स्वेच्छेने आणि व्यक्तिगत कारणानं राजीनामा देणं हे अगत्याचं, गरजेचं बनलं असेल तेव्हा देखील त्या राजीनाम्यानं सत्ताबदल होऊ शकतो! पण अशी घटना अपवादात्मकरित्या बनू शकते. सध्या जे काही आपण पाहतोय ते व्यक्तिगत स्वार्थ, स्वतःच्या पक्षाचं नुकसान आणि विरोधकांचा फायदा व्हावा याच राजकीयदृष्टीनं स्वार्थानं, लोभानं दिलेला असतो. आमदाराला विधानसभेत निवडून पाठवताना त्यानं सर्वप्रथम त्या मतदारांचं, जनतेचं हीत जोपासण्याचं काम करायला हवंय. प्रथम प्रजेसाठी आणि त्यानंतर त्याच्या पक्षासाठीचं हीत पाहायला हवंय! पण राजीनामा देऊन तो लोकप्रतिनिधी केवळ स्वतःचाच विचार आणि त्याच्या पक्षाचं अहित करणार असेल तर ते चालवून घेता कामा नये. राजीनामा द्यायची सूट असायला हवी, पण त्याला कमीतकमी आपल्याच मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी किंवा इतर कोणत्याही मतदारसंघातून त्याचवेळी होणारी पोटनिवडणूक लढविता येऊ नये. अशी तरतूद असायला हवी. पांच वर्षांनंतर पुन्हा नव्यानं स्वतःच राजकारण करून निवडणुकीला त्यानं सामोरं जायला हवं! स्वार्थासाठी पक्षाला, सरकारी निवडणूक यंत्रणेला आणि मतदारांना सुद्धा त्यानं वेठीला धरायला नकोय!


*सत्ताबदलाच्या खेळीचे खेळाडू*
तसं पाहिलं तर नियमानुसार  विधानसभाध्यक्षांनी घेतलेले निर्णय हे आपल्या निर्णयाशी योग्य आहेत. हे खरंय की, एकतृतीयांश आमदारांचे राजीनामे ऐच्छिक वा व्यक्तिगत कारणानुसार आहे हे निश्चित करूनच त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार कर्नाटकच्या विधानसभाध्यक्षांना होता. पण त्यात त्यांनीच घोळ घातला. कर्नाटकातले १३ आमदार जीवाची मुंबई करण्यासाठी मुंबईत आले. खासगी चार्टर्ड विमानानं ते आले. पंचतारांकित हॉटेलात राहिले. त्याचबरोबर ते दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात अर्जही दाखल करतात. बंगलोरला  विधानसभाध्यक्षांच्या कार्यालयात जाऊन राजीनामाही देतात. पुन्हा मुंबई गाठतात. त्यामुळं हे राजीनामे व्यक्तिगत कारणानुसार वा स्वेच्छेने दिलेले नाहींत तर, स्वतःच्या पक्षाचं सरकार पाडून त्याठिकाणी भाजपचं सरकार आणण्यासाठी केलेली ती एक राजकीय खेळी होती. आणि त्या खेळाचे ते खेळाडूं बनले. त्या सत्ताबदलाच्या राजकीय घडामोडीचे हिस्सेदार बनले!

*सभागृहध्यक्षांची राजकीय भूमिका नडली*
काँग्रेसच्या विश्वजित राणेंनी गोवा विधानसभा सदस्यपदाचा लगेचच राजीनामा दिला त्यामुळं त्यांच्यावरची पक्षांतरबंदीची कारवाई ही गैरलागू आहे. त्यांनी राजीनामा दिला म्हणजे तो कायदा त्यांना लागू होतो की नाही? त्याबाबतचा खटला सर्वोच्च न्यायालयात अडीच वर्षांपासून सुरू आहे. कर्नाटकच्या आमदारांना राजीनामा द्यायचा अधिकार द्यायला हवा. पण त्यांनी सरकार उलथवून टाकण्याचं षडयंत्र रचलंय की स्वतःच्याच पक्षाच्या सरकारविरोधात कारवाई करताहेत म्हणून त्यांना ना-लायक ठरवायला हवंय? हा मामला सर्वोच्च न्यायालयात गेलाय, तिथं तो चालूच राहील पण दरम्यान कर्नाटक सरकार गडगडलं आणि भाजपेयीं तिथं सत्ताधारी बनलेत. इथं हे पाहणं आवश्यक आहे की, कुमारस्वामी यांनी चर्चेचं गुऱ्हाळ सुरू ठेऊन सहा दिवसाचा वेळ काढला. विश्वासदर्शक ठराव त्यांनी मांडला. आमदारांची समजूत काढण्याबरोबरच त्यांना व्हीप बजावण्याची संधी हवी होती, ती मिळाली नाही. न्यायालयात कायद्याचा कीस काढण्याचा प्रयत्न झाला. विधानसभाध्यक्ष हे मूळचे काँग्रेसी असल्यानं त्यांनी सरकार वाचविण्याचा प्रयत्नही केला. मूळ भाजपेयीं असलेल्या राज्यपालांनी केलेली मतदान घेण्याची सूचना कुमारस्वामी यांनी फेटाळली. आता त्या १३ काँग्रेसी आणि ३ जेडीयु आमदारांना आता निलंबित करणार की, त्यातल्या काहींना मंत्री करणार हे लौकरच समजेल! भाजपेयींचं आता सत्तारोहण झालंय. आपली कोंडी करणाऱ्या सभागृहाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची संधी ते सोडतील असं वाटत नाही.

*कायद्यात बदल करण्याची इच्छाशक्तीच नाही*
आता प्रश्न असा उभा राहतो की, कर्नाटकातल्या नागरिकांनी, देशातल्या मतदारांनी हा सगळा तमाशा फक्त बघतच राहायचा का? सध्याच्या या परिस्थितीत आमदार आणि खासदार यांची खरेदी-विक्री करणं सर्वच राजकीय पक्षांना सहजशक्य झालेलं आहे. स्वार्थासाठी ती मंडळी आणि सर्वच पक्षाचे नेते हे पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत तरतुदीत अत्यंत गरजेचे असे बदल वा सुधारणा करण्यासाठी कुणीच तयार होणार नाहीत. सत्ताधारी होणार नाहीत पण विरोधकांनाही काय हवंय तेही स्पष्ट नाही. या कायद्यात बदल करावा आवश्यकतेनुसार सुधारणा करावी अशी मागणी करतानाही विरोधक सध्या दिसत नाहीत. भविष्यात अशाच प्रकारच्या घटना घडवता याव्यात म्हणून सारेच याबाबत गप्प आहेत. पण आपण किती दिवस हे लोकशाहीचे धिंडवडे निघताना, तिचं वस्त्रहरण होत असताना गप्प पहात बसायचं? पक्षांतर केलेल्यांना खरेतर जनतेने नाकारायला हवे, असे अनेकांना वाटते. पण मुळात जनतेलाही लोकप्रतिनिधींच्या अशा पक्षांशी वा त्यांच्या पक्षांतराशी काही देणेघेणे नसते. त्यांना त्यांची कामे करणारा, मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना हवा असतो. त्यामुळेच पक्षांतर केलेले अनेक जण पराभूत होतात तेव्हा त्यांनी केवळ पद उपभोगलेले असते जनतेची कामे काही केलेली नसतात हे स्पष्ट होते. येत्या विधानसभा निवडणुकीत तर त्या दृष्टीने खूपच महत्त्व येईल. कारण सध्याच एवढे पक्षांतर झाले आहे की निवडणुका जसजशा जवळ येतील अन् उमेदवारीचं वाटप होईल तेव्हा नाराजांमुळेच पक्षांतराचा वेग कितीतरी पटीने वाढेल. अशा पक्षांतराने महाराष्ट्राचं काही भले होईल याची मात्र कोणतीही खात्री नाही. त्यामुळे पावसाळ्यातील कावळ्याच्या छत्र्या जशा अल्पायुषी असतात, तसेच यातील बव्हंशी मंडळींचे होईल, एवढे मात्र निश्चित!
-हरीश केंची
९४२२३१०६०९

Saturday, 20 July 2019

डॉ. आंबेडकर यांची मुस्लिमांबाबत भूमिका!

इस्लाममधील समतावादी तत्वामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात इस्लामविषयी आदरभाव होता, परंतु भारतात तो समाजवादी आशय लोप पावल्यामुळे त्यांना दु:खही झाले होते. इस्लाममध्ये वंश आणि वर्ग यांच्या सीमा ओलांडून विविध लोकांना बंधुत्वाच्या भावनेने एकत्र बांधण्याची क्षमता असली तरी भारतीय मुसलमानांतील जातीव्यवस्था नष्ट करण्यात त्यास यश आलेले नाही.

‘मुस्लिम समाजातील काही रुढींबद्दल आणि त्याहुनही त्यात बदल घडवू पाहणाऱ्या इच्छेचा त्यांच्यातील अभाव याविषयी डॉ.आंबेडकरांनी प्रखर टिका केलीली आहे. उदा. मुस्लिम महिलांतील बुरखा पध्दती. त्याबद्दल ते म्हणतात,
’ रस्त्यातून चालत जाणाऱ्या या बुरखाधारी महिला हे भारतात आढळणाऱ्या अगदी हिणकस दृश्यांपैकी एक दृश्य आहे. पडदा पध्दतीमुळे मुस्लिम महिलांच्या शारीरिक रचनेवर अनेक दुष्परिणाम होतात. अनेमिया, क्षय, दातांचे विविध रोग, यासारख्या रोगांना त्या बळी पडतात. पाठीत बाक निर्माण होणे, हात-पाय वाकडे होणे इत्यादी. या पडदा पध्दतीमुळे मुस्लिम महिला बौध्दिक व नैतिक पोषणापासून वंचित ठेवल्या जातात. त्यांना बाह्य जगापासून पूर्णत: विभक्त केल्यामुळे कुटूंबातील लहान-सहान भांडणामध्ये त्या गुंतून राहतात. परिणामत: त्या कोत्या मनाच्या व संकुचित दृष्टिच्या बनतात. आंबेडकरांच्या मते, पडदा पध्दतीमुळे हिंदूना सामाजिकदृष्टया मुस्लिम समुदायापासून विभक्त करण्याचे कार्य घडत आहे. जे भारतातील सामाजिक जीवनाच्या विनाशाचे एक कारण आहे.’

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची खंत आहे की, मुस्लिमांनी त्या प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केल्याचा एकही पुरावा आढळत नाही.

डॉ. आंबेडकरांनी भारतीय मुस्लिम समाजाच्या सामाजिक जीवनाबरोबरच राजकीय जीवनातील भूमिका अधोरेखित करताना म्हटले आहे की, मुस्लिमांना राजकारणात काहीही रस नाही.धर्मातच त्यांना मुख्यत: रस आहे. मुस्लिम मतदार संघातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला पाठींबा देण्यासाठी ज्या अटी घातल्या जातात त्या अशा – उमेदवाराने स्वखर्चाने मशीदीतील जुने दिवे काढून त्या जागी नवे दिवे लावावे, जुन्या सतरंज्या फाटल्याने त्या नव्या आणाव्यात, मशिद मोडकळीस आल्याने तिची दुरुस्ती करावी! मुस्लिम राजकारण हें प्रामुख्याने पुराहितप्रवण आहे, आणि त्याला फक्त एक फरक कळतो, तो म्हणजे हिंदू व मुसलमांनातील फरक. मुस्लिम समाजातील राजकारणात जीवनाच्या कुठल्याही ऐहिक व धर्मनिरपेक्ष घटकाला स्थान नाही. डॉ. आंबेडकर म्हणतात, ‘त्यांना अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे, त्याविरुध्द एखाद्या संघटित समाज सुधारणा चळवळीचा अभाव होय.’ हिंदूंमधील निदान काही घटकांमध्ये अशी या सामाजिक दोषाबाबत जाणीव निर्माण झाली आहे, आणि त्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत, त्याप्रमाणे मुस्लिमांमध्ये अशी चळवळ राहोच, पण या दोषांची जाणीवही निर्माण झालेली नाही.’

इस्लाम हा सर्व लोकांना सर्व काळ सर्व परिस्थितीत योग्य ठरणारा वैश्विक धर्म आहे, हे मुस्लिमांचे मुलभूत गृहीत याला कारणीभूत आहे, असे अनेक विचारवंतानी स्पष्टीकरण दिलेले आहे.

भारतातील मुसलमानांमध्ये परिवर्तनाच्या वृत्तीचा जो अभाव दिसून येतो, याचे कारण भारतीय समाजातील विशिष्ट स्थानामध्ये शोधले पाहिजे. त्याला प्रामुख्याने हिंदू वातावरण हळूवार परंतू सातत्यपूर्ण रितीने त्याच्यावर अतिक्रमण करीत असते.ते त्याच्या गैरमुसलमानीकरण करीत आहे,असे त्याला वाटते. या संथपणे चाललेल्या इस्लामपासून परावृत्त करण्याच्या प्रक्रियेपासून बचाव म्हणून आपल्या समाजाला काय उपकारक आणि काय हानीकारक ठरेल याची चिकित्सा न करता जे जे इस्लामिक तें ते जतन करण्याचा त्यांना अट्टाहास करावा लागत आहे. दुसरे, भारतातील मुसलमानांस ज्या राजकीय वातावरणात रहावे लागत आहे, ते वातावरणसुध्दा प्रामुख्याने हिंदूच आहे. त्यामुळे आपण दडपले जाऊ आणि या राजकीय दडपणामुळे मुसलमान हे एका शोषित वर्गात ढकलले जातील अशी त्यांची भावना झालेली आहे.

राजकीय व सामाजिकदृष्टया हिंदूद्वारे होणाऱ्या अतिक्रमणापासून स्वत:चा बचाव करावा लागणार आहे. राजकीय व सामाजिकदृष्टया हिंदूद्वारे होणाऱ्या अतिक्रमणापासून स्वतःचा बचाव करावा लागणार आहे. ‘ही जाणीवच माझ्या मते भारतीय मुस्लिम इतर देशातील मुस्लिमांच्या तुलनेत सामाजिक सुधारणेच्या बाबतीस मागास असल्याचे प्राथमिक कारण आहे. जागा व पदांसाठी हिंदूशी सातत्याने भांडण्यातच त्यांची सर्व शक्ती खर्च होत आहे. सामाजिक सुधारणेच्या प्रश्नासाठी वेळ देणे, त्यासंबंधी विचारमंथन करणे आणि अवसर उपलब्ध करुन देणे या बाबी घडत असताना दिसत नाहीत. आणि जरी तसे काही घडले तरी हिंदू व हिंदूधर्माच्या उपद्रवाविरुध्द कुठल्याही किंमतीवर सामाजिक- धार्मिक संघटीत फळी उभी करु पाहणाऱ्या सांप्रदायिक तणावातून निर्माण होणाऱ्या इच्छेखाली दबून जाते, दडपले जाते.’

”भारतातील मुस्लिम समाजाच्या राजकीय कुंठितावस्थे विषयीदेखील हेच स्पष्टीकरण लागू होते. मुस्लिम राजकारणी जीवनाच्या इहवादी घटकांना त्यांच्या राजकारणाचा आधार बनवू इच्छित नाहीत. कारण त्यामुळे हिंदूविरोधी लढयात त्यांचा समुदाय कमजोर होईल, असे त्याना वाटते. गरीब मुस्लिम, गरीब हिंदूशी एकजूट करुन श्रीमंताकडून न्याय मिळवण्यासाठी झटणार नाहीत. जमीनदारांच्या जुलमाला विरोध करण्यासाठी हिंदू कुळाबरोबर मुस्लिम कुळे एकत्र येणार नाहीत. असे का? उत्तर सरळ आहे. कुळाला असे वाटते की, जर त्याने जमिनदारीविरोधी मोहिमेत भाग घेतला तर त्याला एखाद्या मुस्लिम जमिनदाराविरोधात लढावे लागेल. त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की, एखाद्या श्रीमंत मुस्लिमाचे, मुस्लिम जमिनदाराचे अथवा मुस्लिम गिरणीमालकाचे नुकसान होणे म्हणजे मुस्लिम समाजाची हानी करणे होय. कारण त्यामुळे हिंदू समाजविरोधी लढयात तो समाज कमजोर होण्याची शक्यता आहे.’

