Saturday, 30 September 2017

समाज सुसंस्कारित व्हावा

*समाज सुसंस्कारित व्हावा...!*

" आजच्या जाहिराती आणि चित्रपट युगात प्रत्येकजण स्त्रीला आपल्या आवडत्या चौकटीत बसवायला बघतो. मुलांना आई कशी हवी असते तर ती पावभाजी, डोसा, न्यूडल्स करणारी!, नवऱ्याला हवी असते जाहिरातीत दिसते तशी सुडौल बांधा, बॉबकटवाली!, सासऱ्यांना हवी असते सर्व विषयांवर बोलणारी, चर्चा करणारी,येणाऱ्या जाणाऱ्यांची उठबस करणारी सुसंस्कृत, स्मार्ट सून हवी असते!, सासूला हवी असते मसाले भाजणारी, पुरण-पोळ्या करणारी सुगरण!. नोकरीवर गेली की, बॉसला हवी असते घरातल्या अडचणी विसरून ऑफिसच्या कामात मग्न होणारी कर्मचारी. सगळ्यांना सांभाळता सांभाळता त्या स्त्रीला स्वतःचे कसे व्हायचे आहे हा विचारही मनी डोकवायला जागा उरत नाही. दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांतून आई कशी हवी, बायको कशी हवी, सून कशी हवी म्हणून कुणी जाहिरात करत नाही हे नशीब म्हणायचं!"
---------------------------------------------

*न*वरात्रीचा जागर हा स्त्रीशक्तीचा जागर! खरंच तसा तो असतो का? या काळात स्त्रीशक्तीचं खूप गुणगान गायलं जातं. पण प्रत्यक्षात स्त्री कशी उपभोग वस्तू आहे याचं चित्र जाहिरातीतून, दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांतून, चित्रपटातून रंगविलं जात असल्याचं आपण पाहतो. याबाबत कुणीच गांभीर्यानं घेताना दिसत नाही. समाज संवेदनाहीन बनला आहे.

*जाहिरातींचा अतिरेक*
दूरचित्रवाणी ही आता समाजाचा एक अविभाज्य अंग बनलं आहे.जगभरात घडलेल्या घडामोडी क्षणार्धात आपल्यासमोर मांडणारा हा 'ईडीयट बॉक्स' लोकांचा प्यारा बनला आहे; पण या दूरचित्रवाणीच्या माध्यमातून समाजजीवनावर कोणता परिणाम होतो आहे. याचा खरा तर समाजशास्त्रज्ञानी विचार करायला हवाय. त्यावरून कोणते कार्यक्रम सादर होतात आणि कोणत्या दाखविल्या जातात. ही सध्या चिंतेची बाब आहे. या जाहिरातींचा एवढा प्रचंड मारा आहे की, या सर्व जाहिरातींच्या अनुषंगानं कार्यक्रम असावा असा भ्रम निर्माण होतोय. या उधाण आलेल्या जाहिरातीतून अनेक जाहिराती खरंच संस्कारक्षम असतात का हा संशोधनाचा विषय आहे. केवळ अंतरवस्त्रांच्याच जाहिरातींच नव्हे तर मासिक पाळीच्या अन कंडोमच्या जाहिरातींचा रतीब दररोज टाकला जातोय!

*जाहिरातीत बाई हवीच का?*
जाहिरात म्हटलं की, त्या जाहिरातीत बाई ही हवीच! मग त्या जाहिरातीत तिची गरज असो वा नसो! तेल अशी साबण असो की, आणखी काही त्यात सुंदर छबीकडी हवीच हवी. जणू काही बाई जितकी सुंदर तितकी मालाला मागणी मोठी! असं जाहिरात करणाऱ्याला वाटत असावं. जर जाहिरातील सुंदर बाया या गेल्या, तर त्या कुठं गेल्या अशी पुरुषांची आणि सगळ्या बघ्यांची अवस्था होईल. स्त्रीचं विकृत दर्शन... अंगप्रदर्शन घडविणाऱ्या जाहिरातींकडे महिला संघटनांनी लक्ष का देऊ नये? मध्यंतरी अशीच एक जाहिरात सुरू होती, गर्भप्रतिबंधक गोळ्यांची स्त्रीत्वाची विटंबना करणाऱ्या जाहिरातींकडे कसे लक्ष जात नाही? 'तू कधी किती वाजता संभोग केलास?' असा प्रश्न ती विचारतेय हे कशाचं लक्षण आहे? या बरोबरच जी गोष्ट स्त्रिया शक्यतो कुणाच्या लक्षात येऊ देत नाहीत. तिचं साग्रसंगीत प्रदर्शन जाहिरातीतून सध्या दिसतं. कोरडेपणा पटवून देण्यासाठी प्रात्यक्षिक दाखविण्याचा हा प्रकार कुणाला शहाणं करण्यासाठी? उद्या थेरडेपणा जाऊन जवानी कशी येते हे पटविण्यासाठी आणखी कसलं प्रात्यक्षिक हे जाहिरातवाले दाखवतील.

*महिला संघटना गप्प का?*
चित्रपटातल्या नटींनी जे नको ते दाखवलं म्हणून बोंब मारणाऱ्यांना सॅनेटरी नेपकिन्स-टॉवेल्सची कोरडी प्रात्यक्षिक खटकत नाहीत? दुरचित्रवणीपुढं लहान मुलं-मुली एकत्र बसलेली असतात. हे शहाण्यांना कळू नये? स्त्रियांना बेशरम बनविण्याचा वारसा आपल्याकडं आलाय असा अट्टाहास करून वावरणाऱ्या अतिशहाण्यांना आवरण्याची काही योजना महिला संघटनांकडे आहे का? हे वेळीच आवरलं नाही, तर उद्या दूरचित्रवाणीवरील कसल्या कसल्या जाहिरातीत काय काय दाखविलं जाईल हे सांगता येणार नाही. नंतर पाऊलखुणा शोधण्याऐवजी आधीच वाट निश्चित केलेली बरी!

*प्रत्येकाला स्त्री अशी हवीय*
आजच्या जाहिराती आणि चित्रपट युगात प्रत्येकजण स्त्रीला आपल्या आवडत्या चौकटीत बसवायला बघतो. मुलांना आई कशी हवी असते तर ती पावभाजी, डोसा, न्यूडल्स करणारी!, नवऱ्याला हवी असते जाहिरातीत दिसते तशी सुडौल बांधा, बॉबकटवाली!, सासऱ्यांना हवी असते सर्व विषयांवर बोलणारी, चर्चा करणारी,येणाऱ्या जाणाऱ्यांची उठबस करणारी सुसंस्कृत, स्मार्ट सून हवी असते!, सासूला हवी असते मसाले भाजणारी, पुरण-पोळ्या करणारी सुगरण!. नोकरीवर गेली की, बॉसला हवी असते घरातल्या अडचणी विसरून ऑफिसच्या कामात मग्न होणारी कर्मचारी. सगळ्यांना सांभाळता सांभाळता त्या स्त्रीला स्वतःचे कसे व्हायचे आहे हा विचारही मनी डोकवायला जागा उरत नाही. दूरचित्रवाणीच्या आई कशी हवी, बायको कशी हवी, सून कशी हवी म्हणून कुणी जाहिरात करत नाही हे नशीब म्हणायचं!

*मालिकांचा धुडगूस*
दूरचित्रवाणीवरील जाहिरातीशिवाय देशीविदेशी मालिकांनी जो धुडगूस घातलाय त्याचे परिणाम आपल्यावर कसे होणार आहेत. याचा विचार कुणी करतोय? हिंदी, मराठी चित्रपटात हे हवंय, ते नकोय म्हणणाऱ्यांनी या दूरचित्रवाणीच्या माध्यमातून घरात काय शिरतयं याचा विचार करू नये? आता रामरक्षा, मनाचे श्लोक, शांताकारम.... म्हणणाऱ्या मुलांचे आवाज दिवेलागणीला ऐकूच येत नाहीत. हातात पुस्तक घेऊन एखादा मुलगा तल्लीन होऊन वाचतोय असं दिसतंच नाही. आमच्या एका मित्राच्या नातवाला ब्रेकडान्स आणि फॅन्सीड्रेस स्पर्धेत गणेशोत्सवात बक्षीस मिळालं; मोठ्या उत्साहानं त्यानं ते बक्षिसाचं पुडकं फोडलं आणि रडवा चेहरा करून तसंच पुडकं त्यानं आईच्या हातात दिलं. तो इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होता. आणि त्याला बक्षीस मिळाली होती मराठी पुस्तकं, चांगल्या देवाच्या गोष्टी होत्या!

*कथा मार्कंडेयाच्या मंदिराची*
सुपरमॅन, स्पाईडरमॅन आणि कसले कसले मॅन आवडीनं वाचणाऱ्या मुलांना देवाच्या कथा वाचायला आवडत नाहीत. या गोष्टीची दखल देवळं बांधायचा ध्यास घेतलेल्यांनासुद्धा दिसत नाही. आपल्या तीर्थस्थळांच्याही रम्य अशा कथा आहेत. कुंभकोणम पासून तीन मैलावर मार्कंडेयाचं मंदिर आहे. या मार्कंडेयानं तपश्चर्येनं विष्णूला प्रसन्न करून घेतलं. विष्णूनं विचारलं,
'भक्ता, काय हवं ते माग'  मार्कंडेय म्हणाला
'मला तुझा सासरा व्हायचंय; तेव्हा लक्ष्मीला माझी मुलगी होण्याची आज्ञा कर'
विष्णूनं म्हटलं
'बाबा रे, लक्ष्मीला मी सांगू शकत नाही, त्यासाठी तुलाच तिला प्रसन्न करून घ्यावं लागेल, ती तुझी मुलगी व्हायला तयार झाली, तर मी ही तुझा जावई व्हायला तयार आहे.'
लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी मार्कंडेयानं तप सुरू केले. आणि एके दिवशी त्याला तुळशीच्या रोपाजवळ एक इवलीशी, तरतरीत गोरीपान मुलगी बसलेली दिसली. मार्कंडेयानं विचारलं,
'तू कोण?'
मुलीनं उत्तर दिलं,
'मला माहित नाही, मला आई-वडील नाहीत'
मुलीनं सांगून टाकलं.
'तुला कोण हवंय?, मार्कंडेयानं विचारलं.
'तुम्हीच....'
असं म्हणून त्या मुलीनं मार्कंडेयांच्या पायाला मिठी मारली. मार्कंडेयानं ओळखलं लक्ष्मी आलीय. तो तिचं पालन पोषण करू लागला. मुलगी हळूहळू वाढू लागली, मोठी झाली. विष्णू येईल आणि मुलीला मागणी घालील, या विश्वासानं मार्कंडेय स्वस्थ होता; पण एक दिवस एक जख्ख म्हातारा ब्राह्मण त्याच्या पुढ्यात उभा राहिला आणि म्हणाला,
'तुझी मुलगी बायको म्हणून मला दे नाही तर, जीभ हाडसून इथंच प्राण देईन'.
मुलीनं म्हाताऱ्याची मागणी ऐकली, तिनं तिथूनच सांगितलं,
 'मला या म्हाताऱ्याला दिलीत, तर मीही जीभ हाडसून प्राण देईन'.
मार्कंडेयाला काय करावं सुचेना. त्यानं विष्णूची करुणा भाकली, साक्षात विष्णू उभे ठाकले, मार्कंडेयानं विष्णूला म्हाताऱ्याची मागणी आणि मुलीचं म्हणणं ऐकवलं,. विष्णू म्हणाले
'चल, बघू कोण आहे तो?'
 बघतात तर तो म्हातारा आहे कुठं? मग विष्णूनं हसून सांगितलं,
'अरे, तो मीच होतो'
विष्णूचं पुन्हा लक्ष्मीशी लग्न झालं. मार्कंडेयानं कन्यादान केलं. आपल्या एकेका देवळाची अशी भन्नाट कथा आहे. पण सांगणारे नाहीत आणि असले तरी त्यांना ऐकणारे नाहीत. अशी स्थिती व्हायची काही वर्षांत...!

*चौकट*

*आपली सामाजिक जबाबदारी*
भारतीय तत्वज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभुत सुविधा व समृध्दी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये ज्ञान, कल्पना देणारी महासरस्वती असते. अशा प्रकारे या तीन शक्तींना महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे स्थान दिलेले आहे. पूजा जरी पुरूष दैवताची केली जात असली तरी चर्चा होते ती त्यांच्या शक्तीची, त्यांच्या असलेल्या स्त्री शक्तीची. स्त्री आणि पुरूष यांच्यात केवळ शरीरभेद नाही तर स्त्री अधिक संवेदनशील, श्रध्दावंत आहे, तिला देवत्वाचे अस्तित्व अधिक जाणवते. पुरूषाचे लक्ष्य मात्र भौतिकतेकडे, जडत्वावर अधिकार गाजविण्याकडे अधिक असते. स्त्री म्हणजे शक्ती, शुद्ध ऊर्जा यांचे मूर्त स्वरूप. आपल्या प्राचीन लोकांनी याला मान्यता दिली म्हणून वैदिक काळात स्त्रियांना उच्च आदर दिला जात होता. स्त्रीच्या रूपाने आशीर्वाद म्हणून लाभलेल्या या शक्तीला मोठय़ा कल्याणासाठी हितकर मार्गाने दिशा देणे, एक समाज म्हणून आपली जबाबदारी आहे.


-हरीश केंची ९४२२३१०६०९


Sunday, 24 September 2017

भगवानगड: भाषण आणि भांडण




*भगवानगड*
*भाषण आणि भांडण*

"सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक श्रद्धा-प्रेरणास्थानं ही राजकारण्यांच्या शह-काटशहांच्या खेळीचे अड्डे बनले आहेत. भगवानगड इथंही हा त्याच प्रकारचा फड गाजतो आहे. गोपीनाथरावांनंतर त्यांच्या कन्या-पुतण्याने आपल्या राजकारणासाठी 'वंजारी तितुका मेळवावा' असा जातीचा गडसुद्धा भगवानगडाच्या आडून बांधण्याचा प्रयत्न चालवला आहे. आणि  त्यावर आपलंच वर्चस्व असावं यासाठीचा हा झगडा आरंभलाय. माणसाला अध्यात्म कळलं, तर हे जग काय? त्यात आपलं स्थान काय? या सर्वांची जाणीव होईल असं हरिचिंतन सांगतं. या अध्यात्माचा सोयीचा अर्थ लावत त्यात आपलं जातीतील आणि राजकारणातलं स्थान पक्क करण्याचा हा दुबळा प्रयत्न म्हणायला हवं!"
-------------------------------------------

 *द*सरा, विजयादशमीचं समाजजीवनात अन्यन्यसाधारण असं आध्यात्मिक, पौराणिक महत्व आहे. ह्या निमित्तानं सामाजिक आणि राजकीय पातळीवर अनेक सोहळे होतात. रावणदहनाबरोबरच नागपूरला दीक्षाभूमीवर होणारा धम्मपरिवर्तनदिन, मुंबईत शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा मेळावा हे विशेष महत्वाचे होते, पण गेल्या काही वर्षांपासून भगवानगडावर होणारा सोहळा देखील चर्चेत राहिला आहे. भगवानगड हे आध्यात्मिक स्थळ! पण अध्यात्माचा सोयीचा अर्थ लावत भगवानगडाच्या माध्यमातून आपलं जातीतलं आणि राजकारणातलं स्थान पक्क करण्याचा प्रयत्न भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी आरंभला होता. त्यांच्या निधनानंतर आता त्यांची कन्या पंकजाताई मुंडे आणि पुतणे धनंजय मुंडे हे दोघे आपलं जातीतलं आणि राजकारणातलं स्थान पक्कं करण्यासाठी भगवानगडाच्या माध्यमातून एकमेकांवर कुरघोडी करताहेत. या दोघांच्या वादात भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी उडी घेतलीय.

*महंतांची ऑडिओ व्हायरल*
भगवानगड फक्त भाषणांपुरता आणि भांडणापुरता मर्यादित राहायला नको. त्याच एक स्वतंत्र अस्तित्व असून, तिथं फक्त भगवानबाबांचं नाव असावं. भगवानगड सुरक्षित रहायला हवा, यासाठी गडावरून कोणाचं राजकारण नको, असं मत भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी नुकतंच व्यक्त केलं आहे. राजकारणाचे जुने अनुभव वाईट आहेत. त्याचं दुःख मनात असल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं शास्त्री म्हणतात. या संदर्भात "भगवान गडाची ३५० एकर जमीन आहे. त्याला धोका पोहोचू शकतो," असं वक्तव्य नामदेवशास्त्री करत असल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झालीय, त्या जमिनीचा काय मुद्दा आहे समजून सांगताना ते म्हणतात. 'औरंगाबादमध्ये भगवान शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था लोकशिक्षणासाठी भगवानबाबांनी उभारली होती. मिल कॉर्नर इथं संस्थेची जागा होती. अजब नगर इथं आजही दहा गुंठे जागा आहे. जिथं अनेक जणांनी शिक्षण घेतलं. त्या संस्थेची जागा भीमसिंग महाराज गादीवर असताना बळकविण्यात आली. आता भगवानगड सुरक्षित राहायला हवा, यासाठी म्हणून कोणत्याही राजकीय नेत्याला गडावर भाषणबाजी नको, अशी भूमिका आम्ही घेतलीय.'

*बाबांचं अस्तित्व राहायला हवं*
गोपीनाथ मुंडेंना गडावर भाषणं होत होती, मग इतरांची का नकोत?  याबाबत त्यांचं म्हणणं 'इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, गोपीनाथ मुंडे यांची भाषणं जर आपण ऐकली तर लक्षात येईल की, ते स्वतःला भगवान बाबांचा भक्त मानत होते. मात्र इतरांची तशी भाषा नाही. गडावर वारसा सांगितला जातो आहे. ही बाब योग्य नाही. मी गडाचा पहारेकरी आहे. त्यामुळे गडाच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला. त्याचा फायदा देखील गडाला होतो आहे.' वर्षभरात गडाचे भक्त वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ४० टक्के मराठा समाज गडाचा शिष्य आहे. ८२ पैकी ४० सप्ताह मराठा समाज बहुसंख्य असलेल्या गावात झाले. त्यामुळे एक धार्मिक भावना जपत गडाची वाटचाल झाली पाहिजे. भगवानबाबाच्या गादीचा विसर पडत कामा नये. आळंदी, पैठण या सारख्या इतर धार्मिक स्थळांप्रमाणे भगवान गडाचे अस्तित्व असलं पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. भगवानगडाचा बहुसंख्य भक्त ऊसतोड कामगार आहे. हा वर्ग कागदोपत्री घोडे नाचवत नाही. त्यांना जर निर्णय आवडला नसता, तर त्यांनी ‘शो’ दाखवला असता. एक वर्ष झालं गड शांत आहे. निर्णय मान्य नसता तर ती शांतता राहिली नसती. भक्त संख्या वर्षभरात चाळीस टक्क्याने वाढलीय. बहुसंख्याने मराठा समाज असलेल्या अनेक गावांत सप्ताह झाले. गडावर येणाऱ्या पायी दिंड्या ज्या मध्यंतरी बंद झाल्या होत्या. त्या पुन्हा सुरु झाल्यात. भगवानगड भाषणापुरता आणि भांडणापुरता मर्यादित राहायला नको. त्याच एक स्वतंत्र अस्तित्व असून, तिथं फक्त भगवान बाबांचं नाव असावं. म्हणून तो निर्णय घेतला.

*गडाच्याआडून राजकारण*
पंकजाताई मुंडे यांना गडावर भाषण करण्यास परवानगी नाकारण्यात आली. तेव्हा धनंजय मुंडे यांना कसं भाषण करू दिले जाईल? आरोप प्रत्यारोप राजकारणाचा भाग आहे. माझे एवढंच सांगणं आहे, भाविकांच्या मतांसाठीचं हे राजकारण आहे. असं स्पष्ट मत नामदेवशास्त्री व्यक्त करतात तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल.

*भगवानबाबांचा गड!*
अहमदनगर व बीड जिल्ह्याच्या सीमेरेषेवरील पाथर्डी तालुक्यातील खरवंडी तालुक्याच्या परिसरातील 'भगवानगड' हे एक आध्यात्मिक स्थान म्हणून ओळखलं जातं. भगवानबाबांनी हा गड विकसित केला म्हणून हा भगवानगड! भगवानबाबा हे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील 'सुपे सावरगाव'चे! त्यांचं लहानपणीचं नांव आबाजी. लहानपणीच हा घरच्यांना कुणालाच न सांगता पंढरीच्या वारीत गेलास आणि वारकरी झाला. पुढे तो बीड जिल्ह्यातील नारायणगडावरील माणिकबाबांचे शिष्य बनले. माणिकबाबांसमवेत ते या गडावरच राहू लागले. एकदा बंकटस्वामी या गडावर आले असता भगवानबाबांना ते आळंदीला वारकरी सांप्रदायाच्या शिक्षणासाठी घेऊन गेले. आळंदीत बारा वर्षे अभ्यास करून आल्यानंतर भगवानबाबांनी पुन्हा आपलं आध्यात्मिक काम सुरु केलं. जत्रांमध्ये होणाऱ्या प्राणी हत्येविरोधात जागृती करण्याचं काम त्यांनी सुरु केलं. असा उल्लेख 'राजयोगी महंत भगवानबाबा' ह्या राजकुमार घुले यांनी लिहिलेल्या पुस्तकात केला आहे. कालांतरानं भगवानबाबा यांना त्रास सुरु झाला. मग त्यांना नारायणगड सोडावा लागला. त्यावेळी त्यांच्यावर अनेक खोटे-नाटे आरोप करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला. असं सांगितलं जातं की, नारायणगडावर त्यांच्या अंथरुणात महिलेची चोळी दडवून ठेऊन त्यांच्या चारित्र्यहनांनाचाही प्रयत्न झाला. या घटनेनं भगवानबाबा इतके व्यथित झाले की, त्यांनी स्वतःच लिंग कापून स्वतःला सिद्ध केलं.

*भक्तीचा गड: भगवानगड*
भगवानबाबा हे पुढे पंढरी व सध्याच्या भगवानगडावर आले आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत ते तिथंच राहिले. या गडाचा विकास त्यांनी केला. हा गड पांडवांचे गुरु धौम्यऋषी यांच्या नावानं ओळखला जात होता. भगवानबाबांना हे स्थान आवडलं. त्यामुळं त्यांनी इथं भक्तीचा गड उभारला असं या गडाचं माहात्म्य सांगितलं जातं. हा गड विकसित केल्यानंतर १ मे १९५८ रोजी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या गडाचं उद्घाटन झालं. गड म्हणजे तिथं विठ्ठलाचं मंदिर आणि दगडी संरक्षण भिंत आहे. या गडाचं उद्घाटन करताना यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, 'आपल्याला वाटलं की हा गड म्हणजे सिंहगड, प्रतापगड, रायगड यासारखा गड असेल, परंतु हा भक्तीचा, श्रद्धेचा गड आहे. चव्हाण यांनीच सर्वप्रथम 'भगवानगड' हे नांव उच्चारलं आणि पंढरीगडाचं भगवानगड असं नामकरण झालं.

*भीमसिंह उत्तराधिकारी*
१८ जानेवारी १९६५ ला पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये भगवानबाबांचं निधन झालं.त्यानंतर त्यांची समाधी भगवानगडावर बांधण्यात आली.उत्तराधिकारी नेमल्याशिवाय महात्म्याचा पुढील विधी करता येत नाही, अशी प्रथा असल्यानं या गडावर त्यांचे शिष्य भीमसिंह यांना उत्तराधिकारी नेमण्यात आले. भगवानबाबा हे वंजारी समाजाचे पण त्यांच्या डोक्यात 'जात' नव्हती. त्यांचे उत्तराधिकारी भीमसिंह हे रजपूत समाजाचे होते. भीमसिंह महाराजांच्या निधनानंतर सध्या नामदेवशास्त्री हे या गडाचे महंत आहेत. ते बाबांचे नातलगच आहेत.

*राजकीय पंढरीला सुरुवात*
अंधश्रद्धा, शिक्षण, भक्तिमार्ग, स्वातंत्र्यसंग्राम, अनिष्ट रूढी-परंपरा अशा अनेक विषयांवर काम करताना भगवानबाबांनी 'पंढरी: या गडाचा विकास केला. परंतु त्यांचे भक्त म्हणविणाऱ्यांनी हा गड राजकीय 'पंढरी' बनवण्यास सुरुवात केली. भगवानबाबांना वंजारी समाजासह सर्व जातीपाती मानतात; परंतु त्यांना वंजारी समाजापुरतं मर्यादित करुन आपली राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न गोपीनाथ मुंडे सतत करीत होते.