मुस्लिम समुदायावर डॉ. आंबेडकरांनी केलेली ही टीका आणि त्याच्याबद्दल व्यक्त केलेली नकारात्मक मते आंबेडकर कसे मुस्लिमविरोधी होते, हे दर्शविण्यासाठी हिंदुत्ववाद्यांना उत्साहवर्धक वाटत असतील. परंतु काय हे खरे आहे? त्यात एक अंशसुध्दा तथ्य नाही. मुस्लिम समाज इतका -हासशील व अंतर्लक्षी का आहे याबद्दल डॉ. आंबेडकरांचे विश्लेषण वाचल्यास वस्तुस्थिती नेमकी उलटी आहे हे लक्षात येते.‘प्रतिगामीपणा हा मुस्लिमांचा स्थायीभाव आहे. इस्लाम त्याच्या पलिकडे इतर विचारांना मान्यता देत नाही. त्यातच मुस्लिम समाजाच्या मागासलेपणाची कारणे शोधावी लागतात’. – हे भारतीय मुस्लिम समाजाच्या प्रतिगामी स्वरुपाबद्दल दिले जाणारे एकसाची स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे नाकारतात. त्यांना हे स्पष्टीकरण असमर्थनीय वाटते. कारण इतर देशातील मुस्लिमांनी इस्लामचा त्याग न करता मूलगामी सुधारणा घडवून आणल्या आहेत.भारतातील मुस्लिमांच्या मागासलेपणाचे कारण त्यांना त्यांच्या भोवतालच्या वैशिष्टयपूर्ण हिंदू वातावरणात सापडते. हिंदू समाजात इतरांना सहभागी करुन घेण्याची वृत्ती नाही. तिचे स्वरुप प्रभावशाली आहे. अंगभूतपणे हिंसक आहे. हिंसा हे सर्व हिंदू देवतांचे वैशिष्टय आहे. त्यांचे प्रभुत्व अमान्य करणाऱ्या लोकांसाठी आश्वासक वातावरण निर्माण करण्यास हे सक्षम नाहीत. आणि त्यामुळे हे कट्टर पुराणमतवादी बनले आहेत. या सत्य परिस्थितीच्या प्रकाशात डॉ. आंबेडकर हे मुस्लिमविरोधी होते अथवा नव्हते हे वाचकच चांगल्या प्रकारे ठरवू शकतील, असे डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी म्हटले आहे.

डॉ. आंबेडकरांच्या निर्वाणानंतर १४-१५ वर्षात महाराष्ट्रात मुस्लिम सत्यशोधक मंडळ नावाचे प्रबोधनवादी आंदोलन उभे राहिले. मरहूम हमीद दलवाईंच्या नेतृत्वाखाली २२ मार्च १९७० रोजी पुण्यात स्थापना झालेल्या या चळवळीचा प्रस्तुत लेखक संस्थापक सभासद असून १९७१ ते १९८० या काळात पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम केलेले आहे. सध्या सरचिटणीस आहे. आम्हा प्रबोधनवादी कार्यकर्त्यांना डॉ. आंबेडकरांची वरील मांडणी अत्यंत तर्कशुध्द व वस्तुस्थितीदर्शक आहे, असे वाटते. किंबहूना मुस्लिम सुधारकांच्या डोळयात अंजन घालणारी आहे. आम्ही मुल्ला-मौलवीना जबाबदर धरुन चळवळीची आखणी करीत गेलो. मुस्लिम स्त्रीवर होत असलेले अन्याय उदा. तोंडी तलाक कायद्याने बंद झाला पाहिजे, सवतबंदीचा कायदा भारतीय मुस्लिमांना लागू करावा, पुढे चालून समान नागरी कायदा व्हावा अशी भूमिका मांडत आलो.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा जाहीरनामा म्हणतो- ”भारतीय मुस्लिम समाजापुढे स्वातंत्र्योत्तर काळात नवी आव्हाने उभी राहिली आहेत.स्वातंत्र्यपूर्व काळातील सर सैयद अहमदखान यांचा मुस्लिम समाजाच्या धार्मिक आणि ऐहिक दृष्टिकोनातून मुलभूत बदल घडवून आणण्याचा आरंभीचा प्रयत्न वगळल्यास एरवी निराशाच पदरी येते. भारतीय मुस्लिम समाज या सर्व काळात आपल्या अल्पसंख्यांक स्थानाविषयी विनाकारण अतीव जाणीव बाळगून आपल्या सनातन, परंपरागत श्रध्दा कवटाळून बसलेला आणि बहुसंख्य हिंदू समाजविरोधी आंदोलने करीत राहिला. सर सैयद अहमदखानाच्या प्रयत्नाने सुरु झालेल्या मुस्लिम सुधारणांचा गाडादेखील अखेरीला विभक्तवादाच्या दलदलीत रुतून गेला. पाकिस्तानची निर्मिती आणि भारतातील हिंदू-मुस्लिम संबंधातील तफावाचा इतिहास सर्वांना माहीत आहेच.”

भारताला सर्वधर्मीय राष्ट्रीयता निर्माण करण्याच्या झालेल्या सर्व प्रयत्नात एक मूलभूत चूक सतत होत राहिली आहे. ती अशी की, हिंदू समाजाला आधुनिक, विशाल आणि पुरोगामी बनवण्याच्या आड येणाऱ्या जुनाट धर्मनिष्ठा बदलण्याचा एक सततचा प्रयत्न चालला असतानाच मुस्लिम समाजाच्या काल- विसंगत अशा परंपरागत श्रध्दांना हात न लावण्याचा आटापिटा मुस्लिम समाजाकडून करण्यात येत होता. आणि बहुसंख्य हिंदू समाजातील परिवर्तनवादी मंडळीदेर्खींल या प्रक्रीयेला कळत न कळत हातभार लावीत होता. आज देखील या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. याचा परिणाम म्हणजे हिंदू समाजात आधुनिक राष्ट्रवादाचे, धर्मनिरपेक्षतेचे आणि समानतेच्या आधुनिक मानवी मूल्यांचे प्रवाह तुलनेने अधिक बळकट होत गेले आणि मुस्लिम समाज मात्र आपल्या जुन्याच श्रध्दांना चिकटून राहिला. सुशिक्षित मुस्लिमांची मजल यामुळे विभक्तवादी प्रवृत्तीपलिकडे कधी जाऊ शकली नाही. बदललेल्या परिस्थितीचे आव्हान यामुळेच मुस्लिम समाज स्वीकारु शकला नाही.

भारतातील हिंदू आणि मुसलमान समाजातील ही प्रबोधनाची दरी भरुन काढल्याशिवाय खऱ्या अर्थाने या दोन्ही समाजाचे संबंध सुधारणार नाहीत, राष्ट्रीय एकात्मता निर्माण होणार नाही, आणि नव्या भारतातील प्रजासत्ताकात मुस्लिम समाज राष्ट्रजीवनाचा एक सन्माननीय घटक म्हणून नांदू शकणार नाही. आपण लोकशाही जीवनपध्दती स्विकारलेली असल्याने या प्रबोधनाची निकड निर्माण झालेली आहे. त्याशिवाय समाजातील सर्व क्षेत्रात स्त्री-पुरुष समानता निर्माण होणार नाही व लोकशाहीचा पाया कमकुवतच राहील.

हे कार्य व्हावे म्हणून मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना करण्यात येत आहे. ‘सत्यशोधक’ शब्दाला महाराष्ट्राच्या जीवनात एक विशिष्ट अर्थ आहे. त्यामध्ये सामाजिक सुधारणांच्या प्रखर आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. या मंडळाचे ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ’ हे नाव ठेवताना महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाची जाणीव या मंडळाच्या संस्थापक सभासदांपुढे आहे.”

आता बदललेल्या राजकीय, सामाजिक परिस्थितीचा विचार करता मंडळाने आपली भूमिका बदलली आहे. स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनी प्रथमच मुस्लिमांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रश्नांचा विचार करुन न्या. सच्चर समितीचा अहवाल पंतप्रधानांना सादर करण्यात आला आहे. त्याचा निष्कर्ष लिहीताना न्या. सच्चरनी असे नमूद केले आहे की, इथल्या बी.सी. समाजापेक्षाही येथील मुस्लिम समाज मागासलेला आहे. जे हिंदूत्ववादी पक्ष आणि संघटना म्हणत होत्या की, मुसलमानांचे लाड होतात. त्यांच्या मुस्काटात सणसणीत चपराक न्या. सच्चरनी लावलेली आहे.

या अहवालाला घेऊन मुस्लिम समाजात काम करण्याची गरज वाटली. कारण अहवाल येऊन वर्ष उलटले तरी मुस्लिम समाजाला त्याची माहिती नव्हती. इंटरनेटवर असलेला हा जवळ जवळ पाचशेहे पानांचा रिपोर्ट कोण वाचणार? मुस्लिम्स फॉर सेक्युलर डेमॉक्रसी, मुंबई या संघटनेने त्यावर एक परिषद आयोजिली होती. त्याला आम्ही उपस्थित राहिलो व तेथे त्यांनी ‘कम्युनॅलिझम कॉम्बॅट’मध्ये प्रसिध्द केलेला संक्षिप्त रिपोर्ट मिळाला. त्याचे मराठी व हिंदीमध्ये भाषांतर करुन महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाच्या सहाय्याने पुस्तिका प्रसिध्द करुन विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात सुमारे ५० गावातून मुस्लिमांच्या सभा घेतल्या. इतरही मंडळी या विषयावर काम करीत आहेत. त्या अंमलात आल्या तर मुस्लिम समाजाला फायद्याचे ठरणार आहे. पण या शिफारशी अमलात आणा म्हणून मुस्लिम समाजाचा रेटा निर्माण झाला तरच शासन त्या अंमलात आणील. म्हणून वरील प्रयत्न केले. परंतु त्याची एक चळवळ निर्माण होत नाही. छुट-पुट सभा होतात असे चित्र दिसले. असे का होते याचे उत्तर डॉ. आंबेडकरांनी केलेल्या वरील विवेचनात सापडते.

काही ठिकाणी मुस्लिमांनी अशी भिती व्यक्त केली की, आधीच इथे मुस्लिमांचे लाड होतात अशी ओरड सुरु असताना आम्ही सच्चर आयोग लागू करा अशी मागणी सुरु केल्यास काय होईल? तेव्हा सर्वोदय मंडळ व तुमर्चीं संघटना असा एकत्रित कार्यक्रम घेऊ म्हटल्यावर त्यानी ते मान्य केले व तशी परिषद घेण्याचे मुस्लिम समाजातील नेत्यांना बाजूला ठेवून सर्वसामान्य मुस्लिमांना एकत्र करुन काम करण्याची गरज आहे.

नुकतीच धुळयाला दंगल झली. तेथे सर्वोदय मंडळाची टीम गेली होती. दहा दिवस कर्फ्यु होता. ३ तास कर्फ्यु उठल्यावर आम्ही गांधींच्या पुतळयासमोर दोन दिवस सर्व धर्म प्रार्थना घेतली. दंगलीत ज्यांची घरे जळाली त्या मंडळींना भेटायला गेलो. गजानन कॉलनीमधील बरीच घरे जाळण्यात होती. पाच किलोचे गॅस सिलींडर वापरुन घरे पेटविली असे आम्हाला सांगण्यात आले. बाहेरुन आलेली मंडळी होती. तोंडाला रुमाल बांधलेली मंडळी होती. नॅशनल उर्दू हायस्कूलमध्ये मुस्लिम मंडळींचा कँप होता. तेथील लोकांची घरेदेखील वरीलप्रमाणे जाळली होती. अनेक ठिकाणची मंडळी तेथे होती.काही जण तर दंगली सुरु झाल्यावर घराला कुलूप लावून आली होती. आज घराची अवस्था काय आहे त्याना माहित नव्हते.

तेथे चार मौलाना होते. मौ. मजहरुद्दीन, मौ.मुक्तार, मौ.अबुल आस, मौ.मुक्ती कशिम. ही मंडळी स्थानिक टी. व्ही. वरून शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवाहन करत होती.

त्यांनी सांगितले की, मुस्लिम समाजाने दहशतवादाचा पुतळा जाळण्यासाठी मिरवणूक काढली होती. (खरे पाहता या त्यांच्या कृतीचे स्वागत व्हायला हवे होते.) परंतु हिंदू रक्षक समितीने अशी भूमिका घेतली की, दहशतवादी मुस्लिमच आहेत व तेच दहशतवादाचा पुतळा जाळतात म्हणजे काय?आपण त्यांच्या विरुध्द सभा घेऊ. व त्यांनी मुस्लिम दंगे घडवतात अशा आशयाचे डिजिटल बोर्डस् लावले व ते बोर्ड फाडल्यावरून दंगल सुरू झाली. येत्या निवडणूकीवर डोळा ठेवून हे घडले आहे, असे अनेकांनी सांगितले.

परंतु दोन्ही समाजातील स्रीयांना ही दंगल पसंत नसल्याचे दिसले.नेहमी आपण शेजारी शेजारी राहणार आहोत असे कसे जगता येईल? असे त्या म्हणत होत्या. तेव्हा दोन्ही समाजातील स्रिया व मुलांना घेऊन शांती मोर्चा काढावा असे आम्ही ठरविले व जिल्हाधिकारी श्रीमंती प्राजक्ता लवंगाारे यांची भेट घेतली. त्यांनी या कल्पनेचे स्वागत केले परंतु १४४ कलम उठल्यानंतर करु असे म्हणल्या.

वरील मौलानांनी आम्ही हिंदू समाजाबरोबर बसून बोलू इच्छीतो. एकमेकांची काय चूक आहे यावर चर्चा करू असे म्हणाले. तोही एक मार्ग हाताळून पहाता येईल.

हिंदू रक्षक समितीमध्ये बजरंग दल व इतर हिंदूत्वावादी संघटना आहेत. त्यांची भूमिका आक्रमक आहे.समन्वयाची नाही. याचे आणखी एक उदाहरण सांगता येईल. भाजप व संघ परिवाराने बाबरी मशिद उध्वस्त केल्यानंतर देशात हिंदू-मुस्लिम विद्वेषाचे वातावरण निर्माण झाले. यावर मार्ग काढवा म्हणून मुस्लिम सत्यशोधक मंडळाने तडजोडीचा एक मुद्दा पुढे केला की, मुस्लिम समाजाने बाबरी मशिदीच्या जागेवरील ताबा सोडून द्यावा. हिंदू समाजाने राम मंदिराबरोबर दुसरीकडे बाबरी मशिद बांधावी आणि इथून पुढे कोणत्याही मंदिर मशिदीचा प्रश्न उपस्थित न करता १९४७ ची स्थिती जैसे थे मान्य करावी.

हा तडजोडीचा मुद्दा घेऊन मुस्लिम सत्यशोधक मंडळ महाराष्ट्रात व देशभर सद्भावना यात्रा काढू इच्छित होते.आम्ही पुण्यात पत्रकार बैठक घेऊन जाहीर केले.तेव्हा विश्व हिंदू परिषदेच्या प्रवीण तोगडीया यांनी पुण्यात जाहीर केले की, ‘यह अच्छी बात है, हम राम जन्मभूमि की जगह ले लेंगे और काशी मथुरा के लिए और लढ़ेंगे’ तोगडीयांच्या या आढयताखोर भूमिकेमुळे मंडळाची सद्भावना यात्र निघू शकली नाही. हिंदूत्ववादी संघटनांच्या या आक्रमक भूमिकेचा पुढचा भाग म्हणजे भारत हे हिंदू राष्ट्र आहे ही भूमिका.