*राजकीय भाषणे*
भगवानगडावर दसऱ्याच्या सणाला भाविकांची पूर्वीपासून गर्दी होते. मुंडेंनी चलाखीनं ही गर्दी 'दसरा मेळाव्या'त परिवर्तित केली. या पट्टयात ऊसतोडणी कामगार मोठ्या संख्येनं आहेत. यात बहुसंख्य वंजारी समाज आहे. या सगळ्या भाविकांच्या भावनांचा फायदा उठवत 'दसरा मेळाव्या'त गर्दी जमवून मुंडेंनी शक्तीप्रदर्शनाचा उद्योग आरंभला. 'आपण या गडावर भक्तीपोटी येतो.' असं ते म्हणत. मात्र भाषण मुख्यमंत्री बनण्याचं ठोकत आणि विरोधकांवर टीका करीत. 'मला या गडावरुन मुंबईत दिसते.' असं त्यांनी एकदा भाषणात सांगितलं होतं. त्यापूर्वी एकदा 'दिल्ली दिसते' असंही ते म्हणाले होते. त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न त्यांची कन्या पंकजाताई आणि धनंजय मुंडे करताहेत पंकजाताईंनी गोपीनाथ मुंडेंच्या स्मरणार्थ 'गोपीनाथ गडा'ची निर्मिती केली, तरी देखील त्यांना गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणे भगवानगडावर भाषण ठोकायचं आहे. त्याला नामदेवशास्त्री यांनी विरोध करताहेत. धनंजय मुंडे आज नामदेवशास्त्रीच्या भूमिकेचं स्वागत करताहेत ते राजकीय हेतू ठेवूनच. पण त्यांनाही गडावर यायचं आहे, भाषण ठोकायचं आहे.

*सर्वपक्षीय राजकीय फड*
काही वर्षांपूर्वी गोपीनाथरावांनी एक सर्व पक्षीय मेळावा भरवला होता. मुंडे यांच्यासह छगन भुजबळ, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, अशी राजकीय पलटणचं गडावर जमली होती. विविध राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांप्रमाणेच मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी गोविंद कुलकर्णी असे 'जातीय' मंडळी हजर होती. त्या सर्वांनी मुंडे यांचे गोडवे गात  त्यांच्या मोठेपणासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. पण पतंगरावांनी मात्र गोपीनाथराव यांना आपल्या भाषणातून चिमटे काढत मुंडेंना भगवानगडावर वारसा सांगू नका असं बजावलं होतं.

*मुख्यमंत्र्यांना साकडं*
भगवानबाबांवर आध्यात्मिक संस्कार करणारे माणिकबाबा आणि बंकटस्वामी हे वंजारी नव्हे तर मराठा समाजाचे होते. त्यामुळे नामदेवशास्त्री म्हणतात तसं त्यांना हा गड सर्वजातीय भक्तांचा असावा; त्याच भूमिकेतून त्यांनी मुंडे बहीण-भावाला गडावर यायचं आमंत्रण दिलंय मात्र इथं भाषणबाजी होऊ नये अशी अपेक्षा करतात. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना भाषणबंदीसाठी साकडं घातलंय. मुख्यमंत्र्यानी त्यादृष्टीनं हालचाली सुरू केल्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी.

*सोयीचा अर्थ लावला*
सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक श्रद्धा-प्रेरणास्थानं ही राजकारण्यांच्या शह-काटशहांच्या खेळीचे अड्डे बनले आहेत. भगवानगड इथंही हा त्याच प्रकारचा फड गाजतो आहे. गोपीनाथरावांनंतर त्यांच्या कन्या-पुतण्याने आपल्या राजकारणासाठी 'वंजारी तितुका मेळवावा' असा जातीचा गडसुद्धा भगवानगडाच्या आडून बांधण्याचा प्रयत्न चालवला आहे. आणि  त्यावर आपलंच वर्चस्व असावं यासाठीचा हा झगडा आरंभलाय. माणसाला अध्यात्म कळलं, तर हे जग काय? त्यात आपलं स्थान काय? या सर्वांची जाणीव होईल असं हरिचिंतन सांगतं. या अध्यात्माचा सोयीचा अर्थ लावत त्यात आपलं जातीतील आणि राजकारणातलं स्थान पक्क करण्याचा हा दुबळा प्रयत्न म्हणायला हवं!

-हरीश केंची,
८७८८२११६८९

Saturday, 16 September 2017

पाकिस्तानात तक्षशिला चाणक्याची उपेक्षा


*पाकिस्तानात तक्षशिला, चाणक्याची उपेक्षा!*

"भारतीय राजकारणात राज्यकारभारासाठीच नव्हे तर राष्ट्रधर्माच्या आचरणासाठीही चाणक्याच्या मार्गदर्शक तत्वांचा नेहमीच अवलंब केला जातो, त्याचा उल्लेख आपण नेहमीच वाचत आलो आहोत. चाणक्याचे तत्वज्ञान आणि त्यांचे जगविख्यात कौटिल्यीयशास्त्र, या साऱ्या ज्ञानाची पाळमुळ जिथं रुजली त्या तक्षशिला विद्यापीठाची अवस्था आज अत्यंत दयनीय झालीय. भग्नावस्थेतील या विद्यापीठाकडं दुर्लक्ष केलं गेलंय आजही त्याची दखल घेतली जात नाही, याचं कारण ते आहे पाकिस्तानात ! चाणक्यांना पाकिस्ताननं अस्पृश्य मानलंय, पाकिस्तानची निर्मिती होण्यापूर्वी या भारतीय उपखंडातील तक्षशिला विद्यापीठ, मोहोंजोदडो, हडप्पा, सिंधू संस्कृती ही मानचिन्हे पाकिस्तानात गेली. पण ही सारी हिंदूंची भारतीयांची मानचिन्हे आहेत म्हणून त्यांची सतत उपेक्षा पाकिस्तानात केली जातेय. तक्षशिला विद्यापीठाच्या भग्नावशेषांतल्या वास्तु युनेस्को जतन करतेय. ही समाधानाची बाब असली तरी, युनेस्कोच्या त्या समितीवर भारताचा प्रतिनिधी असणं गरजेचं झालं आहे"
--------------------------------------------
या जगविख्यात 'तक्षशिला विद्यापीठा'ची जी दूरवस्था झालीय याबाबत पाकिस्तानातल्या काही विद्वानांनी खंत व्यक्त केलीय. तिथले ज्येष्ठ पत्रकार सैफ ताहीर यांनी रावळपिंडीपासून केवळ ३५ किलोमीटर दूर असलेल्या तक्षशिला विद्यापीठाच्या भग्नावशेषांचे विस्तृत चित्र तिथल्या ख्यातनाम दैनिक 'डॉन' मध्ये एका विस्तृत लेखाद्वारे मांडलेय. त्याचे शीर्षक होतं, "व्हाय इज ग्रेट फिलॉसॉफर कौटिल्य नॉट पार्ट ऑफ पाकिस्तान हिस्टोरीकल कॉन्सीयसनेस?" साध्या सरळ भाषेत सांगायचं म्हटलं तर 'पाकिस्तानातील इतिहासकार कौटिल्यासारख्या प्रखर तत्वज्ञानीची उपेक्षा का करताहेत?'

*तक्षशिलाची दखलच नाही*
सैफ ताहीर यांनी पाकिस्तान सरकार, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ आणि तिथल्या संवेदनशील नागरिकांना सवाल केला आहे की, तक्षशिला सारख्या प्राचीन विद्यापीठाचे अवशेष फाळणीनंतर पाकिस्तानात आढळून आले. त्यात मोठ्याप्रमाणात हिंदू, बौद्ध धर्म आणि संस्कृतीच्या अस्तित्वाचा, ताकदीचा प्रभाव दिसत होता. या विद्यापीठातून वेगवेगळ्या विषयातील जगविख्यात विद्वान निर्माण झाले होते. ते सारे प्रामुख्यानं हिंदू, वा बौद्ध होते. याच कारणानं पाकिस्तानला तक्षशिला विद्यापीठ, आणि तिथल्या विद्वानांचा, त्यांच्या पुरातत्व वास्तूंचा अभ्यास वा नोंदी इतिहासात करणं पसंत नसावं.

*१८ मठाचं शिक्षण संकुल*
२हजार७०० वर्षांपूर्वी केवळ भारतातच नव्हे तर जगभरातल्या ज्या विद्यापीठाचा लौकिक होता , जिथं प्रवेश मिळणं मग ती विद्यार्थी म्हणून असो वा शिक्षक म्हणून असो ती एक प्रकारची सिद्धी समजली जात होती. अशा तक्षशिला विद्यापीठ संकुलाचे जे कांहीं अवशेष शिल्लक आहेत त्याची 'झलक' युनेस्कोने संवर्धित अवशेष पाकिस्तान आणि जगासमोर मांडली आहे.तक्षशिला विद्यापीठ जिथं होतं वा तिचे अवशेष आज जिथं आढळतात ते आणि त्याचा परिसर हा ' मोहरा मोराडू' या नावानं ओळखला जातो. तक्षशिला विद्यापीठ हे १८ मठाचं एक मोठं शैक्षणिक संकुल होतं. जेलियन, धर्मराजिका, सकर्प, पीपलान, अशा प्रकारची नावं या मठाची होती. तक्षशिलामध्ये वेद, ज्योतिष, अवकाश विज्ञान, तत्वज्ञान, अर्थशास्त्र, राजनीती, वाणिज्य, हिसाब, युद्धकला, अगम-निगम, संगीत, नृत्य, चित्रकला, वैद्यकीय, सर्जरी, अशाप्रकारचे ६८ विषय शिकवले जात. १६ वर्षांहून अधिक वयाचे १० हजार ५०० विद्यार्थी इथे वास्तव्य करून शिक्षण घेत होते. आपल्याकडे गुरुकुल शिक्षणपद्धती जी आहे ती इथूनच आलीय. केवळ भारतातीलच नव्हे तर बेबीलॉन, ग्रीस, सीरिया, अरेबिया, फोनसिया, आणि चीन या देशातून इथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये मोठी स्पर्धा होत असे.

*राज्यकारभाराचा अभ्यास*
अर्थशास्त्रातील सिद्धांताचा सर्जक आणि कुशाग्रबुद्धीचा मालक, राजनितिज्ञ, सल्लागार, 'कौटिल्य,-चाणक्य', संस्कृत भाषेतील व्याकरण, शब्दांचे अर्थ आणि त्याच्या शब्दकोशाची निर्मिती करणारा 'पाणिनी', वैद्यकीय ज्ञानापासून भौतिक ज्ञानाचा प्रणेता 'जीवाक', आयुर्वेदाचा प्रखर ज्ञाता 'चरक', त्याचबरोबर पंचकर्मातील गोष्टींचा निर्माता 'विष्णूवर्मा' यासारख्या वेगवेगळ्या विषयातील अत्यंत बुद्धिमान असा शिक्षकगण इथं कार्यरत होता. देशविदेशातील राजकुमार तक्षशिलामध्ये अभ्यास करून,  शिक्षण घेऊन आपलं राज्य कारभार सांभाळत वा राजकीय सल्लागार म्हणून ते काम करीत.

*अलेक्झांडरला मोह*
अलेक्झांडर जेव्हा पंजाबात आला होता, तेव्हा गुणग्राहक असलेल्या त्याने आपली राजकीय इच्छा आणि सत्तेची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या देशाचा बहुमुखी विकास करण्यासाठी तक्षशिलातील निवडक विद्यार्थ्याना ग्रीसला परतताना आपल्याबरोबर घेऊन गेला होता.

*खंडहर बनले विद्यापीठ*
तत्कालीन भारताच्या उत्तर-पश्चिमेला तक्षशिला विद्यापीठ होतं. त्यामुळे त्यावर चढाई करणाऱ्यांना ते सोपं जातं असे. त्यामुळेच पर्शियन, शक, कुशाण, आणि शेवटी हुण-ज्यांनी रोमन साम्राज्याचा विध्वंस केला होता. अशा साऱ्यांनी हे विद्याज्ञानाचं हे तीर्थस्थळ उध्वस्त केलं होतं. चीनचा प्रवासी हुएन त्संग याने सहाव्या शतकात तक्षशिलाच्या या स्थानाचं वर्णन केलंय त्यात तो म्हणतो की, हे विद्यापीठाची अवस्था एक खंडहरासारखी झालीय. महाभारताची विस्तृत कथा ही तक्षशिलाच्या अभ्यासक्रमात होती. बौद्धांच्या जातककथेतही तक्षशिलाची महती वर्णिली आहे. तत्कालीन गांधार- कंदाहार आणि तक्षशिला यांचा विकास हा एकमेकांना पूरक असाच होता.