‘भारतात इतर धर्मांचे लोक आहेत.आम्ही मुस्लिम आहोत. फाळणीनंतर फक्त २० टक्के मुस्लिम पाकिस्तानात गेले. ८० टक्के मुस्लिम मेरा देश मेरी मिट्टी म्हणतात. इथे राहिले आहेत, ते मुख्यतः धर्मांतरीत आहेत. आम्ही कांही अरबस्तानातून आलेलो नाही. हिंदु धर्मातील चातुरर््वण्य व्यवस्थेने केलेल्या अनन्वित अत्याचारामुळें हिंदू धर्मातील विशेषत: अस्पृश्य जमातीने हिंदू धर्म टाकून कोणी मुस्लिम, कोणी ख्रिश्चन तर कोणी बौध्द धर्म स्विकारला आहे. त्यामुळे आम्ही आज मुस्लिम असलो तरी आम्ही या देशाचे भूमिपूत्र आहोत.तेंव्हा आम्हां सर्वाना घेऊन हिंदू राष्ट्र बनवावे लागेल व भारताची धर्मनिरपेक्ष घटना कायम ठेवूनच ते करावे लागेल. तसेच जो जो भारतीय वंशांचा आहे; मग त्याचा धर्म कोणताही असो. त्या प्रत्येकाला इथे राहण्याचा व आपला विकास करून घेण्याची संधी असली पाहीजे,अशी व्यवस्था असणारे हिंदू राष्ट्र असायला आमची हरकत असणार नाही.’

या संदर्भात डॉ. आंबेडकरांनी झरज्ञळीींरप ेी ींहश झरीींळींळेप ेष खपवळर या पुस्तकात आपली भूमिका मांडली आहे की, ‘हिंदू राज्या’विषयी मुस्लिमांच्या मनातील कुशंकांचा आधार नष्ट करुन आंबेडकर जाहिरपणे भविष्यवाणी करतात,’ हिंदु राज्य अस्तित्वात आले तर ते या देशासाठी फार भयंकर संकट ठरेल यात शंका नाही. हिंदू काहीही म्हणोत, परंतू हिंदू धर्म हा स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वांना उपद्रवकारक आहे. त्याबाबतीत तो लोकशाहीशी विसंगत आहे. त्यामुळें कोणत्याही परिस्थितीत ‘हिंदू राज्या’ला प्रतिबंध केलाच पाहिजे. ‘अनेक देशांमध्ये बहुसंख्यांक-अल्पसंख्यांक हा विवाद असला तरी कुठेही जमातवादी राज्य उदयाला आल्याचे दिसत नाही. उदा. कॅनडामध्ये ब्रिटीशराज, दक्षिण आफ्रीकेमध्ये डचराज, अथवा स्वित्झर्लंडमध्ये जर्मनराज आले नाही, असे ते नमुद करतात,’ एखाद्या देशातील विविध समुदयांच्या सापेक्ष क्षमतांमध्ये लक्षणीय तफावत असल्यामुळेच जमातवादी राज्य संभावते. जमातवादाला राजकारणाला मध्ये परवानगी न दिल्यामुळेच या देशांना जमातवादी राज्यांचा उदय रोखता आला आहे.’

हिंदू धर्मातील साम्राजवादी वैशिष्ठयांमुळे अल्पसंख्यांकांसाठी शांततामय सहजीवन जगण्यासाठी आवश्यक ती परिस्थिती निर्माण होऊ शकेल, या बददल डॉ.आंबेडकर जरी साशंक असले तरी मुस्लिमांच्या अल्पसंख्यांक जमादवादाचीसुध्दा ते हयगय करीत नाहीत. जमातवादाचा राक्षस निर्माण करण्याबद्दल त्यांना दोष देत ते म्हणतात,’ हिंदू महासभा आणि त्यांच्या हिंदूशाही व हिंदू राज्याच्या घोषणांबद्दल मुस्लिम आक्रोश करत आहेत,पण या साठी कोण जबाबदार आहे?

हिंदू महासभा आणि हिंदू राज्य या मुस्लिमांनी मुस्लिम लिग स्थापन करुन स्वत:वर ओढवून घेतलेल्या अनिवार्य अशा दैवी शिक्षा आाहेत. ही क्रिया आणि प्रतिक्रिया आहे. एकीमुळे दुसरीला बळ मिळते. फाळणी नव्हे, तर मुस्लिम लिगचे विसर्जन आणि हिंदू मुस्लिमांच्या मिश्र पक्षाची स्थापना हाच हिंदू राज्याचे पिशाच्च गाडून टाकण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे.’ हिंदू व मुस्लिमांचा मिश्र पक्ष स्थापण्यात त्यांना कोणतीच अडचण दिसत नाही. ‘हिंदू समाजात असे अनेक कनिष्ठ स्तर आहेत, की ज्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि सामाजिक गरजा बहुसंख्य मुस्लिमांप्रमाणे आहेत आणि जे शेकडो वर्षापासून त्यांचे साधे मानवी हक्कही नाकारणाऱ्या व हिरावून घेणाऱ्या उच्च जातीय हिंदूपेक्षा मुस्लिमांबरोबर समान ध्येय गाठण्यासाठी एकत्र येण्यासाठी निश्चितच तयार होतील.’ आंबेडकरांना हे साहसवादी वाटत नाही.१९२०ते १९३७ या काळात माँटेग्यू- चेम्सफोर्ड सुधारणांर्गत बहुसंख्य प्रांतात मुस्लिम, ब्राम्ह्मणेतर आणि मागासवर्गीय यांनी एकत्र येऊन या सुधारणा राबवल्या, याची ते आठवण करुन देतात. त्यांच्या मते,’ हिंदू व मुस्लिमांमध्ये जातीय सलोखा राखून हिंदू राज्याचा धोका नष्ट करण्याची ही सर्वात फलदायी पध्दत आहे.’

शरद जोशी: शहरी आणि ग्रामीण

कल्याणकारी राज्य आणि कल्याणकारी अर्थशास्त्र ( welfare state and economics) या दोन्ही संकल्पना शरद जोशींना अमान्य होत्या. सरकारच्या हस्तक्षेपामुळे, व्यक्तीमधली जबाबदारी घेण्याची वृत्ती कमी होते. लोक आशाळभूतपणे मदतीसाठी सतत सरकारकडे डोळे लावून बसतात. व्यक्तीची आत्मप्रतिष्ठा, स्वातंत्र्य, निर्णय क्षमता, धोका पत्करण्याची वृत्ती हळूहळू क्षीण होत जाते. सततच्या संरक्षणामुळे, आधारामुळे परावलंबी झालेल्या माणसाची स्थिती काय होते? चांदवडच्या महिला अधिवेशनात एका कार्यकर्ती बहिणीने सांगितलेली हकीकत यासंदर्भात शरद जोशी दृष्टांत म्हणून सांगतात. ''चांगली पन्नास-साठ वर्षांची बाई, संध्याकाळ झाली की किंवा दिवसासुद्धा घराबाहेर पडायचं असेल तर, पाच वर्षांच्या लहान मुलाला बरोबर घेते आणि म्हणते, पुरूष माणसाची सोबत असलेली बरी''. थोडक्यात काय, सततच्या परावलंबित्वामुळे माणूस आत्मविश्वास गमावून बसतो

शरद जोशींचा स्वतंत्रतावाद 'भांडवलवादी' नाही तर तो 'उद्योजकतावादी' आहे. त्यांच्या स्वतंत्रतावादात, संशोधन करणाऱ्यांना, धडाडी दाखवून उद्योगव्यापार उभे करणाऱ्यांना महत्त्व आहे. जोशी म्हणतात, ''विविधता तयार करणारा उत्पादक आणि त्याचा उपभोग घेणारा ग्राहक ही एकाच व्यक्तीची दोन अंग आहेत.
माणसानं उत्पादन करावं, ते जगासमोर ठेवावं, जगाच्या नजरेत त्याच्या या नजराण्याचे जे काही मोल असेल त्याप्रमाणे उत्पादकाला मोबदला मिळावा, त्यात कोणाचाच हस्तक्षेप असू नये अशी अर्थव्यवस्था स्वतंत्रतावाद मानतो.''
'सरकारी हस्तक्षेप नको, खुली बाजारपेठ असावी'
सरकारी हस्तक्षेप नको. खुली बाजारपेठ असावी असे शरद जोशी म्हणतात. हे म्हणताना ते खुल्या अर्थव्यवस्थेच्या विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतात. खुल्या अर्थव्यवस्थेचे विरोधक, खुली अर्थव्यवस्था म्हणजे चंगळवाद असा आरोप करतात.
पण शरद जोशींच्या मते, "बाजारपेठेच्या व्यवस्थेत उत्पादन वाढ करून उपभोग वाढवण्यासाठी धडपड सुरू असते ही कल्पनाच चुकीची आहे. धडपड उपभोग वाढवण्याची नाही, तर विविधता आणि विपुलता वाढवण्याची आहे. तिचा हेतू लोकांना निवडीचं अधिकाधिक स्वातंत्र्य देण्याचा आहे. क्षणोक्षणी उपभोग तर अपरिहार्य आहेच. जनावरही उपभोग घेतात आणि माणसही घेतात. मग दोघांमध्ये फरक काय? जनावरं निसर्गानी जेवढं त्यांच्यापुढे ठेवलं त्यातूनच निवड करून त्याचा उपभोग घेतात. पण माणूस निसर्गापलीकडे विविधता तयार करतो''.

उदाहरणाने हे अधिक स्पष्ट होईल. आपण निवारा किंवा आवासाचं उदाहरण घेऊ. जनावरं निसर्गाने दिलेल्या वातावरणात राहतात. काही प्राणी नैसर्गिक गुहांमध्ये, काही झाडावर, काही पाण्यात, काही जमिनीवर...पण माणसाने निसर्गातील घटकांवर प्रयोग करून सिमेंट बनवलं, विटा बनवल्या, टाईल्स बनवल्या. त्यातून पक्की सिमेंट-विटांची घरं बांधली.
पुढे त्या घरातही त्यानं अनेक तऱ्हेने सौंदर्य आणलं. इंटिरिअर डिझाईन आलं. मग वेगवेगळ्या दर्जाचे, प्रकारचे रंग आले. टाईल्सचे मार्बल, ग्रॅनाईट असे अनेकविध प्रकार आले. फर्निचर, नळाच्या तोट्यांपासून ते मॉड्यूलर किचनपर्यंत विविधता आली. थोडक्यात काय तर उपभोग नाही तर उपभोगाची गुणवत्ता आणि विविधताही माणसाची प्रेरणा आहे. ती प्रेरणा खुली अर्थव्यवस्था पूर्ण करते. यात माणसाच्या प्रतिभेला, कल्पकतेला वाव आहे, संधी आहे.

याच्याच पुढे जाऊन शरद जोशी आपली स्वातंत्र्याच्या कक्षा ( Degree of freedom ) ची संकल्पना मांडतात. हा त्यांचा अत्यंत मौलिक विचार आहे असं मला वाटतं. ते म्हणतात, "माणसाच्या आयुष्याची गुणवत्ता कशी ठरवायची? त्यासाठी खालील निकष आहेत.
१) आयुष्यात तुम्हाला निवड करण्याची संधी किती वेळा मिळते? उदाहरणार्थ- गरिबांना निवडीची संधी मिळतच नाही. गरिबाच्या पोराला खेळायला एक लाकडी बैल मिळाला तरी खूप कौतुक; पण श्रीमंताचं पोर पाचशे प्रकारची खेळणी घेऊन खेळतं, कॉम्प्युटरवर खेळतं, मोबाईलवर खेळतं. त्यातून ते निवड करू शकतं. शाळा असो, खेळ असो, व्यवसाय असो गरिबाच्या पोराला निवड करण्याची संधी कमी तर श्रीमंताच्या पोराला ती जास्त असते.
२) निवड करण्याची संधी मिळाल्यावर निवडीसाठी किती पर्याय असतात? म्हणजे गावातल्या मुलाला शाळेत जायची संधी मिळते तेव्हा पर्याय फक्त जिल्हा परीषदेचा असतो. शहरातल्या मुलाला शाळानिवडीसाठी मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, अर्ध-इंग्रजी माध्यम असे अनेक पर्याय असतात.
३) निवडीसाठी जे पर्याय उपलब्ध होतात ते किती व्यापक असतात? गावातील शाळेत एकच अभ्यासक्रम तोही मराठी माध्यमातून. शहरात एसएससी बोर्ड, सीबीएसई बोर्ड, आयसीएसई बोर्ड, फ्रेंच, जर्मन पासून अनेक भाषा शिकण्याची संधी.''
इथेच त्यांच्या इंडिया आणि भारत या संकल्पनेचा उगम कळून येतो. निवडीच्या स्वातंत्र्याच्या आधारावरच त्यांनी ही मांडणी केली आहे.
इंडियातल्या माणसांना निवडीचं स्वातंत्र्य आहे, ते उपभोगताना अनेक विकल्प उपलब्ध आहे. भारतातल्या लोकांना ते नाही. म्हणूनच सर्वांना निवडीचं स्वातंत्र्य उपलब्ध करून देणारी व्यवस्था हवी. कवी बी यांनी म्हटले आहे, ''ते स्वातंत्र्य खरे न फक्त अपुले जे तोडीते बंधने, अन्यांच्या पदश्रृंखलाच बघते निष्कंप ऐशा मने''. त्यादृष्टीने अन्यांच्या पायातील बेड्या तोडणारी खुली अर्थव्यवस्था ही स्वतंत्रतेची पहिली पायरी आहे असे जोशी मानतात.