*वैश्विक विद्वान*
कौटिल्याचा उल्लेख 'सर्वोपरी वैश्विक विद्वान' असा उल्लेख सैफ ताहीर यांनी केला आहे. इटलीचे प्रख्यात तत्वज्ञानी मेडीआवेली यांच्या 'प्रिन्स' या ग्रंथात आणि चाणक्यच्या अर्थशास्त्रात ज्या गोष्टी मांडल्या आहेत हे पाहता हे दोन्ही जागतिक स्तरावरील महनीय ग्रंथ आहेत. असं अमेरिकेचे राजनीतिज्ञ हेन्री किसिंजर यांनी जाहीररीत्या म्हटलं आहे. चंद्रगुप्त मौर्य यांच्या साम्राज्याचा व्याप, यश कीर्ती आणि समृद्धी या साऱ्या मागे चाणक्याची बुद्धिमत्ता स्पष्ट दिसते. त्याच्याच सल्ल्यानुसार राज्यकारभार चालत असे. मौर्य साम्राज्य त्याकाळी संपूर्ण भारतीय उपखंडात पसरलेलं होतं. भौगोलिक दृष्ट्या ते मोगल साम्राज्यापेक्षा मोठं होतं. भारतीय इतिहासात मौर्य आणि त्याच्या वंशजांनी दीडशे वर्षांहून अधिक काळ चाणक्याच्या सिद्धांताला अनुसरून सत्ता राबविली. हा एक विक्रमच म्हणायला हवा. चाणक्य हे तक्षशिलाचे विद्यार्थी होते आणि पुढे ते इथले प्राचार्यही बनले.

*सर्वांगीण अभ्यासक्रम*
चाणक्याच्या ग्रंथात, 'अर्थशास्त्रा'त शासकाचं कर्तव्य, निर्णयशक्तीची क्षमता, साम-दाम दंड-भेदाची कुटनीती, युद्धकला, वाटाघाटीची कला, नगरशासन, वाणिज्य, कायदा, कृषी, आरोग्य, शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्रासाठीचे, त्याचबरोबर सामाजिक चालीरीती, रूढी, परंपरा याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं आहे. या त्यांच्या सर्व विषयांची धोरणं आणि नीती यांच्या केंद्रस्थानी नागरिकांचा उत्कर्ष, विकास, आणि देशाची सुरक्षा हेच राहिलेलं आहे.

*पुरातत्व खातेही अनभिज्ञ*
'अर्थशास्त्र' या ग्रंथात मौर्य साम्राज्यातील विशाल संख्यने असलेल्या संख्याबाबत आणि त्याच्या अस्तित्वाबाबत चाणक्य म्हणतात, "केवळ संख्या हीच महत्वाची नसते शिस्त आणि योग्य नेतृत्व नसेल तर उलट संख्याबळ हे ओझंच ठरतं.
चाणक्य यांच्यासारखे महाज्ञानी, विद्वान आणि तक्षशिला सारख्या महान विद्यापीठाबाबत पाकिस्तान सरकार जशी उपेक्षा करते आहे तशीच उपेक्षा इथले इतिहासकार, इथले पुरातत्व विभाग हेही करताहेत. पाकिस्तान पुरातत्व विभागाच्या वेबसाईटवर याची साधी दखल घेतली गेलेली नाही मग विस्तृत माहिती तर लांबच! याची खंत या लेखात सैफ ताहीर यांनी व्यक्त केलीय. शासन आणि तज्ञांच्या पातळीवर असे असेल तर तिथल्या सामान्य नागरिकांना काय कळणार? ते याबाबत अजाण आहेत.  तिथल्या 'पाकिस्तान हिंदू कौन्सिल' या संस्थेचे आधारस्तंभ असलेले डॉ. रमेशकुमार वाकवाणी यांनी तक्षशिला विद्यापीठाची पुन्हा नव्याने निर्मिती करावी अशी मागणी पाकिस्तान सरकारकडे केलीय. ते शक्य नसेल तर इथल्या एखाद्या विद्यापीठाला 'तक्षशिला' चे नाव द्यावं असे सुचविले आहे. पण पाकिस्तानातील विद्वान, बुद्धिजीवी, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ यापैकी कुणीही याला पाठींबा दर्शविला नाही.पाकिस्तानच्या कोणत्याच अभ्यासक्रमात ना तक्षशिला आहे ना चाणक्य!

*तक्षशिला : मोहरा मुराडू*
तक्षशिला विद्यापीठ जिथं होतं ते 'मोहरा मुराडू' हे निसर्गरम्य गाव आहे. चहूबाजूला हिरवंगार डोंगर, निसर्गाचं वरदान असलेल्या या गावात भग्नावस्थेतील काही इमारती आहेत. हे गाव हेरिटेज गाव म्हणून ओळखलं जातं, तक्षशिला विद्यापीठाच्या इथल्या काही मठावर, बौद्ध स्तुपावर 'युनेस्को'नं संरक्षित म्हणून लेबल लावले आहेत. तालिबान प्रभावित कट्टरपंथीयांनी अफगणिस्तानमधील बौद्ध गुफा जशा बॉम्बने उध्वस्त केल्या होत्या त्याप्रमाणेच या तक्षशिलाच्या अवशेषांना भय आहे. जिथे सरकारला आणि पाकिस्तानी जनतेला या गोष्टी जाणून घेण्यात रस नाही मग त्याचे संरक्षण करण्याची बुद्धी त्यांना कुठून येणार?

*पाकिस्तानी खूपच कमनशिबी*
सैफ ताहीर यांनी अत्यंत निर्भिडपणे लिहिलंय की, चाणक्याना पाकिस्ताननं अगदी अस्पृश्य मानलंय. याचं कारण असं ही असू शकेल की, चाणक्यची मनोभूमिका ब्राह्मणवादी आणि हिंदू संस्कृतीचं प्रतिनिधित्व करीत होतं. 'द इनसेस सागा' या ग्रंथात पाकिस्तानी इतिहासकार ऐताज अहेसान अत्यंत कष्टी होऊन लिहतात की, पाकिस्तान सरकार आणि लोक हे स्वतंत्र ओळखीची आणि मानचिन्हाची सतत उपेक्षा करीत आले आहेत. हे पाकिस्तानसाठी खूपच कमनशिबी म्हणावं लागेल. खोटा प्रचार आणि मनघडत दंतकथांना इतिहास म्हणून खपवून आपल्याच हाती आपणच बेड्या घालून घेतल्या आहेत. आता जे आपण पाकिस्तानात पाहतो आहोत ते पाकिस्तान निर्माण करणाऱ्यांच्या स्वप्नातील पाकिस्तान नाही. पाकिस्तानातल्या सगळ्या समस्यांचं मूळ हे त्यांची उभी केलेली खोटी प्रतिमाच आहे.'

*भारत सरकारनं लक्ष द्यावं*
पाकिस्तानची जगभरातील प्रतिमा बदलून उज्ज्वल करायची असेल तर त्याच्या भूमीवर एका जमान्यात विस्तारलेल्या बिगर मुस्लिम इतिहासाला स्वीकारायला हवाय. चाणक्य सारखा विद्वान पाकिस्तानच्या भूमीवर होता. हे इथल्या नव्या पिढीला ज्ञात करून द्यायला हवीय. नवनिर्माणाची प्रक्रिया सुरू करायला काय हरकत आहे? असं त्या लेखात सैफ ताहीर यांनी म्हटलंय. ते त्यात म्हणतात, हडप्पा, मोहोन्जोदडो, तक्षशिला, सिंधू संस्कृती अशांचे अवशेष पाकिस्तानात आहेत. ज्यात भारत, हिंदू संस्कृती, हिंदुधर्मातील दुर्लभ स्थापत्यकार, सिद्धी, कर्तृत्व दिसून येतंय. हे सारे अवशेष पाकिस्तानात आहेत. त्याची उपेक्षाच नव्हे ते संरक्षणाबाबतचाही धोका आहे..... आपल्या वर्तमान भाजप सरकारनं भारतासाठीचा हा अमूल्य आणि दुर्लभ ठेवा सन्मानपूर्वक राखण्यासाठी युनेस्कोच्या या प्रकल्पावर भारताचा प्रतिनिधी ठेऊन करता येईल.

-हरीश केंची

सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे जनक


 *सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे जनक*
        *प्रबोधनकार ठाकरे*

"प्रबोधनकारांना ही गोष्ट फार लागली. लोकांनी एकत्र यावं, समाजाच्या भल्याचा विचार करावा, त्यासाठी जमेल तसा, जमेल तेवढा आचारही करावा, आधी तीव्र तळमळ असल्यानं प्रबोधनकारांनी या उत्सवाला पर्याय शोधला. जिच्या दरबारात सगळ्यांना मुक्तद्वार आहे त्या महाराष्ट्राच्या मुख्यदेवतेचा.... मायभवानीचा नवरात्र उत्सव सार्वजनिक स्वरूपात का होऊ नये? शिवकाली घराघरात, गडागडावर होणारं मायभवानीचं नवरात्र बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी वापरायचा संकल्प केला. त्यासाठी 'लोकहितवादी संघ' स्थापला गेला आणि श्रीशिवभवानी नवरात्र महोत्सव दादरमध्ये सुरू झाला. मुंबईत वा महाराष्ट्रात तोपर्यंत कुठेही असा नवरात्र महोत्सव झाला नव्हता. मऱ्हाठी जनतेनं हा उत्सव उचलून धरला. या पहिल्या नवरात्र उत्सवाचं प्रबोधनकारांनीच जे शब्दचित्र उभं केलं आहे ते त्यांच्या 'माझी जीवनगाथा' या आत्मचरित्रात प्रत्यक्ष वाचल्यावर त्यांची कल्पकता आणि कार्यशक्ती केवढी विलक्षण होती याची साक्ष मिळेल. जे समाजघटक आपण हिंदू आहोत असं कधी अभिमानानं म्हणू शकत नव्हते, आपली पायरी सोडू नका असा संभावित उपदेशच ज्यांना सदैव ऐकावा लागत होता त्या समाजघटकांना स्वाभिमान आणि सन्मान देण्याचं, त्यांचं हिंदुत्वाशी असलेलं जन्मसिद्ध नातं ठोकून ठाकून सोवळेवाद्यांना पटवून देण्याचं काम प्रबोधनकारांनी या नवरात्र उत्सवाद्वारे केलं."
----------------------------------------
 *कों*बडा जसा डोक्यावर तुरा मिरवतो तसं हिंदुत्व मिरवणारी काही मंडळी सध्या दिसत आहेत. हिंदुत्व हे खरं तर धमन्यातून वाहणाऱ्या रक्तांसारखं हवं. ते असायला हवंय, दिसायला मात्र हवंच असं मात्र नाही. अंगात रक्त आहे हे दाखविण्याचे मार्ग वेगळे आहेत. कडकड कडे वाजवत फडफड फडाड आसूड स्वतःवरच उडवत, दाभणानं दंडाला भोसकून रक्ताच्या चिळकांड्या उडवणाऱ्या कडकलक्षम्या रस्त्याने कधी मधी फिरतात. भाबड्या बायाबापड्या त्यांना नमस्कार करतात. चार पैसेही देतात. हिंदुत्वाच्या अशा कडकलक्षम्या असाव्यात असं कुणालाच वाटणार नाही. पण सध्या हिंदुत्वाचं प्रदर्शन करण्याची क्रेज आहे, हे नाकारता येणार नाही. देशाचे सर्वच ठिकाणी भगवं राज्य आल्यानंतर तर याला उभारीच आलीय. ज्यांनी कधी आपण कोण आहोत याचा विचारसुद्धा केला नव्हता अशी पैसा हाच देव, पैसा हाच धर्म मानणारी धंदेवाईक माणसंही आज हिंदुत्वाचा प्रदर्शनपूर्वक कैवार घेत आहेत. हिंदुत्वाचा भाव वधारला आहे ह्याचंच हे लक्षण! हिंदुत्वाचा शेअर अंबानीच्या शेअरसारखा तेजीत आहे. रात्रभर दांडिया-गरबा खेळला जाण्यात हिंदुत्व आहे. ध्वनिक्षेपक रात्री लवकर बंद करा असं सांगणं हा हिंदुत्वावर अन्याय आहे. असे नको तिथं हिंदुत्व दाखवून हिंदुत्वाला सवंग बनवत आपलं स्वतःचा भाव वाढवून घेणारे गल्लीगल्लीत उगवत आहेत.

*लोकांची सहनशीलता*
दहा दिवस गणपती झाले. विजेचा लखलखाट आणि ध्वनिक्षेपकावर बडविल्या जाणाऱ्या बडवेबाज गाण्यांनी लोकांची टाळकी पिकवली. आता अंबामातेचे तरुण भक्त, शक्तीपूजक सिनेमांच्या गाण्यावर थिरकतील. रात्र जागवतील. सहामाही परीक्षा सुरू आहेत....परीक्षा गेल्या खड्डयात! दिवसभर दमल्यानंतर रात्री जरा शांतता....बसा बोंबलत! आमच्या घरात आजारी आहेत.... आई जगदंबा काळजी घेईल! पोलिसात तक्रार द्यावी लागेल....लई शाना होऊ नकोस, पोलीस आपल्याला हात लावू शकत नाहीत! हे सगळे वाद संवाद सगळीकडेच होत आहेत. अवघ्या नऊ रात्रीचा प्रश्न! हिंदुत्वासाठी एवढंही तुम्ही सहन करू शकत नाही? असंही बोलणारे आहेत.