सोलापूर शहरातील वास्‍तू आणि वैशिष्‍ट्ये

सोलापूर कर्नाटकच्या सीमेवर वसले आहे. सोलापुरात बहुभाषिक नागरिक आहेत. त्यास हजार वर्षांचा इतिहास आहे. ते पूर्वी सोन्नलगी या नावाने प्रसिद्ध होते. बाराव्या शतकात श्रीशिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी या नगराची रचना केली. त्यांनी तेथे अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली. छत्तीस एकर क्षेत्रफळ असलेले सरोवर निर्माण केले. त्यालाच सिद्धेश्वर तलाव असे म्हणतात. सिद्धरामेश्वरांनी समाजसुधारणेची लोकोपयोगी कामे केली.
सोलापूर हे कापडगिरण्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. कापड उत्पादनास तेथे 1877 साली प्रारंभ झाला. ‘सोलापूर स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ ही पहिली गिरणी. ती ‘जुनी मिल’ म्हणून प्रसिद्ध होती. त्या मिलमध्ये तेलगू भाषिक समाज त्यांच्या वस्त्र विणण्याच्या कौशल्याबद्दल नावाजला गेला. ‘जुनी मिल’ हे सोलापूरचे वैभव मानले जाई.
शेठ गोकुळदास मोरारजी हे तिचे मालक! त्यांनी त्या काळी वीजनिर्मितीसाठी मिलच्या आवारात मोठे हौद व विहिरी खोदून पॉवर हाऊसही बांधले. पूर्ण सोलापूरचे रस्ते त्या वीजेमुळे प्रकाशित झाले. मिल अठ्ठ्याऐंशी एकर क्षेत्रात वसली आहे. मिलची चिमणी तीनशेपंचवीस फूट उंच होती व ती आशिया खंडातील सर्वांत उंच चिमणी ठरली. दुस-या महायुद्धात सैनिकांच्या छावणीसाठी लागणारे तंबूचे कापड त्या मिलमधून तयार होत असे. नंतरच्या काळात सोलापुरात अनेक गिरण्या उभारल्या गेल्या.
‘नरसिंग गिरजी’ ही मिल मिळालेला नफा कामगारांना वाटत असे! त्या मिलच्या आवारात अडीचशे वर्षांहून अधिक जुने वडाचे झाड आहे, त्याचा बुंधा तब्बल पंधरा फूट रुंद आहे. त्याच आवारात पाउणशे वर्षांपूर्वीचे लाकडी देवघर आहे. त्यातील गणपतीची मूर्ती साडेसहा फूट उंच आहे. देवघराचे नक्षीकाम रेखीव आहे. एकशेपंधरा वर्षांनंतरही पाणी पुरवणारी चौकोनी दगडी विहीरही तेथेच आहे.
सोलापुरातील चाळी प्रसिद्ध आहेत. वीरचंदपूर चाळ 1944 साली उभारली. तेथे चारशेअठ्ठ्याऐंशी घरे आहेत, तर एस.जी. वारद चाळीत तीनशेएक घरे आहेत.
कवी कुंजविहारी ऊर्फ हरिहर गुरुनाथ सलगरकर हे ‘लक्ष्मीविष्णू मिलमध्ये (1896 ते 1978)’ काम करत. लक्ष्मी विष्णू चाळीत घरे होती सातशेपन्नास. माधवराव आपटे यांनी ती मिल चालवायला 1966 मध्ये घेतली. त्या काळी चाळीचे भाडे तीन रुपये महिना असे (तेव्हा पाव दहा पैशांला व बुंदी पंधरा पैशांला मिळे). चाळींची डागडुजी चाळींचे मालकच करत.
शहराला हिप्परगा तलावातून पाणीपुरवठा होई. म्हणून अनेक विहिरी खोदल्या गेल्या. त्यांपैकी साखरपेठमधील विहिरीला गोड पाणी लागले. म्हणून त्या पेठेला साखरपेठ म्हणत. तेथेच सिद्धेरामेश्वरांच्या जन्माचा उल्लेख आहे. तेथेच हिंगलाजमाता मंदिर आहे. तिचे उगमस्थान बलुचिस्तानात असल्याचे दाखले मिळतात. त्याच भागात लाकडाचा बाजार होता. त्याला तेलगुमध्ये ‘कट्टेलसंता’ म्हणतात. त्या नावाचे प्रसृतिगृह त्र्याऐंशी वर्षांनंतरही कार्यरत आहे. त्याच पेठेतील पद्मा टॉकीज 1946 पासून टिकून आहे.
त्या पेठेतील सोमा कुटुंबीय हातमागावर सुंदर व सुबक कलाकृती विणतात व त्यांनी बनवलेल्या वॉलहँगिंगना जगभरात मागणी आहे. ते कुटुंब 1965 पासून वॉलहँगिंगच्या व्यवसायात आहे. साखरपेठेत राहणारे आणखी एक नाव आहे व्यंकटेश कोटा! भुयारी गटारे व ड्रेनेज साफ करणारी ‘व्यंकटगिरी यंत्रे’ बनवणारे व्यंकटेश कोटा फक्त पाचवीपर्यंत शिकलेले आहेत. पण त्यांच्या यंत्रांना अमेरिका, इंग्लंड व युरोपमध्ये मागणी आहे. त्यांनी त्यांच्या वयाच्या पंधराव्या वर्षी ते यंत्र बनवले. त्यांचा कारखाना सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर देगाव येथे आहे.
तुकाराम महाराज जोशी यांना वैष्णव संप्रदायाचे कुलगुरू मानतात. त्यांचा जन्म1910 सालचा. त्यांनी पंढरपूरला दिंडी नेण्याची सुरुवात सत्तर वर्षांपूर्वी केली. ती प्रथा अजूनही सुरू आहे. त्यांनी 1जानेवारी 1995 रोजी रविवार पेठेत जिवंत समाधी घेतली. त्यांचा समाधी सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. पद्मशाली समाज म्हणजे विणकर व विड्या वळणारे! तो समाज 1845 मध्ये सोलापुरात आला.
लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना ज्या ‘आजोबा गणपती’वरून सुचली ते मंदिर शुक्रवार पेठेत आहे. तेथे सार्वजनिक गणेशोत्सव इसवी सन 1885 पासून साजरा होतो. टिळक यांनी पुण्यातील सार्वजनिक गणपती 1893 मध्ये सुरू केला, त्याआधी आठ वर्षे! तो गणपती इको फ्रेंडली साहित्य वापरून बनवला गेला आहे व ती मूर्ती एकशेअठ्ठावीस वर्षांची जुनी आहे याचे आश्चर्य वाटते. अनेक मान्यवरांनी त्या मंदिरास भेट दिली असून तो मानाचा गणपती आहे. त्याच पेठेत गेली शंभर वर्षे दूध बाजार चालतो. ‘सोलापूर समाचार’ हे साप्ताहिक 1885 साली त्याच भागात सुरू झाले व त्याचे दैनिकात रूपांतर 1930 मध्ये झाले, पण ते 1988 साली बंद पडले. त्याच जक्कल कुटुंबीयांचे ‘विश्व समाचार (1976)’ मात्र सुरू आहे. त्याच भागात शंभर वर्षांपासून ‘भांडे’ गल्ली आहे. सर्व धातूंची भांडी, पलंग, कपाटे, ट्रंका तेथे मिळतात.
वड, लिंब व पिंपळ या वृक्षांचा संगम असलेले शहरातील एकमेव ठिकाण शनिवार पेठेत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पाहण्यास मिळते.
भवानी पेठेतील कृषी विद्यालयात आधुनिक शेतीचे शिक्षण मिळते. त्याचे क्षेत्र साडेअकरा एकर आहे. ते विद्यालय गेली सहासष्ट वर्षे सोलापूरला वरदान ठरले आहे.
सोलापूरकरांचे आणखी एक आराध्य दैवत असलेली रूपाभवानी, तिचे मंदिरही भवानी पेठेत आहे. ती मूर्ती तुळजापूरच्या तुळजाभवानीशी मिळतीजुळती असल्याने ती रुपाभवानी! नवरात्रात तेथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो. दीड एकर जागेत सभामंडप व मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला आहे. शहरातील जोडभावी पेठेत सर्व काही मिळते. मंगळवार बाजारात भाजीपाला, फळे, दूध, तूप, इतर खाद्यपदार्थ, कपडे, अवजारे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, धान्य हे सर्व वाजवी भावात मिळते.
हातमागावर साड्या विणणारी पेठ म्हणजे आंध्र-भद्रावती/दाजी पेठ. तेथे तेलगू समाज इरकली, जपानी, मोठी किनार, श्यामसुंदर किनार अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या साड्या विणत असे. आता आंध्र-भद्रावती पेठ ही यल्लमा पेठ म्हणून ओळखली जाते. दाजी पेठेत दाक्षिणात्य पद्धतीचे सुंदर व्यंकटेश्वर मंदिर, म्हणजे तिरुपती बालाजीची प्रतिकृती आहे. जवळ, तितकेच सुंदर राममंदिर आहे. पाच्छा पेठेतही दाक्षिणात्य बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेले कालिकादेवी मंदिर आहे. त्याच पेठेत नऊवारी लुगडी व सतरंज्या बनवणारे हातमाग होते.
बेगम पेठ – सोलापुरवर औरंगजेबाचे वर्चस्व असताना तो ब्रम्हपुरी (ता. मंगळवेढा) येथे सात वर्षे राहिला. तो जुम्मा आणि ईद नमाजासाठी सोलापूरच्या जामे मशिदीत जात असे. तो खुद्द सोलापुरातही तेरा महिने राहिला होता. त्याची फौज बेगमपेठेत असायची. त्याच्याबरोबर त्याची चौथी पत्नी (बेगम) उदयपुरी व मुलगी झीनतल्लीसा होती. त्या वेळपासूनचे बेगमपुरा नंतर बेगम पेठ झाले आहे. ती व्यापा-यांची व कष्टक-यांची पेठ म्हणून प्रसिद्ध आहे.
सोलापूरच्या सिद्धेश्वर पेठेतील सिद्धेश्वर मंदिर, मार्कंडेय मंदिरही प्रसिद्ध आहेत. त्या पेठेत अनेक कलावंत झाले. नाट्य-कलागुणांची जणू तेथे मांदियाळी होती.
दीडशे वर्षे कार्यरत असलेले ‘हिराचंद नेमचंद वाचनालय’ हे सोलापूरची शान आहे. शहरवासीयांची बौद्धिक भूक भागवण्याचे काम ते वाचनालय करते. त्याचे तीन हजार सभासद आहेत. ते वाचनालय मुरारजी पेठेत आहे. वाचनसंस्कृतीबरोबर अनेक कार्यक्रमही त्यांच्या ‘टिळक स्मारक सभागृहा’त होत असतात. त्याच पेठेत राघवेंद्र स्वामी मठ आहे व तेथे हजारो भक्तगण अध्यात्माची परंपरा जोपासत आहेत.
साठ फुट खोल व तीस फुटापर्यंत पाय-या असलेली, संपूर्ण दगडी बांधकाम असलेली गंगा विहीर ही नवी पेठचे वैशिष्ट्य आहे. त्याच नवी पेठचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ‘नामदेव चिवडा’! तो त्याची ओळख गेली एकशेचाळीस वर्षे टिकवून आहे. त्याच पेठेत छत्रपतींच्या कार्याची ओळख सांगणारे ‘शिवस्मारक’ एक एकर चौदा गुंठे जागेवर उभे राहिले आहे. राष्ट्रसेवेची प्रेरणा देणा-या त्या कार्यकेंद्रात विविध व्याख्याने, प्रवचने, स्पर्धा होत असतात. एक संग्रहालयही तेथे आहे. तसेच व्यायामशाळा, भौतिक चिकित्सा केंद्र आहे.
गावठाण भाग विकसित करून बनवलेली ती ही नवी पेठ! सोलापूरचे वैभव असलेला भुईकोट किल्ला त्याच पेठेत आहे. तो 1358 ते 1375 या दरम्यान बांधला गेला असावा. तेथे आतमध्ये बाग बनवली आहे, अठराव्या शतकातील दोन तोफा आहेत. देवालयासारखी एक वास्तू असून त्यावरील शिल्पकला हिंदू राजांनी केलेली आहे. त्या मंदिरातील शिवलिंग मल्लिकार्जुन मंदिरात आणले असावे असे सांगण्यात येते.
ज्योतिषशास्त्राला पंचांगाचा आधार देणारे कै. ल.गो. दाते यांनी 1916-17 मध्ये दाते पंचांग प्रसिद्ध केले. त्यांनी गणितातील स्थुलता घालवून अधिक सूक्ष्म असे दृक्गणित स्वीकारले व पूर्वीची ‘घटी-पळे’ देणारी वेळ रद्द करून घड्याळाच्या वेळा दिल्याने ते लोकप्रिय झाले. दाते पंचांगकर्ते लोकांकडून आलेल्या प्रश्नांचे
 निरसन करतात. त्यांची पंचांगे 1939 पासून पाच पाच वर्षांच्या संचात उपलब्ध झाल्याने अभ्यासकांची सोय झाली आहे. त्यांचे स्वत:चे गणेशमंदिरही आहे.
सोलापूरच्या दक्षिण कसबा पेठेतील ‘सुंद्री’ वादन म्हणजे सोलापूरची शान आहे. सुंद्री म्हणजे आकाराने छोटी सनई. सुंद्रीवादन कलेला जाधव घराणे सात पिढ्यांपासून जोपासत आहेत. अक्कलकोटच्या संस्थानचे राजा फत्तेसिंह यांनी ते वादन ऐकून तिला ‘सुंद्री’ हे नाव दिले. ती खैर वा सिसम लाकडाची बनवतात. लांबी अकरा इंच, त्यावर नऊ स्वररंध्रे असून वरील भाग निमुळता असतो. खालील भाग चंबूसारखा व मुखभागी ताडाच्या पानाची पत्ती असते. सुंद्रीवादनाला ‘खुर्दक’ या तालवाद्याची साथ असते.
प्रवचनकार, किर्तनकार, कविवर व लोकशाहीर अशा अनेक बिरुदावलीने अजरामर ठरलेले राम जोशी हे उत्तर कसब्यात जन्माला आले. ते आठशे वर्षांची परंपरा असलेल्या जोशी घराण्यात 1760 वा 1762 साली जन्मले. त्यांच्या घराण्याकडे पूर्वापार ग्रामजोशी हे मानाचे पद होते. ते आता त्यांच्या सहाव्या पिढीकडे आहे. – सुमारे एक हजार वर्षांपासूनचा देशमुखवाडा दक्षिण कसब्यात आहे. सिद्धरामेश्वरांचा आठशे वर्षांपूर्वीचा योगदंड त्या वाड्यात पुजला जातो.
सोळाव्या शतकातील मल्लिकार्जुनाचे हेमाडपंती मंदिर उत्तर कसबापेठेत आहे. तेथे दीडशे फूट खोलीची प्राचीन विहीर स्वच्छ पाण्याने भरलेली असते. त्या भागातील पत्रा तालीम प्रसिद्ध आहे.
हरिभाई देवकरण प्रशाला 1918 साली स्थापन झाली. ती शतकाच्या उंबरठ्यावर आहे. तर त्याच रेल्वे लाईन भागातील दुसरी नामवंत जुनी शाळा म्हणजे सोलापूर हायस्कूल! त्याच्या नंतर नॉर्थकोर्ट ही प्रशाला स्थापन झाली, 1855 साली! तब्बल एकशेसाठ वर्षांची ती प्रशाला होती सोलापुरातील पहिले हायस्कूल! संपूर्ण इमारत दगडी बांधणीची असून इतर अभ्यासक्रमांसाठी आणखी सहा इमारती बांधल्या गेल्या आहेत. त्या प्रशालेतील नामवंत विद्यार्थी आहेत – डॉ. द्वारकानाथ कोटणीस, शिल्पकार रावबहाद्दर मुळे, स्वामी रामानंदतीर्थ, शंतनुराव किर्लोस्कर, वालचंद हिराचंद, शेठ गुलाबचंद व रतनचंद हिराचंद, कवी कुंजविहारी, सोलापूरचे ‘विश्वकर्मा’ – नानासाहेब चक्रदेव, माजी नगराध्यक्ष – बाबासाहेब वारद, सर अब्दुल लतिफ, व्ही. आर. कुळकर्णी, मारुती चित्तमपल्ली, लक्ष्मी उद्योगसमूहाचे जयकुमार पाटील इत्यादी. त्या नामवंत शिक्षणसंस्थांप्रमाणेच गेल्या एकशेतेरा वर्षांपासून कार्यरत असलेले पहिले ‘महिला अध्यापक विद्यालय’ असलेले ‘मेरी बोर्डिंग विद्यालय’ व ‘वोरोनीको प्रशाला’ अतिशय प्रसिद्ध आहे.
- हरीश केंची
९४२२३१०६०९

भाजपेयींचे मुद्दे ऐरणीवर...!


"देशातलं राजकारण बघा कसं असत! अटलजींनी एनडीएची मुहूर्तमेढ रोवताना भाजपेयींच्या अत्यंत जिव्हाळ्याचे असे अयोद्धेत राममंदिर, समान नागरी कायदा आणि कश्मीरबाबतचं ३७०वं कलम हे तीनही मुद्दे सोडून दिले होते. पण गत पांच वर्षांत भाजपेयींनी हे मुद्दे उठविले नाहीत तरीही आज ते ऐरणीवर आले आहेत. याला म्हणतात राजकारण! 'मनातलं साध्य करायचं पण त्याचा डंका पिटायचा नाही!' ही आहे मोदी शैली. भाजपेयींच्या राजकारणाची ही झलक आपल्याला दिसून आलीय. आगामी काळात ते कसं आणि काय राजकारण करतील हे पाहणं राजकीय निरीक्षकांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे! भाजप आता सर्वसमावेशकता आणणार की, आपलं राजकारण रेटणार याची कसोटी लागणार आहे!"
-----------------------------------------------

*स* हा-सात वर्षापुर्वी लोकसभा निवडणूका ऐन भरात आल्या असताना नितीशकुमार यांनी भाजपाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा नितीश आणि त्यांच्या निकटवर्तियांनी केलेला युक्तीवाद आज कोणालाही आठवत नाही, याचे नवल वाटतं. दोन दशकापुर्वी म्हणजे १९९६ च्या सुमारास मुंबईच्या रेसकोर्स मैदानावर भाजपाचं राष्ट्रीय अधिवेशन भरलेलं होतं. तेव्हा समता पार्टी म्हणून नितीशकुमार आणि जॉर्ज फ़र्नांडीस यांनी जनता दलाबाहेर पडून लालूप्रसाद यादव यांच्या विरोधात वेगळी चुल मांडलेली होती. फ़र्नांडीस गंभीर आजारी होते आणि त्यांना मुंबईला येणं शक्य नव्हतं. तेव्हा त्यांचे प्रतिनिधी म्हणून भाजपाच्या या अधिवेशनाला जया जेटली आणि नितीशकुमार यांनी हजेरी लावलेली होती. तिथून मग भाजपानं कॉग्रेसला पर्याय म्हणून आघाडीचं खरं राजकारण सुरू केलं. तेव्हा फ़क्त जागावाटप झालं होतं आणि १९९८ च्या निवडणूक निकालानंतर सुशासनाचा अजेंडा बनवून एनडीए म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना झाली. त्यात भाजपानं इतर पक्षांच्या तीन अटी मान्य केल्या होत्या. अयोध्येतील राममंदिर, समान नागरी कायदा आणि काश्मिरला खास दर्जा देणारे ३७० कलम घटनेतून रद्द करण्याचा आग्रह, भाजपेयींचे हे तीन कळीचे मुद्दे भाजपनं बाजूला ठेवलं. म्हणून अन्य पक्ष त्यांच्या सोबत आले. त्यातून अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालचं पहिले संयुक्त सरकार स्थापन होऊ शकलं. थोडक्यात भाजपनं आपला हिंदूत्वाचा अजेंडा गुंडाळून ठेवण्यावरच ही आघाडी घेऊ शकलेली होती. पुढे कारसेवकांवरील गोध्रातील हल्ला आणि  त्यानंतर उसळलेली गुजरातची दंगल, यामुळं वाजपेयी सरकारवर ठपका आला. तरी हिंदूत्वाचा मुद्दा भाजपाने कधी पुढे आणला नव्हता. पण नितीशकुमार यांनी मोदींना विरोध करण्यासाठी तोच मुद्दा उकरून काढला आणि भाजपची दीर्घकालीन सोबत सोडून दिलेली होती. कारण मोदी हे हिंदूत्वाचे प्रतिक असल्याचा नितीश यांचा आरोप होता.

*भाजपेयींच्या मुद्द्यावर मोदी यांचं मौन!*
नितीशकुमार आणि त्यांच्या सहकार्‍यांनी तेव्हा सतत एनडीएचा पाया हा या तीन अटीवर असल्याचं ठासून सांगितलं होतं आणि नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्रीपदाचे भाजपचे उमेदवार झाल्यानं भाजप पुन्हा तेच तीन मुद्दे आणि हिंदूत्वाचा झेंडा खांद्यावर घेत मार्गक्रमण करीत असल्याचा आरोप चालविला होता. त्यात तथ्य असले तरी त्याचा कुठलाही पुरावा त्यांना कधीच समोर आणता आला नाही. मात्र त्या आरोपाचा आधार घेऊन तथाकथित पुरोगामी पक्ष आणि प्रसिद्धीमाध्यमांनी 'मोदी म्हणजेच हिंदूत्व' असे काहूर माजवलेलं होतं. त्या दरम्यान भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून अमित शहांनी सुत्रे हाती घेतली आणि उत्तरप्रदेशचे प्रभारी म्हणून शहा तिकडे दाखल झाले. पहिल्याच दिवशी त्यांनी अयोध्येत जाऊन तिथं असलेल्या तात्पुरत्या मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेतलं. त्याचा अर्थच भाजपाने मंदिराचा छुपा अजेंडा हाती घेतल्याचाही गदारोळ झालेला होता. पण मोदी किंवा शहा यांनी चुकूनही अशा विषयांना कधी हात घातला नाही, की त्यावरून कधी रान उठवलं नाही. साहजिकच पुढल्या सहा महिन्यात अनेक लहानसहान पुरोगामी पक्षही नव्यानं उभ्या होणार्‍या एनडीएमध्ये येत गेले आणि मोदींचे हात बळकट करत गेले. मोदींनी आपल्या प्रचारात विकासाचं सूत्रं घेतलं होतं आणि भ्रष्टाचारमुक्त भारताची भूमिका ठासून मांडण्याला प्राधान्य दिलेलं होतं. साहजिकच कुठेही त्या मुळच्या तीन वादग्रस्त विषयांचा उल्लेख व्हायचं जणू बंद होऊन गेलं. लोकसभेत भाजपाला मोदींनी स्पष्ट बहूमत मिळवून दिले, अधिक मित्र पक्षांच्या सहकार्यामुळे संसदेत भक्कम पाठबळावर मोदी सरकार काम करू लागले. गेल्या पांच वर्षात कोणालाही त्या तीन वादग्रस्त विषयांची आठवणही राहिली नाही. अधूनमधून योगी आदित्यनाथ वा अन्य भाजपाचे काही आक्रमक नेते साधूसंत मंदिर वा तत्सम हे या विषयावर बोलत राहिले. पण मोदींनी त्याबाबत आपल्या तोंडातून चकार शब्द उच्चारला नाही, की पक्षाच्या कुणा पदाधिकार्‍याला त्याविषयी बोलू दिले नाही.

*मनातले साध्य करायचं पण डंका पिटायचा नाही*
आता पांच वर्षानंतर भाजपेयींच्या सत्तेची काय स्थिती आहे? त्याच तीन विषयांचे राजकीय भांडवल करून आपले पुरोगामीत्व जपायला एनडीए सोडणार्‍या नितीशकुमार यांची घरवापसी झालेली आहे. पण त्याच मुहूर्तावर तेच तिन्ही वादग्रस्त विषय आज ऐरणीवर आलेले आहेत. नितीशकुमार मात्र गप्प आहेत. भाजपच्या पाठींब्यावर राज्यात सत्ता उपभोगताहेत. राम मंदिराचा खटला आता सुप्रिम कोर्ट सलग सुनावणीतून ऐकणार आहे. नजिकच्या काळात त्याचे कायदेशीर उत्तर शोधले जाणार आहे. त्यातही मुस्लिम विरोधकांची एकजूट संपलेली असून, शिया पंथीय संघटनेनं मंदिर पाडूनच मशिद उभारल्याचा दावा पेश केलेला आहे. दुसरा वादग्रस्त मुद्दा समान नागरी कायद्याचा होता. त्यात मुस्लिमांचा तिहेरी तलाक हा सर्वात मोठा अडथळा होता आणि त्यालाही मुस्लिम महिलांनी पुढाकार घेऊन वाचा फ़ोडलेली आहे. त्यामुळे संपुर्ण देशात धर्माचा भेदभाव न करता समान नागरी कायदा बनवला जाण्याचाही विषय सुप्रिम कोर्टात विचारार्थ येऊन पोहोचला आहे. तिसरा विषय काश्मिरला खास दर्जा देऊन भारतापासून अलिप्त राखणारे राज्यघटनेतील ३७० कलम होय. ते आणि काश्मिरचा खास दर्जा रद्द करावा किंवा नाही, असाही विषय आता सुप्रिम कोर्टात विचारार्थ सादर झालेला आहे. थोडक्यात दोन दशकापुर्वी नव्याने पक्षाची उभारणी करताना भाजपाने जे तीन मुद्दे घेऊन आघाडी उघडली होती, ते मुद्दे आज सुप्रिम कोर्टात अन्य मार्गानं पोहोचले आहेत. जे मुद्दे सत्ता संपादनासाठी तडजोड करताना भाजपला गुंडाळून ठेवावे लागले होते, तेच तीन विषय मोदींच्या कारकिर्दीत भाजपेयींकडून उठवले गेलेले नाहीत, तरी आज ते  ऐरणीवर आलेले आहेत. याला राजकारण म्हणतात! मनातले साध्य करायचे, पण त्याचा डंका पिटायचा नाही, ही खास मोदीशैली आहे. सबका साथ सबका विकास असा झेंडा आहे आणि त्या झेंड्याखाली भाजपाचा अजेंडा पूर्ण करून घेण्याची हालचाल चालू राहिली आहे. पण त्याचा ठपका भाजपावर येऊ शकत नाही, की कोणी पुरोगामी शहाणा त्यासाठी मोदी सरकारला जबाबदार धरू शकत नाही.

*तत्वांशी तडजोड केल्यानेच भाजपेयीं सत्तेवर*
दोन दशकापुर्वी सत्तस्थापनेसाठी प्रयत्नशील असलेला भाजप, आपल्या राजकीय भूमिकेशी तडजोड करीत वाटचाल करीत गेला होता. म्हणून त्यातून एनडीए अस्तित्वात आलेली होती. आज एनडीए नव्यानं अशी उभी राहिलेली आहे की तिच्यासमोरही विकासाचाच अजेंडा आहे. पण भाजपला अलिप्त ठेवून मोदी यांनी पक्षाच्या गाभ्यातले विषय अलगद ऐरणीवर आणून ठेवलेले आहेत. त्यांचे कडवे विरोधकही कुठले आक्षेप घेण्याच्या स्थितीत सध्या राहिलेले नाहीत. समान नागरी कायद्याचा मुद्दा तर मुस्लिम महिलांनीच उचलून धरला आहे. त्यामुळे त्यावरून भाजपाला हिंदूत्ववादी ठरवण्याची मुभा कोणाला राहिलेली नाही. अयोध्येतील राममंदिराचा विषय मुस्लिम पंथीय मतभेदांमुळे सोपा झाला आहे. तर काश्मिरी पक्षाशी हातमिळवणी करून तिथल्या प्रशासनात चंचूप्रवेश केल्यानंतर तिथून बाहेर पडून ३७० कलमाचा विषय परिस्थितीनेच ऐरणीवर आणला आहे. याला मोदीशैली म्हणतात. करायचे आपल्याला हवे तेच! पण बोलायचे मात्र भलत्याच विषयावर. शत्रूला गाफ़ील ठेवून पादाक्रांत करण्याची ही रणनिती जोवर विरोधी पक्षांच्या लक्षातही येत नाही, तोवर या संघ स्वयंसेवकाला रोखणे कोणाला शक्य नाही. पराभूत करणे दूरची गोष्ट झाली. यातली मजेची गोष्ट अशी, की जे मुद्दे वादाचे ठरवून नितीशकुमार यांनी एनडीएची साथ सोडलेली होती, तेच मुद्दे प्रभावीपणे समोर आले असताना नितीशकुमारांना एनडीएत परतावे लागलेले आहे. एवढंच नाही तर निवडणुकांनाही सामोरं जाताना भाजपेयींना सोबत घेऊन जावं लागलं आहे. २०१३-१४ सालात हे मुद्दे अगदीच अडगळीत पडलेले होते, तरीही त्याचं अशा लोकांनी भांडवल केलेलं होतं. त्यावरून कांगावा केलेला होता. आज तेच लोक हताश आणि निष्प्रभ होऊन त्याच विषयांना साथ द्यायला उभे रहात आहेत. त्याच्या अप्रत्यक्ष समर्थनाला पुढे येत आहेत. दुनिया झुकती है, सिर्फ़ झुकानेवाला चाहिये, म्हणतात त्याचीच इथं प्रचिती येते!

चौकट........

*स्टार वॉर मधील 'वेडर' अन आजचे 'मोदी'!*
'स्टार वॉर' चित्रपटाच्या मूळ ट्रॅयोलॉजीत आजही स्मरणात राहणारं एक पात्र होतं 'डार्थ वेडर' ... द इनव्हिजिबल अपराजेय! याला पराजित करणाराच नव्हे, तर त्याचं नाव उच्चारताच भले भले योद्धे देखील थर थर कापत. संपूर्ण ब्रह्माडात त्याचं एकचक्री वर्चस्व होतं! त्याचा मुकाबला चित्रपटातील नाटकीय प्रवेशातील कथेत त्याचाच मुलगा ल्युक स्क्रायवेडर करतो. पौराणिक ऋषीसारखा गुरू योद्धा त्याला सांगतो "वेडरने एक अजब, अलौकिक जादुई सिद्धी प्राप्त केलीय. जो त्याच्यासमोर लढायला जाई तेव्हा त्याच्या मनांत त्याच्याबद्धल भरपूर द्वेष, क्रोध आणि तुच्छता निर्माण झालेली असायची. जेवढी तुच्छता त्याच्याबद्दल तुमच्या मनांत वाढेल, क्रोध वाढेल, द्वेष वाढेल तेवढीच त्याची ताकद वाढत जाई. जेवढ्या तीव्रतेनं आणि जोशानं तुम्ही तुटून पडाल, प्रहार कराल, तेवढीच त्यांच्यातली शक्ती वाढत जाई. त्यामुळं  प्रतिस्पर्ध्यमध्ये निराशा, हताशा वाढते मग तो आणखी जोरानं प्रहार करील, आक्रोश करील. वेडर तेवढीच ताकद मिळवी!" हे चक्र कधी थांबत नाही आणि वेडर कधीच पराभूत होत नाही! त्या कथेतील वेडर डार्क साईडला होता तर वास्तवात नरेंद्र मोदी ब्राईट साईडला आहेत. हे फिक्शन आणि फक्ट मधला फरक आहे. पण कथा तर तशीच आहे. विल्यम इनगे यांचं एक प्रख्यात विधान आहे, "जगात दोन प्रकारचे मूर्ख आहेत. एक असे आहेत की, जे जुनं आहे ते सगळंच चांगलं आहे; दुसरे असे आहेत की, जे नवं आलंय ते सगळंच चांगलं आहे!" हे सत्यवचन! या बाबी लक्षांत घेता चांगलं-वाईट याचं संतुलित आकलन करण्याऐवजी लोक आपलंच खरं म्हणत एका बाजूला ओढले जातात. अशाच या विधानाप्रमाणे आताच्या या वातावरणात ट्विट करून सांगता येईल की, आजही दोन प्रकारचे मूर्ख आहेत. ते म्हणजे नरेंद्र मोदी यांचे अंध भक्त आणि अंध विरोधक...! यात ऑपरेटिव्ह शब्द अंध आहे. डोळे झाकून भक्ती करणारा, अगदी मोदींनाही मागे सारेल अशी खूषमस्करी करतील. तथ्य आणि तटस्थता याचा काही संबंधच नसतो. असंच मोदी विरोधक पण असतात. त्यांच्या त्या आदर्शवादी विचारसरणीच्या भ्रमातून बाहेरच येत नाहीत. आणि जाणता अजाणता आपल्याच बौध्दिकतेचं प्रदर्शन करीत स्वतःच धन्यता मानतात.

- हरीश केंची.
९४२२३१०६०९

राज ठाकरेंची नवी 'शिदोरी'...!