*भगवे आणि केशरी*
'भगव्यां'नी गणपती यंदा लई पॉवरमध्ये केले. नवरात्री सुपरपॉवरमध्ये व्हायलाच हव्यात अशी ईर्षाही 'केशरी'वाल्यांमध्ये दिसते आहे. देशभरातील राजकीय वातावरण 'केशरी' असल्यानं महाराष्ट्रातले छगन-मगनसुद्धा डोक्याला केशरी पट्टया आवळायला लागलेत. श्रीगणेश आणि अंबामाता ह्यांच्या कृपेनं शहरात, गावात सगळीकडं हिंदुत्वाचा झेंडा फडफडतोय. रात्रभर डोळ्याला डोळा लागत नाही आणि कानात बोळे कोंबूनही ध्वनिक्षेपकावरून येणारा ठणठणाट थांबत नाही म्हणून मराठी माणूस तडफडतोय. गणपती आणि नवरात्रौत्सव हे दोन्ही उत्सव आज अशा थराला आलेत  की, त्यांच्याबद्धल समाजाने गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. या उत्सवापासून होणारा उपद्रव कमी करता येणार नाही? तरुणांना मोकळेपणानं एकत्र येता यावं, त्यांच्यामध्ये निरोगी अशी जवळीक साधावी. देवाधर्माच्या साक्षीनं हे घडलं तर गैर गोष्टी घडण्याची शक्यताच कमी, हे सगळं मान्य. पण आज ह्या भावनेचं या उत्सवात दर्शन होतं का? समाजकंटक म्हणून ज्यांचा उल्लेख जनता येईल अशा मंडळींचा या उत्सवांवर वरचष्मा आहे हे अमान्य करता येईल? चाळीतून, वाड्यावस्तीतून, सोसायट्यातुन गृहस्थी मंडळी एकत्र येऊन मर्यादीतपणे जो उत्सव साजरा करतात त्याच्याबद्दल कुणीच वाईट बोलणार नाही. पण हा उत्सवसुद्धा 'धंदो छे' म्हणून वागणाऱ्यांचं काय? समाजकार्याची सफेदी फासून लक्षावधी रुपयांचा मन मानेल तसा चुराडा करणारे, परिसरातल्या सरळमार्गी नागरिकाला ओलीस धरून उपद्रव देणारे किती काळ हा धिंगाणा घालणार आहेत आणि हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर मिरवणारे किती काळ हे असंच चालू देणार आहेत?

*बेलभंडार उचलायला हवा*
देवधर्म असा सवंग होऊन समाजातल्या अपप्रवृत्तीच समर्थ करणार असेल तर ह्या उत्सवाच्या मूळ हेतूच धुळीला मिळेल. उनाडटप्पू लोकांना हवा तो धिंगाणा घालायला संधी प्राप्त व्हावी म्हणून हे उत्सव सुरू झाले नव्हते. ते सुरू करणाऱ्यांनी काही आदर्श डोळ्यासमोर ठेवले होते. ते आदर्श कचऱ्याच्या पेटीत टाकून या उत्सवाचे धिंगाणे जिथे होतात तिथे ताठ मानेने उभे होऊन हा धिंगाणा थांबविण्याचा प्रयत्न व्हायला हवा. गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव यांना आलेलं स्वरूप बदलण्यासाठी सत्तेचं चाटण मिळालेल्या आणि हिंदुत्व विसरलेल्यांकडून कुणी अपेक्षा करणार नाही. पण बंडखोरी आणि अन्यायाविरुद्ध दंड थोपटून उभे होण्याची ईर्षा ज्यांच्या आहे अशा मऱ्हाठी बाण्याच्या मंडळींकडून मऱ्हाठी समाजाच्या निश्चित अपेक्षा आहेत. त्यांनी तरी नवरात्र उत्सवाला वळण लावण्यासाठी बेलभंडार उचलून हर हर महादेव करायला हवा. कारण मायभवानीचा हा नवरात्रौत्सव मुंबईसह महाराष्ट्रात सामाजिक एकता साधण्यासाठी सार्वजनिकरित्या सुरू करण्यात पुढाकार होता  'ज्याची लंगोटी स्वच्छ तो कुणाला भिणार आणि कुणाची पर्वा करणार?' असं ठणकवणारे बेडर समाजसुधारक, संघटक आदरणीय प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा!

*...तर गणेशमूर्ती फोडीन !*
१९२६ मधली ही घटना आहे. दादरला टिळक पुलाच्या पायथ्याजवळ सार्वजनिक गणेशोत्सव व्हायचा. या उत्सवात स्पृशांबरोबरच अस्पृश्यानाही गणेशमूर्तीची पूजा करता यावी यासाठी काही तरुणांनी प्रयत्न चालविले. हिंदुत्वाचं सोवळं सांभाळण्यासाठीच आपला जन्म आहे असा अहंकार बाळगणाऱ्यांनीं या गोष्टीला विरोध दर्शविला.  त्यातल्या काही तरुणांनी प्रबोधनकारांची भेट घेतली. त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली परिस्थितीचे गांभीर्य पाहून प्रबोधनकार ठाकरे पुढे आले. त्यांनी उत्सवातील काही मंडळींची भेट घेतली, उत्सवासाठी वर्गणी देणाऱ्या साऱ्यांचा पूजेवर हक्क आहे असं त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण उपयोग होत नाही असं लक्षात येताच ठाकरे कडाडले. 'अस्पृश्य हिंदू बांधवांना गणेश पूजनाचा हक्क मिळणार नसेल तर मी स्वतः गणपतीची मूर्ती फोडून टाकीन अशी गर्जना केली. मातीच्या मूर्तीपेक्षा जिता जागता माणूस मोठा आहे असं मानणाऱ्या प्रबोधनकारांच्या या बंडखोरीने सोवळी सांभाळणारे गडबडले! डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रावबहादूर बोले यांना बोलावून काही मार्ग काढण्यासाठी धावपळ झाली. आणि मग एका अस्पृश्याने स्नान करून ओलेत्याने एक पुष्पगुच्छ ब्राह्मण पुजाऱ्याला शिवून त्याच्या हातात द्यावा व पुजाऱ्याने तो विनातक्रार गणपतीला वाहावा अशी तडजोड निघाली.

*उत्सवच बंद करून टाकला*
मडकेबुवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दलिताने आंघोळ करून पुजाऱ्याच्या हातात गुच्छ दिला. तो गणपतीला वाहण्यात आला. ही फार मोठी सामाजिक क्रान्ती होती.हिंदुत्वाला ग्रासणाऱ्या शतकानुशतकांच्या रूढी-परंपरेच्या बेड्या धडक मरून तोडणारी प्रबोधनकारांसारखी आणखी हजारभर माणसं जर महाराष्ट्रात होती तर आजही ऐतखाऊ बुरसटलेल्या मंडळींच्या कफनीच्या कफनात घुसमटत पडलेले हिंदुत्व कधीच मुक्त झालं असतं. कोट्यवधी दलितांना आपण दुरावला नसतो. पण देवापुढे, सारे समान हा प्रबोधनकारांनी घालून दिलेला धडा सोवळं सांभाळणाऱ्यांना मान्य झाला नाही. आता दरवर्षीच अस्पृश्य पूजा करणार, देव बाटणार, धर्म बुडणार असा कांगावा करून त्यांनी गणेश उत्सवच बंद करून टाकला.

*नवरात्रौत्सवाची सुरुवात*
प्रबोधनकारांना ही गोष्ट फार लागली. लोकांनी एकत्र यावं, समाजाच्या भल्याचा विचार करावा, त्यासाठी जमेल तसा, जमेल तेवढा आचारही करावा, आधी तीव्र तळमळ असल्यानं प्रबोधनकारांनी या उत्सवाला पर्याय शोधला. जिच्या दरबारात सगळ्यांना मुक्तद्वार आहे त्या महाराष्ट्राच्या मुख्यदेवतेचा.... मायभवानीचा नवरात्र उत्सव सार्वजनिक स्वरूपात का होऊ नये? शिवकाली घराघरात, गडागडावर होणारं मायभवानीचं नवरात्र बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी वापरायचा संकल्प केला. त्यासाठी 'लोकहितवादी संघ' स्थापला गेला आणि श्रीशिवभवानी नवरात्र महोत्सव दादरमध्ये सुरू झाला. मुंबईत वा महाराष्ट्रात तोपर्यंत कुठेही असा नवरात्र महोत्सव झाला नव्हता. कुलाबा ते कल्याण आणि पालघरपर्यंतच्या मऱ्हाठी जनतेनं हा उत्सव उचलून धरला. या पहिल्या नवरात्र उत्सवाचं प्रबोधनकारांनीच जे शब्दचित्र उभं केलं आहे ते त्यांच्या 'माझी जीवनगाथा' या आत्मचरित्रात प्रत्यक्ष वाचल्यावर त्यांची कल्पकता आणि कार्यशक्ती केवढी विलक्षण होती याची साक्ष मिळेल.

*उत्सवात सुधारणा हवी*
जे समाजघटक आपण हिंदू आहोत असं कधी अभिमानानं म्हणू शकत नव्हते, आपली पायरी सोडू नका असा संभावित उपदेशच ज्यांना सदैव ऐकावा लागत होता त्या समाजघटकांना स्वाभिमान आणि सन्मान देण्याचं, त्यांचं हिंदुत्वाशी असलेलं जन्मसिद्ध नातं ठोकून ठाकून सोवळेवाद्यांना पटवून देण्याचं काम प्रबोधनकारांनी या नवरात्र उत्सवाद्वारे केलं. म्हणूनच निदानपक्षी महाराष्ट्रात होणारा हा नवरात्र उत्सव बाजारू धिंगाणा न होईल याची दक्षता शिवसेनेनं घ्यावी असं मला वाटतं. 'फुकटचे सल्ले देऊ नका' हे ऐकण्याची तयारी ठेवूनच हे अत्यंत नम्रपणे मी सुचवितो आहे. कारण एकलव्याचा निष्ठेनं प्रबोधनकारांच्या विचारांचे, निर्भीड पत्रकारितेचे धडे मी घेतलेत.

*नवनिर्माणाची खात्री*
कोट्यवधी दलित हे भारताचं एक शक्तीस्थान आहे. त्यांना धिक्कारून, डावलून अथवा दडपून ठेऊन भारताचं, हिंदुत्वाचं, समाजाचं भलं होणार नाही. बुद्ध, आंबेडकरच नव्हेत, त्यांना मानणारे सारे दलित आमचेच आहेत. मंदिराचीच नव्हे, आमच्या हृदयाची दारंही त्यांच्यासाठी सदैव खुली आहेत. त्यांना सन्मान लाभावा, समृद्धी लाभावी, यासाठी आम्ही प्रसंगी अपमानही सोसू. आम्ही त्यांना अव्हेरणार नाही अशी उदारता जाणीवपूर्वक हिंदूंनी दाखवावी म्हणून फुले, गांधी, सावरकर, माटे मास्तर, साने गुरुजी व इतरेजन जीवनभर झटले. पण त्याचं महत्व अद्याप पटलेलं नाही. दलितांच्या नावावर जगणाऱ्या काही नेत्यांचं सोडा, ज्यांना आडवाटेनेच जायचं आहे त्यांना खुशाल त्या वाटेनं जाऊन घ्यायचा तो अनुभव घेऊ दे. पण ज्यांना आजही जगायचं कसं एवढी एकच चिंता सदासर्वदा पोखरते आहे त्यांच्या मनात आपण विश्वास जागवणार आहोत की नाही? गणेशोत्सव, नवरात्रौत्सव करणारे यासाठी काही करू शकणार नाहीत काय? ते नक्कीच करू शकतात. लक्षावधीची रोषणाई, अर्थशून्य गाण्यांचा ध्वनिक्षेपकावरून अविरत मारा आणि जल्लोष, हैदोस हे आजच्या उत्सवाचं स्वरूप हे समाजाला लागलेल्या किडीचं लक्षण आहे. हिंदुत्वाचा अभिमान धरणाऱ्यांना तरी उत्सवाचं हे स्वरूप बदलण्याची आवश्यकता जाणवायला हवी. ते बदलणं हे तरुणांच्याच हाती आहे. ते नवं काही घडवतील, नवनिर्माण करतील अशी खात्री वाटते.

-हरीश केंची 
९४२२३१०६०९


Saturday, 9 September 2017

लोकशाही: संसदीय की अध्यक्षीय!


 *लोकशाही... संसदीय की अध्यक्षीय*

"घटना कोणत्याही प्रकारची असली तरी तिचं यश हे राबवणार्‍यांवर अवलंबून असतं. त्यांची राज्य पध्दतीवरील निष्ठा आणि जनतेचं कल्याण करण्याची वृत्ती, यावर सर्व ठरतं. राजेशाही हा हुकूमशाहीचाच  एक प्रकार आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे लोकांना हवंहवंसं वाटणारं राज्य होतं. गुजरातमध्ये बडोद्याला सयाजीराव गायकवाडांची राजवट जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारी होती. आजही अशा अनेक राजांची नांवं इतिहासात आदराने नोंदली गेली आहेत. नेतृत्व जर भ्रष्ट असेल तर कितीही उत्तम राज्यव्यवस्था असली, तरी तिची वाटच लागणार. भारतातल्या सर्व मतदारांना आणि लोकशाहीलाही आता ही सवय झालीय. भारतात यापुढे होणार्‍या निवडणुकीत कुणालाही बहुमत मिळणार नाही असं वाटत असतानाच भाजपला नागरिकांनी स्पष्ट बहुमत दिलं. देशात अनेक राज्यांत विविध पक्ष सत्तेवर आहेत. आज मूल्याधिष्ठित राजकारणाऐवजी व्यक्तिनिष्ठ राजकारणाला प्रारंभ झाला आहे. असं वाटावं अशी स्थिती निर्माण झालीय,  त्यामुळे लोकशाही संसदीय असावी की अध्यक्षीय याबाबत चर्चा व्हायला हवीय."
---------------------------------------------

: सत्तरच्या दशकात देशातील नऊ राज्यांत कॉंग्रेस हरली, तेव्हापासून या आघाडीच्या राजकारणाला प्रारंभ झाला. संयुक्त विधायक दल, लोकशाही आघाडी अशा कांहीं नावांनी आघाडी सरकारं अस्तित्वात आली. परंतु आघाडी सरकारांचं बस्तान ना कधी कोणत्या राज्यात बसलं, ना केंद्रात. प्रत्येकवेळी घटक पक्षांमध्ये मतभेद होऊन सगळी सरकारं कोसळली. याला गेल्या कांही वर्षात अपवादही सिध्द झालाय. राज्यातलं आघाडी सरकार कोसळलं आणि कोणीही सरकार बनवू शकत नसेल तर राष्ट्रपती राजवट जारी करता येते. राज्यपालांमार्फत कारभार सुरू होतो. परिस्थिती स्थिरस्थावर झाली की, निवडणुका घेता येतात. असं वारंवार घडलं तरी राज्याची सूत्रं राज्यपाल सांभाळू शकतात. देशातील अनेक राज्यांमध्ये आजवर अनेकदा राष्ट्रपती राजवट आली आहे. परंतु, केंद्र सरकारबाबत अशी काही सोय घटनेत नाही. राज्य घटनानिर्मिती झाली त्यावेळी घटनाकारांना वाटलं असेल की, ब्रिटिश पध्दतीच्या संसदीय लोकशाहीची पाळंमुळं खोलवर रूजतील, चांगल्या प्रथा निर्माण होतील आणि पंतप्रधान व मंत्रिमंडळ असलेली संसदीय लोकशाही वाढीस लागेल. ती तशी लागल्याचं दिसतं. लोकांनी तब्बल वीस वर्षांनंतर संपूर्ण बहुमत एका पक्षाच्या म्हणजेच भाजपच्या हाती सोपवलीय.


*विचारांवर आधारित पक्ष*
ब्रिटनची घटना अलिखित आहे. आजवरच्या वर्षानुवर्षाच्या अनुभवातून त्यांची आजची राज्यपध्दती विकसित झालीय. काळाच्या ओघात त्यात आणखीही बदल होतील. या पध्दतीचा मूलाधार आहे, संसदेत कोणत्यातरी एका पक्षाचं पूर्ण बहुमत असायला हवे. आतापर्यंत ब्रिटनमध्ये हुजूर, मजूर किंवा उदारमतवादी पक्षांचीच सरकारं आली आहेत. जगात अनेक मतमतांतरं असलेले लोक असतात. आपापल्या तत्त्वज्ञानानुसार ते पक्ष-पंथ काढतात. रचनात्मक तत्त्वज्ञानापासून गोंधळवादावर विश्वास असलेल्यांपर्यंत अनेक गट जगभर पसरले आहेत. त्यांना प्रत्येकाला वाटतं की, सत्तासुकाणू आपल्या हाती असावं. त्या अनुषंगानं त्यांचे पक्ष बनतात. विश्‍व शांततावादीपक्ष, पर्यावरणाची काळजी घेणार पक्ष, मुक्त जीवनाचा पुरस्कार करणारा पक्ष, आदि राज्यशकटाच्या दोन चाकासारख्या असलेल्या दोन पक्षांवर आधारित ब्रिटिश लोकशाहीसुध्दा या नवनव्या विचारांमुळे डळमळू लागली आहे. राजकारणात अनेक तत्त्वं येतात. तेव्हा त्यांना दोनच पक्षांत सामावणं कठिण असतं. उदा.- मजूरपक्षाचे काही लोक आणि हुुजूरपक्षाचे कांही लोक पर्यावरणवाद न मानण्याच्या मुद्द्यावर एकत्र येऊ शकतात. त्यामुळे विविध पक्षोपपक्षांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. नवनवे पक्ष निर्माण होताहेत. इंग्लंडमध्ये हुजूरपक्ष आणि उदारमतवादी पक्ष यांच्या तत्त्वज्ञानातला थोडाथोडा भाग घेऊन लिबरल डेमोक्रॅट पक्ष उदयाला आला आहे. लोकशाहीत दोनच पक्ष आमने-सामने खडे असतील तर बहुमत कुणाला, हे ठरवणं सोपं जातं. परंतु तीन किंवा अधिक पक्ष असले की, कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणं अशक्य होतं. एखादा पक्ष फारच मजबूत असेपर्यंत बहुमताचा प्रश्‍न येत नाही.

*ब्रिटिश राजपद्धती गैरलागू*
भारतात अनेक पक्ष असूनसुध्दा कॉंग्रेसने सतत बहुमत मिळवून संसदीय लोकशाही पध्दतीने सरकार बनवलं, हा अपवाद आहे. सतत पन्नासहून अधिक वर्षं एकच पक्ष अशा पध्दतीत सत्तेवर राहणं हे कॉंग्रेसनं करून दाखवलं. पण आता याच चमत्काराला ओहोटी लागली आहे. मधल्या अल्पमतातल्या व आघाडी सरकारानंतर आता पुन्हा बहुमताचं सरकार आलंय. आघाडी सरकारचं नेतृत्व करताना अटलबिहारी वाजपेयी यांनी यावर मत व्यक्त करताना एका मुलाखतीत म्हटलं होतं की, ‘ब्रिटनची राज्यपध्दती त्यांच्यासाठी योग्य आहे. कारण तिथे दोनच पक्ष आहेत; परंतु आपल्याकडे अनेकपक्ष असल्याने ती पध्दत आपल्याला उपयुक्त नाही.’ त्यांचा रोख कॉंग्रेसच्या राजकीय परिस्थितीवर होता. नरसिंह राव सरकार रोखे घोटाळा, साखर घोटाळा, खासदार खरेदी अशा अनेक गडबडीमुळे राव यांना न्यायालयीन आरोपी म्हणून उभं रहावं लागलं होतं. त्यानंतरही आलेल्या कॉंग्रेस आघाडी सरकारच्या कारभाराच्या दिशेने होतं. अटलजींनी राज्यातील निवडणुकांबाबतही म्हटलंय, वेगवेगळ्या राज्यात अनेक पक्ष सत्तेवर आल्याने देशात आता एकाच पक्षाचं राज्य राहील याची शक्यता नाही. राज्यात विविध पक्ष सत्तेवर आले तर ठीक, पण लोकसभेचे काय ? केंद्र सरकारचं काय ? ५४० जागा असलेल्या लोकसभेत चार मोठे आणि कांही लहान पक्ष आले तर एकाच पक्षाच्या स्पष्ट बहुमताची शक्यता नाही. त्यातून सध्याची संसदीय पध्दत अशक्य होईल. इंग्लंडमध्येही तसंच होतंय. कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशामध्ये दोनच प्रमुख पक्ष असल्याने अजून तरी ब्रिटिश पध्दतीची लोकशाही तिथे राबविली जात आहे. आपल्याकडे मात्र एकाच पक्षाच्या बहुमताची शक्यता नाही आणि आघाडीचं सरकार टिकविण्याचीही शक्यता नाही. कारण अटलजींनी हा अनुभव घेतलाय. तेरा दिवसांचे पंतप्रधान पद, त्यानंतर तेरा महिन्यांचे पंतप्रधान पद त्यांच्याकडून आल्यानंतर त्यांनी त्यांचंच म्हणणं खोटं ठरवित पांच वर्षांची टर्म पुरी केलीय. मनमोहनसिंग सरकार प्राप्त परिस्थितीत आपल्या दोन टर्म पूर्ण केल्या. या आघाडी सरकारातल्या गोंधळानं लोकांना एकपक्षीय सत्ता आणण्याचं बळ मिळालं.

*सर्वाधिकार प्रधानमंत्र्याकडे*
एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढविल्यानंतर सत्तेसाठी एकत्र येणं अनेकांना क्रमप्राप्त झालं होतं. निवडणुकानंतर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही तर आघाडी सरकार येणं प्रत्येकवेळा सोपं असेल, असं नाही. कारण, अनेक पक्ष परस्परांच्या वार्‍यालाही उभे राहात नाहीत. सोमनाथ चटर्जी, प्रणव मुखर्जी, यांच्यासारख्या अनेकांना यासंदर्भात चिंता व्यक्त केली होती सर्वांनाच धास्ती होती. अशा राजकीय रोगावरचा इलाजही आपल्याकडे नाही. गलिच्छ राजकारणाने कळस गाठला होता. जर पुन्हा एकाच पक्षाला बहुमत मिळाले नाही तर... या परिस्थितीत ब्रिटिश पध्दतीच्या संसदीय लोकशाहीचा त्याग करावा काय? सध्याच्या पद्धतीमध्ये लोकसभेत बहुमत असलेल्या पक्षाचा नेता पंतप्रधान होतो आणि सर्व सत्ता त्याच्याच हाती असते. राष्ट्रपती आणि सरसेनापती असले तरी ते नामधारी पद आहे. ब्रिटनमध्ये ते राणीचं स्थान आहे. आणि तिथेही संसद पंतप्रधानांमार्फत राज्यकारभार करते. आपल्याकडे प्रौढ मताधिकारातून लोकप्रतिनिधी निवडून येतात. केंद्रसरकार लोकांनी निवडून दिलेलंच असलं पाहिजे आणि ते स्थिर असणंही जरुरीचं आहे.
ब्रिटिश पध्दतीच्या संसदीय लोकशाहीला पर्याय म्हणजे अमेरिकन धर्तीची अध्यक्षीय लोकशाही. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आदि देशांत ही पध्दत यशस्वीरित्या कार्यरत आहे. आपल्याकडे भरमसाठ पक्ष निर्माण होत असतात. अनेकपक्षांचे तुकडे पडतात. नेत्याच्या नांवावरून हे गट ओळखले जातात. राजकीय स्वातंत्र्याचा हा तोटा म्हणा हवा तर, पण त्याला पायबंद घालता येत नाही. म्हणूनच आजच्या परिस्थितीत पर्याय म्हणजे अध्यक्षीय पध्दत!

*मतांच्या प्रमाणात प्रतिनिधित्व*
अमेरिकेत अध्यक्षीय पध्दत असली, तरी तिथेही ब्रिटनसारखेच दोन पक्ष आहेत. डेमोक्रेट आणि रिपब्लिकन. आपल्याकडे अनेक पक्ष असल्याने अध्यक्षीय पध्दतीला दूरच राहील पण पूर्वी इंदिरा गांधी आणि आता नरेंद्र मोदी यांचा राज्य कारभार पाहिला तर तो अध्यक्षीय पद्धतीनुसार चाललाय की काय अशी स्थिती आहे. आता याला इटालियन किंवा जर्मन पध्दतीची जोड द्यावी लागेल. आपल्याकडे एकमत अधिक मिळविणाराही निवडून येऊ शकतो. त्यामुळे पक्षाला मिळालेली मतं आणि जागा यांचा काही ताळमेळ नसतो. केवळ ३५ टक्के मतं मिळविणार्‍या पक्षाला सत्तर टक्के जागा मिळाल्याचं उदाहरण आहे. अनेक निवडणुकांतूनही हे कांही प्रमाणात सिध्द झालंय. वाटेल तेवढे पक्ष आणि मतांची टक्केवारी व जागा यातला विसंवाद दूर करण्यासाठी मतांच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व ही पध्दत योग्य ठरेल. ज्या पक्षाला जेवढी मतं मिळतील, त्या प्रमाणात लोकसभेतील जागा त्या पक्षाच्या वाट्याला येतील. त्यामुळे एखादा छोटा पक्ष मोठ्या पक्षाच्या साठमारीत नामशेष होतो. तसं न घडता त्या पक्षालादेखील एखादं-दोन जागा पदरात पाडता येतील. अध्यक्षाच्या हाती सत्ता असलेली लोकशाही आणण्यासाठी सध्याची ब्रिटिश धर्तीची पध्दत पूर्णपणे रद्द करावी लागेल.