"परिस्थिती माणसाला शहाणं बनवतं असं म्हटलं जातं, पण कधी कधी परिस्थिती आपली बुद्धी, शहाणपण, विचार, आचार आणि स्वाभिमान गहाण टाकायलाही भाग पाडतं. जणू अशीच अवस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांची झालीय. ज्या सोनियांना परकीय असल्यानं प्रधानमंत्री होऊ देणार नाही असं बजावणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंची ही 'सावली' थेट सोनियांच्या दिल्ली दरबारी गेली! कधीकाळी मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी सरसावलेले राज ठाकरे हेच मोदींना देशाच्या राजकीय पटलावरून दूर सारायला निघाले होते. राज ठाकरे यांनी आपली राजकीय कारकीर्द आणि वाटचाल ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वैचारीक वारसानं, विचारांच्या शिदोरीनं चालवली होती. पण गेल्या काही दिवसांतील त्यांच्या राजकीय हालचाली पाहता, ती बाळासाहेबांच्या विचारांची शिदोरी कुठंतरी संपल्याचं जाणवतंय. कुण्या नव्याची 'शिदोरी' त्यांनी सोबत घेतल्याचं जाणवतंय. नाही तर बाळासाहेबांप्रमाणेच सतत डाव्यांची हेटाळणी करणाऱ्या राज यांना तीच विचारसरणी आता प्रातःस्मरणीय झालीय. हे कुणाच्या 'मैत्री' चं द्योतक म्हणायचं?"
--------------------------------------------------
*लो* कसभेच्या निकालावर राज ठाकरे यांनी 'अनाकलनीय' असा शेरा मारत आपलं ट्विटर-मौन सोडलं होतं. लोकसभा निवडणुकीच्यावेळी राज ठाकरेंचा डिजिटल प्रचार धडकी भरवणारा होता. पण भाजपच्या विजयानंतर तो टिंगलीचा विषय केला गेला. महिन्याभरानंतर राज यांनी तब्बल १४ वर्षांनी दिल्ली पहिली. अटलजींचा काळ आणि मोदींची राजवट यात खूप फरक त्यांना जाणवला. त्यांच्यातही बदल झाल्याचं प्रसिद्धी माध्यमांना जाणवलं. निवडणूक आयोगाची भेट घेऊन आगामी निवडणूक ही मतपत्रिकेवर घेण्यात यावी, अशी विनंती करायला आल्याचं सांगितलं. पण त्याला फारशी प्रसिद्धी मिळणार नाही असं लक्षांत आल्यावर 'न्यूजसेन्स' असलेल्या राज यांनी थेट युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींचं घर गाठलं. त्यांचा काय संवाद झाला ते समजलं नाही, पण राज यांच्या सोनिया भेटीनं राज्यातले काँग्रेसजन पार गोंधळून गेले. कदाचित त्यांचा आघाडीत जाण्याचा मार्ग सुकर व्हावा हा राज यांचा मानस असावा. राज यांनी मनसेची स्थापना करताना ज्या विचारसरणीची कास धरली होती. ती शिवसेनेची, मराठी माणसांची, मराठी वैभवतेची, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीची होती. मनसेची प्रारंभीची वाटचाल त्याच मार्गावर झाली. खुद्द बाळासाहेबांनी आपला फोटो वापरू नये अशी ताकीद दिल्यानंतर त्यांची छबी वापरणं त्यांनी थांबवलं. पण शिवसेनेची तीच 'खल्लखटाक' संस्कृती सुरूच ठेवली होती. राज्यात सेना-भाजपचा वाढता प्रभाव पाहता आपल्याला त्याच विचारसरणीवर मतं मिळणार नाही. अस्सल उपलब्ध असताना नक्कलला कोण विचारणार? असं लक्षांत येताच त्यांनी त्यांच्याविरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांना शरद पवारांचं मार्गदर्शन लाभलं. नव्यानं वाटचाल सुरू झाली. शिवसेनाप्रमुख प्रारंभीच्या काळात समाजवादी विचारांशी जवळीक साधणारे होते. त्यातूनच त्यांनी प्रारंभीच्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रजा समाजवादी पक्षाशी युती केली होती. त्यामुळं शिवसेनेची विचारसरणी प्रबोधनकारांची दिसत होती. पण शिवसेनेला मिळालेला मोठा जनाधार लक्षांत येताच बाळासाहेबांना ग.वा.बेहेरे, दि.वा.गोखले, विद्याधर गोखले यासारख्या संघ विचारांच्या कावेबाज पत्रकारांनी घेरलं. सततच्या सानिध्यानं बाळासाहेब प्रबोधनी विचारांपासून दूर जात 'हिंदुत्ववादी' बनले. इतिहासाची पुनरावृत्ती म्हणतात ती अशी! इथं नेमकं उलटं घडलं; राज ठाकरे यांना जसे पुरोगामी शरद पवार भेटले तसेच डाव्या विचाराचे 'मैत्री' या मेळघाटात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे अनिल शिदोरे भेटले. त्यांनी मनसे अकादमीची धुरा स्वीकारली आणि मनसेत वैचारिक बदल घडवला. शिवाय त्यांच्या सततच्या सानिध्यानं कदाचित राज यांना शिदोरेंची डावी विचारसरणी भावली असेल. त्यामुळेच त्यांनी हिंदुत्ववादी विचारांना विरोध करायला सुरुवात केलीय. त्यातूनच शरद पवारांच्यानंतर थेट सोनियांची भेट घेते झाले!
*मनसेचे निवडणुकीत यशापयश*
राज यांच्या शिवसेना त्यागानंतरची त्यांची आणि त्यांच्या मनसेची वाटचाल प्रारंभी अतिशय आक्रमक झाली. तेरा आमदार, लोकसभेत चांगली मते, अनेक महापालिकांमध्ये नगरसेवक, नाशिक महापालिकेत सत्ता अशी स्थिती २००९ ते २०१२ मध्ये होती. काँग्रेस विरोधी वातावरण, आक्रमक शैलीची तरुणांची संघटना याचा फायदा मनसेला झाला. मात्र, संघटनात्मक बांधणीत राज ठाकरे कमी पडल्याचं दिसलं. मोदी यांचं नेतृत्व देशपातळीवर आलं, अन्‌ काँग्रेस विरोधी वातावरणाचा लाभ उठवित विकासाचा नारा देत ते केंद्रात सत्तेवरही आलं. २०१४ मध्ये राज ठाकरे यांनी मोदी यांना पाठिंबा देताना सहा मतदारसंघात निवडणूक लढविली. मात्र, तोपर्यंत मतांचं धृविकरण झालं होतं. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध शिवसेना-भाजप युती या लढाईत मनसेला स्थान मिळालं नाही. त्यावेळी मनसे युतीत सहभागी होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, विधानसभेला चारही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढले. आघाडी विरोधाचा फायदा, तसेच मोदी लाट यामुळं भाजप सर्वांत मोठा पक्ष बनला. पुढे दुसऱ्या क्रमांकावर असलेली शिवसेनाही त्यांना मिळाली. लोकसभेपाठोपाठ झालेल्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही मनसेचा धुव्वा उडाला. मनसेचा केवळ एकच आमदार निवडून आला, आतातर तोही पक्ष सोडून गेलाय. महापालिका निवडणुकांमध्ये चार नगरसेवकांचा प्रभाग ही कल्पना भाजपनं अंमलात आणली, आणि त्यात भाजपनं सर्वांधिक, तर त्या पाठोपाठ शिवसेनेनं अनेक महापालिकांत यश मिळविलं. मनसेचे नगरसेवक अगदी बोटावर मोजण्याएवढेच आले. भाजपनं गेल्या पांच वर्षांत शिवसेनेलाच सत्तेत फारसा वाटा दिला नाही, त्यामुळे मनसेनं दिलेल्या पाठिंब्याचा विचारही त्यांनी केला नाही. मनसे हळूहळू आकसत गेली. गेल्या चार वर्षांत युतीतील वाद, देशातील राजकीय वातावरण याचा फायदा घेत मनसे पुन्हा आक्रमक भूमिका निभावण्याच्या तयारीला लागली. मोदी लाटेत भाजपचे १२२ आमदार, तर शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले. काँग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार निवडून आले. युती आणि आघाडीच्या लढतीत गेल्या वेळच्या चौरंगी लढती आता दुरंगी होतील. लोकसभा निवडणुकीचे पडसाद त्यावर पडतील. युतीच्या आमदारांची संख्या घटण्याची शक्‍यता दिसत नाही. आघाडीला सत्तेपर्यंत पोहोचण्यास अंतर्गत वाद अडचणीचे ठरतील. त्यांना विरोधीपक्षाचा दर्जा तरी राखता येईल का? अशी स्थिती निर्माण झालीय. या परिस्थितीत निर्माण होणारी विरोधीपक्षांची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न मनसे करील. कोणाला बहुमत न मिळाल्यास आणि मनसेला काही जागा मिळाल्यास, त्यांना राज्याच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होईल. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे यांची वाटचाल सुरू झाली आहे.
*राज्यातील ५०-६० मतदार संघावर प्रभाव*
गेल्या दहा-बारा वर्षांत वेगवेगळ्या निवडणुकीत मनसेचा थोडाफार प्रभाव सुमारे पन्नास-साठ मतदारसंघांत पडलेला आहे. तिथंच त्यांनी लक्ष केंद्रीत करायचं ठरविलंय. लोकसभा निवडणुकीत आघाडीत मनसेला घ्यायला काँग्रेसनं विरोध केला होता. ते प्रामुख्यानं मुंबईतल्या उत्तरप्रदेशी नेतृत्वानं. मात्र, राज ठाकरे यांच्यासारखा प्रभावी वक्ता त्यांना आता प्रचारासाठी हवाय. केंद्रातील सत्ता निश्‍चित झालीय. विधानसभेच्या निवडणुकीचा फड रंगू लागलाय. लोकसभा निवडणुकीतच अनेकांनी विधानसभेचे मतदारसंघ बांधण्यास सुरवात केलीय. लोकसभेला पाठिंबा म्हणजे विधानसभेला पाठिंबा आहे, असे नाही, विधानसभेचे त्यावेळी ठरविण्यात येईल, असे राज ठाकरे यांनी पहिल्याच भाषणात स्पष्ट केलं होतं. मनसेची विधानसभेची तयारी सुरू झालीय. संघटनात्मक बांधणी भक्कम केल्यास आणि चांगले स्थानिक उमेदवार रिंगणात उतरविल्यास, मनसेला यश मिळेलही.
*विरोधीपक्षांची भूमिका बजावता येईल*
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विरोधीपक्षाची पोकळी जाणवतेय. काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात लढण्याची उमेद राहिलेली दिसत नाही. अशावेळी  वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे या दोघांचं नेतृत्व राज्यात सध्या रिकामी असलेली विरोधी पक्षाची जागा त्यांच्या पक्षांना मिळवून देऊ शकतात. या दोन्ही नेतृत्वांचा पूर्वेतिहास, राजकीय वैचारिक वारसा आणि स्वभाव पाहता, ते म्हणणार की, विरोधी पक्षासाठी निवडणूक होत नाही. सत्ताधारी होण्यासाठीच निवडणूक लढवली जाते. त्यात यशस्वी झालो नाही तर विरोधी पक्षाची भूमिका निभवावी लागते. लोकसभा निवडणुकीत वाढलेल्या मतांनी जरी एकच जागा मिळाली असली तरी वंचित बहुजन आघाडी राजकीय चर्चेच्या मुख्यस्थानी आलीय. त्यांच्यावर भाजपची ‘बी टीम’ असा आरोप केला जातो. गंमत म्हणजे विरोधी पक्ष म्हणून शून्य कामगिरी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पराभवाचं खापर वंचित बहुजन आघाडीवर फोडत ‘बी टीम’चा सिद्धान्त अनेकांनी अधोरेखित केलाय. योगायोग पहा २००९ साली असाच आरोप मनसेवर त्यावेळी पराभूत झालेल्या युतीनं केला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी उत्तर दिलं होतं की, ‘मग २००४ साली का हरले हे, तेव्हा मनसे नव्हती!’ तेच आता आंबेडकर विचारताहेत की,“२०१४ साली वंचित नव्हती, तरी का पराभूत झाले?" याचा अर्थ वंचित व मनसे यांच्याकडे आज काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा जनतेसमोर जाण्यासाठी आजच्या घडीला आवश्यक ते राजकीय चरित्र व चारित्र्य आहे. आणि त्यामुळेच हे दोन्ही पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचे मित्रपक्ष म्हणून आघाडीत आणण्याचे प्रयत्न चालू आहेत, तशा वावड्या उठत आहेत किंवा आघाडीला पर्याय नाही असं दर्शवलं जातंय. पण आघाडीत जायची गरज वंचित किंवा मनसेला खरोखरच आहे? त्यातून फायदा कुणाचा होणार? याचं उत्तर अखिलेश यादव नीट देऊ शकतात! एकदा त्यांनी काँग्रेसशी आघाडी करून तोंड पोळून घेतलं, नंतर ताक फुंकून पीत मायावतींशी आघाडी करून आगीतून फुफाट्यात. तेच तेजस्वी यादवचं आणि चंद्राबाबूंचं! अशा स्थितीत वंचित आणि मनसे यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणं श्रेयस्कर. मतदारांना दोन नवे विकल्प मिळतील. निवडणुका चौरंगी, पंचरंगी झाल्या तरी बेहत्तर, पण या पक्षांना त्यांच्या विस्ताराची शक्यता तर निश्चित तपासता येईल.