*राष्ट्रपतींची भूमिका*
अध्यक्षीय पध्दतीत राष्ट्रप्रमुखाची निवडणूक सबंध देशभरात मतदान घेऊन होते. संसदेत मात्र विविध पक्षांचे निवडून आलेले प्रतिनिधी बसवतात आणि अध्यक्ष त्यावर लक्ष ठेवतात. अनेक पक्षांमुळे आघाडीची सरकारं बनतात-पडतात. अशावेळी अध्यक्ष कारभार पाहतात. अध्यक्षांनी बेदरकारपणा दाखवला तर सर्वोच्च न्यायालय त्याची दखल घेतं. आपल्याकडे खरी सत्ता पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या हाती असते. राष्ट्रपती नामधारी राष्ट्रप्रमुख. पंतप्रधान व मंत्रिमंडळ नसेल तर राष्ट्रपती राज्य चालवू शकत नाहीत. चरणसिंग, चंद्रशेखर, देवेगौडा, गुजराल आणि वाजपेयी यांच्याकाळात अल्पमतातील सरकारं होती. तरीही नांवापुरते का होईना पण ते पंतप्रधान होते. त्यांना काळजीवाहू पंतप्रधान ठेवून राष्ट्रपतींनी निवडणुका घेतल्या. असं केव्हातरी घडतं. राष्ट्रपतींनी असं पाऊल उचलण्याची तरतूद घटनेत नसली, तरी त्याला विरोधही नाही. अडचणीतून पार होण्याचा तो एक मार्ग. पण आता बहुमत नसण्याचा पेचप्रसंग सारखाच उद्भवू लागला तर त्यासाठी कायमी उपाय शोधावा लागेल.

*घटनादुरुस्ती अशक्य*
अध्यक्षीय पध्दत आणि प्रमाणात प्रतिनिधीत्व अशी सुधारणा करण्यासाठी घटना बदलावी लागेल. त्यासाठी नवी घटनासमिती किंवा खासदारांच्या दोन तृतियांश बहुमताची आवश्यकता आहे. अर्थात, घटनेत तशी तरतूद नाही. तीही सर्वानुमते करावी लागेल. असा घटनाबदल आणि अध्यक्षीय पध्दती शक्य आहे का ? ते शक्य झालं आणि अध्यक्षीय लोकशाही अवतरली तरी देशाची सर्व सत्ता सांभाळू शकणारा अध्यक्ष सतत मिळू शकेल कां ? सर्वंकष सत्तेची चटक लागलेला एखादा नेता घटना गुंडाळून स्वत:च सरमुखत्यार बनला तर? घटना कोणत्याही प्रकारची असली तरी तिचं यश हे राबवणार्‍यांवर अवलंबून असतं. त्यांची राज्य पध्दतीवरील निष्ठा आणि जनतेचं कल्याण करण्याची वृत्ती, यावर सर्व ठरतं. घटना कोणत्याही प्रकारची असली तरी तिचं यश हे राबवणार्‍यांवर अवलंबून असतं. त्यांची राज्य पध्दतीवरील निष्ठा आणि जनतेचं कल्याण करण्याची वृत्ती, यावर सर्व ठरतं. राजेशाही हा हुकूमशाहीचाच  एक प्रकार आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे लोकांना हवंहवंसं वाटणारं राज्य होतं. गुजरातमध्ये बडोद्याला सयाजीराव गायकवाडांची राजवट जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारी होती. आजही अशा अनेक राजांची नांवं इतिहासात आदराने नोंदली गेली आहेत. नेतृत्व जर भ्रष्ट असेल तर कितीही उत्तम राज्यव्यवस्था असली, तरी तिची वाटच लागणार. भारतातल्या सर्व मतदारांना आणि लोकशाहीलाही आता ही सवय झालीय. भारतात यापुढे होणार्‍या निवडणुकीत कुणालाही बहुमत मिळणार नाही असं वाटत असतानाच भाजपला नागरिकांनी स्पष्ट बहुमत दिलंय. देशात अनेक राज्यांत विविध पक्ष सत्तेवर आहेत. आज मूल्याधिष्ठित राजकारणाऐवजी व्यक्तिनिष्ठ राजकारणाला प्रारंभ झाला आहे. असं वाटावं अशी स्थिती निर्माण झालीय,  त्यामुळे लोकशाही संसदीय असावी की अध्यक्षीय याबाबत चर्चा व्हायला हवीय."


हरीश केंची, ८७८८२११६८९

Friday, 1 September 2017

सिद्धी-प्रसिद्धीचा फुत्कार

 *सिद्धी-प्रसिद्धीचा फुत्कार...!*

'प्लेबॉय' म्हणून शोभेल अशा लीला करीत असलेल्या गुरू डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित राम रहीम इन्सान या नटव्याला आपल्याच आश्रमातील दोन साध्वीवर बलात्कार केल्याप्रकरणी २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा झालीय. आणखी काही शिष्यांवर केलेल्या अत्याचाराच्या केसेस अद्याप सुनावणीसाठी आलेल्या नाहीत. त्या येतील तेव्हा त्यातही शिक्षा होईल. केवळ गुरमितच नव्हे तर देशात आज सर्वत्र अशा बाबांनी उच्छाद मांडला आहे. सगळे 'राम' नांव धारण करणारे काही 'हराम'खोर गजाआड झालेत.त्यांच्या या प्रवृत्तीला राजकारणी आणि दोन नंबरच्या धंद्यातले तथाकथित उद्योजक कारणीभूत आहेत. राजकारण्यांसाठीची प्रसिद्धी आणि बुवा बाबांची नसलेली सिद्धी या त्यांच्या सिद्धी-प्रसिद्धीच्या तथाकथित मोहमायेत सामान्य जनता, अनुयायी हे त्यांचे बुद्धिबळाच्या खेळातील प्यादे ठरताहेत. ही परिस्थिती केवळ उत्तरेकडेच आहे असं समजण्याचं कारण नाही महाराष्ट्रातही 'धर्मसत्तेनं राजसत्तेला मार्गदर्शन करावं' असं म्हणणारे सत्ताधारी आहेत. ही त्यांची मानसिकता बदलणार कशी? सत्ताधारी राजकारणीच असे वागत असतील तर मग अशा भोंदू बुवा बाबांना आवरणार तरी कोण?
-------------------------------------------


*आ*ज आधुनिक विज्ञानानं जग जवळ आलंय. बायपास होत हृदयाला भिडलंय. आयुष्याला गती देणाऱ्या, आनंद देणाऱ्या अनेक गोष्टी माणसाच्या जवळ आल्यात. तथापि अनेक सामाजिक, सांसारिक, शारीरिक व्याधी-व्यथांनी माणसाला घेरलंय. माणसं जवळ असली तरी मनानं दूर जाताहेत. अशावेळी देव, धर्म, अध्यात्म याचा त्याला आधार वाटतोय. पण ही त्याची गरज ओळखून काहींनी त्याचा बाजार मांडलाय. बाजार म्हटलं की जे काही असतं ते सारं इथे दिसतं. खरं तर सत्संग हा काही उपचार नाही, ती सहजप्रवृत्ती आहे. ती तशीच असली पाहिजे. 'शेवटचा दिस गोड व्हावा' किंवा मोक्षासाठी देव, धर्म, कार्य नाही. जे आपण अनुभवतो, जगतो त्यातील विकारांचा नायनाट करण्यासाठी सत्संग, अध्यात्म आहे. असा सत्संगच मूर्तीतल्या देवाला, धर्माला, अहंकाराला भडभुंजा ठरवणाऱ्या देवमाणसाचं दर्शन घडवितो. अस चित्र आहे.

*सुशिक्षितही यांच्या कह्यात*
या बुवाबाजीनं केवळ अशिक्षितांनाच नव्हे तर सुशिक्षितांना सुद्धा आपल्या कह्यात घेतलं आहे. त्यामुळे अल्पशिक्षित, अर्धशिक्षितांमध्ये एक वेगळ्याप्रकारच्या संभ्रमाची भावना निर्माण होते. हल्ली आपल्याकडं अध्यात्म, धर्म, श्रद्धा, यासारख्या शब्दांना बरेच चांगले दिवस आले आहेत. जिकडे तिकडे सत्संग, प्रवचन, योग शिबीर, आयोजित केली जात आहेत. प्रसिद्धीमाध्यमे दररोज अशा या बुवा बाबांच्या प्रवचनाचे रतीब घालताहेत. त्यामुळे अशा सत्संगाला हजारो भाविकांची हजेरी लागते. कुण्या बाबा-स्वामी-महाराज-पूज्य यांच्या अनुषंगाने काही वाद निर्माण झालाच तर, त्याच्या बाजूनं वादात लोक मोठ्या संख्येनं उतरतात. बाबा गुरमित याच्यावरील आरोप सिद्ध होताच त्याच्या भक्तांनी हरियाणा, पंजाबमध्ये धुमाकूळ घातला. यापूर्वी आसारामबापू, रामफल, रामवृक्ष यांच्यावर कारवाई झाली तेव्हादेखील अशारीतीने या बुवा, बाबा, गुरू, महाराज यांच्या प्रतिष्ठेच्या रक्षणार्थ त्यांचे अनुयायी रस्त्यावर उतरल्याचे आपण पाहिले आहे. मध्यंतरी नाणीजच्या नरेंद्र महाराजांच्या धर्मदंडाबाबत वाद झाला तेव्हा देखील मुंबई, औरंगाबाद विमानतळावर निदर्शने झाली, दगडफेक झाली, लाठीमार झाला होता. बुवा, बाबांच्या चरणी ज्यांनी आपल्या श्रद्धा अर्पिल्या आहेत, अशा लोकांची संख्या वाढली आहे. या भानगडीत आत्मशांती, सहिष्णुता, अहिंसा, सदाचार वगैरे शिकवण गळून पडते नि भक्त हमरीतुमरीवर येतात.

*'पुण्या'साठीचा शॉर्टकट*
देवाधर्माच्या नावाने पोट जाळणाऱ्यांनी देवाला आकारात आणि धर्माला कर्मकांडात अडकवलं. आधुनिक काळात झालेल्या भौतिक प्रगतीतून लोकांमध्ये भोगवादी वृत्ती वाढते आहे. चंगळ वाढते आहे. एकीकडे मौजमजा करायची, वाट्टेल त्या मार्गाने पैसा, संपत्ती मिळवायची आणि दुसरीकडे पुण्य गाठीशी बांधण्याचा 'शॉर्टकट' म्हणून बुवा-बाबांचा हा सत्संग करायचा; ही वाढती वृत्तीही हे प्रस्थ वाढविण्यास कारणीभूत आहे. उच्चभ्रू वर्गातील सुशिक्षित डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, शास्त्रज्ञ, व्यापारी, चित्रतारका, खेळाडू, राजकारणी, या मंडळींनी बुवा बाबांचा सत्संग हा स्टेटस सिम्बॉल झाला आहे. सामान्य माणसं त्याचं अनुकरण करतात.

*नियत साफ हवी*
बऱ्याच जणांना या परमपूज्य मंडळींचं भजन-पूजन, आणि वाणी श्रवण केलं की, आपण धार्मिक, आध्यात्मिक झालो असं वाटतं. स्वामी विवेकानंदांनी या वृत्तीवर परखड टीका केलीय. ते म्हणतात, " खऱ्या धर्मात कोणत्याही विश्वासाला आणि श्रद्धेला स्थान नाही. कोणत्याही महान धर्माचार्याने अंधविश्वासाची शिकवण दिलेली नाही. अंधविश्वास हा धर्मग्लानीकाळातच पुढे येतो. मूर्ख लोक कोणातरी महान विभूतीचे अनुयायी असल्याचा आव आणतात आणि त्यांच्या स्वतःमध्ये कोणतेही सामर्थ्य नसले, तरी इतरांना डोळे मिटून विश्वास ठेवण्याचा उपदेश देतात. पण विश्वास ठेवायचा कशावर? आंधळेपणाने श्रद्धा ठेवल्याने माणसाचा अधःपात होतो. तुम्ही नास्तिक झाला तरी चालेल, पण कशावरही डोळे मिटून विश्वास ठेवू नका. उगीच स्वतःला पशूंच्या पातळीवर का घसरू देता? त्यामुळे तुम्ही स्वतः चेच नुकसान घेत नसून, समाजाचेही नुकसान करता! अंधविश्वासाच्या भरीला न पडता दृढतेनं तर्कबुद्धीच्या सहाय्यानं विचार करा. या अवस्थेप्रत जेव्हा तुम्ही पोहोचाल तेव्हाच तुम्ही धार्मिक व्हाल. तोपर्यंत तुम्ही पशुपेक्षा भिन्न नसाल," तर महात्मा गांधींनी म्हटलंय 'श्रद्धा ही नीतीला पर्याय नाही'. मानवी व्यवहाराच्या नावानं दिवसभर अशुभं करायचं आणि सांजवातीला शुभंकरोती म्हणायचं, ही विसंगती देवाधर्माला बदनाम करणारी आहे. अंतरीचा ज्ञानदीप सतत तेवत असेल तर रोजचं जगणंही उजळून निघेल, यासाठी कुणाची करुणा भाकायची गरज नाही. नियत साफ असली म्हणजे बस्स!