*मनसे-वंचित यांचं अस्तित्व दिसलं*
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या प्रचाराचा बार फुसका ठरला, असं म्हटलं गेलं. पण नीट विचार केला, तर राज ठाकरेंचा घणाघाती मोदी विरोध झाला नसता तर आज युती ४८ जागांवर जिंकून आली असती. वंचितमुळे आघाडीच्या १०-१२ जागा कमी झाल्या असं एक विश्लेषण केलं जातंच आहे. कारण वंचितचे उमेदवार होते. राज ठाकरेंचा प्रभाव झाला की नाही हे कसं ठरवणार? कारण त्यांचे उमेदवारच नव्हते. साहजिकच मोदींचे पराक्रम पाहून त्यांना पराभूत करण्यासाठी राज ठाकरेंनी पर्याय कोणते ठेवले? काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित!
आणि या तिन्ही पक्षांना आज जी काही मतं पडलीत, त्यात राज ठाकरेंचा हस्ते-परहस्ते प्रभाव आहे. भाजप-सेना नको, पण मग काँग्रेस-राष्ट्रवादीही नको असं वाटणाऱ्या काही लोकांनी वंचितला मतं दिली. पण ज्यांना काही कारणासाठी वंचितही नको होती त्यांना मात्र मनसेचा पर्याय नव्हता!
*मनसेची दुसरी फळीच निर्माण झाली नाही*
राज ठाकरे आणि तेरा वर्षाची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं समीकरण मांडलं तर, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लागणारे निकालातून राज ठाकरे यांच्या इंजिनला नवीन दिशा असेल किंवा इंजिन कारशेडमध्ये दिसेल. महाराष्ट्रात युतीच्या जागा कमी झाल्या तर, त्याचे सारे श्रेय राज यांना मिळणार आहे. ही  विधानसभा निवडणूक राज ठाकरे यांच्यासाठी फार महत्वाची आहे. जर यावेळी त्यांची गणितं जुळून नाही आली तर मात्र पुन्हा संधी कठीणच आहे. कारण त्यानंतर पुन्हा पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीत राजकारणाचे संदर्भ बदलेले असतील.
राज ठाकरे यांचा पक्ष आज महाराष्ट्रात नावालाच उरला आहे. सातत्यानं त्यांचे निवडून आलेले आमदार-नगरसेवक फोडले जाताहेत. पण काही वर्षांपूर्वी वाशी येथे एका कार्यकर्ता मेळाव्यात पक्षफुटीवर भाष्य करताना ते म्हणाले होते, की "एक कार्यकर्ता जरी राहिला तरी मी त्यातून लाख निर्माण करेन."  त्यांच्या सभांना मिळणाऱ्या प्रतिसादातून असं नक्की होऊ शकेल हे जाणवतंय. राज ठाकरे यांना आपलं शक्तिस्थळ माहितीय. राजकारणाची उत्तम जाण, उत्कृष्ट वक्तृत्व, पॉलिटिकल टायमिंगमध्ये त्यांचा देशात मोजक्या लोकांत गणना होतेय. मग आजही त्यांना यश का नाही मिळालं याचं कारण काय हा प्रश्न उरतोच. याबाबत एका प्रसंगाची आठवण करून द्यावीशी वाटते. राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यानंतर, शरद पवार यांनी स्वतःचा स्वतंत्र पक्ष चालविण्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं! असा टोमणा मारला होता. एका अर्थानं त्यांना असं म्हणायचं होते की, पक्ष चालविण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. पण राज ठाकरे यांनी हा वडीलकीचा सल्ला त्यावेळी फारसा गांभीर्याने घेतला नाही. आता मात्र त्यांच्याच सल्ल्यानं त्यांची वाटचाल सुरु आहे असे त्यांचे विरोधक आरोप करताहेत. त्यांना सुरुवातीला चांगलं यश मिळालं, पण नंतर ते टिकवून ठेवता आलं नाही. त्यासाठी अनेक कारणं असतील पण राज ठाकरे यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. राज ठाकरे हेसुद्धा एक उत्तम कलाकार आहेत. कलाकार कोणाचा गुलाम होत नाही. अगदी कोणा व्यक्तीचा, वेळेचा आणि वेळापत्रकाचाही नाही. पण यावर सुद्धा मात करता आली असती. त्यांची दुसरी फळी अगदीच सुमार होती. याबाबतीत शिवसेनाप्रमुख मात्र नशीबवान होते. त्यांच्याकडे सक्षम व निष्ठावंत वामनराव महाडिक, दत्ताजी साळवी, मनोहर जोशी इ. नेते होते. ते फर्डे वक्ते होते. पण राज ठाकरे यांची आजही हीच मोठी समस्या आहे. त्यावर मात केलीच पाहिजे आता तशी संधी सुद्धा येणार आहे.
*स्थान निर्माण करण्याची शेवटची संधी*
तेरा वर्षात राज ठाकरे यांनी मनसेचे नेते आणि कार्यकर्ते यांना टोल नाका आंदोलन, मराठी पाट्या अशा काही गोष्टी वगळता, नवीन सकारात्मक उपक्रम देऊन राज्यपातळीवर ३६५ दिवस गुंतवून ठेवता आलेलं नाही. तसंच सगळ्याच शहरात आणि गावात कुठल्याच पक्षात जागा नसलेले अनेक टुकार कायम नवीन पक्षाच्या प्रतिक्षेत असतात. अशा अनेक प्रवृतींनी त्याकाळात मनसेचा ताबा घेतलाय. त्यांनी मनसेच्या नावानं दुकानदारी सुरु केलीय. त्यामध्ये वेळोवेळी दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या 'ब्लु प्रिंट'नुसार नवनिर्माण करायला आलेले कार्यकर्ते पुन्हा माघारी फिरलेत. त्यामुळे जे उरलेले आता कुठेच जागा नाही, तर हेच काय वाईट आहे. अशा प्रवृतीना शोधून, त्यांच्या जागा रिकाम्या करणं हे मोठे आव्हान असणारंय. सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय पोकळीत, राज ठाकरे यांना स्थान निर्माण करण्याची शेवटची संधी आहे. त्यासाठी आता नवीन कार्यकर्त्यांचे रोप लावून त्याची वाट बघणं, आत्मघातकी ठरेलं. त्यासाठी युती होणार नाही या आशेनं अनेक सेना -भाजपच्या मातब्बर नेत्यांनी विधानसभा निवडूणुकीची तयारी केली होती. त्यांची शोध मोहीम घेऊन योग्य त्यांना मनसेनं उमेदवार केलं पाहिजे.  सेना-भाजपच्या जागावाटपात दोन्ही पक्षाचे  उमेदवार वैचारिक जवळकीनं मनसेसोबत येऊ शकतात. शरद पवार यांनी ज्याप्रमाणे छगन भुजबळ, गणेश नाईक इ.नेते आपल्या पक्षात सामावून घेतलं, त्यांना टिकवून ठेवलं. तशी कला राज ठाकरे यांनी आता अवगत करायला हवीय. सेना -भाजपनं जशी मनसेची फोडाफोडी केली त्याची परतफेड करण्याची ही वेळ आलीय.

चौकट.....
*फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घ्यावी*
महाराष्ट्रात सगळ्याच पक्षात मुख्य पदावर अनेक वर्षे ठराविक नेते जागा अडवून बसले आहेत. त्यामुळे दुसरी फळी संधीच्या अभावी निराश आहेत. त्यांना जाणीवपूर्वक मनसेत आणले पाहिजे. त्यांना कामाची संधी दिली पाहिजे. राज ठाकरे यांनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार मांडले पाहिजेत. त्यामुळे बहुजन तरुणांना एक आशावादी नेतृत्व मिळेल. मुस्लिम तरुणांनासुद्धा काही विधायक कार्यक्रम मनसेनं दिला पाहिजे. सुशिक्षित मुस्लिम युवकांसाठी मनसे हा योग्य पर्याय ठरू शकतो. फक्त मनसेच्या झेंडयात निळा, हिरवा रंग असून चालणार नाही. त्या वर्गाला योग्य संदेश गेला पाहिजे. एक राज्यव्यापी अधिवेशन घेऊन नव्याने भूमिका मांडली पाहिजे. राज ठाकरे यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा भरारी घेतली पाहिजे, असं आज महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांना वाटतंय. महाराष्ट्राचे हित जपणारा पहिला प्रादेशिक नेता सत्तेत यावा असं शहरी आणि ग्रामीण जनतेला वाटतंय. मोदी-शाह यांच्या समोर देशातील सगळेच नेते शेपूट घालून बसले असताना राज ठाकरे यांनी सडेतोड भूमिका घेतली ती प्रत्येक मराठी माणसाला भावून गेलीय. महाराष्ट्र वाट बघतो आहे, एका नवीन दमदार नेतृत्वाची, मराठी हितासाठी सर्वसमावेशक स्वच्छ भूमिका मांडणारा. जरी चूक झाली तर दुरुस्त करणारा. आडपडदा न ठेवता पडद्यावर जाहीर पोलखोल करणारा, त्या राज ठाकरे यांची नव्याने वाट पाहतो आहे.

हरीश केंची
९४२२३१०६०९

तालिबानींची कथा-व्यथा...!

भारताच्या वायव्येकडे हिंदूकुश पर्वताच्या पलीकडे असलेल्या छोट्याशा देशाला खर तर अस्थिरतेचा, यादवीचा जुना शापच आहे. प्राचीन काळापासून इथं अनेक टोळ्यांचं आक्रमण झालं. तिथं सतत लढाया होत राहिल्या. अफगणिस्तानचा इतिहास तपासल्यास त्याची रंजक माहिती मिळते.

इसवी सनापूर्वी १५०० वर्षांपूर्वी आर्यानी अफगणिस्तानावर आक्रमण केलं. त्यांनी अनेक स्थानिक रहिवाशांची कत्तल करून किंवा त्यांच्याशी विवाह करून तिथे आपली सत्ता जमविली. इसवी सनापूर्वी ५००वर्षांपूर्वी पर्शियन लोकांनी अफगाणिस्तानातील बाक्ट्रिया प्रदेश ताब्यात घेऊन इसवी सनापूर्वी ३३० वर्षापर्यंत राज्य केलं. नंतर ग्रीक आणि मेसोडियनांनी अलेक्झांडरच्या नेतृत्वाखाली या प्रदेशावर आक्रमण करून दीडशे वर्ष सत्ता सांभाळली. त्यानंतर आलेल्या कुशाणानी त्यांचा पराभव करून त्यांच्याकडून सत्ता हिसकावून घेतली. परंतु इसवी सन ४०० च्या सुमारास पर्शियन आणि हुणांनी त्यांना पराभूत केलं. इसवी सन ६०० मध्ये अरब आक्रमक अफगाणिस्तान आले. इसवी सन ८०० पर्यंत अरबांनी या प्रदेशात इस्लामचा व्यवस्थित प्रचार केल्याने इस्लाम हा अफगणिस्तानचा मुख्य धर्म बनला. तुर्की लोकांनी इसवी सन ९०० ते १२०० पर्यंत अफगणिस्तानवर राज्य केलं. चेंगीज खानच्या नेतृत्वाखालील मंगोलियन लोकांनी त्यांना धूळ चारून इसवी सन १२०० मध्ये सत्ता हस्तगत केली. इसवी सन १५०० ते १७०० या काळात मोगलांनी अफगणिस्तानवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. १७४७ च्या सुमारास पहिल्यांदाच सर्व अफगाणी आदिवासी जाती एकत्र आल्या आणि त्यांनी अहमदशहा दुराणी च्या नेतृत्वाखाली सत्तेची सूत्र हाती घेतली. १८०० च्या सुमारास रशियनांनी अफगाणिस्तानात घुसखोरी केली तर त्यांना शह देण्यासाठी ब्रिटिश फौजांनी १८३९ मध्ये अफगणिस्तानावर हल्ला केला. ब्रिटिशांनी अफगाण राजाविरुद्ध तीन लढाया केल्या. या तिन्ही लढायांत ब्रिटिशांचा पराभव झाला. त्यामुळे अफगाणिस्तानात ब्रिटिश राजवट कधीच स्थापन झाली नाही. १९३१ मध्ये अफगाणिस्तानात घटनात्मक राजसत्ता स्थापन झाली. मोहम्मद नादीर शहा हा पहिला राजा बनला ही राजसत्ता १९७३ पर्यंत यथास्थित होती. १९७३ मध्ये बादशहा झाहिर शहा याच्या पुतण्याने मोहम्मद दाऊदने सत्ता उलथवून टाकली. सरतेशेवटी १९७९ मध्ये रशियाने अफगाणिस्तानात फौजा घुसवून कर्माल बारबाकला सत्तेवर आणलं. तेव्हापासून अमेरिकेलाही अफगाणिस्तानच्या राजकारणात रस वाटू लागला. अफगाण घुसखोरींविरुद्ध चीन, अमेरिका, पाकिस्तान सगळे लढले शेवटी १९९२ मध्ये रशियाने अफगाणिस्तानातून माघार घेतली.
[
 सततच्या आक्रमणामुळे अफगाणिस्तानात अनेक लहान मोठ्या टोळ्या लहानलहान प्रांतावर कब्जा करू लागल्या. त्यामुळे अफगाणिस्तान असं एकसंघ राष्ट्रचं नव्हतं. ज्याच्याकडे काबूल त्याच्याकडे अफगाणिस्तानची सूत्रं असं समजलं जायचं. या टोळ्यांना रशिया, अमेरिकेने शस्त्रास्त्र दिली. दरम्यानच्या काळात बनीहुद्दीन रब्बानी यांनी काबूलचं सरकार काही सेनाधिकाऱ्यांकडे संपवलं. तेही स्थिर नव्हतंच कारण पाकिस्ताननं हिकमतीयार या सेनापतीला पाठींबा दिला होता. काबूलवर आपलाच हक्क असल्याचा त्यांचा दावा होता. रब्बानी आणि हिकमतीयार यांच्यात आधी लढाई झाली. मग समझौता झाला. रब्बानी राष्ट्रपती तर हिकमतीयार पंतप्रधान झाले.राजकीय अस्थिरतेचा शाप मात्र सरला नाहीच.

आज अमेरिकेला डोईजड झालेल्या तालिबानचा जन्मही अमेरिकेच्याच कृपेने झाला. अफगाणिस्तानामधील रशियन फौजांविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने अफगाण टोळ्यांना आधुनिक शस्त्रास्त्र दिली. रशियन सैन्य मागे घेतलं गेल्यावरही ही शस्त्रास्त्र त्यांच्याच हाती राहिली. साहजिकच या शस्त्रास्त्रांच्या जोरावर टोळ्यांमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरू झाला. या यादवीने उध्वस्त झालेल्या अफगाणिस्तानला शिस्त लावण्यासाठी तालिबान चळवळ सुरू झाली. 'तालिबान' या शब्दाचा अर्थ विद्यार्थी असा असला तरी त्यात अनेक प्रौढ माणसं आहेत. अमेरिकेच्याच एकेकाळच्या म्हणण्यानुसार तालिबान म्हणजे अफगाणिस्तान-पाकिस्तानात शिकलेले आणि देशाला यादवीतून बाहेर काढणारे बंडखोर तरुण. त्यांना लष्करी शिक्षण, शस्त्र, पैसा, कोण पुरवतं यावर मात्र अमेरिकेने काहीच भाष्य केलं नाही.

 तालिबानला अमेरिकेबरोबर पाकिस्तानची पुरेपूर मदत मिळाली. तालिबान चळवळीची सुरुवातही पाकिस्तानकडील दक्षिण अफगाणिस्तानच्या बाजूने झाली. आधी कंधार मग हेरत शहरं जिंकत त्यांनी काबूलवर हल्ला चढवला. अध्यक्ष रब्बानी आणि पंतप्रधान हिकमतीयार पळाले. फारशी लढाई न करता काबूल तालिबानच्या हाती आलं.

तालिबान ही संपूर्ण लष्करी प्रशिक्षण लाभलेली संघटना आहे. कंदहारचा मोहम्मद ओमर हा तिचा प्रमुख आहे. अफगाणिस्तानमधील रशियन फौजविरुद्ध तो मुजाहिद्दीन-स्वातंत्र्यसैनिक म्हणून लढला या लढाईत त्याला एक डोळा गमवावा लागला. पाकिस्तान आणि अमेरिकेने त्याला भरपूर पाठींबा दिल्याने तो तालिबानचा नेता बनला.
तालिबान ही अतिशय पुनरुज्जीवनवादी संघटना आहे. त्यामुळे ती सत्तेवर येताच अफगाणिस्तानच्या दुर्दशेला सुरुवात झालीय.तालिबानचा उदय होण्यापूर्वी सगळं काही आलबेल होतं असं नव्हे. मुळात दक्षिण-पूर्व आशिया खंडातील हा देश पूर्वीपासून अत्यंत अविकसित आहे. आधुनिक सुधारणांचा गेली कित्येक वर्षे त्याला स्पर्श झालेला नाही. तिथं खनिज संपत्ती, वनसंपदा फारशी नाही. साहजिकच कारखानदारी नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञान तर अफगाणिस्तानातील नागरिकांना कधी पाहायलाच मिळालं नाही. अनेक बाबतीत तिथे अजून जुनं, अविकसित तंत्रज्ञानच वापरलं जातं.

 खरं तर अफगाणिस्तानचं भौगोलिक स्थान खूप मोक्याचं आहे. पश्चिमेला चीन, पाकिस्तान, दक्षिणेला कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमनिस्तान आणि पश्चिमेला इराणशी त्याच्या सीमा जोडलेल्या आहेत. त्या महत्वाच्या स्थानामुळे जुन्या काळी भारत आणि मध्य-पूर्व आशिया यांच्यातील तो सिल्क रूट म्हणजे सोनेरी मार्ग समजला जायचा भारत आणि मध्य-पूर्व देशातील सगळा व्यापार इथूनच व्हायचा. त्यामुळे या प्रदेशातील कब्जातील इतिहासात अनेक लढाया झाल्या.
अफगाणिस्तानचा बहुतेक सगळा प्रदेश डोंगराळ असल्याने तिथे शेती कमीच होते. तरीही नव्वद टक्के अफगाणी जनता शेतीवर जगते. गहू, कापूस, फळभाज्या, ऊस, सुकामेवा, हे इथलं प्रमुख उत्पादन. मात्र शेतीसाठी केवळ परंपरागत पद्धतच वापरली जात असल्यानं फारसं उत्पादन घेता येत नाही. उत्पादन वाढविणाऱ्या  विविध खतांचा वापर अफगणिस्तानात अजूनही होत नाही.