*सत्संगाचे सोहळे*
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. सातशे वर्षांची संत परंपरा आहे. पण तुकडोजी महाराजानंतर ती संपली. आज संत म्हणण्याच्या लायकीचा एकही अध्यात्मिक पुरुष नसला तरी बुवा, बाबा, स्वामी, परमपूज्य, महाराज यांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. त्यांच्याही देवस्थानचे अड्डे थाटात उभे राहत आहेत. अध्यात्म, सत्संग याला धंद्याचं स्वरूप आलंय. सत्संगासाठी हे बुवा, बाबा लाख लाख रुपयांच्या सुपाऱ्या घेताहेत. ह्या सुपाऱ्यांबरोबरच सत्संगासाठीच्या मंडपाला, लाऊडस्पीकरला, प्रसिद्धीला त्याहून अधिक पैसा खर्च केला जातो. तो काही या बुवा, बाबांच्या खिशातला नसतो. तो कुठून आणला जातो? कोण देतो? याची विचारपूस बुवा बाबा करतात का? मिळालेल्या पैशाचा हिशेब कधी कुणाला देतात का? कुमार्गातले दोन नंबरचे धंदे करणारे आणि राजकारणी यांचा हा पैसा असतो.  त्यांच्या दातृत्वाची किंमत त्यांच्या गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष करून मोजावी लागते. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.पण सत्संगाचे मोठमोठाले सोहळे भरवून आपल्या भक्तीचे आणि भक्तांच्या सांघिक शक्तीचे दर्शन घडविण्याची संधी हे बुवा बाबा सोडत नाहीत. माणसात देव आहे म्हणायचं आणि त्यालाच आपला मोठेपणा मिरवण्यासाठी झुकवायचं, वापरायचं हा कसला सत्संग? महाराष्ट्रातल्या संतांनी आखून दिलेला मार्ग हा सन्मानानं जीवनप्रवास करण्याचे बळ देणारा आहे. या प्रवासातील देवांच्या दलालांची आणि धर्माच्या 'हवाला'दारांची गरजच काय?

*राजकारण्यांची खेळी*
गुरमितसारख्या बाबांचे स्तोम उत्तर भारतात खास करून हरियाणा व पंजाबच्या भागात मोठ्याप्रमाणात आहे. उत्तर प्रदेश व उत्तरांचल मध्ये देखील हे प्रमाण अधिक दिसते. याला कारण तिथली सामाजिक व्यवस्था आहे. तिथली जातीय उतरंड आणि असमतोल सामाजिक स्थिती लोकांच्या मनात एक असुरक्षितता निर्माण करत असते. जातीच्या उतरंडीमुळे होणारा अन्याय दूर करण्यासाठी म्हणून डेराच्या अनुयायांनी शीख धर्माचा स्वीकार केला. शीख धर्म तसा सिद्धांत म्हणून जातीविरहित आहे पण, प्रत्यक्षातली परिस्थिती दुर्दैवाने फारच वेगळी आहे. जाट-खत्री या उच्चवर्णीय जातींचा शिखांच्या धार्मिक घटनाचक्रावर प्रभाव आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी आणि इतर गुरुद्वारा समित्यांमध्ये त्यांचंच प्राबल्य आहे. त्यांच्यानंतर शीख धर्मात आलेल्यांना पद्धतशीरपणे सत्तास्थानांपासून दूर ठेवलं जातं.  जातीय उच्चनीचतेचं समीकरण या धर्मातही अबाधित ठेवलं गेलं आहे. या असमतोल स्थितीमुळे अनेकांच्या मनात न्यूनत्व येते आणि स्वतःसाठी एक सन्मानजनक स्थिती हवी असते. आणि यातूनच अशाप्रकारचे डेरे आणि बाबांचा जन्म झालाय. कबीरपंथीय रामपाल असो की गुजरात मधील आसाराम या सर्वांनी या लोकांना एक आत्मभान दिले. व्यसनमुक्ती हा एक नवा मंत्र दिला आणि स्वतःची अशी एक वेगळी नशा दिली ज्यातून लोक जोडले जाऊ लागले. धार्मिक कार्यक्रमात सन्मान प्राप्त करू लागले. डेरे,  मठ आणि आश्रम माणसांनी गजबजून राहू लागले. याचा लाभ राजकारणी मंडळींनी घेतला ज्यांना आपल्या राजकारणासाठी ही मंडळी लाभदायक होती. त्यांना व्होटबँक ओळखता येते. म्हणूनच तर ते राजकारणी असतात. त्यांनी असे डेरे उभे राहू दिले, त्यांचा उत्कर्ष होऊ दिला, त्यांची संख्या वाढू दिली. या डेऱ्यांना त्यांनी मोकळं रान दिलं. त्यांना सर्व प्रकारचं पाठबळ देऊन त्यांच्या रूपाने हक्काची मतपेढी बाबांच्या माध्यमातून निर्माण केली. कालचे विरोधक हे आजचे सत्ताधारी बनलेत ते अशाच बाबांच्या सहाय्यानं त्यामुळे शपथविधी सोहळ्याला त्यांना सन्मानानं उच्चासनावर बसवलं गेलं. सत्ता हाती येताच याच बाबांचा वापर विरोधकांनी करु नये, आपल्या विरोधात ही मंडळी जाऊ नयेत म्हणून त्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी संपविण्याचा प्रयत्न सुरू झालाय, हे विशेष!

*विवेकाची कास सोडलीय*
मात्र महाराष्ट्रात तशी स्थिती फारशी नसली तरी सध्या अध्यात्माच्या नावाने जे काही प्रकार सुरू आहेत ते पाहता महाराष्ट्रातल्या अनेक समाजसुधारकांनी, संतांनी, निर्माण केलेले प्रबोधन लुप्त झालं आहे की काय आणि इथल्या माणसांनी हा सारा संस्कार पाहता  पाहता पुसून टाकला की काय? असं वाटून जावं अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रात आणि देशात अध्यात्माची जी नवी आवृत्ती बुवा, बाबांच्या रूपानं अवतरली आहे आणि तिला जो उदंड प्रतिसाद लाभतो आहे, ती पाहता या मंडळींनी ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा सारखे धार्मिक ग्रंथ पचवून एक जोरदार ढेकर दिलेली दिसते. कालपर्यंत खेडूत, ग्रामीण, अशिक्षित, गरीब वर्गाच्या श्रद्धांना विधींना, पुजांना, परंपरांना 'अंधश्रद्ध' म्हणणारा शहरी सुशिक्षित तुलनेने सुस्थिर पांढरपेशा, मध्यमवर्ग अशा विचारांची, विवेकाची कास सोडून बाजू बदलू पाहतो नि सत्संगाना नि प्रवचनांना उपस्थिती लावू पाहतो आहे. या वर्गाने काल पर्यंत मागासलेले अंधश्रद्ध असं ज्यांचं वर्णन केलं होतं, त्यांच्या मांडीला मांडी लावून सश्रद्ध बनले आहेत. त्यामुळेच सत्संगाना हजेरी लावणं, आस्था, संस्कार, जागरण, साधना यासारख्या धार्मिक, आध्यात्मिक चॅनल्सवरील प्रवचन ऐकणं, त्यांच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या वादात 'भक्त' या नात्यानं सामील होणं असे कारनामे हा वर्ग करू लागलाय. शिक्षणाचा, शहाणपणाचा, योग्य-अयोग्य ठरविण्याचा मक्ता आपल्याकडं आहे, असं मानणारा हा वर्ग पाहता पाहता नवाध्यात्मिक लाटेत सामील झालाय. हे चिंताजनक आहे तिकडे जातीची उतरंड होती इकडे संतांच्या शिकवणीनं, पुरोगामी विचारधारेच्या प्रसारानं ती फारशी नाही. पण यातलं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे.

*सत्संगासाठीच्या सुपाऱ्या*
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. सातशे वर्षांची संत परंपरा आहे. पण तुकडोजी महाराजानंतर ती संपली. आज संत म्हणण्याच्या लायकीचा एकही अध्यात्मिक पुरुष नसला तरी बुवा, बाबा, स्वामी, परमपूज्य, महाराज यांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. त्यांच्याही देवस्थानचे अड्डे थाटात उभे राहत आहेत. अध्यात्म, सत्संग याला धंद्याचं स्वरूप आलंय. सत्संगासाठी हे बुवा, बाबा लाख लाख रुपयांच्या सुपाऱ्या घेताहेत. ह्या सुपाऱ्यांबरोबरच सत्संगासाठीच्या मंडपाला, लाऊडस्पीकरला, प्रसिद्धीला त्याहून अधिक पैसा खर्च केला जातो. तो काही या बुवा,बाबांच्या खिशातला नसतो. तो कुठून आणला जातो? कोण देतो? याची विचारपूस बुवा बाबा करतात का? मिळालेल्या पैशाचा हिशेब कधी कुणाला देतात का? कुमार्गातले दोन नंबरचे धंदे करणारे आणि राजकारणी यांचा हा पैसा असतो.  त्यांच्या दातृत्वाची किंमत त्यांच्या गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष करून मोजावी लागते. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.पण सत्संगाचे मोठमोठाले सोहळे भरवून आपल्या भक्तीचे आणि भक्तांच्या सांघिक शक्तीचे दर्शन घडविण्याची संधी हे बुवा बाबा सोडत नाहीत. शिवाय प्रसिद्धीमाध्यमे जाहिरातीच्या आमिषानं अशा बाबांच्या, बुवांच्या, महाराजांच्या सोहळ्याची रसभरीत वर्णन प्रसिद्ध करीत असतात. दूरचित्रवाणीवरील वाहिन्या त्यांच्या या सत्संगाचं नियमित रतीब घालीत असतात त्यानं ही भोळी भाबडी माणसं आणि आपल्या कृष्णकृत्यानं आत्मभान हरवलेली मंडळी अशा बाबा, बुवांच्या चरणी लीन होतात.

 *यांना आवरणार कोण?*
देशभर गाजत असलेल्या आणि 'प्लेबॉय' म्हणून शोभेल अशा लीला करीत असलेल्या गुरू डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित राम रहीम इन्सान या नटव्याला आता आपल्याच आश्रमातील दोन साध्वीवर बलात्कार केल्याप्रकरणी २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा झालीय. आणखी काही शिष्यांवर केलेल्या अत्याचाराच्या केसेस अद्याप सुनावणीसाठी आलेल्या नाहीत. त्या येतील तेव्हा त्यातही शिक्षा होईल. केवळ गुरमितच नव्हे तर देशात आज सर्वत्र अशा बाबांनी उच्छाद मांडला आहे. सगळे 'राम' नांव धारण करणारे काही 'हराम'खोर गजाआड झालेत.त्यांच्या या प्रवृत्तीला राजकारणी आणि दोन नंबरच्या धंद्यातले तथाकथित उद्योजक कारणीभूत आहेत. राजकारण्यांसाठीची प्रसिद्धी आणि बुवा बाबांची नसलेली सिद्धी या त्यांच्या सिद्धी-प्रसिद्धीच्या तथाकथित मोहमायेत सामान्य जनता, अनुयायी हे त्यांचे बुद्धिबळाच्या खेळातील प्यादे ठरताहेत. ही परिस्थिती केवळ उत्तरेकडेच आहे असं समजण्याचं कारण नाही महाराष्ट्रातही 'धर्मसत्तेनं राजसत्तेला मार्गदर्शन करावं' असं म्हणणारे सत्ताधारी आहेत. ही त्यांची मानसिकता बदलणार कशी? सत्ताधारी राजकारणीच असे वागत असतील तर मग अशा भोंदू बुवा बाबांना आवरणार तरी कोण?


हरीश केंची

प्रभंजन साठीचा लेख

मोदींच्या सौगाताची खैरात...!

"एकीकडे औरंगजेबाच्या कबरीचा घातलेला गोंधळ, आजवर भक्तांनी मुस्लिमांबाबत व्यक्त केलेला टोकाचा द्वेष, तिरस्कार, वक्फ दुरुस्ती ...