अफगाणिस्तान अफूच्या शेतीसाठीही बदनाम आहे. अफूच्या मादक द्रव्याची अफगाणिस्तानामधून पाकिस्तान-भारतात मोठ्या प्रमाणात निर्यात होते. हाच पैसा अफगाण बंडखोरांनी रशियनविरुद्ध लढण्यासाठी वापरला असं म्हणतात. पशुपालन हा अफगाणी लोकांचा आणखी एक व्यवसाय. इथे भटक्या जातींची संख्या भरपूर आहे. ते हा व्यवसाय करतात तसंच दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादनही करतात.

अफगणिस्तानची लोकसंख्या जवळजवळ तीन कोटींचा घरात आहे. अफगणिस्तानचे मूळ रहिवासी असलेले जवळपास वीस वांशिक समूह आहेत. यातील बहुतेक आदिवासी जाती जमातीचे आहेत. ते सगळे एकमेकांशी बरंच साम्य असलेल्या भिन्न भाषा बोलतात. पश्तून हा यातील सगळ्यात मोठा वांशिक गट. इसवी सनच्या पहिल्या शतकापासून तो अफगणिस्तान आहे, असं म्हटलं जातं. पन्नास टक्के अफगाणी या वांशिक गटाचे आहेत. ताजीक हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा गट असून ते मूळचे इराणचे समजले जातात. तसंच इराणी भाषेशी साम्य असलेली भाषा बोलतात. काबूलच्या आसपास आणि इराणच्या सरहद्दीनजीकच्या भागात त्यांची वस्ती आहे. तिस्ता मोठा गट हजारा हा आहे. मूळचा मंगोलियन असलेला हा गट तेराव्या ते पंधराव्या शतकात अफगणिस्तानात आला. हे लोक पर्शियन बोलीभाषा बोलतात. ते शिया मुस्लिम आहेत. हजरत नावाच्या भागात ते राहतात. तुर्क आणि तुर्को-मंगोल यांचा तुर्कोमनस हा मेंढपाळ गट आहे. उझबेक हा मूळ तुर्की असलेला गट आहे. शेती व्यवसायात असलेला हा गट तुर्की भाषा बोलतो. किरगिझ हा आणखी एक वांशिक गट चीनकडील सरहद्दीनजीक वाखत भागात राहतो.

पश्चिम अफगणिस्तानात राहणाऱ्या 'चाहार ऐमार' या प्रत्यक्षात फिसझुकही, तैमानी, जमशिदी, तैमुरी आणि पश्चिम हजारा अशा पाच आदिवासी जमाती आहेत. दक्षिण भागात बलुची ही भाकी जात आढळते.  ते बलुची ही इराणीयन भाषा बोलतात.
सर्वसाधारण अफगाणिस्तानी रहिवाशांना अफगाणी वा पठाणी म्हटलं जातं. दारी किंवा पुश्तू या अफगणिस्तानच्या राष्ट्रीय भाषा आहेत. सर्व सरकारी व्यवहार याच भाषेतून होतात. इस्लाम हा इथला प्रमुख धर्म आहे. यातील ८० टक्के अफगाणी शिया मुसलमान तर वीस टक्के सुन्नी आहेत.
हरीश केंची
९४२२३१०६०९



.

काँग्रेस: 'एक्सपायरी डेट’ संपलेलं औषध!

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या घटनेला २५ जुलै रोजी बरोब्बर दोन महिना होतील. ह्या दोन महिनाभरात काँग्रेसचा कारभार ठप्प आहे. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी काँग्रेसवाल्यांनी खूप उठापटक चालवली आहे. पण राहुलबाबा मानायला तयार नाही. केवळ राहुलबाबा घरी बसलेले नाहीत. सोनिया आणि प्रियांका ह्याही घरी बसल्यासारख्या आहेत. निर्णय करणार कोण? राहुलबाबाच्या जागी दुसरे नाव सुचविण्याची कुणाची हिंमत आहे? त्यामुळे सारे ठप्प आहे. त्यांच्या जागी अशोक गेहलोत, पृथ्वीराज चव्हाण, मोतीलाल व्होरा यांची नावं ऐकू येत आहेत. हाही विनोदच म्हटला पाहिजे.
राहुलबाबा कामावर बसायला तयार नाही. त्यांच्या ह्या अघोषित सुतकामुळे काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कारण कुणीच निर्णय करायला तयार नाही. कोण लक्ष देणार? चार महिन्यांनी महाराष्ट्र, हरियाणा राज्याची निवडणूक आहे. भाजप केव्हाच कामाला भिडला आहे. काँग्रेसचा पत्ता नाही. काँग्रेसने स्वतःहून ही परिस्थिती ओढून आणली आहे. राहुल गांधींना राजकारणात अजिबात रस नसताना सोनिया गांधी यांनी पुत्रप्रेमापोटी त्यांना आणले. लहरी स्वभावाच्या राहुलबाबाने निवडणुकीसाठी आखलेली रणनीतीच मुळात फसवी होती. नरेंद्र मोदी यांना चोर म्हणून हिणवण्याचा उलट परिणाम झाला. भाजप हिंदुत्वाचे कार्ड चालवत असताना राहुलबाबाने मुस्लिम-दलित कार्ड चालवले. त्यामुळे ध्रुवीकरण होऊन मोदींना मागच्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळाल्या. ‘ब्रम्हास्त्र’ म्हणून आणलेल्या प्रियांका गांधी उत्तर प्रदेशात आपल्या आईपलीकडे कुणालाही जिंकवू शकल्या नाहीत. सपा-बसप यांच्याशी आघाडी न करण्याची काँग्रेसची रणनीती साफ फसली.
आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीतही काँग्रेसची एवढी दुर्गती झाली नव्हती. जनाधार नसलेल्या लोकांच्या हाती काँग्रेसची सूत्रे गेल्याने ही पाळी आली आहे. आपसातली गटबाजी थांबत नसल्याने एकेकाळचे कट्टर काँग्रेसी भाजपमध्ये गेले आहेत. भाजप हाऊसफुल्ल झाल्याने शिवसेनेत जात आहेत. राहुलबाबाने खरे तर लोकसभा पराभवाची कारणे शोधून नव्याने कामाला लागायला पाहिजे होते. पराभवामुळे काँग्रेसची जेवढी नाचक्की झाली नाही तेवढी राहुलबाबाच्या घरी बसण्याने झाली. काँग्रेस पक्ष आज अशा अवस्थेला पोचला आहे, की राहुलबाबा उद्या परतले काय किंवा नाही परतले काय, काही फरक पडणार नाही. ‘एक्स्पायरी डेट’ संपलेल्या औषधासारखी काँग्रेसची अवस्था झाली आहे. ‘एक्स्पायरी’ झालेले औषध जसे काम करत नाही तसे काँग्रेसचे झाले आहे. तुम्ही लिहून ठेवा. आणखी किमान दोन निवडणुका मोदींच्या बाजूने आहेत. गांधी नावाचा करिष्मा ह्या ‘पप्पू’ने स्वतःच्या करणीने संपवला. प्रियांका याही फुसका बार निघाल्या. काँग्रेसला ह्या जीवघेण्या आजारातून उठवेल असा नेताच आज काँग्रेसकडे नाही. काँग्रेस कुठल्याही कामाचा उरला नाही. कुणाला निवडून आणू शकत नाही तो पक्ष काय कामाचा? मोदी काँग्रेसमुक्त भारत करू शकले नाहीत. राहुलबाबाने ते करून दाखवले.

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी २०१४ च्या तुलनेत चांगली होईल, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र त्यांना केवळ ५२ जागांवर विजय मिळवता आला.
काही राज्यात काँग्रेसला खातंही उघडता आलं नाही अशी परिस्थिती आहे.
या निकालावर चर्चा करण्यासाठी शनिवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी उपस्थित होते.
निवडणुकांच्या निकालांमुळे ‘या’ दिग्गजांच्या घराणेशाहीवर पूर्णविराम?
महिलांना तिकीट दिल्याने राजकीय पक्षांना फायदा होतो का?
या पराभवाने राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. अशावेळी प्रश्न उपस्थित होतो की काँग्रेसचं भविष्य काय आहे? पक्ष आपल्या पराभवातून वर येणार आहे का? जर त्यांना पुनरागमन करायचं असेल तर त्यांची काय रणनीती असेल?

काँग्रेससाठी अस्तित्वाचा प्रश्न
काँग्रेससमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. २०१४ मध्ये हे कळत होतं की १० वर्षांपर्यंत यूपीएचं सरकार अस्तित्वात होतं. भ्रष्टाचाराचे आरोप होते आणि नेतृत्वाचीही समस्या मोठ्या प्रमाणात होती. यावेळी काँग्रेस पक्ष पाच वर्षं विरोधीपक्षात होता. त्याचा काहीतरी फायदा व्हायला हवा होता. निवडणुकीत राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी प्रचार केला होता. काँग्रेसने चांगल्या पक्षांशी युती केली होती. ज्या राज्यात काँग्रेसचं सरकार आहे तिथे कमीत कमी तीस जागा येतील, अशी अपेक्षा होती. मात्र तसं काही झालं नाही. काँग्रेसच्या नऊ माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव झाला. अमेठी हा तर पक्षाचा बालेकिल्ला होता. तिथेही पक्षाचा पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसच्या समोर एक मोठं संकट उभं राहिलं आहे. पुढे काय करावं हे त्यांना समजत नाही.

आव्हानं काय आहेत?
नेहरू-गांधी कुटुंबीयांमधले सर्व सदस्य प्रभावहीन ठरले ही काँग्रेससमोरची सगळ्यांत मोठी समस्या आहे. मात्र त्यांच्याकडून राजीनामा घ्यावा अशा स्थितीत सध्या काँग्रेस नाही. प्रियंका आणि राहुल गांधी दोघंही सक्रिय राजकारण सोडू इच्छित नाही. मोदी सरकारच्या काळात त्यांच्यावर काही आरोप लागले तर त्यांच्या बचाव करण्यासाठी निदान एका राजकीय पक्षाची गरज आहे. सध्या काँग्रेसमध्ये ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावरून मला असं वाटतं की येणारा काळ काँग्रेससाठी अत्यंत कठीण आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तींकडे कोणत्याही प्रकारचा जनाधार नाही. आपल्या स्थानाला धक्का लागू नये यासाठी ते नक्कीच प्रयत्नशील असतील. त्यामुळे राहुल गांधींनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मुळीच इच्छा नाही. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण गुंतागुंतीचं आहे आणि त्याचा कोणताच तोडगा सध्या दिसत नाही.
आता राहुल गांधीच जर पक्षाध्यक्षपदी राहणार असतील तर प्रश्न कुणाला आणि किती विचारायचे हा प्रश्न उरतो. उत्तरदायित्वाचा प्रश्न असेल तर त्यात पहिला क्रमांक खुद्द राहुल गांधींचाच आहे.

नेहरू गांधी कुटुंबीयांवरची श्रद्धा हा त्यांच्या यशातला पहिला अडथळा आहे. हीच गोष्ट काँग्रेसच्या बहुतांश लोकांना कळत नाही. राहुल गांधी या निवडणुकीत चांगलं बोलले. खूप प्रयत्न केले, मात्र जनता त्यांचं ऐकायला तयार नव्हती.
ज्या लोकांना आपण नवोदित मतदार म्हणतो ते जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका गांधी यांना वैतागले आहेत. त्यांना एक वेगळं कुटुंब हवं आहे. त्यांच्यामते काँग्रेसने आता एक दुसरा नेता आणायला हवा. हे काँग्रेससाठी एक मोठं आव्हान आहे. काँग्रेस त्यासाठी तयार नाही आणि हीच त्यांच्यासमोर एक मोठी अडचण आहे.
नेहरू गांधी कुटुंबाचा वापर राजकारणासाठी करावा मात्र राजकीय नेतृत्व, महत्त्वाचं पद दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला द्यावं. हे सगळं समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत जाऊन करावं. हे ज्या दिवशी होईल त्यादिवशी काँग्रेसमध्ये खरा बदल होईल.

नेहरू-गांधींना सोडावी लागतील महत्त्वाची पदं
मला असं वाटतं की नेहरू गांधी कुटुंबीय सद्सदविवेकबुद्धीचा वापर करतील. राहुल गांधींमुळे काहीही होत नाही हे त्यांना कळतंय. प्रियंका राजकारणात आल्या आहेत आणि त्यामुळे लोक खूश आहेत. प्रियंकांची शैली राहुलपेक्षा चांगली आहे. त्यांचं संवादकौशल्य उत्तम आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांना पूर्व उत्तर प्रदेशात पाठवलं. तिथे काँग्रेसची अवस्था आधीपासून बिकट होती. त्यामुळे त्यांना तिथे काहीही करिश्मा दाखवता आला नाही.

काँग्रेससमोर तसे अनेक पर्याय आहेत. त्यांच्या कुटुंबाशिवाय जर कुणी अध्यक्ष झालं आणि भलेही त्याला सोनिया, राहुल आणि प्रियंकाचा पाठिंबा असेल तर काँग्रेसवर नेहरू गांधी कुटुंबीयांचाच वारसा असल्याचा आरोप दूर होईल.
ममता बॅनर्जी, शरद पवार, जगनमोहन रेड्डी हे लोक काँग्रेसला सोडून गेले आहेत. त्यांच्याशी योग्य संवाद साधून एक मोठा फ्रंट तयार केला तर काँग्रेसला आणि या पक्षांनाही मोठा फायदा होईल. मात्र असं करण्यासाठी त्यांना मोठ्या पदांचा त्याग करावा लागेल. मग ते संसदेत असो किंवा संसदेच्या बाहेर. ममता, जगनमोहन रेड्डी यांना मोठी पदं द्यावी लागतील. त्यांच्याशी संवाद साधणं, एकत्रीकरण करणं हा भाग कठीण आहे. त्यात सोनिया गांधी सक्रिया भूमिका निभावू शकतात. कारण त्यांचे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत

काँग्रेस पक्षाने सध्याचे दिवस 'माँ-बेटा-बेटी'च्या राजकारणाने ओढवून घेतले आहेत. संपुआच्या पहिल्या पर्वातल्या कामगिरीच्या बळावर जनतेने यांना जास्त बळ दिलं. पण त्याची मुदत पाच वर्षंच असते, तहहयात नसते, याचा त्यांना विसर पडला. मग मॅडमच्या राष्ट्रीय सल्लागार मंडळाने मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणांची वाट लावली. पण रिझर्व्ह बँकेत गव्हर्नर राहिलेले डॉ. सिंग त्यांना राजकारणात आणणा-या 'मॅकिॲव्हेली'कडून काही शिकले नाहीत. उलट, भर संसदेत युवराजांनी आपल्याच सरकारचं विधेयक फाडलं तरी हे 'युवर मोस्ट ओबिडिअन्ट सर्व्हंट'च्या मानसिकतेतून बाहेर आले नाहीत.  म्हणूनच पक्षात या कुटुंबाची धुणी धुवायला आता कुणी तयार होत नाहीये. कारण उद्या बरे दिवस आले तर हे पुन्हा खुशमस्क-यांमार्फत गादीवर हक्क सांगतील आणि आपली अवस्था नरसिंह राव-सीताराम केसरींसारखी होईल, अशी सगळ्याना धास्ती वाटतेय ! कदाचित १९६९, '७७  किंवा '९९ प्रमाणे या पक्षाची पुन्हा छकलंही होऊ शकतात. पण ही घुसळण केव्हा तरी व्हायलाच हवी होती !!
- हरीश केंची
९४२२३१०६०९

मोदींच्या सौगाताची खैरात...!

"एकीकडे औरंगजेबाच्या कबरीचा घातलेला गोंधळ, आजवर भक्तांनी मुस्लिमांबाबत व्यक्त केलेला टोकाचा द्वेष, तिरस्कार, वक्फ दुरुस्ती ...